डॉ. गंगाधर पानतावणे : ‘अस्मितादर्श’चे ध्यासपर्व संपले (उत्तरार्ध)
संकीर्ण - श्रद्धांजली
दत्ता भगत
  • डॉ. गंगाधर पानतावणे (२८ जून १९३७ - २७ मार्च २०१८)
  • Fri , 04 May 2018
  • संकीर्ण श्रद्धांजली डॉ. गंगाधर पानतावणे Gangadhar Pantawane दत्ता भगत Datta Bhagat अस्मितादर्श Asmitadarsh

‘अस्मितादर्श’ या नियतकालिकाचे संपादक, दलित साहित्याचे प्रमुख आधारस्तंभ आणि ख्यातनाम लेखक डॉ. गंगाधर पानतावणे यांचं २७ मार्च २०१८ रोजी औरंगाबाद इथं निधन झालं. त्यांच्याविषयी या ना त्या कारणानं निर्माण झालेल्या गैरसमजांना चोख उत्तरं देणारा हा त्यांच्या मित्रांनी लिहिलेला लेख...

.............................................................................................................................................

खरं तर पानतावणे सरांच्या आंबेडकर निष्ठेबदल कुणीही शंका घेण्याचं काही कारण नाही. स्वत: बाबासाहेब आंबेडकरांना आपण Most Misunderstood Leader आहोत याची जाणीव होती. आंबेडकर अनुयायांनासुद्धा त्यांचं हे स्वत:विषयीचं बोलणे किती सार्थ होतं याची जाणीव आहे. पानतावणे सर अशा अनुयायांपैकी एक होते. म्हणूनच त्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या पत्रकारितेच्या अंगानं अभ्यास केला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका दुर्लक्षित पैलूवर प्रकाश टाकून पीएच.डी.सारखा प्रबंध लिहिला.

‘दलित साहित्य’ म्हणावं की ‘आंबेडकरी साहित्य’ असा एक वाद निर्माण झाला होता, त्या वेळची गोष्ट. पानतावणे सर ‘अस्मितादर्श’ नियतकालिकाचे संपादक होते. या निमित्तानं त्यांनी ‘दलित साहित्य’ हा शब्दप्रयोग असंख्य वेळा वापरला होता. आश्चर्य असं की ज्यांनी या शब्दाला कडाडून विरोध केला, त्यांनीही हा शब्द पूर्वायुष्यात वापरलेला होता. शिकलेल्या लोकांनी मला धोका दिला, असं सांगत मा. काशीरामजींनी चळवळ उभी केली, तेव्हा अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी ‘दलित’ या शब्दाच्या वापरावर कठोर हल्ले सुरू केले. हा शब्द मुद्दामच आंबेडकरी अनुयायांसाठी वापरून त्यांच्या अस्मितेवर हिंदुत्ववाद्यांनी घाला घातला, हे अनेकांच्या गळी उतरवण्यात आलं, पण त्यासाठी आपणालाच जवाबदार धरलं जातं, असं गृहीत धरून त्यांनी अनेक ठिकामी खुलासे केले. त्यातच त्यांचं समरसता मंचाच्या महाराष्ट्र पातळीवरील समारोपाला पाहुणे म्हणून उपस्थित राहणं त्यांच्यावर प्रहार करण्यासाठी साधन म्हणून वापरलं गेलं. डॉ. प्र. ई. सोनकांबळे आणि मी समरसता मंचावर उपस्थित राहिलो, हे त्यांचं सांगणंही बचाव म्हणून त्यांच्या फारसं उपयोगी पडलं नाही.

प्र.ई. सोनकांबळे त्यांच्या आत्मकथनामुळे वाचनात लोकप्रिय झाले होते. डॉ. सोनकांबळेंचं लेखन दलितांच्या अस्मितेची हानी करणारं आहे, ही पानतावणे सरांची भूमिका होती. ही त्यांची समीक्षक म्हणून असलेली भूमिका उभ्या महाराष्ट्राला मान्य होती असं नाही. डॉ. सोनकांबळेंचं लेखन दलितांना पशुतुल्य वागणूक देणाऱ्या परंपरेचा वाचकांच्या मनात निषेधच जागा करत होतं. पण सवर्ण समीक्षकांना त्यांच्या लेखन शैलीत आणखी एक सुखवणारं वैशिष्ट्ये होतं, त्याबदल कुतूहलही होतं आणि वाचकांना आदरही वाटत होता, तो पानतावणे सरांनी लक्षात घेतला नाही. अत्यंत परंपरागत आणि कर्मठ शैलीतही सनातनी माणसं आपल्या धर्माची पायमल्ली होणार नाही, अशा बेतानं दलितांना माणुसकीची कशी वागणूक देतात याचं एक नकळतपणे दर्शन ‘आठवणींचे पक्षी’मधून घडत होतं. त्यामुळेही सर्वत्र वाचक सुखावत होता. हे समाजशास्त्रीय बळ पानतावणे सरांनी फारसं लक्षात घेतलं नाही. त्यात महाराष्ट्रातल्या प्रादेशिक अस्मितांचा संदर्भ साहित्य चळवळीत घुसला होता आणि औरंगाबादच्या नागसेनवनात तर तो अधिकच टोकदार झाला होता. माझ्यापुरतं बोलायचं तर मी कुरुंदकराचा विद्यार्थी असल्यामुळे माझ्याबद्दलची जी काही दलित-दलितेतरांची मतं होती, त्यात फारसा बदल होणं शक्यच नव्हतं. ती सर्व मतं ठरलेलीच होती. आणि या मताच्या बऱ्या-वाईट परिणामांचा मी सुरुवातीपासूनच स्वीकार करायचा हे मनानं आधीच ठरवून टाकलं होतं. तेव्हा माझ्या बाजूनं मी कधी खुलासे-प्रतिखुलासे या भानगडीत पडलो नाही. या असल्या आरोपांचा बौद्धिक शीण घेण्याची मला आवश्यकता वाटत नव्हती. पण पानतावणे सरांना असा शीण घेणं टाळता येणं शक्य नव्हतं. कारण साहित्याच्या चळवळीतलं त्यांचं स्थान एका नेत्याचं होतं, ते केवळ सामान्य कार्यकर्त्याचं नव्हतं. म्हणूनच समरसता मंचावरील उपस्थितीबाबत त्यांनी खुलासे केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राजकारणात प्रवेश झाला. १९२० ते १९३० या पहिल्या दशकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म. गांधी यांच्या नेतृत्वाकडे अनुकूलतेने पाहत होते. गांधीजींशी झालेल्या पहिल्या भेटीत त्यांचा भ्रमनिरास झाला. दुसऱ्या गोजमेज परिषदेनंतर ते म. गांधीपासून दुरावले. १९४६ साली ते त्यांना शत्रू मानू लागले. या विकास काळात कम्युनिस्ट पक्षाचा उदय झाला. व्यावहारिक पातळीवर कम्युनिस्टांशीही बाबासाहेबांचं जमेनासं झालं. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत डांगे यांच्यामुळेच शेकापचा पराभव झाला, हा बाबासाहेबांचा समज दृढ झाला. मार्क्स आणि कम्युनिस्ट पक्षाबद्दलच्या बाबासाहेबांच्या अतिशय कडव्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. त्याच वेळी बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांत अत्यंत संवेदनक्षम वयातील उच्चशिक्षित दलित विद्यार्थी त्यांच्याकडे आकर्षित होत होते. पाणतावणे सर अशा विद्यार्थ्यापैकी होते. त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट यांच्याबद्दलची एक तीव्र विरोधाची भावना पानतावणे सरांच्या मनात रुजली होती. काहींनी मार्क्स आणि कम्युनिस्ट यांच्यासंबंधांचं अभ्यासनिष्ठ परिशीलन केलं. त्यांनी बाबासाहेब आणि मार्क्स यांच्या अन्वयाचा शोध घेत नवी मांडणी केली. त्यात डॉ. रावसाहेब कसबे, दया पवार, यशवंत मनोहर, बाबूराव बागूल इत्यादी लेखक मंडळी होती. पानतावणे यांना मात्र हा अन्वय गंभीरपणे समजून घ्यावा याची आवश्यकता वाटत नव्हती. आजही हे दोन गट आंबेडकरी साहित्यात आढळून येतात. त्यात पानतावणे सर मार्क्सवादाच्या विरोधाबद्दल कडवे होते. तशा प्रतिक्रिया जाहीर वक्तव्यांतून देत असत. एका बाजूला गुरूतुल्य संबंध असणारे ग.त्र्यं. माडखोलकर यांचा ओलावा आणि दुसऱ्या बाजूला मार्क्सबद्दलचा कडवा विरोध यांचा संदर्भ मॅग्निफाय (विस्तारीत) करण्याचा प्रयत्न त्यांच्या शत्रूंनी केला. त्यामुळे त्यांना ते आतून समरसतावादी आहेत, हे ठरवणं सोपं गेलं.

पानतावणे सर साहित्याचं व्यासपीठ चालवत होते. त्यामुळे त्यांचे वैयक्तिक पातळीवर अनेक साहित्यिकांशी मैत्रीचे संबंध होते. अशा मित्रात संघवादी साहित्सिकसुद्धा होते. याचाही त्यांच्या विरोधासाठी हत्यार म्हणून वापर केला जात होता. हे सर्व त्यांना कळत नव्हतं असं नाही. पण साहित्यिकांचे संबंध आणि वैचारिक भूमिका यातील भेद लक्षात घेण्यासारखा आपला समाज पुढच्या टप्यावर आलेला नाही म्हणून त्याकडे ते दुर्लक्ष करत होते. हे दुर्लक्ष केल्यामुळे जो काही ठपका आपल्यावर येईल, तो त्यांनी बुदध्याच स्वीकारला होता असं मला वाटतं.

‘अमृत’ मासिकातून त्यांनी ‘विद्रोहाचे पाणी पेटले आहे’ ही लेखमाला लिहिली. पुढे या लेखमालेचं त्याच नावानं पुस्तक निघालं. दलित साहित्याच्या चळवळीचा शोध घेत ते पन्नास वर्ष मागे गेले आणि त्या वेळच्या साहित्य चळवळीला त्यांनी इतिहासाचं पाठबळ मिळवून दिलं. आपला सर्व रिकामा वेळ दलित साहित्याच्या चळवळीला समृद्ध करण्यासाठी जेवढा वापरता येणं शक्य आहे, तेवढा त्यांनी वापरला. त्यामुळे स्वतंत्र स्वरूपाचं सृजनपर लेखन मात्र त्यांनी कमी केलं. सृजनपर लेखन लिहिताना त्यांना अभिजात भाशाशैलीचं अधिक आकर्षण वाटत असावं असा माझा तर्क आहे. ‘मृत्यूशाळा’ हा त्यांचा दीर्घांक अशा लेखनाचं एक आगळंवेगळं उदाहरण आहे. मनानं ते अत्यंत संवेदनशील होते. त्यामुळे एखाद्या मनाला न आवडणाऱ्या मताबद्दल, घटनेबदल ते तात्काळ नापसंतीची प्रतिक्रिया व्यक्त करत असत. त्यामुळे माणसं त्यांच्यापासून दुरावली जात. त्यांच्या अशा प्रतिक्रिया तिरकस शैलीतून व्यक्त होत असत. ‘हलगी’ या सदरातून आलेल्या लेखनात त्यांच्या अशा अनेक तिरकस स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त झालेल्या आहेत.

दलित साहित्याच्या संदर्भात त्यांनी केलेली तात्त्विक मांडणी मला पुरेशी समाधानकारक वाटली नाही. माझ्या ‘दलित साहित्य : दिशा दिशांतर’ या पुस्तकात मी त्यांच्या नावाचा कुठेही उल्लेख न करता माझी मतभिन्नता नोंदवली आहे. ‘वाटा-पळवाटा’ अथवा ‘अश्मक’ या माझ्या नाटकांबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करणं पानतावणे सरांनी टाळलं. मीही स्वत:हून या संदर्भात त्यांच्याशी कधी बोललो नाही. मतभिन्नतेच्या सरहदी कायम ठेवूनही मैत्री जपता येतं, असं मला नेहमीच वाटत आलं आहे.

‘अस्मितादर्श’ नियकालिकाला आता पन्नास वर्ष पूर्ण होत आली आहेत. म्हणून सुवर्ण महोत्सवी मेळाव्याच्या आयोजनासाठी ते अत्यंत उत्साहानं अनेक ठिकाणी दौरे काढत होते. कदाचित त्यांना हा मेळावा नांदेडला घ्यायचा असावा. अर्थात मला हे नक्की माहीत नाही. कारण त्या निमित्तानं नांदेडला झालेल्या बैठकीस मी उपस्थित नव्हतो. मी निमंत्रितही नव्हतो. ‘अस्मितादर्श’ नियतकालिकाचा दुसरा लेखक-वाचक मेळावा २५-२६ जानेवारी १९७५ दरम्यान नांदेडला झाला होता. या मेळाव्यात स्वयंसेवकासारखे अत्यंत उत्साहानं राबलेले अनेक विद्यार्थी आज प्रतिथयश साहित्यिक म्हणून ओळखले जातात. उदाहरणार्थ डॉ. जगदीश कदम, निर्मल सूर्यवंशी, भगवान अंजनीकर, रवीचंद्र हडसनकर इत्यादी. या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष होते अ‍ॅड. यशवंतराव आठवले, तर या मेळाव्याचे अध्यक्ष होते शंकरराव सुरडकर (पोलिस महासंचालक सुधाकरराव सुरडकर यांचे तीर्थरूप). लौकिक असणारे अनेक लेखक-कवी या मेळाव्यात उपस्थित होते. हा केवळ मेळावा नव्हता. सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मेळाव्याचं स्वरूप एखाद्या प्रादेशिक साहित्य संमेलनासारखं होतं. मेळाव्याच्या आयोजक समितीत आम्ही फक्त चार मित्र होतो. त्यातही मी लेखक असल्यामुळे सर्व लेखकांचे पत्ते मिळवणे, त्यांचे होकार मिळवणे, ही सर्व जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आलेली होती. आयोजकांना पानतावणे सरांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. अनेक लेखक-कवींचे पत्ते त्यांनीच दिले होते. त्याशिवाय मेळाव्याच्या यशासाठी स्थानिक पातळीवर सल्लागार समिती तयार केलेली होती. पद्मश्री श्यामराव कदम, प्राचार्य गो.रा. म्हैसेकर आणि गुरुवर्य कुरुंदकर अशी ही तिघांची सल्लागार समिती होती. स्वाभविकच या सल्लागार समितीच्या भूमिकेचंही प्रतिबिंब आयोजनात उठून दिसेल असंच होतं. अनेक साहित्यिकांना कुरुंदकर गुरुजींचं एक वेगळं आकर्षण होतं. त्यांचा पश्चिम महाराष्ट्रात पुरेसा वैचारिक दबदबा होता. कुरुंदकर या दोन्ही दिवशी उदघाटन समारंभापासून ते समारोपाचे आभारप्रदर्शन होईपर्यंत सर्वच कार्यक्रमासाठी श्रोत्यात उपस्थित होते. दलित साहित्यिकांत फाटाफूट नव्हती, अशा एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे घेण्यात आलेला पहिलाच मेळावा होता. आणि हाच अखेरचाही मेळावा ठरला.

तिसरा मेळावा मुंबईत झाला. मी मेळाव्यात उपस्थित होतो. मेळावा वडाळ्यास झाला. पण वडाळ्यातच हाकेच्या अंतरावर दोन सभामंडप पडले होते. एका मंडपात नारायण सुर्वे, बाबूराव बागूल होते, तर दुसऱ्या मंडपात वामन होवाळ आयोजक म्हणून मिरवत होते. या मंडपात अस्मितादर्श परिवारातली खास मंडळी होती. तर दुसऱ्या मंडपातील उपस्थितात खूप दलित साहित्यिक होते, पण त्या उपस्थितांचं छत मात्र मार्क्सवादाचं होतं.

माझं नाव दोन्ही निमंत्रण पत्रिकेत होतं. नेमकं कुठे उपस्थित राहावं हा प्रश्न माझ्यासमोर होता. पण वामन होवाळांनी हा तिढा सोडवला. ‘त्या मंडपात उपस्थित राहताना तुझी इकडची उपस्थिती अडचणीची होत नसेल तर तू तिथंही जा. आपलं नातं आपल्या लेखणीशी असलं की झालं’, असं ते म्हणाले. आणि मी दोन्ही मंडपातल्या मोजक्या कार्यक्रमांना उपस्थित राहिलो. हे असं का घडलं? नांदेडला इतका यशस्वी झालेला अस्मितादर्श लेखक-वाचक मेळावा अवघ्या एकाच वर्षात का विभाजित झाला, हा प्रश्न मला अनेक वर्ष छळत होता. शक्यतो कुणीही याचे उत्तर द्यायचा प्रयत्न कधी केला नाही. पण अवघ्या चार-पाच वर्षानंतरच मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. हिंमत करून आणि ५० व्या मेळाव्याची संधी साधून निदान पानतावणे सरांना तरी बोलून दाखवावं असं मी मनोमन ठरवलं होतं. पण माझी ही इच्छा तशीच राहून गेली.

खरं तर नांदेडच्या मेळाव्याच्या यशानंच दुहीची बीजं अदृश्य स्वरूपात रुजवली होती. त्या मेळाव्याच्या प्रास्ताविकपर भाषणात पानतावणे सर जाहीरपणे म्हणाले होते, ‘हा मेळावा लेखक-वाचकांचा आहे. त्यामुळे आयोजनाचंही स्वातंत्र्य स्थानिक मंडळींना असतं, तसं ते इथंही आहे. मी सर्वांचं स्वागत करतो.’ पण मेळाव्याच्या आयोजनात वैचारिक भूमिकांच्या सरहद्दी असतात, त्या अदृश्य असतात, पण असतात हे मला नंतर कळालं. कविता वाचनाच्या कार्यक्रमात मेश्राम आणि सुर्वे यांच्यातील दुरावा जाणवला. मी एका टोकावरच्या गावात राहत होतो. त्यामुळे वामनराव भट अथवा दिनकर साक्रीकर यांच्या भूमिका मला त्यावेळी तरी माहीत नव्हत्या. नारायण सुर्वे यांची वैचारिक भूमिका जगजाहीर होती. इतक्या विविध प्रकारच्या वैचारिक भूमिका असणारे साहित्यिक एकाच वेळी उदयोन्मुख असलेल्या व्यासपीठावर एकत्रित येणार असतील तर अस्मितादर्शच्या मूळ उद्देशाचं काय? त्या व्यासपीठाच्या स्वातंत्र्याचं काय, असं मला आज वाटतं. हे प्रश्न त्याच वेळी पानतावणे सरांच्या मनात असावेत. त्यांनी स्पष्ट शब्दात तसं बोलून दाखवलं नाही. पण त्या नंतरच्या मेळाव्याच्या आयोजनात काय घडलं असावं याचा आज मी तर्क करू शकतो. गेल्या २५-३० वर्षातल्या संदर्भांचे तपशील माझा तर्क खरा किंवा खोटा हे केव्हातरी तपासून पाहावेत असं ठरवत होतो. पण काळानं ही संधीच हिरावून घेतली.

पानतावणे सरांना मी अखेरचं बोललो ते वामन होवाळ गेले तेव्हा. मी मुंबईत होतो. वामनराव आणि पानतावणे सर यांचे संबंध अतिशय घट्ट होते, हे मला माहीत होतं. या वयातसुद्धा ते अत्यंयात्रेसाठी धडपडत येतील याची मला कल्पना होती. मी फोन केला तेव्हा ते निघण्याच्या तयारीतच होते. पण मी आणि प्रेमानंद असं आम्ही दोघांनीही त्यांनी येऊ नये असं आग्रहानं सांगितलं. एक तर ते वेळेवर पोचू शकणार नाहीत आणि घोटी गावाजवळ रस्त्याची कामं चालू असल्यामुळे अनेक डायव्हर्जन्स आहेत. आमची विनंती त्यांनी मान्य केली. काही दिवसांपूर्वीच वामनरावांची भेट घेऊन ते परतले होते. पण मी मात्र मुंबईत असून माझ्या आजारपणामुळे वामनरावांना भेटू शकलो नव्हतो. केव्हातरी वामनरावांच्या उपस्थितीत ‘अस्मितादर्श’च्या सुवर्ण महोत्सवाबदल त्यांना छेडावं असं मनात होतं. पण आता ना वामनराव आहेत, ना पानतावणे सर.

प्रकृती ठीक नसल्यामुळे, भेटीगाठीचा त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या आजारपणाचं गांभीर्य अनेकांना कळवण्यात आलं नव्हतं. कदाचित याच कारणामुळे असेल त्यांच्या जवळपास वावरणाऱ्या मित्रांनीही मला त्यांच्या आजारपणाची माहिती दिलीच नाही. त्यामुळे त्यांची अखेरची भेट व्हावी, ही इच्छा मात्र मनातच राहून गेली.

पानतावणे सरांनी दलित लेखन कृतींची सांगितलेली मूल्यं मला मान्य नव्हती. बौद्ध संस्कृतीचं वेगळेपण नोंदवण्यासाठी अनेकविध नवनवे शब्द वापरण्याचा त्यांचा हट्ट मला मान्य नव्हता. मार्क्सवादी भूमिकेबदल मी त्यांच्याशी सहमत नव्हतो. ‘अस्मितादर्श’च्या प्रथम संपादक पदाबद्दलचा टोकाचा आग्रह मला महत्त्वाचा वाटत नव्हता. अशा अनेक मुद्यांबद्दल माझ्या मनात मतभिन्नता होती.

असं असलं तरी त्यांचं मोठेपण मात्र मला मान्य होतं. साहित्य निर्मितीचा आत्मविश्वास नसणाऱ्या अनेक लेखकांना त्यांनी बळ पुरवलं. साहित्य क्षेत्रातली वाद अथवा मतभिन्नतेबदलचे आग्रह साहित्याचे नुकसान करत नसतात. उलट ते साहित्यिक जाणीवा अधिक सुस्पष्ट आणि समृद्ध करत असतात, हे ज्यांना कळतं ते पानतावणे सरांचं ऐतिहासिक कार्य विसरू शकणार नाहीत. त्यांनी मराठी साहित्यांच्या मध्यवर्ती प्रवाहात दलित साहित्याचं स्वतंत्र दालन निर्माण केलं. स्वत:चं एक स्वतंत्र्य स्थान निर्माण केलं आणि मराठी साहित्यालाच वेगळ्या अर्थानं समृद्ध केलं. पानतावणे सरांचं हे साहित्यिक योगदान आहे असं मला वाटतं. म्हणूनच त्यांच्या निधनानं ‘अस्मितादर्श’चं ध्यासपर्व संपलं, असं मला जाणवतं.   

(समाप्त)   

.............................................................................................................................................

लेखक दत्ता भगत प्रख्यात नाटककार आणि दलित रंगभूमीचे एक अध्वर्यू आहेत.

editor@aksharnama.com 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......