अजूनकाही
डेसिडेरिअस इरॅस्मस हा डच पाद्री, सामाजिक टीकाकार, शिक्षक व धर्मशास्त्री होता. युरोपच्या सांस्कृतिक पुनरुत्थानातील तो महत्त्वाची व्यक्ती होता. तो म्हणतो, “माझ्याकडे जेव्हा थोडे पैसे असतात, तेव्हा मी पुस्तके विकत घेतो व जे उरतील ते अन्न व कपडे यासाठी वापरतो.” डेसिडेरिअसचा जन्म हा पंधराव्या शतकातला. पुस्तकांची छपाई नुकतीच सुरू होत होती. हाताने लिहिलेली पुस्तके खूप महाग असत. अनेक पुतळ्यांत व चित्रांत डेसिडेरिअसच्या हातात पुस्तक आहे.
डेसिडेरिअससारख्या अनेक महाजनांनी वाचनाचे महत्त्व सांगितले आहे. वाचनप्रेमाला समाजात मानाचे स्थानही असते. पण त्याचे वाचनवेडात रूपांतर झाले की, वाचणारी व्यक्ती थट्टेचा विषय होते. जोपर्यंत तुम्ही मर्यादेबाहेर प्रेम करत नाही, तोपर्यंत तुम्ही पुरेसे प्रेम करत नाही, या उक्तीनुसार वाचनप्रेमाचे रूपांतर वाचनवेडात कधी होईल हे सांगता येत नाही. ‘पुस्तकी-कीडा’, ‘पुस्तक-वेडा’ अशी विशेषणे त्याला लावण्यात येतात. ती बऱ्याचदा खरीही असतात. अनेक किस्से त्याच्या नावाने प्रसिद्ध असतात. एका पुस्तकी पंडिताला त्याच्या बायकोने कंटाळून म्हटले, ‘मी तुझी बायको होण्यापेक्षा पुस्तक झाले असते तर बरे झाले असते! (त्या निमित्ताने तरी तू मला जवळ घेतले असतेस!).’ लोकांना प्रश्न सोडवणारा, मदतीस येणारा, सामाजिक माणूस जास्त प्रिय असतो व पुस्तक वाचणारा स्वत:च एक मोठी अडचण असतो.
असा वाचनवीर व्यंगचित्राचा विषय होणे साहजिक असते. शोध घेतला तर ही मनेावृत्ती दर्शवणारी व्यंगचित्रे बरीच मिळतील. या लेखात वाचकाच्या मनोवृत्तीवर नेमका प्रकाश टाकणाऱ्या काही निवडक व्यंगचित्रांच्या आधारे वाचनवेड्या मनाचा विचार केला आहे.
“सध्या नवीन वाचन काय?” हा वाचकाला नातेवाईक व मित्रांकडून कायम विचारण्यात येणारा प्रश्न असतो. वाचणारा माणूस कधीही याचे उत्तर लगेच देऊ शकत नाही. याचे मुख्य कारण तो बऱ्याचदा समांतरपणे एकापेक्षा जास्त पुस्तके वाचत असतो आणि त्या पुस्तकांचा एकमेकांशी संबंध असतोच असे नाही. शॅरलॉक होम्स, विंदांच्या कविता व ऑलिव्हर सॅक्सचे ‘अवेकनिंग’, हे तो एकाच वेळी समान आस्थेने वाचत असतो. त्यातले एखादे त्याने आधी अनेकदा वाचलेलेही असते. शिवाय एक पुस्तक वाचत असताना अनेक पुस्तके त्याच्या मनात फडफडत असतात आणि वेटिंग लिस्टवरही अनेक असतात. अशा अशांत वाचक मनाचे खालच्या व्यंगचित्रात केलेले चित्रण बहारीचे आहे.
पुस्तकांवर बंदी घालण्याचा प्रकार देशोदेशीच्या राजकर्त्यांकडून अनेक वेळा घडतो. अनेक सामाजिक गटही आपली ताकद अजमावत पुस्तकांवर सामाजिक बहिष्कार जाहीर करतात. एकामेकांवर कुरघोडी करू पाहणाऱ्या धर्मसत्ता व राजसत्ता यांचेही याबाबत एकमत दिसते. जनतेला नियंत्रणात ठेवण्याचा मार्ग पुस्तक-बंदीतून जातो, असा सत्ताधाऱ्यांचा समज असतो आणि तो पूर्वापार आहे. चर्चने त्यांनी बंदी घातलेल्या पुस्तकांची पहिली यादी १५५९ साली प्रसिद्ध केली. पार्लमेंटमधले पुस्तकांवर नियंत्रण घालण्याच्या विरोधात केलेले सर्वांत प्रसिद्ध भाषण - ‘अॅरिओपॅगेटिका’ हे मिल्टनचे - १६४४ सालचे आहे. त्यातील वचने शाळा, महाविद्यालये व वाचनालयांवर लावलेली सापडतात. बंदीमुळे त्या पुस्तकांबद्दल आणखी कुतूहल जागृत होते. बंदी घातलेली पुस्तके स्मरणातून जात नाहीत. पुढच्या व्यंगचित्रात हेच तरलपणे सांगितले आहे.
मुलांची पुस्तके व त्यांचे वाचन हाही विषय सतत चर्चेत असणारा आहे. पुढील व्यंगचित्र मुलांबरोबर पालकांची मनोवृत्ती दर्शवते. मुलांसाठी म्हणून आणलेले महागडे ज्ञानकोश अखेर रद्दीत जातात. मुलांना वाचायला काय आवडेल याचा विचार करताना मोठी माणसे आपला भूतकाळ विसरतात. आपापल्या लहानपणच्या रत्नाकर मतकरी, गुरुनाथ नाईक वा चंद्रकांत काकोडकरांना विसरणे कसे शक्य आहे? या मुलाला त्याच्या हातात कोंबलेल्या पुस्तकातल्या नीरस माहिती बरोबर काही चमचमीत हवे आहे.
जातीच्या वाचकाला सारे शब्दांत आले की, ते मनाला भिडते. वाचन महर्षी बोऱ्हेसला हे नेमके समजले होते. नाइल नदी म्हटली की, त्याला ज्ञानकोशातले नाइलचे वर्णन आठवे. खऱ्या नाइलशी त्याला काही देणेघेणे नसे. या व्यंगचित्रातदेखील या लहान मुलाला प्रेमळ पित्याच्या सोबतीचा आनंद घेण्यापेक्षा त्याच्यासंबंधी वाचणे जास्त प्रिय आहे. याचा मागोवा घेतला तर लक्षात येईल की, प्रवास वर्णने वा थरारक मोहिमांबद्दल भाराभर वाचणारा माणूस फारच गरज असल्याशिवाय घराबाहेर पाऊलही टाकणारा नसतो.
आणि या शेवटल्या व्यंगचित्रात इलेक्ट्रानिक युगातल्या मुलाला त्याच्या भाषेतच वाचनाचे महत्त्व सांगावे लागत आहे.
व्यंगचित्रांतल्या अशा प्रकारच्या थट्टेची व विनोदाची वाचनवीराला सवय असते. पण याला प्रत्त्युत्तर करायला म्हणून त्याला पुस्तकातून मान वर करून पाहायलाही सवड नसते. अशाच एका वाचकाने ग्रंथपालाला रात्री दोन वाजता फोन करून वाचनालय उघडण्याची वेळ विचारली. ग्रंथपालाने याबद्दल चार शिव्या हसडताच वाचकाने दिलगिरीच्या स्वरात आपण वाचनालयातून बोलत असल्याचे सांगितल्याचेही मी वाचून आहे. तेव्हा वाचनाचा जरा खोलवर विचार केला तर त्याबद्दलचे अनेक सुविचार हे उथळ असल्याचे लक्षात येईल.
लेखाच्या सुरुवातीला उल्लेखलेला डेसिडेरिअस इरॅस्मस हा उत्तम वाचकाबरोबरच उत्तम लेखकही होता. धर्मसुधारणेच्या काळात चर्चविरुद्धच्या बंडवाल्याबद्दल सहानुभूती असूनही तो प्रोटेस्टंट झाला नाही. कॅथॉलिक चर्चशी प्रामाणिक राहून सुधारणेचा पक्ष तो मांडत राहिला. ‘इन अ प्रेज ऑफ फॉली’ (मूर्खपणाच्या समर्थनार्थ’) हे त्याचे गाजलेले पुस्तक. अभिजनांच्या सभेत मूर्खपणा आपला पक्ष मांडत आहे, असे त्याचे स्वरूप आहे. मी असल्याशिवाय लग्ने व मुले होऊ शकली नसती, असा युक्तिवाद मूर्खपणा करतो आहे. तो पुढे म्हणतो, मी तुम्हाला वृद्धपणापासून लांब ठेवतो, असे वय जे दुसऱ्याला शहाणे करण्याच्या खटपटीत स्वत:ला जास्त हास्यास्पद बनवते. डेसिडेरिअसचे हे वचन प्रमाण मानत जातिवंत वाचक दुसऱ्याला शहाणे करण्याच्या खटपटीत न पडता स्वत:चा मूर्खपणा चालू ठेवतो ज्यातल्या शहाणपणाची गुपिते केवळ त्याला ठाऊक असतात, जी त्याला तरुण ठेवत असतात.
.............................................................................................................................................
लेखक रवींद्र कुलकर्णी युद्धविषयक पुस्तकांचे संग्राहक आणि अभ्यासक आहेत.
kravindrar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment