अजूनकाही
आपण मराठी माणसं अमावास्येला शुभ मानत नाही. अनेक जण घराचं प्रवेशद्वार दक्षिणेला करत नाहीत. पाश्चिमात्य देशात १३ हा आकडा शुभ मानत नाहीत. १३ तारीख जर शुक्रवारी येत असेल तर अगदीच वाईट समजतात. त्या दिवशी प्रस्थान ठेवायलाही टाळतात. १४ तारखेचं तिकीट मिळत असून आम्ही शुक्रवारी, १३ एप्रिललाच मुंबई- बीजिंग- सॅन फ्रान्सिस्को प्रवासास निघालो. तेही आपले शत्रू, चीनच्या विमानानं.
विमानात ‘चायना डेली’ हे वर्तमानपत्र वाचायला मिळालं. आपण चीनला आपले स्पर्धक समजतो. सगळ्या गोष्टीत त्यांच्याशी तुलना करतो. भारतातल्या वर्तमानपत्रात चीनबद्दल उल्लेख नाही असा दिवस फारसा वाचनात येत नाही. पाकिस्तानातल्या वृत्तपत्रात भारतातल्या बातम्या खूपच असतात. तशाच भारताबद्दलही, बहुतेक वाईट बातम्या, सरकारी नियंत्रणाखालच्या चिनी वर्तमानपत्रात वाचायला मिळणार अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात भारताबद्दल कुठलाच उल्लेख आढळला नाही. पाकिस्तानात काराकोरम ते ग्वादर बहुचर्चित ‘आर्थिक हमरस्ता’ चीन बांधतोय, हे आपण अनेकदा वाचतो. त्याबद्दलही काही ‘चायना डेली’त नव्हतं. फक्त श्रीलंकेतल्या चिनी प्रकल्पाची एक लहानशी बातमी सोडली तर संपूर्ण दक्षिण आशियाबद्दल फारसं काहीच छापलेलं नव्हतं.
दक्षिण आशियाला चीन फारसा महत्त्व देत नाही. चीन आता स्वतःची तुलना युरोप-अमेरिकेशी करतो असं ऐकलं होतंच, ते जाणवलं. पहिल्या पानावर पंतप्रधान शी जिनपिंग चिनी आरमाराची परेड निरीक्षण करत आहेत असं छायाचित्र होतं. परेडमध्ये विमानवाहू नौका आणि अणुशक्तीवर चालणारी, अण्वस्त्रधारी पाणबुडीचा समावेश होता. भारताचं आरमार जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया वगैरे देशांबरोबर कवायती करतं, तसं चिनी आरमार करत नाही. कारण त्यांचे कोणाशीच मैत्रीचे संबंध नाहीत.
करमणूक-सिनेमाच्या पानावर थोडक्यात नजर फिरवत होतो, तेव्हा स्टीवन स्पीलबर्गच्या ‘रेडी प्लेयर वन’ या सिनेमानं चीनमध्ये बॉक्स ऑफिसचा सगळ्यात मोठा गल्ला मिळवला, अशी बातमी होती. पुढच्या वाक्यात बॉलिवुडच्या ‘हिंदी मिडियम’ या सिनेमानं दुसरा नंबर पटकावल्याचा उल्लेख होता. सिनेमा काय होता हे फक्त एका लहानशा वाक्यात आटोपलं होतं. तेव्हढ्या दोनच ओळी भारताबद्दल सापडल्या. एका भारतीय सिनेमानं अजस्त्र लोकसंख्येच्या चीनमध्ये दुसऱ्या क्रमांकानं यशस्वी व्हावं, ही बातमी दोनच ओळीची असली तरी सामान्य नव्हती. चिनी सरकार आणि लष्कर भारताच्या सीमेवर काहीही करो, पण भारतीय सिनेमा इतर अनेक देशांप्रमाणे चिनी लोकांतही लोकप्रिय आहे. सामान्य चिनी जनतेला भारतीय जीवन पद्धती पाश्चिमात्य जीवन पद्धतीपेक्षा अधिक जवळची वाटते, हे त्याचं एक कारण असू शकेल. त्यांचा कुंग फू बाहेर कोणी पाहत नाही.
.............................................................................................................................................
‘सेपिअन्स - मानवजातीचा अनोखा इतिहास’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406
.............................................................................................................................................
विमानात वाचण्यासाठी मासिकं होती. तीही चाळली. बहुतेक लेख चीनबद्दलच. फक्त एक लेख युरोपवर होता. चिनी कला, संस्कृतीवर सुंदर छपाईची छायाचित्रं होती. सगळं लेखन चिनी भाषेत. पण एक लेख इंग्रजीतही होता. त्यात दुकानात नेहमी दिसणाऱ्या ढेरपोट्या ‘लाफिंग बुद्धा’ची माहिती होती. तो महायान पंथाचा एक भिक्षु होता. काही जण त्याला मैत्रेय अवतार समजतात (त्याला चुकीनं ‘बुद्ध’ म्हणतात). बौद्ध धर्म भारतातून चीनमध्ये गेला असं एक वाक्य होतं. चीननं भारताकडे कितीही दुर्लक्ष केलं तरी भारताचं हे सांस्कृतिक श्रेष्ठत्व चीनला मान्य करणं भाग पडतं.
विमानात मुला-नातवंडांना अमेरिकेला भेटायला जाणारे पुष्कळ भारतीय आजोबा-आजी होते. एक निवृत्त झालेलं मराठी जोडपं बीजिंगला उतरून खुष्कीच्या मार्गानं मंगोलियाला जाणारं भेटलं. चंगीज खानाचा देश पाहून ते पुढे रशियात ट्रान्स-सैबिरियन रेल्वेनं मॉस्कोमध्ये प्रवास करणार होते. हे सर्व पर्यटन कोणा ट्रॅव्हल कंपनीतून न करता त्यांनीच अभ्यास करून, माहिती काढून आखलं होतं. त्याचं विशेष वाटलं. त्यांना आधुनिक ‘मार्को पोलो’च म्हटलं पाहिजे.
बीजिंगला विमान उतरताना आकाश नभाच्छादित आणि किंचित पाऊस होता. खूप काळोखीही होती, ती बीजिंगच्या कुप्रसिद्ध प्रदूषणमुळेही असावी. विस्तीर्ण विमानतळावर चीनशिवाय इतर देशांची विमानं होती, पण एकही भारतीय विमान दिसलं नाही. बिझिनेस लाऊंज मोठं असूनही भरलेलं होतं. बहुतेक गोरे म्हणजे युरोपीयन-अमेरिकन होते. उद्योगधंद्यांनिमित्त आलेले असणार. चीनची अर्थव्यवस्था भारताच्या अर्थव्यवस्थेच्या चौपट आहे. त्याची ती एक खूण होती.
आमच्या फ्लाईट शेजारी व्हॅन्कुव्हरला (कॅनडात) जाणाऱ्या फ्लाईटची मोठी रांग होती. रांगेत खूप भारतीय होते. त्यात प्रामुख्यानं शीख कुटुंबं दिसली. त्याच व्हॅन्कुव्हरमध्ये १९१४ साली ‘कोमागाता मारू’ जहाजावरून आलेल्या साडेतीनशे शीख स्त्री-पुरुषांना कॅनेडियन सरकारनं जमिनीवर उतरण्यास बंदी घातली होती, ही गोष्ट आता खरीही वाटत नाही. जहाज कलकत्त्याला परतल्यावर दंगल झाली. पोलीस गोळीबारात अनेक जण मेले. काहींना शिक्षा होऊन अंदमानला धाडलं. १९५२ साली बजबजला त्याचं स्मारक नेहरूंनी उभारलं. नुकतेच कॅनडाचे पंतप्रधान भारतभेटीला आले असताना शिखांसंबंधीची घटना मात्र कटू ठरली.
प्रवासात चिनी सेवकवर्ग हसतमुख आणि तत्पर होता. विमानं वेळेवर निघाली, वेळेवर उतरली, अशुभ मानल्या गेलेल्या दिवशी निघूनही सर्व यात्री सुखरूप पोचले. युरोपियन लोकांच्या अंधश्रद्धांची भर आपल्या अंधश्रद्धांच्या भल्यामोठ्या यादीत घालायला नको.
……………………………………………………………………………………………
लेखक कॅ. मिलिंद परांजपे निवृत्त नौदल अधिकारी आहेत.
captparanjpe@gmail.com
……………………………………………………………………………………………
Copyright Aksharnama, 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment