अजूनकाही
१. नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर आल्याचं मोदींनी सिद्ध केलं तर मोदींसाठी जोरजोराने टाळ्या वाजवेन, रस्त्याकडेला उभे राहून मोदी, मोदी असं ओरडेन : अरविंद केजरीवाल
केजरीवाल, आता तरी काहीतरी वेगळं करा. आताही तुम्ही सदासर्वकाळ तेच करत असता. लोकांना फरक कळणार कसा? निदान थोडा गॅप तरी ठेवा.
……………………………………
२. पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदीविषयक गदारोळाला उत्तर द्यायला संसदेत का हजर राहत नाहीत, या विरोधकांच्या प्रश्नाची खिल्ली उडवताना केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री बाबूल सुप्रियो म्हणाले की, जब छोटे बच्चे ही इनका जवाब दे सकते है, तो ‘डॅडी’ को आने की क्या जरूरत है?
बाबूल बेटा, डॅडी मोठे तुमच्यासाठी? लोकशाहीत संसद सर्वोच्च आहे. तिथे ‘मेरे डॅडी शक्तिमान’ म्हणून कडक्या पोरांनी बेडक्या फुगवत नाचायचं नसतं. डॅडींनी येऊन जबाबदारीने उत्तरं द्यायची असतात. डॅडींनी थेट इथं आणण्याआधी चांगल्या शाळेत घातलं असतं तर बरं झालं असतं बच्चेकंपनीला.
……………………………………
३. आता एटीएमबरोबरच ‘बिग बझार’च्या आस्थापनांमध्ये डेबिट कार्ड स्वाईप करून पैसे काढता येणार. दोन हजार रूपयांची मर्यादा : बिग बाझार समूहाचे अध्यक्ष किशोर बियाणी यांचं ट्वीट.
या वेगाने आणखी काही दिवसांत स्वायपिंग मशीन असलेल्या सगळ्याच आस्थापनांमध्ये ही व्यवस्था करावी लागेल. सहकारी बँका मात्र रिझर्व्ह बँकेच्या लेखी बिग बाजारइतक्याही विश्वासार्ह नाहीत, हे मनोज्ञ आहे.
……………………………………
४. सातारची स्वाभिमानी जनता आता ‘बारामती’चा आदेश मानत नाही, हे काँग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांच्या विजयावरून स्पष्ट झालं आहे : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
बापरे, सातारची काँग्रेस स्वयंभू झाली की काय! यापुढे ती दिल्लीचे आदेश घेणार नाही? हे काय बोलताय ते मॅडमना कुणी कळवलं तर काय होईल बाबा?
……………………………………
५. आपण बारबाहेर, दारूच्या दुकानाबाहेर रांग लावतोच ना, तर मग देश प्रामाणिक बनवण्यासाठी बँकेबाहेर रांग लावण्यात अडचण काय? : मल्याळी सुपरस्टार मोहनलालच्या विधानावरून केरळात वादंग
फारच असहिष्णू आहेत बुवा हे मल्याळी लोक. मोहनलालगारू कोणत्या रांगेतून कोणत्या रांगेत आले असतील, याचा अंदाज घेऊन सोडून द्यायचं ना त्यांचं विधान. जाने दो, पियेला है, म्हणतात, ते उगाच का!
……………………………………
६. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नव्या आलिशान घरातील बाथरुमही बुलेटप्रूफ, एक लाख चौरस फुटापेक्षा मोठया घरात दोन बेडरुमही बुलेटप्रूफ, ५० सुरक्षारक्षकही तैनात, सुरक्षा अधिकाऱ्यांचीही २४ तास नजर.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावांना रिक्वेस्ट करून एक बेडरूम मिळवायला हरकत नाही. एका राज्याचं निम्मं पोलिस दल जर एकाच माणसाच्या सुरक्षेसाठी नेमलं गेलं असेल, तर तिथं त्यांना 'जान का खतरा' असण्याचा सवालच नाही.
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment