‘रामचंद्र गुहा यांना या वर्षीच्या महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारांच्या वितरणाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले आहे. त्यांचा होकार आला आहे. पुण्यात ते असतील तेव्हा साधनाच्या वतीने त्यांच्याबरोबर अडीच-तीन दिवस राहायला तुला आवडेल का?’ असे साधनाच्या संपादकांनी ऑक्टोबर महिन्यात मला विचारले. मी अर्थातच होकार दिला. मी माझा पुणे दौरा त्याआधारे ठरवला. दर वर्षी मला डिसेंबर महिन्यात सुट्टी असते. त्यामुळे मी दिल्लीहून त्याच काळात महाराष्ट्रात येत असतो. या वर्षी मात्र गुहासरांचा कार्यक्रम लक्षात घेऊन मी जानेवारीत आलो.
गुहासरांना पुण्यातील वास्तव्यात सोबत करण्याचे काम माझ्याकडे दिले गेले, यामागे तीन प्रमुख कारणे होती. रामचंद्र गुहांचे साधनात सदर सुरू झाले, तेव्हापासून त्या सदराचा मी नियमित वाचक होतो, गरज पडली तेव्हा सदरातील काही लेख मी अनुवादित केले होते, त्यांचे इतरत्र येणारे लेखन मी वाचत होतो, शिवाय त्यांची पुस्तके तर कायम सोबत होतीच. दुसरे कारण- मी गेल्या पाच वर्षांत क्रमाने साधनाशी अधिकाधिक जोडला गेलो होतो, साधनाविषयी आतून आणि बाहेरून मला बरेच काही माहीत होते. आणि तिसरे कारण पूर्वी वास्तव्य केलेले असल्यामुळे आणि नंतर येणे-जाणे होत असल्याने, पुणे शहराची मला चांगली ओळख होती. तसेच गुहासरांना पुण्यात साधनाच्या कार्यक्रमासाठी बोलावण्याचे जे प्रयत्न मागील दोन वर्षांत केले गेले होते, त्याचा मी साक्षीदार होतो. त्यामुळे साधनाच्या कार्यक्रमासाठी गुहासरांसारखा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर इमेज असलेला आयकॉन येणे म्हणजे नेमके काय, याची मला कल्पना होती.
या वर्षी गुहासर मुख्य कार्यक्रमाला येणे, याला आणखी एक वेगळा अर्थ होता. त्यांनी ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ या पुस्तकात आधुनिक भारताच्या निवडक एकोणीस निर्मात्यांमध्ये हमीद दलवाई यांचा समावेश केला आहे. आणि याच वर्षी महाराष्ट्र फाउंडेशनने विशेष अपवाद करून आपल्या बावीस वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार (दलवाईंना) दिला होता. फाउंडेशनच्या इतिहासातील तो बरोबर ३०० वा पुरस्कार असणार होता.
गुहासर पुण्यात दोन कार्यक्रमांसाठी येणार होते. त्यापैकी पहिला कार्यक्रम ७ जानेवारीला शनिवारी संध्याकाळी होता. महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारांचे वितरण त्या कार्यक्रमात केले जाणार होते. दुसऱ्या दिवशी- म्हणजे रविवारी ८ जानेवारीला सकाळी गुहासरांच्या ‘साधना’तील ‘कालपरवा’ या सदरातील निवडक लेखांचे पुस्तक आणि हमीद दलवाई यांच्या ‘मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद, या दोन पुस्तकांचे प्रकाशन केले जाणार होते. गुहासर या कार्यक्रमांसाठी बंगळुरूहून शुक्रवारी दुपारी येणार होते आणि कार्यक्रम संपले की, रविवारी संध्याकाळी पुढील प्रवासाला निघणार होते. त्यामुळे शुक्रवार दुपार ते रविवार संध्याकाळ इतका काळ मी त्यांच्याबरोबर असणार होतो. कार्यक्रमाची आखणी आणि इतर बाबी या संदर्भात गुहासरांशी केल्या जाणाऱ्या संवादाचे अपडेट्स मला सतत येत होते. काही वेळा त्या संवादात साधनाच्या बाजूने माझा अप्रत्यक्षपणे सहभागसुद्धा होता.
मागील दोन महिन्यांपासून गुहांच्या संपर्कात साधना होती. त्यांना लागेल त्याप्रमाणे विविध प्रकारची माहिती पुरवली जात होती. मात्र ते येणार होते त्याच्या आधीच्या दोन दिवसांत मी एकूण चित्रात आलो. त्यांच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी तेव्हा माझ्यावर दिली गेली. मी कोण आहे, माझा मोबाईल नंबर, विमानतळावर कधी येणार, हॉटेल बुकिंग असे सर्व तपशील मी त्यांना देत होतो. तसेच ते पुण्यात आल्यानंतर ज्यांना-ज्यांना भेटणार त्यांच्याविषयी थोडक्यात माहितीही त्यांना देत होतो. पुरस्कारविजेत्या व्यक्ती कोण आहेत आणि त्यांचे काम काय आहे, याविषयीसुद्धा मी त्यांना कळवले होते. अशा सर्व छोट्या-छोट्या नोट्स तयार करून त्यांना त्या मेलद्वारे दिल्यामुळे ते पुण्यात येण्यापूर्वी त्यांची पूर्वतयारी झालेली असावी, असा या सगळ्यामागचा हेतू होता. हे सर्व करताना साधनाच्या संपादकांशी मी सतत संपर्कात होतो.
दि. ६ ला दुपारी गुहासरांना आणायला विमानतळावर साधना ट्रस्टचे विश्वस्त सचिव हेमंत नाईकनवरे आणि मी जावे, असे ठरले होते. गुहांबरोबर पुण्यात राहायचे आहे, हे दोन-अडीच महिने आधीपासून मला माहीत होते, त्यांचे लेखन वाचलेले होते. मात्र, तरीही त्यांना आणायला जाताना मनावर थोडे दडपण आले होते. पुण्यातील ट्रॅफिकमधून मार्ग काढत पोहोचेपर्यंत आम्हाला पाच मिनिटे उशीर झाला होता. तोपर्यंत ते विमानतळाच्या बाहेर आले होते. त्यांना रिसीव्ह करून हॉटेलच्या दिशेने गाडी निघाली. प्रभात रोडवर हॉटेल बुक केलेले होते. विमानतळ ते प्रभात रोड प्रवासात हेमंतसर आणि गुहासर यांच्या गप्पा सुरू राहिल्या.
हेमंतसर गुहांना डिसेंबर महिन्यात मुंबईत ‘टाइम्स लिटररी फेस्टिव्हल’मध्ये भेटले होते. तिथून गप्पांना सुरुवात झाली. गुहांचे पुणे शहराशी असलेले नाते, पुणे आणि बंगळुरू या दोन शहरांची तुलना, साधना साप्ताहिक आणि महाराष्ट्र फाउंडेशन याविषयीची माहिती असे विषय चर्चेत होते. गुहासरांनी चर्चेत साने गुरुजींविषयी एक इंटरेस्टिंग माहिती दिली. त्यांनी गांधीजींच्या पत्रव्यवहारात साने गुरुजींचा उल्लेख पाहिला होता. स्वातंत्र्याच्या थोडे अलीकडे, साने गुरुजींना हरिजनांना विठ्ठल मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रह करायचा होता. मात्र गांधीजींनी त्यांना सांगितले, आताची वेळ योग्य नाही. त्यामुळे साने गुरुजींना प्रश्न पडला होता की, अस्पृश्यतेविरोधात गांधीजी इतकी स्पष्ट भूमिका घेत असतात, मग आता का नाही म्हणत आहेत? पुढे क्रिकेटचा विषय निघाला. या वर्षी गुजरातचा संघ रणजी ट्रॉफीची फायनल पहिल्यांदाच खेळणार आहे, असे गुहांनी सांगितले. साधनाचे संपादक, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, अशी माहिती गुहांनी विचारली.
एकूण प्लॅन असा होता की, गुहांना हॉटेलवर न्यायचे. मग ते तिथे थोडे फ्रेश होतील. मग साधनाचे बाकी विश्वस्त त्यांचे स्वागत करायला आणि चहापानासाठी हॉटेलवर येतील. मात्र गुहा प्रवासाने अजिबात थकले नव्हते. त्यामुळे हॉटेलवर चेक-इन करताच हॉटेलच्या लॉबीत बसून गप्पा सुरू झाल्या. या बैठकीत साधनाच्या विश्वस्तांपैकी विजया चौहान, सुनील देशमुख तसेच साधनाचे संपादक विनोद शिरसाठ आले होते. हेमंतसर तर होतेच. गुहा अतिशय मनमोकळेपणे गप्पा मारत होते. चर्चेत राष्ट्र व राज्य स्तरावरील अनेक महत्त्वाच्या सामाजिक आणि राजकीय विषयांना स्पर्श होत होता. चर्चेत गुहासरांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला. त्यांचे असे म्हणणे होते की, सध्याचे सरकार एका अर्थाने नेहरू आणि आंबेडकर यांची व्हिजन उद्ध्वस्त करत आहे. कारण जे काही संस्थात्मक जाळे या देशात आहे, त्याची उभारणी नेहरू आणि आंबेडकरांच्या विचारातून झालेली आहे. या सरकारला आणि मुख्यतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नेमके ते संस्थात्मक जाळेच अडचणीचे वाटते. तसेच मोदी सरकारने सामाजिक संस्थांना परदेशातून आर्थिक मदत मिळण्याच्या मार्गात कसे अडथळे उभे केले आहेत, हाही विषय चर्चेत आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसा स्वतःला जगातील सर्वांत मोठी सामाजिक संस्था मानतो आणि त्यांना बाकीच्या पुरोगामी विचारांच्या सामाजिक संस्थांच्या कामाचा अडथळा वाटतो, असेही चर्चेत येऊन गेले.
महाराष्ट्र फाउंडेशनचे नेमके काम काय आहे, त्यांची व्हिजन काय प्रकारची आहे आणि आतापर्यंत काय साध्य करता आले, याचा एक धावता आढावा सुनील देशमुखांनी गुहांना दिला. ते ऐकून गुहांनी परदेशातील मराठी माणसे आणि इतर भाषिक समूह यांची तुलना केली. त्यांचे असे म्हणणे होते की, परदेशातील मराठी माणसे महाराष्ट्रातील सामाजिक कामाला मदत करतात, हे चित्र चांगले आहे. कारण गुजराती, तमिळ असे भाषिक समूह आपल्या प्रांताला इतकी मदत करत नाहीत आणि केली तरी सामाजिक दृष्ट्या निरुपयोगी कामांना पैसा पाठवतात. मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्याविषयी द्वेष पसरवणारे काम काही भाषक समूह बऱ्याचदा उचलून धरताना दिसतात. चर्चा चालू असताना एकदा चहा झाला होता. पुढे दोनअडीच तास गप्पा झाल्या. मात्र ना गुहांनी आणखी चहा घेतला, ना आपल्या फोनला हात लावला. अगदी निवांत असे ते छान गप्पा मारण्याच्या मूडमध्ये होते.
गप्पा मारताना सदानंद मोरेंचा विषय निघाला. मोरेसर प्रभात रोडच्या अगदी जवळच राहतात, म्हणून साधनाच्या संपादकांनी त्यांना फोन केला. मोरेसरांना वेळ होता आणि त्यामुळे ते लगेच गुहांना भेटायला आले. पूर्वी दि.पु. चित्र्यांनी मोरेसरांची आणि गुहांची ओळख करून दिलेली होती. मोरेसरांच्या ‘लोकमान्य ते महात्मा’ या पुस्तकाच्या इंग्रजी अनुवादाचे काम दि.पु.चित्रे करणार होते, हे गुहांना माहीत होते. मात्र २००९ मध्ये चित्रेंचे निधन झाल्याने ते काम मागे पडले. गुहांनी मोरेसर येताच त्यांना त्याविषयी विचारले. दोघे अनेक वर्षांनी भेटत होते. मात्र समोरच्या व्यक्तीला अजिबात अवघडलेपण वाटू न देता कसे रिलॅक्स करावे, याचा वस्तुपाठच गुहांनी पूर्ण संध्याकाळभर दिला होता.
रात्रीच्या जेवणासाठी गुहांना त्यांच्या एका मित्राकडे जायचे होते. तिथे तू यायची गरज नाही, मला फक्त ड्रायव्हरचा नंबर दे- असे गुहासरांनी सांगितल्याने मी साधना ऑफिसला परत आलो.
दुसऱ्या दिवशी गुहासरांचा प्रोग्राम बिझी होता. सकाळी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे काही निवडक तरुण कार्यकर्ते आणि सय्यदभाई, शमसुद्दीन तांबोळी व अन्वर राजन आले होते. गुहासरांना प्रश्न विचारणे, काही बाबतींत त्यांचा सल्ला घेणे आणि एकूण विचारविनिमय करणे असा कार्यक्रमाचा सूर होता. मी थोडा उशिराच पोहोचलो. तोपर्यंत चर्चा सुरू झाली होती. मुस्लिम समाजाचे समकालीन प्रश्न, लखनौ करार, हिंदू जातीयवाद आणि मुस्लिम जातीयवाद यांचा संबंध असे विषय चर्चेत होते. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या सध्याच्या कामाविषयी गुहांना माहिती दिली गेली. मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सय्यदभाईंनी ‘दगडावरची पेरणी’ या आपल्या आत्मचरित्राच्या इंग्रजी अनुवादित प्रती गुहांना दिल्या. सत्यशोधक मंडळाचे तरुण कार्यकर्ते प्रश्न विचारत असताना, गुहा अतिशय लक्ष देऊन त्यांचे प्रश्न ऐकत होते. पुढे गुहांना लंच असल्याने तासाभराची भेट बाराच्या सुमारास संपली.
हमीद दाभोलकर, विनोद शिरसाठ आणि गुहासर असे तिघेच शनिवारी दुपारच्या जेवणाला भेटणार होते. मग त्यात माझाही समावेश केला गेला. त्या चर्चेत गुहांनी डॉ.दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाविषयी अतिशय आस्थेने चौकशी केली. सनातन संस्था, गोव्यातील व इतरत्र असलेले त्यांचे नेटवर्क, उच्च न्यायालय आणि सरकारची तपासातील भूमिका याविषयी प्रश्नोत्तरे झाली. गुहांनी हमीद दाभोलकर नेमके काय काम करतात, याविषयी माहिती घेतली. विनोद शिरसाठ त्या बैठकीला थोडे उशिराच आले. संध्याकाळी होणार्रा मुख्य कार्यक्रमाच्या तयारीचा व्याप सांभाळून ते जेवायला आले होते. हमीद दलवाई यांचे ‘मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया’ हे पुस्तक इंग्रजीत प्रकाशित करावे यासाठी प्रयत्न करण्याचे गुहांनी मान्य केले होतेच. तसेच पुस्तकाला ते स्वतः प्रस्तावना लिहिणार, हेही ठरले होते. त्याच बरोबरीने दलवाई यांचे ‘जमिला जावद आणि इतर कथा’ हे पुस्तकसुद्धा इंग्रजीत प्रकशित करता येऊ शकेल काय, याविषयी तेव्हा चर्चा झाली. त्या तीन दिवसांत इतर अनेक फोटो झाले; मात्र नेमका त्या शनिवारी दुपारी झालेल्या लंचचा फोटो घ्यायचा राहून गेला.
गुहांनी अतिशय साधेच जेवण घेतले होते. खिचडी आणि दही खाता-खाता गुहा त्यांच्या एकूण नियोजनाबाबत, कामाबाबत बोलत होते. त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीबाबत काही इंटरेस्टिंग तपशील दुपारी जेवताना सांगितले. वर्षातील आठ महिने ते शक्यतो कार्यक्रम स्वीकारत नाहीत. ते त्या काळात बंगळुरूमध्ये राहून संशोधन करतात. उरलेल्या चार महिन्यांतसुद्धा ते मुख्यतः भारतात प्रवास करतात. भारताबाहेर फार जात नाहीत.
त्यांचे मित्र देशभरात विखुरलेले आहेत. गेली तेरा वर्षे ते दोन इंग्रजी दैनिकांत (पूर्वी ‘द हिंदू’ आणि ‘टेलिग्राफ’, आता ‘हिंदुस्थान टाइम्स’ आणि ‘टेलिग्राफ’) सातत्याने पाक्षिक सादर लिहीत आहेत. म्हणजे बाकीचे संशोधन सांभाळून महिन्याला चार लेख ते लिहितात. तसेच त्यांचे जे ‘टेलिग्राफ’मधील लेखांचे सदर ‘साधना’त येते, तेच लेख मराठीशिवाय इतर सहा भाषांतसुद्धा अनुवादित होतात. त्यामध्ये गुजराती आणि आसामी या दोन भाषासुद्धा आहेत.
सोशल मीडियाबाबतसुद्धा गुहासर बोलले. ते ट्विटरवर आहेत, मात्र फेसबुकवर नाहीत. ट्विटर आले तेव्हा राजदीप सरदेसाई आणि सिद्धार्थ वरदराजन या त्यांच्या दोन मित्रांनी त्यांना असा सल्ला दिला होता की, तुम्ही इथे येण्यापूर्वी जाड कातडी धारण करायला हवी. गुहांचेच चांगले मित्र असलेले मुकुल केशवन यांना ट्विटर सोडावेसे वाटावे इतक्या वाईट पद्धतीने त्यांच्या वैचारिक विरोधकांनी टार्गेट केले होते. आणि अखेर जेव्हा केशवन ट्विटर सोडून गेले, तेव्हा तो त्यांना आपला विजय वाटला होता. तसाच प्रयत्न गुहांबाबतसुद्धा झाला आहे, होत आहे. मात्र ट्विटर सोडून न जाणे, हेच आपल्या वैचारिक विरोधकांना दिलेले चोख उत्तर असणार आहे याची गुहांना पूर्ण जाणीव आहे.
महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार वितरणाचा कार्रक्रम दोन सत्रांत असतो. त्यापैकी दुपारच्या सत्यात (२ ते ४) गुहा येऊ शकले नाहीत. त्यांचे मुख्य भाषण संध्याकाळी होते. तसेच तो कार्यक्रमसुद्धा मोठा होता. त्यांना घ्यायला मी चारच्या सुमारास हॉटेलवर पोचलो. ते तयारच होते. ‘महाराष्ट्र इन द लाइफ ऑफ द नेशन’ या विषयावर गुहा बोलणार होते. गाडीत आम्ही दोघेच होतो. मी त्यांचे लेखन कसे वाचले आहे आणि मला त्याविषयी काय वाटते, याविषयी त्यांना सांगितले. राम गणेश गडकरींचा पुतळा हलवला गेला होता, त्याविषयी गुहांनी प्रश्न विचारले. राज्यातील संभाजी ब्रिगेड आणि मराठा राजकारण याविषयी त्यांना माहिती दिली. गुहांना आचार्य अत्रे माहीत होतेच. यामुळे गडकरी आणि अत्रे यांच्यातील गुरू-शिष्याचे नाते याविषयीसुद्धा संवाद झाला. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रम होता. गुहांना तिथे घेऊन वेळेत पोचलो. कार्यक्रम सुरू होण्याआधी काही लागले तर मी स्टेजच्या मागेच आहे, असे त्यांना सांगितले आणि विंगेत येऊन बसलो.
विचारपीठावर नऊ पुरस्कारविजेते, त्यांच्यासोबत सुनील देशमुख, शिरीष गुप्ते, हेमंत नाईकनवरे, प्रमोद निगुडकर आणि हमीद दाभोलकर अर्धवर्तुळाकार बसले होते. नऊपैकी सहा पुरस्कारविजेत्यांची भाषणे आधीच्या सत्रात झाली होती. त्यामुळे संध्याकाळी अतुल पेठे, अरुण साधू आणि मेहरुन्निसा दलवाई यांची भाषणे होणार होती. त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून गुहा बोलणार होते. कार्यक्रमात अरुण साधूंना गुहांच्या हस्ते साहित्य जीवनगौरव पुरस्कार दिला गेला, तेव्हा स्टेजवरसुद्धा एक छोटे स्टेज होते. त्यावर चढून पुरस्कार प्रदान केले जात होते. आधी तिथे पोहोचूनसुद्धा गुहांनी साधूंच्या ज्येष्ठतेचा मान ठेवून आधी साधूंना ‘त्या छोट्या स्टेजवर या’ अशा अर्थाची हालचाल केली. छोटीशीच कृती, मात्र गुहांचे मोठेपण काय आहे हे दाखवणारी.
आपल्या भाषणाने गुहांनी नेहमीप्रमाणे सभा जिंकली. देशात सामाजिक व राजकीय क्षेत्रात जे-जे चांगले आणि वाईट आहे त्याचा उगम महाराष्ट्रात झालेला आहे, असे सांगून त्यासाठीची उदाहरणे दिली. जात आणि लिंग या दोन्ही महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवर काम करणारे समाजसुधारक महाराष्ट्रात होऊन गेले. सामाजिक सुधारणा आणि राजकीय स्वातंत्र्य या दोन्ही क्षेत्रांत महाराष्ट्राचे योगदान असाधारण आहे, असे सांगितले. देशाला स्पृहणीय तसेच निषेधास पात्र अशा गोष्टींचा उगमसुद्धा महाराष्ट्रात झालेला आहे. गांधीजींवर पहिला हल्ला महाराष्ट्रातच झाला होता आणि पुढे एका मराठी माणसानेच गांधीजींची हत्या केली. राजकीय नेत्यांनी खासगी उद्योगधंद्यांसाठी सरकारी जमीन देण्याची सुरुवात महाराष्ट्रात झाली, इत्यादी. वीस मिनिटांत आपले भाषण संपवून गुहा खाली बसले, तेव्हा खच्चून भरलेले सभागृह त्यांच्यावर खूश झाले होते.
सभागृहातील श्रोत्यांमध्ये तरुण मुला-मुलींचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. तसेच पुण्यातील आणि पुण्याबाहेरील अनेक दिग्गज खास गुहांना ऐकायला म्हणून आले होते. कार्यक्रम संपताच त्यांची सही घेता यावी, त्यांच्यासोबत फोटो असावा, म्हणून खूप गर्दी झाली. गुहांनीही मुलांचा उत्साह समजून घेऊन न थकता फोटो काढू दिले, सह्या दिल्या. मात्र फोटो काढण्यासाठी केवळ लहान मुलांनाच उत्साह होता असे नाही अनेक मोठ्या व्यक्तींनासुद्धा गुहांना भेटण्यात आणि त्यांचा फोटो काढण्यात रस होता. साधनात गुहांचे लेख गेले वर्षभर ज्यांनी अनुवादित केले त्या अशोक वाडीकर यांना गुहांना खास भेटायचे होते. तसेच सध्या गुहांचे काही लेख अनुवादित करीत असलेले धनंजय बिजले यांनासुद्धा गुहांसोबत फोटो हवा होता. रविवारी दुपारी ‘जर महाराष्ट्र वाहिनी’चे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांनीसुद्धा गुहासरांसमवेत फोटो काढून घेतला. त्यांचे असे म्हणणे होते की, इतर कोणाहीबरोबर फोटो काढण्यात त्यांना विशेष रस नाही, मात्र गुहासर ही एक अशी व्यक्ती आहे की, जिच्याबरोबर त्यांना आवर्जून फोटो काढावासा वाटतो.
गुहांबरोबर असे फोटो काढणे आणि सह्या देणे चालू असतानाच ते पुण्यातील त्यांना भेटायला आलेल्या लोकांशी बोलतसुद्धा होते. कुमार केतकरांना पाहून त्यांनी आवर्जून ‘शारदा साठे कुठे आहेत?’ अशी विचारणा केली. (गुहांच्या ‘इंडिया आफ्टर गांधी’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद शारदा साठे यांनी केला आहे.) सदा डुंबरेंना पाहून गुहांना त्यांचा टिळक स्मारक मंदिरात झालेला कार्यक्रम आठवत होता. कार्यक्रमानंतर काही निवडक लोकांसाठी डिनरचा कार्यक्रम होता. तिथे गुहांना घेऊन गेलो. कुमार केतकर आणि गुहासर यांच्या सद्य:स्थितीवर गप्पा तिथे रंगल्या. त्याच दिवशी केतकरांचा ७१ वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने अतुल पेठेंनी तिथे केतकरांसाठी केक आणला होता. अतुल देऊळगावकर आणि मुकुंद टाकसाळेही तिथे होते. देऊळगावकर आणि गुहा यांच्यात शास्त्रीय संगीत हा समान आवडीचा मुद्दा होता. त्यावर ते बोलत होते. जेवण आटोपून गुहा लवकरच तिथून बाहेर पडले. गुहा जेवत असताना मी मात्र तिथे जेवलो नाही, हे त्यांनी अचूक पाहिले होते. त्यांचे जेवण होताच मी का जेवलो नाही, हे त्यांनी विचारले. ‘आपण थोडा वेळ थांबू या, पण तू जेवून घे’ असे त्यांनी मला आग्रहाने सांगितले. मात्र मला ‘साधना’ ऑफिसला काही काम आहे, असे सांगून मी त्यांना घेऊन बाहेर पडलो.
गाडीत बसल्यावरही उद्याच्या कार्यक्रमाच्या दृष्टीने ते प्रश्न विचारत होते. साधना प्रकाशनाची दोन महत्त्वाची पुस्तके उद्या प्रकाशित होणार होती. साधना वर्षाला किती पुस्तके प्रकाशित करते, साधनाची वितरणयंत्रणा कशी आहे, साधना ऑनलाईन विक्री करते का, इतर वितरकांबरोबर टाय-अप करून साधना आपली पुस्तके मार्केटमध्ये का आणत नाही- असे प्रश्न गुहासर विचारत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गुहांना दहा वाजता एस.एम.जोशी सभागृहात पोहोचायचे होते. त्यांना सकाळी लवकरच घ्यायला मी पोहोचेन, असे सांगून हॉटेलवर सोडले. मी परत साधना ऑफिसला आल्यावर साधनाच्या संपादकांबरोबर रात्री उशिरा जेवून गुहांसाठी एक पत्र तयार केले.
रविवारी सकाळी गुहांना आणायला गेलो, तेव्हा अतिशय महत्त्वाची दोन कामे माझ्यावर सोपवली होती. त्यांना पुस्तकाच्या व कार्यक्रमाच्या मानधनाचे चेक्स द्यायचे होते. तसेच त्याबरोबर जे पत्र रात्री उशिरा साधनाच्या संपादकांनी तयार केले होते, तेही द्यायचे होते. मात्र सकाळी ते पत्र साधनाच्या ऑफिसमध्येच राहिले आणि चेक्स माझ्याकडे आले. संपादकांना हे सांगताच ते म्हणाले की, तू आता तिथे पत्र लिही आणि त्यांना दे. गुहा येण्याआधी पत्र लिहून संपवायचे होते. माझे पत्र लिहून संपले आणि नेमके त्याच वेळी ते तयार होऊन खाली आले. त्यांना म्हटले की, तुमचे चेक्स द्यायचे आहेत आणि हे पत्र त्यासोबत द्यायचे आहे. त्यांनी पत्यावर नजर टाकली, जिथे सह्या करायच्या होत्या तिथे केल्या आणि चेक्स ठेवून घेतले. त्यानंतर त्यांना मला एक अतिशय स्पेसिफिक गोष्ट विचारावयास सांगण्यात आली होती. दिले गेलेले मानधन त्यांच्या लौकिकाला साजेसे आहे की नाही, असा तो प्रश्न होता. मात्र त्या सगळ्याला गुहांनी अगदी सहजपणे बाजूला सारले.
एस.एम.जोशी सभागृहात पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला त्यांना घेऊन आलो, तेव्हा दहा वाजून गेले होते. पुण्यातील क्रीम क्लास त्या कार्यक्रमाला आला होता. तसेच पुण्याबाहेरील अनेक लेखक, कलावंत पत्रकार वगैरे आले होते. कार्यक्रमात त्यांच्या बरोबरीने कुमार केतकर, न्या. गोखले व रझिया पटेलही बोलणार होत्या. कार्यक्रमात ते ‘माय असोसिएशन विथ पुणे’ या विषयावर बोलणार होते. त्यांच्या लेखनावर कुमार केतकर तर हमीद दलवाई यांच्यावर न्या. गोखले बोलणार होते. गुहांना आपले भाषण समजावे म्हणून रझिया पटेल हिंदीत, कुमार केतकर मराठी आणि इंग्रजी असे मिश्र भाषेत, तर न्या. गोखले पूर्णतः इंग्रजीत बोलले. गुहांनी त्यांच्या संशोधनात पुण्याचा संबंध कसा सुटत नाही, हे व्हेरिअर ऑल्विन, बाळू पालवणकर आणि महात्मा गांधी यांची उदाहरणे देऊन सांगितले.
गुहांचे रविवारचे भाषणही शनिवारप्रमाणेच परफेक्ट होते. एखादा सेट झालेला बॅट्समन कसा पहिल्या बॉलपासून उत्तम खेळतो, तसे ते भाषण होते. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना मेहरुन्निसा दलवाई यांच्या आत्मचरित्राची नवी आवृत्ती (‘मी भरून पावले आहे’) त्यांच्याच हस्ते देण्यात आली. कालच्याप्रमाणेच गुहांचे फोटो आणि सही घ्यायला गर्दी उसळली होती. त्या गर्दीतून मार्ग काढत त्यांनी ‘तीन मुलांचे चार दिवस’ हा विशेषांक आणि पुढे पुस्तक आलेल्या तिन्ही तरुण मुलांशी संवाद साधला. त्यांच्या पुस्तकांवर सह्या केल्या. या कार्यक्रमानंतर गुहांच्या सन्मानार्थ साधनाने काही निवडक निमंत्रितांसाठी जेवण ठेवले होते. तिथे जाईपर्यंत गाडीत गुहांशी बोलायला ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ होते. त्यांना काही उपक्रमांसाठी गुहांचे सहकार्य हवे होते, त्या दृष्टीने ते बोलत होते.
जेवणानंतर विमानतळावर जाण्याआधी गुहांना पुण्यातील तीन जागा पाहायच्या होत्या. पर्णकुटी, आगा खान पॅलेस व येरवडा जेल अशा तीन जागा पाहून ते त्यांच्या एका मित्राकडे जाणार होते आणि तिथून पुढे त्यांना विमानतळावर जायचे होते. मी त्यांना हॉटेलमध्येच सोडावे आणि गाडी त्यांच्याबरोबर ठेवावी, असे त्यांनी सुचवले होते. तसेच पर्णकुटी नेमके कुठे आहे हे ड्रायव्हरला सांगावे, असे त्यांनी सांगितले. संध्याकाळी विमानात त्यांना एक स्पेसिफिक सीट हवी होती. त्यासाठी शनिवारी प्रयत्न केले होते, मात्र तसे होऊ शकले नव्हते. त्यांचे जेवण झाल्यावर त्यांना घेऊन हॉटेल प्रेसिडेंटवर गेलो. तेव्हा गाडीत साधनाचे संपादक आले होते. त्या दोघांच्या गप्पा गाडीत झाल्या. बंगळुरूच्या सुखद हवेमुळे आपण कायम कार्यमग्न राहू शकतो, असे गुहासर सांगत होते. तसेच त्यांची अभ्यासिका घरापासून जवळच असल्याने ये-जा करण्यात त्यांचा वेळ जात नाही. त्यांच्या अफाट उत्पादक क्षमतेचे ते रहस्य होते. हॉटेलमधून बाहेर पडताना, व्यग्र दिनक्रमातून दोन दिवस वेळ काढून आल्याबद्दल संपादकांनी गुहांचे आभार मानले. त्याचवेळी गोपाळ नेवे, व सुदाम सानप हे दोघे तेथे आले. ‘आपल्या कार्यक्रमांची पडद्यामागची जबाबदारी सांभाळणारे हे दोन शिलेदार आहेत,’ असे सांगून त्यांच्यासोबत फोटो हवा अशी विनंती संपादकांनी गुहांना केली. तो गुहांसोबताचा शेवटचा फोटो ठरला.
गुहांना हॉटेलवर सोडून, गाडी त्यांच्या दिमतीला देऊन आम्ही साधना कार्यालयात निघालो. ते गेल्यानंतर त्यांचे अपडेट्स आम्ही ड्रायव्हरला विचारून घेत होतो. आगा खान पॅलेसला गेल्यानंतर तेथील फोटो त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर पण टाकला होता.
गुहासर सोबत असताना वेळ कसा गेला, हेच कळले नाही. त्या दोन-अडीच दिवसांत त्यांच्याशी गप्पा होत राहिल्या, तसेच इतरांशी झालेल्या त्यांच्या गप्पा ऐकायची संधी मला मिळाली. ते जेव्हा बोलत नव्हते किंवा चाहत्यांच्या गर्दीत होते तेव्हासुद्धा स्वतःला कसे प्रेझेंट करतात, हे पाहता आले. त्यांचा स्टेजवरील परफॉर्मन्स अगदी जवळून पाहता आला. विविध विषयांवर वेगवेगळ्या लोकांशी ते कसे संवाद साधतात हे पाहणे, हा एक अनुभव होता. कोणत्या व्यक्तीला काय सांगून संवाद चालू ठेवावा याचे उदाहरण अनेकदा दिसले. या सगळ्यातून रामचंद्र गुहा नावाच्या एका अभ्यासकाचे एक चित्र समोर आले.
गुहा उत्तम अभ्यासक आहेत, त्याहून चांगले लेखक आणि वक्ता आहेत. मात्र, या सगळ्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे, एक माणूस म्हणून ते अतिशय सहृदयी आणि उदारमतवादी आहेत. समोरच्या व्यक्तीला काय सांगायचे आहे, हे भाषेचा अडथळा आला तरीसुद्धा सहानुभूतीने समजून घेऊन ते त्यावर आपले मत देतात. (त्यांना भेटणाऱ्या अनेकांची संभाषणे अर्ध्या-कच्च्या हिंदी-इंग्रजीत झाली.) त्यांच्यातील हे माणूसपण त्यांच्यातील अभ्यासकाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. आपल्या देशावर, येथील प्रश्नांवर सातत्याने लिहितानासुद्धा त्यांचे लेखन कधीही फ्रस्ट्रेशन देत नाही, याचे कारण कदाचित या सहृदयी आणि उदारमतवादी वृत्तीत असावे. गुहांसारख्या अभ्यासकाची लोकप्रियता पाहू जाता, अशी लोकप्रियता पेलणे कठीण असते; मात्र ते अगदी सहजपणे वावरतात. कशाचेही ओझे आपल्यावर आहे, असा फील येऊ देत नाहीत. त्यांच्यासारखे अभ्यासक या देशात फार दुर्मीळ आहेत आणि म्हणूनच त्यांना जपले पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे. साधनाच्या कार्यक्रमाने ही जाणीव फारच प्रकर्षाने झाली. ती सगळ्यांसमोर मांडता यावी, यासाठीच हा लेख.
(‘साधना’ साप्ताहिकाच्या २८ जानेवारी २०१८च्या अंकातून साभार.)
.............................................................................................................................................
‘गांधींनंतरचा भारत’ या रामचंद्र गुहा यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3683
.............................................................................................................................................
‘आधुनिक भारताचे विचारस्तंभ’ या रामचंद्र गुहा यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4372
.............................................................................................................................................
लेखक संकल्प गुर्जर दिल्लीस्थित साउथ एशियन विद्यापीठामध्ये पीएच.डी. करत आहेत.
sankalp.gurjar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment