अल्मास शेखचं स्वच्छंद असणंच तिची (बॉक्सिंगसाठीची) ऊर्जा आहे!
सदर - रौशनख़याल तरुण
हिनाकौसर खान-पिंजार
  • बॉक्सिंगपटू अल्मास शेख
  • Thu , 12 April 2018
  • रोशनख्याल तरुण हिना खान Heena Khan अल्मास शेख Almas Shaikh

अल्मास अवघ्या १८ वर्षांची! गोशा-बुरखा पाबंद असणाऱ्या कुटुंबात वाढत आहे, पण ही पाबंदी कधी तिच्या खेळाच्या आड आली नाही. घरचे धार्मिक असले तरी तिच्यातल्या खेळाडूकडे कुटुंबियांनी दुर्लक्ष केलं नाही. म्हणूनच आज अल्मास बॉक्सिंगमध्ये आपला ठसा उमटवताना दिसत आहे. आजवर राज्य-राष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारी अल्मास २०२०च्या ऑलंपिक स्पर्धेसाठी तयारी करत आहे. कोणत्याही स्पर्धेसाठी देशातून निवड होण्याआधी राज्यातून निवड होते. ऑलंपिकच्या स्पर्धेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातून आठ जणांची निवड झाली, त्यापैकी अल्मास एक आहे. तिचे प्रशिक्षक व मार्गदर्शक विजय गुजर यांच्यासह सर्वांच्याच नजरा तिच्या तयारीकडे लागल्या आहेत.

तिचं वागणं-बोलणं तिच्या वयासारखंच मासूम. तिच्याशी बोलताना सतत जाणवत होतं की, ऑलंपिकसाठी मजल मारण्याची इच्छा ठेवणाऱ्या या छोकरीचं ‘बालपण’ अजून संपलेलं नाही. आपल्या मामेभावंडांशी खेळकरपणे मस्ती घालत ती संवाद करत होती. अल्मास तिच्या आजोळी आईबरोबर राहते. अल्मासच्या आईचं वयाच्या विसाव्या वर्षी लग्न झालं. मात्र अल्मास अवघ्या सहा महिन्यांची असताना एका रस्ते अपघातात तिच्या वडिलांचं निधन झालं. बाळंतपणासाठी आलेल्या अल्मासच्या आई कायमच्या माहेरच्या होऊन राहिल्या. अल्मासच्या नानी-नानांनी तिचं आणि तिच्या आईची सारी जबाबदारी स्वीकारली. या मायलेकी माहेरच्या कुटुंबातल्या अविभाज्य घटक झाल्या.

घरात, पारंपरिक वातावरण होतं. धार्मिक आचरणाचा आग्रह होता. आपल्या बुरख्यातल्या मुलीला नोकरी-चाकरीसाठी कुठं पाठवायचं असा विचार करत अल्मासच्या आईला त्यांनी नोकरी करू दिली नाही. घरात जरी सारं काही मळलेल्या वाटेवरून घडत होतं, तरी निसर्गानं अल्मासच्या पायाखाली वेगळी वाट देऊ केली होती.

खरं तर अल्मास बॉक्सिंगमध्ये आली तेच मुळी नकळत, कुणाच्याही ध्यानीमनी नसताना. ती या खेळात प्रवेशली ते तिच्या आजीमुळे-नानीमुळे! पण त्यांच्याही गावी नव्हतं की, घटकाभराची उसंत मिळावी म्हणून बॉक्सिंग क्लबमध्ये आपण पाठवून देतोय, ती अल्मास त्या खेळात राष्ट्रीय स्तरावर चुणूक दाखवेल.

तर घडलं असं. तिची नानी आणि आई पुण्यात भवानी पेठेत असणाऱ्या वस्ताद लहूजी साळवे बॉक्सिंग क्लबच्या आवारात संध्याकाळी चालायला जात. अल्मासला चार मामा. अल्मास आणि मामांची मुलं असा लवाजमा घेऊन नानी-आई चालायला जात. पण ही मुलं फार त्रास द्यायची. त्याचवेळेस बॉक्सिंग क्लबची मुलं मैदानात व्यायाम आणि सराव करताना नानी पाहत होती. म्हणून नानीनं तिला बॉक्सिंग क्लबमध्ये टाकलं. त्यावेळेस ती अवघी तीन वर्षांची चिमुकली होती. अल्मासही आनंदानं, उत्साहानं बॉक्सिंग या पुरुषी क्रीडा प्रकारात खेळू लागली. सुरुवातीला घरातल्यांनी आक्षेप घेतला. चिमुकली असली तरी मुलींनी पुरुषी क्रीडा प्रकार खेळावा याविषयी कुटुंबियांच्या मनात राग होता. नाराजी होती. मात्र नानी खंबीरपणे आपल्या लेक व नातीच्या पाठीशी उभी राहिली. काही दिवसांतच घरातल्यांची नाराजी गळून पडली.

अल्मासदेखील आपल्या खेळानं सर्वांना प्रभावित करू लागली. अँग्लो उर्दू बॉईज स्कुल इथं शालेय शिक्षण घेत असताना, वयाच्या चौदाव्या वर्षीच तिनं पहिलं राष्ट्रीय स्तरावरचं सुवर्णपदक मिळवलं. अगदी लहान वयातच ती एकेक प्रगतीची पायरी चढू लागली. ती आत्तापर्यंत जवळजवळ चाळीसेक सामने खेळली आहे. स्थानिक, जिल्हा, राज्य पातळीवरची अनेक बक्षिसं मिळवली आहेत. शालेय ते राज्य स्तरावर तिनं कित्येकदा सुवर्णपदकांची लयलूट केलच आहे. राष्ट्रीय स्तरावर तिला तीन वेळा सुवर्ण, २ रजत व २ कांस्य पदकं मिळाली आहेत. शिवाय राष्ट्रीय स्तराव सहभागासाठीही तिला तीनदा पदक मिळालं आहेत.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

अल्मासच्या आजवरच्या प्रवासात तिच्या आई इतकीच नानी-नानांचीदेखील भरपूर साथ लाभली आहे. कुठल्याही स्पर्धांसाठी तिची आई कायम तिच्यासोबत असते. अल्मासला एक सोबती असावा म्हणून त्या जातात.

अल्मास सध्या पुण्यात अँग्लो उर्दू ज्युनियर कॉलेजमध्ये बारावीत आहे. त्यामुळे अभ्यासाच्या दृष्टीनं तिचं हे अत्यंत महत्त्वाचं वर्ष आहे. त्यामुळे ती अभ्यास-खेळात पूर्णपर्ण व्यस्त आहे. सकाळी सात ते नऊ ती कोचिंग क्लासला जाते. तिथून परतल्यावर थोडा व्यायाम आणि मग दुपारी १२ ते ६ कॉलेज. नंतर लगेच सहा ते आठ बॉक्सिंगचा सराव. कॉलेज आणि बॉक्सिंगचा सराव करण्याची ठिकाणं दोन्हींही घरापासून दहा किमीच्या अंतरावर आहेत. त्यामुळे कॉलेजसाठी एकदा दहा किमीचा प्रवास करून जा-ये करणं आणि पुन्हा सरावासाठी आणखी दहा किमीचा प्रवास करणं, हे तर तिचं रोजचंच जगणं झालं आहे.

अल्मासनं आत्तापर्यंतच्या खेळातून स्वत:ला सिद्ध केलं ही आहे, तरीही अद्याप परिसरातील व दूरच्या नात्यातील लोकांच्या मनातल्या शंका दूर झालेल्या नाहीत. समोरून वा आडून अल्मास व तिच्या कुटुंबियांना लोकांच्या टोमण्याचा सामना करावा लागतो. अल्मासच्या खेळापेक्षाही तिचे आखूड कपडे या लोकांच्या नजरेत अधिक भरतात. अशा सगळ्या टोमण्यांकडे ‘दुर्लक्ष करते’ असं म्हणत अल्मास विषय संपवते. पण तिथंच असणारी तिची अम्मी वास्तव सांगू लागते, ‘‘रिश्तेदारही नहीं आसपडोस के, जिनसे हमारा कोई रिश्ता भी नहीं वो लोग भी बाते बनाते. अब स्पोर्टसपर्सन है तो मॅचेस के लिए बाहर गाव तो जाना पडता है. लोग कहते रहते है, ये अच्छा लगता क्या लडकी बाहर जाती, छोटे कपडे पहन के मर्दोंके सामने भी खेलती. तरह तरह की बाते बोलते. अल्मास तो वैसे बच्ची है. ऐसी बातोंपर गौर नहीं किया, तब भी थोडा असर तो होता ही है...हम ज्यादातर दिलपर लेतेही नहीं ऐसी बातों को. अल्मास के नाना-नानी हाजी है...लोग तो उसपर भी कहते, नाना-नानी हज करके आये और नवासी क्या तो बॉक्सिंग करती. अच्छा लगता क्या? अब इस में अच्छा नहीं लगनेवाली क्या बात है? हमारी बच्ची में हुनर है, खेल का जज्बा है, वो भी अल्लाहकीही नेमत हैं, तो उससे क्यो मुँह फेरने का? सबके पास तो नहीं होती खेलने की ताकद. अल्मास की नानी तो ऐसे बातों पर बहुत अच्छी बात बोलती, ‘भगौने के मुँह को ढक्कन लगा सकते... लोगों के मुँह को लगा सकते है क्या?’  ”

अल्मासच्या अम्मी नेमकं बोलल्या. त्या सांगतात, “कधी कधी समाजाच्या अनाहूत सल्ल्यांनी सैरभैर होतो जीव. शेवटी रहायचं तर याच समाजात असतं ना. पण सैरभैर झालेला जीव एकमेकांच्या साथीने सावरतो.” अल्मास, तिची आई आणि कुटुंबीय वर्तमानातील अशी आच सोसून सोनेरी भविष्याचा वेध घेत आहेत. समाजाकडून कौतुक नकोच आहे त्यांना, पण किमान त्यांनी उद्धार करत फिरू नये इतकी साधी मागणी आहे. आम्ही लाख दुर्लक्ष केलं तरी इथं, इथल्याच माणसांत रहायचं असतं, तेव्हा त्यांच्या बोलण्याचा नाही म्हटलं तरी त्रास होतोच, हेही त्या प्रांजळपणे कबूल करतात.

समाजातून होणारा दुस्वास तर आहेच, पण याही जोडीला इतरही अडचणी आहेतच. तिच्या या खेळातील खर्चही दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवासखर्च, क्रीडासाहित्य, कोचिंगची फी, प्रोटीन, डायटफुड, एनर्जी ड्रिंक, कॉलेज, ट्युशनचा खर्च अशी खर्चाची खूप मोठी यादी आहे. तिचं कुटुंबही फार मोठं आहे चार मामा-मामी, त्यांची मुलं, एक मावशी असा मोठा परिवार. अशा परिस्थितीत अल्मासच्या खर्चाची जबाबदारी तिच्या नानीच उचलत आहे. कधी उधारी कर तर कधी घरातलं काही विकून तिच्या गरजा भागवत आहेत. त्यांनी स्पॉन्सरशिपसाठी खूप प्रयत्न केले, मात्र अद्याप काहीही हाती लागलं नाही. यामुळे ती कुठल्याही प्रकारचा विशिष्ट डायट अगर फुड घेत नाही. तिची अम्मी म्हणते, “अल्मास की नानी तो भौत करते. पर उसको डायट, प्रोटीन दे सकू इतनी हैसियत भी नहीं. बहुत महेंगे रहते. बच्चा तो हमारा बिना डायट प्रोटीन केही खेलता. अच्छा डायट दूँगी, तो कितना अच्छा खेलेगा. पर उतना हम कर नहीं सकते. इतना स्कुल-कॉलेज के लिए इनाम मिलाते, तो ऐसे होनहार बच्चोके लिए कुछ तो करना चाहिए. अगर कोई थोडी मदत कर देता तो शायद और अच्छा होता.”

खेळाडू म्हटला की, चांगलं खाद्य ही तर अत्यंत महत्त्वाची गरज असते. पण अल्मासला तेच मिळत नाही. तुझं डायट कसं असतं असं विचारल्यावर ती लगेच ‘मी नाही घेत’ असं उत्तरली. क्षणभर मलाच वाटलं की, माझा प्रश्न तिला चुकीच्या पद्धतीनं कळला असेल. बहुतांश वेळा डायट म्हणजे उपाशी राहून वजन कमी करणं असा एक अर्थ घेतला जातो. तिनं तसाच घेतला असावा की काय म्हणून मी तिला नीट उलगडून सांगितलं, पण ती पुन्हा तितक्याच निरागसपणे म्हणाली, “नाही, मी नाही घेत.” शेवटी तिच्या आईनं मध्यस्थी करून नेमकी परिस्थिती सांगितली. अल्मास सहजतेनं म्हणते, ‘माझ्या नानीनं मला खेळात घातलं आणि मम्मीनंही पूर्ण पाठिंबा दिला. घरात सगळेच जण बुरखा घालतात. पण माझ्या खेळाची गरज घरात सगळ्यांना कळते आणि म्हणून कोणीही मला बुरख्यासाठी जबरदस्ती करत नाही. आँखो में शर्म रहनी चाहिए, असं मात्र आवर्जून सांगतात. त्यांच्या साथीनं मी पुढं येऊ शकले. अजून खूप मिळवायचं आहे!’

अल्मासला केवळ प्रतिस्पर्ध्यासोबतच बॉक्सिंगची लढत लढायची नाही, तर वैयक्तिक आयुष्यासोबतही तिची झुंज सुरू आहे. परंतु लहानपणापासूनच ती अशा असुविधांसह जगत असल्यानं म्हणा किंवा अजून पुरेशी जगरहाटी न पाहिल्यानं म्हणा तिच्या आवाजात, बोलण्यात आणि वागण्यातही मासूमियत भरून आहे. कदाचित तिचं हे असं स्वच्छंद असणंच तिची ऊर्जा असावी.

.............................................................................................................................................

लेखिका हिनाकौसर खान-पिंजार या मुक्त पत्रकार आहेत.

greenheena@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 12 April 2018

अल्मास, तू बिनधास्त पुढे जा. तुझ्या पाठीशी माझ्या सदिच्छा आहेत. डोळ्यांतली लज्जा अशीच असू दे. तुझ्यासारख्या शेरणीला समजून घेणारा शेरदिल तुला निश्चितच सापडेल. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......