अजूनकाही
इरफान खानच्या हस्तमैथुनानं (masturbate) चित्रपटाला सुरुवात होते. जे नंतरही चित्रपटात वारंवार एका किंवा दुसऱ्या व्यक्तीकडून होत राहतं. (ज्यासाठी 'प्रेरणा' म्हणून इरफान आलटून पालटून सहकारी ते अगदी थेट बॉसच्या पत्नीचा फोटो वापरतो.) या दृश्यासोबत ‘सटासट’ नावाचं एक भन्नाट गाणं आणि काही माँटाज यांचा अफाट वापर दिग्दर्शक अभिनय देव करतो आणि पकड न सोडणाऱ्या चित्रपटाची सुरुवात होते.
यातील मुख्य पात्र, देव कौशल (इरफान खान) एक विनोद सांगताना दिसतो. तो विनोद असा : एक नवरा एकदा त्याच्या बायकोला सरप्राइज देण्यासाठी म्हणून रोजच्या वेळेआधी घरी जातो. मात्र होतं काय की, तो तिला दुसऱ्या एका पुरुषासोबत पाहतो. मग हा दुसरं काही करण्याऐवजी तिच्या प्रियकराला ‘ब्लॅकमेल’ करायचं ठरवतो. ब्लॅकमेलची कथा याच विनोदाभोवती फिरते. मुळात तो विनोद नसतोच म्हणा. कारण देव त्याचीच गोष्ट सांगत असतो.
हे कथानक सोपं असलं तरी पुढे यात तशीच पाचेक उपकथानकं निर्माण होतात. आणि त्यातील प्रत्येकाचा दुसऱ्याशी किंवा इतरांशी असलेला संबंध या सगळ्या गुंत्यात कथानकाचं यश आहे. पण हे यश पुन्हा एकदा 'डेली बेली'च्या (delhi belly) यशाचं पुनर्निर्माण करण्याचा प्रयत्न वाटत राहतं. जे अनेक पातळ्यांवर यशस्वीदेखील होतं. आणि इतक्या सगळ्या गुंत्यातही कथानकात तशा फार मोठ्या त्रुटी वगैरे आढळत नाहीत. चित्रपटात काही उणीवा जरूर आहेत. (ज्यातील एक म्हणजे यातील इन्स्पेक्टर देवला चार-पाच दिवसांनी पुन्हा येऊन अटक करतो, अशा संदर्भाचं वाक्य बोलतो. पण तो ते तेव्हाच करत नाही.) पण त्या कथानकातील गुंत्यामुळे तयार होत नाहीत हेही तितकंच खरं.
इरफाननं साकारलेला देव कौशल मध्यमवर्गीय मानसिकता असलेला, स्वतःच्या अनेक समस्यांमध्ये अडकलेला, परिस्थितीमुळे तयार झालेला एक बळी आणि मग त्यातून निर्माण झालेला एक गुन्हेगार म्हणून उभा राहतो.
आनंद म्हणून प्रधुमन सिंग; देवची पत्नी, रीना कौशल म्हणून किर्ती कुल्हारी आणि अरुणोदय सिंगनं साकारलेला तिचा प्रियकर असलेला रणजित अरोरा हे कलाकार मध्यवर्ती पात्रांच्या भूमिकेत दिसतात. याशिवाय अनुजा साठेची प्रभा घाटपांडे, दिव्या दत्ताची डॉली वर्मा आणि गजराज रावचा चावला हे तिघेही 'चेरी ऑन द टॉप' म्हणावेत अशा रूपात दिसतात. त्यामुळे एकूणच पटकथेच्या पातळीवर बऱ्यापैकी यशस्वी झालेलं हे प्रकरण तितक्याच तगड्या रूपात पडद्यावरही दिसल्यानं यातील फार्स आणि प्रासंगिक विनोद आणखी ताकदीनं आपला अपेक्षित परिणाम करतात. शिवाय ओमी वैद्यही देवच्या बॉसच्या रूपात दिसतो. ज्याची भूमिका जरी मर्यादित स्वरूपाची असली तरी तो काही विनोद उकळण्यात नक्कीच यशस्वी होतो.
अभिनय देवनं केलेले काही दृश्यबदल चांगले आहेत. म्हणजे इरफान झोपत असताना त्याचे उघडे डोळे आणि पुढील दिवसाच्या सुरुवातीला त्याच्यासमोर ठेवलेल्या ऑम्लेटच्या बलकातील कट अशा काही फ्रेम्स उजव्या आहेत. दुसरं फार्स म्हणून चित्रपट समोर मांडताना चित्रपटात आणि रणजित अरोराच्या घरातही सगळा गोंधळ सुरू असताना कॅमेरा त्याच्या घराच्या बाहेर आणत 'सुख निवास' अशा पाटीवरून अलगद फिरवणं, असे काही (किंवा खरं तर अनेक) विडंबनात्मक क्षण मजेशीर आहेत. जे चित्रपटाच्या एकूण प्रभावात भर घालतात.
सुरुवातीला इरफाननं पत्नीच्या अफेअरबद्दल कळाल्यानंतर घरातून बाहेर घेतलेली धाव आणि नंतरही बराच वेळ धावत राहणं, हे दृश्य आणि त्याला असलेली पार्श्वसंगीताची जोड, यामुळे सुरुवातीच्या काही प्रसंगांमधून उत्तम वातावरण निर्माण होतं.
असं सगळं असलं तरी चित्रपट जरासा लांबला आहे असं वाटत राहतं. शिवाय मध्यंतरानंतर प्रत्येक जण एकाच वेळी एकाचा बळी आणि दुसऱ्याचा गुन्हेगार म्हणून दिसत असल्यानं, ज्या वेगवेगळ्या परिस्थती निर्माण होतात, त्या जराशा पुनःपुन्हा घडत असल्याची भावना निर्माण झाल्यानं चित्रपटाचं लांबणं जास्त ठळक होतं.
तरीही एकूण चित्रपट बराच प्रभावी वाटतो. कारण तो या उणीवांखेरीजही कुठे कंटाळा आणत नाही. त्यातील ब्लॅक आणि स्लॅपस्टिक कॉमेडी सतत काही ना काही घडवत राहते. ज्याला अमित त्रिवेदीच्या (जवळपास) कॅची संगीताची जोड असल्यानं चित्रपट रेंगाळत असूनही जलद गतीनं सुरू आहे असा भास निर्माण केला जातो.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment