अजूनकाही
‘बा’ उर्फ कस्तुरबा गांधी यांची १५० वी जयंती काल देशभर विविध ठिकाणी साजरी झाली. महात्मा गांधींपेक्षा कस्तुरबा जवळपास सहा महिन्यांनी मोठ्या होत्या. (पुढील वर्षी महात्मा गांधी यांची १५० वी जयंती आहे.) त्यांच्याविषयीची हा पुनर्मुद्रित लेख...
.............................................................................................................................................
‘बां’च्या जन्मतारखेची कधी कुणी फारशी दखल घेतली नाही. ती शोधून काढावी लागली. त्या काळात मुलींच्या जन्माची नोंदणीही होत नसे. गांधीजी आणि कस्तुरबा या दोघांचाही जन्म पोरबंदरचा आणि दोघांचीही घरे शेजारीच होती. ‘बां’चा जन्म ११ एप्रिल १८६९ चा, तर २२ फेब्रुवारीला त्यांची पुण्यतिथी असते. ‘बा’ या बापूजींपेक्षा वयाने अंदाजे सहा महिन्यांनी मोठ्या होत्या. २२ फेब्रुवारी १९४४ रोजी आगाखान पॅलेसमध्ये कारावासात असताना ‘बां’चा मृत्यू झाला. १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनातच त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. त्यांच्या समाधीवर स्वत: महात्मा गांधींनी लहान-लहान शंखांनी ‘हे राम’ शब्द लिहिलेले आहेत. ‘करेंगे या मरेंगे’ हे भारत छोडो आंदोलनाचे घोषवाक्य ‘बां’नी खरे करून दाखवले. महादेवभाई देसाई यांच्या समाधीवर ‘क्रॉस’, तर बांच्या समाधीवर ‘स्वस्तिक’ चिन्ह बनवण्याचा निश्चरही झाला होता. यात मेलेल्यांच्या मूर्तिपूजेची भावना नव्हती, तर त्यांच्या गुणांचे स्मरण व्हावे आणि त्या गुणांप्रति श्रद्धांजली वाहावी, एवढीच नम्र भूमिका होती; जेणेकरून त्यांच्या गुणांचे अनुसरण करण्याची प्रेरणा मिळावी.
‘बां’च्या अंतिम कारावासाचे सुंदर वर्णन सुश्री. डॉ. सुशीला नायर यांनी केलेले आहे. ‘चले जाव’ चळवळीच्या वेळी गांधींना अटक झाल्यावर ‘बा’ त्यांच्यासोबत जाणार होत्या. तेव्हा गांधीजी म्हणाले की, ‘तू माझ्यासोबत येण्याऐवजी मी अंगीकारलेले काम पुढे चालव.’ त्यामुळे बांनी बापूंचे काम पुढे चालवण्याचे ठरवले. बापू मुंबई येथील शिवाजी पार्कवर भाषण करणार होते, म्हणून बांनी जाहीर केले की, त्या आता शिवाजी पार्कवर भाषण करतील. आपण पकडल्या जाऊ याची कल्पना असल्याने, कस्तुरबांनी एक संदेश लिहून ठेवला- “महात्माजींनी आपणास बरेच काही सांगितलेले आहे. काल अडीच तास एआरसीसीच्या बैठकीत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केलेच आहे; यापेक्षा अधिक सांगण्यासारखे काय उरले आहे? आता तर त्यांच्या सूचनांवर अंमल करावयाचा आहे. भगिनींना आपले तेज दाखवण्याचा सुअवसर आहे. सर्व-धर्म व जातींच्या भगिनींनी एकत्र येऊन ही लढाई सफल करून दाखवावी. ‘सत्य’ आणि ‘अहिंसा’ याचा मार्ग सोडू नये.” शिवाजी पार्कवर पोचण्यापूर्वीच ‘बां’ना अटक झाली. अटकेच्या वेळी आंदोलनात सहभागी असलेल्या प्रत्येक सैनिकाने आपल्या कपड्यांवर ‘करेंगे या मरेंगे’ लिहिलेला बिल्ला शिवून घ्यावा, असे ठरले होते. बांना तसे सुचवले गेले, तेव्हा त्या म्हणाल्या, “मला याची काय गरज आहे?” तो तर त्यांच्या काळजावरच कोरलेला आहे. अशा अहिंसक शहीद कस्तुरबांबद्दलही बरे-वाईट, वेडे-वाकडे लिहिणारे महाभाग आजही आहेत. बा-बापूंच्या वैरक्तिक संबंधांवर टीका करण्याचा मोह अजूनही विद्वानांना आवरत नाही. याला काय म्हणावे, हेच कळत नाही. हा कर्मदरिद्रीपणा कधी तरी संपावा, एवढे मात्र अवश्य वाटते.
‘पत्नीला आपल्या हृदयाची व गृहाची साम्राज्ञी करण्याऐवजी पुरुषाने तिला खरेदी-विक्रीची वस्तू बनवली. इंग्रजी वाड्मय वाचून पुरुषवर्गाने हाच धडा घेतला काय? स्त्री ही पुरुषाचे अर्धांग-उत्तमांग हे, असे वर्णन केले जाते. पण पुरुषांनी स्त्रियांना गुलामांच्या अवस्थेत पोचवले आहे. त्याचा रिणाम आपला देश पक्षाघाताने पीडित होण्यात झाला आहे.’ असे गांधी म्हणत. पण बा-बापूंबद्दल वा स्त्री-पुरुष संबंधांबद्दल अनुदारवृत्तीने लिहिणाऱ्या विद्वानांची संख्या थोडीथोडकी नाही. आपण मूर्खपणाने स्त्रियांना सती जायला शिकवले, ही व्यक्तिपूजेची पराकाष्ठा आहे. पण पत्नीधर्म तर हा आहे की- तिने पतीचे कार्य स्वत: अमर करावे, हा गांधींचा संदेश कस्तुरबांनी जीवनात उतरवला. ‘विशुद्ध जीवन जगण्याच्या माझ्या प्रयत्नात कस्तुरबाने मला कधी अडवून धरले नाही. यामुळे जरी आमच्या बुद्धी-शक्तीत खूप अंतर असले; तरी आमचे जीवन संतोषी, सुखी आणि आम्हा उभयतांना उन्नत करणारे झाले आहे, असे माझे मत आहे. मला जन्मोजन्मी सहचारिणीची निवड करावी लागली, तर मी ‘बा’लाच पसंत करीन! निष्कपट श्रद्धा, नि:स्वार्थ भक्ती व सेवा यांचा आदर्श जसा ‘बा’मध्ये दिसत असे, तसा मला दुसरीकडे कुठेच व कोठेही दिसला नाही. आमच्या विवाहापासूनच माझ्या जीवनसंग्रामात ‘बा’ अचल निष्ठेने माझ्याबरोबर उभी राहिली. तिने स्वत:ला काया-वाचा-मनाने माझ्या जीवनकार्यास अर्पिले होते; ते इतक्या पूर्णतेने की, त्याला तोड नाही. सरतेशेवटी माझी पत्नी ही अहिंसा शास्त्रातील माझी गुरू बनली’, असे स्वत: गांधींनी लिहून ठेवले आहे.
‘मी जेव्हा माझ्या इच्छेप्रमाणे माझ्या पत्नीला वाकवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी तिच्यापासून अहिंसेचा धडा शिकलो. एका बाजूला ती माझ्या इच्छेला निकराने विरोध करत होती, तर दुसऱ्या बाजूला माझ्या मूर्खपणामुळे होणाऱ्या कष्टांना निमूटपणे मान तुकवत होती. ही तिची वृत्ती पाहून अखेरीस मला माझीच लाज वाटली. तिच्यावर स्वामित्व गाजविण्यासाठीच मी जन्माला आलो आहे, या विचाराच्या मूर्खपणातून मी मुक्त झालो. सरतेशेवटी माझी पत्नी ही अहिंसाशास्त्रातील माझी गुरू बनली. बाचा सर्वांत मोठा गुण म्हणजे केवळ स्वेच्छेने माझ्यात सामावून जाणे हा होता. माझे सार्वजनिक जीवन जसजसे उज्ज्वल होत गेले, तसतसा बाचा विकास होत गेला आणि ती पोक्त, विचाराने माझ्यात- म्हणजेच माझ्या कार्यांत सामावून गेली. काही काळाने असे झाले की, माझ्यात आणि माझ्या कार्यात भेद राहिला नाही. तेव्हा ‘बा’देखील त्याच्याशी समरस होऊ लागली. हा गुण हिंदुस्थानच्या भूमीला कदाचित अधिकात अधिक मानवत असावा. माझ्या दृष्टीने बाचा सर्वांत मोठा गुण म्हणजे तिची हिंमत व बहादुरी हा होय. ती हट्ट करील, क्रोध करील, ईर्ष्या करील; पण हे सर्व माहीत असूनही, दक्षिण आफ्रिकेपासून आजतागायतची तिची कर्तव्यक्षमता पाहिली म्हणजे तिची बहादुरीच मनात उरते’, असेही गांधीजींनी लिहून ठेवले आहे.
गांधीजी पुढे म्हणतात, ‘कोणत्याही महत्त्वाच्या बाबतींत बा माझ्या मागे नव्हती- असलीच तर पुढे होती. तिने मला सदैव जागरूक राहण्यास मदत केली आणि प्रतिज्ञापालनांतही मला मदत केली. माझ्या सर्व राजकीय संघर्षात ती माझ्या खाद्यांला खांदा लावून उभी राहिली. शिक्षणाच्या प्रचलित अर्थाने ती अशिक्षित होती. पण माझ्या दृष्टीने ती खऱ्या शिक्षणाचा आदर्श होती. ती वैष्णवभक्त होती. तिने आपल्या मनांतून जातीरतेची सारी भावना पुसून टाकली होती. एका हरिजन मुलीला आपल्या स्वत:च्या मुलापेक्षा ती कमी प्रेमाने वागवीत नव्हती. नरसी मेहताने आपल्या ‘वैष्णव जन तो’ या पदात वर्णिलेला आदर्श तिच्यामध्ये साकार झालेला होता. असे काही प्रसंग येऊन गेले की, जेव्हा मी मृत्यूशी उग्र झुंज घेत होतो. आगाखानाच्या प्रासादतुल्य निवासस्थानातील माझ्या उपोषणाचे वेळी मी अक्षरश: मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आलो. पण तिने एक अश्रू ढाळला नाही की, कधी आशा वा धैर्य सोडले नाही. ती परमेश्वराची प्रार्थना मनोभावे करीत राहिली. निष्कपट श्रद्धा, नि:स्वार्थ भक्ती व सेवा यांचा आदर्श बामध्ये जसा दिसे, तसा मला दुसरीकडे कुठेच किंवा कोठेही दिसला नाही. आमच्या विवाहापासूनच माझ्रा जीवनसंग्रामात ती अचल निष्ठेने माझ्याबरोबर उभी राहिली. तिने स्वत:ला कारा-वाचा-मनाने माझ्या जीवनकार्यास अर्पिले होते, ते इतक्या पूर्णतेने की त्याला तोड मिळणे कठीण.’ या गांधीजींनी स्वत:च व्यक्त केलेल्या भावनांत ‘बां’ची थोरवी सामावलेली आहे. त्यामुळे त्या संबंधात बांबद्दल अधिक काही लिहिण्याची गरज नाही.
सेवाग्राम येथे गांधींचा आश्रम होता. तो ‘मठ’ नव्हता. ‘आश्रम’ व ‘मठ’ या दोन संकल्पनांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. कारण गांधींचा आश्रम ही वृत्ती आहे, ती एक प्रवृत्ती आहे; केवळ निवारा किंवा निवास नव्हे. ती वृत्ती सर्व दृष्टीने निरपेक्ष, निर्भर, नि:पक्ष व निर्वैर होती. गांधीजींनी त्यात सामाजिक मूल्ये प्रस्थापित केली. ध्येयनिष्ठा व उत्कटता, पावित्र्य व संयम आणि कुटुंबातील सहजस्फूर्त जिव्हाळा व गोडवा यांचा संयोग या आश्रमात होता. त्या आश्रमात ‘बापू’ होते, ‘बा’ होत्या. बापू ‘बां’ना बाच म्हणत. ‘बा’ म्हणजे ‘आई’ व ‘बा’ बापूंना ‘बापू’च म्हणत. ‘बापू’ म्हणजे वडील. आश्रमात ‘बेन’ होत्या, काका-मामा होते, मावशी व आत्या होत्या, आई-भाई-ताई होत्या; म्हणजे रक्तसंबंधाच्या पलीकडे जाऊन कौटुंबिक भावनेचा विस्तार व विकास करणारी सगळी नाती होती. ती स्वायत्त असल्यामुळे अधिक प्रभावी होती. परिवारातील शुभकारक भावनांचा सहजीवनाच्या विकासाच्या कामी उपयोग करून घेण्याची हातोटी बा व बापू यांनी साधली होती. ही नाती धर्म, जात, प्रदेश, भाषा यांच्या मर्यादेत मावणारी नसल्यामुळे त्याला वैश्विक रूप प्राप्त झालेले होते. गांधींच्या या आश्रमास भिक्षावृत्ती, संग्रह, सौदा व स्वाद यांचे वावडे होते. गांधींच्या मूल्यांवर व मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या आश्रमात कामाचा हिशेब नसे, परंतु मानधनाचा काटेकोर हिशेब असे. काम कितीही करावे- अगदी चोवीस ताससुद्धा करावे; पण मानधन मात्र गरजेप्रमाणे कमीत-कमी घ्यावे, असा नियम होता. वर पुन्हा कर्ज काढता कामा नये, अशी सक्त ताकीद होती. तिथे दानाचा व्यवहार नव्हता, अनासक्ती रोग होता. ‘विषाद योग’ किंवा आसक्ती योग नव्हता. खऱ्या अर्थाने तो आश्रम, श्रमनिष्ठा, सामाजिक ब्रह्मचर्य भावना, भक्ती, निरहंकारिता व सामूहिक साधना यांचे श्वसन केंद्र व प्रक्षेपण केंद्र होते. तेथील आस्तिकता मानवनिष्ठ होती. तो आश्रम म्हणजे अध्यात्म, सांस्कृतिक सहरोग व मानवी सहजीवनाचे तीर्थक्षेत्र होते. आश्रमात कुणी आजारी असेल तर गांधीजी व बा स्वत: दर दिवशी सकाळी त्याची चौकशी करण्यासाठी त्याच्या दाराशी जात असत. तो आश्रम सहजीवनाचे आगळे-वेगळे प्रतीक होते. बापूंची कुटी व बांची कुटी या शेजारीच होत्या. पण त्या स्वतंत्र होत्या. बापूंची पथ्ये ‘बा’ पाळत असत. तरी दोन्ही कुटींतील पाहुण्यांच्या स्वागताची पद्धत वेगळी असे. आश्रमात आलेल्या ज्या पाहुण्याचे ‘चहा’शिवाय अडत असे त्यास ‘बां’च्या कुटीत ‘चहा’ मिळत असे. आणि आम्हा मुलांसाठी ‘बां’च्या जवळ खाऊ असे. एका अर्थाने त्यात मातृत्वभावनेचा आगळा-वेगळा आविष्कार दिसून येई.
कस्तुरबांना बापू ‘बा’ म्हणत आणि गांधींना कस्तुरबा ‘बापू’ म्हणत, हा शुद्ध अनाचार आहे असे मानणारे बुद्धिवान लोक आजही आहेत. कारण गुजरातीत ‘बा’ म्हणजे आई व ‘बापू’ म्हणजे ‘बाप’. नवऱ्याने बायकोला ‘आई’ म्हणायचे व बायकोने नवऱ्याला ‘बाप’ म्हणायचे, हा त्यांच्या मते शुद्ध अनाचार आहे. गांधींचा आश्रम होता, चार भिंतींचे कुटुंब नव्हते. जसे कम्युनिस्टाच्या ‘कम्युन’मध्ये आई, बाप, नवरा, बारको, मुलगा, मुलगी, भाऊ-बहीण सर्वच ‘कॉम्रेड’ असतात; तसेच गांधींच्या आश्रमात कौटुंबिकता असली तरी कौटुंबिक नाती नव्हती. त्यामुळे सर्वच आरा नि सर्वच बाप. सर्वच भाई किंवा बेन असत. रक्त संबंधांपलीकडचे हे स्वायत्त नाते असे. आपल्या मुलाची आई म्हणून स्वत:च्या स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी सर्वांत उदात्त व सुसंस्कृत मानली जाते. पूर्वी जेव्हा पुरुष बायकोला नावाने हाक मारत नसत, तेव्हा मूल झाल्यावर मुलांची आई म्हणूनच तिला संबोधित असत. त्यामुळेच ‘मातृत्वभावना’ कौटुंबिक भावनेचे परम उदात्त शिखर आहे, असे मानण्यात येते. पार्वती व परमेश्वर म्हणजे माता व पिता यांचा उल्लेख कालिदासाने ‘पितरौ’ या एकाच शब्दाने केला. तसा तो कधी तरी ‘मातरौ’ या शब्दानेही तो होईल. यात द्विवचन असले तरी भावना एकत्वाची आहे, असे दादांनी (धर्माधिकारी) ‘बा’ हा उदात्त व मूलभूत असा पुण्यसंकेत कसा आहे हे दाखवून देताना म्हटले आहे. परंतु नर-मादी-व्यतिरिक्त ज्यांना स्त्री-पुरुषांकडे बघताच येत नाही, त्यांना हे कधीच कळणार नाही.
‘बा’ बापूंची सहधर्मचारिणी होती, अनुगामिनी नव्हती. पतिनिष्ठेपेक्षा महात्माजींच्या विचारांशी तिची निष्ठा अधिक निगडित होती. बांशी बापू नवऱ्यासारखे कधीमधी वागले, नवरेशाहीही दाखवली; तरी ‘बा’ ढळल्या नाहीत, कारण त्या त्यांच्या विचारांशी एकरूप झाल्या होत्या. मुलगा हरिलालभाईच्या बाबतीतही पुत्रप्रेमापेक्षा गांधींच्या तत्त्वावर ‘बा’ त्यामुळेच अटळ राहू शकल्या. हे सारे अग्निदिव्य होते, पण त्यातून कस्तुरबा तावून-सुलाखून बाहेर पडल्या. म्हणून त्या सर्वांच्या ‘बा’ होऊ शकल्या. मातृहृदरी साने गुरुजींच्या भाषेत ‘बा-बापू हे नवभारताचे उभरता माय-बाप. कस्तुरीप्रमाणे बांचे जीवन सुगंधी. माते, तुझे ते बंदिखान्यातील मरण आम्ही कसे विसरू? पुण्याची ती समाधी म्हणजे भारताचे तीर्थक्षेत्र आहे. बा-बापूंचे जीवन म्हणजे राष्ट्राची अमर पुण्यपुंजी!’ साने गुरुजींच्या या शब्दांत बांची पुण्याई सामावलेली आहे तीच खरी संपत्ती आहे. आणि ती सदैव वृद्धिंगत होत राहो! हीच ‘बां’च्या १५० व्या जन्मजयंतीच्या निमित्ताने नम्र अपेक्षा आहे.
(‘साधना’ साप्ताहिकाच्या १४ एप्रिल २०१८च्या अंकातून साभार)
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment