सांस्कृतिक-राजकीय संघर्षात स्त्रीचं शरीर रणभूमी होतं हेच खरं!
अर्धेजग - कळीचे प्रश्न
अलका गाडगीळ
  • ‘द व्हर्जिन स्प्रिंग’चं पोस्टर आणि असिफा
  • Sat , 14 April 2018
  • अर्अधे जग कळीचे प्रश्न कथुआ kathua असिफा Asifa इंगमार बर्गमन Ingmar Bergman द व्हर्जिन स्प्रिंग The Virgin Spring अलका गाडगीळ Alka Gadgil

जम्मूतील कथुआ इथं आठ वर्षांच्या असिफावर झालेल्या सामूहिक बलात्काराचे नवनवीन विकृत तपशील पुढे येत आहेत. असिफाला संपवण्याचं ठरवल्यानंतर स्पेशल पोलिस ऑफिसर दीपक खजुरिया यांनी आपल्या गँगला फोन करून कळवलं, ‘थांबा थोडं, मला अखेरचा बलात्कार करू द्या’. विकृतीची परीसीमा काय असू शकते? पण ही केवळ मानसिक विकृती नाही. त्यामागे आहे अघोषित धार्मिक आणि सांस्कृतिक युद्ध आणि पूर्वनियोजित कट.   

युद्धकाळात बलात्कार हत्यार म्हणून वापरलं जातं. जर्मनीच्या नाझींनी आणि पूर्व बंगालात पाकिस्तानी सैन्यानं या शस्त्राचा उपयोग केला. जगात इतरत्रही अनेक संघर्षांमध्ये शत्रूला नामोहरम करण्यासाठी आणि शत्रूपक्षातील पुरुषांना नामर्द ठरवण्यासाठी हे हत्यार वापरलं जातं. स्त्रियांची शरीरं राजकीय रणभूमीसारखी वापरली जातात!

लहान मुलीच्या बलात्कारातील अतीव हिंसेचा शोध इंगमार बर्गमन या विश्वविख्यात स्वीडिश दिग्दर्शकानं ‘द व्हर्जिन स्प्रिंग’ या सिनेमात घेतला. कथुआ बलात्कारातील भीषणतेच्या बातम्या वाचताना कॉलेजच्या फिल्म सोसायटीमध्ये पाहिलेला बर्गमन यांचा हा सिनेमा सतत आठवत राहिला.

या चित्रपटाची संहिता तेराव्या शतकातील एका स्वीडिश लोककथेवर आधारलेली आहे. कारीन नावाची दहा वर्षांची मुलगी इंगेरी या आपल्या सावत्र बहिणीसोबत चर्चमध्ये सुगंधी मेणबत्त्या अर्पण करण्यासाठी निघते. वाट वनातून जाणारी असते. दोघींची मौजमजा सुरू असते. इंगेरी मात्र अर्ध्या रस्त्यात वेगळ्या दिशेनं चालू लागते. पुढे कारीनला मेंढपाळ भेटतात. विशीतल्या दोघा मोठ्या भावांबरोबर त्यांचा दहा वर्षांचा धाकटा भाऊही असतो. कारीन त्यांच्यासोबत गप्पा मारू लागते, आपलं जेवण त्यांना देऊ करते. मोठ्या भावांच्या मनात मात्र काळंबेरं येतं. ते तिच्यावर बलात्कार करतात आणि तिचा खूनही करतात. तिच्या अंगावरचे दागिने आणि तिचा मौल्यवान पोषाख ते आपल्या सोबत घेतात. तिच्या सुगंधी मेणबत्यांना ते पायानं तुडवतात. हे घडत असताना दुसरीकडे निघून गेलेली इंगेरी तिथं पोचलेली असते. लांबवरून ती सारं पाहत असते. लहान भाऊ हिंसेचा हा थयथयाट पाहून अत्यंत भयभीत होतो. त्याला कापरं भरतं. पुढे ते तिघं रात्रीच्या आसऱ्यासाठी अजाणता कारीनच्याच गढीवर येतात. घरी कारीनचे बाबा टोअर, आई मारीटा आणि नोकरचाकर असतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

घरी आलेल्या वाटसरूंना आश्रय द्यायचा प्रघात हे कुटुंब पाळतं. यजमान रात्रीचं जेवण या तिघा भावांसोबत घेतात. लहान भाऊ मात्र जेवत नाही. तो अस्वस्थपणे इकडेतिकडे पाहत राहतो. त्याला अजीर्ण झाल्याचं मोठे भाऊ सांगतात. जेवणाआधी येशूची प्रार्थना केली जाते.

जेवण झाल्यानंतर भावांना त्यांची खोली दाखवण्याचं काम मारीटा करत असतानाच ते दोघे भाऊ म्हणतात, ‘आम्हाला पैशांची जरूरी आहे, असेच पैसे आम्हाला नको, आमच्याकडे मौल्यवान पोषाख आणि दागिने आहेत. ते तुम्ही घ्या आणि आम्हाला पैसे द्या’. कपडे बघून मारीटा चमकते. ते ताब्यात घेऊन ती कशीबशी बाहेर येते आणि त्या खोलीला कुलूप लावून घेते.

आपल्या मुलीचे कपडे बघून टोअर अस्वस्थ होतो. त्यावरचे रक्ताचे डाग बघून त्याला रडू कोसळतं. तोपर्यंत इंगेरी परत आलेली असते. ती सारं काही सांगते. बलात्कार आणि खून तिनं पाहिलेला असतो. पण मध्ये पडून कारिनला वाचवण्याचं काम मात्र ती करत नाही. कारीनबद्दल तिला मत्सर वाटत असतो. ती लख्ख गोरी, तर इंगेरी कमी गोरी. कारीन आईबाबांचं अपत्य, तर ती टोअरच्या अनौरस संबंधातलं मूल. पण आता मात्र इंगेरी दु:ख आणि पश्चात्तापानं होरपळत असते.

आपलं दु:ख आवरून टोअर पाहुण्यांच्या खोलीत जातो. खंजीराचे सपासप वार करत तो मोठ्या भावांना मारतो. अत्यंत भयभीत झालेल्या आणि विकृतीच्या दर्शनानं आजारी पडलेल्या लहान भावालाही तो निघृणपणे मारतो.

इंगेरी आई-बाबांना गुन्ह्याच्या ठिकाणी घेऊन जाते. तिथं कारीनचं विटंबना झालेलं मृतशरीर पडलेलं असतं. तिचं डोकं वर उचलल्याबरोबर जमिनीतून झरा वाहू लागतो. आई-बाबा आणि इंगेरीला शोक आवरत नाही. पण केलेल्या हत्यांमुळे टोअर होरपळलेला असतो. शोकमग्न अवस्थेत तो देवाची आळवणी करतो आणि मानवी हत्या केल्याच्या पापाबद्दल क्षमायाचना करतो. आणि त्याच स्थळी चर्च बांधण्याचं वचन देवाला देतो.

चित्रपटाचा काळ आहे तेराव्या शतकातला. या काळात स्वीडनमध्ये बरीच उलथापालथ झाली होती. ख्रिश्चन धर्मपीठ आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत होतं. ख्रिश्चॅनिटीच्या लाटेपुढे स्वीडनमधल्या मूळ पेगन धर्मानं लगेच नांगी टाकली असं झालं नाही. या धर्माची कोणतीही मागणी नव्हती. विशाल मंदिरं नव्हती. पेगन धर्मानं असंख्य बंधनं लादली नव्हती. म्हणून नवव्या शतकापासून पुढची तीन शतकं मोठा संघर्ष झाला होता. (हिंदू आणि बौद्ध धर्मही पेगन मानले जातात.)

स्वीडनमधील बहुसंख्य संघटित धर्मावर विश्वास न ठेवणारे. ओडीन आणि इतर देवतांवर जनतेची श्रद्धा. फसवून वा सक्तीनं धर्मांतर झालेले पुन्हा आपल्या स्थानिक धर्माकडे वळत होते.

मात्र टोअरसारख्या काहींनी नवीन धर्माचा स्वीकार केलेला असतो. या नव धर्मांतरितांना रोमन चर्च भरघोस मदत करत होतं. समाजातील अनेकांना या नव्यानं बाटलेल्यांबद्दल घृणा वाटत असे. ओडीन हा देव युद्ध, सूड, मृत्यू आणि काळकोठडीचा. ओडीनच्या भक्तांना नवख्रिश्चनांचा वचपा काढायचा असतो.

या दोन समाजांच्या संघर्षात अल्पवयीन कारीनला वेठीस धरलं जातं. सूड घेतला जातो तिच्या शरीराच्या माध्यमातून. या बालिकेचं शरीर रणभूमी म्हणून वापरलं जातं.

टोअर आणि त्याचं कुटुंबं धर्मांतरित असलं तरी त्याचा सूड ओडीनच्या तत्त्वानुसार होतो. ख्रिश्चन धर्मातलं क्षमेचं तत्त्व पुरेसं न मुरल्यामुळे टोअर ख्रिश्चन देवाची आळवणी करतो आणि त्याची माफीही मागतो.

कथुआची कथा ‘व्हर्जिन स्प्रिंग’पेक्षा फारशी वेगळी नाही. चित्रपटातील सामाजिक संघर्ष आणि त्या काळातली स्वीडनमधील अस्वस्थतेचं प्रतिबिंब इथंही पडलंय. अशीच विकृत सूडबुद्धी नाझी काळातही होती आणि सूड घेण्याचं, दहशत पसरवण्याचं एक माध्यम होतं स्त्रीचं शरीर!

ज्यू, जिप्सी आणि पोलीश या नाझींना अप्रिय असणाऱ्या तीन समाजातील स्त्रियांना काही स्वतंत्र छळ छावण्यात ठेवण्यात आलं होतं. त्यापैकी पोलीश स्त्रियांनी सांगितलेली एक कहाणी अंगावर शहारे आणणारी आहे.

मध्यरात्री सैनिक येतात. छावणीतल्या जिप्सी स्त्रीला खेचून आडवं करतात. इतरांना बाहेर काढतात, फक्त अकरा वर्षांच्या मुलीला मात्र तिथxच ठेवलं जातं. सैनिक जिप्सी स्त्रीवर बलात्कार करतात. पाळलेले शिकारी कुत्रे तिच्यावर सोडतात. कुत्रे अत्याचारित नग्न स्त्रीच्या शरीराचे लचके तोडतात. तिच्या स्तनाचेही लचके तोडले जातात. रक्ताचं थारोळं तयार होतं. स्त्रीचा आक्रोश हळू हळू मंद होतो. तिचं तडफडणही अखेरीस थांबत. ती मान टाकते.

ही विकृत हिंसा पाहणाऱ्या मुलीवर पाच सैनिक आळीपाळीनं बलात्कार करतात. तिला जखमी करतात. त्यावर दारू ओततात. पण तिच्या छातीची वाढ झालेली नसते, त्यामुळे स्तनाचे लचके निघत नाहीत. सैनिक निघून गेल्यावर इतर स्त्रिया बराकीत परतात. त्या नि:शब्दपणे जमीन साफ करतात. मृत स्त्रियांना बराकीबाहेर ठेवतात. काही स्त्रिया माती उकरायला लागतात. कोणीही काही बोलत नसतं कारण बोलण्यासारखं काही राहिलेलंच नसतं.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

कथुआची कथा यापेक्षा काय वेगळी आहे?

गेल्या काही वर्षांपासून जम्मूतील रसाना विभागात राहणाऱ्या बकेरवाल या भटक्या जमातीवर हल्ले होतायत. जम्मूतील डोगरा हिंदूंना वाटू लागलंय की, मुसलमानांच्या जमातींना इथं पाठवून जम्मूही कश्मीर खोऱ्याप्रमाणे मुस्लीमबहुल करण्याचा डाव आहे. दोन वर्षांपूर्वी निराश्रित रोहिंग्यांना जम्मूत आसरा दिल्यामुळे तणाव वाढला. या आत्यंतिक तिरस्कारानं आठ वर्षाच्या असिफाचा बळी घेतला.

सांझीराम या कटाचा मास्टरमाइंड. हा सांझीराम सरकारी कर्मचारी होता. दहशत उत्पन्न करून बकेरवाल जमातीला जम्मूतून पळवून लावायचं असं त्यानं ठरवलं. आपली ही योजना त्यानं आपला भाचा, त्याचा मित्र आणि  इन्स्पेक्टर दीपक खजूरियाला सांगितली.

जम्मू पोलिसांनी आपल्या आरोपत्रात घटनेचे असंख्य तपशील नमूद केले आहेत.   

१० जानेवारीच्या दुपारी आपल्या वाट चुकलेल्या खेचरांना शोधत असिफा रसानाला आली. सांझीरामच्या भाच्यानं तिला पाहिलं. खेचर दाखवतो असं सांगून त्यानं तिला देवळाजवळ आणलं. काहीतरी गडबड असल्याचं असिफाला वाटलं असावं. तिनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. सांझीच्या भाच्यानं तिला खाली पाडलं आणि तिच्या तोंडात गुंगी आणणारी गोळी कोंबली. ती बेशुद्ध पडल्यानंतर तो तिला घेऊन देवळात गेला. हे देऊळ सांझीरामनेच बांधलेलं. त्या पुढचे तीन दिवस सांझी, त्याचा भाचा, भाच्याचा मित्र, पोलीस अधिकारी खजूरिया यांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केले. तिला सतत गुंगीची औषधं पाजण्यात येत होती.

सतरा जानेवारीला रसानाजवळ असिफाचं शव सापडलं. दोन दिवसांनी एका किशोरवयीन मुलाला अटक करण्यात आली. नंतर या घटनेचे तपशील पुढे आले.

भारतात मुस्लिम आणि दलित समाजांविरोधात अघोषित जिहाद पुकारला गेला आहे, याचं प्रत्यंतर गेल्या चार वर्षांत वेळोवेळी येत आहे. स्त्री शरीरासोबत इतिहास, अन्न, पोषाख, ऐतिहासिक व्यक्ती आणि त्यांची नावं, पाठ्युपुस्तकं, साहित्य, सोशल मीडिया यासहित अगणित शस्त्रांचा वापर या सांस्कृतिक संघर्षांत केला जातोय.

गेल्या वर्षी शंभूलाल रेगार यानं अफजरूल या कारागिराला मरेपर्यंत मारलं आणि पेट्रोल टाकून त्याला जाळून टाकलं. ही घटना घडली सहा डिसेंबरला. बाबरी मशीद पाडल्याचा हा वर्धापन दिन. राजस्थानमधील राजसमंद या निमशहरात हा प्रकार घडला. अफजरूल लव्ह जिहाद प्रकरणात होता, असा आरोप त्यानं केला होता. प्रत्यक्षात आपलंच एक लफडं लपवण्यासाठी त्यानं ही हत्या केली, असं राजस्थान पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात नमूद केलं आहे.

एका बाजूला स्त्री शिक्षणाचा प्रसार वाढतोय तसंच तिच्यावर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाणही वाढतंय. बलात्कार झाल्यानंतर महिलेला संपवण्याची प्रकरणंही वाढीला लागली आहेत. 

‘व्हर्जिन स्प्रिंग’मधील टोअरच्या इस्टेटीचा कारभारी सायमन अनाहूतपणे आलेल्या तीन मेंढपाळाना पाहून गूढपणे म्हणतो, ‘दिवसाची सुरुवात सुंदर असू शकते, पण त्याचा शेवट दु:खानं होण्याची शक्यता असते. आज आशेचा किरण लखलखला. सूर्य लख्खपणे तळपू लागला. हाडांपर्यंत पोचणाऱ्या थंडीचा संताप शांत झाला. माझे पाय आनंदानं थिरकायला लागले...पण रात्र पडायच्या आत ती मरून पडली’.

सायमनचं बोलण भविष्यसूचक होतं. कारीनही आशेनं निघालेली असते. मौजमजा करत ती पुढे जात असते. तिची विटंबना होतेच, शिवाय तिनं सोबत घेतलेल्या मेणबत्यांचाही चुराडा होतो.

सांस्कृतिक-राजकीय संघर्षात स्त्रीचं शरीर रणभूमी होतं हेच खरं!

.................................................................................................................................................................

लेखिका अलका गाडगीळ मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.

alkagadgil@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

Post Comment

vishal pawar

Tue , 17 April 2018

वास्तव....


Nikhil Alte

Sat , 14 April 2018

Virgin Spring......... (in India)


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लग्नासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या सबळ असणे आणि विशिष्ट वयाचे असणे महत्त्वाचे नसून भावनिकदृष्ट्या स्थिर असणे, सर्वांत जास्त गरजेचे आहे, याचा आपण जोवर विचार करणार नाही, तोवर अतुल सुभाषसारखे बळी जातच राहतील

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भावना व नाती हाताळायची पद्धत वेगळी असते का, असा प्रश्न सामान्य व्यक्तीला पडू शकतो. एवढे उच्चशिक्षित, तंत्रज्ञानावर हुकमत असलेली हे लोक जेव्हा भावनांचा भाग येतो, तेव्हा का अपयशी ठरत असावेत? अतुल सुभाष यांचा दुर्दैवी मृत्यू हा पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबधित, भारतीय लग्नसंस्थेविषयी आणि कायदा व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करतो.......