आणि हा हा म्हणता बायकांचा मोठा गट ग्रामपंचायतीच्या दिशेनं निघाला...
अर्धेजग - कळीचे प्रश्न
काजल बोरस्ते, प्रियंका अक्कर
  • ब्राह्मणवाडे गावातील महिलांची ग्रामसभा
  • Mon , 09 April 2018
  • अर्धेजग women world कळीचे प्रश्न महिला ग्रामसभा Mahila Gramsabha जागतिक महिला दिन International Women's Day हॅप्पी विमेन्स डे Happy Women's Day

नाशिकस्थित अभिव्यक्ति मीडिया फॉर डेव्हलपमेंट या सामाजिक संस्थेत ग्रामीण भागातील मुलींच्या सक्षमीकरणासंबधित कृतीसंशोधनाचं सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील १० गावांमधील १०० मुलींसोबत हे काम चालू आहे. त्यापैकीच एका ब्राह्मणवाडे या गावात मागच्या - महिन्यात ८ मार्चला, महिला दिनाला - गावात पहिल्यांदाच झालेली ‘महिला विशेष ग्रामसभा’ झाली. त्याविषयीचा हा लेख. 

.............................................................................................................................................

आठ मार्च. आंतरराष्ट्रीय महिला दिन. कर्तबगार महिलांचे सत्कार, महिलांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानं, नऊवार साडी आणि फेटे मिरवत ‘बाई’क रॅल्या, घरात, ऑफिसात लहान-मोठं ‘सेलिब्रेशन्स’, सामोसे, गजरे आणि परफ्युम्सचा घमघमाट या सगळ्या वातावरणातून कैक मैल लांब होत्या नाशिकजवळच्या ब्राह्मणवाडे या गावातील महिला. आठ मार्च आणि त्याचं वेगळेपण याची कल्पना नव्हती. मात्र त्याच गावातील आठ-दहा तरुण मुली मिळून गावातील सगळ्यांचं दार ठोठावत होत्या. चुली समोर भाकऱ्या थापत बसलेल्या या महिलांना घराचा उंबरठा ओलांडायला भाग पडणारा एकच आस्थेचा विषय होता- गावातील पाण्याचा तुटवडा. मुलींनी नेमका तोच विषय हेरला आणि याच एका मुद्द्यावर त्या गावभर ओरडत फिरल्या की, ‘चला, चला, आपल्याला आपल्या गावातल्या पाणीप्रश्नाबद्दल सरपंचांशी बोलायचंय.’ आणि हा हा म्हणता बायकांचा हा मोठा गट ग्रामपंचायतीच्या दिशेनं निघाला.

या बायकांना जमा करणाऱ्या या मुली म्हणजे अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट या संस्थेच्या मदतीनं ग्रामीण भागातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी कृतीसंशोधनाच्या माध्यमातून प्रयत्न करणाऱ्या संशोधक मुली, ‘शोधिनी’.

अभिव्यक्ति मीडिया फॉर डेव्हलपमेंट ही परिवर्तनासाठी माध्यमं ही संकल्पना घेऊन काम करणारी एक नाशिकस्थित स्वयंसेवी संस्था. या संस्थेनं गेल्या दोन वर्षांपासून ग्रामीण भागातील युवतींच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी कृतीसंशोधन या साधनाचा वापर करायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला फक्त पाच गावांमध्ये सुरू झालेलं हे काम आता नाशिकमधील आणखी दहा गावांमध्ये सुरू आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वत:ची गोष्ट सांगण्याचा अधिकार आहे, हे तत्त्व मानत अभिव्यक्ती गेल्या ३० वर्षांपासून उत्तर महाराष्ट्रात काम करत आहे. ‘शोधिनी कृतीसंशोधन’ हा असाच एक प्रयत्न. १४ ते २५ वयोगटातील या मुली स्वत:च या संशोधनाच्या संशोधक आणि विषयसुद्धा आहेत.  

...तर या शोधिनींचं बोट धरून बायकांनी जरा बिचकतच ग्रामपंचायतीची पायरी ओलांडली. दर महिन्याला ग्रामसभा होण्याच्या एक दिवस आधी गावातील महिलांची ग्रामसभा व्हावी आणि महिला दिनाला तर विशेष महिला ग्रामसभा घेतली जावी, अशी विशेष दुरुस्ती ग्रामपंचायतीच्या कायद्यात झाली खरी, पण ती फक्त कागदावरच. याचंच प्रतीक म्हणजे या महिला दिनाला ब्राह्मणवाडेच्या ग्रामपंचायतीत सरपंचांपासून सदस्यांपर्यंत कुणीच उपस्थित नसणं. पण तरीही बायकांनी एकत्र येऊन आपल्या पाण्याच्या प्रश्नाला वाचा फोडायला सुरुवात केली. सुटलेली पेन्सिल पाटी असेल किंवा तुटलेला पाठीचा कणा असेल या सगळ्याचं कारण म्हणजे डोक्यावर पाचवीला पुजलेला पाण्याचा हंडा. तोच बायकांचं मौन तोडण्यासाठी उपयोगाचा ठरला.

एकेक करत या बायकांनी आपापल्या व्यथा मांडायला सुरुवात केली. पाणीप्रश्नावरून सुरू झालेली ही व्यथांची मालिका पुढे मुली शिक्षणापासून दुरावणं, गावाला जुगार आणि दारूचं लागलेलं ग्रहण, त्याची आपल्या कुटुंबावर पडत असलेली गडद छाया, फक्त सरकारी कागदांवर असलेलं हागणदारी मुक्त गाव आणि प्रत्यक्षात मात्र गावभर पसरलेली विष्ठा आणि या साऱ्याचा गावाच्या प्रकृतीवर होणारा प्रतिकूल परिणाम इथंपर्यंत जाऊन पोहचली. या सर्व प्रश्नांच्या थेट आणि पहिली शिकार ठरतात, त्या गावातल्या बायका आणि मुली. पण स्त्रियांनी आपलं तोंड उघडायचं नाही आणि स्वत:ला होणाऱ्या त्रासाबद्दल तर ब्र सुद्धा काढायचा नाही, हे मानणाऱ्या गावातल्या वातावरणामुळे हे सगळे प्रश्न आतापर्यंत मौनातच विरले होते. पण आता आपण बोलायला हवं. आपली उत्तरं मिळवण्यासाठी प्रश्न विचारायला हवेत. जर आमचं आयुष्य हंड्याचा भार वाहण्यात जात असेल तर ग्रामपंचायतीत होणाऱ्या पाणीप्रश्नाबद्दलच्या चर्चेत आमचा सहभाग का नसतो?, असा रास्त प्रश्न विचारत बायकांनी बोलायला सुरुवात केली. आणि सरपंच बाई असू देत किंवा पुरुष ग्रामपंचायत ही फक्त गावातल्या बाप्या माणसांची बसण्या-उठण्याची जागा असते, असा अलिखित नियम या बायकांनी पदर सावरत मोडला.

पाणीप्रश्नावरून सुरू झालेल्या या चर्चेला स्वल्पविराम देत शोधिनींनी बायकांना सांगितलं की, इथं आपण फक्त पाण्याच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी नाही तर महिला दिनाच्या निमित्तानं एकूणच आपल्या सगळ्या स्त्रियांचे काय प्रश्न आहेत यावर बोलण्यासाठी जमलो आहोत. आणि ही साधीसुधी सभा नसून महिला दिनानिमित्त असलेली ‘महिला विशेष ग्रामसभा’ आहे. आणि या ग्रामसभेत आम्ही आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो!

मग ग्रामसभा असेल तर सरपंच तिथं असायलाच हवेत, अशा आणखी एका मागणीनं जोर धरला आणि आतापर्यंत गावात कधीच न झालेल्या फक्त महिलांच्या या अभूतपूर्व ग्रामसभेला सरपंचांना यावंच लागलं. ‘महिलांची ग्रामसभा’ बघणं हा सरपंचांसाठीही सुखद (कदाचित दु:खद) धक्काच होता.

.............................................................................................................................................

‘सेपिअन्स - मानवजातीचा अनोखा इतिहास’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

हळूहळू बायकांच्या या छोटेखानी चर्चेला औपचारिक ग्रामसभेचं रूप येत गेलं. मला भेडसावत असणारे प्रश्न हे फक्त माझेच प्रश्न नाहीत, तर माझ्यासारख्या कितीतरी बायकांचे प्रश्न आहेत, हे कळताच प्रत्येकीच्या बोलण्याला सामूहिक स्वर मिळाला. हा सामूहिक आवाज उभा करणं हे उद्दिष्ट असलेल्या शोधिनींनी त्यात आपलासुद्धा स्वर मिसळला. “आमचं शिक्षण मध्येच का थांबतं? कुणाची तरी मुलगी कुठेतरी पळून गेली म्हणून घरासमोरच असलेल्या शाळेतही आम्हाला पाठवत नाहीत. मुलगी काहीच करत नाही, घरीच असते म्हणून लग्न उरकलं जातं. आणि आम्ही जरा कुठे विरोध करायचा प्रयत्न केला तर जास्त शहाणी झाली म्हणून गप्प बसवलं जातं,’’ असं निर्धास्तपणे बोलत शोधिनींनी या ग्रामसभेच्या चर्चेला नवीन वळण दिलं.

चर्चा मुलींच्या आणि महिलांच्या प्रश्नांवर होते आहे म्हणजे लग्न, नवऱ्याचा- सासरच्यांचा जाच, घरगुती जबाबदाऱ्या हे सारे मुद्दे आड येणारच. पण मुलींनी या प्रश्नांच्या आणखी मुळाशी जाऊन नेमकी त्याची दुखरी बाजू हेरली. बऱ्याचदा मुलीच्या इच्छेविरुद्ध लग्न होतं आणि बव्हंशी तो बालविवाह असतो. मुलीला फक्त अठरावं लागण्याची वाट पाहिली जाते आणि कधीकधी तर तितकीही कळ न सोसता चांगलं स्थळ आलं की, मुलीला तिच्या इच्छेविषयी विचारणंसुद्धा पालकांना संयुक्तिक वाटत नाही.

जगभर ‘किशोरवयीन मुली’ या विषयाशी संबंधित बरीच चर्चा आणि कामं सुरू असतात, पण ग्रामीण भागात मात्र मुलींच्या आयुष्यात बालपण आणि प्रौढत्व या दोनच अवस्था असतात. बालवयातून थेट प्रौढत्वात रवानगी होणाऱ्या या मुलींच्या आयुष्यातील किशोरवय हे फक्त अंगणवाडीच्या कागदांवरच उरते. मग पुन्हा सुरू होतं तेच चक्र- नवऱ्याचा जाच, अपुरं शिक्षण, संसारिक जबाबदाऱ्या आणि त्यात अडकलेल्या मुली नव्हे. पुन्हा तोच ओझ्याचा हंडा डोक्यावर वाहत हतबलतेचं चक्र पुढे अव्याहत सुरू राहतं.

समाजाकडून बायकांना मिळालेल्या परिस्थितीचा वानोळा आपल्याच मुलींना मिळावा यासाठी याच बायका कळत-नकळत प्रयत्न करतात आणि आपल्या मुलींनाही त्याच चक्रात ढकलतात, हा किती मोठा विरोधाभास आहे याची जाणीव मुलींनी जमलेल्या बायकांना करून दिली. गावात पुरुषांना बोलण्यासाठी बऱ्याच जागा आहेत, महिलांना बोलण्यासाठीसुद्धा व्यासपीठं तयार होत आहेत, पण गावातल्या मुलींचे आवाज मात्र कधीच ऐकले जात नाहीत. त्यांचं शिक्षण, लग्न, भविष्याविषयीच्या कल्पना, त्यांना येणाऱ्या अडचणी आणि एकूणच त्यांचं आयुष्य याविषयी त्यांची मतं काय आहेत याबाबत सगळीकडेच अनास्था दिसते. “आम्ही अभिव्यक्ती संस्थेच्या मदतीनं हे सगळे कधीच न ऐकले गेलेले आवाज एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहोत ‘शोधिनी’ प्रकल्पाच्या माध्यमातून. पण यासाठी सुद्धा आया, बहिणी, मावशा, काकवा या भूमिकेतून विरोध करण्यात सगळ्यात पुढे तुम्ही बायकाच असतात.” मुलींच्या अशा तक्रारवजा आरोपानं बायका चांगल्याच चकाकल्या. बायकांचा आवाज सरपंचांनी ऐकण्याची जशी ही पहिलीच वेळ होती, तसाच मुलींचा असा आवाजसुद्धा बायकांनी पहिल्यांदाच ऐकला.

ज्या समस्यांनी आता बायकांची शिकार केली आहे, त्याच समस्या उद्यासाठी मुलींवर डुख धरून बसल्या आहेत. आपल्या समस्या एकच आहेत फक्त त्यांची शिकार वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा गट ठरतो आहे. एकटी-दुकटीनं यावर आवाज उठवून काही होणार नाही. एकत्र येऊन काम करायला हवं, याची जाणीव झाल्यानं बायकांनी मुलींच्या या कृती-संशोधनाच्या कामाला पाठिंबा दिला आणि आता आपण सर्व मिळून हे काम पुढे नेऊ असं आश्वासनही दिलं. गावातल्या महिला आणि मुलींना भेडसावणाऱ्या प्रश्नांना आता आपण एकत्र मिळून वाचा फोडू आणि बदलासाठी करायचा कृतीकार्यक्रमसुद्धा एकत्रित चर्चा करून ठरवू, असं सर्वांनी एकत्र येऊन ठरवलं आणि महिला दिनाच्या मुहूर्तावर त्याची सुरुवातही झाली.

गावातील सर्वांत महत्त्वाच्या प्रश्नावर म्हणजे पाण्याच्या समस्येवर सर्वांनी एकत्र मिळून काम करायचं. सरपंच किंवा इतर पदाधिकाऱ्यांकडे याचा सतत पाठपुरावा करायचा आणि ग्रामपंचायतीच्या पातळीवर हा प्रश्न सोडवला गेला नाही, तर हा मुद्दा पुढे घेऊन जाण्यासाठीसुद्धा बायकांनी कंबर कसली.

परिवर्तनाचा विचार हा नेहमी फक्त शहरी किंवा उच्चवर्णीय वर्गापुरता मर्यादित असतो. आणि त्यातही ते परिवर्तन स्त्रियांविषयी असेल तर ग्रामीण भागाचा समावेश त्यात गृहीत धरलेलाच नसतो. या दृष्टिकोनामुळेच स्त्रिया आणि त्यातही ग्रामीण भागातील स्त्रिया बऱ्याचदा या परिवर्तनाच्या चळवळीपर्यंत पोहचतच नाहीत. महिला दिनाच्या निमित्तानं ब्राह्मणवाडेसारख्या छोट्याशा गावात झालेली, किंबहुना मुलींनी घडवून आणलेली महिला विशेष ग्रामसभा म्हणजे या परिवर्तनाच्या चळवळीचं विकेंद्रीकरण करण्याचा एक प्रयत्न होता. महिलांचं नेतृत्व ही संकल्पनाच दुर्लक्षित असलेल्या गावाच्या वातावरणाला दिलेला हा एक धक्का होता. ‘महिलांच्या जीवनात परिवर्तन आणणारे ग्रामीण आणि शहरी कार्यकर्ते’ या संयुक्त राष्ट्रसंघानं जाहीर केलेल्या या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या थीमच्या दिशेनं कळत-नकळत उचललेलं एक पाऊल होतं.

खरं तर महिला दिन म्हणजे महिलांचं यश, त्यांचं नेतृत्व साजरं करत स्त्री-पुरुष समानतेच्या प्रवासातलं एक पाऊल आहे. स्त्री-पुरुष समानता हेच अंतिम उद्दिष्ट असेल तर मग महिला दिन साजरा करावा की, नाही यावर बरेच वादविवाद आहेत. ग्रामीण भागातील महिलांना आपल्या आवाजाची आणि एकजुटीची ताकद कळत असेल तर आता फक्त प्रश्न मांडून सुरू झालेला हा प्रवास कधीतरी एखाद्या महिला दिनी या महिलांच्या नेतृत्वाचा सन्मान करण्यासाठीही साजरा होऊ शकतो.

.............................................................................................................................................

काजल बोरस्ते या अभिव्यक्ति मीडिया फॉर डेव्हलपमेंट, नाशिक या संस्थेत काम करतात. 

kjlbrst165@gmail.com

प्रियंका अक्कर या अभिव्यक्ति मीडिया फॉर डेव्हलपमेंट, नाशिक या संस्थेत काम करतात.

priyaakkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लग्नासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या सबळ असणे आणि विशिष्ट वयाचे असणे महत्त्वाचे नसून भावनिकदृष्ट्या स्थिर असणे, सर्वांत जास्त गरजेचे आहे, याचा आपण जोवर विचार करणार नाही, तोवर अतुल सुभाषसारखे बळी जातच राहतील

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भावना व नाती हाताळायची पद्धत वेगळी असते का, असा प्रश्न सामान्य व्यक्तीला पडू शकतो. एवढे उच्चशिक्षित, तंत्रज्ञानावर हुकमत असलेली हे लोक जेव्हा भावनांचा भाग येतो, तेव्हा का अपयशी ठरत असावेत? अतुल सुभाष यांचा दुर्दैवी मृत्यू हा पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबधित, भारतीय लग्नसंस्थेविषयी आणि कायदा व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करतो.......