अजूनकाही
हा अंक छापायला गेला त्या दिवशी (२३ एप्रिल) सर्वोच्च न्यायालयाने शाहबानो खटल्यात ऐतिहास निकाल दिला, त्या घटनेला ३२ वर्षे पूर्ण झाली. आणि हा अंक सर्व वाचकांच्या हातात पडलेला असेल तेव्हा (३ मे) हमीद दलवाई यांचा ४१ वा स्मृतिदिन आलेला असेल. भारतातील मुस्लिम राजकारण आणि सामाजिक सुधारणा या दोन्हींच्या संदर्भात दलवाईंनी पन्नास वर्षांपूर्वी रॅशनल, सेक्युलर आणि देशाला एकात्म व आधुनिकतावादी बनवणारी भूमिका मांडली आणि त्यानुसार दहा-बारा वर्षांच्या काळात झंझावातासारखी कामगिरी बजावली. वयाची ४५ वर्षे पूर्ण होण्याच्या आतच दलवाईंचे निधन झाल्याने, कितीतरी पुढे जाऊ शकणारी ती प्रक्रिया बरीच मंदावली. त्याची इतर अनेक कारणे सांगता येतील, पण तीन प्रमुख कारणे अशी :
एक- १९८६ मध्ये शाहबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल तत्कालीन केंद्र सरकारने कायदा करून फिरवणे. दोन- १९९१ मध्ये राम मंदिरासाठी केल्या गेलेल्या आंदोलनात बाबरी मशीद उद्ध्वस्त होणे. तीन- २००२ मध्ये गोध्रा हत्याकांडानंतर हिंदुत्वाची प्रयोगशाळा या नावाखाली गुजरातमध्ये झालेल्या दंगली. या तीनही घटना गेल्या तीन दशकांतील आहेत आणि देशाच्या समाजजीवनावर दूरगामी परिणाम करणाऱ्या ठरल्या. त्यामुळे हिंदुत्ववादी शक्तींचा प्रभाव वाढत गेला आणि मुस्लिम समाज क्रमाक्रमाने अधिकाधिक अडचणीत येत गेला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तर परिस्थिती अधिकच बिकट होत गेली.
अशा या पार्श्वभूमीवर ‘इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी दैनिकात, मागील महिनाभरात ‘मायनॉरिटी स्पेस’ या शीर्षकाखाली बरीच घणाघाती चर्चा झाली. १७ मार्च ते १० एप्रिल या २५ दिवसांच्या कालावधीत एक्स्प्रेसमध्ये नामवंत अभ्यासक-संशोधकांचे १८ लेख प्रसिद्ध झाले.
त्या सर्व वाद-संवादाचा प्रारंभ हर्ष मंदेर व रामचंद्र गुहा यांच्या लेखांपासून झाला आणि समारोपही त्या दोघांच्या लेखांनीच करण्यात आला. ‘सोनिया, सॅडली’ या शीर्षकाखाली मंदेर यांचा लेख आला, त्याला सोनिया गांधींनी ‘इंडिया टुडे कॉनक्लेव’मध्ये केलेल्या एका विधानाचा संदर्भ होता. ‘मुस्लिमांचा अनुनय करणारा पक्ष अशी प्रतिमा निर्माण झाल्याने काँग्रेसचा पराभव झाला,’ अशा आशयाचे ते विधान होते. त्यामुळे, भाजप पूर्णत: विरोधातला, अन्य पक्ष विखुरलेले व निष्प्रभ आणि काँग्रेस पक्षही अंतर राखू पाहणारा असेल, तर भारतातील मुस्लिमांचे काय होणार असा रास्त सवाल मंदेर यांनी उपस्थित केला. त्याला पूरक म्हणून त्यांनी देशाच्या सद्य राजकीय स्थितीत मुस्लिमांचे स्थान किती नगण्य होत चालले आहे आणि १८ कोटी लोकसमूहाला दुय्यम नागरिक असल्याप्रमाणे जगावे लागत आहे, हे स्पष्ट करू शकणारे अनेक तपशील दिले आहेत. हर्ष मंदेर हे मानवी हक्कांचे जोरदार पुरस्कर्ते आहेत, त्यामुळे त्यांनी या समस्येकडे त्या दृष्टिकोनातून जे दिसले ते रेखाटले आहे. अर्थातच ते चित्र खूपच विदारक आहे.
मंदेर यांच्या लेखातील वस्तुस्थिती मान्य असल्याचे सांगत, त्याची कारणमीमांसा करणारा व त्यावरील उपाययोजनेची दिशा सूचित करणारा लेख रामचंद्र गुहा यांनी ‘लिबरल्स, सॅडली’ या शीर्षकाखाली लिहिला. मुस्लिम समाजातील सुशिक्षित उदारमतवाद्यांनी सेक्युलर व आधुनिकतावादी विचारांचा पाठपुरावा न केल्यामुळे आणि मूलतत्त्ववादी शक्तींना विरोध न केल्यामुळे ही अशी परिस्थिती ओढवली आहे, असा रोख गुहा यांच्या विवेचनाचा आहे (अर्थातच, इतरही अनेक कारणे आहेत, हे त्यांना मान्यच आहे.) आणि या विवेचनाला आधार म्हणून हमीद दलवाई यांचे ‘Muslim Politics in India’ या पुस्तकातील तीन लहान परिच्छेद त्यांनी उद्धृत केले आहेत.
गुहा यांनी क्रिकेट ते पर्यावरण अशा अनेकविध विषयांवर लेखन केलेले असले तरी, ते प्रामुख्याने इतिहासकार म्हणूनच ओळखले जातात. त्यातही त्यांची विशेषता ही आहे की, मृत/गत इतिहास निरस पद्धतीने सादर न करता, वर्तमान समजून घेण्यासाठी ते इतिहासातील घटना-प्रसंगांना जिवंत करतात आणि त्या प्रक्रियेवर त्यांची भलतीच पकड आहे. मात्र वर्तमान घटना-घडामोडींच्याच संदर्भात ते लिहितात/ बोलतात, तेव्हा क्वचित काही वेळा व्यापक संदर्भ असलेली त्यांची काही विधाने ढिलेपणाने पुढे येतात आणि त्यातून वादविवाद संभवतात. असाच प्रकार त्यांच्याकडून, मंदेर यांच्या लेखाचा प्रतिवाद करताना झाला. ‘आमच्या सभेला जरूर या, पण बुरखा व स्कल कॅप घालून येऊ नका,’ असे एक दलित नेता म्हणाला, असे विधान मंदेर यांनी केले. त्यावर ‘त्या दलित नेत्याचे ते शब्द कटु असतील तरी हेतू मुस्लिमांना पुढे घेऊन जाणाराच आहे’ असे विधान गुहा यांनी केले. ते सांगताना त्यांनी ‘हिंदूंच्या सभासंमेलनात भगवे कपडे व त्रिशूळ ही प्रतिगामीत्वाची लक्षणे दिसतात, तसेच मुस्लिमांच्या सभा/संमेलनात बुरखा व स्कल कॅप ही प्रतिगामीत्वाची चिन्हे वाटतात’ अशा आशयाचे विधान केले. आणि नेमके हीच दोन विधाने एक्स्प्रेसमधील पुढील सर्व वाद-संवादाला कारणीभूत ठरली.
मंदेर व गुहा या दोघांच्या लेखानंतर तिसरा लेख राज्यशास्त्राचे अभ्यासक सुहास पळशीकर यांचा आला आणि त्यातून त्यांनी ही चर्चा कोणत्या दिशेने जायला हवी, हे नेमकेपणाने सूचित केले होते. मंदेर यांनी भीतीदायक (राजकीय) चित्र उभे केले आहे आणि गुहा यांनी मुस्लिम समाजसुधारणेचा विचार मांडताना राजकीय संदर्भ बाजूला ठेवले आहेत, हे नोंदवून पळशीकरांनी ‘आधी राजकीय की आधी सामाजिक’ हा टिळक-आगरकर यांच्यापासून महाराष्ट्राला माहीत झालेला पेच आजही कायम आहे, या मुद्यावर लेख संपवला आहे. खरे तर पुढील चर्चा या मुद्याला पुढे घेऊन जाणारी व्हायला हवी होती. मात्र बुरखा व स्कल कॅप आणि त्रिशूळ या त्रिकोणाभोवतीच नंतरच्या बहुतेक लेखकांनी आपापले विचार व अनुभव मांडले.
सुरुवातीच्या तीन पायाभूत लेखानंतर पुढील १३ अभ्यासकांचे लेख आले : दिल्ली विद्यापीठातील हिंदीचे प्राध्यापक अपूर्वानंद, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक हरबन्स मुखिया, कला-उद्योगलेखन क्षेत्रातील इरिना अकबर, बीबीसीचे भारतातील माजी प्रतिनिधी मार्क टुली, इतिहासकार मुकुल केशवन, मौलाना आझाद यांच्या चरित्रकार सईदा हमीद, निवृत्त प्रशासकीय अधिकारी आणि (रामविलास पासवान यांच्या) लोकजनशक्ती पार्टीचे प्रवक्ते अब्दुल खालिक, ‘इंडियन मुस्लिम्स फॉर सेक्युलर डेमोक्रसी’चे निमंत्रक जावेद आनंद, दिल्ली विद्यापीठातील इंग्रजीचे प्राध्यापक बद्री रैना, नामवंत उर्दू लेखक शमसुर रेहमान फारूकी, दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक व रा.स्व.संघाचे विचारवंत राकेश सिन्हा, निवृत्त पत्रकार व आम आदमी पार्टीचे प्रवक्ते आशुतोष, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कायदा व प्रशासन विभागातील प्राध्यापक गझला जमील.
या १३ पैकी बहुतांश लेखांमधून रामचंद्र गुहा यांच्या त्या विधानांबाबत कमी-अधिक खंत, नापसंती वा राग व्यक्त केला गेला. काहींनी गुहांना असंवेदनशील किंवा भ्रामक/भाबडे उदारमतवादी संबोधले. हर्ष मंदेर यांच्या विवेचनाशी मात्र बहुतेकांनी सहमती दर्शवली. अगदीच वेगळा सूर संघाचे (तथाकथित) विचारवंत राकेश सिन्हा आणि ‘आप’चे प्रवक्ते आशुतोष यांनी लावला. मंदेर व गुहा या दोघांनाही ‘स्युडो सेक्युलर’ ठरवून सिन्हा यांनी, इतिहासाचे उत्खनन त्यांच्या पद्धतीने करून दाखवले आणि आज जसा भाजपवर हिंदूंचा पक्ष असल्याचा आरोप केला जात आहे, तसाच आरोप स्वातंत्र्यपूर्व काळात (मुस्लिम लीगकडून) काँग्रेसवर केला जात होता, याची आठवण करून दिली.
आशुतोष यांनी आज आपल्या देशासमोर भाजप नव्हे तर संघाची विचारसरणी हे सर्वांत मोठे आव्हान आहे आणि त्याचा सामना करण्यासाठी ‘रणनीती’चा भाग म्हणून ज्या काही गोष्टी केल्या पाहिजेत, त्यामध्ये ‘मुस्लिमांचा अनुनय करणारा पक्ष अशी प्रतिमा निर्माण होऊ न देणे’ ही एक असल्याचे ठामपणे सांगितले. वाराणसीत केजरीवालांचा (नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील निवडणुकीत) जो पराभव झाला, त्याचे एक कारण ‘आप’च्या सभांमध्ये मुस्लिमांची गर्दी अधिक दिसली आणि नंतर दिल्ली विधानसभेत ‘आप’ला दोन मतदारसंघांमध्ये विजय मिळाला, त्याचे कारण तशी प्रतिमा निर्माण होणे आम्ही जाणीवपूर्वक टाळले; असे स्पष्ट मतप्रदर्शनही आशुतोष यांनी केले आहे. ते करताना त्यांनी गुहा यांच्या विधानांचे समर्थन केले आहे (गुहा यांना अभिप्रेत अर्थ आशुतोष यांच्याप्रमाणे नाही, हा भाग वेगळा).
अन्य सर्व अभ्यासक-लेखकांचे लेख मूळ विषयाच्या किंवा मुद्याच्या भोवती न लिहिता, त्या निमित्ताने लिहिले असे झाले आहे. त्यामुळे त्या चर्चेतून ठोस असे हाती काही लागत नसले तरी, अनेक मुद्यांची व विषयांची घुसळण होते, उजळणी होते, त्या उत्खननातून काही दडलेले मुद्दे पृष्ठभागावर येतात. प्रत्येकजण आपापल्या विद्याशाखेच्या व अनुभवांच्या परिप्रेक्ष्यातून लिहीत असल्याने तसे घडणे स्वाभाविक ठरते. शिवाय, जागेची व वेळेची मर्यादा समोर ठेवून वृत्तपत्रासाठी केलेले हे लेखन आहे, हे लक्षात घेतले तर अधिकच्या अपेक्षा बाळगणे तितकेसे योग्य ठरत नाही.
एक्स्प्रेसमध्ये हे लेख प्रसिद्ध होत होते, त्या दरम्यानच्या दोन-तीन आठवड्यांत अन्य माध्यमांतून जी काही चर्चा झाली, तिचे स्वरूपही कमी-अधिक प्रमाणात असेच राहिले. त्यामध्ये तुलनेने ठोकळेबाज म्हणावा असा लेख (वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले आणि अलीकडेच काँग्रेसमधून निलंबित झालेले) माजी मंत्री मणिशंकर अय्यर यांचा आहे, तो त्यांनी एन.डी.टीव्ही डॉट कॉमवर लिहिला आहे. आणि अगदीच लक्षवेधक म्हणावा असा लेख तोफेल अहमद यांनी ‘फर्स्ट पोस्ट’मध्ये लिहिला आहे. वॉशिंग्टनमध्ये इस्लामिझम व आक्रमक मूलतत्त्ववाद यांच्या संदर्भात अभ्यास करणाऱ्या अहमद यांनी गुहा जे काही सांगू पाहतात, ते नेमकेपणाने पकडले आहे. एवढेच नाही तर, हर्ष मंदेर व रामचंद्र गुहा यांचे विवेचन परस्परविरोधी नसून परस्परांना पूरक ठरणारे आहे, हेही त्यांनी अधोरेखित केले आहे. सुहास पळशीकरांनीही त्यांच्या लेखात असेच सूचित केले आहे. (ते दोन्ही लेख एकाच दिवशी प्रसिद्ध झाले आहेत.)
या चर्चेचा समारोप करणारे गुहा व मंदेर यांचे लेख १० एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध झाले. त्यात मंदेर यांनी स्पष्टपणे नोंदवले आहे की, तो लेख इतक्या मोठ्या प्रमाणात सर्वदूर पोहोचेल आणि इतक्या प्रमाणात त्याची चर्चा होईल हे त्यांना अपेक्षित नव्हते. पण तरीही त्या लेखात उपस्थित केलेल्या दोन मुद्यांवर अपेक्षित चर्चा झाली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. ‘राजकीय पक्ष आणि नागरी समाज, मुस्लिमांच्या संदर्भातील जबाबदारी पार पाडण्याचे टाळताहेत,’ यावर ऊहापोह होणे मंदेर यांना अपेक्षित होते. आपण ‘आयडिया ऑफ इंडिया’ची लढाई हरलो आहोत, फाळणीनंतरच्या सर्वाधिक कठीण कालखंडातून जात आहोत, उदारमतवादी मूल्यांच्या चर्चेत योग्य व न्याय्य काय आहे, याकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि हे सर्व मानवतेसाठी घातक आहे, या विधानांवर मंदेर यांनी लेखाचा शेवट केला आहे.
रामचंद्र गुहा यांनी समारोपाच्या लेखाचा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७५ वर्षांपूर्वी केलेली दोन विधाने उद्धृत करून केला आहे. ‘बुरखा वापरण्याची प्रथा मुस्लिम समाजात स्त्रियांना दडपण्यासाठी पुरुषांकडून राबवली जाते, पण त्याचबरोबर मुस्लिमांना बिगर मुस्लिमांपासून दूर ठेवण्याचेही काम बुरखाप्रथा करत असते. एवढेच नाही तर, आपण परस्परांपासून तोंड लपवणार असू तर राजकीय आघाडीवर भागीदार होऊच शकत नाही आणि मग लोकशाहीनिष्ठ समाज तयार होऊच शकणार नाही.’ हा डॉ. आंबेडकरांच्या विधानातील आशय नोंदवताना गुहा म्हणतात की, तीच भूमिका त्यांनी एक्स्प्रेसमधील लेखात मांडली आहे. पण तरीही बुरखा आणि त्रिशूळ ही तुलना चुकीची होती आणि तशी ती केल्यामुळे अन्य लेखकांकडून जी टीका झाली ती रास्तच होती, असेही गुहा म्हणतात. शिवाय, बुरखा व स्कल कॅप वापरणे हे शिखांनी पगडी वापरण्यासारखे (स्वत:ची ओळख दाखवण्यासाठी) आहे, आणि सार्वजनिक जीवनात त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही, हेही मान्य करत गुहा यांनी या वादावर पडदा टाकला.
मात्र त्यांनी पुढे म्हटले आहे की, भारतीय मुस्लिमांना भारतीय प्रजासत्ताकात नागरिक म्हणून पूर्णत: समान वागवले जाईल, यासाठीच्या कृतिकार्यक्रमांची दिशा काय असली पाहिजे, यावर पुढील चर्चा झाली पाहिजे. त्याबाबत भूमिका मांडताना ते म्हणतात, काही बाबतीत तर भारतातील मुस्लिमांची अवस्था दलित व आदिवासी या समाजघटकांपेक्षाही वाईट आहे. ही स्थिती बदलण्यासाठी दलितांनी जसे डॉ. आंबेडकरांचे ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ या शिकवणुकीचा स्वीकार केला तसे मुस्लिमांनी केले पाहिजे. म्हणजे मूलतत्त्ववादाला ठामपणे विरोध करत, आधुनिक मानवी मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या हमीद दलवाईंच्या विचाराने काम करणाऱ्या नेत्यांची गरज मुस्लिम समाजाला आहे. या लेखाचा शेवट करताना गुहा यांनी, दलवाईंच्या लेखनातील पाच विधाने उद्धृत केली आहेत. आज ज्या ‘तिहेरी तलाक’ची समस्या सुटण्याच्या मार्गावर दिसते आहे, तिच्यासाठीचा लढा दलवाईंनी ५१ वर्षांपूर्वी केला होता, याची विशेष नोंद केली आहे. एवढेच नाही तर दलवाईंचे (थोडेच लेखन इंग्रजीत आहे) सर्व लेखन इंग्रजीत व भारतीय भाषांतही गेले पाहिजे, यासाठी प्रकाशकांनी पुढे यावे असे आवाहन करून तो लेख संपवला आहे.
अर्थातच, नव्या परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी नव्या पद्धतीने विचार करावा लागणार आहे, पण दलवाईंचे विचारविश्व त्यासाठी पायाभूत ठरणार आहे, हाच या वाद-संवादाचा सांगावा आहे.
(‘साधना’ साप्ताहिकाच्या ५ मे २०१८च्या अंकातून)
.............................................................................................................................................
‘गांधींनंतरचा भारत’ या रामचंद्र गुहा यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3683
.............................................................................................................................................
‘आधुनिक भारताचे विचारस्तंभ’ या रामचंद्र गुहा यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4372
.............................................................................................................................................
लेखक विनोद शिरसाठ साधना साप्ताहिकाचे संपादक आहेत.
vinod.shirsath@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Thu , 10 May 2018
दोन्ही इंग्रजी लेख वाचले. गुहांच्या म्हणण्याप्रमाणे हिंदूत्वाचा बहुसंख्यवाद ( =Hindutva majoritarianism) असता तर स्वातंत्र्योत्तर काळी मुस्लिमांची लोकसंख्या वाढली नसती. हा नेहमीचा बकवास आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास उर्वरित लेख ठीकठाक. पण मंदेर मात्र पार सुटलेत. इतका मुस्लिमांचा ढोंगी कळवळा दाखवताहेत की विचारूच नका. पहिल्यांदा लेख वाचला तेव्हा वाटलं की पाकिस्तानातल्या मुस्लिमांची हालत वर्णन करताहेत की काय! पण नाही. भारतातल्या मुस्लिमांची भारी काळजी लागून राहिलीये. खरंतर एकदा का भारत सेक्युलर मानला तर मुस्लिमांचे प्रतिनिधित्व असा शब्दप्रयोग उचित नाही. पण मंदेरबाबांना सांगणार कोण. तो आधुनिक राजकीय बुवाबापू आहे. -गामा पैलवान