“नगरचा ‘नरक’ झाला आहे”, याला पुष्टी देणाऱ्या घटना काही कमी नाहीत!
सदर - फोकस-अनफोकस
किशोर रक्ताटे
  • नगरविषयीच्या काही बातम्या
  • Tue , 17 April 2018
  • सदर फोकस-अनफोकस Focus-UnFocus किशाेर रक्ताटे Kishor Raktate नगर Nagar अहमदनगर Ahmednagar

अलीकडील काही वर्षांपासून विविध घटनांनी धगधगत असलेला नगर जिल्हा केडगावमध्ये झालेल्या शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या खुनानं पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कोपर्डी, खर्डा, जवखेडे अशा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनांनी नगर जिल्ह्यावर आधीच एक काळा डाग पडला आहे. त्यानंतर या खून प्रकरणानं आपली क्रूरकर्माची पताका पुन्हा उंचावली अन् नगरचा ‘नरक’ बनल्याच्या चर्चेनं जोर धरला.

ते सत्य आहे का? नगरमध्ये वारंवार घडणाऱ्या या घटनांचा अर्थ कसा लावायचा? नगरला नेमकं झालंय तरी काय? काही मोजकी माणसं अख्ख्या नगरला बदनाम करत आहेत, असंही अनेकांना वाटतं आहे. ते खरं आहे का? ज्या नगर जिल्ह्यानं देशाला शेतीच्या विकासाचा सहकार पॅटर्न दिला, तोच नगर जिल्हा क्रूरकर्माचे पॅटर्न जन्माला घालण्यात अग्रेसर कसा झाला? नगरची दिशा का आणि कशी भरकटली? वारंवार अशा वाईट घटना घडत असताना त्याचं सखोल विश्लेषण का होत नाही? नगरमध्ये ‘नागरी समाज’ नावाचा समाज अस्तित्वात आहे की नाही? आहे तर कुठे आहे? आणि नाही तर का नाही? एखादी घटना घडून गेल्यानंतर त्याचं आपापल्या परीनं विश्लेषण होतं, पण बदललेल्या परिस्थितीचा सामना कसा करायचा, यावर का बोललं जात नाही? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत अन् त्याची उत्तरं केवळ एका व्यक्तीला नव्हे, तर ‘नागरी समाजा’ला शोधावी लागणार आहेत.

अहमदनगर महापालिकेत अलीकडेच समाविष्ट झालेल्या केडगावमध्ये महापालिका पोटनिवडणुकीच्या वादाचं पर्यवसान संजय कोतकर व वसंत ठुबे या दोन शिवसैनिकांच्या खुनात झालं. विशेष म्हणजे, हे खून रात्रीच्या वेळी कुठे एकांतवासात घडले नाही, तर दिवसाढवळ्या अनेकांच्या नजरेसमोर हा प्रकार घडला. या खुनामागील राजकीय कारणं काहीही असोत, त्याची सखोलपणे चर्चा करण्यापेक्षा इतकी क्रूरता आली कुठून, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्यांनी प्रत्यक्ष हा खून होताना पाहिला, ज्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहिले किंवा ज्यांना या घटनेची कानोकानी माहिती मिळाली, ते सर्वजण भीतीच्या छायेत वावरताना दिसत आहेत.

या घटनेचं जागृत नागरिक म्हणून कुणालाच काहीही न वाटावं? इतकी भीतीची मानसिकता का निर्माण झाली? आणि ती का व कुणी तयार केली? या घटनेत बळी पडलेले दोघेही शिवसैनिक असल्यानं शिवसेना पक्षानं स्वाभाविकपणे आवाज उठवला. आता त्याला राजकीय स्वरूप आलं आहे. कारण, ही व्यक्तीची नव्हे, तर राजकीय हत्याच आहे. आणि या राजकीय हत्येच्या गुंतागुंतीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस असे सर्वच पक्ष अडकले. ज्यांच्यावर खुनाचा आरोप झाला, त्या कोतकर – जगताप – कर्डिले कुटुंबांचं नातंगोतं असल्यानं या चर्चेला वेगवेगळी वळणं मिळत गेली.

हा खून कोणी केला, यापेक्षा कट कोणी रचला हाच महत्त्वाचा विषय ठरतो. पण, कट कोणी रचला, हे मात्र अनेकदा पुढे येत नसल्यानं खरा सूत्रधार मोकाट राहतो. अशा या मोकाट राहण्यातूनच नवनव्या पद्धतीनं खून होत राहतात. पुन्हा नवा भिडू आणि पुन्हा नवीन गुन्हा हे गुन्हेगारीचं सत्र असंच सुरू राहतं. त्यामुळे नगर असो किंवा शहरी पट्ट्यातील कोणतंही खून – मारामारीचं प्रकरण असो, त्यातून सूत्रधार पुढे येत नाहीत. खून करणारे मात्र काही तासांत हजर होतात. हे सारे फार सहजतेनं घडत आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

त्यामागील मुख्य कारण म्हणजे, समाजातील अज्ञान – गरिबी आणि मागासलेपण. कारण, आजकाल जगणं महाग होत चाललं आहे आणि मरण सोपं. ज्यांना जगणं महाग झालं आहे, ते कोणतंच काम करायला मागेपुढे पाहात नाहीत. त्यांना कायदा – समाज याच्याशी काहीही देणंघेणं नसतं. त्याला खून करण्यामागील मूळ कारणाशी आणि तो गुन्हा करायला लावणाऱ्याशीही काहीही देणंघेणं नसतं. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं, तर हॉटेलमध्ये रोजंदारीचं काम करणाऱ्याच्या मनात मालक होण्याची इच्छा बळावली, तरीही तो खून करण्याइतपत पाऊल उचलतो. अशा पद्धतीनं खून, मारामाऱ्या करण्यात पारंगत असलेल्यांची एक प्रकारची साखळीच तयार होते. नकळत किंवा क्षुल्लक कारणांमुळे गुन्हेगार झालेली व्यक्ती मग अट्टल गुन्हेगार म्हणून वावरताना दिसते.

त्याच्या मुळाशी जगणं हेच मूळ कारण शोधावं लागेल. त्याच्या क्रूरकर्माचं समर्थन करता येत नाही. पण, समाजातील अनेक व्यक्ती नेमक्या का आणि कशा पद्धतीनं भरकटतात हे समजून घेण्याची तयारी आपल्याला दाखवावी लागेल.

या दोन खुनाच्या निमित्तानं नगरचा गुन्हेगारी गुंता समजून घेताना एकूणच शहराच्या भोवतालचा तथाकथित विकास बाजूला सारता येत नाही. ज्या सहजतेनं हे खून झाले, त्या सहजतेनं गेल्या दोन दशकांत नव्यानं विचित्र पद्धतीनं विस्तारणाऱ्या अनेक शहरांत असे खून होत आहेत. अशा प्रकराच्या खुनांच्या मुळाशी त्या त्या भागात वाढलेले जमिनीचे भाव हेच कारण अनेकदा पुढे आलेलं आहे. त्यामुळे शहराच्या भोवतालात होणारे खून अन त्यांची कारणमीमांसा जुनीच आहे. नगर शहरात अलीकडच्या काळात कोणताही मोठा उद्योगधंदा आलेला नाही. नगरची एमआयडीसी पूर्वी जितकी भरात होती, तितकी आता राहिलेली नाही. व्यवसायाला आवश्यक असणारं पोषक वातावरण तिथं नाही. त्यातच दुर्दैवानं एमआयडीसीचा विस्तार व्हावा, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असं वाटणारं नेतृत्व नगरमध्ये नाही.

नगरच्या प्रस्थापित राजकीय नेतृत्वानं त्यांच्या कर्मभूमीत विकासाचं नंदनवन स्वाभाविकपणे फुलवलं आहे. खरं तर विखेंचं लोणी प्रवरा काय किंवा थोरातांचं संगमनेर काय किंवा अगदी गडाखांची सोनई, ही विकासाची स्थानिक बेटं झाली. त्याचा परिणाम आपापल्या भागापुरते मर्यादित होण्यात झाला आणि जिल्हा म्हणून नगर शहराकडे दुर्लक्ष झालं. त्यातच नगर शहराला आजवर जे नेतृत्व लाभलं, ते जिल्ह्याच्या राजकारणात आपलं वर्चस्व प्रस्थापित करू शकलेलं नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, नगर शहरात ग्रामीण भागाला आकर्षण वाटेल असं काहीही घडलं नाही. ज्या दर्जाची मेडिकल व इंजिनीअरिंग कॉलेज संगमनेर, लोणी या भागात आहेत, तशी तर सोडाच, पण त्याच्या जवळ जाणारंही काही नाही.

ज्या शहरात जिल्ह्यातील लोकांना आकर्षण वाटेल असं काहीही नसेल, तर तिथं काय घडू शकतं? त्याचंच प्रतिबिंब जिल्ह्यातील नागरिकांच्या मानसिकतेत उमटत आहे. नगर जिल्ह्यातील लोक शेजारील जिल्हा असलेल्या पुणे शहरात किंवा शहराबाहेर घर घेण्यासाठी आयुष्य पणाला लावतात. पण, नगरला दोन खोल्यांचं घर घ्यायला तयार नसतात. असं होण्याचं कारण म्हणजे शहरात शिक्षणाचा विस्तार नाही. आपल्या मुलांचं भविष्य पुण्यासारख्या शहरांत जाऊनच घडेल, त्यासाठी मुलाबाळांची सोय पुण्यातच करायच्या मानसिकतेनं जोर धरला आहे.

नाही म्हटलं तरी नगर शहरात तीन मोठी महाविद्यालयं आहेत. त्यातलं एक म्हणजे नगर कॉलेज, ज्यांना नगर जिल्ह्याचं काहीही देणंघेणं नाही. आपलं ख्रिश्चन मिशनरीचं काम अन् नियमित अभ्यासक्रमांच्या पलीकडे झेप नाही. दुसरं, जिल्हा मराठा संस्थेचं महाविद्यालय. या संस्थेकडे राजकारणातील प्रस्थापित आधार नसल्यानं त्याच्या विस्ताराला मर्यादा आहेत. तिसरं, सारडा महाविद्यालय, तेही खासदार दिलीप गांधींकडे आल्यापासून त्यांनी परिवर्तन जवळपास टाळण्याचा जणू काही ठरावच केला आहे, असं दिसतं. जिथं शिक्षणाचा व्यापक दृष्टिकोन नाही, दीर्घकालीन ध्येय नाही, रोजगार नाही, अशा पार्श्वभूमीवर गुंड प्रवृत्तीच्या राजकीय नेत्यांना पाहिजे त्या पद्धतीनं वापरायला बेरोजगारांची एक फळीच भेटते. मग, खून होत राहतात. मारामाऱ्या होत राहतात. खून करणारे तुरुंगात जातात. कट रचणारे नव्या कटाला मोकळे होतात.

नगर जिल्ह्यात जे घडतं आहे, ते समजून घेताना हेही लक्षात घेतलं पाहिजे की, या शहराची आमदारकी २५ वर्षं शिवसेनेकडे आहे. शिवसेनेनं तिथं ज्या पद्धतीनं कारभार केला आहे, तो काही आदर्शवत नव्हता. त्यामुळे आताच्या खून प्रकरणाकडे कोणत्याही एकाच पक्षाच्या नजरेतून पाहणं संयुक्तिक नाही. तिथं पक्ष म्हणून काहीही अस्तित्वात नाही. नातीगोती अन् जमिनीचं राजकारण एवढाच काय तो मुद्दा आहे. त्यामुळे, गेल्या वर्षभरातील नगरमधील वाईट घटना पाहिल्यास, हे नगरमध्येच का? असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो, तेव्हा त्याचं उत्तर आजपर्यंतच्या प्रवासातच सापडतं. ते म्हणजे, या जिल्ह्यात ‘विकास’ नावाची गोष्ट आली, पण त्यासोबत ‘विचार’ नावाची गोष्ट आलीच नाही. पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे खासकरून सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात नगरच्या तुलनेत कैक पटीनं विकास झाला. पण, त्या भागात किमान जो विचार सामाजिक चळवळीनं पेरला, तो विचार नगर जिल्ह्यात संगमनेर, लोणी – प्रवरा वगळता इतरत्र रुजला नाही. म्हणजे राज्यातील चार विचारवंत संगमनेर – लोणीला किमान येतात जातात. आताच्या खुनाचा आरोप असलेल्यांचा अन् विचारवंतांचा काडीमात्र संबंध नसणं, हेदेखील अशा खुनाच्या व्यापक कारणांतील एक भाग आहे.

ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ज्या जिल्ह्यात लिहिली, तो जिल्हा नगरच आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी नगरमधील भुईकोट किल्ल्यातील बंदिवासात ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ लिहिला. परंतु, हा इतिहास केवळ इतिहास म्हणून सांगण्यापुरताच आहे, हे येथील वास्तव आहे. नगरला विचारांची परंपरा नाही, असं नाही. पण, नगरला व्यापक स्तरावर विचार परंपरा पुढे नेणारं राजकीय नेतृत्व नाही. त्याचबरोबर, जिल्ह्याला मान्य असलेलं व्यापक नेतृत्व नाही. आपण, जिल्ह्याला मान्य व्हावं, या दृष्टीनंही नेते प्रयत्न करत नाहीत. आपापले मतदारसंघ हेच त्यांचं ‘संस्थान’ बनलं असून, जिल्हा म्हणून विचार होताना दिसत नाही.

या सर्व पार्श्वभूमीवर ‘नगरी’ नव्हे, तर ‘नागरी समाज’ म्हणून भूमिका बजावण्याची गरज आहे. त्यासाठी केवळ एखादी घटना घडल्यानंतर मन सुन्न होण्याची नव्हे, तर प्रत्येकाचं मन जागृत असण्याची गरज आहे. तरच, एकेकाळी देशाला आदर्श सहकाराची दिशा दाखवणारा नगर जिल्ह्याची तीच ओळख राहील. अन्यथा, नगरचा ‘नरक’ झाला आहे, या वाक्याला पुष्टी देणाऱ्या घटना काही कमी नाहीत!

.............................................................................................................................................

लेखक किशोर रक्ताटे ‘स्ट्रॅटेजी कन्सल्टन्ट’ या संस्थेचे संचालक आहेत.

kdraktate@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

vishal pawar

Fri , 27 April 2018

वास्तव.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......