‘न्यूड’ : नग्नता आणि त्यातील सौंदर्याचा वस्तुनिष्ठ पाठ!
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • ‘न्यूड’चं एक पोस्टर
  • Sun , 29 April 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie न्यूड Nude

'नग्नता' मग ती शारीरिक पातळीवरची असो अथवा लेखन वा चित्ररूपातील असो, तिच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन जसा असेल, त्यावर तिची श्लील-अश्लीलता अवलंबून असते. एखाद्या 'न्यूड' चित्रातील कलात्मकता जर वेळीच लक्षात आली तर त्यातील अश्लीलता कदाचित दिसणार नाही, मात्र तेच चित्र कलात्मकता बाजूला ठेवून पाहिलं तर त्यामध्ये फक्त अश्लीलताच दिसू शकेल आणि ते चित्र प्रसंगी टीकास्पद ठरू शकेल. थोडक्यात ज्याच्या त्याच्या नजरेवर अश्लीलतेचा मापदंड अवलंबून असतो. 'न्यूड' या मराठी चित्रपटात अतिशय कलात्मक पद्धतीनं हेच सांगण्यात आलं आहे. हा चित्रपट म्हणजे नग्नता आणि त्यातील सौंदर्याचा वस्तुनिष्ठ पाठ ठरला आहे.

वास्तविक 'न्यूड' हा मराठी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादग्रस्त ठरला होता. हा चित्रपट न पाहताच केवळ नावावरून त्याला तथाकथित संस्कृतीरक्षकांनी विरोध केला होता. हा विरोध म्हणजे ‘अंधानुकरण’ कसं होतं, त्याची हा चित्रपट पाहताना लगेचच जाणीव होते. चित्रपटाचा विषय लक्षात घेता या चित्रपटात ‘नग्नता’ जरूर आहे, परंतु तो कोठेही अश्लीलतेकडे अथवा बीभत्सतेकडे थोडासाही झुकलेला नाही. तो अतिशय कलात्मक पद्धतीनं सादर करण्यात आला आहे. 

या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक रवी जाधव हे स्वतः 'जे.जे. आर्टस' महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्यानं त्यांना या चित्रपटाचा विषय चांगला ज्ञात आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 'न्यूड मॉडेल्स'ची चित्रं काढणं हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय असतो. आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातूनच ते या 'मॉडेल्स'कडे पाहत असतात. मात्र अशी न्यूड चित्रं काढू देणाऱ्या त्या ‘मॉडेल्स’चं ‘अंतरंग’ कोणालाच माहीत नसतं. ते अतिशय कलात्मक पद्धतीनं उलगडून दाखवण्याचा प्रयत्न रवी जाधव यांनी प्रामाणिकपणे केला आहे. त्यामुळे ‘न्यूड’द्वारे एका विषयाचं दाहक वास्तव मोठ्या पडद्यावर आणण्याचं धाडस केल्याबद्दल ते निश्चितच कौतुकास पात्र आहेत. 

‘न्यूड’ चित्रपटात पाहायला मिळते ती एका ‘न्यूड मॉडेल’ म्हणून काम करणाऱ्या एका महिलेची संघर्षकथा. यमुना ही गावाकडे राहणारी तशी अतिशय साधी गृहिणी. तिला लहान्या नावाचा छोटा लहान मुलगा आहे. मात्र तिचा नवरा दारुडा आणि अतिशय रंगेलबाज आहे. त्यामुळे आपलं आणि आपल्या मुलाचं पुढे कसं होणार, या काळजीनं ती ग्रस्त असतेहे. शेवटी नवऱ्याच्या जाचाला कंटाळून एके दिवशी यमुना आपल्या लहान्यासह मुंबईचा रस्ता धरते. चंद्राक्का ही तिची मावशी तिला मुंबईत आश्रय देते. चंद्राक्काही गरिबीशी संघर्ष करत आपलं जीवन जगत असते. पैशासाठी तीही गुपचूपपणे ‘न्यूड मॉडेल’चा व्यवसाय करते. सुरुवातीला यमुनेला हे कळल्यावर तिला शिसारी येते, मात्र या व्यवसायात पैसे वेळेवर आणि चांगले मिळतात हे कळल्यानंतर तीही मुलाच्या शिक्षणासाठी नाईलाज म्हणून हा व्यवसाय पत्करते. हा व्यवसाय करताना तिला कोणत्या अनुभवातून जावं लागतं, तसंच मुलाला मोठं करण्याचं तिचं स्वप्न साकार होतं का? यासाठी हा ‘न्यूड’ चित्रपट पाहायलाच हवा. 

या चित्रपटाची कथा-पटकथा एखाद्या चांगल्या चित्राप्रमाणे प्रमाणबद्ध आहे. लहान्याला लहानपणापासून असलेली चित्रकलेची आवड आणि तो मोठा चित्रकार होण्यासाठी त्याला शिकवण्यासाठी यमुनेची चालू असलेली धडपड हा भाग कथेची उत्सुकता वाढवणारा आहे. शिवाय तो मोठा चित्रकार झाला तर त्याच्यासमोरच मॉडेल म्हणून आपल्यावर बसण्याची वेळ येऊ नये म्हणून लहान्याला औरंगाबादला पाठवण्याची तिच्या मनाची तयारी आणि, “त्याला जर कलेचं मर्म कळलं तर आपलं काम पाहून तो आपल्या पायावर डोकं ठेवेल आणि नाहीच कळलं तर...” या शब्दांत तिनं व्यक्त केलेली अगतिकता कथेची रुची वाढवणारी ठरली आहे. तसंच नासिरुद्दीन शहा यांनी साकारलेली मलिक या प्रसिद्ध चित्रकाराची भूमिका एका वादग्रस्त आंतरराष्ट्रीय चित्रकाराची आठवण करून देते. त्यामुळे कथेला ती पूरक ठरते.

याशिवाय चित्र काढताना एरवी ‘न्यूड मॉडेल’कडे निर्विकार वृत्तीनं पाहणारा, मात्र प्रसंगी त्याच ‘मॉडेल’मधील माणूसपण शोधणारा जयराम हा विद्यार्थी, तसंच यमुनेनं पैसे मिळवण्यासाठी ‘न्यूड मॉडेल’ म्हणून काम करावं यासाठी तिला सुरुवातीला ‘त्यामध्ये काही गैर नाही’ असं सांगताना “बाईनं अंगावर कितीही कपडे घातले तरी पुरुषी नजरेतून तिच्या अंगावर तसा एकही कपडा नसतो” या शब्दात तिला पटवणारी चंद्राक्का ही पात्रं कथेची रंगत वाढवतात. तर “जग वेगानं कितीही पुढे जात असलं तरी कलेच्या स्वातंत्र्याचा होणार संकोच, ही बाब कलेच्या दृष्टीनं चिंता करणारी आहे” यासारखे चित्रकार प्राध्यापकाच्या तोंडचे संवाद आणि त्याच्या पुष्ट्यर्थ महाविद्यालयावर चालून आलेला संस्कृतीरक्षकांचा मोर्चा आणि त्यांनी केलेली नासधूस, वास्तव परिस्थितीची दाहकता दाखवून देतात. 

सर्वच कलाकारांनी केलेल्या संयमित अभिनयामुळे हे ‘न्यूड’ चित्र अतिशय देखणं झालं आहे. विशेषतः कल्याणी मुळे यांनी रंगविलेली असहाय यमुना चांगली लक्षात राहते. मुलाच्या भवितव्यासाठी केवळ पैसे मिळवण्यासाठी नाईलाज म्हणून मॉडेलचा व्यवसाय स्वीकारताना आलेली अगतिकता आणि त्याचवेळी एक कलाकार म्हणून कलेचं स्वातंत्र्य जपणारी स्त्री त्यांनी आपल्या उत्तम अभिनयानं छान उभी केली आहे. चंद्राक्काच्या भूमिकेतही छाया कदम अतिशय चपखलपणे बसल्या आहेत. मदन देवधर (लहान्या), ओम भुतकर (जयराम), श्रीकांत यादव (यमुनेचा नवरा) किशोर कदम (प्राध्यापक) यांच्याही भूमिका उत्तम वठल्या आहेत.

अमलेंदू चौधरी यांचं छायाचित्रण आणि सौरभ भालेराव यांचं संगीत याही चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत. थोडक्यात, केवळ नावावर न जाता हे 'देखणं चित्र' पडद्यावर पाहायलाच हवं. 

.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Rahul kamalakar Zemse

Tue , 01 May 2018

https://www.instagram.com/p/BiEr80vBiJc/


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......