अजूनकाही
‘सामना’ चित्रपटात मास्तर एकच प्रश्न सतत विचारतो - ‘मारुती कांबळेचं काय झालं?’
आज पुन्हा एकदा तसाच प्रश्न पूजा सकटच्या बाबतीत विचारण्याची वेळ आली आहे - ‘पूजा सकटचं काय झालं? तिला न्याय कोण देणार?’
पूजा भीमा कोरेगावच्या हिंसाचाराची एक महत्त्वाची साक्षीदार होती. दोन जानेवारीला इथल्या वाडा गावातलं तिचं घर दीडशे जणांच्या जमावानं हल्ला करून जाळून टाकलं होतं. हा प्रकार पूजा आणि तिच्या भावानं हताशपणे बघितला होता. त्यानंतरही या दोघांना धमक्या येतच होत्या. ‘आता घर जाळलं, उद्या तुम्हालाही जाळून टाकू’ अशी या गुंडांची भाषा होती. पूजाच्या भावानं फेब्रुवारी महिन्यात याविषयी पोलिसांत दोन तक्रारीही नोंदवल्या होत्या. पण नेहमीप्रमाणे पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं.
बावीस एप्रिलला पूजाचा मृतदेह घराजवळच्याच विहिरीत सापडला. २१ तारखेपासून ती गायब झाली होती. तशी तक्रारही नोंदवण्यात आली होती. पण पोलीस स्वस्थच बसून राहिले. गायब झालेली मुलगी आपली साक्षीदार आहे, हेही त्यांच्या गावी नव्हतं!
पूजाचा मृतदेह मिळाल्यावर मात्र पोलीस आपल्या नेहमीच्या पद्धतीनं कामाला लागले. विहिरीबाहेरच पूजाच्या चपला मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी आत्महत्या हे गृहीत धरलं आणि पुढच्या कारवाईला प्रारंभ केला. आत्महत्येआधी पूजानं काही चिठ्ठी वगैरे लिहून ठेवलीय का याचाही धड शोध त्यांनी घेतला नाही. आधी स्थानिक रुग्णालयातच पोस्टमॉर्टेम करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण पूजाच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतल्यानं, त्यांच्याकडूनच २००० रुपये घेऊन मृतदेह पुण्याला ससून हॉस्पिटलला नेण्यात आला.
ही आत्महत्या नाही, खून आहे, असं पूजाचे घरचे सतत सांगत होते. त्याकडेही सुरुवातीला दुर्लक्ष करण्यात आलं. पण स्थानिक कार्यकर्त्यांच्या दबावामुळे मग पोलिसांनी खोलात जाऊन तपास करण्याचं मान्य केलं. प्रकाश आंबेडकर यांनीही हा खून असल्याची शंका जाहीरपणे व्यक्त केली, तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. ९ जणांना अटक करून त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यात पूजाचं घर जाळणाऱ्या आणि तिच्या कुटुंबाला धमकी देणाऱ्या गुंडापैकी काही जणांचा समावेश आहे. पण पूजाची आत्महत्या की खून हा निष्कर्ष पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आल्यावरच काढता येईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
............................................................................................................................................
‘सेपिअन्स - मानवजातीचा अनोखा इतिहास’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406
.............................................................................................................................................
हा पोलीस तपास समाधानकारक नसल्यानं भीमा कोरेगाव एल्गार यात्रेचं संयोजन करणाऱ्या संघटनांनी एक सत्यशोधन समिती स्थापन केली. तिचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. तो पोलिसांच्या दडपादडपीवर प्रकाश टाकणारा आहे. या अहवालानुसार, पूजाचा मृतदेह जिथं सापडला तिथं पोलिसांनी स्पॉट पंचनामाच केला नाही. पाण्यातून काढलेल्या या मृतदेहाची अवस्थाही लक्षात घेण्यात आली नाही. पूजाचा हा मृतदेह पाण्यानं फुगलेला नव्हता, उलट तिच्या नाकातोंडातून रक्त येत होतं. तिच्या कपाळ, मान, शरीरावरच्या जखमा ताज्या दिसत होत्या. तरीही स्थानिक पोलिसांना कसलाही संशय आला नाही, ही बाब धक्कादायक आहे. पूजाचा भाऊ, काका, वडील हे अपहरण आणि हत्येचं प्रकरण आहे, असं सतत सांगत असताना पोलिसांनी आत्महत्येच्या दाव्यालाच प्राधान्य का दिलं, हा प्रश्नही विचारण्यासारखा आहे.
या प्रकरणी पोलीस कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते काय, याचाही शोध घ्यायला हवा. पूजाच्या घरावर हल्ला करणारे, तिला धमक्या देणारे कोण, हे पोलिसांना चांगलंच ठाऊक होतं. अनेकदा त्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं होतं. मग पूजाच्या भावानं दोनदा तक्रार करूनही पोलिसांनी कारवाई का केली नाही? भीमा कोरेगावला झालेल्या हिंसाचाराच्या खटल्यात पूजानं आणि तिच्या भावानं साक्ष देऊ नये म्हणून हे कारस्थान रचण्यात आलं काय? पूजाचं घर ज्या जमिनीवर आहे, तिच्यावरही काही जणांचा डोळा होता, असं सांगितलं जात आहे. पोलिसांनी या पैलूचा काही तपास केला आहे काय?
पूजाचे वडील सुरेश सकट यांच्यावर या भागांत काम करणाऱ्या अतिरेकी हिंदुत्ववाद्यांचा राग जुनाच आहे. १ जानेवारीला या मंडळीनी भीमा कोरेगावच्या परिसरांत बंदचं आवाहन केलं होतं. त्याला न जुमानता सुरेश सकट यांनी विजयस्तंभाला भेट द्यायला येणाऱ्या आंबेडकरवाद्यांच्या सेवेचं काम सुरू ठेवलं. त्यांनी आणि त्यांचे सहकारी अशोक आठवले यांनी प्रबोधन रॅली काढली, रक्तदान-अन्नदानाचे कार्यक्रम केले. याचाच राग म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांचं घर जाळण्यात आलं. तरीही पोलिसांनी त्यांना कोणतंही संरक्षण दिलं नाही. त्यांनी जिद्दीनं घराचं बांधकाम सुरू केल्यावर धमक्या देण्यात आल्या. पोलिसांनी त्याचीही दखल घेतली नाही. त्याचाच परिणाम म्हणून पूजाची ही गत केली गेली आहे काय?
एक जानेवारीला भीमा कोरेगावला आंबेडकरी जनतेवर हल्ला होण्याआधीपासूनच या भागात विषारी वातावरण आहे. पूजाच्या संशयास्पद मृत्युनंतर हा तणाव वाढला आहे. पूजाच्या मृत्यूला पंधरवाडा उलटला नाही, तोच गावकऱ्यांनी आता सकट कुंटुंबालाच गावाबाहेर काढण्याचा डाव रचला आहे. तसा प्रचारही सुरू झाला आहे. म्हणे सुरेश सकट गावाची बदनामी करतात, खोट्या केसेस घालून त्रास देतात. ग्रामसभा बोलवून सकट यांना गावबंदी करण्याचा हा प्रयत्न आहे. सकट हे मातंग समाजाचे असल्यानं दलित बहिष्काराच्या प्रकरणात याची गणना होईल. ग्रामसभा म्हणजे काही खाप पंचायत नव्हे, याचीही जाणीव या गावकऱ्यांना नाही. अशा जातीयवादी गावावरच सरकारनं कठोर कारवाई केली पाहिजे.
पुरोगामी महाराष्ट्रात एका दलित कुटुंबावर कोसळलेल्या विषारी संकटाची ही कहाणी आहे. भीमा कोरेगावमध्ये थैमान घालणाऱ्या गुन्हेगारांना अजून शिक्षा झालेली नाही. बऱ्याच विलंबानंतर दंगल भडकवण्याचा आरोप असलेल्या मिलिंद एकबोटेला अटक झाली आणि जामीनही मिळाला. पण दुसरे माथेफिरू मनोहर भिडे मोकळेच आहेत. पूजाचं हे प्रकरण एकबोटे तुरुंगाबाहेर आल्यावर घडलंय, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. भिडे-एकबोटेंचे गुंडही अजून मोकाट आहेत. आंबेडकरी कार्यकर्त्यांवर मात्र नक्षलवादी म्हणून गुन्हे दाखल केले जात आहेत.
विहिरीत पडलेली रक्तबंबाळ पूजा माझ्या सतत डोळ्यांसमोर येते आहे. विचारते आहे - ‘मला कधी मिळणार न्याय?’ पूजाच्या संशयास्पद मृत्यूच्या बातम्या जरूर आल्या, पण त्यांचा पाठपुरावा फारसा कुणी केला नाही. पूजासाठी कुणी आक्रोश केला नाही, मोर्चे काढले नाहीत, ‘जस्टीस फॉर पूजा’ असा हॅशटॅगही कुणी सुरू केला नाही. टीव्ही चॅनलवर चर्चा वगैरे तर सोडाच! पूजा आक्रंदते आहे, ‘बाबासाहेबांच्या लेकरांच्या नशिबी आलेला हा वनवास कधी संपणार?’
या प्रश्नाचं उत्तर आजतरी कुणाकडेही नाही. पूजा, आम्हाला माफ कर!
............................................................................................................................................
लेखक निखिल वागळे ‘महानगर’ या दैनिकाचे आणि ‘IBN लोकमत’ या वृत्तवाहिनीचे माजी संपादक आहेत.
nikhil.wagle23@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
vishal pawar
Sat , 05 May 2018