‘Sapiens: A Brief History of Humankind’ हे युव्हाल नोआ हरारी यांचं जगभरात गाजलेलं पुस्तक. ‘A Brief History of Time’ नंतर सर्वांत जास्त गाजलेलं पॉप्युलर सायन्सचं हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या जगभरात १५ लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत आणि ३० हून अधिक भाषात अनुवाद झाला आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद वासंती फडके यांनी केला असून ते १० मे रोजी डायमंड पब्लिकेशन्सच्या वतीनं प्रकाशित होत आहे. या पुस्तकाच्या एका प्रकरणाचा हा संपादित अंश..
.............................................................................................................................................
शंखशिंपले आणि सिगरेट्स
पैसा म्हणजे नाणी किंवा नोटा नव्हेत. वस्तूंची किंवा सेवांची देवघेव करण्याच्या हेतूनं इतर वस्तूंची किंमत पद्धतशीररीत्या ठरवून त्यांचा स्वेच्छेनं वापर करण्यासाठी जे काही वापरलं जातं, ते म्हणजे पैसा. पैशामुळे लोकांना वेगवेगळ्या वस्तूंच्या (सफरचंदं, बूट आणि घटस्फोट) मूल्यांची जलदपणे आणि सहजपणे तुलना करणं शक्य होतं. तसंच पैशामुळे एका वस्तूच्या वा एखाद्या सेवेच्या बदल्यात दुसरी वस्तू घेता येते आणि संपत्तीचा सहज साठा करता येतो. पैशाचे अनेक प्रकार आहेत. त्यांपैकी ‘नाणं’ हे चलन सर्वांच्या परिचयाचं आहे. नाणं म्हणजे ठसा उमटवलेला धातूचा तुकडा होर. नाण्यांचा शोध लागण्याआधी कितीतरी वर्षं शंख, शिंपले, कातडी, गायी, मीठ, धान्य, मणी, कापड आणि वचनचिठ्ठी (प्रॉमिसरी नोट) यांसारख्या चलनांचा वापर करून संस्कृती बहरल्या. संपूर्ण आफ्रिका, दक्षिण आशिया, पूर्व आशिया आणि आशियाना जग या ठिकाणी जवळजवळ चार हजार वर्षं ‘कवडी’ हे चलन वापरलं जात होतं. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत ब्रिटिश युगांडामध्ये कर भरण्यासाठी कवड्यांचा वापर केला जात होता.
आधुनिक तुरुंगांमध्ये आणि युद्धकैद्यांच्या छावण्यांमध्ये सिगरेट्सचा उपयोग अनेकदा पैशासारखा केला गेला आहे. धूम्रपान न करणारे कैदीही सिगरेट्सच्या स्वरूपातला मोबदला स्वेच्छेनं स्वीकारत असतात आणि इतर सर्व वस्तू आणि सेवा यांची किंमत सिगरेट्समध्ये मोजत असतात. ऑश्च्झविट्स छळछावणीतून जिवंत राहिलेल्या एकानं, तिथे सिगरेट्सचा चलन म्हणून कसा उपयोग केला जात असे, त्याचं वर्णन केलं आहे ‘आमचं स्वतःचं असं एक चलन होतं. ते म्हणजे सिगरेट्स. प्रत्येक वस्तूची किंमत सिगरेटमध्ये सांगितली जात असे... ‘सामान्य’ वेळी म्हणजे जेव्हा गॅस चेंबरमध्ये पाठवण्यासाठी सतत माणसं येत असत, तेव्हा ब्रेडच्या एका तुकड्याची किंमत १२ सिगरेट्स होती. मार्जरिनच्या ३०० ग्रॅमच्या पुडक्याची किंमत ३० सिगरेट्स होती; घड्याळाची ८० ते २०० सिगरेट्स होती; तर एक लिटर दारूची ४०० सिगरेट्स होती. असे सगळ्या गोष्टींचे भाव ठरलेले होते.’
आजही ‘नोटा’ आणि ‘नाणी’ हे पैशाचे प्रकार तुरळकच आहेत. जगातला एकूण पैसा सुमारे साठ ट्रिलिअन डॉलर इतका आहे. तरीही नाण्यांची आणि नोटांची संख्या सहा ट्रिलिअन डॉलरपेक्षा कमी आहे. एकूण पैशापैकी ९० टक्के पैसा म्हणजे सुमारे ५० ट्रिलिअन डॉलर्सपेक्षा जास्त पैसा फक्त संगणकांच्या सर्व्हरवर अस्तित्वात असतो. त्यानुसार पुष्कळसे औद्योगिक व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे केले जातात. एका संगणकाच्या फाईलमधून माहिती दुसऱ्या संगणकाच्या फाईलमध्ये घातली जाते. अशा व्यवहारांमध्ये प्रत्यक्ष रोख पैशाची देवघेव होत नाही. फक्त गुन्हेगारच नोटांनी भरलेली सूटकेस देऊन घर विकत घेऊ शकतो. वस्तू आणि सेवा यांचा व्यापार इलेक्ट्रॉनिक माहितीच्या अदलाबदलीनं करण्याची लोकांची तयारी आहे ही बाब चांगलीच आहे; कारण चकचकीत नाणी आणि करकरीत नोटा यांपेक्षा ही देवघेव हलकी, कमी अवजड आणि निगराणी करण्यासाठी अधिक सोपी आहे.
गुंतागुंतीची व्यापारी व्यवस्था कार्यरत राहण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या पैशाचा उपयोग अटळ आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या बुटांची किंमत किती आकारली पाहिजे, हे पैशाच्या अर्थव्यवस्थेत बूट बनवणाऱ्याला माहीत असणं पुरेसं असतं. बूट, सफरचंदं आणि बकऱ्या यांच्यातल्या वस्तूविनिमयाचे दर लक्षात ठेवण्याची गरज नाही. उत्तम सफरचंदं पिकवणाऱ्याला सफरचंदांची तीव्र इच्छा असणाऱ्या बूट बनवणाऱ्याचा शोध घेण्यापासून पैशानं मुक्त केलं आहे. प्रत्येकालाच पैशाची तीव्र इच्छा नेहमीच असते. पैशाचा हा कदाचित मूलभूत गुणधर्म आहे. प्रत्येकाला पैसा नेहमीच हवा असतो. प्रत्येकाला त्याची नेहमीच तीव्र इच्छा असते. याचाच अर्थ तुम्हांला जे हवं, ते किंवा जे गरजेचं आहे, ते तुम्ही पैशाच्या बदल्यात विकत घेऊ शकता. बूट बनवणाराही तुमचा पैसा स्वीकारायला आनंदानं तयार असतो; कारण त्याला सफरचंदं, बकऱ्या किंवा घटस्फोट यांपैकी काहीही हवं असलं, तरी ते पैशाच्या बदल्यात मिळू शकतं.
पैसा हे देवघेव करण्याचं वैश्विक माध्यम आहे. पैशामुळे लोकांना जवळजवळ कुठल्याही गोष्टीचं रूपांतर दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत करता येतं. जेव्हा निवृत्त झालेला एखादा सैनिक लष्करी सेवेसाठी मिळालेल्या भत्यांचा वापर करून महाविद्यालयाची फी भरतो आणि शिक्षण घ्यायला लागतो, तेव्हा त्याच्या शारिरिक शक्तीचं रूपांतर बुद्धीत होतं. जेव्हा एखादा वतनदार आपली मालमत्ता आपल्या पदरी असलेल्या दरबाऱ्यांना आधार देण्यासाठी विकतो, तेव्हा जमिनीचं रूपांतर निष्ठेत होतं. जेव्हा एखादा डॉक्टर आकारलेल्या फीच्या पैशाचा उपयोग वकील नेमण्यासाठी किंवा न्यायाधीशाला लाच देण्यासाठी करतो, तेव्हा आरोग्राचं रूपांतर न्यायात होतं. अगदी संभोगाचं रूपांतर मुक्तीत करणंही पैशाच्या हातात आहे. पंधराव्या शतकातल्या वेश्या पैशासाठी पुरुषांबरोबर झोपत असत. त्याच पैशाच्या बदल्यात त्या कॅथलिक चर्चकडून क्षमापत्र खरेदी करत असत.
अशा प्रकारे, विनिमयासाठी अगदी आदर्श ठरेल अशा पैशामुळे एका वस्तूचं रूपांतर फक्त दुसऱ्या वस्तूत करणं शक्य होत होतं; एवढंच नाही, तर त्यामुळे संपत्ती साठवताही येऊ शकणार होती. काळ आणि सौंदर्य यांसारख्या मौल्यवान बाबींचा साठा करणं शक्य नसतं. स्ट्रॉबेरीसारख्या काही गोष्टी थोड्या काळापुरत्याच साठवून ठेवता येतात. इतर काही गोष्टी अधिक टिकाऊ असतात, पण त्यांची राखण करण्यासाठी पुष्कळ जागा लागते. तसंच त्या टिकवून ठेवण्यासाठी खर्चिक सुविधांचीही गरज पडते. उदाहरणार्थ, धान्य साठवून ठेवण्यासाठी प्रचंड कोठारं बांधावी लागतात. उंदीर, बुरशी, पाणी, आग आणि चोर यांपासून त्याचं संरक्षण करावं लागतं. पैसा कागदी चलन, संगणकीय बीट्स किंवा कवड्या - या समस्या सोडवतो. कवड्या कुजत नाहीत; उंदरांसाठीही त्या चविष्ट नसतात. त्या आगीलाही दाद देत नाहीत. तसंच आकारानं बेताच्या असल्यानं त्या तिजोरीत कुलूपबंद करून ठेवता येतात.
संपत्तीचा वापर करण्यासाठी ती केवळ साठवून ठेवणं पुरेसं नसतं. ती एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणं गरजेचं असतं. काही प्रकारच्या पैशाचं स्थावर मालमत्ता - स्थलांतर करता येत नाही; पण गहू, तांदूळ यांसारख्या धान्यांची वाहतूक कष्टानं का होईना, करता येते. पैसा नसलेल्या अवस्थेत दूरच्या प्रांतात आलेल्या शेतकऱ्याची कल्पना करा. त्याची संपत्ती म्हणजे मुख्यतः त्याचं घर आणि त्याचं शेत या गोष्टी असतात, पण शेतकरी स्वतःबरोबर त्याचं घर आणि त्याचं शेत घेऊन जाऊ शकत नाही. नाहीतर या दोन्ही गोष्टींच्या बदल्यात शेतकऱ्याला कदाचित पुष्कळ तांदूळ मिळाले असते, पण तांदूळ मिळाल्यानंतरही ते वाहून आणणं खूप अवजड आणि खर्चीक झालं असतं. अशा समस्या पैशानं सोडवता येतात. शेतकरी आपली मालमत्ता एक पोतंभर कवड्यांच्या बदल्यात विकू शकतो. तो जिथे जाईल, तिथे त्या कवड्या सहजपणे वाहून नेऊ शकतो.
पैशानं वस्तूचं रूपांतर करता येतं, पैशाचा सहज साठा करता येतो, तसंच तो दुसरीकडे सहज आणि कमी खर्चात नेता येतो; त्यामुळेच जटिल अशा व्यापारी जाळ्यांच्या निर्मितीत आणि गतिशील बाजारपेठेच्या निर्मितीत त्याचं महत्त्वाचं योगदान आहे. व्यापारी जाळी आणि बाजारपेठा यांची जटिलता आणि त्यांचा आकार पैशाशिवाय मर्यादित राहिला असता आणि त्यामुळे हे दोन्ही घटक निष्प्रभ झाले असते.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406
.............................................................................................................................................
पैशाचं तंत्र काय आहे?
कवड्या आणि डॉलर यांना आपल्या सामाईक कल्पनाशक्तीतच किंमत आहे. शिंपल्यांची किंवा कागदाची रासायनिक संरचना, या दोघांचे रंग किंवा या दोघांचा आकार यांमध्ये पैशाचं मूल्य दडलेलं नाही. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचं, तर पैसा म्हणजे ‘भौतिक वास्तव’ नाही. ती एक मानसिक रचना आहे. पदार्थाचं मानसिक गोष्टीत रूपांतर करून या रचनेचं कार्य चालतं; पण पैशाची संकल्पना यशस्वी कशी झाली? आपलं भाताचं सुपीक शेत मूठभर निरुपयोगी कवड्यांच्या बदल्यात द्यायला शेतकरी स्वेच्छेनं का तयार झाला? एखाद्या स्वस्त हॉटेलमध्ये हॅम्बर्गर विकून किंवा आरोग्य विमा विकून किंवा तीन लहान खोडकर मुलांना सांभाळण्याचं काम करून केवळ रंगीत कागदाचे काही कपटे मिळवण्यासाठी आपण इतकी शक्ती का खर्च करतो?
जेव्हा सामाईक कल्पनाशक्तीवर लोकांचा विश्वास असतो, तेव्हा लोक अशी कामं करायला तयार असतात. टाकसाळीतून बाहेर पडणाऱ्या सर्व प्रकारच्या पैशासाठी ‘विश्वास’ हा कच्चा माल असतो. एखादा श्रीमंत शेतकरी आपल्या मालकीच्या सर्व गोष्टी पोतंभर कवड्यांच्या बदल्यात विकतो आणि त्या घेऊन प्रवास करून दुसऱ्या प्रांतात येतो; तेव्हा नव्या प्रांतातले लोक कवड्यांच्या बदल्यात तांदूळ, घरं, शेतं विकतील असा विश्वास त्याला वाटत असतो. पैसा ही परस्परांच्या विश्वासाची बाब आहे, पण ती निवळ परस्पर विश्वासाची व्यवस्था नसून आजपर्यंतच्या इतिहासात उभी राहिलेली परस्पर विश्वासाची सर्वांत वैश्विक आणि सर्वांत कार्यक्षम व्यवस्था आहे.
हा विश्वास ज्यामुळे निर्माण झाला; ती एक अतिशय गुंतागुंतीची, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रकारांच्या दीर्घकालीन संबंधांच्या जाळ्याची व्यवस्था होती. कवड्या, सोन्याची नाणी किंवा डॉलर यांवर मी विश्वास ठेवतो; कारण माझे शेजारी या गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि शेजारी विश्वास ठेवतात, कारण मी विश्वास ठेवतो. आपण सर्व जण चलनांच्या प्रकारावर विश्वास ठेवतो, कारण आपला राजा त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्याकडे कररूपानं त्यांची मागणी करतो. आपला धर्मोपदेशक चलनावर श्रद्धा ठेवतो आणि शेतीच्या उत्पन्नातल्या दहाव्या हिश्शाची (आपल्याकडच्या ऐतिहासिक सरदेशमुखीप्रमाणे) आपल्याकडे मागणी करतो. डॉलरची नोट घेऊन तिच्याकडे काळजीपूर्वक पाहा. तो केवळ साधासुधा, रंगीबेरंगी कागदाचा एक तुकडा असून त्यावर एका बाजूला अमेरिकेच्या अर्थमंत्र्याची सही आणि दुसऱ्या बाजूला ‘देवावर आमची श्रद्धा आहे.’ असं बोधवाक्य तुम्हांला दिसेल. आपण रक्कम म्हणून डॉलर स्वीकारतो, कारण आपण ईश्वरावर विश्वास ठेवतो आणि अमेरिकेच्या अर्थमंत्र्यावर विश्वास ठेवतो. आपल्या राजकीय व्यवस्थांशी, सामाजिक व्यवस्थांशी आणि विचारप्रणाली व्यवस्थांशी आपली अर्थव्यवस्था किती घट्ट बांधलेली आहे याचं स्पष्टीकरण कळीची भूमिका निभावणारा ‘विश्वास’ आपल्याला देत असतो. तसंच अनेकदा राजकीय घडामोडींमुळे आर्थिक संकटं का तयार होतात आणि एखाद्या विशिष्ट दिवशी शेअरबाजार वधारेल किंवा कोसळेल हे त्या दिवशी शेअरच्या दलालांना काय वाटत असतं यावर का अवलंबून असतं याचं स्पष्टीकरणही ‘विश्वास’ देत असतो.
मौल्यवान धातूंची प्रमाणित वजनं निश्चित झाल्यामुळे अखेरीस नाणी अस्तित्वात आली. इतिहासातली पहिली नाणी पश्चिम अनातोलियातल्या (एशिया मायनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशातल्या) लिडियाच्या अलिटेस राजानं इ.स.पू.६४०च्या सुमारास पाडली. सोनं किंवा चांदी यांच्या प्रमाणित वजनाची ही नाणी होती आणि त्यांच्यावर ओळखीचा ठसा उमटवलेला होता. त्या ठशामार्फत नाण्यांवर दोन बाबींची साक्ष दिलेली होती. पहिली बाब म्हणजे त्या नाण्यांमध्ये मौल्यवान भाग किती होता हे ठशामार्फत दाखवलं गेलं होतं. दुसरी बाब म्हणजे नाणं प्रसारित करणाऱ्या अधिकारी व्यक्तीची ओळख या ठशामार्फत सांगितलेली होती आणि नाण्यावर कोरलेल्या आशयाची हमी दिलेली होती. आज वापरात असलेली जवळजवळ सर्व नाणी लिडिअन नाण्यांची वंशज आहेत.
ठसा न उमटवलेल्या धातूच्या लगडीपेक्षा नाण्यांचे दोन महत्त्वाचे फायदे होते. एकतर प्रत्येक खरेदीविक्रीच्या वेळेला धातूच्या लगडीचं वजन करावं लागत होतं. दुसरं म्हणजे लगडीचं वजन करणं पुरेसं ठरत नसे. बूट बनवणाऱ्याला बुटाच्या बदल्यात मिळालेली चांदीची लगड शुद्ध चांदीची होती की शिशाच्या गोळ्याला बाहेरून चांदीचा मुलामा दिलेला होता हे कळायला मार्ग नव्हता. या सर्व समस्रा नाण्यांनी सोडवल्या. नाण्यावर उमटवलेला ठसा नाण्याच्या नेमक्या मूल्याची खातरी देत होता, त्यामुळे बूट बनवणाऱ्याला वजनकाटा जवळ ठेवावा लागत नव्हता. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, नाण्यावरचा ठसा म्हणजे त्या नाण्याच्या मूल्याची खातरी देणाऱ्या एखाद्या राजकीय अधिकाऱ्याची सही असे.
नाण्यावरच्या ठशाच्या घाटात आणि आकारात ऐतिहासिक कालखंडानुरूप खूपच बदल झाल्याचं आढळतं. मात्र नाण्यावरचा संदेश कायम तोच राहिला आहे - ‘मी अमुक अमुक महान राजा, तुम्हांला शपथेवर सांगतो की, या धातूच्या चकतीत बरोबर पाच ग्रॅम सोनं आहे. जर कोणी या नाण्याची नक्कल केली, तर त्याचा अर्थ तो माझ्रा सहीची नक्कल करतो आहे असा होईल आणि त्यामुळे माझ्या नावलौकिकाला कलंक लागेल. अशा गुन्ह्यासाठी मी सर्वांत कडक शिक्षा फर्मावीन.’ त्यामुळेच बनावट पैसा तयार करणं हा फसवणुकीसंदर्भातल्या इतर गुन्ह्यांपेक्षाही गंभीर गुन्हा समजला जातो. बनावट पैसा निर्माण करणं म्हणजे निवळ फसवणूक नसते, तर सार्वभौमत्वाला गेलेला तडा असतो. सत्ता, विशेषाधिकार आणि राजपदी असलेली व्यक्ती यांना उलथवून टाकणारी ती कृती असते. अशा अपराधासाठी ‘लेसेमॅजेस्टी’ (उच्चाधिकाराचा अवमान) ही कायदेशीर संज्ञा होती. अशा गुन्हेगारांना ‘छळ’ आणि ‘देहदंड’ अशी शिक्षा दिली जात असे. राजाची सचोटी आणि त्याची सत्ता यांवर जोपर्यंत लोकांचा विश्वास असतो, तोपर्यंत ते त्याच्या नाण्यांवर विश्वास ठेवतात. अगदी अपरिचित लोकही ‘रोमन दीनारी’ ही नाणी उत्तम असल्याबद्दल सहज सहमती दाखवू शकत असत, कारण रोमन सम्राटाची सत्ता आणि त्याची सचोटी यांवर त्यांचा विश्वास होता. रोमन सम्राटाचं नाव आणि त्याची मुद्रा यांनी रोमन नाणं सजवलेलं होतं.
याउलट सम्राटाची सत्ता दीनारींवर अवलंबून असते. नाण्यांशिवाय रोमन साम्राज्य टिकवून ठेवणं किती अवघड झालं असतं याचा विचार करा. जर सम्राटाला कर वाढवायचे असते आणि लोकांचं वेतन बार्लीत आणि गव्हात द्यायचं असतं, तर किती कठीण होऊन बसलं असतं! सिरियात बार्लीच्या रूपानं कर गोळा करणं अशक्य होतं. ती बार्ली वाहतुकीनं रोमच्या मध्यवर्ती खजिन्यात भरणं आणि तिथून पुन्हा ब्रिटनमधल्या सैन्यासाठी पाठवणं ही केवढी अशक्य कोटीतली बाब होती! जर रोमच्या रहिवाशांनी फक्त सोन्याच्याच नाण्यांवर श्रद्धा ठेवली असती, तरी ती गोष्ट अशक्यच झाली असती; पण गॉल्स (पश्चिम युरोपमधल्या एका प्रदेशात राहणारे लोक), ग्रीक, इजिप्शिअन आणि सिरियन यांनी ही श्रद्धा नाकारली आणि कवड्या, हस्तिदंती मणी किंवा कापडाचे तागे यांवर विश्वास ठेवला.
सुवार्ता सोन्याची (गॉस्पेल ऑफ गोल्ड)
रोमन नाण्यांवरचा विश्वास इतका जबरदस्त होता की, साम्राज्याच्या हद्दीबाहेरचे लोकही दीनारी चलन खुशीनं स्वीकारत असत. रोमन सैनिकांच्या पलटणी भारतातल्या बाजारापासून हजारो किलोमीटर दूर होत्या. तरी इ.स.च्या पहिल्या शतकात रोमन नाणी भारतात स्वीकारली जात होती. भारतीयांचा या दीनारी नाण्यांवर आणि रोमन सम्राटाच्या प्रतिमेवर गाढ विश्वास होता. भारतातल्या स्थानिक राज्यकर्त्यांनी स्वतःची नाणी पाडली, तेव्हा त्यांनी रोमन सम्राटाच्या मुद्रेसकट दीनारी नाण्यांची हुबेहूब नक्कल केली होती! ‘दीनारी’ हे नाण्यांचं जातिवाचक नाव झालं होतं. मुस्लीम खलिफांनी ‘दीनारी’ या नावाचं अरबीकरण करून ‘दीनार’ या नावानं नाणी प्रसृत केली. आजही जॉर्डन, इराक, सर्बिया, मॅसेडोनिया, ट्युनिशिया आणि इतर अनेक देशांमधल्या चलनाचं नाव ‘दीनार’ आहे.
भूमध्य समुद्रापासून हिंदी महासागरापर्यंत लिडिअन पद्धतीची नाणेव्यवस्था पसरली होती. त्याचप्रमाणे चीनमध्येही ठसा उमटवलेली पितळेची नाणी आणि ठसा न उमटवलेल्या चांदीच्या आणि सोन्याच्या लगडी यांवर आधारलेली थोडी वेगळी व्यवस्था विकसित झाली होती. मात्र दोन्ही चलनव्यवस्थांमध्ये बऱ्याचशा गोष्टी समान होत्या. (विशेषतः सोनं आणि चांदी यांवरचं अवलंबन.) त्यामुळे चीनचं क्षेत्र आणि लिडिअन क्षेत्र यांमध्ये चलनविषयक आणि व्यापारविषयक निकटचे संबंध प्रस्थापित झाले होते. मुस्लीम व्यापारी, युरोपीय व्यापारी आणि जेते यांनी लिडिअन नाणेव्यवस्था आणि सोन्याचं वैभव या दोन्ही गोष्टी हळूहळू पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात पसरवल्या. अलीकडच्या आधुनिक युगापर्यंत संपूर्ण जग म्हणजे एकच मुद्राक्षेत्र बनलं होतं. प्रथम हे क्षेत्र सोनं आणि चांदी यांवर अवलंबून होतं. नंतर ब्रिटिश पाउंड आणि अमेरिकी डॉलर यांसारखी थोडीच चलनं विश्वसनीय बनली.
राष्ट्रापलीकडे आणि संस्कृतीपलीकडे जाणाऱ्या मुद्राक्षेत्रानं अॅफ्रो आशियाच्या एकीकरणाचा पाया घातला. अखेरीस, मुद्राक्षेत्रानं संपूर्ण जग एका आर्थिक आणि राजकीय वर्तुळामध्ये आणलं. परस्परांना अनाकलनीय अशा वेगवेगळ्या भाषा लोक बोलत होते, वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या आज्ञा पाळत होते, वेगवेगळ्या देवांची प्रार्थना करत होते; पण सोनं आणि चांदी यांवर आणि त्यांच्यापासून बनवलेल्या नाण्यांवर सर्वांची श्रद्धा होती. या समान श्रद्धेखेरीज जागतिक व्यापाराची जाळी निर्माण करणं अक्षरशः अशक्य होतं. सोळाव्या शतकात स्पॅनिश विजेत्यांना अमेरिकेत सापडलेल्या सोन्यामुळे युरोपीय व्यापारी पूर्व आशियातून रेशीम, चिनी मातीची भांडी आणि मसाले विकत घेऊ शकले. त्यायोगे युरोपमध्ये आणि पूर्व आशियात आर्थिक भरभराटीची चक्रे फिरत राहिली. मेक्सिको आणि अँडिज प्रदेश इथल्या खाणींमधून बाहेर काढलेलं सोनं युरोपिअनांच्या बोटातून निसटून रेशमी कापड आणि चिनी मातीच्या वस्तू तयार करणाऱ्या चिनी लोकांच्या पाकिटात सुखेनैव जाऊन बसलं. कोर्टेसला आणि त्याच्या सहकाऱ्यांना जसं ‘हृदयाच्या आजारानं त्रस्त केलं होतं’, तसं चिनी लोकांना त्रस्त केलं नसतं आणि परिणामी, चांदी आणि सोनं यांच्या स्वरूपातल्या चलनाची देवघेव झाली नसती, तर जागतिक अर्थव्यवस्थेचं काय झालं असतं?
वेगवेगळी संस्कृती असलेले चिनी, भारतीय, मुस्लीम आणि स्पॅनिश हे लोक इतर अनेक बाबतींमध्ये सहमती प्राप्त करण्यात अपयशी ठरले असले, तरी सोन्यावरच्या श्रद्धेबाबत त्यांची सहमती कशी झाली? स्पॅनिश लोकांनी सोन्यावर, मुस्लिमांनी बार्लीवर, भारतीयांनी कवड्यांवर आणि चिनी लोकांनी रेशमी कापडाच्या ताग्रावर श्रद्धा ठेवली; असं का घडलं नाही? अर्थतज्ज्ञांकडे त्याचं उत्तर तयार आहे. दोन प्रदेश व्यापारानं जोडले गेल्यावर आणि ‘मागणी तसा पुरवठा’ हे तत्त्व कार्यरत झाल्यावर वाहतूकक्षम मालाच्या किमती समान होण्याकडे कल असतो.
असं का घडतं हे समजून घेण्यासाठी एक कल्पित उदाहरण पाहू. भारत आणि भूमध्य समुद्री प्रदेश यांच्यामध्ये व्यापाराला सुरुवात झाली, तेव्हा भारतीयांना सोन्यात अजिबात रस नव्हता असं आपण गृहीत धरू. त्यामुळे भारतीयांच्या दृष्टीनं सोन्याला काहीच किंमत नसणार, पण सोन्याचा हव्यास असणं भूमध्य समुद्री प्रदेशात प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जात असणार; त्यामुळे त्याची किंमत जास्त असणार. अशा वेळी पुढे काय घडेल?
भारत आणि भूमध्य समुद्री प्रदेश यांमध्ये प्रवास करणारे व्यापारी सोन्याच्या किमतीतला हा फरक लक्षात घेतील. त्याचा फायदा करून घेण्यासाठी भारतात सोन्याची स्वस्तात खरेदी करतील आणि भूमध्य प्रदेशात जाऊन त्याची चढ्या भावानं विक्रेी करतील. परिणामी, भारतात सोन्याची मागणी आणि त्याची किंमत आकाशाला जाऊन भिडेल. त्याच वेळी भूमध्य समुद्री प्रदेशात सोन्याचा पूर आल्यानं त्याचा परिणाम सोन्याची किंमत घसरण्यात होईल. परिणामी, भूमध्य समुद्री प्रदेशातली आणि भारतातली सोन्याची किंमत एकाच पातळीवर येईल. भूमध्य समुद्री प्रदेशातल्या लोकांनी सोन्यावर विश्वास ठेवण्याच्या एकाच घटनेनं भारतीयही सोन्यावर विश्वास ठेवायला सुरुवात करतील. तोवर भारतीयांच्या दृष्टीनं निरुपयोगी असलेलं सोनं भूमध्य समुद्री प्रदेशातल्या लोकांना हवं असणं ही एकच बाब सोन्याला मौल्यवान ठरवण्यासाठी भारतीयांच्या दृष्टीनं पुरेशी ठरेल.
जरी आपण एखाद्या व्यक्तीचा द्वेष करत असलो, तिची थट्टा करत असलो, तिचा तिरस्कार करत असलो; तरीसुद्धा दुसरी व्यक्ती कवड्या, डॉलर किंवा इलेक्ट्रॉनिक माहिती अशा गोष्टींवर श्रद्धा ठेवते ही बाब त्या गोष्टींवरची आपली स्वतःची श्रद्धा दृढ करण्यासाठी पुरेशी असते. ख्रिश्चन आणि मुस्लीम यांचं धार्मिक श्रद्धेबाबत जरी एकमत नसलं, तरी चलनासंदर्भांत त्यांची सहमती असते. धर्म आपल्याला कशावर तरी श्रद्धा ठेवायला सांगतो. ‘इतर लोक ज्याच्यावर विश्वास ठेवतात, त्यावर विश्वास ठेवा.’ असं पैसा सांगतो.
सर्व अनिष्टांना पैसाच कारणीभूत आहे असं म्हणून तत्त्ववेत्ते, विचारवंत आणि प्रेषित यांनी पैसा हजारो वर्षं कलंकित केला आहे. काहीही असलं, तरी पैसा मानवी सहनशीलतेचा उच्चांक आहे. भाषेपेक्षा, राज्याच्या कायद्यापेक्षा, सांस्कृतिक नियमावलीपेक्षा, धार्मिक श्रद्धांपेक्षा आणि सामाजिक सवरींपेक्षा पैसा अधिक मोकळ्या मनाचा आहे. ‘पैसा’ ही एकमेव मानवनिर्मित व्यवस्था आहे, जी जवळजवळ सर्व प्रकारची सांस्कृतिक दरी सांधू शकते. तसंच धर्म, लिंगभान, वंश, वर किंवा लैंगिकता यांवरून पैसा भेदभाव करत नाही. पैशाला त्यासाठी धन्यवाद द्यायला हवेत. अनोळखी, एकमेकांवर विश्वास न ठेवणारे लोक पैशाच्या संदर्भात मात्र प्रभावीपणे सहकार्य करू शकतात.
पैशाची किंमत
दोन वैश्विक तत्त्वांवर पैसा आधारलेला असतो.
अ) वैश्विक रूपांतरण : पैशामुळे तुम्ही किमयागाराप्रमाणे जमिनीचं निष्ठेत, न्यायाचं आरोग्यात आणि हिंसेचं ज्ञानात रूपांतर करू शकता.
ब) वैश्विक विश्वास : पैशाच्या मध्यस्थीनं कोणत्याही प्रकल्पावर कोणतेही दोन लोक सहकार्य करू शकतात.
या दोन तत्त्वांमुळे लाखो अपरिचितांना व्यापारामध्ये आणि उद्योगधंद्यांमध्ये प्रभावीपणे सहकार्य करणं शक्य झालं आहे; पण सहृदय दिसणाऱ्या या तत्त्वांना एक काळी बाजूही आहे. जेव्हा प्रत्येक गोष्ट रूपांतरक्षम असते आणि निनावी नाण्यांवर आणि कवड्यांवर विश्वास असतो; तेव्हा स्थानिक परंपरा, जवळिकीचे संबंध आणि मानवी मूल्यं गंजून जातात. त्यांची जागा पुरवठा आणि मागणी यांचे निर्दय आणि भावनाशून्य कायदे घेतात.
मानसन्मान, निष्ठा, नैतिकता आणि प्रेम यांसारख्या ‘मूल्यहीन’ (बाजारात ज्यांना पैशाच्या स्वरूपात किंमत नाही अशा) श्रद्धांवर मानवी समाज आणि कुटुंबं आधारित असतात. या बाबी बाजारक्षेत्राच्या बाहेर असतात आणि पैशानं त्यांची खरेदी वा विक्रेी करू नये. चांगला बाजारभाव मिळाला, तरी काही गोष्टी करू नयेत. पालकांनी आपली मुलं गुलाम म्हणून बाजारात विकू नयेत. सच्च्रा ख्रिश्चनानं नैतिक पाप करू नये. एकनिष्ठ शिलेदारानं कधीही आपल्या सरदाराला फसवू नये. आदिवासी जमातींनी वडिलोपार्जित जमिनी परकीयांना कधीही विकू नयेत.
धरणाच्या भेगांमधून पाणी झिरपत जातं, त्याप्रमाणेच हे अडथळे मोडून काढण्याचा पैशानं नेहमीच प्रयत्न केला आहे. कुटुंबातल्या इतर सदस्रांसाठी अन्न विकत घेता यावं म्हणून पालक आपली काही मुलं गुलाम म्हणून विकतात. येशूचे परमभक्त असलेल्या काही ख्रिश्चनांनी खून केले, चोऱ्या केल्या आणि फसवणूकही केली आणि त्यातून मिळवलेल्या पैशाचा उपयोग चर्चमधून क्षमापत्रं विकत घेण्यासाठी केला. महत्त्वाकांक्षी शिलेदार आपल्या निष्ठेचा लिलाव अधिक बोली लावणाऱ्याबरोबर करत. हे करताना आपल्या अनुयायांच्या आपल्यावरच्या निष्ठेचं रक्षण ते रोख रक्कम देऊन करत असत. जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळावा म्हणून आदिवासी जमातींच्या जमिनी जगातल्या दुसऱ्या टोकाच्या लोकांना विकल्या जात.
पैशाला याहूनही एक काळी बाजू आहे. अपरिचितांमध्ये पैसा जरी विश्वास निर्माण करत असला; तरी या विश्वासाची माणसांमध्ये, समाजांमध्ये वा पवित्र मूल्रांमध्ये गुंतवणूक केली जात नाही. त्याची गुंतवणूक पुन्हा पैशातच केली जाते आणि पैशाला उभं करणाऱ्या अमानवी व्यवस्थेत केली जाते. आपण आपल्या शेजाऱ्यावर आणि अपरिचितावर विश्वास ठेवत नाही; पण त्यांच्याकडच्या नाण्यांवर विश्वास ठेवतो. त्यांच्याकडची नाणी संपुष्टात आली की त्यांच्यावरचा आपला विश्वासही उडतो. पैसा समाजाचे, धर्माचे आणि राज्याचे बंध खाली खेचतो आहे; त्यामुळे जग ही एक मोठी आणि निष्ठुर बाजारपेठ होण्याचा धोका आहे.
म्हणूनच मानव जातीचा आर्थिक इतिहास म्हणजे एक नाजूक नृत्य आहे. अपरिचितांमधून सहकार्य मिळवण्यासाठी लोक पैशावर अवलंबून राहतात; पण त्याचबरोबर पैसा मानवी मूल्रांना आणि जवळच्या नातेसंबंधांना दूषित करेल अशी भीती त्यांना वाटते. एका बाजूला माणूस पैसा आणि व्यवसाय यांच्या चलनवलनाला रोखून धरणाऱ्या सामाजिक बांधांना जाणीवपूर्वक नष्ट करायला सज्ज आहे; तर दुसऱ्या बाजूला तो समाज, धर्म आणि पर्यावरण यांचं बाजारशक्तींच्या गुलामगिरीपासून संरक्षण करण्यासाठी नवे बांध घालतो आहे.
बाजार नेहमी वरचढ ठरतो यावर हल्ली सर्व जण श्रद्धा ठेवतात आणि राजे, धर्मोपदेशक आणि समाज यांनी उभ्रा केलेल्या व्यवस्था पैशाच्या पुरापुढे दीर्घ काळ टिकाव धरू शकणार नाहीत असं सर्वांना वाटतं, पण ही भाबडी समजूत आहे. निष्ठुर योद्धे, धर्मवेडे आणि सुजाण नागरिक यांनी हिशेबी व्यापाऱ्यांना पुनःपुन्हा पराभूत करण्यात आणि अर्थव्यवस्थेला नवा आकार देण्यात यश मिळवलं आहे. मानवजातीचं एकीकरण ही शुद्ध आर्थिक प्रक्रिया होती असं समजणं अशक्य आहे. कालौघात हजारो एकेकट्या संस्कृती एकत्र येऊन आज जग एक जागतिक खेडं कसं बनलं हे समजून घेण्यासाठी सोनं आणि चांदी यांच्या भूमिका समजून घेतल्या पाहिजेत. मात्र त्याचबरोबर तितकीच कळीची भूमिका पार पाडणाऱ्या पोलादाकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
ADITYA KORDE
Sun , 15 April 2018
छान, हे पुस्तक आणि ह्याचा पुढचा भाग दोन्ही मी इंग्लिश मधून वाचले आहे ( दुसरे अजून पूर्ण व्हायचे आहे ). मराठी मध्ये असेच म्हणजे ह्या विषयावर डॉ सुलभ ब्रह्मनाळकर ह्यांचे हे गोफ जन्मांतरीचे हे असेच सुंदर पुस्तक आहे अर्थात त्यातले प्रतिपादन वेगळे आहे ... हररी महाशयांनी तर एकदम 'माहोल' पुस्तक लिहिलेले आहे ... इतके सुंदर मराठीत आणल्याबद्दल धन्यवाद ! अक्षर्नामा आणि डायमंड पाब्लीकेशन्स चे मन:पूर्वक आभार आणि अभिनंदन.