अजूनकाही
पूर्वीच्या काळी पेंढाऱ्यांची एक जमात असे. कोणत्याही राजवटीला न जुमानता सामान्य जनतेचा छळ करून त्यांचे ते जीव घेत. समांतर न्याय व्यवस्था चालवत. सरकारी मालमत्ता लुटणे, लोकांना ठार करून त्यांची संपत्ती हडप करणे, अशी कामे ते करत असत. हा व्यापक सामूहिक गुन्हेगारीचा एक प्रकार होता. तेच पेंढारी आजकाल अहमदनगर शहरात अवतरले आहेत की काय असा प्रश्न इथल्या लोकांना पडतो आहे.
हे शहर हे वाईट ट्रेंडसाठी कुप्रसिद्ध झाले आहे.
आधीच्या या शहराची जातीय दंगलींमुळे कायम बदनामी होत असे.
मुस्लिमांची भीती दाखवून राजकारण करणारे लोक दंगली घडवत आणि आपली पोळी भाजून घेत.
हे शहर औरंगाबाद आणि पुणे यांच्यामधील एक महत्त्वाचा थांबा.
सहकाराची पंढरी, दुधाचे आगार, मोठी पाणलोट धरणे, शिर्डी-शिंगणापूर अशी लोकप्रिय नवदैवते, राळेगण-हिवरे बाजारमधील आदर्श गाव कामे, स्नेहालय-माऊलीसारखे समाजसेवी प्रकल्प; कला साहित्यक्षेत्रातील बालकवी, ना.वा. टिळक, लक्ष्मीबाई टिळक, ख्रिस्तगीतकार कृ. र. सांगळे, उमाकांत ठोमरे ते आजचे रंगनाथ पठारे, कला अभिनय क्षेत्रात शाहू मोडक, मधुकर तोडमल ते सदाशिव अमरापूरकर, मिलिंद शिंदे ते आजचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी या शहराची सकारात्मक मुद्रा घडवली.
परंतु या कामावर एका क्षणात बोळा फिरवून या नव्या पेंढाऱ्यांनी शहराची वाट लावली आहे. अर्थात हे अभद्र काम त्यांनी ऐंशीच्या दशकापासून सुरू केलेले दिसते.
चौकाचौकात पहिलवान, वस्ताद ही नगरची जुनी ओळख होती. हेच पहिलवान दादागिरीच्या क्षेत्रात उतरले. समाजासाठी ताकद वापरणारे छबुराव रानबोके पहिलवान इतिहासजमा झाले आणि काळे धंदे, दादागिरी करणारे, जुगार-दारू अड्डे चालवणारे लोक या शहराला बिघडवू लागले.
जुन्या हिंदी चित्रपटात दाखवत तसे इथे सत्तर-ऐंशीच्या दशकात असलेले टांगेवाला, हमाल, कुणी दूधवाला, हातगाडीवाले छोटी-मोठी दादागिरी करत, गुंडगिरीने साम्राज्य तयार करत आज महत्त्वाची पदे बळकावून बसले आहेत. हे आपसात एकमेकांचे सोयरेही झालेत.
सर्वपक्षीय सोयरेधायरे राखून होत असलेली ही संघटित गुन्हेगारी आता या शहराला नवी राहिली नाही.
दारू, मटका, जुगार, हॉटेल्स, वेश्याव्यवसाय अशा सर्वच ठिकाणी यांचा हात आहे. भैया, दादा, भाऊ, हे परवलीचे शब्द आहेत.
हे शहर विस्तार पावू लागले, तसे जिल्ह्याचे ठिकाण म्हणून बाहेरून लोक येऊन इथे स्थिरावू लागले. यात लँडमाफिया आणि त्यांना जोडून पुढे सँड माफिया तयार झाले. जागांच्या गुंतवणुका करणारे पुढे बिल्डर झाले, दादागिरी करणारांशी बिल्डरलॉबीची साठगाठ झाली. शहरात हजार बिल्डर पण त्यांच्या बहुतांच्या खिशात राजकारण्यांची ठेव... काही विशिष्ट उद्योगपती, बिल्डर, तथाकथित डॉक्टर, पत्रकार, फोटोग्राफर, कलाकार, साहित्यिक, कार्यकर्ते लोकांच्या घरी यांच्या तसबिरी टांगल्याचे दिसते. तेव्हा आपण कुठल्या अंधेरनगरीत राहतोय याचाच साक्षात्कार होतो.
त्यांच्यातला निगरगट्टपणा क्रमाने सामाजिक, शिक्षण, कला आणि साहित्यक्षेत्रात अभिसरीत झाला आहे. आणि हे शहर अक्षरशः सडत गेले आहे.
संस्काराचे धडे देणाऱ्या तथाकथित लोकात पक्ष सत्तेवर आला तरी त्यांना लायक लोक उभे करता येईना. याला हे संघटित गुंड कारण. पर्यायी हे लोक पुन्हा मवाली, दादागिरी, गुंडगिरी करणाऱ्यांच्या हाती नेतृत्व देण्यासाठी गेले. रोजची भांडणे, टोळीयुद्ध यातून या गावटग्यांनी एक नामी उपाय काढला. यांनी एकमेकांच्या घरात सोयरसंबंध करून या शहराला कायमचे दहशतीत लोटले. मग हे सारे एकमेकांच्या हातात घेत धाक घालून गाव हाकू लागले. मोक्याच्या जागा बळकावणे, विकलेल्या जागा व घरे कालांतराने पुन्हा बळजोरी करून कवडीमोल भावात खरेदी घेणे, घर खाली करत नसेल तर त्याला जिणे नकोसे करणे, असे विकृत उद्योग यांनी केले आहेत. दुसऱ्याची मोकळी असलेली घरे धाक दडपशाही करून बळकावणे, प्रसंगी लोकांचे खून करणे, आणि ते कायमसाठी दडपणे, हे कायमचेच झाले.
कितीतरी गोरगरीब लोक, सरकारी नोकर, शिक्षक यांचे त्यांच्या कुटुंबियांसह हालहाल करून खून केल्याचा घटना लोकांना आता मुखोदगत झाल्या आहेत. यातल्या एकाच्या नावावर गावातील चाळीसपेक्षा जास्त खून जमा आहेत. काळ्या धंद्याचे राखण म्हणून सगळ्या मार्गावर यांची हॉटेल्स आहेत. भरमसाठ व्याजाने पैसे देऊन त्याच्या वसुलीच्या तगाद्याला कंटाळून शहरात अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या आहेत.
जिल्ह्यातील लोकांची विशिष्ट गुन्ह्यात असलेली मानसिकता या नगरी प्रभावाने भारलेली आहे, उदाहरण म्हणून पाहायचे तर वीस वर्षांपूर्वीचे कोठेवाडी आणि नंतरचे सोनई, खर्डा, शिर्डी, जवखेडा, कोपर्डी, छिंदम, कोतकर ही राज्य आणि देश ढवळून काढणारी गुन्हेगारी ठळक उदाहरणे फक्त गेल्या पाच वर्षांतलीच आहेत.
यात भर म्हणून शहरातील भ्रष्ट सहकार, भेसळ, लूटमार, भ्रष्टाचार, दरोडे, अपहरण, ब्लॅकमेलिंग, शिर्डी, शिंगणापूर इथली बजबजपुरी, लुटारू समाजसेवक, भ्रष्टाचारी साहित्यिक अशी आणखी उदाहरणे काढली तर विविध क्षेत्रांतील हे गुन्हेगार देशाला ‘चुकीच्या अर्थाने मार्गदर्शक’ ठरत आहेत. आणि प्रत्यक्ष बिहार सुधारला असल्याचे समोर आलेले असताना महाराष्ट्रातल्या अहमदनगरने त्याची जागा घेऊन ती कीड आपल्यात फोफावत असल्याचे दाखवून दिले आहे. विश्वासराव नांगरे-पाटील एस.पी. असताना त्यांनी एका किडीचा कायमचा बंदोबस्त केला, तर कृष्णप्रकाश एस.पी. असताना त्यांनी केलेला बंदोबस्त करूनही तो नंतरच्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे न केल्यासारखा निष्प्रभ झाला.
आणि सगळ्या भारताला मार्गदर्शन करणारे अण्णा हजारे या नगरी गुंडांबद्दलच काय, नगर जिल्ह्यातल्या कोणत्याही अन्याय, अत्याचार वा अपप्रवृत्तींबद्दल तोंड उचकत नाहीत. यावरून त्यांचे तथाकथित गांधीपण हे नगरपुरते अगदीच कुचकामी आहे. किंबहुना असलीच तर इथल्या अन्याय, अत्याचारांना त्यांची मूकसंमती आहे, असे समजायला हरकत नाही. इतके त्यांचे विक्षिप्त वर्तन नजरेतून सुटू शकणार नाही असे आहे.
इथल्या जनतेत गुंडांचा दबाव आहे. कोणतेही महत्त्वाचे सरकारी काम, खासगी काम यांच्या आशीर्वादाशिवाय पार पडत नाही. यांना मलिदा पोहोच करावा लागतो. जिल्ह्यातील प्रत्येक पुढारी आपल्या तालुक्याची चड्डी सांभाळण्यात मग्न आहे. त्याला जिल्हा मुख्यालयाच्या सार्वजनिक पडझडीचे काही घेणे-देणे नाही, मोजके अपवाद वगळता नगरचे पत्रकार हे यांचीच प्यादी आहेत.
येथील पत्रकार, साहित्यिक आपापल्या पातळीवर टोळीयुद्ध खेळून या गुंडपुंडांची भ्रष्ट नक्कल करून आम्हीही कमी नाही हे दाखवत असतात. त्यामुळे इथे न्याय होणे दुरापास्त आहे.
यांच्या हातून नाहक मारले गेलेले, खून झालेल्या घरच्या लोकांचे, विशेषतः लहान मुलांच्या तोंडचे उदगार ऐकले तर शहराच्या पोटात सामान्य माणसाच्या अस्वस्थतेचा ज्वालामुखी खदखदतो आहे.
.............................................................................................................................................
संपर्कासाठी
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment