अजूनकाही
गेल्या महिन्याच्या अखेरीस दोन घटना अशा घडल्या ज्यांची अनौपचारिक चर्चा महाराष्ट्रातील बुद्धिवादी वर्तुळात मोठ्या प्रमाणात झाली, मात्र त्यांना जाहीर वाद-संवादाचे रूप आलेले नाही. एक- कुमार केतकर यांची निवड राज्यसभेचे सदस्य म्हणून झाली आणि त्यासाठी त्यांना अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश करावा लागला. दुसरी ज्ञानेश्वर मुळे यांनी त्यांच्या आठ पुस्तकांचे प्रकाशन पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात मोहन भागवत यांच्या हस्ते समारंभपूर्वक घडवून आणले आणि आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून उभे राहण्यास इच्छुक असल्याचे सूचित केले. वरवर पाहणाऱ्यांना या दोन घटनांमध्ये साम्य दिसले, पण त्यामध्ये मूलभूत फरक आहे.
कुमार केतकर यांनी जवळपास पाच दशके मराठी व इंग्रजी वृत्तपत्रांतून पत्रकार-संपादक म्हणून काम केले. महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, लोकसत्ता व दिव्य मराठी या चार मोठ्या वृत्तपत्रांचे मुख्य संपादक म्हणून त्यांची मागील दोन दशकांतील कारकीर्द, त्यांना महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या बुद्धिवादी वर्तुळात महत्त्वाचे स्थान बहाल करणारी ठरली. त्या त्या वृत्तपत्रांतून लिहिलेले हजारो लेख व अग्रलेख आणि महाराष्ट्रातील सर्व भागांत विविध विचारपीठांवरून केलेली शेकडो भाषणे यामुळे त्यांचा राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांत वैचारिक दरारा किंवा दबदबा निर्माण झाला. सुस्पष्ट विचार, प्रवाही भाषा व थेट मांडणी हे त्यांच्या लेखनाचे व भाषणांचे प्रमुख वैशिष्ट्य! आणि डावी, पुरोगामी, उदारमतवादी ही त्यांच्या विचारांची दिशा! त्यांनी भाजप व संघ परिवारातील संस्था-संघटना यांच्या विरोधात सातत्याने व कठोर प्रहार करणाऱ्या भूमिका मांडल्या आणि त्याचवेळी, काँग्रेसचा विचार, नेहरू- गांधी घराण्याचे नेतृत्व यांचे जोरदार समर्थन केले. या दोन्ही कारणांसाठी त्यांच्यावर अनेकांनी असभ्य व शिवराळ भाषेत टीका केली, पण तरीही केतकरांची भूमिका व मांडणीची शैली यात यत्किंचितही बदल झाला नाही.
दुसऱ्या बाजूने पाहिले तर दिसते असे की, केतकरांचे चाहते असणारे बहुतांश लोक या ना त्या कारणाने त्यांना पूर्णत: स्वीकारायला किंवा ‘आपले’ म्हणायला तयार झाले नाहीत. नेहरू-गांधी घराणे व काँग्रेसचा मूळ विचार यांचे समर्थन वजा केले, तर केतकरांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रकारच्या लहान मोठ्या नेत्यांवर, त्यांच्या भ्रष्टाचारांवर, त्यांच्यातील अपप्रवृत्तीवर, सातत्याने कठोर आसूड ओढले आहेत. त्यामुळे काँग्रेसमधील नेत्या-कार्यकर्त्यांना केतकरांना दूरवरूनच रामराम करणे सोयीस्कर वाटते. केतकर स्वत:ला मार्क्सवादी म्हणवून घेत आले आहेत आणि कम्युनिस्टांच्या चळवळींचे, आंदोलनांचे सहानुभूतीदार राहिले आहेत. पण तरीही, त्यांनी श्री. अ. डांगे यांची लाईन सातत्याने लावून धरली (काँग्रेसच्या बरोबर जाण्याची/सहकार्य करण्याची) आणि आर्थिक सुधारणा कार्यक्रम, उदारीकरण पर्व, खासगीकरणाचे धोरण यांचे समर्थन केले म्हणून, कोणत्याही कम्युनिस्टांना ते पूर्णत: आपले वाटत नाहीत. राजकीय-सामाजिक क्षेत्रांतील सक्रिय व बुद्धिवादी असणारा मोठा (पण विखुरलेला) प्रवाह या ना त्या प्रकारचा समाजवादी म्हणून ओळखला जातो. केतकर इंदिरा गांधींचे व त्यांनी लादलेल्या आणीबाणीचे ज्या आवेशाने समर्थन करतात आणि समाजवाद्यांमधील अनेक महनीय नेत्यांवर ज्या पद्धतीने टीका करतात (त्यासाठी कॉन्स्पिरसी थिअर मांडतात). त्यामुळे सर्व प्रकारच्या समाजवाद्यांच्या मनात केतकरांच्या विषयी एक प्रकारचा राग वा दुरावा राहिलेला आहे.
मात्र काँग्रेस, कम्युनिस्ट व समाजवादी या तीनही प्रमुख प्रवाहातील लोकांना आपले ‘ते’ विशिष्ट कारण सोडले तर लेखन, भाषण यासाठी केतकर हवे असतात. त्यामुळे या तीनही प्रवाहातील लहान-मोठ्या व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यात केतकरांची सतत उठबस असते. म्हणजे या तीन प्रवाहांचे केतकरांशी असलेले संबंध एका मर्यादित अर्थाने ‘लव्ह-हेट रिलेशनशिप’प्रमाणे असतात. आणि उजव्या प्रवाहातील लोक केतकरांचा वैचारिक द्वेष करीत असले तरी, ते काय बोलतात वा लिहितात हे चवीने ऐकत व वाचत असतात. गंमत म्हणजे या चारही प्रवाहांतील लोकांशी संबंध ठेवायला केतकरांना अजिबात अवघड जात नाही, आणि कुठेही गेले तरी ते स्वत:च्या भूमिकेला मुरड घालताना दिसत नाहीत. एवढेच कशाला, ज्या ज्या वृत्तपत्रांत ते संपादक झाले, तिथेही त्यांनी आपल्या याच भूमिका सातत्याने पुढे रेटल्या आहेत.
नेहरू-गांधी घराण्याचे व आणीबाणीचे समर्थन काँग्रेसचे मोठे नेते व अधिकृत प्रवक्तेही करणार नाहीत इतक्या उघडपणे व जोरदार समर्थन केतकर करतात. अशा पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून राज्यसभेवर निवडून जाणे यात अनपेक्षित व धक्कादायक असे काही नाही. किंबहुना मागील दहा वर्षांपासून तशी चर्चा होत असल्याने, ‘खूप उशिरा ही निवड झाली’ अशीच सार्वत्रिक भावना आहे. एक तात्त्विक म्हणवला जाणारा प्रश्न असा उपस्थित केला गेला की, पत्रकार-संपादक राहिलेल्या/ असलेल्या व्यक्तीने एखाद्या राजकीय पक्षाच्या तिकिटावर राज्यसभेवर जावे का? वस्तुत: या प्रश्नात तात्त्विक असे काही नाही. मुळात राज्यसभा हे संसदेचे सभागृह कला, साहित्य, पत्रकारिता, उद्योग इत्यादी क्षेत्रांतील महनीय व्यक्तींच्या ज्ञानाचा व अनुभवाचा देशाला फायदा मिळावा यासाठीच आहे. त्यामुळे पत्रकारितेतून निवृत्त झालेले आहेत म्हणूनच नाही, तर सक्रिय असतानाही एखाद्याने राज्यसभेत जाण्यात वावगे असे काही नाही. राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यावर केतकरांनी बीबीसी (मराठी)ला मुलाखत देताना सांगितलेय की, ते संपादक असताना २००८ व २०१२ अशी दोन वेळा राज्यसभेवर जाण्यासाठी ‘ऑफर’ त्यांना आली होती. ती ऑफर त्यांनी त्या वेळी नाकारली किंवा काँग्रेस पक्षातून वा युपीए
सरकारमधून अडथळे आले, यापैकी काहीही घडले असेल. पण आता, आयुष्यभर सातत्याने घेतलेल्या भूमिका मांडण्यासाठी केतकरांना अधिक मोठे व्यासपीठ मिळाले आणि ते त्यांनी घेतले यात चुकीचे म्हणावे असे काही नाही. आणि अर्थातच केतकरांशी ‘लव्ह-हेट’ रिलेशनशिप असलेल्या तीनही प्रवाहांना आतापर्यंत जे काही वाटत आले त्यात बदल होण्याचेही कारण नाही. अधिक मोठ्या व्यासपीठावर गेलेले केतकर आपल्याला काही बाबतीत अधिक उपयुक्त ठरतील याचा आनंद आणि आपल्यावर/ आपल्या नेत्यांवर कठोर टीका ते अधिक मोठ्या व्यासपीठावरून करतील याचा राग, अशा संमिश्र भावना या तीन प्रवाहांमध्ये असतील.
कोल्हापूर जिल्ह्यातील एका लहानशा गावातून पुढे आलेले ज्ञानेश्वर मुळे १९८३ मध्ये भारतीय विदेश सेवेत (आयएफएस) दाखल झाले आणि नोव्हेंबर २०१८ मध्ये निवृत्त होत आहेत. मागील साडेतीन दशकांत त्यांनी जपान, रशिया, मॉरिशस, सीरिया, मालदीव आणि अमेरिका येथील भारतीय दूतावासात काम केले आहे. गेल्या वर्षभरापासून ते दिल्ली येथे परराष्ट्र मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत आहेत. कल्पक व कार्यक्षम अधिकारी अशी त्यांची प्रतिमा राहिली. पण त्याचबरोबर भाषा, साहित्य, कला, संस्कृती यांचे रसिक-भोक्ते ही त्यांची ओळख विशेषत्वाने निर्माण झाली. महाराष्ट्रात स्पर्धापरीक्षा आणि त्यातही केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानेश्वर मुळे यांच्या नावाची व व्यक्तिमत्त्वाची वेगळी क्रेझ आहे. ‘माती, पंख आणि आकाश’ हे त्यांचे आयुष्याच्या उभारणीपर्यंतचा कालखंड सांगणारे आत्मकथन, विशेष लोकप्रिय झाले. हजारो विद्यार्थ्यांना मुळे यांच्या त्या पुस्तकाने प्रशासनात जाण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळाले आहे. मात्र ‘स्पर्धा परीक्षा म्हणजे जीवनाचा प्रारंभ वा अंत नाही आणि स्पर्धा परीक्षेचे दरवाजे बंद होतील त्याक्षणी हजारो दरवाजे खुले होतील’ अशी भूमिका त्यांनी अलीकडच्या काही वर्षांत वारंवार मांडली आहे. रॅशनल व समाजहिताची, पण परीक्षांची तयारी करणार्या तरुणाईला आणि ती करून घेणाऱ्या शिक्षक व संस्थाचालकांना न रुचणारी अशी ही भूमिका आहे. एवढेच नाही तर, जीवनाच्या विविध क्षेत्रांत (शिक्षण, पत्रकारिता, समाजकारण, राजकारण) आज-उद्याच्या तरुणाईने उतरले पाहिजे आणि उत्तुंग काम केले पाहिजे, असा आग्रह त्यांनी सातत्याने धरला. वेगवेगळ्या देशांतील समाज व संस्कृतीशी समरस होऊन, बहुसांस्कृतिक जीवनाचा आस्वाद घेऊन त्यांनी हिंदी, इंग्रजी, मराठी, जपानी इत्यादी भाषांमधून लेखन केले. या सर्व प्रक्रियेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अब्दुल्ला लाट या छोट्याशा गावातून आलेले ज्ञानेश्वर मुळे स्वत:ला ‘विश्व नागरिक’ म्हणवून घेऊ लागले, त्यांचा हा प्रवास निश्चितच स्पृहणीय आहे.
पण विदेश सेवेतून निवृत्तीचे वेध लागल्यानंतर त्यांना राजकारणात उतरून कर्तबगारी गाजवावी अशी इच्छा होऊ लागली, दिवसेंदिवस ती बळकट होऊ लागली. मागील चार-पाच वर्षांतील त्यांची जाहीर वक्तव्ये आणि सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टस् यातून ती इच्छा सूचित होऊ लागली. २०११-१२ मध्ये केजरीवाल व अण्णा हजारेप्रणित भ्रष्टाचारविरोधी आंदोलन उभे राहिले तेव्हा, ‘देशात क्रांती होऊ पाहतेय’ अशी आशा अनेक लहानथोरांना वाटू लागली, त्यात मुळेंचाही समावेश होता.
त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी या पक्षांकडून तशी संधी मिळण्याची शक्यता त्यांनी तपासून पाहिली असावी. ते होत नाही म्हणून गेल्या तीन-चार वर्षांत भाजपकडून तशी संधी मिळावी यासाठी ते प्रयत्नशील असावेत. आणि त्याच प्रक्रियेतून त्यांनी थेट
भाजपच्या मातृसंस्थेचे सर्वेसर्वा रा.स्व.संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते आपल्या आठ पुस्तकांचे प्रकाशन भव्यदिव्य समारंभात करून, स्वत:विषयीची संदिग्धता संपवली असावी. सरसंघचालकांच्या प्रमुख उपस्थितीत निष्ठा दाखवल्यानंतर राज्याच्या व केंद्राच्या भाजप नेतृत्वापर्यंत स्पष्ट संदेश जाणार, हे डिप्लोमॅट राहिलेल्या मुळे यांनी हेरले असणार किंवा त्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संदीप वासलेकर (स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे प्रमुख) यांनी ती स्ट्रॅटेजी मुळे यांना सांगितली असावी. म्हणजे लोकसभा निवडणुकांना जेमतेम एक वर्ष राहिलेले असताना, तातडीने व हमखास यशाची खात्री देऊ शकणारा हा ‘शॉर्ट कट’ त्यांनी शोधला असावा.
ज्ञानेश्वर मुळे यांच्या या खेळीने त्यांच्या चाहत्यांना व त्यांच्याविषयी या ना त्या कारणाने आदर असणाऱ्यांना मोठाच धक्का बसणे साहजिक होते. अर्थात मुळे हे कधीही डाव्या विचारांचे किंवा पुरोगामी वर्तुळातील म्हणून ओळखले गेले नाहीत. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक चळवळी-आंदोलने यांचे सहानुभूतीदार किंवा पाठीराखे म्हणूनही ते कधी दिसले नाहीत. पण याचे मुख्य कारण, मागील ३५ वर्षांपैकी ३० वर्षे त्यांची कारकीर्द व वास्तव्य परदेशातच राहिले आहे. आणि विदेश सेवेत असल्याने स्थानिय, राज्यपातळीवरील व देशाच्या स्तरावरील पक्षीय किंवा निवडणुकीच्या राजकारणाशी त्यांचा संबंध येण्याला खूपच मर्यादा होत्या. याच काळात त्यांनी आपला देश, राज्य व गाव परिसर यांच्याशी मात्र स्वत:ची नाळ घट्ट बांधून ठेवली होती आणि ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग होती. तरीही कोल्हापूर ते पुणे या पट्ट्यातच त्यांचा विशेष वावर राहिला. याच भागातील कला, साहित्य, संस्कृती, माध्यमे, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांतील व्यक्ती व संस्था यांच्याशी त्यांचे प्रामुख्याने आदान-प्रदान राहिले. यापैकी काही अपवाद वगळले तर बहुतांश व्यक्ती, संस्था ढोबळमानाने उदारमतवादी, पुरोगामी किंवा डावीकडे झुकलेल्या आहेत.
त्यामुळे या सर्वांना ज्ञानेश्वर मुळे यांनी आता उजव्यांच्या कॅम्पमध्ये जाणे धक्कादायक आणि राग वा संताप आणणारे असेच वाटले. मात्र ज्यांचा मुळे यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध, सहवास, संपर्क नव्हता त्यांच्या दृष्टीने ही घटना दखलपात्रच नाही. म्हणजे मुळे यांच्याशी या ना त्या प्रेमसंबंधाने किंवा आपुलकीने जोडलेल्या लोकांचीच तेवढी निराशा झाली. मुळे हे डावे, पुरोगामी नाहीत हे सर्वजण समजून होते, पण ‘ते उजवेही नाहीत’ असे बहुतेकांनी गृहीत धरले होते. म्हणून त्यांच्यासाठी हा धक्का किंवा धोका आहे. त्यात अधिक खेदजनक किंवा संतापजनक किंवा खंतजनक प्रश्न हा आहे की, ज्ञानेश्वर मुळे यांनी असे का करावे? रा.स्व.संघ व भाजप यांचे विचार पूर्वीपासून पसंत आहेत म्हणून ते तिकडे गेले असते तर त्याविषयी कोणालाही वाईट वाटण्याचे कारण नव्हते. पण तसा स्पष्ट कल त्यांचा कधी दिसला नव्हता किंवा त्यांनी दाखवला नव्हता. आताही ते भाजपमध्ये गेल्याची बातमी आली असती तर तो धक्का किंचित कमी राहिला असला, कारण भाजपमध्ये गेलेले सर्वजण काही संघाच्या चरणी लीन होत नाहीत. मुळेंनी नेमका तो संदेश दिला आणि म्हणून लोकांना बसलेला धक्का व आलेला राग अधिक तीव्रतेचा जास्त आहे.
आता पुढे काय? मुळेंना लोकसभा किंवा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळेल किंवा मिळणारही नाही कदाचित. संधी मिळाल्यावरही (किंवा मिळाली नाही म्हणून) त्यांचा भाजप-संघाकडून भ्रमनिरास होईल किंवा होणारही नाही कदाचित. पण साठीच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी केलेला हा आयुष्यातील सर्वांत महागडा सौदा आहे, हे निश्चित! हे खरे आहे की, विदेश सेवेत असल्याने कोणत्याही पक्षाच्या व विचारधारेच्या सरकारबरोबर त्यांना काम करावे लागले आणि हेही खरे आहे की, अनेक देशांमध्ये वास्तव्य केल्यानंतर अशा पक्षांच्या किंवा विचारधारांच्या सीमारेषा अस्पष्ट झालेल्या त्यांना दिसल्या असतील. पण भारत देश एका मोठ्या, ऐतिहासिक व दूरगामी परिणाम करणाऱ्या स्थित्यंतरांतून जात असताना, देशाचा मूलभूत ढाचा संकटात सापडलेला असताना, मुळे यांची ही कृती त्यांच्या एकूण कर्तृत्वावर पाणी फिरवणारी ठरण्याची शक्यता जास्त आहे. खासदार होऊन काहीही भव्यदिव्य करता येत नाही हे कळायला त्यांना फार वेळ लागणार नाही आणि आपण ज्यांच्या संगतीत जात आहोत, त्यांना ‘विश्व नागरिक’ तर सोडाच, आपल्या देशातील सर्व नागरिकही चालत नाहीत, हेही मुळे यांना यथावकाश कळेलच.
(‘साधना’ साप्ताहिकाच्या २१ एप्रिल २०१८च्या अंकातून साभार.)
.............................................................................................................................................
लेखक विनोद शिरसाठ साधना साप्ताहिकाचे संपादक आहेत.
vinod.shirsath@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
harsha sharale
Fri , 04 May 2018
असले टुकार लेख विश्लेषणाच्या नावाखाली खपवण्याची वेळ साधनासारख्या साप्ताहिकावर येते, याची मराठी वाचक म्हणून शरम वाटते. इतरांना न कळलेले असे काहीतरी आपण उलगडून दाखवतो आहोत ("वरवर पाहणाऱ्यांना या दोन घटनांमध्ये साम्य दिसले, पण त्यामध्ये मूलभूत फरक आहे"), अशा आवेशामधे केवळ चालू घडामोडींचे वर्णन लेखक महोदयांनी केलेले आहे. स्वतः केवळ वरवरची धूळ झटकून यांना मानवी महत्त्वाकांक्षेचा कसला थांग लागणार बरं! वाट्टेल तशी पोकळ निराधार विधाने बिनदिक्कतपणे करण्याचे कौशल्य मात्र दाद देण्यासारखे आहे. १) पत्रकार व्यक्तीने राजकीय पक्षाचे सदस्य बनून राज्यसभेवर तात्त्विक असे काही नाही, असे विधान लेखकाने केले आहे. यामागे त्यांचे अपुरे तात्त्विक आकलन कारणीभूत आहे. श्री. कुमार केतकर यांच्याविरोधातील उथळ टीका सोडून दिली, तरी ते राज्यसभेवर राष्ट्रपतींच्या नॉमिनेशनद्वारे गेले असते तर बाब वेगळी राहिली असती. काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व, अशोक चव्हाण इत्यादी नेते सोबत घेऊन अर्ज दाखल करणे, या सर्व प्रक्रियेमधे केतकर यांच्यातील पत्रकारिता आणि राजकीय महत्वाकांक्षा यांच्यात हितसंबंधांचा संघर्ष उद्भवतो का? तो आधीच्या त्यांच्या कारकीर्दीशी जोडला गेल्यास गैर ते काय? असे प्रश्न यातून उद्भवतात. यातही केतकरांची बाजू मांडता येईल. पण त्यासाठी तात्त्विक आकलन लागेलच. अशा उथळ लेखांनी ते साधणार नाही. २) मुळे यांच्याविषयी तर याहून उथळ पाण्यातील गटांगळ्या लेखकमहोदयांनी मारलेल्या आहेत. हजारो विद्यार्थ्यांना मुळे यांनी स्पर्धापरीक्षांची प्रेरणा दिली, म्हणे. वाट्टेल ते कपोलकल्पित आडाखे, त्यासाठी पुरावे न देण्याची आळशी वृत्ती.... किती रसातळाला गेली मराठी विचारविश्वाची पातळी! असो. उद्या असले लोकही राज्यसभेवर गेल्यास नवल वाटावयाला नको.