अजूनकाही
सलमान खान आणि आमीर खान दोघंही जेव्हा ‘द सलमान’ किंवा ‘द आमीर’ झाले नव्हते, तेव्हा त्या दोघांचा एकत्रित अभिनय असलेला सिनेमा आला होता. ज्याचं शीर्षक होतं – ‘अंदाज अपना अपना’. हा चित्रपट तिकीट बारीवर खूप यशस्वी झालाच, पण आजही तो टर्निंग पॉइंट, कल्ट फिल्म वगैरे म्हणून समीक्षक, आस्वादक नावाजतात. त्यानंतर दोघांनी पुन्हा एकत्र काम केलं नाही. ‘अंदाज अपना अपना’ सिक्वेलच्या अपवा अनेकदा उठल्या.
पण तो चित्रपट हा काही आजच्या लेखाचा विषय नाही. फक्त त्या चित्रपटाचं शीर्षक या लेखासाठी वापरावंसं वाटलं. त्याला कारण लेखविषय सलमान आहे. ‘अंदाज’ हा शब्द हिंदीत दोन अर्थानं वापरला जातो. त्यातला एक अर्थ ‘शैली’ या अर्थानं आणि दुसरा ‘तर्क’ या अर्थानं. हिंदीतून ‘अंदाज’ म्हणजे ‘तर्क’ या अर्थानं हा शब्द मराठीत रूढ झाला असावा. (आता त्याचं मूळ फार्सी वगैरेतही असू शकतं!) थोडक्यात ‘अंदाज अपना अपना’ असं शीर्षक देताना ‘तर्क आपला आपला’ हे सूचित करायचंय.
यामागचं कारण सुस्पष्ट आहे. वीस वर्षांपूर्वी पाच एप्रिल रोजी सलमान खान आणि त्याच्या सहकलाकारांनी (सैफ अली खान, तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे इ.) एका शूटिंगच्या दरम्यान राजस्थानात काळवीटांची शिकार केली होती. त्यात एका काळवीटाचा मृत्यू, तर एक जखमी झालं होतं. रात्रीच्या अंधारात खेळलेल्या या खेळास वाचा फुटली आणि या सर्वांवर आरोपपत्र दाखल झालं. त्यात मुख्य आरोपी सलमान खान. एरव्ही या काळवीट शिकारीचा खेळ दप्तर दाखल झाला असता. पण काळवीटांना पूजणाऱ्या बिष्णोई समाजानं धार्मिक भावना दुखावल्याचा मुद्दा केला आणि प्रकरण गंभीर झालं.
५ एप्रिल २०१८ रोजी या वीस वर्षं चाललेल्या खटल्याचा निकाल लागणार होता. आरोपींना दोषी\निर्दोष ठरवणं आणि त्याप्रमाणे शिक्षा सुनावणं, हे त्या दिवशी अपेक्षित होतं.
अनेकदा न्यायाधीश अमूक दोषी, तमूक निर्दोष एवढंच वाचन करून शिक्षा सुनावण्यासाठी पुढची तारीख देतात.
तमाम वृत्तवाहिन्यांना देशभरासाठी तरोताजा विषय मिळाला होता. त्यात केंद्रस्थानी सलमान खान असल्यानं वाहिन्यांच्या डिशमध्ये थेट पक्वान्नच वाढलं गेलं होतं. आणि ते आता चवीचवीनं, घासागणिक अधिक चविष्ट होत जाणार होतं.
या पार्श्वभूमीवर सुरू झाला खेळ ‘अंदाज अपना अपना’चा. कायदे कोळून प्यायल्यासारखे प्रत्यदर्शी वार्ताहर अमूक झालं तर तमूक होईल, तमूक झालं तर अमूक होईल, मग पुढे काय होईल हे सांगत होते. आरोपी सगळे सहा-सात जण होते. पण चर्चा फक्त सलमानची होती. सलमान गजाआड गेला तर किती करोड रुपये वाया जाऊ शकतात वगैरे वगैरे. याशिवाय स्टुडिओतून थेट काही ज्येष्ठ विधिज्ञ माहिती पुरवत होते, तर काही चित्रपट क्षेत्रातली मंडळीही आपलं मत मांडत होती.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406
.............................................................................................................................................
खरं तर सगळेच निकाल येईपर्यंतचा वेळ भरून काढत होते. एकच गोष्ट तीन-चार पद्धतीनं ऐकवली जात होती, जोडीला फुटेज होतंच. या दळणात त्या दिवशी दर्शकांचं सुदैव म्हणजे कुठल्याच वाहिनीनं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया घेतली नव्हती. त्यामुळे देशात इतरही वकील आहेत याचा शोध वाहिन्यांना लागला, ही त्यातल्या त्यात बरी गोष्ट!
साधारण ११ वाजता न्यायालयाचं कामकाज सुरू झालं आणि न्यायाधीशांनी फार न ताणता इतरांना निर्दोष ठरवलं, तर सलमानला थेट पाच वर्षांची शिक्षा सुनावली!
सलमान दोषी म्हणताच इतर निर्दोषींना वाहिन्यांनी वाऱ्यावर सोडलं. त्यांची दोन ओळींत विना प्रतिक्रिया, विशेष टिपणी न करता सगळे त्यांना विसरून गेले. संध्याकाळपर्यंत तर खटला फक्त सलमानवर होती की काय, असं वाटायला लागलं.
आता सलमानला जामीन मिळणार का? तो आजच मिळणार का? नाही मिळाला तर सलमान थेट तुरुंगात? पुन्हा प्रत्यक्षदर्शी वार्ताहर विविज्ञ, मान्यवर, अमूकतमूक, पुन्हा एकदा ‘अंदाज अपना अपना’. दरम्यान न्यायालयानं जेवणाची सुट्टी घेऊन, अप्रत्यक्षपणे इतरांनीही जेवून घ्यावं असं सुचवलं. पण हा वेळ वाहिन्यांनी पुन्हा ‘अंदाज अपना अपना’चा खेळ खेळत, पार जोधपूर जेल, विष्णोई समाज, सलमानचं मुंबईचं घर, तिथले भक्त असं कीर्तन चालूच ठेवलं. भक्त दुवा करत होते, तर मराठी सिनेमातली एक दिग्दर्शिका ‘सलमान डेस्टिनी चाईल्ड आहे, मागच्या वेळेसारखा याही वेळेला त्याला दिलासा मिळेल’ असं कौतुकानं सांगितलं. तर संसदेबाहेर जया बच्चन यांनी माध्यमांशी बोलताना तो निर्दोषच आहे, एवढंच सांगायचं बाकी ठेवलं होतं. टीव्हीवर दिसणार या कल्पनेनं समर्थक आणि विरोधक दोघांतही जे काही फेफरं संचारतं, ते आमच्या वृत्तवाहिन्यांनी तयार केलेल्या साथीच्या रोगाचे रोगी झाल्यानं. मुळात गुन्हेगार म्हणून खटला भरलेल्या आणि त्या दोषी ठरवलेल्या गुन्हेगाराबद्दल कसली मतमतांतरं नोंदवतात हे आणि कशासाठी?
त्यातून सलमानची पार्श्वभूमी फारशी निष्कलंक नाही. असं असताना ही बातमी दुपारच्या बातमीपत्रात आटपून संपवता आली नसती? पण मग वाहिन्यांचं काय राहिलं? त्यांनी मग ‘बिग बॉस’च्या भूमिकेत जाऊन सर्वत्र सीसीटीव्हीच लावले. जोडीला ‘अंदाज अपना अपना’ चालू होतंच.
जेवणानंतर न्यायालय म्हणालं, ‘आजच्या आज जामिनावर सुनावणी वगैरे काही नाही, उद्या या!’ झालं! झडप घालून पोलिसांनी सलमानला ताब्यात घेतला आणि पडदे लावलेल्या गाडीत घालून जोधपूर तुरुंगाकडे गाडी निघाली, मग या दृश्यावर वाहिन्यांनी झडप घातली. भक्त हिरमुसले, बिष्णोई नाचले, सोशल मीडियावर नेहमीची दंगामस्ती सुरू झाली. आजची रात्र की पुढच्या चार-पाच रात्री तुरुंगात? यावर ‘अंदाज अपना अपना’ सुरू झालं.
हा सगळा खेळ जेव्हा सकाळी सुरू झाला, तेव्हा आम्हीही आपला ‘अंदाज अपना अपना’ हा खेळ मनाशी सुरू केला होता. तसे आम्ही लोकशाहीवादी आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असणारे, तिच्या निष्पक्षतेविषयी खात्री असणारे. मध्यंतरी चार न्यायमूर्तींनी घेतलेली पत्रकार परिषद किंवा न्या. लोया मृत्यूप्रकरण यामुळे काही आम्ही विचलित झालो नाही. उलट प्राप्त परिस्थितीत काय होऊ शकतं, या पायावर आम्ही आमचा ‘अंदाज अपना अपना’ सकाळीच सुरू केला.
राजस्थानातल्या आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता आणि वीस वर्षं जुना खटला बघता (नेहरूंच्या काळात) आणि त्यात कडवा बिष्णोई समाज सहभागी असताना, करणी सेनेपेक्षा ते महत्त्वाचं ठरतं. अहमदाबादला पतंग उडवले की, सात खून माफ असा संदेश जायला नको. त्यामुळे एक रट्टा देणं क्रमप्राप्त होतं. पुढे जामीन मिळेल, सुटेल, पण सध्या दोषी करार देणं गरजेचं होतं. बिष्णोईंना न्याय मिळाला असं वाटायला हवं आणि समस्त काळवीटांनाही!
आमचा पहिला अंदाज बरोबर निघाला. आणि बिष्णोईंना २० वर्षांनी न्याय मिळाला. अंतिम शिक्षेसाठी अजून बऱ्याच पायऱ्या आहेत, पण तोपर्यंत निवडणूक होऊन जाईल. तोवर हा दोषीचा शिक्का मतपेटीतही उमटू शकतो, न्याय देणारे म्हणून!
आता दुसरा अंदाज जामिनाचा. आमच्या मते आजची रात्र गजाआड टाकणं गरजेचं आहे. वीस वर्षं दोषी ठरवायला आणि वीस मिनिटांत जामीन? ना इन्साफी हिरन के प्रति!
हाही अंदाज बरोबर निघाला. न्यायालय म्हणालं, ‘आज काही नाही, उद्या या!’
आता ‘उद्या’ महत्त्वाचा होता. सलमान, बिष्णोई आणि माध्यमांसाठीही उद्या जामीन मिळाला नाही, तर वरच्या न्यायालयात लगेच जाता येणार नाही. नंतर शनिवार-रविवार म्हणजे जामीन गेला सोमवर-मंगळवारवर. पण आमच्या ‘अंदाज अपना अपना’मध्ये वेगळाच मुद्दा आला.
‘उद्या’ सात एप्रिल. भाजप स्थापना दिन. आणि मुंबईत महामेळाव्याचं आयोजन. तेही बांद्रा बीकेसीमध्ये! आणि सलमान राहतो बांद्रा पश्चिमेस. आता सहा तारखेलाच जामीन मिळाला तर ओबी व्हॅनसह बऱ्याच झुंडी तिकडे पळायच्या! न जाणो गावोगावचे हौशी कार्यकर्तेही पळायचे तिकडे आणि वाहिन्यांवर मेळाव्याऐवजी भाईजान छोटा पडदा व्यापून टाकायचा. राष्ट्रहित पाहता हे काही योग्य नाही. साठ वर्षांत प्रथमच इतका देशभक्त पक्ष केंद्रात व बहुतांश राज्यांत सत्तेवर, त्याचा महामेळावा, तोही पक्षाध्यक्षांचा, तो अशा फुटकळ सिनेस्टार आणि हरिणाच्या शिकारीनं वाया घालवायचा? त्यापेक्षा राहू दे तो एक दिवस तिथंच.
आणि आश्चर्य! सहा तारखेला सकाळी तासभर ऐकून न्यायालय म्हणालं, ‘उद्या!’ आणि न्यायाधीशही बदलले. झालं! भाईजानचा जामीन उद्यावर गेला आणि वृत्तवाहिन्या महामेळाव्याकडे वळल्या. बांद्रा पश्चिम मोकळा झाला आणि बांद्रा पूर्व भरून गेले!
मग आता उद्या काय होणार? तर ‘अंदाज अपना अपना’ आमचा म्हणाला ‘उद्या भाईला जामीन मिळणार!’ कसं काय बुवा? तर आमच्या मते वृत्तवाहिन्यांनी मेळाव्याच्या यशस्वीतेवर मोहर उमटवण्याऐवजी वाहतूक कोंडी, प्राण्यांच्या उपमा नि सेनेबद्दल नरमाई हेच विषय बनवले संध्याकाळपासून! वर लालभाई, मराठा मोर्चाशी तुलना! आता ही चर्चा तोडायची तर उद्या भाईजान बाहेर यायला हवा आणि कॅमेरे बांद्रा पूर्ववरून पुन्हा बांद्रा पश्चिमला जायला हवेत!
आणि तसंच की हो झालं! आमचा अंदाज बरोबर निघाला! अधिवेशन पार पडलं, भाईजान घरी आला, बिष्णोई आता आठ मे ची वाट पाहताहेत.
त्यापुढे काय, त्याचा ‘अंदाज अपना अपना’ बांधायला सुरुवात करा.
.............................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Sourabh suryawanshi
Wed , 11 April 2018
पवारसाहेब ( लेखक महोदय) आपल्या लेखणीला तोड नाय ...मजा पण येते आणि गांभीर्य पण जाणवते...
vishal pawar
Wed , 11 April 2018
अशी ही बनवाबनवी....