आपण तुकाराम निवडणार आहात की दांभिक मंबाजी? 
पडघम - देशकारण
देवेंद्र शिरुरकर
  • आसारामबापू
  • Mon , 30 April 2018
  • पडघम देशकारण आसारामबापू Asaram ‌Baapu

सर्वसामान्य प्रापंचिकाला दैनंदिन जीवन जगताना परमार्थाचा मार्ग दाखवणे, महत्त्वाकांक्षी, पराक्रमी पुरुषाला त्याच्या वाटचालीत सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्याचे काम संत करत असतात. काम, क्रोध, मद, मोह मत्सर, दंभ, अहंकार या सर्व वासनांवर विजय मिळवणारी स्थितप्रज्ञ व्यक्ती, जी व्यवस्थेच्या योग्य दिशेने होणाऱ्या प्रवासाची जागल्या असते. हीच भूमिका काहीशे वर्षांपूर्वी आपल्याकडे ज्ञानेश्वर-तुकाराम या संतद्वयींनी पार पाडलेली आहे. जात, धर्म, पंथ आणि वर्णाच्या संकुचीत चौकटीत अडकलेल्या समाजाच्या विकासासाठी या श्रृंखला तोडण्याचे काम या संतांनी केलेले आहे. व्यक्ती म्हणून असलेले जिवितकार्य, समाजाबद्दलचे उत्तरदायित्व, परस्परांबद्दलचा भातृभाव व अखिल मानवजातीचे कल्याण ही तत्त्वे प्रदान करून त्यांनी बौद्धिकदृष्ट्या कुंठित समाजाला दिशा दिली.

तोच विचार नंतरच्या सुधारकांनी समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. कर्मकांड आणि अंधश्रद्धांत अडकलेल्या समाजाच्या उत्थापनासाठी सहन करावा लागलेला जनक्षोभ गोपाळ गणेश आगरकरांपासून अनेकांना भोगावा लागलेला आहे. सत्याकडे उघडपणे केलेले दुर्लक्ष ही या समाजाची मुळ प्रवृत्ती असल्याचे सिद्ध करणाऱ्या घटना आपल्या अवतीभवती घडत असल्यामुळे या सुधारणावाद्यांची गरज प्रत्येक काळात जाणवत राहते. ब्रम्हज्ञानी असल्याचा कांगावा करणारा आसाराम, भौतिक संपत्तीचे ओंगळवाने प्रदर्शन करणारा रामरहिम, मदिरामंडळातील वारांगणेपेक्षा हिडीस वर्तन करणारी राधे मा, गर्दी जमवणाऱ्या डोंबाऱ्याप्रमाणे धर्माचा खेळ मांडलेले कैक आचार्य, बुवा उपाध्या लावणारी ही उपटसूंभ मंडळी समाजाच्या वैचारिक दारीद्रयाची ठसठशीत लक्षणे आहेत.

लोकांच्या भावनांचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन करून आश्रम, मठे, मंदिरे उभारण्याचा गोरखधंदा ज्या समाजात बहरतो, तो समाज स्वत:च्या सद्सदविवेकाशी फारकत घेतलेलाच असतो. या बांडगूळांवरील कारवाईचे स्वागत करायलाच हवे. पण त्याहूनही अधिक असके उपद्व्यापी लोक ज्या विशाल समूहमानसांत निपजतात त्या समाजाच्या विचारहीन वर्तनप्रवृत्तीवर कठोर शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. संत कोणाला म्हणावे, धर्म कशाशी खातात?, नीतिमत्ता, सार्वजनिक आयुष्यातील चारित्र्यसंपन्नता काय असते? 

या आणि अशा विवेकी प्रश्नांची उत्तरे देताना या समाजातील अंध:कारावर प्रहार केलेल्या महात्मा फुले, तुकडोजी महाराज, गाडगेबाबा अशा अनेकांचा समृद्ध वारसा लाभूनही आपण या बुवाबाजीला थारा का देतो, यापेक्षा वाईट ते काय?

‘ऐसे कसे झाले भोंदु, कर्म करोनि म्हणती साधु, अंगी लावूनिया राख, डोळे झाकुनिया करिती पाप दावूनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा तुका म्हणे सांगो किती, जळो तयांची संगती’ एवढ्या साध्या सोप्या शब्दांत या भोंदूगिरीची ओळख आपल्याला करून देण्यात आलेली असताना आपण यांची संगती करतो एवढी आपली मती कशी काय ढळली ? याचा विचार करणे हाच यावरील अनिवार्य उपाय आहे.

वैचारिक संपदेचा वारसा असणारी सुवर्णमुद्रा सोडून केवळ मुलामा दिलेली नाणी आपण बाजारात कशासाठी खपवून घेत आहोत? कालानुरूप म्हणा अथवा प्रत्येक संकल्पनेचा आपल्याला सोयीस्कर अर्थ लावण्याच्या समाजाच्या अंगभूत प्रवृत्तीमुळे म्हणा धर्म, नीतिमत्ता, सामूहिक कर्तव्यभान या गोष्टीही आपण संकुचित केलेल्या आहेत.

गर्दी जमवण्याची हातोटी जमलेला एखादा संधिसाधू स्वत:चे दुकान लावतो. प्रारंभीच्या काळात जरा चार बऱ्या गोष्टी सांगून प्रभावित करतो.हे त्याचे व्यवहारविषयक वर्तन दैवी असल्याचा डांगोरा त्याचे लाभार्थी व सशुल्क जाहीरातबाज करतात.स्वत: कष्ट न करता, घाम न गाळता सर्वांना मोक्षाचा मार्ग सांगणारा हा भोंदू आश्रम, मठांच्या माध्यमातून स्वत:चा अर्थ साधतो.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

दुर्दैव हे की हाच प्रकार सार्वजनिक व्यवहारात करणारे धुरिण अशा भोंदूंना आवरण्यापेक्षा त्याच्या गर्दी जमवण्याच्या हातोटीचा लाभ उचलत असतात. सर्वच राजकीय संस्थांना गर्दी, एकगठ्ठा मतदान हवे असते. अन्यथा या भुरट्या चोरांचे त्यांच्या आश्रमांतील उन्मादी वर्तन, घाम न गाळता मिळवलेल्या संपत्तीचे उथळ प्रदर्शन आणि समाजसेवेचे ढोंग सहन केल्या गेले नसते.

याचा पुढचा टप्पा म्हणून हल्ली राजकीय पक्षांनीच स्वत:चे बाबा-बुवा तयार करायला सुरुवात केली आहे. हे वर्तन अनिवार्य असले तरी विचारी, विवेकी व्यक्तीची बुद्धी गहाण ठेवण्याची वृत्ती निश्चितच चिंताजनक आहे.

कुठल्यातरी हितसंबंधांसाठी आपण ज्याचा पायावर डोके टेकवले आहे, तो नराधम आश्रमात कोवळ्या फुलांना कुस्करतो आहे, याचा विचार न करणारी आपली सकल व्यवस्था कोणत्या दिशेने प्रवास करत आहे? याचा कधीतरी विचार करायलाच हवा.

धर्माची शास्त्रशुद्ध चिकित्सा करण्याची सामूहिक प्रगल्भता आपल्या समाजात येईल तेंव्हा येईल, पण संत, बाबा, आचार्य, अज्ञ असल्या उपाध्या लावून डोळ्यात धुळफेक करणाऱ्या या टवाळखोरांची लबाडी आपण समाज म्हणून का खपवून घेतो आहोत?

चांद्रयान आणि मंगळयानाच्या मोहिमा आखणारे शास्त्रज्ञ ज्या देशात आहेत त्याच देशात धर्माच्या नावाखाली होणारी भोळ्या-भाबड्या लोकांची फसवणूक खरोखरीच भूषणावह नाही. आपण तुकाराम निवडणार आहात की दांभिक मंबाजी याचा किंचित विचार करायला काय हरकत आहे? 

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 08 May 2018

देवेंद्र शिरुरकर, लेखाशी तात्त्विक दृष्ट्या सहमत आहे. मात्र खरे साधू आणि खोटे भोंदू वेगळे ओळखायचे कसे याविषयी मार्गदर्शन हवं ना? पितळ खोटं आहे असं कितीही घोकलं तरी सोन्याची पारख करता येत नाही. सोन्याची पारख करायला अभ्यासच कामी येतो. तसंच खरा साधू ओळखण्यासाठी साधना हवीच. ज्ञानेश्वरतुकारामादि संतांची साधना पक्की होती. मात्र हल्लीच्या सुधारकांची ती पक्की नसते. त्यामुळे लोकं सुधारकांचं ऐकंत नाहीत आणि भोंदूंच्या फशी पडतात. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......