अजूनकाही
अलिकडच्या काही वर्षांत कोणत्याही दूतांनी क्षितीजावरून जरी लोकसभा निवडणुकीच्या दुंदुभी वाजवायला सुरुवात केली तरी, आसमंतात लगेच शरद पवार पंतप्रधान होण्याच्या वावड्या उडू लागतात. या हंगामात त्याची सुरुवात शरद पवार यांच्या दरबारातील खासे प्रफुल्ल पटेल यांनी केली. त्या सुरात अभिनेते नाना पाटेकर यांनीही आता सूर मिसळला आहे. दरम्यान गुजरात विधानसभा निवडणुकीपासून राहुल गांधी बहरात आले आणि भाजपेतर विरोधी पक्षांच्या उभारीला तरारून कोंब फुटले. ते स्वाभाविकच होतं. कारण २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या विरोधात असं अनुकूल वातावरण प्रथमच निर्माण झालेलं होतं. मग डिनर डिप्लोमसी सुरू झाल्या.
त्यातच उत्तर प्रदेशात झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत हाडवैरी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या युती झाली. परिणामी दोन लोकसभा मतदार संघात भाजपला दणकून मार पडला. शरद पवार यांना सोनिया आणि राहुल गांधी यांनी ‘सन्मान’पूर्वक आमंत्रित केलं. शरद पवार दिल्लीत पोहोचले आणि अनेक नेते त्यांच्या भेटीला सामोरे गेले. ममता बॅनर्जी दिल्लीत पोहोचल्या. त्यांनीही शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. मग त्यांच्या पंतप्रधानपदाच्या शक्यतेची वावडी उठली. राज्यसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात पराभवाला सामोरं जावं लागलं तरी मायावती यांनी भाजपविरोधाची तलवार म्यान केली नाही. कोणत्याही लोकसभा निवडणुकीपूर्वी जशा राजकीय घडामोडी घडतात, तशा घडू लागल्या. फरक एकच होता, कोणत्याही निवडणुकीआधी पूर्वी काँग्रेसला पर्याय म्हणून काही किंवा अनेक पक्ष एकत्र येत, शिवाय तिसरी आघाडी नावाचा या देशात कधीच यशस्वी न झालेला प्रयोग जाहीर होत असे. आता हे सर्व भाजपच्या विरोधात होत आहे.
शरद पवार जर पंतप्रधान झाले तर वाईट वाटावं असं काहीच नाही. राजकारणातल्या खाचाखोचा कोळून प्यायलेला आणि इतकी प्रदीर्घ खेळी असणारा, चौफेर कर्तृत्व गाजवलेला दुसरा मराठी राजकारणी सध्या तरी दृष्टिक्षेपात नाही. ते महाराष्ट्रीयन, ही बाब कोणाही मराठी माणसाला अभिमानस्पद आहे. (माझ्या पिढीची पत्रकारिता फुलली ती शरद पवार यांच्या कर्तबगारीच्या बहरावर. त्यामुळे ते आपल्या देशाचे पंतप्रधान झाले तर मलाही आनंदच आहे. अर्थात माझ्या काहीही वाटण्या- न वाटण्याचा शरद पवार यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्व, त्यांचं कर्तृत्व आणि ते पंतप्रधान होण्या-न होण्यावर काडीमात्र परिणाम होणारा नाहीये!) मात्र, वस्तुस्थिती काय याचं भान विसरता कामा नये.
अलिकडच्या काही वर्षात विशेषत: समाज माध्यमांचा सुळसुळाट झाल्यापासून कोणाही राजकारण्याला वास्तवाची जरा जाणीव करून दिली की, त्याचे ट्रोल तुटून पडतात. महत्त्वाचं म्हणजे ट्रोल्स ही काही केवळ भाजप/नरेंद्र मोदी/राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मक्तेदारी नाही, तर शरद पवार यांचेही ट्रोल्स आहेतच की! त्यामुळे त्यांच्या संभाव्य पंतप्रधानपदाबद्दल (शरद पवार यांनी नेहमीप्रमाणे मौन बाळगलेलं असलं तरी) वस्तुस्थिती सांगितली की, नेहमीप्रमाणे माझं ‘ब्राह्मण्य’ हे ट्रोल काढतील, यात शंकाच नाही.
पंतप्रधान होण्याची मनीषा सर्वांत प्रथम शरद पवार यांनी जाहीर केली, ती पी. व्ही. नरसिंहराव यांच्या विरोधात शड्डू ठोकून. (तेव्हा नागपुरात ती बातमी आम्ही घनघोर चर्चा करत सेलिब्रेट केली होती; होतो असा भाबडेपणा कधी कधी!) तेव्हापासून शरद पवार यांचं पंतप्रधानपद महाराष्ट्रासाठी एक ‘विलोभनीय आणि भावनात्मक मिथक’ ठरलेलं आहे, हे आपण कधीच विसरता कामा नये. याआधी एकदा लिहिलेला/भाषणात अनेकदा सांगितलेला एक अनुभवच पुन्हा सांगतो. म्हणजे दिल्लीत काय वातावरण आहे हे स्पष्ट होईल.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406
.............................................................................................................................................
मनमोहनसिंग यांच्या पहिल्या पंतप्रधानपदाच्या काळातला हा प्रसंग आहे. एकदा दिल्लीत असतांना दोन पत्रकार मित्रांसोबत काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका बड्या नेत्यांकडे (पुढे ते देशाचे घटनात्मक प्रमुख झाल्यानं थेट नाव टाळलं आहे!) रात्रभोजनाला जाण्याची संधी मिळाली. हे सगळे एकमेकांच्या फारच निकटचे आहेत, हे त्यावेळी सहज लक्षात येत होतं. गप्पात एकानं विचारलं, ‘दादा, तुमच्यात पंतप्रधान पदाचं सर्व मेटल आहे, पण एकदा प्रयत्न अयशस्वी ठरल्यावर तुम्ही शांत झाला का आहात?’ त्यावर ते चाणक्य नेते जे म्हणाले होते, त्याचं सार असं- ‘एक म्हणजे, माझ्या स्वत:च्या राज्यातूनच एकहाती संख्याबळ माझ्या पाठीशी नाही आणि दुसरं म्हणजे तर मला गांधी कुटुंबाचा पाठिंबा नाही; तो असेपर्यंत मीच काय कुणीही काँग्रेसकडून पंतप्रधान होऊ शकत नाही!’
तिथून बाहेर पडल्यावर मी त्या पत्रकार मित्रांना म्हणालो, ‘तुम्ही दिल्लीचे पत्रकार आमच्या पवारसाहेबांना ‘मराठा पॉवर’ म्हणता, ‘ग्रेट मराठा’ म्हणता, मुत्सद्दी आणि व्यासंगी राजकारणी म्हणता तरीही त्यांचं नाव पंतप्रधान म्हणून म्हणून तुम्ही गृहीत का धरत नाही?’ त्यावर पत्रकार मित्र म्हणाला, ‘ते अजून पूर्ण दिल्लीकर झालेले नाहीत आणि त्या पदासाठी अजून त्यांची तयारी नाही.’ (आजही पक्कं स्मरणात आहे. त्यानं ‘he is a spring chiken’ असा शब्दप्रयोग केलेला होता आणि तो मला तेव्हा मुळीच रुचला नव्हता). त्यावर देवेगौडा यांना काय एका रात्रीत सर्वज्ञान प्राप्त झालाय का असा वाद मी घातला, तेव्हा महाराष्ट्राचे लोक पवारांबाबत ‘अंध आणि नाहक इमोशनल आहेत’, असा शेरा त्यानं मारला होता.
या घटनेला एक तप उलटून गेलंय. राजकारणाच्या पटावरून आणि पटाखालून खूप पाणी पाहून गेलेलं आहे. एक पत्रकार म्हणून दोन विधानसभा आणि एका लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या दरबारी राजकारणाची चव चाखल्यावर मला शरद पवार यांच्याबाबत दिल्लीच्या पत्रकार मित्रानं केलेल्या मतप्रदर्शनात तथ्य असल्याची खात्री पटलेली आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की, ऊर भरून यावं असं शरद पवार याचं जे काही कौतुक आपण मराठी माणसाला आहे, ते दिल्लीत नाही. जो दिल्लीत पाय रोवून, डेरा पक्का ठोकेल तोच देशाच्या राजकारणातला महत्त्वाचा नेता बनेल हे लक्षात घेतलं पाहिजे. (शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे ही दोन्ही नेते दिल्लीत कधीच रमलेले नाहीत. या दोन्ही नेत्यांचा पाय कधीच दिल्लीत स्थिरावला नाही, हाच आजवरचा अनुभव आहे.) आता पुन्हा चर्चा सुरू झाल्यावर तरी सलग एक आठवडा शरदराव दिल्लीत थांबले आहेत का? तरी महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या शरद पवार यांना पंतप्रधानपद मिळावं असं अनेकांना वाटावं हे मिथकच नाही का?
माझं नेहमीचं प्रतिपादन आहे- दिल्लीच्या राजकारणाचा बाज अस्सल कावेबाजपणाचा तर शैली डोक्यावर बर्फ, जीभेवर खडीसाखर आणि चेहऱ्यावरची सुरकुती न हलू देता दरबारी राजकारण करण्याची आहे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन संबंध, परस्पर संवाद व सौहार्द, सर्वसमावेशकता या शरद पवार यांच्या स्वभावाच्या ज्या वैशिष्ट्यांचा आपण अभिमान वगैरे बाळगतो, त्याच्याशी दिल्लीच्या राजकारणाच्या शैलीची फारकत आहे. आम्ही मतभेद राजकारणापुरतेच ठेवतो असं पवार अभिमानाने सांगतात आणि त्याला आपण कौतुकानं जी दाद देतो; पण तोच त्यांच्या देशाचा नेता होण्यामागील कमकुवत दुवा आहे!
एखाद्या राज्याचं मुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात एखादं खातं समर्थपणे सांभाळणं ठीक आहे, पण नेत्यांकडे जागतिक भान आवश्यक आहे. क्रिकेटचं आंतरराष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळणं आणि जागतिक अर्थकारण, परराष्ट्र संबंधातील गुंतागुंत, संरक्षण आघाडीवरील क्लिष्टता काश्मीर प्रश्नाचं अश्वत्थामाच्या भळभळत्या जखमेसारखं दुखणं, देशाच्या पूर्व आघाडीवरील जटील प्रश्न आणि प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती आणि अस्मिता व भाषेपासून ते भुकेपर्यंत नानाविध वेगळ्या समस्या, अशा अनेक आघाड्यांवर शरद पवार अजून सिद्ध व्हायचे आहेत... अर्थात हे सर्व आकळून घेण्याची अफाट क्षमता पवार यांच्या आहे, याबद्दल दुमत नाहीच.
शिवाय शरद पवार (महा) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असतात, पण भारतीय लोकशाहीचा संकोच केल्याचा आरोप ज्यांच्यावर होतोय, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘गुरु’ असतात. भाजपमध्ये शरद पवार इतके पॉवरफुल्ल असतात की, राज्यसभेची उमेदवारी भाजपकडून मिळवून मुंबईला विमानानं पोहोचेपर्यंत दत्ता मेघे यांची उमेदवारी रद्द करवून घेण्याइतकी त्यांची भारी वट असते. ते काँग्रेसमध्ये असतात (म्हणजे होते) पण, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचे मित्र असतात. एवढंच नाही तर वाजपेयी पंतप्रधान असतांना देशाच्या आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतात. सोनिया गांधी यांच्या विदेशी असण्यावरून पवार काँग्रेसमधून फुटून निघतात आणि लगेच झालेल्या निवडणुकीनंतर जातीयवादी शक्तीला म्हणजे भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी राज्य आणि केंद्रातल्या काँग्रेसप्रणीत सरकारात सहभागी होतात. पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारला अणू करारावरून जेरीस आणणाऱ्या डाव्यांशीही ते मैत्र ठेवून असतात. ‘पेशवाई आणणार का?’ अशी जहरी टीका भाजपच्या ज्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार करतात त्याच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार यावं, यासाठी त्यांचा राष्ट्रवादी ‘जातीयवादी’ पक्ष भाजपला विनाशर्त बाहेरून पाठिंबा देतो, हे दिल्लीच्या दरबारी राजकारणाला मानवणारं मुळीच नसतं. बरं, या संदर्भात स्वत: शरद पवार कायम सोयीस्कर मौन बाळगून असतात! म्हणजे शरद पवार सर्वांचे आहेत, पण प्रत्यक्षात कोणाचेच नाहीत, असा समजाचा त्रिशंकू दिल्लीच्या राजकारणात आहे.
महाराष्ट्रात शरद पवार यांची स्थिती त्या संकटमोचक नेत्यासारखीच आहे. शरद पवार यांच्या पाठीशी महाराष्ट्र एकमुखी उभा असल्याचा कौल मराठी माणसानं आजवर कधीच दिलेला नाही, याचा एक पत्रकार म्हणून पुलोदच्या प्रयोगापासून अनेकांसोबतचा साक्षीदार मीही आहे. ममता बॅनर्जी, (पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद भाजपच्या भरवशावर मिळवूनही भाजपच्या कट्टर विरोधक झालेल्या) मायावती, जयललिता, मुलायमसिंह, नवीन पटनाईक यांच्याप्रमाणे जनमताचा कौल म्हणा की, पूर्ण विश्वास शरद पवार यांना महाराष्ट्राकडून मिळवता आलेला नाही आणि यापुढेही तो मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे कथित तिसऱ्या आघाडीला समजा सत्ता मिळाली तरी संख्याबळाअभावी शरद पवार यांना पंतप्रधानपदासाठी बोली लावता येणार नाही.
राहता राहिला प्रश्न काँग्रेसकडून पंतप्रधानपद मिळण्याचा. इंदिरा गांधी यांच्या युगापासून गांधी घराण्याशी शरद पवार यांचे सूर सौहार्दाचे कधीच नव्हते. आजही ते तसे आहेत असा दावा खुद्द पवारही करतील याची कदापिही शक्यता नाहीच. शिवाय काँग्रेस हा देशव्यापी आणि पक्ष आहे. या पक्षाचा चेहरा आता निर्विवादपणे राहुल गांधी झालेले आहेत आणि तेच काँग्रेसच्या सत्ताप्राप्तीसाठी देशातील जनमताचा कौल मिळवू; शकतात शरद पवार नाहीत. अशा स्थितीत समजा २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला (आज अजिबात शक्यता दिसत नसलेलं) पूर्ण बहुमत मिळालं तर राहुल गांधी हेच पंतप्रधान होणार हे स्पष्टच आहे (मेहनत करे मुर्गा, अंडा खाये फकीर हाच नाही तर कोणीही कितीही मेहेनत करो, अंडे म्हणजे नेतृत्व गांधी घराण्याकडेच जाणार, ही काँग्रेसी परंपराच आहे!); समजा काँग्रेस हा सभागृहातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून विजयी झाला (तीही शक्यता आजच्या घटकेला तरी धूसरच दिसते आहे!) आणि सत्तेसाठी या पक्षाने दावा केला तरी पुन्हा तेच; संख्याबळाअभावी शरद पवार पंतप्रधानपदासाठी दावा करूच शकणार नाहीत आणि त्यांनी तो केला तर काँग्रेस पक्ष मान्य करणार नाही. एकुणात काय तर, शरद पवारांच्या पंतप्रधानपदाचं मिथक एक न सुटणारं कोडं राहणार असं दिसतंय!
शेवटी एक राजकारणी म्हणून शरद पवार अनेकदा आवडतात आणि अनेकदा आवडत नाहीत; तरी मी त्यांचा चाहता आहे. म्हणूनच पंतप्रधान होण्याची शरद पवार यांची (सुप्त) महत्त्वाकांक्षा २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून प्रत्यक्षात उतरो आणि कोट्यवधी मराठी माणसाला तो क्षण सेलिब्रेट करण्याची संधी मिळो, याच मनापासून शुभेच्छा!
.............................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
pravin sapkal
Fri , 20 April 2018
सर, आपला लेख खूप अभ्यासपूर्ण आणि वास्तावादी आहे. ज्ञानात भर पाडलीत त्याबद्दल धन्यवाद ! मी पाठीमागे एका दैनिकाच्या दिवाळी अंकात गोविंद तळवलकर सरांचा लेख वाचला होता...त्यातही असेच संदर्भ देण्यात आले होते. तुम्ही म्हंटल्याप्रमाणे पवार साहेब हे दिल्लीच्या राजकारणात आणि देशाची निती म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणात रमलेले दिसलेले नाहीत.त्यामुळं ते पंतप्रधान व्हावेत ही प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे....पण आपल्याला वास्तावाचं भान असायला हवं हे मात्र नक्की....
Gamma Pailvan
Thu , 19 April 2018
नमस्कार प्रवीण बर्दापूरकर! एका विशिष्ट परिप्रेक्ष्यात बघितलं तर पवारांना spring chicken म्हंटलेलं बरोबर आहे. कुठला परिप्रेक्ष्य ते मी सांगंत नाही. या परिप्रेक्ष्यास मोदींनी अगदी पार सुरुंग लावलेला नसला तरी पडझड निश्चितपणे सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पवारसाहेब अंगाला माती फासून गादीवरच्या कुस्तीस तर उतरले नसतील? आपला नम्र, -गामा पैलवान
Uddhav V
Mon , 16 April 2018
चांगला लेख !! लेख वाचून बाॅलिवूडच्या सल्लूमियाॅंची आठवण झाली की हो. सल्लूमिया गेली २५ वर्षे बाॅलिवूडचे 'मोस्ट एलिगिबल बॅचलर' म्हणून मिरवत आहेत. पण अजूनही त्यांचे काही फायनल सूत जुळले नाही व ते बॅचलरच आहेत. आता मुळात त्यांना हा मोस्ट एलिगिबल बॅचलरचा हुद्दा कोणी दिला, तर तो त्यांच्याच चमच्यांनी दिला. त्यामुळे झाले काय की ते मोस्ट एलिगिबल बॅचलर असले किंवा नसले तरी निदान त्यांचे नाव बॅचलरच्या लिस्ट मध्ये राहिले व रणवीर, रणधीरच्या जमान्यात अजूनही लिस्ट मध्ये आहे. तसे बघायला गेले, तर अजूनही बॅचलर राहण्यात त्यांच्या स्वत:च्या कृत्यांचाही बराच हात आहे. म्हणजे त्याना भरपूर चांगली स्थळे ( ऐश्वर्यवान, कॅट स्टाईल वगैरे) सांगून आली होती, पण त्यांनी कधी आपला 'हात' तर कधी 'लाथ' चालवून हि स्थळे गमावली. कधी 'गाडी' तर कधी ' घोडा ! (कट्टेवाला) नको त्या ठिकाणी चालवला, व वकिलांची धन केली. पण अजूनही मियाॅं, मोस्ट एलिगिबल बॅचलर आहेत. असो.....ह्या सल्लूच्या गोष्टी आणि पंतप्रधान पदात इच्छुक असलेला एका राजकारणी यात काहीसे साम्य आहे. बघा हं, हा सल्लू जसा खूप वर्षे बॅचलर आहे, तसे ते राजकारणीही गेल्या २५ वर्षापासून पंतप्रधानपदाचे इच्छुक उमेदवार आहेत. मोस्ट एलिगिबल आहेत की नाही हे मात्र माहीत नाही. तसेच ते पंतप्रधान बनले नाहीत याचे कारण त्यांचीच कृत्ये, जशी की बेडूकउड्या मारणे, खंजीरफेम वगैरे. यामुळे बाकीच्या नेत्यांचा त्यांच्यावर भरवसा नाय वाटला व ते PM नाही होउ शकले. तरी आता निवडणूक आली की त्यांच्या भक्तगणांना साहेबच आठवतात. अजून एक साम्य म्हणजे सल्लूमिया जसा लग्नाचा विषय काढला की टाळतो , तसे हे साहेबही, लोकसभानिवडणूक आली की आपण पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये नाही असेच सांगतात. पण आजकाल हळूहळू त्यांना वास्तवाचे भान आल्यासारखे वाटते, त्यामुळे गेल्यावर्षी त्यांनी राष्ट्रपती पदासाठी प्रयत्न केल्याचे कानावर आले. पण मोदींनी UP मध्ये सिक्सर मारला आणि या साहेबांचे राष्ट्रपतीपदाचे स्वप्नही भंगले की हो...जाउ दे भगवंताच्या मनांत काय आहे आपल्यासारख्या पामराला काय कळणार हो ? पण शेवटी काही वर्षांनी, खरे पंतप्रधान नसलो तरी, 'जनतेच्या मनातील पंतप्रधान/राष्ट्रपती आम्हीच' असे सांगण्याची वेळ साहेबांवर न येवो हिच आमची श्रीचरणी प्रार्थना.