अजूनकाही
श्री क्षेत्र आळंदी इथं कालपासून ‘पहिले पसायदान विचार साहित्य संमेलन’ सुरू झाले आहे. उद्यापर्यंत चालू असलेल्या या संमेलनाचे उदघाटन कवी, समीक्षक वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणाचा हा संपादित अंश...
.............................................................................................................................................
भूवैकुंठ एक पंढरी, त्याहुनी आगळी अलंकापुरी, सिद्धेश्वराशेजारी, इंद्रायणी अशा पवित्र स्थळी श्री ज्ञानदेव महाराजांनी संजीवन समाधी घेतली. सातशेबावीस वर्षांपूर्वीची ही घटना आहे. तथापि मराठी मनात ती सदैव वास करून आहे, आणि त्या महापुरुषाचे स्थानही मराठी माणसाच्या अंतरंगात अबाधित आहे. त्यांनी केलेल्या गीतेवरील भाष्याला आपण ‘भावार्थदीपिका’ या नावाने ओळखत नाही, तर ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘ज्ञानदेवी’ म्हणतो. ती ज्ञानदेवांची वाङ्मयी मूर्ती आहे, तिच्या रूपाने मूर्तिमंत ज्ञानदेवच भेटतात अशी आपली श्रद्धा आहे. आपण त्या काळात नव्हतो, पण नामदेव महाराजांनी अतिशय हृदयंगम आणि हृदयद्रावक वर्णन लिहून ठेवलेले आहे. साऱ्या वासनाविकारांच्या पलीकडे गेलेल्या निवृत्तिनाथांच्या स्थितीचे वर्णन पाहिले तरी वियोगाचा हा प्रसंग सर्वांनाच किती कठीण जात होता हे समजते. निवृत्तिनाथ हे ज्ञानदेवांचे गुरू होते, पण ते वडील बंधूही होते. नामदेवमहाराजांच्या अभंगात निवृत्तिनाथांचे माणूसपण दिसते. ते योगी होते, तरी त्यांच्यातले माणूसपण गेलेले नव्हते. बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट, ओघ बारा वाट, मुरडताती अशी त्यांची स्थिती होती. संत विरक्त होते, योगी होते, वैयक्तिक सुखदु:खांच्या पलीकडे गेलेले होते. परंतु त्यांचा माणसांविषयीचा जिव्हाळा नाहीसा झालेला नव्हता. माणसांच्या दु:खांनी ते व्याकूळ होत. जगाने दिलेल्या दु:खांच्या पलीकडे जाऊन ते जगाविषयी, त्यातल्या दु:खीकष्टी माणसांविषयी विचार करीत असत. श्रीज्ञानदेवांनी याच विचाराने मराठीत ‘भावार्थदीपिका’ रचली. त्यांच्या या ग्रंथात ठायीठायी मराठी भाषेविषयी प्रेम आहे आणि ते अतिशय सुंदर शब्दांत व्यक्त झाले आहे. या आम्हा सर्वांच्या आद्य कविकुलगुरूंसमोर आम्ही नम्र होण्याशिवाय दुसरे काहीच करू शकत नाही.
ज्यांनी अनुभवाच्या नौका, पार केले लोकां, जडमूढा अशा ज्ञानदेव महाराजांच्या समाधीच्या परिसरात आपण आहोत. आजच्या आमच्यासारख्या जडमूढ लोकांना वासनाविकारांचा महापूर आलेल्या काळनदीच्या पलीकडे घेऊन जाणारी नौका आहे का कुठे, याचा जवळजवळ विसरच पडलेला आहे. ती नौका आहे, आणि ती कुठे बांधलेली आहे, याचे भान आणून देण्यासाठी हे संमेलन आहे याची मला खात्री आहे.
पसायदान विचार साहित्य संमेलनाचे प्रवर्तक आणि संयोजक श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी एका लेखात अशा संमेलनाची आवश्यकता का आहे याचे विवेचन केलेले आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे त्याप्रमाणे ‘ज्ञानेश्वरी’चे सारतत्त्व असलेले ‘पसायदान’ हे केवळ मानवतेचे महन्मंगल स्तोत्रच नाही, तर तो उद्याचा आदर्श मानव समाज कसा असावा याची नीलप्रत समाजास देणारा शाश्वत लोककल्याणकारी विचार आहे. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे विश्वशांतीसाठी पसायदान हे रचलेले महान असे शांतिसूक्त आहे. श्री ज्ञानदेवांची पसायदानात व्यक्त झालेली विश्वदृष्टी आजच्या साहित्यिकांनी आत्मसात केली पाहिजे, हा या संमेलनामागे असलेला विचार आहे. आपल्या भोवतालच्या जगाकडे नीट पाहिल्यास हा विचार किती आवश्यक आहे आणि तो किती मोलाचा आहे हे आपणा सर्वांच्याच लक्षात येईल.
कसे आहे आपले आजचे जग?
एडवर्ड मुंक (१८६३-१९४४) यांचे द स्क्रीम (१८९३) हे एक प्रसिद्ध असे चित्र आहे. या चित्रात एक व्यक्ती आहे. चित्रातील व्यक्तीच्या विवर्ण चेहऱ्यावर भय दाटून आलेले आहे. लाकडी पुलावर उभ्या असलेल्या त्या व्यक्तीने आपले दोन्ही हात कानांवर ठेवलेले आहेत. त्याने किंकाळी फोडली आहे, आणि ती चित्रातली व्यक्ती असली तरी आपल्याला ती किंकाळी ऐकू येते. वरचे लाल आभाळ आणि खाली असलेल्या त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरची फिकट पिवळसर आभा. त्याच्या चेहऱ्यावरचे विलक्षण असे भय. समोर काय आहे? इतके भय वाटावे असे काय आहे?
ते आतले अस्तित्वजन्य, आपल्या अस्तित्वाशी निगडित भय असू शकते, अथवा या भयाचा उगम बाह्य स्थितीतही असू शकतो. भ्यावे असेच काही बाहेर घडत असावे. चित्रकाराने चित्राच्या रूपाने भय व्यक्त केले आहे. भयाची कारणे त्याने दाखवलेली नाहीत. दुसरेही एक प्रसिद्ध चित्र आहे. ते या चित्रानंतर ४४ वर्षांनी काढलेले आहे.
पाब्लो पिकासोचे ‘ग्वेर्निका’ (१९३७) हेही एक प्रख्यात चित्र आहे. स्पेनमधल्या ग्वेर्निका नावाच्या छोट्या गावावर नाझी जर्मनीने बॉम्बहल्ला केला होता. त्यात गाव उद्ध्वस्त झाले आणि हजारो निरपराध माणसे ठार झाली. युद्धामुळे होणाऱ्या शोकांतिकांचे चित्रण या चित्रात केले आहे. चित्रातील डाव्या बाजूला एका भागात मेलेले मूल मांडीवर घेऊन बसलेली एक स्त्री आहे. तिचा चेहरा आकाशाकडे वळलेला आहे, आणि ती आकांत करते आहे. पृथ्वीवरच्या या अतिशय सामान्य स्त्रीचा आकांत कुणाच्या कानावर जाणार आहे? तिच्या बाजूलाच मेलेल्या व देहाचे तुकडे झालेल्या सैनिकाचा हात आलेला आहे. त्याच्या उघडलेल्या तळव्यावर जखमेचा व्रण आहे. तो येशूच्या तळहाताला झालेल्या जखमेचा संदर्भ सांगणारा आहे. येशूने सर्वसामान्य माणसांसाठी क्रूसावरचे मरण स्वीकारले. हा एक साधा सैनिकही माणसांसाठीच बळी पडतो.
या चित्राच्या मध्यभागी वेदनेने कळवळणाऱ्या जखमी घोड्याचे तोंड आहे. त्याच्या गळ्यावर खोल घाव झालेला आहे. या चित्रात एक मूढ हताश बैल आहे. आकाशाकडे हात फैलावून आकांत करणारी एक मनुष्याकृती आहे. या चित्रातील बैल हा बैल आहे, आणि घोडा हा घोडा आहे असे पिकासोने म्हटले आहे. त्याच पद्धतीने या चित्रातील स्त्री ही स्त्री आहे, आणि मेलेले मूल हे मेलेले मूल आहे, त्या स्त्रीचा आकांत हा एका स्त्रीचा आकांत आहे असे आपण म्हणू शकतो.
हे भयावह वास्तव आहे आणि ते या चित्रातून व्यक्त झाले आहे. त्या स्त्रीचे तोंड वर वळलेले आहे. पण तिकडे कोण आहे? निर्दयपणे बॉम्बचा वर्षाव करणारी विमाने आहेत.
१९३७ पासून आता २०१८ पर्यंत हिंसेचे थैमान जागतिक आणि स्थानिक स्तरावर आपण अनुभवतो आहोत.
आज एकविसाव्या शतकात आपल्या भोवतीच्या जगात भय वाटावे असे बरेच काही आढळते. आपल्या मुलांची कलेवरे मांड्यांवर घेऊन विलाप करणाऱ्या असंख्य माता आढळतात. अलान कुर्दी हा तीन वर्षांचा छोटा सिरियन मुलगा समुद्रकिनाऱ्यावर मेलेला आढळला. त्याचे निलुफर देमिरने काढलेले छायाचित्र जगभर पाहिले गेले आणि ते निराश्रितांविषयीच्या जगाच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणारे ठरले. ते छायाचित्र ही एक कलाकृती आहे किंवा नाही याविषयी वाद होतील. परंतु जबाबदारीची जाणीव निर्माण करणारी प्रत्येक कलाकृती ही कलाकृती असतेच, आणि ती आपल्या काळातली एक भयानक बातमीदेखील असते. ईदच्या आधीच्या दिवशी जुनैद नावाच्या युवकाला ट्रेनमधल्या सहप्रवाशांनी मारून प्लॅटफॉर्मवर फेकून दिले होते. त्याच्या आईचे छायाचित्र पाहिले. त्या छायाचित्रातील चेहऱ्यावर हताशा, भय, आघात आणि दु:ख आहे, असहायता आहे. अलीकडच्या काळातील वृत्तपत्रांतील अनेक छायाचित्रे आठवतात. कुणा तरुणाने आत्महत्या केलेली असते, तर कुणाची हत्या झालेली असते. ते राष्ट्रीय महाकाव्यातील वीरनायक नसतात, ते राष्ट्राच्या वर्तमानातील सामान्य इसम असतात. आर्थिक कोंडीमुळे आत्महत्या केलेले, धार्मिक विद्वेषामुळे हत्या झालेले सामान्य लोक. पण त्यांच्या चैतन्यहीन देहांच्या शेजारी बसलेल्या असहाय मातांचा मूक आक्रोश सामान्य नसतो.
मग माणसाने घाबरणे, घाबरत राहणे, भयभीत होणे आणि थरथरत राहणे हेच आहे का आपल्या काळाचे निदान?
कवींनी, लेखकांनी, विचारवंतांनी, चित्रकारांनी, चित्रपटकारांनी थरथरत राहावे?
मग कविता, कथा, कादंबरी, नाटक, चित्र, चित्रपट कुणाला काय देत असते? हे सगळे लिहिणारे, चितारणारे विश्वाच्या अक्राळविक्राळ रूपाचे दर्शन घडवत असतात. परंतु आता हे लेखकदेखील थिटे पडतील असे काही विचित्र घडते आहे. मीच एकदा म्हटले होते : मी हे टिपण, विचारार्थ पुढे मांडत आहे : विचार करणाऱ्यांनी विचार करावा. या आपल्या काळाला, आपल्या आसपासच्या आजच्या काळाला, काय झालेले आहे? चालता बैल एकाएकी खाली कोसळावा, आणि चारही पाय झाडू लागावा, तसे याचे का म्हणून झालेले आहे?
विचार करणाऱ्यांनी विचार करावा. नाहीतर आहेतच मौनात जाण्याची अनेक कारणे.
हे आमचे आजचे जग आहे.
मागे एक चित्र पाहिले होते. एका माणसाला अजगराने विळखा घातलेला आहे. त्याचवेळी वरच्या मधाच्या पोळ्यातून मध ठिबकतो आहे, आणि तोंड उघडून ते मध तो प्राशन करतो आहे. आजच्या स्थितीची विपरीतता अशी आहे की, तो अजगराला कुरवाळतो आहे, त्याच्या कांतीची तारीफ करतो आहे, आणि मधाकडे दुर्लक्ष करतो आहे. तो अजगर त्याला गिळणार आहे हे त्याला समजत नाही.
.............................................................................................................................................
‘सेपिअन्स - मानवजातीचा अनोखा इतिहास’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406
.............................................................................................................................................
श्री ज्ञानदेवांनी अकराव्या अध्यायात म्हटले आहे : किती नाना प्रकारचे आकार व रूपें आहेत पाहा :
काही किरकोळ, तर काही लठ्ठ; कोणी आखूड, तर कोणी लांबलचक; काही पसरट, तर काही सरळ, आणि काही तर केवळ अमर्याद; काही बेफाम, तर काही गरीब; कित्येक चंचल, तर कित्येक निश्चळ; कोणी विरक्त, कोणी ममताळू, तर कोणी अत्यंत कडक; कित्येक धुंद, तर कित्येक सावध; काही उथळ, काही खोल; काही उदार, काही चिकट, तर काही कोपिष्ठ; कोणी शांत, तर कोणी माजोरी; कोणी निर्विकार, तर कोणी आनंदित; कोणी गरजणारे, तर कोणी मौनी, तर कोणी मनमिळाऊ; कोणी आशाळभूत, तर कोणी विषयी; कोणी जागे, तर कोणी निजसुरे; कोणी संतुष्ट, कोणी लोभट, तर कोणी समाधानी; कोणी सशस्त्र, तर कोणी शस्त्ररहित; कोणी अतिभयंकर, तर कोणी अतिस्नेहाळू; कोणी भ्यासुर, कोणी विलक्षण, तर कोणी समाधिमग्न; कोणी प्रजाजनाच्या कामात गुंतलेली, कोणी प्रेमाने प्रजापालन करणारी, कोणी रागावेगाने प्रजासंहार करणारी, तर कोणी केवळ तटस्थपणे सर्व मजा पाहणारी...
हे विश्वरूपदर्शन लेखकाला, कवीला, चित्रकाराला, चित्रपटकाराला होत असते. तो ते पाहतो, आणि घाबरतो, दु:खी होतो, खिन्न होतो, संतापतो, उद्विग्न होतो, थकून जातो...आणि लिहितो, चितारतो.
साहित्यात- कवितेत, कथेत, कादंबरीत, नाटकात, चित्रात, चित्रपटात हे विश्वरूपदर्शन घडते.
हल्ली आपण कोणी रागावेगाने प्रजासंहार करणारी, तर कोणी केवळ तटस्थपणे सर्व मजा पाहणारी अशी माणसे पाहतो.
श्रीज्ञानदेव आणि त्यांची भावंडे तेराव्या शतकात ज्या स्थितीतून गेली असतील त्याची आपण कल्पना करू शकतो. इतक्या विपरीत परिस्थितीत त्यांची शांती ढळली नाही, आत सगळे विषारी वायू ओढून बाहेर त्यांनी जगद्कल्याणाचा प्राणवायू दिला. गांजलेली मने शांत करणारी ज्ञानेश्वरी दिली. राष्ट्रीय व्यापारी मार्गावर, जिथे खाण्यापिण्याचे तत्कालीन ढाबे असत, तिथे गाड्या सोडून, बैलांपुढे चारा ठेवून, ही सामान्य माणसे ज्ञानेश्वरांचे भाष्य ऐकायला जमत. तिथल्या थोर माणसांच्या साधेपणामुळे ही माणसे तिथे सहजपणे बसत. निवृत्तिगुरूचा व ज्ञानेशांचा संवाद ऐकत, आल्हादित होत. आमच्या आद्यकवीने अगदी सामान्यांच्या भाषेत, त्यांना कळेल आणि आपल्या भाषेचे सौंदर्यही समजेल, अशा रीतीने, एक महत्त्वाचे तत्त्वज्ञान त्यांच्यासमोर मांडले. दैनंदिन जीवनातील अनेक दृष्टांतांसह मांडले.
आम्हीच असे आहोत की अजगराच्या विळख्याचे सुख अनुभवत आहोत, आणि त्याची उघडउघड प्रशंसा करीत आहोत. हा आजचा अजगर राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक आहे हे समजत असले तरी भ्रमात राहू इच्छितो, त्याच्या फुंकरीने आम्हाला आंधळे केले आहे, आमच्यात विचारमांद्य उत्पन्न केले आहे, हे आम्हाला समजत नाही.
म्हणून पसायदान विचार साहित्य संमेलन. बाजारी उपभोगवादी व असहिष्णु बनत चाललेल्या समाजाला सहजीवनाचे, सहअस्तित्वाचे मर्म समजून सांगण्यासाठी. हे काम ज्ञानदेवासारखा कवीच करू शकतो. आजच्या आमच्यापैकी नामदेव ढसाळांनी म्हटले आहे :
दुष्टांनी पोचविली आहे पृथ्वीला इजा
कवी जाणतात हे सर्व
कवीच पृथ्वीला वाचवू शकतात
सर्वनाशापासून!
मग माणसाने घाबरणे, घाबरत राहणे, भयभीत होणे आणि थरथरत राहणे हेच आहे का आपल्या काळाचे निदान?
कवींनी, लेखकांनी, विचारवंतांनी, चित्रकारांनी, चित्रपटकारांनी थरथरत राहावे?
याचे ‘नाही’ हे उत्तर आहे. आपल्या मागे आपला बाप ज्ञानेश्वर उभा आहे. त्याचे ‘पसायदान’ हा आमचा महत्तम वारसा आहे.
.............................................................................................................................................
लेखक वसंत आबाजी डहाके प्रसिद्ध कवी, समीक्षक आहेत.
vasantdahake@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment