अजूनकाही
महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आमदारकीच्या सहा जागांचे निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जबर धक्का देणारे आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज (बाबा) चव्हाण यांनी या निकालानंतर अत्यंत स्फोटक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘साताऱ्यात काँग्रेसच्या मोहनराव कदम (हे पतंगराव कदम यांचे बंधू आहेत.) यांना लोकांनी जिंकवले आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धूळ चारली. यावरून सातारा-सांगलीची जनता स्वाभिमानी आहे हे दिसते. या जनतेने बारामतीचा आदेश धुडकावला आणि स्वाभिमान जपला.’
बाबांची ही प्रतिक्रिया राष्ट्रवादीला झोंबणार हे उघड आहे. कारण या निवडणुकांच्या निकालांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वांत जास्त तोटा झाला आहे. या सहा जागांपैकी चार जागा राष्ट्रवादीच्या खिशात होत्या. त्यापैकी फक्त पुण्याची जागा अनिल भोसले यांनी राखल्याने राष्ट्रवादीला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. इतर तीन जागा मात्र राष्ट्रवादीला हकनाक गमवाव्या लागल्या. अजितदादा पवार यांच्या हेकट, हट्टी धोरणामुळे राष्ट्रवादीला हा पराभव पत्करावा लागला हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अजितदादांना टीकेचे धनी व्हावे लागणार हे ओघाने आलेच.
यानिमित्ताने काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातले राजकारण पुन्हा टकराव घेणार आहे. बाबा आणि दादा यांचे विळ्या-भोपळ्याचे सख्य जगजाहीर आहे. मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण हे अजितदादांचे काही चालू देत नसत. उपमुख्यमंत्री असूनही आपला योग्य मान ठेवला जात नाही याचे शल्य अजितदादांना नेहमी वाटत असे. त्यामुळे या दोघांमध्ये सतत खटके उडत.
पवार-चव्हाण वादाला सातारा-सांगलीच्या राजकारणाचीही पार्श्वभूमी आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना ऐन उमेदीच्या काळात कराड लोकसभा मतदार संघांत श्रीनिवास पाटलांकडून शरद पवारांनी हरवले होते. तो पराभव बाबांच्या एवढा जिव्हारी लागला होता की, पवार हे नाव काढले तरी त्यांच्या कपाळावर आठ्या पडत.
राजकीय अपरिहार्यता म्हणून पृथ्वीराज चव्हाण-शरद पवार-अजितदादा यांनी आघाडीचे राजकारण केले खरे, पण त्यांचे सूर कधी जुळले नाहीत. हे सूर न जुळण्याला वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांच्या राजकारणाचेही कंगोरे आहेत. सांगली-सातारा भागात वसंतदादांचा गट नेहमी प्रबळ असे. हा गट शरद पवारांना कधी मानत नसे. कारण १९७८साली शरद पवारांनी फसवून वसंतदादांना मुख्यमंत्री पदावरून घालवले आणि अल्पमतात असूनही स्वत:च्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालून घेतली. वसंतदादांच्या पाठीत पवारांनी खंजीर खुपसल्याची ही बोच सांगली-सातारकरांना नेहमी सलते. असो.
तर बाबा-दादांच्या राजकारणाचे हे कंगोरे या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा टोकदार झाले आहेत. लिहिता लिहिता आठवले. चालू वर्ष वसंतदादा पाटलांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. वसंतदादा माणूसलोभी लोकनेता म्हणून प्रसिद्ध होते. त्यानिमित्ताने वर्षभर कार्यक्रम होतील. दादांच्या स्मृती जागवल्या जातील. अवघे काँग्रेसजन एक करणे हे, त्यांचे ध्येय होते. नेमक्या त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांतच बारामतीचा आदेश आणि साताऱ्याचा स्वाभिमान यांची टक्कर व्हावी हे विशेष घडले आहे. तर हेही असो.
या निवडणुकीत पुण्यातून राष्ट्रवादीचे अनिल भोसले, यवतमाळमधून शिवसेनेचे तानाजी सावंत, नांदेडमधून काँग्रेसचे अमर राजूरकर, भंडारा-गोंदियामधून भाजपचे परिणय फुके, सांगली-साताऱ्यातून काँग्रेसचे मोहनराव कदम, जळगावमधून भाजपचे चंदूलाल पटेल हे उमेदवार विजयी झाले आहेत. या सर्वांचे अभिनंदन करायलाच हवे. पण त्याचबरोबर प्रसारमाध्यमांमध्ये या निवडणुकीचे जे विश्लेषण आले आहे, त्याकडेही डोळेझाक करून चालणार नाही.
या निवडणुकीतले प्रसारमाध्यमांचे पहिले टीका-निरीक्षण असे आहे की, या निवडणुकीत पक्षांच्या निष्ठेपेक्षा पैसा जिंकला. पक्षनिष्ठा, तत्त्व या साऱ्याला या निवडणुकीत तिलांजली देण्यात आली. उमेदवारांनी लक्ष्मीदर्शनाला महत्त्व दिले. या निवडणुकीतले मतदार महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांचे सदस्य म्हणून निवडून आलेले असतात. सध्या नगरपालिका निवडणुकांचा सुकाळ, हंगाम जोरात आहे. एकाद्या छोट्या वार्डातून, गटातून निवडून येण्यासाठी या सदस्यांना वारेमाप पैसा खर्च करावा लागतो. स्वत: पैसा वाटून निवडून आलेले हे लोक स्वत:चे मतदान साधूवृत्तीने करणार नाहीत हे उघडच आहे. त्यामुळे या निवडणुकीत पैसा वाटून निवडून आलेल्यांची मते अधिक पैसा वाटून मिळवण्याची चढाओढ झाली असणार, यासाठी कुठल्या पुराव्याची गरज नाही.
लक्ष्मीदर्शनाचा यथेच्छ वापर या निवडणुकीत होतो हे आता लपून राहिलेले नाही. म्हणून निवडून आलेले लोक धनबलाने श्रेष्ठ होते म्हणूनच आमदार होऊ शकले हे कुणी बोलले तर त्यात सत्याचा काही अंश असणारच हे गृहीत धरायला काहीच हरकत नाही.
या निवडणुकीत जळगावचा निकाल एकनाथ खडसेंना पीडादायक आणि मंत्री गिरीश महाजनांना आनंददायक ठरणारा आहे. खरे तर भाजपने चंदूलाल पटेल या पक्षात फारसे सक्रिय नसणाऱ्या पण पैसेवाल्या उमेदवाराला तिकीट दिले होते. पटेल हे महाजनांच्या जवळचे. त्यामुळे खडसे या निवडणुकीपासून दूर फेकले गेले. महाजनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा उमेदवार पडणे परवडणारे नव्हते. म्हणून खडसेंनी पाडापाडीचे राजकारण केले नाही, पण त्यामुळे त्यांचा प्रभाव या निवडणुकीवर दिसला नाही. यापूर्वी खडसे म्हणजे सबकुछ जळगाव हे चित्र होते. ते आता महाजनांनी खोडून काढले आहे. खडसेंना आपले उपद्रवमूल्य या निवडणुकीत दाखवता आले नाही. त्यामुळे त्यांचा प्रभाव दिसला नाही. जळगावात महाजनांनी एकहाती बाजी मारली.
आजवर विधान परिषदेत राष्ट्रवादी हा सर्वांत मोठा पक्ष होता. आता काँग्रेस हा पक्ष मोठा झाला आहे. आपली संख्या जास्त म्हणून राष्ट्रवादीने काँग्रेसच्या शिवाजीराव देशमुखांना घालवून रामराजे निंबाळकरांना आणले, धनंजय मुंडेंना विरोधी पक्षनेता बनवले. आता मात्र राष्ट्रवादीचे संख्याबळ घटल्याने काँग्रेस राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडणार नाही. त्यामुळे येत्या काळात बारामतीचे आदेश आणि साताऱ्याचा स्वाभिमान यांची टक्कर सतत घडेल. त्यातून पडणाऱ्या राजकीय ठिणग्या महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळणार आहेत.
लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.
rajak2008@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment