आज, उद्या आणि परवा (१३ ते १५ एप्रिल २०१८) श्रीक्षेत्र आळंदी इथं ‘पहिले पसायदान विचार साहित्य संमेलन’ होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षा व लोकसाहित्य व संतसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा संपादित अंश...
.............................................................................................................................................
स्त्री-देह हा कितीही मोठा अडसर असला तरी वैराग्याची ऊर्मी आणि निश्चयाचे बळ बळकट असेल तर स्त्री किती मोठ्या संतपदाला पोहचू शकते, याचे उत्तर म्हणजे संत बहिणाबाईंची चरित्रानुभवगाथा आहे. त्यांचा हा सगळा अंतर्बाह्य संघर्ष संत तुकोबारायांच्या संघर्षाशी खूप जवळचे नाते सांगतो. म्हणून तर संत तुकोबारायांनाच गुरू करावा, अशी ओढ तिला लागली नसेल ना! आणि प्रपंचाचा अडथळा उभा करणाऱ्या स्त्री-पुत्रादिकांना ‘रांडा-पोरे’ म्हणणारे तुकोबारायही त्याचिये जातीच्या’ वैराग्य मार्गावरच्या स्त्रिया भेटल्यावर स्त्री-पुरुष ही जाती विसरून एकच भगवत्भक्ताची जाती जाणत नसतील ना, असेही वाटते.
एकूण संत बहिणाबाईंनीही अखेर ‘स्वैरिणी’ झाल्याची गर्जना केली हे खरे!
संत कान्होपात्रांनी तर देवाला पती म्हणून प्रथमपासून निवडले असल्याने मानवी पुरुषांचा संपर्क हाच तिला अनाचार वाटतो. त्या देहमीलनाच्या भाषेतच म्हणतात,
तुझे म्हणविता । दुजे अंगसंग ।
उणेपणा सांग कोणाकडे ?
संत चोखोबारायांची बहीण निर्मळाही प्रपंचाला विटली.
बहु मज उबग आला असे देवा,
नाही मज आशा आणिक कोणाची।
अशा वेळी माणूस मदत त्या काय करणार? मला देहातीत शुद्ध आत्मतत्त्वाची ओढ लागली आहे.
पंचमहाभूते ही अवघा त्यांचा खेळ,
आत्मा तो निर्मळ शुद्ध आहे॥
अशा देहातीत अनुभवाकडे जाण्यासाठी सर्व संतांनी ‘स्वैरिणी’ होणे खुशीने स्वीकारले आहे.
परमेश्वराला पती, प्रियकर, परपुरुष म्हणवून घेणे संत स्त्रियांना भूषणाचे वाटते. त्याचप्रमाणे गुरूचीही महती वाटते. गुरूही ईश्वररूपच। त्याच्या संगतीमुळे जरी जनापवाद आले तरी त्याची पर्वा संत स्त्रिया करीत नाहीत.
रामदासी संप्रदायातील अंबाबाई स्वतःला ‘सद्गुरूची सौरी’ म्हणवून घेणे गौरवाचे समजतात.
मी सद्गुरूघरची सौरी, शोभत्ये बरी ।
किंवा आणखी एके ठिकाणी त्या स्पष्टच म्हणतात,
रामदासाश्रय म्या केला।
अंबि न विसरे गुरुपदाला ॥
रामदासांच्या अनुग्रहित अशा स्त्रियांना अन् स्वतः रामदासांना समकालीनांचे अपवाद सहन करावे लागलेच. तरुण विधवा वेणाबाईंबाबत हे प्रारंभी झालेच होते. पण वेणाबाईला जननिंदेची पर्वा नाही.
आमुच्या वाटे नका जाऊ ।
नये ते वाटे तुम्हां लाऊ ॥
आम्ही पारिखे पारिखे ।
न हो लौकिकासारिखे ॥
म्हणून एके ठिकाणी अध्यात्ममार्गीयांचे वेगळेपण सांगण्याचा वेणाबाईंनी प्रयत्न केला आहे. गुरुसंगतीमुळे
कोणी निंदिती, कोणी वंदिती
वास मी त्यांची पाही ना ।
हृदयाशी धरिले गुरुचरण
प्राणांतीही विसंबेना ॥
म्हणून एके ठिकाणी आपला दृढनिश्चय वेणाबाई व्यक्त करतात. अगदी एकोणिसाव्या शतकातील बालविधवा गोदामाई कीतने यांनाही परमार्थाची वाट चोखाळताना ‘स्त्री देहाची बुंथी’ हा मोठा अडसर ठरला होता. त्यातून गुरूने, गुरुभक्तीनेच त्यांना मुक्त केले होते. गोदामाई आपला अनुभव सांगताना म्हणतात,
पडिले स्त्री देहाचे बुंथी ।
स्वतंत्र फिरता न ये जगती ॥
त्याचे नि ते कृपामूर्ती
दर्शन होती तै सरे ॥
येथे गोदामाईंनी योजलेला ‘बुंथी’ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. ‘बुंथी’ म्हणजे आवरण. आत्मतत्त्वाला सगुण होताना व्यक्त देहाचे आवरण घ्यावे लागते. हा व्यक्त देह एक नराचा (पुरुषाचा) तरी असेल किंवा मादीचा (स्त्रीचा) तरी असेल. माझ्या बाबतीत हे स्त्री-देहाचे आवरण असल्याने स्वातंत्र्यात फार मोठा अडथळा आला आहे. परंतु गुरुभेटीनंतर हा अडथळाही दूर झाला. ‘आवरणाचे’ बंधन नाहीसे झाले. व्यक्त देह नराचा की मादीचा? स्त्रीचा की पुरुषाचा? हा प्रश्नच उरला नाही. अंतिमतः सर्व एकच आहे. अद्वैतच आहे, असा अनुभव आला. गुरुभेटीनंतरच्या आणि गुरुकृपेनंतरच्या (रामचंद्र महाराजांच्या तिकोटीकर भेटीनंतरच्या) या अवस्थेचे वर्णन त्या करतात,
यापरी स्वरूप न्याहाळीता । गोदा पावली
तटस्थता ॥
सुसमाधी भोगता ॥ देहावस्थित झाली ॥1॥
राहिले स्त्री-पुरुष भान । राहिले ज्ञातिकुलवर्ण ।
एक परब्रह निर्वाण । सच्चिदानंद कोंदले ॥2॥
अशा देहातीत अनुभवानंतर त्या पर(म)पुरुषाचे सुख भोगण्यासाठी ती आपोआपच निःसंग झाली. त्या अनुभवाचे वर्णन त्या रतिसुखभोगाच्या परिभाषेतच करतात.
झाले निःसंग निःसंगभोग भोगाया हो ।
परात्पर पुरुषाशी रत झाले, अर्पुनिया काया हो ॥
सांडिली लाज सारा लौकिक हो ।
परात्पर पुरुषाशी निजसदनी दिधला थारा हो ॥
तयाविण न गमे लव पळहि जाता वाया हो ॥10॥
हा रतीच्या अनुभवसुखाचा मार्ग नरदेहावाचून येत नाही, म्हणून नरजन्मही महत्त्वाचा ठरतो. म्हणून हे सुख घेताना कितीही जनापवाद सहन करावे लागले तरी त्याची पर्वा नाही. त्याला-पर- पुरुषाला-घातलेली मिठी मी काही झाले तरी सोडणार नाही. रात्रंदिवस त्या परात्पर पुरुषाच्या उपभोगसुखात रत राहण्यात, त्याला काया अर्पण करण्यात आपल्या जीवनाची सार्थकता आहे, असे गोदामाईला वाटते.
.............................................................................................................................................
‘सेपिअन्स - मानवजातीचा अनोखा इतिहास’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406
.............................................................................................................................................
एकीकडे देहाचे भोग हे बंधक आहेत, मुक्तिमार्गातले अडसर आहेत हे सांगत असतानाच देहातीत परब्रह्मप्राप्तीच्या सुखाचा अनुभव देहाच्या रतिभोग अनुभवाच्या भाषेतच सगळे संत सांगत आले आहेत. संत मीरेची तर उत्कट विरहाची अनेक पदे आहेत.
मैं तो प्रेम दिवानी मेरा दरद न जाने कोय?
अशी तिची गोड तक्रार असते. अगदी ज्ञानदेवही जेव्हा ज्ञानी ज्ञानदेवाच्या भूमिकेतून उत्कट भक्त ज्ञानदेवांच्या भूमिकेत येतात आणि ईश्वरविरहाचे वर्णन करतात तेव्हा हीच रतिभोगाची परिभाषा वापरतात.
चंदनाची चोळी, माझे सर्व अंग जाळी ।
या शब्दांत सांगतात. किंबहुना संतांच्या ‘विराणी’ (विरहिणी) रचना या ईश्वरविषयक उत्कट ओढीतून, रतिभावातून केलेल्या वर्णनांची सुंदर उदाहरणे आहेत.
येथे आणखी एक मजेशीर बाब आहे. पुरुष संतांनी स्वतःकडे स्त्री-भूमिका घेऊन परमेश्वर ओढीविषयी व्यक्त केलेले उत्कट भाव आहेत. येथे मधुराभक्तीची उत्कट छाप आहे. परंतु महाराष्ट्रात बंगालसारखा मधुराभक्तीचा थेट प्रवाह नाही.
एक मात्र दिसते, प्रपंच हा परमार्थमार्गातला अडथळा आहे, हे सांगताना अगदी पुरुष संतांनीही प्रपंच हा सासर किंवा नवरा या प्रतीकात पाहिला आहे आणि हा नवरा सोडून निःसंग झाल्याशिवाय त्या पर(म)पुरुषाची, परमेश्वराची प्राप्ती होणार नाही, हे पुनःपुन्हा सांगितले आहे. हा मानवी नवरा अन् सासर, अनुषंगाने सासरची सर्व माणसे सोडायला हवीत. त्यासाठी निःसंग व्हायलाच हवे. निर्लज्ज म्हणवून घ्यायला भ्यायचे कारण नाही. कारण बोलून चालून ते ‘सौरी’ (स्वैरी-स्वैरिणी) होणे आहे. ‘स्वैरिणी’ म्हणून घेणे पुरुष संतांनाही हवे आहे. नव्हे, त्याखेरीज त्यांच्या मनातली ईश्वरविषयक ओढ पुरतेपणाने, नेमकेपणाने व्यक्त झाली आहे असे पुरुष संतांनासुद्धा वाटत नाही.
सर्व संतांनी आपले मनोभाव व्यक्त करण्यासाठी या ना त्या प्रकारे रूपकात्मक काव्यरचना केल्या आहेत आणि त्यात प्रत्येकाची हमखास एक तरी रचना ‘सौरी’ या शीर्षकाची आहे. प्रस्तुत स्त्री-संत हा प्रतिपादनाचा मुख्य विषय असल्याने पुरुष संतांच्या ‘सौरीविषयक’ रूपक रचनांची जास्त उदाहरणे देण्यास अवकाश नाही आणि त्याची गरजही नाही. परंतु शितावरून भाताची परीक्षा व्हावी, या न्यायाने नमुना म्हणून काही उदाहरणे देत आहे.
तुकाराम महाराज सर्वांत परखड अन् स्पष्टवक्ता म्हणून प्रसिद्ध आहेत. आडवाटांनी जाणे आणि आडवाटांनी बोलणे त्यांना फारसे माहीत नाही. तरीही ते याच परिभाषेत बोलतात. परमेश्वर हा परपुरुष ! त्याचे सहवाससुख हे सर्वांत उत्कट सुख. परंतु स्वगृहाचा आणि स्व-पतीचा त्याग करून त्या परपुरुषाचे सुख भोगण्यासाठी नुसती इच्छा असून चालत नाही, हिंमतही असावी लागते. जनमर्रादा झुगारून देण्याचे अलौकिक धाडस असावे लागते. प्रसंगी मस्तक उतरवून देण्याची वेळ आली तरी ते सहन करण्याची तयारी असावी लागते. प्रपंचातली वेदना एकपट असेल तर परमेश्वराकडे जाताना दसपट वेदना सहन करावी लागते. अर्थात हे एक दिव्यच असते. हा भाव व्यक्त करताना तुकाराम महाराज म्हणतात,
परपुरुषाचे सुख भोगे तरी,
उतरौनि करी घ्यावे शीस ॥
परंतु परपुरुषाचे सुख हे परमसुख आहे आणि कितीही किंमत द्यावी लागली तरी ते भोगावेच, याबद्दल तुकारामांचा आग्रह आहे.
ज्ञानदेवांच्या विराणी रचनांचा उल्लेख यापूर्वी केला आहेच. ज्ञानदेवही स्वतःकडे परपुरुषाकडे जाणाऱ्या व्यभिचारिणी, परद्वारिणी (घररिघी) नारीचीच भूमिका घेतात. त्याखेरीज ईश्वरभेटीची उत्कटता नेमकेपणाने व्यक्त झाली आहे असे त्यांना वाटत नाही.
पतीव्रता मी परद्वारिणी हो ।
परपुरुषेसी व्यभिचारिणी हो ॥
रूपकात्मक भारूड रचना हे खास संत एकनाथांचे क्षेत्र! नाथांनी लोकगीतसरणीच्या भारूड रचनांतून लोकशैलीत नर्मविनोदाचा, उपहास-उपरोधाचा अन् विडंबनाचा आश्रय घेत घेत पुन्हा व्यभिचारिणी होणाऱ्या उत्कट भक्ताचीच भूमिका मांडली आहे.
दारिद्रयाने गांजलेली पोराबाळ्यांच्या उपाशीतापाशी लेंढाराने कावलेली, बेपर्वा नवऱ्याच्या जाचाला उबगलेली स्त्री हे ग्रामीण भारतातले सर्वसामान्य चित्र आजही आहे. नाथांच्या काळात तर ते अधिक प्रमाणात असणार. अशा वेळी त्या दरिद्री संसाराचे वर्णन करीत त्या स्त्रीशी सहानुभाव साधीत या सगळ्यातून सुटण्याचा मार्ग ते पटकन सांगून टाकतात,
नवरा नको ग बाई ।
मला दादला नको ग बाई ।
लौकिक वास्तव जीवनातील अनुभवातून अलौकिकाकडे जाण्याचा मार्ग सांगताना जणू ते गांजलेल्या स्त्रीच्या अंतर्मनाचाच वेध घेतात. प्रपंचात दारिद्रयाने गांजलेल्या स्त्रीलाही कदाचित वाटत असेल की या सगळ्या जाचणुकीच्या अनर्थाचे मूळ म्हणजे नवरा. म्हणून
नवरा नको ग बाई...
मग द्वयर्थी रचनेन ‘नवरा नको’ असण्याची जी कारणमालिका दिली जाते ती लौकिक प्रपंचातल्या दुःखाची अन् वेदनेची नित्य अनुभूतीच असते.
लौकिक अन् अलौकिकाच्या क्षेत्रात सारख्याच समर्थपणे फिरत ठेवणारा नाथ महाराजांच्या रचनेतील आशय अन् अभिव्यक्ती केवळ अ-पूर्व आहे.
आणि मग त्या नवऱ्याबरोबर सगळे सासरही नकोसे होते. नाथांचा ‘रोडगा’ त्या दृष्टीने लक्षणीय आहे.
सत्वर पाव गे मला भवानीआई,
रोडगा वाहीन तुला ॥
या मुखड्याने रचनेचा नाट्यपूर्ण प्रारंभ होतो. मग सासरच्या एकेका व्यक्तीचा समाचार घेतला जातो. ‘हे भवानी आई, माझा सासरा गावी गेला आहे. तिकडेच त्याला खपव, जाच करणाऱ्या सासूला लवकर निर्दाळून टाक, फडफड बोलणाऱ्या जावेला बोडकी कर (विधवा कर), नंदेचं कारटं सारखं किरकिरत असतं, त्याला एकदाची खरूज येऊ दे... एकूण काय तर छळवादी सासरच्या सगळ्याचा काटा काढ एकदाचा ! आणि या सगळ्या अनार्थांचं मूळ म्हणजे नवरा. हा नवराच केला नसता तर सासरची नाती कशी जुळली असती? म्हणून नवरा हे सगळ्या जाचाच्या अनर्थाचं मूळ. त्याला सगळ्यात मोठी शिक्षा मात्र मीच देईन.’
दादला मारून आहुती देईन,
मोकळी कर ग मला ॥
एका जनार्दनी सगळेच जाऊ दे,
एकटीच राहू दे मला ॥
दादल्याला मात्र जाळूनच नष्ट करायला हवा. देहभोगाच्या मोहाचे समूळ उच्चाटन दादला-नवरा नष्ट करण्याच्या प्रतीकातून संत एकनाथांनाही व्यक्त करावेसे वाटते हे महत्त्वाचे.
यापूर्वी अक्कमहादेवींनेही नवरा जाळून टाकण्याचीच परिभाषा वापरली होती, त्याचे येथे स्मरण होते.
प्रपंचातून मुक्ती मिळवणे हे सर्वच संतांचे ध्येय होते. त्यासाठी प्रपंच-मोहातून मोकळे होणे, निःसंग होणे, फकिरी स्वीकारणे आणि लौकिक भयातून मुक्त होणे, निर्द्वंद्व होणे हे उद्दिष्ट होते. स्त्रियांचेही तेच उद्दिष्ट होते.
परंतु लौकिक-भौतिक जीवनातले अडथळे आणि ओढाळ इंद्रियमोह जबरे बंधक आहेत याचे भान त्यांना होते. या जबऱ्या इंद्रियमोहासाठी पुरुषसंतांनीही ‘नवरा’ हेच प्रतीक मानून स्वतःकडे स्वैरिणीची भूमिका का घ्यावी? पुरुष संतांनाही अशीच प्रतीके का वापरावीशी वाटली? तीही अगदी उत्कट आंतरिक ऊर्मीने ! सर्वांनीच ही परिभाषा वापरली असल्याने त्यांची सार्वत्रिकताही आहे, असे आढळते. या सर्व बाबी केवळ काव्यातील प्रतिमा म्हणून सोडून देण्याजोग्या नाहीत. उलट त्यांचा गंभीरपणे विचार व्हावा. विश्लेषण व्हावे.
लौकिक जीवनात विवाहसंस्थेने आणि नवऱ्याने स्त्रीच्या पायात सगळ्यात भक्कम बेडी अडकवली आहे, हे वास्तव सत्यच त्यातून व्यक्त होते. ती बेडी तोडणे म्हणजे स्वैरिणीचा शिक्का मारून घेण्याचे धाडस करणे होय अन् प्रपंचातून मुक्ती हवी असेल तर स्वैरिणी होण्याची तयारी ठेवायला हवी हेच संत सांगतात.
विश्वातील द्वंद्व परमार्थक्षेत्रात मांडण्याची विशिष्ट परिभाषा आहे. त्यातील ‘पुरुष’ आणि ‘प्रकृतीची’ परिभाषा सर्वज्ञात अशी परिभाषा आहे. अव्यक्त चैतन्यतत्त्व किंवा आत्मतत्त्व म्हणजे पुरुष आणि पंचमहाभूतांनी सिद्ध झालेली व्यक्त सृष्टी म्हणजे ‘प्रकृती’ होय.
मानवी नर-नारी म्हणजे अनुक्रमे पुरुष व प्रकृती आहेत, ही भूमिका तत्त्वज्ञानाची भूमिका नाही. मानवी नर म्हणजे पुरुष व मादी अथवा नारी म्हणजे प्रकृती हे म्हणणे म्हणजे पारमार्थिक संकल्पनांविषयीचे अज्ञान आहे. पंचमहाभूतघटित नाशवंत व व्यक्त अशी सर्व सृष्टी म्हणजे ‘प्रकृती’ असल्याने सर्व देह प्रकृतीच होय. मग तो नरदेह असो की नारी (मादी) देह असो आणि त्या पलीकडचे अविनाशी चैतन्य तत्त्व म्हणजे पुरुष, अशी भूमिका असल्याने आणि ते पुरुष संतही देहधारी असल्याने ‘प्रकृती’ होत. या प्रकृतीला परम पुरुषाची, चैतन्याची ओढ असल्याने प्रकृतिजनित सर्व बंधने, सर्व प्रपंच सोडल्याखेरीज गत्यंतर नाही.
प्रकृतीचे मोहबंधन मोठे बळकट आणि चिवट असते. त्यासाठी त्यांनी सासर, नवरा, प्रपंच ह्या प्रतिमा आणि प्रतीके वापरलेली आहेत.
त्यामुळे सामान्य मानवी जीवनात जरी पुरुष संतांचा पुल्लिंगी उल्लेख व्याकरणिक पातळीवर (जेंडर) आपण करीत असलो तरी परमार्थ पातळीवर ती प्रकृतीच असल्याने वरवर विसंगती वाटली तरी अंतिमतः ती अंतर्गत सुसंगतीच आहे.
देह नराचा असो वा मादीचा असो; परमार्थाच्या परिभाषेत त्याला ‘नरदेह’ म्हणूनच संबोधले जाते.
अध्यात्माच्या आणि परमर्थाच्या क्षेत्रातील शब्दांचे हे व्याकरणिक संकेत माहीत नसल्याने अनेकदा मानवी स्त्री-पुरुष म्हणजेच प्रकृती-पुरुष असे समजून विवेचन केले जाते, ते योग्य नव्हे. हे उमजले की, लौकिक भेद आध्यात्मिक पातळीवर संपून जातात. संतांच्या बाबत स्त्री-पुरुष असा भेद अध्यात्ममार्गात शिल्लक राहत नाही. नव्हे तो तसा मुळातच नसतो अशी संतांची भूमिका असते. लिंगभाव संपतो. व्यावहारिक पातळीवर मात्र स्त्री-पुरुष हे द्वंद्व सतत प्रश्नचिन्हे निर्माण करीत राहते.
अध्यात्मक्षेत्रातील मुक्ती मिळवण्यासाठी सर्वांनाच भौतिक सुख, मोह अन् सुरक्षितता झुगारल्याखेरीज अंतिम मुक्तीचा मार्ग खुला होत नाही. ज्ञात-अज्ञात भयापासून मुक्ती मिळत नाही. प्रकृतिमोहातून बाहेर येणे म्हणजे ‘नवरा सोडणे’ या परिभाषेचा आता उलगडा होईल. एकदा पुरुष-नवरा सोडायचाच म्हटल्यावर मग ‘पर-पुरुष’ तरी कशाला हवा?
एकतर मानवी पुरुष-पती ही ‘प्रकृती’च आहे म्हणून तो ‘पूर्ण पुरुष’ नव्हे. ही प्रकृती बंधक आहे. उलट पर(म)पुरुष पूर्ण पुरुष आहे. पुरुषत्वाने सर्व सुख देण्यासाठी तो समर्थ आहे आणि लग्नच न झाल्याने इतर नाती अन् प्रपंच यांची कटकट नाही. बंधन नाही ही मांडणीही पुन्हा दोन पातळ्यांवर अर्थ व्यक्त करते.
विवाहामुळे स्त्रीला सुरक्षितता मिळते, असे एकीकडे विवाहसंस्थेचे समर्थन केले जाते. पण ती सुरक्षितता किती फसवी असते, याचाही अनुभव पदोपदी येत असतो. विवाहित स्त्री आहे म्हणून सीतेला पळवून नेताना रावण कचरला नाही अन् द्रौपदीची विटंबना करताना कौरव कचरले नाहीत. उलट त्यांच्या चारित्र्यावर आक्रमणे झाली ती त्यांच्या नवऱ्यांमुळेच ! इतरत्रही नवरे स्त्रीच्या चारित्र्याचे रक्षण करताना कुठे दिसत नाहीत. सीता-द्रौपदीसह प्रत्येकीला अखेर आत्मबळ खर्ची घालूनच सवतःचे रक्षण करावे लागते. हा अगदी रोकडा अनुभव असताना विवाहामुळे मिळणारी (खरे म्हणजे न मिळणारी) तकलादू सुरक्षितता झुगारून देणेच अधिक श्रेयस्कर !
जी सुरक्षितता मुळातच नाही, ती आहे अशा ‘भ्रमातून’ वेळीच बाहेर आले तर आत्मबळ तरी जागे राहील. नाहीतर एखाद्या भ्रमात गाफील राहायचे अन् आक्रमण झाल्यावर खंत करायची, असेच घडण्याची शक्यता जास्त !
विवाहसंस्थेतील हा प्रत्यक्षानुभवही ‘नवरा नको ग बाई।’च्या सार्वत्रिक प्रतिमेमागे अभावितपणे अंतःस्थ ऊर्मीने उभा राहिला नसेल ना?
अगदी वाच्यार्थानेही स्त्रीचा कोणी रक्षणकर्ता असा पुरुष कधी नसतोच. मग तो रक्षणकर्ता, (पती) नाहीसा झाला तर आपण असुरक्षित होऊ, हे भरही मिथ्याच असते. हे ज्ञान होणे, हे भान येणे माणसाला निर्भय बनवते. पांगुळगाडा आहे म्हटले की आधार घ्यावासा वाटतो. तो ‘नाहीच’ म्हटले की आत्मबळ जागे होते. हाच अनुभव संतांच्या प्रपंच सोडून ‘परपुरुषाकडे’ जाण्याच्या प्रतीकातून व्यक्त होतो.
परपुरुषाकडे जाणाऱ्या (किंवा खरे तर त्याला आपल्याकडे येऊ देणाऱ्या) स्वैरिणीला, वेश्येला कोणता पुरुष स्वीकारायचा अन् कोणता नाकारायचा याचे स्वातंत्र्य असतेच. मिळेल तो पुरुष इच्छेविरहित स्वीकारण्याचे बंधन तिच्यावर मुळातच नाही. वेश्याजीवनातील या स्वातंत्र्यभावाच्या आशयाचाही एक सूक्ष्म पदर ‘स्वैरिणी’ अथवा ‘वेसवा’ होण्याच्या परिभाषेत अंतर्भूत आहे. पत्नीला ती सवलत नाही. अर्थात स्त्री-संतही याच समाजातल्या आहेत. त्यामुळे बरेचदा ‘परपुरुषाशी’ त्या विवाहितेचे, पत्नीचे नाते जोडतात. भक्त अन् परमेश्वर यांच्यात कधी स्वकीय (विवाहित) नर-नारी भाव असतो तर कधी परकीय (विवाहबाह्य) नर-नारीभाव दिसतो.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment