भारतीय पुरुषाची विकृत मानसिकता
अर्धेजग - कळीचे प्रश्न
शिव विश्वनाथन
  • प्रातिनिधिक छायाचित्रं
  • Tue , 17 April 2018
  • अर्धे जग women world बलात्कार Rape लैंगिकता Sex समाज Society शिव विश्वनाथन Shiv Visvanathan भारतीय पुरुष Indian Male स्त्री Women

‘भारतीय पुरुष’ हा अनेक विसंगतींनी भरलेला प्राणी आहे. स्त्रियांनी त्याला लाडावून ठेवला आहे. केवळ ‘पितृसत्ताक’ याच नात्यानं तो प्रतिसाद देतो. त्याची पितृसत्ताक व्यवस्था ही दोन पातळ्यांवर चालणारी यंत्रणा आहे. सार्वजनिक जीवनात तो ‘राष्ट्र’वादी असतो, तर घरात ‘कर्ता पुरुष’ असतो. कुणी समाजबाह्य वर्तन करत नाही ना हे पाहण्यासाठी तो स्वयंघोषित स्वयंसेवक बनून राणा भीमदेवी थाटात रस्त्यावरून गस्त घालतो. राष्ट्राच्या दृष्टीनं तो ‘गोरक्षक’ असतो, तर घरात तो ‘स्त्रीदेहा’चा रक्षक असतो. ‘राष्ट्र’ आणि ‘स्त्रीदेह’ या त्याच्या दोन महान जहागिऱ्या असतात. त्या दोन्हींना त्यानं हद्दी ठोकून ठेवलेल्या असतात. त्या हद्दींचा रक्षक या नात्यानं तो ‘कुणी अतीपणा करत नाही ना,’ हे जातीनं पाहतो. नैतिकतेचा परीक्षकही तोच असतो. अशा तऱ्हेनं तो ‘स्त्री-शरीर’ आणि ‘राष्ट्रशरीर’ यांचं रक्षण करतो. 

त्याच्या व्यक्तिमत्त्वात कसलं तरी दुभंगलेपण आहे. त्याला स्वतःला बेबंद राहायचं आहे, परंतु त्याच्या मालकीच्या स्त्रियांनी मात्र बंधनातच राहावं असं त्याला वाटतं. विचित्र गोष्ट म्हणजे ‘आई’ ही त्याच्या लेखी ‘आदर्श स्त्री’ असते. तिचा त्याग, तिनं स्वतःवर घालून घेतलेले निर्बंध, ती करत असलेली कर्तव्यं यांची तो पूजा करतो. त्याची आई आणि तशीच स्वयंशिस्त पाळणारी, संगोपन करणारी ‘राष्ट्ररूपी माता’ या दोघी त्याच्या दृष्टीनं समान असतात. त्याच वेळेस इतर स्त्रियांनी मात्र त्याच्याशी मोकळेपणानं वागावं, त्यानं स्वतःही त्यांच्याशी मोकळेपणानं वागावं असं त्याला वाटतं. तंत्रज्ञानात आणि त्याचा परिणाम म्हणून नीतिमूल्यांत लैंगिक क्रांती घडून आली आहे, हे त्याच्या गावीही नसतं. कंडोमचा वापर हा त्याला आपल्या मर्दानगीचा अपमान वाटतो. त्याची मर्दानगी ही त्याच्या एकूणच वर्तनावर भाष्य करणारं रूपक म्हणून समोर येते. निर्णय घेण्यापासून ते तंत्रज्ञानाच्या वापरापर्यंतच्या सर्वच क्षेत्रांत त्याचा पुरुषी अहंकार फणा काढून उभा असतो. त्याला अणुबॉम्ब हवा असतो आणि त्याच वेळेस सरकारनं सर्व संकटांत आपल्या नागरिकांची सुरक्षा वाहावी असंही वाटत असतं.

एवढं असूनही त्याला स्वतःच्या कुवतीची खात्रीही नसतेच. ‘नर’ ससाणा या रूपात स्वतःला पाहणाऱ्या त्याला ‘क्षेपणास्त्र’रूपी शत्रूची भीती वाटते. खरं तर ‘सुरक्षितता’ या शब्दाचा पुरुषांना एवढा मोह का वाटतो, त्याचं मला सदैव आश्चर्यच वाटत आलं आहे. मातेच्या उदरातील नाळेनं वेढावं तशी त्याला ही सुरक्षिततेची संकल्पना वेढून टाकते, बांधून घालते, त्याचं रक्षण करते आणि त्याला आपल्या काबूतही ठेवते. स्वसंरक्षणासाठी म्हणून घरात तो सतत सुरक्षितता शोधत असतो आणि इतरांच्या वागण्यावर पाळत ठेवून त्यांच्याशी वादही घालत असतो.

भारतीय पुरुष हा एक ‘मुस्कटदाबी केलेला’ प्राणी आहे, असंही म्हणता येईल. जन्मल्यापासून ठरावीक साच्यात वाढवल्यामुळे लैंगिक निवड असो की, व्यवसायाची निवड असो, त्याचं वागणं अगदी सहज अंदाज बांधण्यासारखं असतं. कारण अकाउंटन्सी, इंजिनिअरिंग आणि डॉक्टरकी यातच त्याचं सगळं जग संपतं. संकुचित जगात जगल्यामुळे चाळीसाव्या वर्षी त्याला जीवनाचा उबग येतो आणि तो अगदी मंदावल्यासारखा होऊन जातो. पन्नासाव्या वर्षी त्याला दुसऱ्यांदा पौगंडावस्था प्राप्त होते. केवळ धर्माचा आधार घेऊनच त्यातून तो तरून जातो. खरं सांगायचं तर भारत हा असा देश आहे, जिथं सगळी बंधनं असूनही वयाच्या चाळीशीनंतर पुरुषांतील धग मंदावू लागते, तर स्त्रियांना मात्र अधिक जोम येतो. मेधा पाटकर, अरुणा रॉय यांच्यापासून ते इंदिरा जयसिंग, इला भट, इरोम शर्मिला यांच्यासारख्या उत्साही कार्यकर्त्यांकडे आणि नव्या आदिवासी कार्यकर्त्यांकडे पाहिलं तर लैंगिकता आणि वर्चस्व या बाबतीत स्त्रिया सहजभावानं वागतात हे जाणवतं.

खरं तर पुरुषच ‘दडपला’ गेला आहे. स्वतःची मुस्कटदाबी झाल्यामुळे तो इतरांवर हुकूमशाही गाजवू लागतो. नीतिमत्तेच्या नावाखाली दुटप्पी वर्तन करू लागतो. पुरुषांसाठी वेगळा आणि स्त्रियांसाठी वेगळा न्याय लावू लागतो. म्हणूनच ‘खाप पंचायत’ आणि ‘नॅशनल सिक्युरिटी स्टेट’ या संकल्पनांत मला खूप साम्यस्थळं दिसतात. दोन्हीकडे चिंतांना काबूत ठेवण्यासाठी म्हणून सुरक्षिततेच्या यंत्रणा जन्माला येतात आणि मग चिंताग्रस्त स्थिती कायम राहावी म्हणून त्या यंत्रणाच हिंसक आणि क्रूर बनतात. जणू एकीकडे स्वतःचं दमन करताना दुसरीकडे त्यांना इतरांवर हिंसेचा अतिरेक करावा लागतो. अशा वेळेस मग हिंसाचाराचा हैदोस आणि शरीरसुखाचा उत्कट बिंदू हे जणू भावनिकरीत्या समान पातळीवर येतात. ‘आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स अॅक्ट’ या कायद्याखालच्या प्रकरणांपासून ते गुजरात दंगलींपर्यंतच्या प्रकरणातील कुठलीही हिंसक घटना पाहिली की, तिचं अंतिम पर्यवसान बलात्कारात होणं, ही त्या हिंसेची गरज असल्यासारखंच दिसतं. जणू बलात्कार हा मर्दानगीचा आणि आपल्याला कोण हात लावणार, या बेदरकारीचा ट्रेडमार्कच बनतो. खरोखर, बलात्काराशिवाय भारतीय पुरुषी अहंकार अपूर्णच ठरतो.

सुरक्षिततेनंतरची दुसरी संशयास्पद कल्पना आहे, ती म्हणजे ‘इज्जत’ किंवा ‘अब्रू.’ इज्जत याचा अर्थ मोठेपणा किंवा आत्मसन्मान नव्हे. तर स्त्रीवर मालकी हक्क दाखवणारी, घराण्याची स्वामीत्वभावनायुक्त इभ्रत असते ती. स्त्रीने मर्यादा ओलांडली तर तिला त्या कृत्याची किंमत चुकवावीच लागते. ‘ऑनर किलिंग’ हा जणू पुरुषाची अब्रू जपण्याचा विधीच आहे. जणू ‘इज्जत’ ही अशी शक्ती आहे, जी ‘ऑनर किलिंग’मधून पुनःपुन्हा प्रकटत असते. पुरुषाची इज्जतच काय ती महत्त्वाची असते, तर स्त्री हे त्या इज्जतीला शाबूत ठेवणारं आणि सहज बदलता येणारं असं साधन असते.

ऑनर किलिंगच्या समजुतीमागे भारतीय कुटुंबातील सर्वांत मोठं गुपित लपलं आहे. ते म्हणजे निषिद्ध संभोग किंवा इन्सेस्ट. ‘निषिद्ध संभोग’ भारतात खूप मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे. ‘निषिद्ध संभोग’ हा सामाजिक अत्याचार आहे. तो उघडकीला आल्यामुळे त्याला घरच्यांनी दूर लोटलं किंवा त्यानं स्वतःहून दुसरीकडे स्थलांतर केलं तर, अन्यथा भारतीय पुरुषाच्या दडपलेल्या भावनांना या निषिद्ध संभोगातून वाटच मिळते. मात्र या ‘निषिद्ध संभोगा’मुळे एरवी तो जे बोलत असतो ते सगळं खोटं ठरतं. बाहेरच्या स्त्रीवर बलात्कार करण्यामुळे खूप मोठी सनसनाटी निर्माण होते, परंतु निषिद्ध संभोग मात्र गुप्त राखला जातो, ती अशी एक मूक दुनिया असते, जिच्याविषयी कुणी चकार शब्दही काढत नाही. निषिद्ध संभोगाचं मूक जग आणि बलात्काराची सनसनाटी बातमी या दोन्हींत भारतीय पुरुषाची दांभिकता दिसून येते. विचित्र गोष्ट अशी आहे की, अनिर्बंध चालणाऱ्या परंतु पुष्कळ गळती लागलेल्या पंपासारखा भारतीय पुरुष काम करत असला तरी त्याला नर्मश्रृंगाराची समज फार कमी असते. श्रृंगारिक जग हे जणू त्याच्या लेखी इतिहासातील स्मरणरंजन असतं आणि प्रणयाराधन म्हणजे ‘पंच आणि ज्युडी’ या धसमुसळ्या बाहुल्यांच्या खेळातील द्व्यर्थी विनोद आणि रासवट हिंसा असते. आनंद घ्यावा असा तो कोमल प्रणयविधी नसतो. पुरुषांच्या जीवनात सध्या हे मर्यादांचं आणि बंधनांचं नस्तं स्तोम माजलं आहे. त्यामागे त्यांच्या जीवनात असलेला नर्मश्रृंगाराचा अभाव हेच कारण आहे. नर्मश्रृंगारासाठी, मुळात दुसऱ्या व्यक्तीची जाणीव तरल पातळीवर व्हावी लागते. त्यासाठी भाषेची ताकद लागते आणि शारीरिक जवळिकीचे लोभस उपचारही लागतात. पण सध्या मात्र डिओडरंटचा यांत्रिक वापर एवढंच त्या नर्मश्रृंगाराचं रूप उरलं आहे.

हेही सांगितलं पाहिजे की, वैवाहिक जीवनातील अत्यंत कंटाळवाणेपण हे त्यात भरच घालत असतं. पतीपत्नींना एकमेकांशी बोलण्यासारखं फारसं काही नसतं. आनंददायी संभाषण ही संकल्पना तर कुणाला सुचतही नाही. हॉटेलात बसलेल्या भारतीय कुटुंबाचं निरीक्षण केलं तर दिसतं की, पुरुष एकटाच मोठ्या ऐटीत जेवतो आहे, तर स्त्री मात्र मुलांवर लक्ष ठेवण्यात गुंतली आहे. तिथं कोमलतेला थारा नाही,  इकडच्या तिकडच्या गप्पा नाहीत, काहीच नाही. जणू कर्तव्यपालन आणि कर्तव्यच्युती, त्याग आणि भोग यांच्यामधल्या अवस्थेत ते कुटुंब लोंबकळत आहे. चाळीशीनंतर तर प्रियाराधनाची उरलीसुरली हौस आणि त्यातील काव्य सारचं ओसरून जातं.

अशा वेळेस लैंगिकतेऐवजी सत्तेचा कामोद्दिपनासाठी वापर होऊ लागतो. मग लैंगिकतेची जागा ऑफिसातलं काम आणि तिथल्या गावगप्पा घेतात आणि भारतीय पुरुष हा चाळीसाव्या वर्षीच थकल्याभागल्या इंजिनासारखा दिसू लागतो. मला वाटतं की, इथं एक मूक शोकांतिका घडते. ती घडू नये यासाठी काही जुन्या गोष्टी खणून काढण्याची, पुन्हा नव्यानं सांगण्याची गरज आहे. कारण पुरुष अस्वस्थ झाले तरी त्यांना त्यामागचं कारण कळत नाही. मग आपल्या सर्वंकष नपुंसकतेला सामोरं जाण्याऐवजी हे अस्वस्थ, बेचैन पुरुष नैतिकतेचे पहारेकरी बनतात, खाप पंचायतीचे प्रणेते बनतात. बलात्कारपीडित स्त्रिया स्वतःवर ती परिस्थिती ओढवून घेतात म्हणून त्यांचा धिक्कार करणारे न्यायाधीशही तेच बनतात.

व्यक्तीच्या मानसशास्त्राबद्दल सांगणाऱ्या फ्रॉईडची इथं गरज नाही, तर पुरुषांच्या सामूहिक मानसिकतेबद्दल सांगणाऱ्या रोशॅक या मानसशास्त्रज्ञाची गरज आहे. समूहातील प्रत्येक पुरुष स्वतः अत्याचारांना बळी पडलेला असतो आणि त्याच वेळेस तो स्वतः अत्याचार करणाराही असतो. जे जग त्याला स्वतःला पुरेसं कळलेलं नाही, अशा जगातला तो एक रुग्ण असतो. पितृसत्ताक समाजव्यवस्थेनं जगातली गुंतागुंत त्याच्यासाठी सोपी केली असली तरी आजच्या त्या जगाला तोंड देताना त्याला जाणवत असतं की, शरीर, लैंगिकता, तंत्रज्ञान आणि नीतीमूल्यं बदललेली असली तरी आपण मात्र अजूनही व्हिक्टोरियन काळातून आल्यासारखं जगत आहोत. सॅम्युअल बटलरने लिहिलेल्या ‘द वे ऑफ ऑल फ्लेश’ या अत्याचार आणि दडपशाहीवर भाष्य करणाऱ्या अभ्यासातून बाहेर आलेल्या प्राण्यासारखा वाटतो तो. आपण शरीराकडे जसं पाहतो, त्यावर लिंगव्यवस्थेकडे बघण्याच्या दृष्टिकोनातील फरक ठरतो. पुरुषांच्या दृष्टीनं स्त्रीदेह हे कुरण आहे, त्यांच्या मालकीचा प्रदेश आहे. सांस्कृतिक मूल्यांचं प्रतीक म्हणूनही ते स्त्रीदेहाकडे पाहतात आणि स्त्रियांनीही ते मान्य करावं असा आग्रह धरतात. या ठिकाणी असलेला दुहेरीपणा आपण समजून घ्यायला हवा. बहीण किंवा पत्नी म्हणून स्त्रीला मान असला तरी बाकीच्या स्त्रियांना प्रतीकात्मक मूल्यही नसतं. अन्य स्त्रिया या तिरस्करणीय वस्तू असतात, केवळ वापरासाठी असतात. बलात्कारित स्त्री ही तर ‘काचेचं फुटकं भांडं’ असते, ही केवढी दुर्दैवी बाब आहे. तिच्याशी नातं निघालं तर त्यामुळे कुटुंबाच्या इज्जतीला धक्का पोचतो. बलात्काराभोवती रचलेल्या कहाणीत त्या स्त्रीलाच दोषी धरलं जातं. सामूहिक बलात्कार झालेल्या स्त्रीला तर पार वाळीतच टाकलं जातं.

ज्या नैतिक मूल्यव्यवस्थेत स्त्री ही पुरुषाची ‘मालमत्ता’ समजली जाते, तीच मूल्यव्यवस्था पुरुषाला मात्र सगळ्या परवानग्या देते, शिक्षेपासून मुक्तीही देते. मग अशा मूल्यव्यवस्थेत न्याय मिळण्याची शक्यता दुरापास्तच ठरणार ना. त्या मूल्यव्यवस्थेचं संस्थात्मक प्रतिबिंब म्हणजेच खाप पंचायत. तिथं न्याय व्हायला हवा, या गरजेपेक्षा कुटुंबाची इभ्रत आणि ‘स्त्रीचा घसरलेला पाय’ यालाच अधिक महत्त्व दिलं जातं. अशा दृष्टिकोनाला नाकारण्याच्या प्रयत्नांनाही लोकमान्यता मिळत नाही. हल्लीच मी फरहान अख्तर आणि जॉन अब्राहम यांनी केलेल्या जाहिराती बघत होतो. पुरुषांनी स्त्रियांची बाजू घ्यावी अशा अर्थाच्या त्या जाहिराती होत्या. त्या जाहिरातींतून मिळणारा संदेश फारसा प्रभावी नव्हता. रोटरी क्लबात बोलल्यासारखं ते बोलत होते. शपथ घेणाऱ्या बॉय स्काऊट्ससारखी त्यांनी नागरिकांची कर्तव्यं सांगितली. पण भूमिकेला ताकद आणि अर्थ देणाऱ्या नटांसारखं त्यांचं बोलणं वाटलं नाही. त्यांनी केलेला निर्धार हा वैयक्तिक शपथ घेतल्यासारखा वाटला, त्यांचा हेतू चांगला असला तरी प्रचलित समाजमूल्यं भेदून जाण्याची ताकद त्यात नव्हती. परिवर्तन घडवून आणण्यात येणाऱ्या अडथळ्यांचाच हा एक भाग आहे असं मला वाटतं. वैचारिक सुधारणा झालेला ‘चांगला पुरुष’ आणि त्याच्या या अशा जाहिराती कृत्रिम वाटतात, वरवरच्या वाटतात. कारण बलात्कार किंवा छळणूक यांच्या मुळाशी असलेल्या आदिमकालीन हिंसेचा त्या शोध घेतात.

एका समीक्षकाचं निरीक्षण असं आहे की, बलात्कारविरोधी जाहिरातींपेक्षा कंडोमच्या जाहिरातींतसुद्धा अधिक मेलोड्रामा आणि भावनांचं प्रदर्शन असतं. मुळात तो संदेश नागरिकांची कर्तव्यं, बालवीरांच्या शपथा यांच्यापल्याड तर जायला हवा. ज्या मूल्यांवर आणि भावनांवर आपण क्वचितच चर्चा करतो, त्यांना त्यानं स्पर्श करायला हवा. अशा तऱ्हेची एकच अर्थपूर्ण धर्माज्ञा मी पाहिली, ती फाळणीनंतरच्या पंजाबमध्ये! तेव्हा धार्मिक संस्थांनी स्पष्ट आज्ञा दिली होती की, परत आलेल्या बलात्कारित स्त्रियांना त्यांच्या कुटुंबांनी स्वीकारायला हवं. त्याविरुद्ध चकार शब्दही काढायला वाव दिला नव्हता. याच अर्थानं आपण सामाजिक मूल्यं आणि त्यांची गहनता यांच्यापाशी पोचलं पाहिजे. केवळ निधर्मी कायदे अशा प्रवृत्तीना लगाम घालू शकणार नाहीत.

खरं सांगायचं तर केवळ कायदा करून असा बदल घडून येईल का, हाही एक प्रश्नच आहे. अत्यंत सात्त्विक, शुद्ध असा कायदेमंडळात पास करून घेतलेला कायदाही बलात्कारातील पशुत्वपातळीला स्पर्श करू शकत नाही. सामूहिक बलात्काराला जिथं सजा मिळत नाही, तिथं काही वर्षांसाठी मिळालेल्या सक्तमजुरीच्या शिक्षेचं काय कौतुक? त्यासाठी न्यायबुद्धी हवी, ग्रीक नाट्यभूमीवरील महाकाव्यासारखा न्याय असायला हवा तो. जिथं नियती, सृष्टी आणि नागरिक एकत्र येतात आणि मुक्तपणे अभिव्यक्त होऊन निर्णय देतात.

अशा तऱ्हेची भूमिका ठामपणे घेण्याच्या दृष्टीनं आजची सामाजिक शास्त्रं फारच वरवरची मलमपट्टी करणारी वाटतात. आपल्याला असं साहित्य, अशी भाषा हवी आहे, जी काळजात घुसेल, पुरुषाच्या अंतर्मनात दडून बसलेल्या जुन्यापुराण्या, दबलेल्या भावनांना स्पर्श करेल. केवळ त्यामुळेच परिवर्तन करण्याची इच्छा त्याच्या मनात जागृत होईल. ते परिवर्तन घडवून आणण्यासाठी आंतरिक बदल घडून आले पाहिजेत, आत्म्यावर अक्षरशः गारूड झालं पाहिजे. कारण इथं आपल्याला केवळ वरवरची दुरुस्ती करायची नाहीये, तर सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणायचंय. ग्रीक शोकांतिकेतील भाषेत वेदनेची अर्थगर्भता असते. आधुनिक ब्रिटिश (अँग्लो-सॅक्सन) कायदा बलात्कारावर वरवरची रंगसफेदी करतो. निषिद्ध संभोगाविषयी साहित्यात ‘ब्र’ही न उच्चारलेला नसणं, हे तर एखाद्या दमनकारी, काळ्याकुट्ट भावनेसारखंच आहे. (जर्मन लेखक फ्रॅंक काफ्का यांच्या कथांत अशा काळ्याकुट्ट भावनांचं चित्रण येतं.) सध्याच्या अस्तित्ववादी परिस्थितीत जेव्हा नैतिक आणि भावनिक अर्थानं समाज बलात्कारित स्त्रीला नाकारतो, तेव्हा तिच्याबद्दल क्वचितच सहानुभूती वाटते. त्या एकटेपणाच्या यातनेला कायद्यानं दृश्य स्वरूपात आणलं पाहिजे. तसं झालं तरच बलात्काराला योग्य ते उत्तर मिळू शकतं.

मला वाटतं की कायदयाच्या आणि समाजसुधारणेच्या मार्गानं जाऊन ‘शरीर’ आणि ‘राष्ट्र-शरीर’ यांना जोडणारा एक नवीन कल्पक सांधा निर्माण केला पाहिजे, ज्यायोगे एखाद्या स्त्रीच्या शरीरावर अत्याचार झाला तर संपूर्ण ‘राष्ट्र-शरीर’ हादरून उठेल. विचार करा की आज स्त्रीवर एखादा अॅसिडचा हल्ला होतो, तेव्हा तिला यातना-अपमानांना सामोरं जावं लागतं. प्रसारमाध्यमांना वाटणारी कणव म्हणून त्या घटनेचा फोटो छापणं एवढ्यानं काही होत नाही. त्यातून तो पुरुष समाजकंटक आहे किंवा कामविकृत आहे एवढं कळून येतं. पत्नीला जाळून मारणारा रॉकेलप्रेमी पती आणि हा अॅसिड-हल्ला करणारा पुरुष- दोघांनाही वाळीत टाकलं पाहिजे आणि माध्यमांतून दिल्या जाणाऱ्या नेहमीच्या बातम्यांतून हा बहिष्कार प्रतिबिंबित झाला पाहिजे. त्यानं केलेल्या कृत्यामुळे ‘राष्ट्र-शरीरा’पासून तो दुरावला आहे, संपूर्ण राष्ट्रानं त्याचा धिक्कार केला आहे, असं दिसलं पाहिजे. क्षुल्लक जाळपोळ करणारा एक इसम किंवा किरकोळ चोर असं मानल्यामुळे त्या समस्येतील दाहकता नष्ट होऊन जाते. न्यायाची मागणी धुडकावून लावणाऱ्या, केवळ वरवरची मलमपट्टी करणाऱ्या कायद्याच्या आणि भाषेच्या पल्याड जाऊन समाजानं आपला प्रतिसाद खरमरीतपणे व्यक्त केला पाहिजे.

व्यापक अर्थानं पाहता मला वाटतं की, ताबडतोबीनं करण्याचा रामबाण उपाय म्हणजे ‘गोष्टी सांगण्या’साठी आणि ‘संवाद घडून येण्या’साठी साईट्स उपलब्ध करून द्याव्यात. त्या साईट्सवर भारतीयांच्या लैंगिक जीवनातील शांततेला वाचा फुटावी. त्यावर चर्चा होऊन, मनातील सर्व गरळ-विषांचा पार निचरा व्हावा. व्यक्तिमत्त्व विकासावरची पुस्तकं किंवा प्लॅसेबो- उपचार (रोग्याला बरं वाटावं म्हणून त्याला साधंच कुठलं तरी औषध देण्याचं नाटक करणं) अशासारखा हासुद्धा एक प्रभावी उपचार ठरेल. तथापि, भावनांचं दमन आणि सॅन्सॉरशीपचा बडगा यांच्यामध्ये अडकल्यामुळे ही गोष्ट घडून येणं अवघडच दिसतं. म्हणूनच असं वाटतं की, शेवटी पुरुष, विशेषतः भारतीय पुरुष हा या शतकातील सर्वाधिक दडपला गेलेला आणि दुसऱ्यावर दडपशाही गाजवणारा एक ‘नमुना’ म्हणूनच जगणार आणि मरणार हे निश्चित आहे.

अनुवाद – सविता दामले

..............................................................................................................

मूळ इंग्रजी लेख ‘आउटलुक’ या साप्ताहिकाच्या २ जानेवारी २०१७च्या ‘स्पेशल एयर-एण्ड’ विशेषांकात प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा –

..............................................................................................................

लेखक शिव विश्वनाथन हे एक समाजशास्त्राचे अभ्यासक असून नुकतेच त्यांचे ‘थिएटर्स ऑफ डेमॉक्रसी : बिट्विन द एपिक अॅण्ड एव्हरी डे’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.

..............................................................................................................

सविता दामले प्रसिद्ध अनुवादक आहेत.

savitadamle@rediffmail.com

..............................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

vishal pawar

Fri , 27 April 2018

वास्तव.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लग्नासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या सबळ असणे आणि विशिष्ट वयाचे असणे महत्त्वाचे नसून भावनिकदृष्ट्या स्थिर असणे, सर्वांत जास्त गरजेचे आहे, याचा आपण जोवर विचार करणार नाही, तोवर अतुल सुभाषसारखे बळी जातच राहतील

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भावना व नाती हाताळायची पद्धत वेगळी असते का, असा प्रश्न सामान्य व्यक्तीला पडू शकतो. एवढे उच्चशिक्षित, तंत्रज्ञानावर हुकमत असलेली हे लोक जेव्हा भावनांचा भाग येतो, तेव्हा का अपयशी ठरत असावेत? अतुल सुभाष यांचा दुर्दैवी मृत्यू हा पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबधित, भारतीय लग्नसंस्थेविषयी आणि कायदा व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करतो.......