अजूनकाही
गेल्या दहा वर्षांपासून मी मुस्लीम या विषयाचा अभ्यास करतोय. पण संदर्भ ग्रंथांच्या कमतरतेमुळे मला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. गेल्या वर्षभरात मी पुणे, मुंबई, औरगांबाद, नागपूरच्या अनेक ग्रंथालयांत वारंवार गेलो आहे. बऱ्याच शोधानंतर एखादंच पुस्तक हाती लागतं. अनेक वेळा दुकानदारांशी बोललो. सर्वांची एकच तक्रार असते की, अलीकडे प्रकाशक अशी पुस्तकं छापत नाहीत. मुस्लिमांवरील पुस्तकांना वाचक मिळत नाहीत, अशी दुकानदार व प्रकाशकांची नेहमीचीच तक्रार आहे. पण माझं निरीक्षण यापेक्षा वेगळं आहे. २००१ नंतर मुस्लीम व इस्लामविषयक पुस्तकांची मागणी झपाट्यानं वाढली आहे. ऑनलाईन खरेदीत इस्लाम हा विषय बेस्ट सेलरमध्ये आहे.
वर्ल्ड ट्रेंड सेंटरवरील हल्ल्यानंतर जगभरात ‘इस्लाम फोबिया’चा नियोजनबद्ध पद्धतीनं प्रसार करण्यात आला. त्या चार-दोन महिन्यांत इस्लाम इतका बदनाम झाला की, गेल्या कित्येक शतकांत झाला नसावा. परिणामी इस्लाम काय भानगड आहे, हे जाणून घ्यायचा कल जगभरात अचानक वाढला. जागतिक स्तरांवर इस्लाम आणि मुस्लीमविषयक पुस्तकांची मागणी झपाट्यानं वाढली.
पेग्विन, ऑक्सफर्ड यांसारख्या प्रकाशन संस्थांनी अशा प्रकारच्या पुस्तकांतून रग्गड कमाई केली. पेंग्विननं तर खास इस्लामविषयक लेखकच पोसले होते. अशा प्रकारचं लिखाण करणाऱ्या लेखकांना पेंग्विननं बक्कळ मानधन देऊ केलं. त्यातून मार्केटची गरज असलेलं बरंच ‘अण्टी इस्लाम’ साहित्य गेल्या १५ वर्षांत मेनस्ट्रीममध्ये आलं. यातला राजकीय वाद बाजूला ठेवला तरी मुस्लीमविषयक पुस्तकांतून भारी कमाई या प्रकाशकांना झाली आहे. जागतिक स्तरावर मागणी वाढल्यानं अनेक भाषांमध्ये ही पुस्तकं अनुवादित झाली. भारतात हिंदीतही ही अनुवादित पुस्तकं भरमसाठ आली. ही एकांगी मांडणी खोडून काढणारा एक विचारप्रवाह अलीकडच्या काळात वाढला आहे. पुन्हा याच प्रकाशकांनी जागतिक स्तरांवर मार्केटची गरज ओळखून अशी पुस्तकंही प्रकाशित करणं सुरू केलं आहे. वरील कथित पुस्तकं बऱ्याच भाषेत अनुवादित झाल्यानं तिकडेही प्रतिवादाच्या अनुवादाची परंपरा सुरू झाली.
गेल्या वर्षी पाकिस्तानचे माजी डिप्लोमॅट हुसेन हक्कानी यांच्या भारत-पाक मैत्री डिप्लोमसीवरील एका अनुवादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिल्लीत पार पडला. या सोहळ्यात हक्कानी यांच्या पुस्तकाची विक्रमी विक्री झाली. अजूनही अॅमेझॉन व फ्लिपकार्टवर हे पुस्तक टॉपमध्ये आहे. मी या पुस्तकाची प्रत फेब्रुवारीमध्ये ऑर्डर केली होती. महिनाभरानंतर पुस्तक माझ्या हाती पडलं.
दुसरं उदाहरण इरफान अहमद यांचं. ते माझे फेसबुक मित्र आहेत. ते जर्मनीच्या मॅक्स प्लेनक या धार्मिक विविधतेवर काम करणाऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक आहेत. त्याचं ‘रिलिजन अॅज क्रिटिक’ हे इस्लामी धर्मशास्त्रावरील ३०० पानी पुस्तक दोन महिन्यांपूर्वी प्रकाशित झालं. तब्बल तीन हजार रुपयांच्या या पुस्तकाचं मुखपृष्ठ फेसबुकवर टाकताच इरफान अहमद यांच्याकडे अनेक ऑर्डर आल्या. ऑक्सफर्डनं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला भारतातून प्रचंड मागणी आहे.
त्यांचं अजून एक पुस्तक ऑक्सफर्डकडून प्रकाशित होतंय. त्याबद्दल त्यांनी २० एप्रिलला फेसबुकवर माहिती दिली. त्याबाबतची पोस्ट अपलोड होताच, पुस्तकासाठी बुकींग सुरू झाली. बुकिंग केलेले सर्वजणच पुस्तक खरेदी करतील असं नाही, पण हा प्रतिसाद वाचकांची मुस्लीमविषयक साहित्याची रुची जरूर दर्शवतो.
आज इस्लामवर अनेक पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. पण सामाजिक आणि राजकीय विषयावरची पुस्तकं गायब आहेत. या विषयावर लिखाण करणाऱ्या जुन्या विचारवंतांची अनेक पुस्तकं आज बाजारात नाहीत. त्यामुळे अभ्यासकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. मौलाना आझाद, सर सय्यद अहमद खान, डॉ. रफीक झकेरिया, मोईन शाकीर, असगरअली इंजिनियर यांची दर्जेदार पुस्तकं आऊट ऑफ प्रिंट आहेत. ही गरज लक्षात घेऊन हिंदी-इंग्रजीत अशा प्रकारची पुस्तकं पुनर्प्रकाशित होत आहेत. मराठीत ही पुस्तकं पुनर्प्रकाशित झाली तर नक्कीच मोठा आर्थिक लाभ मराठी प्रकाशकांना होऊ शकतो.
गेल्या महिन्यात इंग्रजी दै. ‘इंडियन एक्सप्रेस’नं मुस्लीम प्रश्नांवर ‘दि मॉयनॉरिटी स्पेस’ या नावाची लेखमाला प्रकाशित केली. यात सुमारे १८-१९ लेख प्रकाशित झाले आहेत. याव्यतिरिक्त विविध ठिकाणी जवळजवळ ५० लेखांमधून या विषयाची चर्चा झाली. लवकरच या लेखांना संग्रहित करून पुस्तक काढलं जाणार आहे. या पुस्तकातून समकालातील सकस लिखाण उपलब्ध होऊ शकेल.
वरील उदाहरणं प्रातिनिधिक असली तरी मुस्लीमविषयक लिखाण वाचणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राणा अयूब यांच्या ‘गुजरात फाईल्स’चं उदाहरण सर्वांसमोर आहे. मूळ इंग्रजीत प्रकाशित झालेलं हे पुस्तक हिंदी, संस्कृत, तमिळ, मल्याळी भाषेत अनुवादित झालं आहे. या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचीही नोंदणी सुरू आहे. प्रकाशनाच्या वर्षभरानंतरही ‘गुजरात फाईल्स’च्या मागणीत कुठलाही फरक पडलेला नाही. एस. एम. मुश्रीफ यांचं ‘हू किल्ड करकरे’ हे पुस्तकदेखील इंग्रजीसह मराठीतही बेस्ट सेलर ठरलं आहे. नुकतीच या पुस्तकाच्या मराठी अनुवादाची नववी आवृत्ती शब्द पब्लिकेशननं काढली आहे.
सत्ताधारी भाजपच्या मुस्लीमद्वेषी धोरणामुळेही भारतात ‘मुस्लीम विषय’ अभ्यासण्याचा कल वाढला आहे. पुरोगामी संघटनांकडून मिश्र संस्कृतीचा पुरस्कार करणारी अनेक पुस्तकं बाजारात आली आहेत. सबा नकवी, योगिंदर सिकंद यांची भरमसाठ महाग पुस्तकं खरेदी करून वाचणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दहशतवादाच्या आरोपातून सुटून आलेल्या अनेक तरुणांनी आत्मचरित्रं लिहिली आहेत. ‘११ साल सलाखो के पिछे’, ‘फ्रेम्ड’, ‘बेगुनाह कैदी’ इत्यादी आत्मचरित्रांनी मुस्लीम समाजातील सामान्य व मध्यमवर्गाला वाचनाकडे खेचलं आहे.
तसं पाहिलं तर अशा पुस्तकांनी मुस्लीम समाजात वाचनसंस्कृती नव्यानं रुजवली आहे. दहशतवादाच्या आरोपातून दोषमुक्त झालेल्या दिल्लीच्या मोहम्मद आमीर खानचं आत्मचरित्र राजहंस प्रकाशननानं अनुवादित केलं आहे. मुंबईच्या अब्दुल वाहिद शेख यांचं ‘बेगुनाह कैदी’ उर्दू, हिंदीत चांगलं गाजतंय.
रोहन प्रकाशननं जागतिक स्तरांवरील अनेक मुस्लीम भाष्यकारांची पुस्तकं अनुवादित केली आहेत. मेहता पब्लिशिंग हाऊसनेदेखील काही निवडक पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत. साधना प्रकाशनानं समग्र हमीद दलवाई पुनर्प्रकाशित प्रकाशित केले आहेत. मुस्लीम सत्यशोधक मंडळाला या समग्र दलवाई साहित्याचा खूप फायदा झाला आहे. याव्यतिरिक्त दलवाईंच्या टीकाकारांनीदेखील ही पुस्तकं उचलून धरली आहेत.
मुस्लीम लेखकांच्या आत्मचरित्रांनादेखील मराठीत मोठी मागणी आहे. मौलाना आझाद यांचं ‘स्वातंत्र्याच्या जन्मकाली’ हे सध्या आऊट ऑफ प्रिंट आहे, पण उर्दू, हिंदी, इंग्रजीमध्ये आजही गाजत असलेलं हे पुस्तक आहे. मराठीत अलीकडच्या काळात आत्मचरित्रांना चांगली मागणी आहे. फ. म. शहाजिंदे यांची ‘मी-तू’, इब्राहिम खान यांचं ‘मुस्लीम महार’, हुसेन जमादार यांचं ‘जिहाद’, सय्यदभाई यांचं ‘दगडावरची पेरणी’, तसनीम पटेल यांचं ‘भाळ अभाळ’, मल्लिका अमर शेख यांचं ‘मला उधवस्त व्हायचंय’ आणि मेहरुनिस्सा दलवाई यांचं ‘मी भरून पावले’ इत्यादी आत्मचरित्रांना चांगली मागणी आहे. ‘मी भरून पावले’ची हिंदी आवृत्तीही नुकतीच आली आहे. पण जुनी दर्जेदार आत्मचरित्रं आज आऊट ऑफ प्रिंट आहेत. प्रकाशकांच्या उदासीन धोरणामुळे ही पुस्तकं प्रकाशित होत नसल्याचं दिसून येतं.
गेल्या काही वर्षांपासून मी स्वत: मुस्लीमविषयक संदर्भ ग्रंथांचा संग्रह करतो आहे. दिल्लीचं दरियागंज बुक मार्केट, मुंबईचं पीपीएच, किताबघर, पुण्यात लकडी पुलावरून मी अनेक पुस्तकं विकत घेतली आहेत. पुण्यातील भगतसिंग अकॅडमीतील अनेक ग्रंथांची मदत झाली. तसंच गोखले आणि डेक्कन कॉलेजमधील ग्रंथालयांत अनेक पुस्तकं आहेत. मी तिथं जाऊन अनेक पुस्तकं चाळली\वाचली आहेत. यामुळे माझा बराचसा वेळ वाया जातो. पण माझा पुस्तकाचा शोध सुरूच राहील. मात्र प्रकाशकांनी अशी दुर्मीळ पुस्तकं उपलब्ध करून दिल्यास माझ्यासारख्या अभ्यासकांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. या विषयावर मी अनेक प्रकाशकांशीही बोललो आहे. त्यातील काहींनी उदासीनता दाखवली, तर काहीजण अशी पुस्तकं नव्यानं प्रकाशित करायला तयार झाले आहेत.
अलीकडे सोलापूरच्या गाझियोद्दिन रिसर्च सेंटरनं मराठीत काही इतिहासविषयक पुस्तकं खासगीरीत्या प्रकाशित करून बाजारात आणली आहेत. बाबरनामा, कुली कुतुबशाह, औरंगजेब, महमंद तुघलक, टिपू सुलतान यांची अराजकीय पुस्तकं या सेंटरनं प्रकाशित केली आहे. या सेंटरकडून आगामी काळात डॉ. रफीक जकेरिया आणि मोईन शाकीर यांची सर्व पुस्तकं पुनर्प्रकाशित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या रिसर्च सेंटरकडे लेखकांची मोठी टीम आहे. गाझियोद्दीन रिसर्च सेंटरला प्रकाशक व वितरक मिळाले तर अनेक दर्जेदार पुस्तकांची निर्मिती आगामी काळात शक्य होईल.
.............................................................................................................................................
लेखक कलीम अजीम 'सत्याग्रही विचारधारा' मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत.
kalimazim2@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Wed , 02 May 2018
नमस्कार कलीम अझीम! आज इस्लामच्या नावाखाली कोणीही उठतो आणि दहशतवादी कृत्ये करून निरपराध्यांचे बळी घेतो. म्हणून इस्लाम समजून घेण्यासाठी बिगरमुस्लिम जगतात इस्लामी पुस्तकांची मागणी वाढलेली दिसते. अर्थात सर्वांचीच (मुस्लिम व बिगरमुस्लिम दोघांची) अपेक्षा अशीये की इस्लामचं काहीतरी प्रमाणीकरण झालं पाहिजे. त्यादृष्टीने इस्लामी पुस्तकांची वाढलेली मागणी ही केवळ एकतर्फी असू नये. मुस्लिमांनी देखील अशीच पुस्तके वाचून बिगरमुस्लिमांसोबत सलोख्याने नांदण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. किंवा निदान संवादास सुरुवात तरी केली पाहिजे. इस्लाम म्हणजे स्वैर आतंकवाद हे चुकीचं समीकरण निर्माण होऊ घातलंय. ते अत्यंत घातक आहे व ते मोडून काढलं पाहिजे. आपला नम्र, -गामा पैलवान
vishal pawar
Mon , 23 April 2018