अजूनकाही
'संगीत देवबाभळी' या कलाकृतीनं मटा सन्मान आणि झी गौरवचे जे अनेक पुरस्कार पटकावले आहेत, ते किती योग्य आहेत, याचा प्रत्यय ही कलाकृती पाहताना येतो. लेखक आणि दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांनी अतिशय तरलपणे ही कलाकृती साकारताना कधी मिश्किल, कधी धीरगंभीर होत आवली आणि रखुमाईची कथा गुंफली आहे.
तुकारामाची पत्नी आवली एकदा त्यांच्यासाठी भाकर घेऊन जात असताना तिच्या पायात देवबाभळीचा काटा रुततो आणि ती कोसळते. तिला शुद्ध येते, तेव्हा ती तिच्या घरात असते आणि तिच्या शेजारी बसून लखुबाई म्हणजेच विठोबाची रखमाई भाकऱ्या भाजत असते. आवलीची जखम बरी होईपर्यंत लखुबाई पतीच्या सांगण्यावरून तिच्या मदतीला थांबते. पण देवाच्या नादी नवरा लागल्यामुळे विठोबाला आवलीनं शिव्या घालणं लखुबाईला आवडत नाही. त्या दोघींमधला संवाद म्हणजेच हे नाटक.
नवऱ्याचं संसारात लक्ष नाही, हे कळत असूनही त्याची साथ न सोडणाऱ्या आवलीकडे पाहून रखमाईला तिची चूक कळते. विठोबावर रागावून दिंडीर अरण्यात निघून गेलेली रखमाई आपला राग सोडते आणि आवलीची जखम बरी होताच निघून जाते. शिव्या घालत का होईना, पण आपल्या ओठीही विठोबाचंच नाव असतं, हे आवली तिला निक्षून सांगते. रागावून, रुसून बसण्याचा हक्क फक्त देवीला. सामान्य बाईला संसाराचा गाडा ओढताना असं करता येत नाही, असं आवली म्हणते, तेव्हा लखुबाईचे डोळे उघडतात.
दोन्ही बायकांचं आपल्या नवऱ्यावर निरतिशय प्रेम. पण विठोबाला शिव्या घालते, म्हणून लखुबाईचा आवलीवर राग आणि देवाच्या नादापायी नवऱ्याचं संसारातून लक्ष उडालं, म्हणून आवलीचा विठुरायावर राग. देव आणि भक्त यांच्यातलं नातं सांगताना दिग्दर्शकानं स्त्रियांच्या स्वभावाचंही सुंदर दर्शन घडवलं आहे. देवी असूनही रखमाईला षडरिपूंपासून दूर राहता येत नाही. राग, मत्सर तिच्याही मनात आहेच. आवली मात्र वरून रागीट वाटत असली, तरी दयाळूही आहे. भाकरीचा उरलासुरला तुकडा मागणाऱ्या लखुबाईला ती पूर्ण भाकर देईन म्हणते, तेव्हाच तिच्या कोमल मनाचा प्रत्यय येतो.
मानसी जोशी यांनी आवलीचा राग राग करणाऱ्या, विठोबावर रुसलेल्या लखुबाईची भूमिका सुंदररीत्या बजावली आहे. शुभांगी सदावर्ते यांनी आवलीचा राग आणि प्रेम, दोन्ही तितक्याच तन्मयतेने रंगवलं आहे. विठोबाला हाताला धरून खेचत आणत घरातली बिकट परिस्थिती दाखवण्याच्या दृश्यात तर त्यांनी जान ओतली आहे. आनंद भाटे यांनी गायलेली गाणी, स्वतः मानसी आणि शुभांगी यांनी गायलेली गाणी, प्रदीप मुळ्ये यांचं मोजकंच पण रेखीव नेपथ्य, नेत्रसुखद प्रकाशयोजना, आनंद ओक यांचं कर्णमधुर संगीत, प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेली सुंदर गाणी, अशा सगळ्याच गोष्टींचा उत्तम मिलाफ या कलाकृतीत जुळून आला आहे. म्हणूनच हा आगळावेगळा विठूसावळा प्रयोग एकदातरी पाहायलाच हवा.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406
.............................................................................................................................................
लेखक संदेश कुडतरकर मुंबईस्थित 'अक्सेंचर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत टीम लीडर म्हणून कार्यरत आहेत.
msgsandesa@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment