राष्ट्रकुल सुवर्ण, आता २०२० ऑलिंपिकचा पल्ला गाठायचा आहे!
पडघम - क्रीडानामा
अनिकेत वाणी
  • राष्ट्रकुल
  • Wed , 18 April 2018
  • पडघम क्रीडानामा राष्ट्रकुल

क्वीन्सलँड गोल्ड-कोस्ट इथं संपन्न झालेल्या २१ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी आणखी सात पदकं पटकावत ६६ पदकांसह भारतानं पदकतालिकेमध्ये तिसरं स्थान निश्चित केलं. यामध्ये २३ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताची आतापर्यंतच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील कामगिरी तिसऱ्या क्रमांकाची राहिली आहे. दिल्ली (२०१०) ११० पदकं, मँचेस्टर (२००२) ६९ पदकं आणि गोल्ड-कोस्ट (२०१८) ६६ पदकं भारतानं पटकावली आहेत. आतपर्यंताच्या एकूण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील १५ खेळ प्रकारांत ५०४ पदकं (सुवर्ण १८१), (रौप्य १७५), (कांस्य १४८) भारताला मिळाली आहेत.

एकीकडे आयपीएल क्रिकेटचा थरार सुरू झालेला असताना, भारतीय क्रीडा चाहते राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेवर (मेडल-टॅली) लक्ष्य ठेवून असल्याचं निदर्शनास आलं. वृतपत्रांनीही आयपीएलपेक्षा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या बातमीला अधिक प्राधान्य दिलं.

कधी नव्हे ते माझे मित्र-मैत्रिणी, कुटुंबातील सदस्यदेखील सकाळी लवकर उठून सामने पाहत होते. हे सर्व यासाठी नमूद करतो आहे की, गेल्या दहा वर्षांत ऑलिंपिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, हॉकीचा विश्वचषक, बॅडमिंटन ओपन सीरीज असो किंवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो, या खेळांकडेही क्रीडाप्रेक्षक, सामान्य जनता आणि युवावर्ग वळू लागल्याचं दिसतं. तरीदेखील या बदलत्या चित्राचं वर्णन ‘ग्लास अर्धा भरलेला आणि अर्धा रिकामा आहे’ असं करावं लागेल.

यावेळी मागील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तुलनेत महिलांची कामगिरी अधिक सरस पाहावयास मिळते. २६ पैकी १२ सुवर्ण पदकं महिलांनी पटकावली, तर पुरुषांनी १३ आणि १ सुवर्ण पदक मिश्र खेळ प्रकारात पटकावली. ग्लास्गो राष्ट्रकुलमध्ये ही टक्केवारी ४७:५३ अशी होती. दडपणात पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक चांगल्या रीतीनं खेळतात हे यावरून सिद्ध होतं.

या वर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत नऊ जागतिक, तसंच ९१ स्पर्धा विक्रमाची नोंद झाली आहे. गोल्ड-कोस्ट २०१८ च्या राष्ट्रकुलमध्ये सर्वाधिक म्हणजे १६ पदकं ही नेमबाजांनी मिळवली होती. २००२ ते २०१० पर्यंतच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांचं वर्चस्व होतं, पण मागील दोन स्पर्धा, ज्यात आशियाई स्पर्धांचा देखील समावेश आहे. अशा स्पर्धेत ऑस्ट्रेलियासारख्या नवख्या देशांनी वैयक्तिक कामगिरी उंचावत भारतीय नेमबाजांसमोर आव्हान निर्माण केलं. गगन नारंग, अभिनव बिंद्रा, विजय कुमार, अंजली भागवत, तेजस्विनी सावंत हे दिग्गज अनुभवी खेळाडू असतानाही भारताच्या खात्यात पदकं येत नव्हती. पण यावेळच्या राष्ट्रकुल स्पर्धेत नवोदित आणि अनुभवी नेमबाजांनी सर्व रायफल आणि पिस्टल प्रकाराच्या नेमबाजीत पदकं प्राप्त केली. त्यामुळे २०२० च्या पूर्वेकडील देशांत होणाऱ्या जपानमधील टोकियो ऑलिंपिकमध्ये गगन नारंग, विजय कुमार, मानवजीतसिंग संधू, तेजस्विनी सावंत, संजीव राजपूत, अन्नुराज सिंग, हीना सिद्धू यांसारख्या मात्तबर खेळाडूंसह नव्या दमाचे युवा खेळाडू चैन सिंग, रवी कुमार, दिपककुमार, जितु रॉय, ओम मिथार्वाल, अनिष भानवाला, मनू भाकर, मेहुली घोष यांसह २७ जणांचा नेमबाजांचा संघ समतोल असल्याचं दिसतं.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

गोल्ड-कोस्ट २०१८चं मुख्य आकर्षण होतं, ते नीरज चोप्रा या २० वर्षीय खेळाडूचं. त्यानं जॅविलीन थ्रो प्रकारामध्ये सुवर्ण पदक पटकावत जागतिक विक्रम मोडत ८६.४७ मीटर लांब भाला फेकत नवीन विक्रम प्रस्थापित केला. तर डिस्कस थ्रो या प्रकारात सीमा पुनिया आणि नवजीत कौर ढिल्लो यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक पटकावलं. जमैका आणि बोट्स्वाना या देशांचं वर्चस्व असणाऱ्या ४०० मी. स्पर्धेत मोहमद अनास याहीयानं ४५.३१ असा राष्ट्रीय विक्रम करत चौथं स्थान पटकावलं, तर हिमा दासनं ५१.३२ असा वैयक्तिक विक्रम मोडत सहावं स्थान पटकावलं. हेप्तःलोन या प्रकारात पोर्णिमा हेम्ब्रामनं सहावं स्थान पटकावून नवीन विक्रम प्रस्थापित केला.

बॅडमिंटन आणि टेबल टेनिस या प्रकारात अनुक्रमे ६ आणि ८ अशी पदकं मिळवत पहिलं स्थान पटकावलं. यामध्ये मुख्य आकर्षण होतं ते मनिका बात्राचं. तिनं सांघिक आणि वैयक्तिक कामगिरीत एकूण ४ पदकं पटकावली. त्यात २ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य पदकाचा समावेश आहे. दुसरं आकर्षण म्हणजे भारताच्या दोन बॅडमिंटन फुलराण्या सायना आणि सिंधु अंतिम फेरीत एकमेकींविरुद्ध लढत होत्या. या सामन्यात सायनानं सुवर्ण, तर सिंधुनं रौप्य पदक पटकावलं. स्क्वॅशसारख्या खेळ प्रकारात वैयक्तिक गटात जरी यश आलं नसलं, तरी सांघिक कामगिरी उंचावत मिश्र आणि वुमेन्स डबल्समध्ये दोन रौप्य पदकं मिळवण्यात दीपिका पल्लीकलचा वाटा मोठा होता.

गोल्ड-कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेची सुरुवात झाली, ती वेटलिफ्टिंगच्या सुवर्ण पदकानं! यामध्ये एकूण ९ पदकं भारताला मिळाली. ऑलिंपिकमध्ये अपयशी ठरलेल्या मीराबाई चानुनं सुवर्ण पदक पटकावलं. मागील राष्ट्रकुल स्पर्धेच्या तुलनेत ४ पदकं कमी मिळाली असली, तरी ती पदकांची संख्या १८ म्हणजे दुप्पट पदकांच्या बरोबर आहेत. याचं कारण स्नॅच आणि क्लीन अॅण्ड जर्क या दोन्ही प्रकारांत मिळून आता पदक देण्यात येतं. तर पॅरापॅावरलिफ्टिंगमध्ये १ कांस्य पदक सचिन चौधरीनं पटकावलं. कुस्ती या पारंपरिक प्रकारात १२ पदक मिळवत भारतानं पहिलं स्थान कायम राखलं. खाशाबा जाधव, मारुती माने यांची परंपरा पुढे नेत महाराष्ट्राच्या राहुल आवारेनं ५७ किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली. तर महिलांमध्ये फोगट भगिनी विनेश आणि बबिता यांना अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य अशी पदकं मिळवली. सलग तीन राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये बबितानं रौप्य, सुवर्ण, रौप्य पदकांची तर सुशील कुमारनं सुवर्ण पदकांची हॅटट्रिक साधली.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा जरी इतर स्पर्धांच्या तुलनेत कमी महत्त्वाच्या असल्या तरी देखील अर्थातच पूर्ण दुर्लक्ष करून चालणार नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुपर मॉम मेरी कॉमनं तिच्या करिअरमधील पहिलं राष्ट्रकुल पदक पटकावलं. आजपर्यंत तिच्याकडे सर्व स्पर्धेतील पदकं होती, पण या वयातही तीन मुलांची आई आणि राज्यसभा खासदार असताना सुवर्ण पदक पटकावणं आणि तेही ४८ किलो वजनी गटात सोपं नाही. पुरुषांच्या सर्व वजनी गटात किमान एक तरी पदक आलं, हेही काही कमी नाही. मात्र इतकं सगळं चांगलं होत असताना पदकतालिकेत भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकीच्या रकान्यात एकही पदक जिंकता आलेलं नाही, ही गोष्ट भूषणावह नव्हे. आजपर्यंत एकदाही भारतानं राष्ट्रकुल स्पर्धेत हॉकीत पदक न जिंकता रिकाम्या हातानं परत आला नाही. त्यामुळे सलग चार संधी मिळूनही हॉकीची पाटी कोरीच राहिल्याची खंत वाटते.

आता पुढील लक्ष्य टोकियो ऑलिंपिक २०२०. खेळाडूंनी स्वत:ला झोकून देऊन मेहनत केली, तर यश आपलंच आहे!  

..............................................................................................................

लेखक अनिकेत वाणी यांनी जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन ही पदवी पुणे विद्यापीठातून पूर्ण केली आहे.

anumyself01@gmail.com

..............................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......