अजूनकाही
दिल्लीला आल्यापासून वेगवेगळ्या जागा शोधण्याचा चंग सुरू आहे. लिस्ट मुंबईतच बनली होती, पण त्यामध्ये दर्यागंजचं संडे बुक मार्केट नव्हतं. त्याबद्दल इथं आल्यावर समजलं. दिल्ली म्हटलं की, यादीत सर्व पुरातन वास्तू असतात. लालकिल्ल्यापासून कुतुब मिनारपर्यंत. पर्यटकांची प्रचंड गर्दी असते या ठिकाणी. या यादीत हे बुक मार्केट कुठेच नसतं. दिल्लीत काही दिवस स्थायिक झाल्यानंतर तुम्ही पुस्तक प्रेमी असाल तर हे नाव तुमच्या कानी पडतं.
दिल्लीत पुस्तकं घ्यायची असतील तर दोन जागा खास आहेत. पहिली खान मार्केट, आणि दुसरी दर्यागंज संडे बुक मार्केट. खान मार्केट हे पुस्तकांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. शिवाय स्पा, फुड कोर्ट, ज्वेलर्सची दुकानं असं भरपूर तिथ आहे. खान मार्केट म्हणजे दिल्लीतली दक्षिण मुंबई. इथं खास करून इंग्रजी पुस्तकाची दुकानं आहेत. काही ठिकाणी हिंदी पुस्तकंही मिळतात. प्लॅस्टिकच्या कवरमध्ये रचलेले पुस्तकांचे ढिग इथं दिसतात. तुम्हाला हवं ते पुस्तक विकत घेण्यासाठी मदतीला माणसं असतात. ही सर्व पुस्तकांची दुकानं एसी आहेत. पॉश गाडीतून येणारे पुस्तकप्रेमी तिथं अनेक लेखकांवर गप्पा मारताना भेटतात. दिल्लीत वाचकांची संख्या चांगली आहे. मुंबईतल्या ‘किताबखाना’ एवढं मोठं दुकान नसलं तरी छोटी-मोठी अनेक पुस्तकांची दुकानं इथं आहेत. मुख्य म्हणजे तिथं गर्दीही असते.
पण दर्यागंज संडे बुक मार्केटची बातच काही और आहे. मुंबईला हुतात्मा चौकासमोर जसे रस्त्यावर पुस्तकांचे स्टॉल असायचे, तसंच आहे हे बुक मार्केट. पण हे मार्केट दीड-दोन किलोमीटर परिसरात पसरलेलं आहे. ते फक्त रविवारीच भरतं. कारण या परिसरात बँका आणि सरकारी कार्यालयं आहेत. रविवारी ती बंद असतात. म्हणून बाहेरच्या रस्त्यावर हा पुस्तकांचा आठवडी बाजार भरतो. कोलकात्ताचा कॉलेज स्ट्रीटस, मद्रासमधलं मूर मार्केट, हैद्राबाद कोटी बुक मार्केट आणि मुंबईतल्या फाऊंटनमधील पुस्तकांचे स्टॉल्स यांपेक्षा कितीतरी मोठं आहे, हे बुक मार्केट.
या बुक मार्केटची सुरुवात कधी झाली हे कुणाला सांगता येत नाही. अनेकांना विचारलं तर ते सांगतात खूप आधीपासून हा पुस्तकांचा बाजार भरतो. या मार्केटची सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे इथं जगातली सर्व इंग्रजी पुस्तकं मिळू शकतात. तेही अगदी २० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत. सर्वांत जास्त पुस्तकं ही शैक्षणिक आहेत. अगदी केजीपासून मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बीएस्सी आणि अकाउंटिंगची पुस्तकं इथं रस्त्यावर अगदी कमी किमतीत मिळतात. स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा तर खच पडलेला असतो. या पुस्तकांना जास्त मागणीही असते.
अतुलकुमार सिंघवी गेल्या १५ वर्षांपासून इथं आपला पुस्तकांचा स्टॉल लावतायत. आता तर त्यांचा मुलगाही त्यांच्यासोबत येतोय. अतुलकुमार सांगतात, “मला माहीत नाही कसं सुरू झालं मार्केट, पण इथं काही पब्लिशिंग हाऊसेस आहेत. ती रविवारी बंद असतात. तिथं नवीन पुस्तकं मिळतात. म्हणून कदाचित हा सेकंड हँड पुस्तकांचा बाजार वाढला असावा. इथली ७० टक्के पुस्तकं ही वापरलेली असतात. त्यात इंग्रजी जास्त आहेत. हिंदी किंवा इतर भाषेतल्या पुस्तकांची संख्या फारच कमी असते.”
सकाळी आठ वाजल्यापासून पुस्तकांचे स्टॉल्स लावायला सुरुवात होते. बंद असलेल्या बँका, सरकारी कार्यालयांचे व्हरांडे या पुस्तकांनी भरू लागतात. काही जण तर टेम्पोतून ही पुस्तकं आणतात. १० वाजण्याच्या आसपास पुस्तकांचा हा आठवडी बाजार चांगलाच फुलतो. लहान मुलं आई-बाबांचा हात पकडून शाळेची पुस्तकं शोधताना दिसतात, तर पुस्तकप्रेमी एकामागून एक स्टॉल सावकाश पार करताना दिसतात. संपूर्ण मार्केटमध्ये जर आपल्या आवडीचं पुस्तक शोधायचं असेल, तर त्यासाठी अडीच-तीन तास खर्च करावे लागतात. कारण पुस्तकांच्या ढिगातून आपलं पुस्तक शोधणं जरा कठीणच होतं. छोटे-मोठे सुमारे ७० स्टॉल्स इथं लागतात. सुमारे दोन-तीन किलोमीटरचा हा परिसर रविवारी पुस्तकांनी भरतो आणि ती घेण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होते.
हे बुक मार्केट इंग्रजी क्लासिक पुस्तकांसाठी जास्त प्रसिद्ध आहे. काफ्कापासून लॉरेन्स, विलियम्स थॅकरे, सर्व इथं मिळतात. अगदी अलीकडचे लेखकही मिळतात. त्यामुळे क्लासिक शोधणाऱ्यांसाठी क्लासिक आणि कंटेम्पररी चाहत्यांसाठी त्यांच्या आवडीची पुस्तकं. असं तीन पिढ्यांचं वाचनाचं वेड भागवेल, असं सर्व काही या बुक मार्केटमध्ये आहे. त्यामुळं इथली दर्दींची गर्दी आठवड्यागणिक वाढतेय.
दिल्लीच्या ग्रेटर कैलासमधून आलेले रोशन चतुर्वेदी इथं भेटले. ते म्हणाले “काफ्काचं ‘द कॅसेल’ २० रुपयात आणि ब्लादिमीर नोबोकोवची ‘लोलिता’ ५० रुपयांत जगात दुसरीकडे कुठे मिळेल का? मी दर आठवड्याला या क्लासिक पुस्तकांच्या शोधात इथं येतो. वाचणारा माणूस वेडा होईल इतकी पुस्तकं इथं आहेत.”
हे इतकं मोठं मार्केट इथं कसं उभं राहिलं असेल याचा जरा जास्त शोध घेतला तर समजलं की, दिल्लीत पायरेटेड पुस्तकाचं मोठं रॅकेट आहे. कुठलंही नवीन पुस्तक आलं की, अगदी त्याच दिवशी त्याची पायरेटेड कॉपी मिळू शकते. हे रॅकेट या मार्केटला माल पुरवतं. काही जण रद्दीत दिलेली पुस्तकं आणि नियतकालिकं विकायला येतात.
काही मिळत नाही असं नाही, फक्त शोधावं खूप लागतं. खूप घासाघीसही करावी लागते. अगदी भाजी मार्केटमध्ये करतो तशी, तरच पुस्तकं कमी भावात मिळू शकतात. काही ठिकाणी ‘फिक्स रेट’चा बोर्डही दिसतो. पण एक मात्र नक्की, एकदा का तुम्ही या मार्केटमध्ये शिरलात आणि तुम्हाला वाचनाची आवड असेल तर हे मार्केट तुमचं आहे. पुढचे काही तास तुम्ही इथून बाहेरच पडू शकत नाही.
दिल्ली गेट मेट्रो स्टेशनच्या ३ नंबर एक्सिट पॉइंटला हे मार्केट सुरू होतं, ते असगर अली स्ट्रीटच्या अगदी टोकावर असलेल्या डिलाईट सिनेमापर्यंत. इथं सकाळी जशी मार्केट भरण्याची लगबग असते, तशीच संध्याकाळी टेम्पोची गर्दी होते. पुस्तकांची गाठोडी टेम्पोत टाकली जातात. पुढच्या रविवारी परत येण्यासाठी.
दिवसभरात इथला प्रत्येक स्टॉलधारक साधारणत: किमान २००० ते ५००० पर्यंतचा गल्ला कमावतो. दोन महिन्यापूर्वी या बुक मार्केटवर महानगरपालिकेची करडी नजर पडली. तब्बल पाच आठवडे मार्केट बंद होतं. तेव्हा सोशल मीडियावर ‘सेव्ह संडे बुक मार्केट’चा ट्रेड सुरू झाला होता. दिल्लीसारख्या शहरात काहीच आलबेल नसताना फक्त रविवारी भरणाऱ्या या मार्केटवर पालिकेची नजर का, असा एक मोठा मतप्रवाह तयार झाला. शेवटी पाच आठवड्यानंतर मार्केट पुन्हा सुरू झालं. पालिका पुस्तकप्रेमींच्या दबावाला झुकली आणि वाचणाऱ्यांचा अखेर विजय झाला!
दिल्लीला तुम्ही कधी आलात तर रविवारी या बुक मार्केटला आवर्जून भेट द्या. कारण या बुक मार्केटमध्ये दिल्लीतल्या इतर ‘ऐतिहासिक’ वास्तूंसारखीच ‘ऐतिहासिक’ बात आहे!
.............................................................................................................................................
लेखक नरेंद्र बंडबे झी मीडियामध्ये कार्यरत असून आंतरराष्ट्रीय फिल्म क्रिटिक असोसिएशन FRIPRESCI चे सदस्य आहेत.
narendrabandabe@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
vishal pawar
Thu , 26 April 2018
महत्वाची माहिती.