अजूनकाही
‘बेटी बचाव, बेटी पढवा’चा डिंडिम पिटणारं सरकार केंद्रात आणि राज्यात आहे. याशिवाय हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादीही. प्रधानसेवक म्हणजे परमेश्वराचा अवतार (इति. सध्याचे उपराष्ट्रपती) आणि आता भारतात काही होणार असेल तर फक्त विकास, विकास आणि फक्त विकास.
या पार्श्वभूमीवर कठुआ आणि उन्नावमधील घटनांकडे पाहिलं की काय दिसतं? सत्ताधाऱ्यांचा सोयीस्कर धृतराष्ट्री पवित्रा, धृतराष्ट्रामुळे, सत्ताधारी अग्निशिखा महिला प्रतिनिधी, मंत्री यांची आपोआपच गांधारीची भूमिका. पक्षीय प्रमुखांचं मौन आणि पुरुष प्रतिनिधींची बेशरम विधानं. त्याला पोषक अशा कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवणारे विविध मंच. वकिलांचं हिडिस वर्तन. ‘नंगानाच’ हा शब्दही सोज्वळ वाटावा इतका बीभत्स पुरुषी आक्रमकवाद.
कठुआ आणि उन्नावच्या घटनांचे घटनाक्रम, तपशील आता सर्वांना तोंडपाठ झाले असल्यानं त्यांची उजळणी नको. आता आरोपीच्या पिंजऱ्यात त्या प्रकरणातले आरोपी तर उभे करावेच लागतीलच, पण त्यांच्यासोबत ५६ इंची छातीवाले, सत्ताधारी भाजप आणि त्यांची निर्मिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, यांनाही या पिंजऱ्यात उभं करून उलटतपासणी करायला हवी.
स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणारा भारतीय जनता पक्ष वयातही न आलेल्या मुलीवर ‘देवळा’तच पाशवी बलात्कार आणि नंतर विकृत विल्हेवाट लावणाऱ्यांचा समर्थनार्थ उभा राहतो? वकिलांची संघटना खुलेआम बलात्कारींसोबत राहून धर्मांध भूमिका घेते आणि न्यायालयीन प्रक्रियेतच अडथळा आणते? दोन मंत्रीही या धर्मलंडांना साथ देतात? या अशा कृत्यांसाठीच ‘मंदिर’ निर्माण करणार का?
उन्नावमध्ये तर सरळ सरळ लोकप्रतिनिधी, प्रशासन, पोलिस आणि राज्य सरकार वर्षभर पीडितांना झुलवतात. दबाव टाकतात, नमवतात. पीडित मुलीच्या बापाचा पोलिस कोठडीतच मृत्यू होतो. ‘दबंग’गिरी चालूच राहते. हे असे ‘दबंग’ सर्व पक्षीय वारकरी असल्यानं विरोधी पक्षही आस्ते कदम मोडवर जातात. आणि हे सर्व घडत असताना प्रधानसेवक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करत स्वत:च्या पदाचं श्रेय त्यांना देत आयुष्यमान सप्ताह साजरा करण्याचे आवाहन सोहळे करत राहतात! किमान नैतिकता ही आता या राष्ट्रीय पक्षात आणि त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांत राहिलेली नाही. जणू काही आपण त्या गावचेच नाही, असं आठवडाभराचं मौन पंतप्रधानपदाची शोभा करतं. कधीतरी याच पक्षाच्या जाज्वल्य नेत्यानं, जो सध्या अडगळीत आहे, त्यावेळच्या पंतप्रधानांना ‘सबसे निकम्मा प्रधानमंत्री’ अशी चपराक लावली होती. त्याच पंतप्रधानांना आताच्या पंतप्रधानांनी ‘मनमौनसिंह’ असं नाव दिलं होतं. मग आता या दोन्ही उपाध्या एकत्र करून ‘मौनी निकम्मा’ म्हणून साभार परत करायच्या काय? जिभेच्या दांडपट्ट्याची ऐन मोक्याच्या वेळी सुरळी कशी होते?
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406
.............................................................................................................................................
हाच तो पक्ष, विरोधात असताना यांच्या सुविद्य, सुशिक्षित महिला नेत्या ‘सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर केशवपन करणार’ होत्या. तत्कालिन पंतप्रधानांना बांगड्या पाठवणारी विदुषी आता विस्मृतीच्या विकारानं त्रस्त तर नाही ना? हिंदुत्ववादी सरकारच्या काळात बांगड्या मिळू नयेत? बाबासाहेबांच्या वडिलांच्या नावात ‘रामजी’ शोधणारे ‘राम’ संविधानिक पदावर आहेत, पण त्यांना स्वपक्षातले ‘रावण’ दिसत नाहीत का? सीतेनं कायम अग्निपरीक्षाच द्यायची आणि यांनी राजप्रासादात ‘गीतरामायण’ ऐकायचं?
एखाद्या सत्ताधाऱ्यानं किती मस्तीत, माजात, घमेंडखोरीत मिरवावं? मग तो संपूर्ण पक्ष असो की त्याचं नेतृत्व. कोवळ्या मुली, वयात आलेल्या मुली, स्त्रिया यांच्यावर सरेआम बलात्कार होतात. संरक्षक पोलिसांच्या साक्षीनं लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणारे लिंगपिसाट होतात. करुण किंकाळ्यांनी आसमंत हादरतो, देशवासी दिग्मूढ होतात. मती गुंग, सुन्न होते. पण यांच्या जाहिराती अधिक रंगीत होतात. यांचे लोकार्पण सोहळे थांबत नाहीत. प्रसंगानुरूप कुर्ते आणि जाकिटे रंग बदलत राहतात. रक्ताचा सडा पडतो, देहाची विटंबना होते, निरपराध झुरळापेक्षा क्षुल्लक पद्धतीनं मारले जातात. यावर कळस म्हणजे अपराधी, अपराधगंडानं अथवा कायद्याच्या शासनाच्या भीतीनं गपगर होऊन फरार होत नाहीत की तोंड लपवत नाहीत. उलट राष्ट्रध्वज हातात घेऊन झुंडीनं हिंडत कायदा, न्याय, शासन सर्वांनाच आव्हान देतात. कारण, आम्ही हिंदू आहोत आणि देशात आता आमचंच सरकार आहे. सरकारचं मौन या आक्रमकतेला मूक प्रतिसादच देतं.
आणि इथं या सरकारची निर्मिक संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठळकपणे अधोरेखित करावी लागते. संघाला हे राष्ट्र हिंदू करायचंय. कारण इथं बहुसंख्य हिंदू आहेत, हा दावा विवादास्पद. कारण येथील बौद्ध, शीख, जैन… विविध पंथ, जातीजमाती, आदिवासी स्वत:ला हिंदू मानत नाहीत आणि इतिहास, वंशशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी दाखल्यांतून ते तसं आहेही. पण संघासाठी मुस्लीम व ख्रिश्चन वगळता इतर सारे हिंदूच! (आता तर लिंगायतही स्वत:ला हिंदू मानायला तयार नाहीत!) संघाला हिंदूंचं संघटन यापेक्षा मुस्लीम-ख्रिश्चनांचं निर्दालन या विकृत ध्येयानं पछाडलंय. आणि त्यासाठी कठुआसारख्या घटना घडतील अशी रणभूमी तयार करण्याचं काम शाखाशाखांतून एखाद्या स्लो पॉयझनिंगसारखं केलं जातंय.
संघाला घडवायचं काहीच नसतं. त्यांना बिघडवायचं असतं. छेड काढून गल्लीत पळणाऱ्या भेकड रोडरोमिओसारखं संघाचं वर्तन असतं. त्यासाठी विविध प्रकारच्या संघटना, मंच, दलं यांच्या स्थापनेला उत्तेजन द्यायचं, बौद्धिकं पुरवायची, प्रसंगी संमोहनाचे प्रयोग करायचे. आणि आपलं ईप्सित साध्य झालं की हात झटकून मोकळं व्हायचं. कल्याणसिंह काय किंवा प्रवीण तोगडिया काय, ही त्याची प्रातिनिधिक उदाहरणं. संघाच्या सात्त्विक मुखवट्याआडचा भेसूर चेहरा म्हणजे कठुआ-उन्नाव गोरक्षकांची उद्दामगिरी आणि साधु-साध्वींची आगलावू वक्तव्यं.
‘बलात्कार ‘भारता’त नाही, ‘इंडिया’त होतात’ म्हणणारे मोहन भागवत संघाचे सरसंघचालक. आता भागवतांनी सांगावं, कठुआ व उन्नाव भारतात येतात की इंडियात? की तुमच्या मनात असलेल्या नथुरामाच्या अखंड भारताच्या नकाशात? हिंदू बायकांनी अधिक मुलं जन्माला घालावीत म्हणणाऱ्या हिंदू पुरुषांनी आपलं पौरुष्य मुस्लीम महिलांवर बलात्कार करून सिद्ध करायचं का? आणि त्यासाठी देवळाचा वापर केला तरी ते धर्मकार्य? राष्ट्रकार्य? पण आता भागवतही बोलणार नाहीत. बोलले तरी पाचवीच्या वर्गात फळ्यावर सुविचार शोभेल असं- कायद्यासमोर सर्व समान किंवा गुन्हेगाराला जात\धर्म नसतो वगैरे. पण भागवत इथं गुन्हेगार आपला धर्म उघड माथ्यानं मिरवताहेत आणि तोच तुमचाही धर्म आहे. मग आता तुमची भूमिका काय? का आता विजारीत हात घालून शांतपणे सांगणार- संघ राजकारणात नाही. संघ, भाजप दोन वेगळे ध्रुव आहेत!ए
आता ही दोन्ही प्रकरणं माध्यमचर्चेतून गायब करण्यासाठी आश्रित माध्यमांना हाताशी धरलं जाईल. हिंदू मुलीवरल्या बलात्काराच्या घटना वेचून काढल्या जातील, जम्मूतील हिंदू पंडितांच्या करुण कहाण्या मुखपृष्ठ बदलून पुन्हा पेरल्या जातील. भडखाऊ मुस्लिम संघटना अतिरेकी विधानं करतील, अशा पद्धतीनं ट्रोल केल्या जातील. तोवर राम मंदिराची सुनावणी जवळ येईल, आठ मेला सलमान काळवीटासह पुन्हा आहेच! त्यात कर्नाटकच्या निवडणुकांमुळे माध्यमांनाही पॅकेजेस पाहावी लागतील. फास्ट ट्रॅकच्या बातम्या येतील. आमदाराला निलंबित केलं जाईल, कदाचित पक्ष सदस्यत्व रद्द केलं जाईल आणि आमदारसाहेबांवरचा अन्याय निवारण्यासाठी कदाचित वकिलांची फौजच तयार होईल.
या सर्व घटनांतील पुरुषी मानसिकता हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. मग तो पुरुष आमदार असो, मंत्री, अधिकारी, प्रधानसेवक असो की सरसंघचालक. स्त्रियांचं स्वावलंबन आणि स्वयंनिर्णयन कायमच खूपत असतं सर्वांनाच. त्यामुळेच स्त्री आरक्षण विधेयक संसदेत धूळ खात पडतं. हरेक बलात्कारासोबत नवा कायदा, नवे नियम, नव्या समित्या. पण पुरुषांची शिकवणी नाही. तीन मुलांच्या आईवर कोण बलात्कार करेल, हे भाजप नेत्याचं दिव्यज्ञान. हे असे मर्द ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाकडून आपण अपेक्षा तरी काय करायची?
या आणि अशा गुन्हेगारीतील गुन्हेगारांना त्यांचे त्यांचे पक्ष, नेते, धर्म, जाती वाचवतील. यातून स्त्रियांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. रामराज्यांनी भारलेल्या सध्याच्या काळात राम, रावण, धोबी, सगळेच एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अग्निपरीक्षा, लवकुश व आजन्म वनवास!
तेव्हा प्रतीकं आणि मिथकं यातून बाहेर पडत थोडं उच्चरवानं सांगायला हवं की, बांगड्यांचा अहेर तथाकथित मर्दांना पाठवू नका. आम्हाला बांगड्यांचं ओझं नाही की, ते तेवढंच आमचं स्त्रीधन नाही. आता सती पेटणार नाहीत, तशी बांगडीही फुटणार नाही की, कुंकू पुसलं जाणार नाही. आता सौभाग्यलेणी, स्त्रीधन अडगळीत ठेवतोय आम्ही. स्वसन्मान, आत्मनिर्भर आणि जीवशास्त्रापलीकडला स्वलिंगभाव हे आमचं नवं निशाण आहे. आठ वर्षाच्या चिमुरडीवर मर्दानगी दाखवणाऱ्या नामर्दांसाठी बांगड्यांचा आहेर पाठवून त्यांचा, पर्यायानं आमचा अपमान करू नका.
.............................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
vishal pawar
Fri , 27 April 2018
समाजाला वास्तवाची जाणीव करून देऊन,काय योग्य काय अयोग्य याची माहिती देणारा लेख.
Chandrakant Kamble
Wed , 18 April 2018
आदरणीय सर, नमस्कार, तुम्हाला अगदी खरे सांगतो. मी गेली वर्षभर असा लेख वाचला नाही....वाचनात आलाच नाही. खऱ्या अर्थाने पत्रकार जिवंत आहेत अजून ही याची पुष्टी आपल्या लेखाने दिली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्याला जसे पाहिजे तसे लोक घेत आहेत. मात्र पत्रकार, साहित्यिक, विचारवंत, लेखक, संशोधक यांचे प्रमुक कर्तव्य आहे ते म्हणजे समाजाला दिशा देण्याचे, शिक्षित करण्याचे, मार्गदर्शन करण्याचे, अध्या असे होताना दिसत नाही. झाले तरी हिंदुत्ववादी दहशतवादी त्यांच्या मुसक्या आवळत आहेत.हे लोकशाही आणि समाज स्वास्थ्यासाठी पोषक अजिबात नाहीए. तुम्ही जळजळीत अस स्पोटक लिहल म्हणून मला आवडलं असे नाही, याहून स्पोटक मी लोक वाचले आणि एकले मात्र तो काळ वेगळा आणि हा काळ वेगळा. तुमचे विचार कलिक आहेत. देशाचे नेतृत्व नेहमी दंड ठोकणार आज शेपूट घालून पाय मोडीतंय. ही दाहकता चार वर्षाची आहे. अखंड भारताचे दिवस खूप सुजलाम सुफलाम असतील. असो......धाडसाचे कोतूक. लिहित राहा. तुम्ही जिवंत वाटलात. जय भिम जय भारत चंद्रकांत कांबळे संशोधक विद्यार्थी PH.D नांदेड विद्यापीठ
Anand Pawar
Wed , 18 April 2018
आदरणीय महोदय, आपला सदरी लेख सद्य परिस्थितीवर अगदी योग्य भाष्य करणारा आहे. आपले हे विचार स्वातंत्र्य लवकरच संकुचित होणार आहे याची आपल्याला जाणीव असेलच. तरी आपले या लेखा बद्दल अभिनंदन . ..... आनंद पवार.
Prashant
Tue , 17 April 2018
Respected Sir, After reading this article I am speechless. You are presented real, harsh, true condition of this country. Times now to we all analysis our system & make positive changes. Thanks Aksharnama.
vikrant vare
Tue , 17 April 2018
जळजळीत