काहीतरी सुंदर बघण्याची इच्छा असेल, तर ‘ऑक्टोबर’ नक्कीच पाहा
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
पवन नंदकिशोर गंगावणे
  • ‘ऑक्टोबर’चं पोस्टर
  • Mon , 16 April 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie ऑक्टोबर October शूजित सरकार Shoojit Sircar वरुण धवन Varun Dhawan

आशा आणि निराशा, यांच्यामध्ये आपल्या सोबत जे घडतं ते म्हणजे आयुष्य.

तक्रारखोर, नेहमी नाराज असणारा डॅन हॉटेल मॅनेजमेंट करून आलेला एक ट्रेनी असतो. त्याची फक्त तोंडओळख असलेली बॅचमेट, शिऊलीचा अपघात होतो. आणि डॅनला कळतं की, अपघाताच्या आधी शिऊलीनं ‘डॅन कहा है?’ असं विचारून त्याची चौकशी केली होती. शिऊलीचा त्याच्यावर क्रश होता असा डॅनचा समज होतो. आणि तो त्याच्या इंटर्नशिपला फाट्यावर मारून मिळेल, तेव्हा शिऊलीला बघायला हॉस्पिटलमध्ये चकरा मारायला लागतो. कोमात असलेल्या शिऊलीला रोज भेटणं, ती बरी होईल का? तिनं अपघाताच्या काही क्षणांपूर्वी त्याची चौकशी का केली असावी? या प्रश्नांनी डॅन चक्रावून जातो.

इथं मनुष्याला असलेल्या प्रेमाची भूक दिसून येते. आपल्याला नेहमी वाटत असतं की, कोणाला तरी आपण आवडावं, त्यानं आपला विचार करावा. जेव्हा अनपेक्षितपणे कोणी आपल्याबद्दल आपुलकी दाखवतं, तेव्हा साहजिकच आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल सहानुभाव तयार होतो. तो आपल्याला इतरांपेक्षा जास्त जवळचा वाटायला लागतो. डॅनचंही असंच होतं. तो स्वतःच्या मित्रांपासून, कुटुंबापासून दुरावतो आणि शिऊली व तिच्या कुटुंबियांना जवळचा वाटू लागतो. शिऊलीच्या मनात डॅनबद्दल प्रेम होतं का? नक्कीच नाही. तिनं सहजच तो न दिसल्यानं त्याची चौकशी केली होती, पण तीच डॅनच्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी पुरेशी ठरते.

सुरुवातीला बेशुद्धावस्थेत असलेली शिऊली काही महिन्यांनी थोडीशी सुधारते. डोळ्याच्या हालचालींनी संवाद साधू लागते. डॅन तिच्यासाठी दिवस-रात्र करत असलेले प्रयत्न कदाचित तिच्याही मनात घर करत असतील, कदाचित ती आता खरंच त्याच्या प्रेमात पडली असेल. कारण तो तिच्या आईसाठी आधारस्तंभ बनलेला असतो. चांगल्या मित्रानं पाठ फिरवलेली असताना, काका खर्च टाळण्यासाठी तिचा ऑक्सिजन पुरवठा काढून घेऊन तिला मरू देण्याच्या गोष्टी करत असताना, डॅन मात्र नेहमी तिला वेळ द्या, ती बरी होईल अशा गोष्टी बोलून तिच्या आईला धीर देत असतो. हे ती बेशुद्धावस्थेतच पाहत असते, पण तिला बोलता येत नसल्यानं हे प्रश्न अनुत्तरितचं राहतात.

देवळानंतर हॉस्पिटलच माणसासाठी सर्वांत मोठं आशेचं केंद्र असतं. कारण इथंच चमत्कार घडत असतात. मृत्यूच्या जबड्यातून एखाद्या व्यक्तीला सोडवण्याची कला देवानंतर फक्त डॉक्टरांकडेच असते. जसं एखाद्या अवघड क्षणी देवासमोर माणसांचे हात जोडले जातात आणि चमत्काराची अपेक्षा ठेवली जाते, तेच हॉस्पिटलमध्येही होतं. आणि जसं खऱ्या आयुष्यात कधी आशा निर्माण होते, तर कधी निराशा पदरी पडते. ते हॉस्पिटलच्या चार भिंतीआड होताना ‘ऑक्टोबर’मध्ये दिसतं. इथं डॅन म्हणजे मनुष्य, शिऊली म्हणजे मनुष्याची एखादी अशक्य अपेक्षा, स्वप्न आणि या दोघांनी हॉस्पिटलमध्ये घालवलेले ते दिवस म्हणजे आयुष्य, अशा रूपकाद्वारे दिग्दर्शक शुजित सरकारनं सूक्ष्म स्वरूपात आयुष्याचा प्रवासच टिपलाय, असं म्हणायला हरकत नाही.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

‘डुबते को तिनके का सहारा’ या स्वरूपात शिऊली डॅनच्या जीवनात येते आणि त्याच प्रकारे डॅन शिऊलीच्या आईच्या जीवनात येतो. विधवा असलेल्या शिऊलीच्या आईची मुलं वयानं लहान असतात, तर तिचा दीर अतिशय पाषाणहृदयी स्वार्थी माणूस असतो. या परिस्थितीत ती एकदम एकटी पडलेली असते. तिला कोणाकडे मनही मोकळं करता येत नाही. अशा वेळी शिऊलीचा डॅन नावाचा बॅचमेट हॉस्पिटलमध्ये चकरा घालायला लागतो आणि तिचा आधार बनतो.

आपल्यासोबत अनेकदा अशा अनपेक्षित गोष्टी घडतात, काही अनोळखी माणसं इतकं काही करतात, ते जवळची माणसंसुद्धा करत नाहीत. डॅन तो अनपेक्षित व्यक्ती बनून शिऊलीच्या आईच्या आयुष्यात येतो. सुरुवातीला ‘इसका प्रॉब्लेम क्या है?’ इतपत किचकट वाटणारा डॅन या सहा-आठ महिन्याच्या कालांतरात मॅच्युअर होतो. पगार घेऊनही ग्राहकांना सेवा न पुरवणारा डॅन हळूहळू हॉस्पिटलच्या सगळ्या स्टाफचा ओळखीचा बनतो आणि ‘बिनपगारी, फुल अधिकारी’ असल्यागत शिऊलीची काळजी घेण्याची ड्युटी बजावत राहतो.

शिऊलीही एक शब्दसुद्धा न बोलता बरंच काही बोलून जाते. सुरुवातीला असहाय्य झालेली आई हळूहळू या धक्क्यातून सावरते. कळ्यांना बहर येतो, सुंदर फुलं उमलतात आणि काही काळानं ती कोमेजून जातात. जीवनाचं हे अविरत चालणारं चक्र ‘ऑक्टोबर’ खूप सुंदर पद्धतीनं पडद्यावर साकार करतो.

अभिनेत्रीला कायम सुंदर बनवून दाखवणं, स्ट्रेसबस्टर म्हणून उगाचंच एखादं गाणं घुसडणं, यांसारख्या पारंपरिक धारणांना छेद देत शुजित वैद्यकीय प्रक्रियेच्या खोलाशी जातो. शिऊलीची सर्जरी खूप डिटेल्समध्ये जाऊन दाखवली जाते. तिचं टकलं करणं, तिचं मोडलेलं बोटं, चेहऱ्यावरील जखमा हे सगळं खूप सातत्यानं दाखवण्यात आल्या आहेत. केस हळूहळू वाढतात, तर जखमा कालांतरानं भरतात.

एक दिग्दर्शक त्याच्या सिनेमावर आणि बारकाव्यांवर इतकी मेहनत घेतोय, हे बघून खूप समाधान वाटतं. सिनेमा गंभीरच आहे, पण तरीही प्रासंगिक विनोदानं अधूनमधून वातावरण हलकं राहील याची काळजी घेतली आहे. सिनेमाची गती मंद आहे, पण कथा कुठेही रेंगाळत नाही, ती नाट्यमय न होता वास्तववादी वाटत राहते. पात्रं त्यांच्या मोटिवेशन्स सतत बोलून दाखवत नाहीत, पण त्यांच्या कृत्यातून त्यांच्यात होत गेलेले बदल दिसतात. याचं पूर्ण श्रेय जातं लेखिका जुही चतुर्वेदीला. तिनं सिनेमाची कथा, पटकथा व संवाद लिहिले आहेत. (जुहीनं यापूर्वी ‘पिकू’, ‘विकी डोनर’ व ‘मद्रास कॅफे’ यांसारखे सिनेमे लिहिले आहेत.)

इतक्या मंद गतीनं जाणाऱ्या कथेला रोचकतेनं पडद्यावर उतरवणं हे बरंच कठीण काम आहे, पण संवेदनशील दिग्दर्शक म्हणून ओळख असलेल्या शुजित सरकारनं हे काम करून दाखवलंय. सोबतच अविक मुखोपाध्यायची सिनेमॅटोग्राफी व शांतनू मोईत्राचा बॅकग्राउंड स्कोरसुद्धा छान जमून आलाय. नुकताच ‘जुडवा २’ सोबत शंभर कोटींचा माईलस्टोन गाठलेला वरुण धवन अशा प्रकारचा जवळपास आर्ट सिनेमामध्ये मोडणारा सिनेमा करेल अशी अपेक्षा बहुतेकांना नव्हती. व्यावसायिक गणितांचा चांगला अभ्यास असलेल्या वरुणलाही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालणार नाही याची पूर्वकल्पना असावी. पण तरीही एक नट म्हणून आपल्याला समृद्ध करणाऱ्या भूमिका मिळाल्या, तर त्या वरुण स्वीकारतो, हे त्यानं आधी ‘बदलापूर’ आणि आता ‘ऑक्टोबर’ करून दाखवून दिलंय.

एखाद्या दुसऱ्या अभिनेत्यानं कदाचित डॅन वरुणपेक्षा चांगला केला असता, पण तरीही डॅन हा वरुणचा आजवरचा सर्वोत्कृष्ट अभिनय आहे असं वाटतं. शिऊलीच्या रूपात बनिता संधूनंही चांगलं काम केलंय. कुठलाही मेकअप न करता आणि अपघातानंतर संवाद विरहित भूमिका असताना बनितानं शिऊली चांगली उभी केलीय. छोट्या-मोठ्या भूमिकेत असलेल्या सगळ्या कलाकारांनी चांगला अभिनय केलाय, पण सर्वोत्तम अभिनय झालाय तो शिऊलीच्या आईचा, गीतांजली रावचा. अनेक छटा असलेली ही भूमिका त्यांनी खूप चांगली साकारलीय.

‘ऑक्टोबर’ सगळ्यांसाठी नक्कीच नसून मल्टिप्लेक्स ऑडियन्सला डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलाय. मसाला फिल्म्स बघून कंटाळा आला असेल किंवा काहीतरी सुंदर बघण्याची इच्छा असेल तर (हॉलिवुडच्या रोमँटिक सिनेमांच्या यादीत शोभेल असा) ‘ऑक्टोबर’ नक्कीच अनुभवावा असा आहे.

.............................................................................................................................................

लेखक पवन नंदकिशोर गंगावणे चित्रपट अभ्यासक आहेत.

g.pavan018@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

arun tingote

Thu , 19 April 2018

सुंदर लिहिलंय. शुभेच्छा.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख