आस्तिक विरुद्ध नास्तिक संघर्षाचा तोकडा ‘मंत्र’ 
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • ‘मंत्र’ची पोस्टर्स
  • Mon , 16 April 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie मंत्र Mantr मनोज जोशी Manoj Joshi दीप्ती देवी Deepti Devi सौरभ गोगटे Saurabh Gogate

परमेश्वरानं/निसर्गानं माणसाची निर्मिती केली. पण मानवी मन खूपच चंचल असल्यामुळे त्याला आवर घालण्यासाठी माणसानं पुन्हा देवाची निर्मिती केली. देव आला की धर्म आला आणि धर्म आला की चालीरीती, रूढी, परंपरा आल्या. त्या पाळण्यासाठी मग कर्मकांड आलं. माणूस नंतर या कर्मकांडातच अडकून पडला. ही कर्मकांडं कशासाठी करायची याचं नेमकं उत्तर त्याच्याकडे नसतं आणि ते शोधण्याच्या तो कधी प्रयत्नही करत नाही. तो स्वतःच्या धर्मात आणि त्याचं पालन करण्यासाठी कर्मकांडात अडकून पडतो.

खरं तर कर्मकांडासाठी म्हणून असलेल्या मंत्रांमध्ये खूप सामर्थ्य असतं. मात्र या मंत्रांचा हल्ली फारसा कोणी गांभीर्यानं विचार करताना दिसत नाही. त्यामुळे या कर्मकांडाचं नेमकं फलित काय? यावर भाष्य करण्याचा प्रयत्न ‘मंत्र’ या नवीन मराठी चित्रपटात करण्यात आला आहे. लेखक-दिग्दर्शक हर्षवर्धन यांनी खरं तर अतिशय प्रामाणिकपणे हा चिकित्सक विषय पडद्यावर मांडला आहे. मात्र त्याची मांडणी हवी तितकी प्रभावी झालेली नाही. त्यामुळे प्रयत्न चांगला असला तरी यानिमित्तानं चित्रपटात दाखवण्यात आलेला आस्तिक विरुद्ध नास्तिक संघर्षाचा ‘मंत्र’ तोकडा ठरला आहे, हे शेवटी जाणवतं. 

हल्ली सर्वत्र धार्मिक श्रद्धेचा कोणत्याही कारणानिमित्त अक्षरशः ‘बाजार’ मांडला जातो. ‘ओएमजी’ (ओ माय गॉड) किंव्हा ‘पिके’ या हिंदी चित्रपटात हा विषय चांगल्या पद्धतीनं हाताळला आहे. ‘मंत्र’मध्येदेखील हाच विषय अधिक खोलात जाऊन मांडण्यात आला आहे. त्यादृष्टीनं पाहता या चित्रपटाची कथा कोणत्याही मंत्राइतकीच प्रभावी आणि वेधक ठरली आहे. 

कर्मकांडासाठी प्रसिद्ध असणाऱ्या एका पौराहित्य कुटुंबाची ही कहाणी आहे. पुण्यात राहणारे श्रीधरपंत यांचा पौराहित्य (भिक्षुकी) करण्याचा परंपरागत व्यवसाय आहे. त्यांना दोन तरुण मुलं, एक काशिनाथ आणि दुसरा निरंजन, असतात. त्यापैकी काशिनाथ हा याच व्यवसायात पारंगत झाला आहे. मात्र पदवीधर झालेल्या निरंजनला या व्यवसायात फारसा रस नाही. तो सीए करून चांगली नोकरी करण्याच्या विचारात आहे. अर्थात पैसे मिळवण्यासाठी तोही भिक्षुकीच्या कामात वडील आणि भावाला छोटी-मोठी मदत करत असतो. काशिनाथचं लग्नाचं वय झालं आहे. मात्र तो पौराहित्य करत असल्यामुळे त्याला फारशा मुली सांगून येत नाहीत. त्याचं लग्न न जमणं ही घरातील एक प्रमुख समस्या झालेली असते.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

दरम्यानच्या काळात जर्मनीत एका मंदिरासाठी एका पुरोहिताची गरज असल्याची ऑफर श्रीधरपंतांकडे चालून येते. त्यांना त्यासाठी काशिनाथला पाठवण्याची इच्छा असते, मात्र काशिनाथचं इंग्रजी जेमतेम असल्यानं, शिवाय त्याला स्वतःलाच आत्मविश्वास नसल्यानं ते निरंजनला जर्मनीला जाण्यासाठी विचारतात. परदेशी जाण्याची संघी आणि त्याबरोबरीनं चांगला पैसाही मिळेल, या दोन्ही हेतूनं निरंजन जर्मनीला जाण्याचं ठरवतो. त्यासाठी तो जर्मन भाषेचा क्लासही लावतो.

एकीकडे जर्मन भाषेचा क्लास आणि दुसरीकडे सीएचा अभ्यास करत वडील/भावास भिक्षुकीसाठी मदत, असं त्याचं चालू असताना क्लासमध्ये त्याची अंतराशी ओळख होते. आधुनिक विचारसरणीची अंतरा कट्टर नास्तिक असते. तिच्या बहिणीला झालेल्या त्रासामुळे तिचा धर्मावरचा आणि कर्मकांडांवरचा विश्वास पूर्णपणे उडालेला असतो. त्यामुळे निरंजनला आपला भिक्षुकीचा व्यवसाय तिच्यापासून लपवून ठेवायचा असतो. मात्र तिच्या घराच्या वास्तुशांतीच्या वेळी निरंजनचं बिंग फुटतं. आणि अंतरा त्याचा धिक्कार करते.

दुसरीकडे त्याचे मित्रही त्याचा वापर धर्माचा बाजार मांडण्यासाठी करतात. त्यामुळे त्याचा संभ्रम निर्माण होतो. आपण हे कर्मकांड कोणासाठी आणि नेमकं कशासाठी करतो, या प्रश्नाच्या गर्तेत तो सापडतो. त्याला त्याचं नेमकं उत्तर कोण आणि कसं देतो, यासाठी ‘मंत्र’ पडद्यावर पाहायला हवा. 
कथासूत्र चांगलं असलं तरी पटकथा आखीव-रेखीव हवी होती, तसंच तिची मांडणीही चांगली झाली असती तर चित्रपट अधिक प्रभावी झाला असता. निरंजनचा राजकारणातील मित्र सन्नी आणि इव्हेन्ट मॅनेजमेंटमधील डेव्हिड या दोन मित्रांच्या व्यक्तिरेखा आणखी विकसित करण्याची गरज होती. तसंच संभ्रमात पडलेल्या निरंजनला त्याचे वडील श्रीधरपंत ज्या पद्धतीनं समजावून सांगतात, ते निराकरण शेवटी अपुरं पडल्याची जाणीव होते.

निरंजनचं मध्यमवर्गीय कुटुंब (आई-वडील, आजी, काका आणि भाऊ) आणि सद्य परिस्थितीतील कौटुंबिक वातावरण उभं करण्यात दिग्दर्शकाला चांगलं यश मिळालं आहे. त्यामुळे कथेची गोडी वाढत जाते. तसंच सर्वच कलाकारांनी अतिशय उत्तम अभिनय केल्यानं या ‘मंत्रा’चं सामर्थ्य नक्कीच प्रभावी ठरलं आहे. संभ्रमित पडलेल्या निरंजनच्या भूमिकेत सौरभ गोगटेनं कमालीचा अभिनय केला आहे. तसंच मनोज जोशी यांनी श्रीधरपंतांच्या भूमिकेत संयमित अभिनय केला आहे. पुष्कराज चिरपुटकर यानंही फारसं ना बोलता आपला अस्वस्थपणा चांगला अभिनित केला आहे. दीप्ती देवीनं नास्तिक अंतरा चांगली रंगवली आहे. शुभंकर एकबोटे (सन्नी), वृषाली  काटकर (आई), अनुराधा मराठे (आजी) यांच्याही भूमिका दखल घेण्याजोग्या आहेत. अविनाश-विश्वजित यांनी संगीतबद्ध केलेली गाणीही उत्तम झाली आहेत. 


.............................................................................................................................................

लेखक श्रीकांत ना. कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख