ही जी काही हिडीस दमनशाही चाललीय, त्यात कसं ‘असायचं’ आहे आपण?
पडघम - देशकारण
स्पृहा जोशी
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Thu , 19 April 2018
  • पडघम देशकारण कथुआ kathua उन्नाव Unnao असिफा Asifa

काय फरक पडतो मी नाही लिहिलं तर?

मला जे काही वाटतंय त्यानं तसाही कसला बदल घडणार आहे? कुठली क्रांती येणार आहे? आठ वर्षांचं ते ‘असिफा’ नावाचं लेकरू तडफडून मेलं. माझ्यापासून कित्येक किलोमीटर दूर काश्मीर नावाच्या देशात. हो देशच! पण मेली ती पोर. हाल-हाल होऊन मेली. मेल्यानंतर पण तिच्या चिंधड्या चिंधड्या करत राहिलो आपण सगळे... #JusticeForAsifa असे हॅशटॅग्स येत राहिले फक्त. बाकी सगळं चालूच राहिलं तसंच. माझं शेड्युल, मिटिंग्ज, शुटिंग्ज, डिनर्स, इन्स्टा स्टोरीज, नॅशनल अवॉर्ड्स... सगळं… रोजचंच.. रोजच्यासारखंच.

पण या सगळ्यामध्ये ही बातमी ज्या क्षणी वाचली, तेव्हापासून जो काय भीतीचा गोळा आलाय पोटात, तो जाता जात नाहीये. बलात्कार, वासनाकांड, लिंगपिपासा ही कधीही घृणास्पदच. त्याचं कुठलंही समर्थन असूच शकत नाही. कधीच! पण त्याला जो आणि ज्या पद्धतीचा सपोर्ट मिळतो आहे, ते ज्या पद्धतीनं पाठीशी घातलं जातंय, तिरंग्याची देशप्रेमाच्या नावाखाली जी काय अंतयात्रा काढली जातीय, किंवा एकुणातच ही जी काही हिडीस दमनशाही चाललीये, त्यात कसं ‘असायचं’ आहे आपण? मुजोरपणाची किती टोकाची परिसीमा? आणि हा कसला बेशरम नंगानाच चाललाय आसपास??

मी खूप ठरवलं की, यावर आपण बोलायचं नाही. व्यक्त व्हायचं नाही. काय फरक पडतो इतके सगळे लोक बोलत असताना मी नाही बोलले तर? आणि त्यातून सोशल मीडियावर तर नकोच. उगाच कशाला नसते वाद अंगावर घ्या! खूप प्रयत्न केला शांत बसायचा. पण खरं सांगू, ते फोटोमधले हसरे मोठे मोठे डोळे ना झोपूच देत नाहीयत. विचित्र पाठलाग करतायत असं वाटतं सारखं.

काल एक ट्विट वाचलं, “अच्छा हुआ असिफा मर गई, बडी होती तो वैसे भी आतंकवादी ही बनती." मी शप्पथ सांगते मला रडू आलं एकदम. यापेक्षा जास्त काय करू शकणार म्हणा? रडूच शकतो फक्त. पण हे रडू घाणीचं होतं. रागाचं, तिरस्काराचं, हताश वाटण्याचं, भीतीचं, सगळ्याचं. ही कुठली विषारी गोळी गिळलीय आपण समाज म्हणून? सगळ्यांनी, एकत्र? असिफाला गोळी देऊन गुंगीत असताना बलात्कार केला तिच्यावर. आपलंही फार काही वेगळं नाहीय. ही गुंगीची गोळी देऊन अख्ख्या समाजावर वर्षानुवर्षं बलात्कार झालाय आणि ते मेंदू दगड घालून फोडलेत कोणीतरी! कुठलाही विषय आपण बेसिक संवेदनशीलतेनं पाहू शकतच नाही! फक्त ओंगळवाणी, बीभत्स, किळसवाणी प्रदर्शनं मांडू शकतो. आपल्या भक्तीची, श्रद्धांची, देवाची. नुसती प्रदर्शनं… नुसत्या आराशी!

.............................................................................................................................................

‘सेपिअन्स - मानवजातीचा अनोखा इतिहास’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

साधं खरचटलं तरी दोन दिवस जोंभाळतो आपण स्वतःचा जीव. त्या एवढ्याशा पोरीला काय झालं असेल? किती किती दुखलं असेल. शरीराच्या त्या भागाशी ‘शू’ करण्याव्यतिरिक्त ओळखही न होण्याचं वय ते... आपल्यासोबत हे काय होतंय कळायच्या आतच संपली ती. आणि संपली नाही सीधेपणानं… गळा दाबून, दगडाने डोकं ठेचून संपवली तिला....

मला खरंच खूप भीती वाटतीय की, मी या अशा जगात राहतेय जिथं हे सगळं खूप नॉर्मल वाटतंय सगळ्यांना. किंवा माझ्या आसपासचे सगळेच पोटात ही भीती घेऊन वर नॉर्मलसीचा मुखवटा घालून जगतायत. हे तर फारच भीतीदायक आहे. आपल्याला सगळ्यांना या सप्रेशननं वेड लागेल कदाचित. किंवा लागलंही आहे ऑलरेडी! ‘आपले – त्यांचे’, ‘माझ्या जातीचे - त्याच्या जातीचे’ या सगळ्यात माझ्या बाई असण्याची आणि माणूस असण्याची जी ‘लक्तरं’ निघतायत; त्यानं मी उभी-आडवी नासवली जातीये. दररोज.

मला झोप नाही लागतेय नीट रात्रीची. या अशा वातावरणाची, त्याच्याशी जुळवून घेण्याची आणि काही पर्याय नाही, म्हणून पाय ओढत जगत राहण्याची मला खरंच खूप, खूप जास्त भीती वाटतीय!

.............................................................................................................................................

लेखिका स्पृहा जोशी मराठी सिने-नाट्य कलावंत आहेत.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Anand Pawar

Fri , 20 April 2018

स्पृहा जोशी यांचा लेख चांगला व योग्य आहे. परंतु त्यावरील प्रतिक्रिया देणारे गामा पैलवान यांनी वरील विषयात धर्म जात पात याऐवजी स्त्री व पुरूष संबध व सामाजिक भान या दृष्टीने विचार करणे आवश्य आहे. पुर्वी त्यांनी केले म्हणून आता आम्ही तसे वागणार यातून परिस्थिती कशी सुधारणार.


Gamma Pailvan

Fri , 20 April 2018

स्पृहाताई, तुम्ही लिहाच. काय फरक पडतोय असं म्हणून अजिबात गप्प राहू नका. त्याचं काये की तुम्ही तुमच्या आईच्या पोटांत होतात ना (इ.स. १९८९ बरंका), त्याच्याही आधीपासनं काश्मिरात हिंदू बायकांवर नृशंस अत्याचार होत आलेत. तेव्हा जर वेळच्या वेळी वृत्तपत्रांनी आवाज उठवला असता तर आज असिफावर हा प्रसंग ओढवला नसता. आज जे असिफाच्या नावाने ऊर बडवीत रडताहेत ते १९९० साली हिंदूंवर अशीच भीषण परिस्थिती ओढवली असतांना डोळ्यांवर कातडं ओढून बसले होते. तुम्ही मात्र अशी चूक आजिबात करू नका. लिहा. व्यक्त व्हा. आणि त्या रोहिंग्या मुस्लिमांना जम्मूतनं हाकून लावायच्या कार्यात योगदान द्या. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......