भाजपचा मेळावा वादग्रस्त…शहा-फडणवीस नैराश्यग्रस्त
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • भाजपचा मेळावा मुंबईतला मेळावा
  • Wed , 11 April 2018
  • सदर सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar अमित शहा Amit Shah देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis भाजप BJP

भारतीय जनता पक्षाचा ३८ वा पक्षस्थापना मेळावा ६ एप्रिल २०१८ रोजी मुंबईत पार पडला. तेव्हापासून त्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्र भाजपनं शक्तीप्रदर्शन केलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या मेळाव्यातली भाषणं वादग्रस्त ठरली. 

सत्ताधारी पक्षानं खूप जबाबदारीनं वागलं पाहिजे. या जबाबदारीचा अभाव या मेळाव्यात दिसला, असं निरीक्षण माध्यमांनी आणि विरोधी पक्षांनी नोंदवलं आहे. या मेळाव्यात अमित शहा, देवेंद्र फडणवीस खूप आक्रमकपणे बोलले. एवढा आक्रमकपणा जनतेची कामं करण्यासाठी का वापरला जात नाही, असाही प्रश्न विचारला गेला.

अलीकडच्या काळात मुंबईत आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा आला होता. वनजमिनी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी तो होता. नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च कम्युनिस्ट पक्षानं काढला. सहा दिवस पायी चालत मोर्चेकरी मुंबईत धडकले. या मोर्च्यात खूप शिस्त होती. रस्त्यानं मोर्चेकऱ्यांनी कुणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली. वाहतुकीला अडथळा होणार नाही असं पाहिलं. त्यामुळे या मोर्च्याविषयी शहरातल्या लोकांमध्ये सहानुभूती तयार झाली.

मोर्चा मुंबईत आला, तेव्हा दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू होत्या. परीक्षा देणाऱ्या मुलांना त्रास होऊ नये म्हणून मोर्चेकरी रात्रीचा प्रवास करून, झोप न घेता आझाद मैदानात दाखल झाले. त्यामुळे मोर्चेकऱ्यांचं शहरवासीयांनी खूप कौतुक केलं. लोकसंघटनांनी स्वखुशीनं मोर्चेकऱ्यांना पाणी, चहा, बिस्किटं, जेवण दिलं. शिवाय त्यांच्या प्रश्नांना पाठिंबा दिला. त्याचं माध्यमांनी वार्तांकन केलं. त्याचा परिणाम झाला. मोर्चाचा सत्ताधाऱ्यांवर दबाव आला आणि मुख्यमंत्र्यांना मोर्चेकऱ्यांशी सकारात्मक चर्चा करावी लागली. त्यांचे प्रश्न मार्गी लावावे लागले. 

भाजपचा महामेळावा आणि आदिवासी शेतकऱ्यांचा लाँग मार्चची तुलना मुंबईकरांच्या मनात येणं स्वाभाविक होतं. लाँग मार्चला शहरवासीय मुंबईकर, ठाणेकर मदत करत होते. तर उलट महामेळाव्याला आलेल्या कार्यकर्त्यांविषयी मुंबईकर तक्रार करत होते. मुंबई लोकलमध्ये महामेळाव्यासाठी आलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर प्रवासी उखडले. ट्रेनच्या डब्यातून भाजप कार्यकर्त्यांना प्रवाशांनी उतरून दिलं. काही बेशिस्त भाजप कार्यकर्ते लोकांना त्रास होईल असं वागल्यामुळे हे घडलं. मुंबईत वांद्र्यात तर कामाला जाणाऱ्या मुंबईकरांना बेस्ट बस मिळेनात. दोन बसथांब्यावर थांबलेले चाकरमाने मुंबईकर चिडले. त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधी, कॅमेऱ्यांसमोर भाजप कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे, वाहतुकीत अडथळा आल्यानं आम्हाला त्रास होतोय अशा तक्रारी केल्या.

खरं तर कामाच्या दिवशी एवढी गर्दी मुंबईत जमा करण्याची काही गरज नव्हती, असा सूर सगळीकडे उमटला. पण भाजप नेते-कार्यकर्ते याविषयी बेफिकीर दिसले. कार्यकर्त्यांच्या बसेस, खाजगी कार यांनी वाहतुकीत अडथळा आणला… ६ एप्रिलला सकाळी मुंबईत ट्रेन, बसेसचा बोजवारा उडाला. त्यातून सर्वसामान्य मुंबईकर, ठाणेकरांना मनस्ताप झाला. शाळा-कॉलेजांच्या परीक्षेच्या काळात हे घडलं. त्यामुळे विद्यार्थी-शिक्षक-पालकही हैराण झाले. या हैराणीतून नाराजी पसरली. 

लाँग मार्चनंतर मुंबईत प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलित-बहुजन कार्यकर्त्यांचा एल्गार मोर्चा निघाला होता. हे कार्यकर्ते शिस्तीनं आझाद मैदानात जमले होते. या मोर्च्यात कार्यकर्त्यांची संख्या पन्नासेक हजाराच्या आसपास होती. पण कार्यकर्त्यांनी शिस्त पाळल्यानं कुणाला त्रास झाला नाही. लाँग मार्च, एल्गार मोर्चा शिस्तीनं पार पडला. लोकांना त्यातून त्रास झाला नाही तर मग भाजप मेळाव्याला आलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी शिस्त पाळायला काय हरकत होती, असा प्रश्न विचारला गेला. 

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

भाजप मेळावा त्या पक्षानं नियोजन केल्याप्रमाणे ‘महा’ झाला. गर्दी खूप होती. त्यामुळे शक्तीप्रदर्शन झालं. पण या मेळाव्यानं नेमकं काय साधलं? या मेळाव्यातून कोणता विचार नेत्यांनी दिला? पक्षानं कार्यकर्त्यांना कुठला कार्यक्रम दिला? भाजपबरोबर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची या मेळाव्यावरची प्रतिक्रिया बोलकी आहे. शिवसेनेनं म्हटलं, ‘हा मेळावा ‘महा’ झाला, पण ‘महा’ विचार काही मेळाव्यात दिसला नाही. काँग्रेसनं म्हटलं की, विरोधक संघटित होत असल्यानं भाजपाई घाबरलेत. त्यामुळे ते निराशेतून आक्रमक झालेत. त्यामुळे नेत्यांच्या भाषणाची पातळी घसरली. 

या मेळाव्यातलं अमित शहा यांचं भाषण शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांना खटकलं. शहा यांनी विरोधकांना साप, मुंगुस, कोल्हे, लांडगे, कुत्रे अशा प्राण्यांची उपमा दिली. लोकशाहीत विरोधी पक्षाचं महत्त्वाचं स्थान असतं. विरोधकांचे आरोप सभ्य भाषेत खोडता येतात. सभ्य भाषेत त्यांना उत्तरं देता येतात, हे अमित शहा अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून शिकले नसावेत. शहा यांनी वाजपेयींचं स्मरण या मेळाव्यात केलं. वाजपेयी यांनी ३८ वर्षांपूर्वी मुंबईत भाजप स्थापना मेळाव्यात म्हटलं होतं, ‘अंधेरा छटेगा, सुरज निकलेगा, कमल खिलेगा.’ ही घोषणा भाजप कार्यकर्त्यांमध्ये तेव्हापासून आतापर्यंत गाजते आहे. तिचा उल्लेख अमित शहा यांनी केला. पण वाजपेयी पक्षाध्यक्ष आणि पक्षाचे नेते असताना विरोधकांना कसे सुसंस्कृत भाषेत उत्तरं देत, कार्यकर्त्यांना कसं पुढे जायचं याची दिशा ज्या शालीनतेनं सांगत, गळी उतरवत ते अमित शहा विसरले.

शहांचं या मेळाव्यातलं भाषण विरोधकांना प्राण्यांच्या उपमा देणारं, त्यांना कस्पटासमान लेखणारं होतं. देशातले सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या सर्वांनी ‘मोदी हटाव’ची घोषणा दिलेली आहे, हे शहांच्या जिव्हारी लागलेलं दिसलं. त्या वेदनेतून त्यांचं भाषण विखारी झालं. तो विखार त्यांच्या बोलण्यात, वाक्यावाक्यात दिसत होता. 

अमित शहा हे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जगातल्या सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांचा पक्ष केंद्रात आणि देशातल्या वीस राज्यात सत्तेवर आहे. एवढी प्रचंड सत्ता हातात असताना ते आतून एवढे घाबरलेत का? त्यांनी खरं तर या प्रसंगी पक्षानं गेल्या चार वर्षांत काय कामं केली, ते सांगायला हवं होतं. पण त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि विरोधकांना लांडगे, कोल्हे, कुत्रे संबोधण्यात भाषण वाया का घालवलं?

भाजपला श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, रामभाऊ म्हाळगी अशा सुसंस्कृत नेत्यांची मोठी परंपरा आहे. त्यांची भाषणं विरोधकही सहानुभूतीनं ऐकत. या नेत्यांना जनमनात स्थान होतं. भाजपची जननी जनसंघ आहे. या जनसंघात अनेक शालीन नेते होते. त्यांचा साधेपणा, प्रामाणिकपणा लोकांना भावत असे. आता भाजपनं जनसंघाच्या संस्कृतीपासून घटस्फोट घेतलाय की, काय असा प्रश्न विचारला जातोय. दीनदयाळ उपाध्याय-वाजपेयी यांची राजकीय संस्कृती भाजप हरवून बसलाय की काय? हा प्रश्न या मेळाव्यानंतर पुढे येतोय. अमित शहा यांच्या भाषणानंतर तो अधिक टोकदार बनतोय. 

हा मेळावा कार्यकर्त्यांना समर्पित आहे, असं भाजप नेते सांगत होते. पण कार्यकर्त्यांना मेळाव्यातून काय विचार मिळाला? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मेळाव्यातलं भाषण हे जरा जास्तच चिडचिड व्यक्त करणारं ठरलं. एक तर ते कारण नसताना चढ्या आवाजात बोलले. त्यामुळे त्यांचा घामाघूम होऊन दम निघाला. भाषणात फडणवीस विरोधकांवर टीका करताना त्यांना ‘नालायकांनो’ असं म्हणाले. हा शब्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडी शोभतो का? असाही प्रश्न विरोधक विचारत आहेत.

फडणवीसांचा हा अति आक्रमकपणा आतून घाबरल्यामुळे आला की काय? चहा घोटाळा, उंदीर घोटाळ्यामुळे झालेले आरोप फडणवीसांना जिव्हारी लागलेले असावेत. कदाचित म्हणूनच असे आरोप करणारे विरोधक ‘नालायक’ आहेत, असं म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली असावी. फडणवीसांना या मेळाव्यात मुख्यमंत्री म्हणून साडेतीन वर्षांत केलेल्या कामांवर सुसंस्कृत भाषेत बोलता आलं असतं. कार्यकर्त्यांशी संवाद साधता आला असता, पण विरोधकांना दूषणं देण्यात त्यांनी ही संधी दवडली की काय? 

भाजपच्या स्थापना दिनी कार्यकर्त्यांना भावी काळासाठी अजेंडा देता आला असता. पण अधिक सत्ता मिळवायची याचा पाढा वाचण्यापलीकडं या मेळाव्यात नवा विचार नेत्यांनी दिला नाही, असं दिसलं. कार्यकर्त्यांविषयीच्या तक्रारीमुळे सामान्य लोकं भाजपवर नाराज झाले आणि नेत्यांच्या भाषणांनी निराशा केली. या पलीकडे या मेळाव्याचं वेगळं फलित दिसलं नाही, हे खेदानं म्हणावं लागतं. 

.............................................................................................................................................

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

vishal pawar

Wed , 11 April 2018

बरोबर.... सहमत....


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......