सामान्यतः कुठल्याही सृजनशील लेखकाची सुरुवात ही कविता, कथा व कादंबरी अशी टप्प्याटप्प्यानं होत असते. प्रदीप धोंडीबा पाटील यांचीही तशीच झालेली आहे. त्यांचा ‘संदर्भ शोधताना’ हा कवितासंग्रह आणि ‘होरपळ’ या कथासंग्रहानंतर ‘गावकळा’ ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. साहित्यातून सामाजिक, आर्थिक व राजकीय अवस्थांतरांचं, सामाजिक स्थित्यंतराचं दर्शन घडायला हवं. ‘साहित्य’ हा समाजाचा आरसा असतो. त्यात संपूर्ण समाजाचं सुरूप व कुरूप प्रतिबिंब उमटायला हवं, नव्हे ते उमटतच असतं. तरीही ते सशक्तपणे उमटवण्याची जबाबदारी लेखकांवरही असते. त्यात प्रदीप धोंडीबा पाटील हे यशस्वी झालं आहेत, असं ‘गावकळा’ वाचल्यानंतर लक्षात येतं.
‘गावकळा’ या कादंबरीचं ‘ग्रामस्वच्छता’ हे मुख्य कथानक आहे. आणि हेच तिचं वेगळेपण आहे. स्वच्छता ही नितांत आवश्यक असणारी बाब आहे, मात्र तिच्यासाठी आपलं समाजमन आजही तयार झालेलं नाही. गावच्या गावं आजही अगदी अस्वच्छ, रोगराईनी युक्त अशी पाहायला मिळतात. खरं तर ग्रामस्वच्छतेसाठी संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांनी जीवनभर खूप जनजागृती केली. संत गाडगेबाबा यांनी हातात झाडू घेऊन गावेच्या-गावं स्वच्छ केली, तसंच अज्ञान-अंधश्रद्धांचं समाजातलं स्तोम पाहून आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून अज्ञानी-अंधश्रद्ध मनंही स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ‘ग्रामगीता’ लिहून खेड्यांचा विकास हाच राष्ट्राचा विकास आहे आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील व्हायला हवं, ही शिकवण दिली. महात्मा गांधींनी 'खेड्याकडे चला' हा नारा दिला. देशातली जवळपास सत्तर टक्के जनता खेड्यात राहते. तिचा विकास झाला तरच राष्ट्राचा विकास झाला म्हणता येईल, अन्यथा सर्व व्यर्थ आहे, हे त्यांनी जाणलं होतं.
स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षानंतरही खऱ्या अर्थानं खेडी बदलली का? त्यांचा विकास म्हणावा तसा अपेक्षेप्रमाणे झाला का? असे प्रश्न मनात निर्माण होतात. त्यांचं उत्तर ‘नाही’ असंच येतं. वाटतं, सरकारी यंत्रणा कमी पडली की काय? तर त्याचं उत्तरही ‘नाही’ असंच येतं. मग हा विकास का असा रडत-पडत घडतो आहे? तर याचं उत्तर समाजमनात दडलेलं आहे. गावपातळीवर केल्या जाणाऱ्या अत्यंत द्वेषपूर्ण, हिणकस व एकमेकांवर कायम कुरघोडी करण्याच्या राजकारणाचा फटका गावाच्या विकासाला बसतो, हे प्रदीप धोंडीबा पाटील यांनी त्यांच्या या कादंबरीच्या माध्यमातून आविष्कृत केलं आहे.
ही कादंबरी ग्रामीण वास्तवाचा वेध घेणारी आहे. सरकारी योजना राबवण्यासाठी किती पराकोटीचा संघर्ष करावा लागतो, याची कल्पना ‘गावकळा’ वाचल्यानंतर येते. गावातील लोकांच्या सुष्ट व दुष्ट वृत्ती-प्रवृत्तींचं दर्शन या कादंबरीतून घडतं. ‘गजापूर’ या गावचे नवनिर्वाचित सरपंच सखाबापू हे या कादंबरीचे नायक आहेत, तर राघोबा मास्तर हे खलनायक. सखाबापू निवडणुकीत प्रतिस्पर्धी असणाऱ्या दाजीबा पाटील यांना जाऊन भेटतात. त्यांना निर्मल ग्राम योजना राबवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन करतात. गावाच्या विकासासाठी दिलदारपणे दाजीबा पाटीलही आपले सारे मतभेद, अभिनिवेश बाजूला सारून संपूर्ण सहकार्य करण्याचं कबूल करतात. ‘इथली लोकं गहन हायती परंतु वाईट न्हायती’ अशा आपल्या गावकऱ्यांप्रती असणाऱ्या अनुभवाच्या गोष्टी दाजीबा पाटील सखाबापूला सांगतात. सखाबापू याच बळावर ग्रामसभा घेऊन सर्वानुमते निर्मल ग्राम योजना राबवण्याचं ठरवतात. घरोघर फिरून स्वच्छतेविषयी जनजागृती करतात. लोक तोंडासमोर ‘होय’ म्हणतात, पण प्रत्यक्ष कामं करत नाहीत. केवळ बोलण्यानं लोक ऐकत नाहीत. गावचे लोक खरंच खूप गहन आहेत, हे सखाबापूंच्या लक्षात येताच ते स्वतः स्वच्छता करायला लागतात. गावातील प्रत्येक गल्ली झाडू लागतात, तेव्हा लोक त्यांची चेष्टा करतात. तंबाखू, गुटख्याची पुडी रस्त्यात टाकून ‘इथं राहिलं बघा सखाबापू’ म्हणून डिवचतात. तो सारा अपमान, अवहेलना स्वीकारून सखाबापू काम करतच राहतात. परिणामी हळूहळू गावकऱ्यांच्या मनात सखाबापूविषयी आदर निर्माण होतो. लोक त्यांना सहकार्य करू लागतात.
कादंबरीतील खलपात्र राघोबा मास्तर हा अत्यंत विघ्नसंतोषी व नीच प्रवृत्ती असणारा माणूस असतो. तो पेशानं निवृत्त शिक्षक असतो, मात्र तो त्याच्याजवळ असणाऱ्या तुटपुंज्या ज्ञानाचा उपयोगही केवळ द्वेषनिर्माण करणं, भांडणं लावणं यासाठीच करतो. लोक त्याला निवृत्त गुरुजी असल्यामुळे मान देतात, पण त्या मानाचा तो गैरफायदा घेतो. गावोगावी अशा प्रवृत्तीची माणसं आजही पाहायला मिळतात, म्हणूनच तर कुठल्याही लोक कल्याणकारी योजना राबवायला त्रास होतो.
सखाबापू नालासफाई करायला लागतात. त्यांना गावातील चांगले लोक मदत करू लागतात, हे पाहून राघोबा मास्तरकडून अशी वावडी उठवली जाते की, गावाला नाला साफ करायला लावून हा सखाबापू नालासफाईसाठी आलेला सरकारी निधी स्वतः खाऊन टाकतो आहे. गावात ही वावडी वाऱ्यासारखी पसरते. लोकांना ती खरीही वाटते. मग त्यांच्या मनात सखाबापूंविषयी गैरसमज निर्माण होतो. ग्रामसभा घेऊन सारा हिशोब दिल्यानंतरही या पावत्या खऱ्या की खोट्या असा प्रश्न राघोबा मास्तर विचारतो. यातून सखाबापूंविषयी गावात व गावकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच ग्रामसभेत सखाबापू एक भीष्मप्रतिज्ञा करतात की, “कोणी माझ्या कामाची कितीही टिंगलटवाळी केली, कितीही अडचणी आणल्या तरी, आजपासून जोपर्यंत आपलं गाव निर्मल ग्राम म्हणून घोषित होऊन गावचा सन्मान दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते होणार नाही, तोपर्यंत मी अंगात सदरा घालणार न्हाई. पायात वहाणा घालणार नाही!”
‘लोकशाहीचे संवर्धन व जतन करायचं असेल तर युवकांनी पुढं आलं पाहिजे’ असं म्हणत राघोबा मास्तर तरुणांची डोकी भडकवायला सुरुवात करतो. त्यांच्या मनात नाना प्रकारचे गैरसमज निर्माण करतो. याचं पर्यवसन सखाबापूच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यापर्यंत होतं. नित्यनियमाप्रमाणे सखाबापू हातात झाडू घेऊन गल्ली स्वच्छ करत असतात, तेव्हा इंदर बनसोडे त्यांच्यावर ‘तुम्ही आमच्या गल्लीची स्वच्छता करण्याचं निमित्त करून आमच्या बायका आंघोळ करताना बघता’ असा आरोप करतो. त्या आरोपाचं खंडन इंदरचीच आई इठाबाई व गल्लीतील बाया करतात, पण त्या आरोपानं सखाबापू खूप व्यथित होतात. चांगल्या कामाला, चांगल्या माणसांना कसा व किती हीन प्रकारचा विरोध होतो, हे लक्षात येतं. पुढेही गावात अनेक पेचप्रसंग निर्माण होतात. त्या सर्वांना लोकशाही मार्गानेच निपटताना सखाबापूंची खूप खालमेल होते, पण त्यांच्या मनात सदैव गावाचा विकास व कल्याण असल्याकारणानं त्यातूनही मार्ग निघत जातो. खरं तर सखाबापूंचे भाऊ, पुतणे बळाचा वापर करून विरोध मोडून काढण्यासाठी पावलं उचलू आणि योजना यशस्वी करू असं कायम म्हणत असतात, पण सखाबापू त्या सर्वांना थोपवतात. निर्मल ग्राम योजना लोकांच्या आनंदी सहभागातून पार पडायची आहे आणि ती केवळ पुरस्कार मिळवण्यापुरती राबवायची नाही, तर ती पुढेही चिरंतन राहावी यासाठी राबवायची आहे. लोकांचे मनपरिवर्तन करायचं आहे. त्यासाठी बळाचा वापर अयोग्य आहे, असं सखाबापू सर्वांना समजावत असतात.
गाव आता स्वच्छ होऊ लागतं, पण कुणीतरी स्वच्छ झालेल्या जागेवर शौचास बसू लागतं. मग ती घाणही सखाबापू स्वच्छ करू लागतात. पुढे घरापुढील उकंडे गावाच्या बाहेर टाकण्यासाठी पाऊलं उचलली जातात, तेव्हा सारा गाव राघोबा मास्तर पेटवून देतो. तुमचे उकंडे काढायला लावून ती जागा सखाबापू स्वतःच्या नावावर करून घेणार आहे असा अपप्रचार करतो. गरिबांचे उकंडे उपसायला लावण्याआधी श्रीमंतांचे उकंडे उचलायला लावा अशी टूम काढली जाते. गावात एक प्रकारची अघोषित यादवी माजू पाहते. पण त्यावरही सखाबापू पर्याय शोधतात आणि सगळ्यात आधी रानबा पाटील व दाजीबा पाटील यांना त्यांचे उकंडे बाजूला स्थलांतरित करायला लावतात, तेव्हा राघोबा मास्तरांची चांडाळ चौकडी रानबा पाटलांचा गैरसमज करून देण्यासाठी त्यांच्या घरी जातात. मात्र तिथं गेलेल्या सगळ्यांनाच रानबा पाटील अपमानित करतात. राघोबा मास्तरला ‘मास्तरकी केली की ढोरं राखली?’ असं विचारतात. राष्ट्रीय कामात अडथळा निर्माण करू नका असा आदेशही देतात. ते रौद्ररूप पाहून सगळेच अचंबित होतात.
हा प्रयत्न फसल्यावर राघोबा मास्तर व त्यांचे सहकारी एक नवीनच वाद उपस्थित करतात. घरासमोरील उकंडे गायरान जमिनीवर स्थलांतरित करायला सखाबापूंनी गावकऱ्याला सांगितलं आणि लोकांनीही ते ऐकलं, मात्र ही जागा दलितांना आरक्षित होती. गावकऱ्यांनी त्यावर अतिक्रमण केलं आहे, अशी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात येते. सवर्ण व दलित यांच्यातील वादामुळे गावातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण आहे, अशा बातम्या जिल्हाभर होतात. मग एके दिवशी जिल्हाधिकारी व त्यांचा ताफा गावात येतो. संपूर्ण गावाला बैठकीला बोलावलं जातं. अतिक्रमणाचा तिढा का निर्माण झाला असा प्रश्न तहसीलदार विचारतात, तेव्हा सखाबापू सांगतात, “साहेब, आमचं गाव या वर्षी ‘निर्मल ग्राम’ योजनेसाठी घोषित झालंय. गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांना शौचालय बांधता यावीत म्हणून गावातील गल्लीगल्लीतील रस्त्याच्या आजूबाजूला असलेले, लोकांच्या घरासमोर असलेले उकंडे गावाबाहेर काढणं गरजेचं होतं. मात्र बऱ्याचशा लोकांना उकंडे टाकायला पर्यायी जागा नव्हत्या. तेव्हा शेवटी पर्याय म्हणून गावस्तरावर ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन संबंधित जागा ग्रामपंचायतीला लावून गरजू लोकांना भाडेतत्त्वावर जागा देण्याचं आम्ही ठरवलं हाय. या जागेच्या भाड्याच्या रूपातून आमच्या ग्रामपंचायतीला कररूपात चार पैसे जमा झाले, तर त्याच पैशातून नागरिकांना भौतिक सुविधा देण्याचा विचार हाय आमचा.”
ही योजना ऐकून जिल्हाधिकारी खुश होतात, या संकल्पनेला सहकार्य करण्याची सूचना देतात. गावकरीही जिल्हाधिकारी यांना ही सगळी अफवा होती, गावात कसलाच वाद नाही असं सांगतात. मग जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तेच दाजीबा पाटील यांच्या शौचालय बांधकामाचं भूमिपूजन केलं जातं. गावात शौचालय बांधण्यासाठी लोकांना आर्थिक अडचण येत आहे, हे लक्षात आल्यावर सखाबापू आपली जमीन गहाण ठेवून कर्ज काढतात व गरजू लोकांना शौचालय बांधकामाचं साहित्य पुरवतात. त्यात ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, तेही हे साहित्य घेऊन जातात. शौचालयांचं बांधकाम होऊनही लोक त्यात जात नाहीत, तेव्हा सखाबापू घरोघरी जाऊन हात जोडून शौचालयाचा वापर करा अशी विनंती करतात.
उघड्यावर शौच केल्यामुळे पावसाळ्यात गॅस्ट्रोची लागण होते. त्यात राघोबा मास्तरचा मुलगा रुपाजीचा मृत्यू होतो. रुपाजीला वाचवण्यासाठी सखाबापू प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, पण तरीही तो वाचत नाही. त्या धक्क्यानेही राघोबा मास्तर सुधारत नाही, उलट तो जबर त्वेषानं सखाबापूंचा द्वेष करायला लागतो. सून सुनंदला त्रास देतो. कारण सुनंदा भेटायला आलेल्या सर्वांना म्हणू लागते की, ‘माझं जे झालं ते तुमचं होऊ देऊ नका. घरी शौचालय बांधा. त्याचा वापर करा. म्हणजे रोगराईचे असे बळी जाणार नाहीत.’ सुनंदा आता सखाबापूंच्या कामाचा प्रचार व प्रसार करू करते. त्यामुळे राघोबा मास्तर अधिकच चेकाळल्यागत करू लागतो .
बायजामाय सुसंपन्न घरातली घरंदाज स्त्री, पण तिचे दिवस पालटतात. तिने तिच्या चालत्या काळात कुणाला उपाशी जाऊ दिलं नाही असा तिचा रुबाब असतो. त्या चालत्या घराला खीळ बसते. ती पहाटेच शौचास जाऊन यायची, पण आता म्हातारपण आलं तेव्हा तब्येत साथ देईना. मग पावसाळा आला की तिला तिची मुलगी स्वतःच्या घरी घेऊन जाऊ लागते. पण तिथं तिला राहायला संकोच वाटे. ती माघारी यते. अशातच स्वतःच्या घरी आल्यानंतर एके दिवशी बायजामायचा शौचास जाताना घसरून पडून पाय मोडतो. ती अंथरुणाला खिळते. त्यातच तिचा अंत होतो. घरात जर शौचालय असतं तर बायजामाय अशी अकाली मृत्यू पावली नसती, असं तिच्या मुलांना वाटू लागतं. खरं तर गावोगावी पावसाळ्यात असे एक-दोन वृद्ध शौचास जाता-येता मृत्यू पावत असतात हे ग्राम वास्तव आहे. आणि लेखकांनी ते अत्यंत गंभीरपणे लिहिलं आहे.
प्राध्यापक असणाऱ्या तोलबा नानाच्या विक्रमचं लग्न झाल्यावर त्यांची सून म्हणजे विक्रमची शिक्षक असणारी पत्नी शौचालय नसल्यामुळे नांदायला येणार नाही असं सांगते. परिणामी त्यांच्यात घटस्फोट होतो. आणि सुशिक्षित लोकही आपल्या गावी घरात आरोग्यासाठी सवयीचे पालन करणार नसतील, तर त्यांचें शिक्षण व्यर्थ ठरते हे या उदाहरणावरून लक्षात येतं.
आता गावात स्वच्छता नांदू लागते. घरासमोरील मोकळ्या जागेत फुलांच्या झाडांनी शोभा वाढते. सगळं गाव मनमोहक दिसायला लागतं. पण काही विकृत व्यक्ती रात्रीचा फायदा घेत मुख्य ठिकाणी शौच करायला लागतात, तेव्हा सखाबापू रात्रीच्या वेळीही जागं राहून संपूर्ण गाव फिरत निगराणी करायला लागतात. त्यात एके दिवशी पहाटे पहाटे सखाबापूला झोप लागते, तेव्हा विरोधी लोक सखाबापूंचे चारित्र्यहनन करण्यासाठी ‘राणू’ या स्त्रीस त्यांच्या अंगावर अलगत हात टाकून झोपण्यास सांगतात व गावभर बोभाटा करतात. पण सखाबापूंवर विश्वास असणारी मंडळी त्यांचा हाही बेत उघडा पाडतात.
अशा अनेक घटना, त्यांचे कार्यकारणभाव कादंबरीभर वाचायला मिळतात. एवढ्या सगळ्या अग्निदिव्यातून जात शेवटी केंद्रीय पथक पाहणी करून ‘गजापूर निर्मल ग्राम’ म्हणून घोषित करतं. संपूर्ण देशभर, राज्यभर गावचा उल्लेख आदरानं होऊ लागतो. राष्ट्रपतींच्या हस्ते सखाबापूंचा सन्मान होणार असतो. सखाबापू दिल्लीला जातात. दुसऱ्या दिवशी पुरस्कार वितरित होणार असतात. त्याआधी सखाबापूंना एका रूममध्ये नेऊन तिथून सॅटेलाईटवरून गाव दाखवलं जातं, ते चित्र पाहून सखाबापू थक्कच होतात. कारण काही लोक पुन्हा शौचास बाहेर जात असलेलं दिसू लागतं. त्यामुळे गावाला मिळणारा पुरस्कार रद्द होतो. अत्यंत खिन्न मनानं सखाबापू दिल्लीहून परत येतात आणि स्वतःला कोंडून घेततात. ते कुणाशी बोलत नाहीत की काही करत नाहीत. सारखे शून्यात पाहत बसतात. त्यांची स्थिती वेड लागल्यासारखी होते.
त्या मनोवस्थेतून सखाबापूला बाहेर काढण्यासाठी रानबा पाटील, दाजीबा पाटील काही सहकाऱ्यांसह येतात. त्यांची समजूत घालतात. आम्ही दोघे भाऊ आज तुमच्यामुळे आमची भांडणं विसरून एक झालो, तुम्ही म्हटलेल्या कामाला सहकार्य केलं, आणखी करू, पण तुम्ही पुन्हा उत्साहानं बाहेर या अशी विनंती करतात. दाजीबा पाटील यांचा मुलगा रंगराव हा सखाबापूंचा निवडणुकीतील विरोधक. त्याला पराभूत करूनच सखाबापू विजयी झालेले असतात. त्यामुळे त्याच्या मनात एक अढी होती, मात्र आता तोही सखाबापूंचं महत्त्व ओळखून त्यांना राघोबा मास्तरानं केलेलं कट-कारस्थान सांगतो आणि या राष्ट्रीय कामात सहकार्य करण्याचं मान्य करून काम करू लागतो.
पुन्हा नव्यानं सारा गाव सखाबापूंच्या स्वप्नांसाठी झटू लागतो. राघोबा मास्तर तळमळू लागतो, मात्र आता गावाला सखाबापूंचं महत्त्व पटलेलं असतं. त्यामुळे त्याला गप्प राहण्यावाचून पर्याय उरत नाही. पुन्हा केंद्रीय पथक गावात येतं. स्वच्छ, सुंदर गाव पाहून अहवाल पाठवतं आणि गजापूर पुन्हा 'निर्मल ग्राम' म्हणून घोषित होतं. राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत सखाबापूंचा सत्कार करण्यात येतो. इथं कादंबरी संपते.
यावरून गावातील राजकारण किती बीभत्स स्वरूपाचं असतं याची प्रचिती येते. गावांमध्ये केवळ एकमेकांना पाण्यात पाहून अप्रत्यक्षरीत्या एकमेकांचे पाय ओढले जातात हे वास्तव वाचकांना वाचायला व अनुभवायला मिळतं. शासकीय योजना राबवण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात येतात. अनेक गावांमध्ये पिण्यासाठी पाणी नाही. ते आणण्यासाठी बायका-मुलांना कोसो दूर पायपीट करावी लागते. पेयजल योजना मुद्दाम राबवली जात नाही. कारण एकदा गाव स्वावलंबी झालं तर आपल्याला आपल्या नेतृत्वाला कोण विचारेल असे खुळचट विचार गावच्या नेता म्हणवणाऱ्याच्या डोक्यात असतात. गाव जेवढं त्रासात राहील तेवढं आपल्याला राजकारण करायला सोपं जातं, असंही त्याचं मत असतं. त्यामुळे ते सतत गावातील घराघरांत भांडणं लावणं, अराजकता पसरवणं, यात धन्यता मानतात. थोड्याफार फरकानं प्रत्येक गावात हीच परिस्थिती आहे.
लेखक ग्रामीण भागातील आणि त्यातही पत्रकार असल्यामुळे या वास्तवाची त्यांना जाणीव आहे आणि त्यांची तीच संवेदनशील जाणीव कादंबरीभर प्रत्ययकारीपणे जाणवते. कादंबरीची भाषा मराठवाडी तथा नांदेड-नायगाव या परिसरातील आहे. त्यामुळे भाषेचा एक लहेजा कादंबरीत वाचायला मिळतो. या कादंबरीत संबंधित परिसरातील सण-उत्सव, परंपरा यांचं दर्शनही घडवता आलं असतं, मात्र तसं झालेलं नाही. काही घटना जाहिरात केल्यासारख्या वाटतात. मात्र कादंबरीवरची पकड लेखकानं फारशी कुठे ढिली पडू दिलेली नाही. त्यामुळे कादंबरी वाचनीय झाली आहे. त्यामुळे तिचं स्वागत करायलाच हवं!
.............................................................................................................................................
गावकळा : प्रदीप धोंडीबा पाटील, राजहंस प्रकाशन, पुणे
पाने : २४८, मूल्य : २६० रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4049
.............................................................................................................................................
ऋषिकेश देशमुख
rushigdeshmukh@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment