रहस्यमय नाटकाच्या गोष्टीतल्या गोष्टीची गोष्ट
ग्रंथनामा - झलक
कमलाकर नाडकर्णी
  • ‘पस्तीस तेरा नव्वद’चं मुखपृष्ठ
  • Fri , 06 April 2018
  • ग्रंथनामा झलक पस्तीस तेरा नव्वद ३५१३९० 351390 Pastis Tera Navvad कमलाकर नाडकर्णी Kamlakar Nadkarni

ज्येष्ठ नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी यांनी अनुवादित केलेलं ‘पस्तीस तेरा नव्वद’ हे नाटक नुकतंच कणकवलीच्या पंडित पब्लिकेशन्सनं प्रकाशित केलं आहे. या नाटकाला नाडकर्णी यांनी लिहिलेलं हे मनोगत...

.............................................................................................................................................

चार दशकांहून अधिक काळ नाट्यसमीक्षा केल्यामुळे आज मी नाट्यसमीक्षक म्हणून चारचौघांत ओळखला जात असलो, तरी मूळचा मी नट. महाविद्यालयीन आणि राज्य नाट्यस्पर्धेत अभिनयाची पारितोषिकं मिळवलेला. त्याही अगोदरचा नाटक बघ्या. अगदी शाळेत आणि कॉलेजमध्ये असल्यापासून काकाबरोबर दामोदर हॉलमधली शनिवार-रविवारची जुनी नाटकं बघणारा. नाटकं बघतबघता चाळीतून-विद्यालयातून नाटकं करायला लागलो आणि नाटकातून काम करता करता आमचा एक समविचारी नाटकवेडा चमू तयार झाला. आमचा नाट्याग्नी शमवायला आम्ही मग १९६० मध्ये ‘बहुरूपी’ नावाचं संस्थात्मक छत्र उभारलं.

तो काळ बाळ कोल्हटकर, मधुसूदन कालेलकर यांच्या कौटुंबिक पारंपरिक नाटकांचा होता. ‘रंगायन’ दादरपासून त्यावेळी लांब वाटावं असं नेपिअन-सी रोडला भुलाभाई इथं होतं. आम्हाला नाटक तर करायचं होतं, पण त्यातही काही वेगळं, चाकोरी बाहेरचं करायचं होतं. एका बाजूला पारंपरिक नाटक व दुसऱ्या बाजूला नवं नाटक अशा तळ्यात-मळ्यात अवस्थेत आम्ही ‘बहुरूपी’वाले होतो. त्यात आमचा दिग्दर्शक हेमू अधिकारी हा कॅप्टन गुप्ते व के. नारायण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यप्रशिक्षित झाला होता. त्याच्यामुळे आम्हा सर्वांच्याच नाट्यजाणीवांमध्ये फरक पडत चालला होता. ‘आणखी एक द्रोणाचार्य’ (आद्य रंगाचार्य), ‘गॅज्युएट’ (दिलीप खांडेकर), ‘राजाचा खेळ’ (वृंदावन दंडवते), ‘कक्षा’ (तारा वनारसे), ‘हे समय उत्ताल समय’ (आशुतोष बंडोपाध्याय), ‘जुलूस’ (बादल सरकार-चित्रा पालेकर) ही आम्ही केलेली नंतरची नाटकं, आमचे वेगळे प्रयत्न अधोरेखित करतात.           

संस्था स्थापन केली, तेव्हा मात्र आमच्या आवडीनिवडीला थोडी मुरड घालावी लागली. नाटक आम्ही करणार असलो तरी तिकिटं खपवणार होतो ती आमच्या नातेवाईकांमध्ये आणि मित्रमंडळीमध्ये. तेव्हा त्यांना आवडेल असंच नाटक करणं भाग होतं. म्हणूनच ‘स्वामिनी’ हे पु. भा. भावे यांचं नाटक आम्ही सुरुवातीला केलं.

राज्य नाट्य स्पर्धेत नाटक करायचं म्हणजे नवीन वेगळ्या प्रकारच्या नाटकाशिवाय तरणोपाय नव्हता. नावीन्यपूर्ण नाटकासाठी आमचा शोध सुरू झाला. इतर हौशी प्रायोगिक नाट्यसंस्थांकडे त्यांचा त्यांचा नाटककार होता. अजूनही असतात. उदाहरणार्थ, पी.डी.ए. (वसंत कानेटकर), रंगायन (विजय तेंडुलकर), थिएटर अकादमी (सतीश आळेकर), थिएटर, मुंबई (शफाअत खान), आंतरनाट्य (राजीव नाईक), नाटक कंपनी (धर्मकीर्ती सुमंत), इत्यादी.

महाराष्ट्र नाट्यकलोपासकच्या राजा नातू यांच्या नावाचा नाट्यवर्तुळात दबदबा होता. ते आपल्या संस्थेसाठी चांगलं नाटक योग्य त्या लेखकाकडून लिहून घेऊ शकत होते. आमचा मात्र सगळाच ठणठणाट होता. संस्था विशेष परिचित नव्हती आणि संस्थेकडे स्वतंत्र नाटककार नव्हता. या अडचणीवर मात करण्यासाठी एकच मार्ग होता तो अनुवादाचा. मराठी नाटक संपन्न होण्यासाठी अनेक गाजलेल्या नाटकांचे अनुवाद किंवा रूपांतरं होत राहिली. पण शेक्सपिअरची नाटकं काय किंवा अन्य पाश्चात्य लेखकांची नाटकं काय, अनुवाद वा रूपांतरं केली गेली, ती तेवढ्याच प्रथितयश नाटककारांकडून. साहित्य-संघानं तर वि. वा. शिरवाडकरांनाच नाटककार बनवलं. ही नाटकं अभिजात नाटकं होती. अशा अभिजात नाटकांना हात घालण्याची क्षमता आमच्यात नव्हती. थोडंसं बरं मराठी लिहिण्याची सवय असलेला मीच एकटा लेखक संस्थेत होतो. पर्यायानं स्पर्धेसाठी नाटक अनुवादित करायची जबाबदारी हेमूनं माझ्यावर टाकली. माझाही लेखनकंडू शमवायला ही उत्तमच संधी होती. आता प्रश्न होता अनुवादासाठी नाटक निवडण्याचा. अर्थात अनुवादासाठी सोपं जाईल अशाच नाटकाची निवड करणं अपरिहार्य होतं आणि त्या दृष्टीनं रहस्यनाट्य हा पर्याय आम्ही निवडला.

एक तरी रहस्यप्रधान नाटक आणि एक तरी फार्स करण्याची प्रत्येक समांतर प्रायोगिक नाट्यसंस्थेची जबर इच्छा असते. आम्ही त्याला अपवाद नव्हतो. आयएनटीचे वसंत कामत लिखित ‘फोन नं. ३३३३३’ हे नाटक १९५६ साली रंगमंचावर आलं. पुण्याच्या पी.डी.ए. संस्थेनं ‘खून पहावा करून’ हे सरिता पदकी यांचं नाटक १९६४ साली रंगमंचावर आणलं. १९६५ साली ‘कथा कुणाची व्यथा कुणा’ हे नाटक राजाभाऊ नातू यांनी महाराष्ट्र कलोपासक या संस्थेतर्फे रंगमंचावर आणलं. त्याचे लेखक होते गो. गं. पारखी. आणि १९६६ साली आमच्या ‘बहुरूपी’नं ‘पस्तीस तेरा नव्वद’ हे रहस्यप्रधान नाटक राज्य स्पर्धेत सादर करून अनेक पारितोषिकं मिळवली. मी अनुवादित केलेलं हे नाटक त्यापूर्वी आलेल्या अन्य रहस्यनाटकांपेक्षा वेगळं होतं.

आमच्या या नाटकात रहस्यावर भर तर होताच, पण ते कौटुंबिकही होतं. ‘आंधळा मागतो एक डोळा…’ आणि त्याला मिळतात दोन! तसंच आमचं झालं. आमच्या हक्काच्या प्रेक्षकांना आवडेल इतपत ते कौटुंबिक होतं आणि आम्हाला काही वेगळं करण्याचं समाधान मिळेल इतकं ते रहस्यमय होतं.

१९६६ साली स्पर्धेत अंतिम फेरीत आम्ही ‘पस्तीस तेरा नव्वद’ सादर केलं आणि आज सुमारे अर्ध्या शतकानंतर त्याचं पुस्तक प्रकाशित होत आहे. आता डाव मांडलाच आहे तर माझ्या अनुवादित संहितेची सत्यघटनेवर आधारित रहस्यकथा कथन करण्यापूर्वी जरा रहस्यप्रधान कलाकृतींचा सापशिडीचा खेळ खेळून बघूया. जमेल तेवढी इतिहासाला साद घालूया.

‘करमणूक’ मासिकात अद्भुत कथा, पोलिसी चातुर्याच्या कथा अधूनमधून येत असत. १९१० च्या ‘करमणूक’च्या अंकात भुताटकीवरील गोष्टीसाठी स्पर्धा लावली होती. ‘भुताटकी माणुसकी’ ही बक्षिसाची गोष्ट १९११ सालच्या ‘करमणूक’मध्ये प्रसिद्ध झाली.

‘मनोरंजन’ मासिकातून ‘चाणाक्षपणाचा कळस’ ही हरी नारायण आपटे यांची रहस्यप्रधान कादंबरी क्रमश: प्रसिद्ध झाली. ती एका फ्रेंच डिटेक्टिव्ह कथेवरून घेतल्याचं हरिभाऊंनीच नमूद केलेलं आहे. या कादंबरीचं प्रकाशन साल कुठे नमूद केलेलं नसलं तरी बहुधा ती कादंबरी १८९५ ते १९१० या दरम्यान प्रसिद्ध झाली असावी. त्यानंतरच्या काळात मामा वरेरकर, बाबुराव अर्नाळकर व गुरूनाथ नाईक यांच्या रहस्य कादंबऱ्या गाजल्या. अगदी कालपरवा ‘शोध’ (मुरलीधर खैरनार) व ‘विश्वस्त’ (वसंत लिमये) या भल्यामोठ्या रहस्य कादंबऱ्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. नाटककार व विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेल्या नाटकात ‘माया विवाह’ व ‘गुप्त मंजूष’ ही दोन नाटकं रहस्यप्रधान होती. पण त्यातलं वातावरण काल्पनिक-ऐतिहासिक स्वरूपाचं होतं.

मुंबई विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर जो नवशिक्षित वर्ग निर्माण झाला, त्यांनी शेक्सपिअर मराठीत आणला. विनोदी फार्सलाही मराठी वळण दिलं गेलं. पण रहस्यनाट्याकडे मात्र लक्ष पुरवलं गेलेलं दिसत नाही. कदाचित तोपर्यंत पाश्चात्य रंगभूमीवरदेखील सामाजिक आधुनिक रहस्यनाटकांचा उदय झाला नसावा.

पाश्चात्य रहस्यचित्रपट खूप लोकप्रिय झाले. या प्रकारच्या चित्रपटाचा बादशाह समजला जाणाऱ्या अल्फ्रेड हिचकॉकनं तर थरार या भावनेची वेगळीच प्रचिती आपल्या दिग्दर्शन प्रतिभेनं प्रेक्षकांना आणून दिली आणि चित्रपटक्षेत्रात रहस्यचित्रपटांचा एक आदर्श निर्माण केला. सर्वसामान्य व इंग्रजी भाषेचं आकलन नसणाऱ्यांतही त्यांनी आपले चित्रपट तुफान लोकप्रिय केले.

आपल्याकडेही मराठीत दिग्दर्शक राजा परांजपे यांनी ‘पाठलाग’, ‘पडछाया’ असे व दिग्दर्शक राजदत्त यांनी ‘आज मुक्त झाले मी’ किंवा ‘माफीचा साक्षीदार’ असे रहस्यपट दिले. या माध्यमाचा भर दृश्यात्मकलेवरच अवलंबून असल्यामुळे चित्रपटात ही पठडी खुलते. रहस्यपटांचा हा जुजबी वानोळा सांप्रत पुरेसा आहे.

१९६० च्या अलीकडच्या-पलीकडच्या मराठी रंगभूमीवरील आलेल्या रहस्य नाटकांचा धांडोळा घेण्यापूर्वी रहस्य नाटकाची काही विशेष समजून घेणं योग्य ठरेल

कुणाचा तरी खून होतो आणि आजूबाजूच्या व्यक्तींवर संशय घेतला जातो. ज्या व्यक्तीवर संशयाची सुई असते तोच खुनी असल्याची खात्री पटते ना पटते, तोच दुसऱ्या व्यक्तीवर सुई रोखली जाते आणि पहिला समज गैरसमज ठरतो. असं होता होता संबंधित व्यक्ती मोकळ्या होतात आणि कधीच संशय येणार नाही, अशा निरपराध वाटणाऱ्या माणसावरच खूनाचा आळ येतो. मागचे सहज कानावरून गेलेले संदर्भ आठवले की, तो निरपराध वाटणाराच खरा खुनी ठरतो.

खून कसा करायचा याची सर्व योजना उघडपणे मांडली जाते. ही योजना प्रत्यक्षात कशी येते व तिचं यशापयश हेच पाहण्यातली उत्सुकता निर्माण करणारंही रहस्यनाट्य असतं.

खून झालेल्या माणसासारखाच एक माणूस प्रत्यक्ष हजर होतो. शेवटी खुनी ‘हा तो असूच शकत नाही, कारण त्याचा तर मी स्वत: खून केला आहे’ अशी कबुली देतो.

खून प्रेक्षकांसमोरच होतो, पण खुनी पकडलाच जात नाही; आणि जेव्हा कळून चुकतं तेव्हा तो खून नसतोच.

निरपराध माणसाला ब्लॅक-मेल करणं, वेशांतर हेही रहस्य नाटकाचे घटक आहेत.

हे जुजबी आराखडे आहेत. यात प्रसंगाची गुंतागुंत व विविधता निर्माण करून प्रेक्षकांना दोन-अडीच तास खिळवून ठेवणं हे लेखक-दिग्दर्शकाचं आणि इतर कलाकारांचं काम असतं. प्रेक्षकांना विचार करायला फार अवसर न देणं आणि सहज म्हणून कानावरून गेलेली गोष्ट किती महत्त्वाची होती याचा धक्का बसणं हे रहस्य नाटकाचं इप्सित असतं.

चटपटीत संवाद, काटेकोर रचना, शिस्तबद्ध आखणी आणि प्रेक्षकांना वेगवेगळ्या प्रकारे भुलैयात पाडणं हे यशस्वी रहस्यनाटकाचं मुख्य कार्य असतं. उत्कंठा वाढवत नेणं आणि टप्प्याटप्प्यानं प्रेक्षकांना ‘पुढे काय?’ या प्रश्नात पाडणं यशस्वी झालं म्हणजे रहस्य-नाटकाचं फलित प्राप्त झालं असं म्हणायला हरकत नाही.

नाटकाची बांधणी अगदी घट्ट असायला हवी. एकही दुवा विसविशीत वा सुटलेला झाला तर ते रहस्यच आणि म्हणून नाटकही फसफसतं. थोडक्यात रहस्यनाटकाच्या लेखकाला डोळ्यात तेल घालून सावधानतेनं सर्व काही साकार करावं लागतं. रहस्यप्रधान नाटक लिहिणं वा उभं करणं अन्य कुठल्या नाटकापेक्षा अधिक खडतर असतं. रहस्यनाटक बसवणं हा नवोदित नाट्यदिग्दर्शकाचा कसब व तंत्र याचा स्वाध्याय होय! त्यानंतर तो फार्सचा कार्निवल आणि ट्रॅजेडीची विलाप यांना सामोरा जाऊ शकतो.

रहस्यनाटकात भावनिक ताणेबाणे विशेष नसतात. उचंबळून यावं वा गदगदून यावं असं काही नसतं. विनोदही अभावानेच आढळतो. हे सगळे चालणाऱ्या नाटकाचे महत्त्वाचे घटक आहेत. त्याचाच अभाव म्हणजे रहस्य नाटक.           

रहस्य नाटकाच्या प्रयोगात चांगल्या अर्थानं दाखवेगिरी करण्याजोगं काही नसतं. फार उत्तुंग अभिनयाची मागणीही रहस्यनाटकं करत नाहीत. एखाद्या नाटकात तशी ती असली, तरी केवळ उत्कृष्ट अभिनय अनुभवण्यासाठी ज्ञात असलेल्या रहस्याचं नाटक पुन्हा बघायला येण्याजोगा आपला व्यावसायिक नाटकाचा प्रेक्षक नाही.

नाटक ही अभिजनांची प्रतिष्ठितांची कला समजली जायची, कदाचित अजूनही जाते. प्रेक्षकही अभिजनच. साहित्यविश्वात जसं रहस्य-कथांना व कादंबऱ्यांना कालपर्यंत दुय्यम-तिय्यम स्थान होतं, तीच गत रहस्य-नाटकाची. अभिजनांनी रहस्य नाटकांकडे कधीच आपुलकीनं पाहिलं नाही, असं म्हणता येईल का? परिणामी ती व्यावसायिक रंगभूमीवर आवश्यक त्या जोरकसपणे आली नाहीत. त्यांचा व्यावसायिक रंगमंचावरचा प्रवेश नेहमीच अपवादात्मक राहिला.

हे कबूल करायला पाहिजे की, रहस्य नाट्याला प्रेक्षकांच्या पुनर्भेटीचं मूल्य नाही. एकदा रहस्य उलगडल्यावर तेच नाटक परत बघायला कोण कशाला येईल? आणि जे नाटक परत बघावंसं वाटत नाही, ते नाटक व्यवसायाला किफायतशीर ठरत नाही, असा निर्मात्यांचा होरा आहे. त्यामुळेच ते तसल्या नाटकाच्या घालमेलीत पडत नाहीत.

गुजरातीमध्ये स्वतंत्र नाटककारांची संख्या अत्यल्प. त्यातून गुजराती नाटकाच्या प्रेक्षकांना खूप गंभीर वा निखळ विनोदी नाटकाचे वावडे. एकंदरित ‘रात गयी, बात गयी’, चार घटका करमणूक, ‘युज अँड थ्रो’ अशी भावना होती. परिणामी पाश्चात्य रहस्य नाटकं गुजरातीतून मोठ्या प्रमाणात आणली गेली. देखणं नेपथ्य व उत्कृष्ट निर्मिती मूल्यं आणि उत्तम अभिनेते या भांडवलावर त्यांनी रहस्यनाटक श्रीमंत केलं. बहुसंख्य गुजराती प्रेक्षक नाटकाकडे केवळ ‘टाइमपास’ म्हणूनच बघतो. त्यांची या खिळवून ठेवणाऱ्या, नेत्रदीपक नाट्यप्रयोगांनी मस्त करमणूक केली.

मराठी नाटकाचं सर्वांत मोठ्या दराचं तिकीट ज्यावेळी १०० रुपयांचं होतं, त्यावेळी गुजराती नाटकाच्या पहिल्या वर्गाचा तिकिट दर ३५० रुपये होता. रविवारी व सुटीच्याच दिवशी होणारं, हे नाट्यप्रयोग हाऊसफुल जातात. या गुजराती रंगभूमीवरची काही रहस्यनाटकं सुरेश जयराम यांनी मराठी रंगभूमीवरही आणली.

इथं एक वस्तुस्थिती नमूद करायला हवी. सर्वाधिक रहस्यनाटकं लिहिणारा मराठीतला नाटककार म्हणजे रत्नाकरी मतकरी. रूपांतरित व स्वतंत्र मिळून त्यांनी एकूण सुमारे नऊ रहस्य नाटकं लिहिली असून त्यातील दोन रहस्यनाटकं रंगमंचावर प्रवेश करण्याची अजून वाट पाहत आहेत.

दूरदर्शन मालिकांमुळे व चित्रपटांमुळे अलीकडे व्यावसायिक रंगभूमीवरच्या रहस्य नाटकांची संख्याही वाढली आहे. आजचा नाटकाचा प्रेक्षकवर्ग वाढला आहे, तसा बराच बदलला आहे, त्यात अभिजन वर्गाबरोबरच निम्नस्तरीय प्रेक्षकही असतो, त्यामुळे कुठलंही नाटक प्रेक्षक एकदा बघून गेला तरी ते बरा व्यवसाय करतं. (अर्थात नाटक आकर्षक हवं.) त्यामुळे प्रेक्षकांच्या पुनर्भेटीचा प्रश्न आता विशेष सतावणारा राहिलेला नाही.

रहस्यनाटकाचे मराठी धागेदोरे पुरेसे हातात आल्यानंतर त्या धाग्यांचा माग काढायला जे निमित्त झालं ते म्हणजेच माझं नाटक... माझ्या अनुवादित संहितेच्या वेगळ्या विणीकडे वळूया.

स्पर्धेत ‘पस्तीस तेरा नव्वद’ला घवघवीत यश मिळाल्यामुळे आम्ही ‘बहुरूपी’चे लोक दुप्पट उत्साहानं पुढच्या नाटकाच्या तयारीत सामील झालो. या रहस्यनाटकाचे दोन-तीन प्रयोग आम्ही केले होते. पुन्हा प्रयोग करण्यासाठी आर्थिक ताकद नसल्यामुळे आम्ही त्या ‘पस्तीशीला’ कायमचं बंदच करून टाकलं होतं.

मध्यंतरी पुलाखालून बरेच पाणी गेलं आणि कुणीतरी उसळी मारली. त्याला ‘पस्तीस’ची संहिता हवी होती. व्यावसायिक रंगमंचावर त्याला ते करायचं होतं. आमची संहितेची शोधाशोध सुरू झाली. मध्यंतरी काही वर्षं गेल्यामुळे व पुन्हा ते नाटक आम्ही करणं अशक्यच असल्यामुळे कुणीच, अगदी नटांनीदेखील, संहिता जपून ठेवली नव्हती. अर्थात ते काही अभिजात वा गाजलेलं नाटक नव्हतं. त्यामुळे संहितेचे लाड करण्याची गरजच नव्हती. माझ्याकडची प्रतही कुणीतरी घेऊन गेला होता. सेन्सॉर बोर्डाकडे डी.आर.एम. नंबर होता, पण संहितेची प्रत त्यांना सापडत नव्हती. ज्या मूळ नाटकाचा मी अनुवाद केला होता, ते पुस्तक ब्रिटिश लायब्ररीचं होतं. ते केव्हाच परत केलं होतं. त्या मूळ नाटकाच्या नावाची नोंदही कुठे नव्हती, कुणाला ते आठवतही नव्हतं. (मी तर आठवणीचा खंदकच!) त्यामुळे परत अनुवाद करायचा प्रश्न मोडीत निघाला. अखेरीस सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यामुळे त्या संहितेच्या शोधाचा आणि नाटकाचाही विचार आम्ही सोडून दिला.

‘पस्तीस’ची टोचणी मनात कायम ठेवत चार दशकं उलटून गेली. आणि एका सायंसमयी फोन खणखणला. ज्ञानेश पेंढारकर बोलत होता. “तुम्ही ‘तीन लाख एकावन्न हजार तीनशे नव्वद’ या नावाचं एखादं नाटक लिहिलं होतं काय?” मी त्याला म्हटलं ‘जाऊ दे रे त्या जुन्या कटु आठवणी.’ “कटु नाही, गोड बातमी आहे. तुमच्या नाटकाची ध्वनिफित अण्णांनी करून ठेवली होती. ती मला सापडली. त्याच्यावर तुमचं नाव आहे. उद्या घेऊन येतो.”

हर्षानंदानं माझी वाचाच बंद व्हायची पाळी आली. स्पर्धेत प्रयोग झाल्यानंतर आम्ही साहित्य संघात एक प्रयोग केला होता. अण्णा पेंढारकरांचा ध्वनिमुद्रण कक्ष रंगमंचाच्या वरच होता. त्यांच्या सवयीनुसार त्यांनी हेही नाटक ध्वनिमुद्रित करून ठेवलं होतं. त्याचा आम्हाला थांगपत्ताही नव्हता. अण्णांनी माझ्या नाटकाला जणू संजीवनीच दिली आणि अर्ध्या शतकानंतर ध्वनिफितीतून त्यात प्राण फुंकला. रंगभूमीविषयक गोष्टींचा संग्रह आणि संगोपन करणाऱ्या अण्णांच्या दस्तावेजी प्रेमाला लाखलाख प्रणाम.

नाटकाची ध्वनिफित कागदावर उतरवत काढण्याच्या कामगिरीतही बऱ्याच अडचणी आल्या. या नाटकाची आणि प्रयोगाची ज्याला इत्यंभूत माहिती होती व ज्याची स्मरणशक्तीही नेहमीच लखलखीत असणायची तो म्हणजे नाटकाचा दिग्दर्शक माझा जिवाभावाचा मित्र हेमू अधिकारी. पण तो याच वेळी गंभीर आजारानं त्रस्त होता. झोपूनच होता. तशा परिस्थितीत त्याला त्रास देणं शक्यच नव्हतं. अखेरीस मी बरीच खटपट व साफसफाई करून नाटकाची रंगावृत्ती सिद्ध केली.

अर्ध्या शतकानंतर माझा हा अनुवाद प्रसिद्ध होत आहे. तिजोरी हे मुख्य पात्र असलेल्या रहस्य नाट्याच्या अनुवादाला त्याच तिजोरीत बंद करायचं की, बाहेर मोकळं ठेवायचं, हे आता रसिकांनीच ठरवायचं. रहस्याची सुई आता त्यांच्यावर रोखतो आणि थांबतो.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......