...ते इतरांना काय शिकवणार?
पडघम - साहित्यिक
सुशील धसकटे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 22 October 2016
  • पडघम साहित्यिक सुशील धसकटे Susheel Dhaskate शिक्षक प्राध्यापक

एकंदर ढासळत चाललेलं वाङ्मयीन पर्यावरण आणि मराठीच्या शिक्षक-प्राध्यापकांत वाचन-लेखन-संशोधन याविषयीची वाढत चाललेली अनास्था, हा सध्याच्या काळातला मोठा कळीचा मुद्दा आहे. महाविद्यालयातील स्थिती तर आणखीनच बिकट आहे. सहाव्या वेतन आयोगामुळे शिक्षक-प्राध्यापकांच्या पगारांचे आकडेही भरसमसाठ वाढले आहेत. ते वाढले आहेत म्हणून कोणाच्या पोटात दुखायचं काही कारण नाही. पण आपण शासनाकडे कर भरतो व या करातूनच जर हे पगार अदा होणार असतील तर त्याचा विनियोग योग्यपणे होतो आहे की नाही, हे पाहण्याचा या देशातील प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. स्वाभाविकच पगार वाढले म्हणजे त्यांच्याकडून अधिक दर्जात्मक कामाची अपेक्षाही वाढते. असं असताना त्यांनी उत्तम अध्यापन व उत्तम संशोधन करून आपला ज्ञानाचा दर्जा उंचावणं अपेक्षित असतं. आपला अधिकाधिका वेळ वाचन-मनन-संशोधन व विद्यार्थ्यांना सकस ज्ञान देणं, यासाठी खर्च करणं अपेक्षित असतं. तसं झालं तरच विद्यार्थ्यांची ज्ञानाची व पर्यायानं समाजातील शैक्षणिक पातळीही उंचावेल. समाजात काहीएक चांगली भर पडेल. परंतु याप्रमाणे घडतंय असं दुर्दैवानं सद्य:स्थिती पाहता म्हणता येत नाही. हेच कटुवास्तव येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य अधोरेखित करत आहे, याची आपण सर्वांनी गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. कारण या येणाऱ्या पिढ्यांमध्ये आपल्याही मुलांची-नातवांची पिढी शिकणार आहे, याचं भान प्रत्येकानं ठेवलंच पाहिजे. आजचा काळ ‘आऊटपुट’वर अधिक भर देणारा असल्यामुळं नाईलाजानं हा लेखणीप्रपंच चालवावा लागत आहे.

खरंतर ‘पुस्तकं विकत घ्यायला पैसे नाहीत’ किंवा ‘वेळच मिळत नाही’ या लंगड्या सबबीही आता सांगून चालणार नाहीत. ज्या काळी प्राध्यापकांचे पगार जेमतेम होते, मोबाइल-झेरॉक्स-इंटरनेट आदी सुविधा उपलब्ध नव्हत्या, अशा स्थितीतही त्याकाळच्या पिढीतील बहुतांश लोकांना आपली लेखन-वाचनाची आवड कसोशीनं जपली होती. आपला स्वत:चा एक ग्रंथसंग्रह नेटानं उभा केला. एकेक पुस्तक मिळवण्यासाठी अनेक अडचणी सहन केल्या. उत्तमोत्तम ग्रंथलेखन केलं. याचं खणखणीत उदाहरण द्यायचं झालं तर श्री. व्यं. केतकरांचं देता येईल. त्यांनी प्रचंड आर्थिक विवंचनेत हालअपेष्टा सोसून ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोशा’ची निर्मिती केली. आजच्या तंत्रज्ञानानं पुढे असलेल्या काळातही अशा प्रकारचं काम कोणीही करू शकलेलं नाही, याची एक मराठी भाषक-मराठी शिक्षक म्हणून आम्हास लाज वाटावी का भूषण? दुसरं एक उदाहरण म्हणजे डॉ. रा. चिं. ढेरे यांचं. ढेरेअण्णांनी वेळप्रसंगी घरातली भांडीकुंडी विकून पुस्तकं घेतली, स्वत:चं सबंध आयुष्य संशोधनाला समर्पित केलं. केतकर व डॉ. ढेरे यांच्या लेखनाबद्दल कुणाचे मतभेद असू शकतील; पण त्यांचा हा ज्ञानपिपासू व ग्रंथवेडा गुण स्वीकारायला कशाची अडचण नसावी! चांगलं ते स्वीकारायला जातपात आडवी येऊ नये. यापुढे जाऊन म्हणायचं झालं तर चांगल्याला जातच नसते. चांगलं असणं हीच त्याची जात!

अजूनही जुन्या पिढीतील अनेक लोक आपापल्या व्याधी-आजार सांभाळत नवीन आलेली पुस्तकं स्वत: विकत घेऊन वाचतात. प्रत्यक्ष भेटीत पुस्तकांवर चर्चा करतात. आपापल्या विषयाशी संबंधित नवं काही लिहून पाहतात. प्राध्यापक म्हणून निवृत्त झाली असली तरी एक व्यावसायिक बांधीलकी व लेखक-वाचक म्हणून असलेल्या निष्ठेपोटी ही जुनी सेवानिवृत्त मंडळी अजूनही वाचन-लेखनव्यवहाराशी जोडलेली आहेत. साहजिकच जुन्या पिढीतील बहुतेक लेखक-प्राध्यापकांविषयी आदर वाटू लागतो. नव्या पिढीतील लोकांबद्दल (अगदी एखाद-दुसरा अपवाद वगळता) तर तो वाटत नाही, शिवाय एकेकाळी शिक्षकाला समाजामध्ये जे आदराचं स्थान होतं तेही आज उरलेलं नाही. याचा सद्सद्विचार व आत्मपरीक्षण करणं जरुरीचं आहे. विद्यार्थ्याला शिक्षकाबद्दल आदरयुक्त दरारा वाटत नसेल तर त्याला इतर कारणांबरोबरच एक शिक्षक म्हणून आपण स्वत:ही तितकेच जबाबदार असतो.

एक संपादक-प्रकाशक म्हणून शिक्षक-प्राध्यापकांशी माझा दैनंदिन संबंध येतो. चार वाक्यं मराठीमध्ये बिनचूक लिहिता न येणाऱ्या मराठीच्या शिक्षक-प्राध्यापकांची संख्या तर आज खूप मोठी आहे. काही सन्माननीय अपवाद आहेत, पण ते अगदी तुरळक. ‘पहिली वेलांटी-दुसरी वेलांटी, पहिला उकार-दुसरा उकार’ असं म्हणणारे तर मराठी विषयाचे असंख्य शिक्षक आहेत. व्याकरणाच्या परिभाषेत त्याला ‘ऱ्हस्व-दीर्घ’ म्हणतात इतकी साधी गोष्टही बहुतेकांच्या गावी नसते. असलीच तर ‘कोण बघतं एवढं?’ किंवा ‘पहिली म्हणलं काय नि दुसरी म्हणलं काय, काय फरक पडतो?’ किंवा ‘काय बुवा हे तुमचं लचांड, घ्या की राव तुम्हीच काय ते बघून. आपल्याला ते काही जमत नाही. आपला तुमच्यावर विश्वास आहे’ अशी निर्ढावलेल्या भाषेतील त्यांची उत्तरं तयार असतात. शुद्धलेखन म्हणजे बहुतेकांना उगाच कटकट वाटते. ‘आम्हाला कॉलेजची खूप कामं असतात’ किंवा ‘कौटुंबिक जबाबदारीतून वेळच मिळत नाही’ अशी कारणंही नित्याची झाली आहेत. ज्याला खरंच गंभीरपणे काही करायचं असतं तो अशी कारणं कधी पुढं करत नाही. ‘ओले मूळ भेदी खडकाचे अंग | अभ्यासासी सांग कार्यसिद्धी’ या तुकोबांच्या ओळी काय मथितार्थ सांगतात? ज्ञानलालसेनं व ज्ञानजिज्ञासेनं झपाटून जाणंच होत नसेल तर खडक काय भेदणार? आपल्याच मातृभाषेची इतकी अक्षम्य हेळसांड क्वचित कुठल्याही भाषिक समूहांकडून होत नसेल. याउलट रूढार्थानं मराठी विषयाचे विद्यार्थी-शिक्षक नसलेल्या व इतर विषयांचे विद्यार्थी असलेल्या (विज्ञान, वाणिज्य इ.) लेखकांचं लेखन मराठीच्या लोकांपेक्षा अधिक बिनचूक असतं, याचा अनुभव मी गेली दहा-बारा वर्षं रोज घेत आहे.

नवीन कोणता लेखक काय लिहितोय, त्याची पुस्तकं कोणती, याची तर बहुतेक शिक्षकांना काडीचीही मालुमात नसते. आता ‘आमच्या गावात पुस्तकंच मिळत नाहीत’ असं कोणी म्हणेल; तर छोट्या मोठ्या कामांसाठी पुण्यात येणारे बहुतेक शिक्षक झटपट कामं आवरून तुळशीबागेत वा लक्ष्मी रस्त्यावर वा बिगबझारसारख्या मॉलमध्ये वेळ काढून बायका-मुलांसाठी कपडे वा इतर खरेदीसाठी आवर्जून जातात. कपडे घ्यावेत कारण तीपण एक महत्त्वाची गरज आहे. पण कपड्यांची दुकानं गावोगाव असतात, ते तिथंही घेता येऊ शकतात. पुण्यात आलोच आहोत तर चार चांगली पुस्तकं घेऊन जाऊ, असं न वाटणं म्हणजे आमची ज्ञानलालसा किती ‘क्षीण’ (यापेक्षा खालचा शब्द मला सुचत नाही.) आहे, हेच त्यातून प्रतित होतं. बालाजी घारुळे व संजय इंगवले हे माझे दोन प्राध्यापक मित्र पुण्यात आल्यावर प्रत्येक फेरीत चांगली चार-पाच हजारांची पुस्तकं खरेदी करतात. मला त्यांचं कौतुक व आदर वाटतो. पण असे आशा टिकवून ठेवणारे अपवाद कमी आहेत, ते बहुसंख्येनं वाढले पाहिजेत. दारूची बाटली घेण्यासाठी सहजपणे खिशात जाणारा हात पुस्तकाचं दुकान समोर असूनही खिशात जाऊ नये, यापेक्षा भिकार अवस्था ती कोणती? ज्या देशात ज्ञानेश्वर-चोखामेळा-एकनाथ-तुकाराम-शिवाजी-फुले-आगरकर-लोकहितवादी-शाहू-आंबेडकर-अण्णाभाऊ साठे जन्मले, त्या देशाचे नागरिक म्हणून येणाऱ्या भविष्याला आपण काय वारसा सांगणार? तो वारसा सांगण्यासाठी निदान पुस्तकं तरी वाचली पाहिजेत ना? एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यानं तर गमतीदार, पण वास्तवावर प्रकाश टाकणारा किस्सा सांगितला. ‘नवीन आलेल्या व चर्चेत असलेल्या पुस्तकांपैकी धडपड करून मी मिळतील ती पुस्तकं घेऊन वाचतो, पण आमच्या सरांना त्यांची नावंही माहीत नसतात. मी सांगितल्यावरच त्यांना माहीत होतं व एवढंच नव्हे तर माझ्याकडूनच ते पुस्तकं घेऊन वाचतात.’ जर शिक्षकांनाच काही माहीत नसेल वा येत नसेल तर विद्यार्थ्यांना ते काय शिकवणार वा संचित म्हणून काय देणार आणि पुढची पिढी कशी घडणार? आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार? मराठीच्या विद्यार्थ्यांना पु.ल.देशपांडे, वि.स.खांडेकर, शिवाजी सावंत, रणजित देसाई, व.पु.काळे हीच लेखक मंडळी माहीत असणं आणि बाबूराव बागूल, दया पवार, श्री.बा.जोशी, राजन गवस, मिलिंद बोकील (‘शाळा’चित्रपटामुळे थोडे तरी माहीत झाले!), बाबु बिरादार, राजन खान, आसाराम लोमटे, विजय जावळे, कृष्णात खोत, अशोक कौतिक कोळी, कल्पना दुधाळ, बालाजी इंगळे, अशोक पवार (अशी आणखीही नावं सांगता येतील.) ही नावंही माहीत नसणं, हा दोष कुणाचा? कारण शिक्षकांशिवाय विद्यार्थ्यांना लेखकांचा परिचय करून देणार तरी कोण?

एम.फिल., पीएच.डी.चं संशोधन तर आणखीनच भयंकर प्रकरण. ‘मला अमुक विषयावर संशोधन करायचं आहे, ही माझी खूप तळमळीची इच्छा आहे’ अशा तीव्र आकांक्षेतून संशोधनाकडे वळलेले अपवादात्मक एक-दोन जण असतात. बाकी बहुतेक जण आपल्या नावापुढे ‘डॉ.’ लागेल या बडेजावापोटी पदवी मिळवायची म्हणून व पुढे प्राध्यापक झाल्यावर इन्क्रीमेंट व प्रमोशनची गणितं डोक्यात ठेवूनच संशोधनाच्या भानगडीत पडतात आणि झटपट उरकूनही मोकळे होतात. इतर अभ्यासकांच्या पुस्तकातील उतारेच्या उतारे उतरवून जाडजूड प्रबंध तयार केले जातात. त्या संशोधकांच्या स्वत:च्या डोक्याचं विश्लेषण त्यात अभावानंच आढळतं. ज्या विषयात संशोधन करायचंय त्या विषयाचं बहुतेकांचं आकलनही अतिशय किरकोळ असतं. संबंधित विषयाचं वाचन तर जवळपास नसतंच. पुष्कळदा फार तोशीस पडणार नाही असेच सोपे विषय निवडले जातात. एका संशोधन करणाऱ्या मित्रानं सांगितलं ‘माझे गाइड तर दिलेलं प्रकरणही वाचत नाहीत. केवळ वरवर चाळून देतात. कारण त्यांनाच त्या विषयाबद्दल फार काही माहिती नाही.’ असे फुटकळ लोक डॉक्टरसारख्या शिक्षणातील उच्च पदव्या मिळवून प्राध्यापक, विभागप्रमुख, डीन होतायत. एवढंच नव्हेतर अभ्यासमंडळं वा विविध समित्यांवरही असे लोक हितसंबंध सांभाळून व राजकारण करून विनासायास जाऊन बसतात. ‘शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे’ ही प्रामाणिक व तळमळीची भावना म.फुले यांनी एकोणिसाव्या शतकात मांडली होती, आता एकविसाव्या शतकात आम्ही शिक्षण ‘गाळात’ घालतोय. विकास की अधोगती? कसं समर्थन करणार?

सहाव्या वेतन आयोगामुळे आता प्राध्यापक होण्यासाठी १५-२० लाखांचा ‘रेट’ चालू आहे. त्यासाठी धडपडणारे वेगवेगळ्या भागातले दोन तरुण भेटले की, ते एकमेकांना हमखास एक प्रश्न विचारतात. पहिला विचारतो, ‘तुमच्याकडे किती रेट चालूय?’ दुसरा म्हणतो, ‘तुमच्याकडं आमच्यापेक्षा कमीचंय, आमच्याकडं-मराठवाड्यात तर वीसपासूनच सुरुवातंय.’ इतके लाख लाख रुपये भरून शिक्षक झालेल्या उमेदवारात शिक्षण-अध्यापन-वाचन-संशोधन यांबद्दल काय आस्था असणार? त्यातही ज्या मराठवाड्यात प्यायला पाणी मिळत नाही, तिथल्या गरीब, कष्टकरी व आधीच मरू घातलेल्या शेतकरी घरातील विद्यार्थ्यांकडे १५-२० लाख रुपये येणार तरी कुठून? ज्याच्याकडे इतके पैसे देण्याची ऐपत आहे तोच प्राध्यापक होतो आणि ज्याच्याकडे टॅलन्ट आहे, पण पैसे नाहीत त्याला या घोडेबाजारात किंमत नाही.

आता तर यूजीसीच्या नियमावलीमुळे प्रबंधांची स्वत:च पैसे देऊन पुस्तकं छापण्याची लाटच आली आहे. आणि एकाएकी स्वत:च काही प्राध्यापक सुप्तावस्थेत ‘प्रकाशक’ तर काही ‘संपादक’ झाले आहेत. ज्ञानदानाच्या पवित्र कायार्कडे कानाडोळा करून ही मंडळी पुस्तकं-मासिकं छापण्यात दंग आहेत. अभ्यासाला पूरक म्हणून ही पुस्तकं व मासिकं शाळा-महाविद्यालयं, ग्रंथालयांना बिनबोभाट खपवली जातात. प्रसंगी अभ्सासक्रमातही नेमली जातात. संपादकीय संस्कारांच्या अभावामुळे लेखनाच्या ढिगांनी चुका त्यात असतात. त्यात पुरेशा गांभीर्याचा अभाव असतो. मराठी ग्रंथप्रकाशनाच्या इतिहासात कधी झाली नसतील इतकी संपादित पुस्तकं आता गावोगावी धपाधपा छापली जातायत. स्वत: एखाद्या विषयावर पुस्तक लिहिण्याइतकी कुवत नसल्यानं व संपादित पुस्तकं करणं जणू खूप सोप्पं असतं, या समजापोटी बहुतेक मंडळी साक्षात्कार व्हावा तशी ‘संपादक’ व ‘प्रकाशक’ झाली आहेत. पगार वेगळा टाकून पुस्तकातूनही भरपूर माया जमवत आहेत. अशाच प्राध्यापकांना आपला समाजही मानसन्मान देऊन व विचारवंत-अभ्यासक म्हणून प्रतिष्ठित करत आहे! त्यामुळे इथून पुढे एखाद्या प्राध्यापक मित्राचा परिचय करून द्यायचा असेल तर ‘हे केवळ प्राध्यापकच नव्हे तर प्रकाशकही आहेत’ असाच करून द्यावा लागेल. या सगळ्यात ग्रंथप्रकाशनाची चांगली मूल्येही धाब्यावर बसवली जात आहेत. 

‘तुमच्या पुस्तकांना आयएसबीएन नंबर असतो का?’,  ‘मला माझ्या पीएच.डी.च्या\एम.फील.च्या प्रबंधाचं पुस्तक करायचंय, किती पैसे घेता?’, ‘मी अमुक या विषयावर १० लेख गोळा केलेत. पाठवून देतो. पुस्तक करा. डी.डी. कितीचा पाठवू?’, ‘स्क्रिप्ट पाठवून दिलंय, त्यात काय हवं नको ते तुम्हीच बघा न छापून टाका’ इत्यादी गोष्टींची कसलीही लाज न बाळगता विचारणा करणारे महिन्यातून एक-दोन तरी फोन मला येतात किंवा असल्याच गोष्टी भेटीतही विचारतात. अशा वेळी प्रचंड अस्वस्थ तर होतंच, पण त्याहीपेक्षा मस्तक भयंकर खवळतं. किती हा आटापिटा? आपलं पुस्तक नाही आलं तर मराठी भाषा व वाङ्मय काही अगदी रसातळाला जाणार आहे का? किंवा ते आलं म्हणून तरी मराठीचा असा कोणता विकास होणारेय व होतोय? ‘आपल्या लेखनात दम असेल तर कुठलाही प्रकाशक झक मारून आपलं पुस्तक छापेल’ हा आत्मविश्वास का नसावा? या सगळ्या गोष्टी पाहता आपण कुठं चाललोय आणि काय साध्य करणार आहोत? ‘प्राध्यापक निदानपक्षी काहीतरी वाचतील व लिहितील’ म्हणून यूजीसीनं नवीन नियम तयार केले, परंतु कुठलाही नियम कसा नि कुठं मोडायचा व वाकवायचा आणि सोयीचा करून घ्यायचा. यात आपण लोक किती वाकबगार आहोत, हेच या सर्व प्रकारातून सिद्ध होतं. उद्या कदाचित यूजीसीनं हे नियम रद्दबादल केले तर आज जे अभ्यासकांचं-लेखकांचं लेंढार माजलंय, त्यातला एक तरी शिल्लक उरला म्हणजे पुरे. गुळाची ढेप असते तोवरच माशा घोंगावणार…

ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांच्या ‘बिढार’, ‘हूल’, ‘जरिला’, ‘झूल’ या चार कादंबऱ्या प्राध्यापकीय व महाविद्यालयीन विश्व रेखाटणाऱ्या आहेत. त्यातून अनेक वृत्ती-प्रवृत्तीचं दर्शन घडतं. त्यांच्या कादंबऱ्यांत जी चित्रणं येतात, जे वास्तव येतं ते पाहिल्यास आज इतक्या वर्षांनंतरही त्यात सकारात्मकदृष्ट्या काही बदल झाले आहेत, असं ठामपणे म्हणता येत नाही. उलट स्थिती आणखीनच ढासळत चालली आहे. परिणामी अलीकडे प्रकाश देशपांडे केजकर यांनाही प्राध्यापकी विश्वावर ‘पैलतीर’ सारखी कादंबरी लिहावी लागली. गतकाळापासून आपणाला काही शिकायचंच नाही काय?

एखाद्या विशिष्ट विषयावर काही लिहून घ्यायचं झालं तर संबंधित विषयाचा जाणता म्हणून नव्या पिढीला तरुणदमाचा व त्या विषयाला न्याय देणारा चांगला माणूस उपलब्ध होत नाही. झाला तरी मग जातपात-गटतट-लांबचाजवळचा, ‘आपल्या’ विचाराचा आहे की, ‘त्यांच्या’ विचाराचा आहे इत्यादी पदर आडवे येतात. ही महाराष्ट्रातल्या तमाम संपादक-प्रकाशकांसमोरील मोठी अडचण आहे. मग साहजिकच जुन्या पिढीतल्या लोकांना विचारावं लागतं. परंतु वयोमर्यादा, आजारपण यामुळे त्यांना पुष्कळ मर्यादा येतात. ‘आता या वयात आम्हाला किती त्रास देणार?’ असं काही ज्येष्ठ म्हणतात तेव्हा त्यांच्या या प्रश्नाला माझ्या सारख्याकडे काही उत्तर नसतं. लेखनविषयक वा भाषाविषयक एखाद्या शंकेचं निरसन करायचं झालं किंवा त्यासंबंधित विषयावर मत विचारायचं झालं तर पटकन डोळ्यांपुढे तज्ज्ञ म्हणून नावं येतात, ती डॉ. भालचंद्र नेमाडे,, डॉ. द. दि. पुंडे, प्रा. यास्मिन शेख, डॉ. यू.म.पठाण, डॉ. कल्याण काळे यांची. ही सर्व ज्येष्ठ मंडळी आता साठी-सत्तरीच्या पुढे आहेत. तेव्हा त्यांना त्रास देणं उचित वाटत नाही. पण विचारल्यास वरीलपैकी कुणी नाही म्हणत नाही. उलट विचारल्याचा त्यांना आनंदच होतो. मात्र यांचे उत्तराधिकारी म्हणावेत असे आणि ज्यांना निर्धास्तपणे विचारावं किंवा ज्यांच्या ज्ञानाबद्दल तिळमात्र शंका घेता येणार नाही, अशी अलीकडच्या पिढीत नाव घ्यावं अशी निदान तीन माणसंही सांगता येत नाहीत, हे आजचं वास्तवचित्र आहे. आर्थिकसुबत्ता येऊनही शिक्षकांचा दर्जा इतका सुमार का व्हावा? आमच्यातील ज्ञानपिपासूवृत्ती लोप का पावत आहे? आर्थिक स्थैर्य मिळालं की माणूस हात-पाय हालवायचं कमी का करतो आहे? स्वत:भोवती एक कोष विणून त्यातच रममाण होणं, ही मनुष्यवृत्ती नवी नसली तरी या वृत्तीला अपवाद ठरावेत अशी आश्वासक स्थितीही नाही. ती निर्माण व्हावी ही एक इच्छा.

वाचनसाखळीतील शिक्षक हा एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे समाजामध्ये वाचनसंस्कृती रुजवण्यात खऱ्या अर्थानं शिक्षक खूप महत्त्वाची भूमिका अदा करू शकतो, नव्हे करतोही. आई-वडलांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचा शिक्षकांशीच जास्त संबंध येतो. एका अर्थानं शिक्षक-प्राध्यापकांचा एक प्रभावही विद्यार्थ्यांवर पडतो. तेव्हा विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये वाचन-लेखनविषयक गोडी उत्पन्न करणं सहज साधू शकतं. त्यासाठी विद्यार्थ्यांचा कल जाणून त्यांच्या मनात सहजगत्या शिरून त्यांना फुलवणाऱ्या शिक्षकाचीच काय ती गरज असते. हे सर्व नि:स्पृह मनाने व झोकून देऊन करणारा शिक्षक लाभला की, विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं सोनं व्हायला वेळ लागत नाही. व्यापक अर्थानं पाहिलं तर पिढ्या घडवणारा महत्त्वाचा घटक म्हणून शिक्षकाचं समाजातील स्थान खूप मोलाचं आहे व ते तसंच अबाधित राहावं असं वाटत असेल तर आपली शिक्षकी व्यवसायावरील निष्ठा व बांधीलकी कुठेही लोप पावणार नाही, याची नैतिक काळजी शिक्षकांनीच घ्यायची असते व ती घ्यावी एवढीच माफक अपेक्षा!

 

लेखक कादंबरीकार व प्रकाशक आहेत.

hermesprakashan@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......