ज्येष्ठ समाजवादी नेते व महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचं पुण्यात २ एप्रिल २०१८ रोजी निधन झालं. मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या निमित्तानं भाईंशी नेहमी संपर्क यायचा. त्यांचं नेहमीच मार्गदर्शन लाभलं. त्यांचा प्रखर बुद्धिवाद आणि विचारांमधील स्पष्टता यांचा दरवेळी प्रत्यय आला. कधी-कधी आमच्या नजरेतून सुटलेले बारकावे भाई अचूक हेरत. मुस्लीम प्रश्नावर एखादं नवीन पुस्तक आलं की, भाई आवर्जून सांगत. भाई मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे स्थापनेपासूनचे साक्षीदार.
मुस्लीम समाज प्रबोधन, धर्मचिकित्सा यावर बोलणं टाळणं हे खरं तर येथील पुरोगामी चळवळी आणि त्यांच्या नेत्यांचं व्यवच्छेदक लक्षण. भाई मात्र यास अपवाद होते. राजकरणात असूनही हमीद दलवाई यांची साथ भाईंनी कधी सोडली नाही. त्यांच्या चळवळीला भाईंनी शेवटपर्यंत पाठिंबा दिला.
भाईंचं वेगळेपण म्हणजे त्यांची बुद्धिवादी भूमिका. तीन तलाकच्या प्रश्नावर दिल्लीला जाऊन पंतप्रधान यांची भेट घेऊयात असं जेव्हा ठरलं, तेव्हा मोजक्याच व्यक्तींनी आम्हाला पाठिंबा दिला. त्यात भाई अग्रभागी होते. अनेक पुरोगामी संघटना, मुस्लीम महिला संघटना मंडळाच्या या निर्णयामुळे नाराज झाल्या. भाई म्हणाले, “तुम्ही त्यांना प्रधानमंत्री म्हणून भेटणार आहात. भाजपचे नेते म्हणून नव्हे. कायदेमंडळाचे ते प्रमुख आहेत, त्यांच्याशी चर्चा न करून कसे चालेल? तुम्ही जरूर जा आणि तुमचे मुद्दे त्यांना पटवून द्या.”
२२ मार्चला मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या ४८ व्या वर्धापनदिन होता. त्या निमित्तानं भाईंची मुलाखत घेण्याच्या उद्देशानं मी आणि साजिद भाईंच्या घरी गेलो होतो. भाई थकलेले वाटत होते. पण तरीही भाईंनी तासभर उत्साहात चर्चा केली, प्रश्नांची उत्तरं दिली.
भाईंशी झालेली ती भेट, त्यांनी दिलेली मुलाखत ही शेवटची असेल याची पुसटशी कल्पनाही आम्हाला त्यावेळी नव्हती. पुरोगामित्व आणि पुरोगामी यांच्यावर सर्रास उपहासानं बोललं-लिहिलं जात असतानाच्या काळात भाई हे पुरोगामित्वाचे मानदंड ठरतात.
‘जातस्य हि ध्रुवो मृत्यू’ असं एक संस्कुत वाक्य आहे. जन्मलेल्याचा मृत्य अटळ आहे, असा त्याचा अर्थ. भाईंसारखा तत्त्वनिष्ठ पुरोगामी जन्मत असला तरी कधी मरत नाही.
.............................................................................................................................................
प्रश्न - एप्रिल १९६६ साली दलवाई यांनी सात महिलांना घेऊन तलाक, बहुपत्नीत्व या तरतुदींच्या विरोधात मोर्चा काढला. दलवाई यांच्या सामाजिक सुधारणा चळवळीची ती सुरुवात होती, असं म्हणता येईल. या वेळी दलवाई आणि तुमचा परिचय होता?
- आता मला निश्चित साल आठवत नाही. त्या मोर्च्याच्या आधीपासूनचा त्यांचा व माझा परिचय होता. एकतर ते समाजवादी चळवळीचे कार्यकर्ते होते. चिपळूणला राष्ट्रसेवा दलातही होते. त्यामुळे त्यांचा व माझा परिचय होताच. ते ‘मराठा’ वृत्तपत्रात होते आणि दुसरं म्हणजे ‘इंधन’ या कादंबरीमुळे त्यांचं नाव चांगलंच चर्चेत होतं. ‘इंधन’मुळे त्यांच्या गावी वाद झाल्याचं मला आठवतं.
प्रश्न - हमीद दलवाई या व्यक्तीचं वेगळेपण तुम्हाला कधी व कसं जाणवलं?
- दलवाई पुण्याला आले की, निळूभाऊ लिमये यांच्या ‘पूनम’ हॉटेलमध्ये थांबायचे. आणि दर वेळी न चुकता मी त्यांची भेट घ्यायचो, चर्चा करायचो. त्यांचं एक भाषण इथं पुण्यात टिळक स्मारक मंदिरात धूमधडाक्यात झालं होतं आणि त्यात त्यांनी व सर्वच धर्मातील जातीयावाद्यांवर तोफा डागल्या होत्या. मला आठवतंय, “गांधींना मुस्लीमधार्जिणे म्हणून तुम्ही दोष देता, पण लखनऊचा करार जिनांसोबत टिळकांनी केला”, असं बिनतोड मत त्यांनी त्या सभेत मांडलं होतं आणि सभेला गर्दी करून आलेले हिंदुत्ववादी आवाक झाले होते. यातून मला सांगायचं इतकंच आहे की, हिंदुत्ववाद्यांचे कानही त्यांनी टोचले, तेही अशा जाहीर सभेत जिथं त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. अशा हमीदशी माझी घनिष्ठ मैत्री झाली, आमच्यात स्नेह उत्पन्न झाला याचा मला खरं तर खूप अभिमान आहे.
प्रश्न - दलवाई यांच्या नेतृवाखाली निघालेल्या त्या ऐतिहासिक मोर्चाबाबत फारच त्रोटक माहिती उपलब्ध आहे. त्या मोर्चात सहभागी झालेल्या महिलांपैकी अनेकांची नावंही आज उपलब्ध नाहीत. तुम्हाला तो मोर्चा ऐतिहासिक का वाटतो? तुमच्या काही विशेष आठवणी?
- त्यांनी सात मुस्लीम भगिनींना घेऊन जो मोर्चा मंत्रालयावर काढला, त्याबद्दल आम्हा सर्वांना आस्था होती. त्यांचं आम्ही अभिनंदनही केलं होत. मुस्लीम समाजातील महिलांनी रस्त्यावर येऊन आपल्या संवैधानिक हक्काच्या आड येणाऱ्या धार्मिक रूढी-परंपराविरोधात निदर्शनं करायची, ही काही सामान्य गोष्ट नव्हती. किंबहुना आता हे सर्वमान्य आहे की, अशा प्रकारच्या मागणी करणारा मुस्लीम महिलांचा तो जगातला पाहिला मोर्चा होता. त्यामुळे तो मोर्चा त्या काळी खूप गाजला. एका बाजूला दलवाई व त्या सात महिला आणि दुसऱ्या बाजूला त्यांना विरोध करणारे हजारो सनातनी वृत्तीचे लोक. पण त्या महिलाही काही डगमगल्या नाहीत.
प्रश्न - धर्माची मूलभूत चिकित्सा करणारे, सोबतच मुस्लीम महिलांच्या संवैधानिक हक्कासाठी लढणारं एखादं मंडळ किंवा संस्था असावी, असा विचार कधी व का आला असावा त्यांच्या डोक्यात?
- या मोर्चानंतरच दलवाई यांनी माझ्यासोबत आणि इतर अनेक सहकाऱ्यासोबत चर्चा केल्या. मला ते म्हणाले की, भाई, मुस्लीम तरुण-तरुणींची एक संघटना काढण्याचं माझ्या डोक्यात आहे. मी त्यावेळी नगरसेवक होतो. मी ज्या भागातून निवडून आलो होतो, तिथं बहुसंख्य मुस्लीम लोक होते. माझे त्यांच्या सोबत अतिशय चांगले संबंध होते. त्यामुळे येथील मुस्लीम तरुणांना संघटनेशी जोडता येऊ शकेल अशी मला आशा होती. ती मी त्यांना बोलून दाखवली होती. सोबतच मी राष्ट्र सेवादलाच्या पुणे विभागाचाही प्रमुख होतो. त्यामुळे समाजवादी विचारांचे अनेक मुस्लीम तरुण-तरुणी या संघटनेसोबत जोडले जाऊ शकतील, असं मला वाटलं. त्यावेळी सय्यदभाई एका महोत्सव समितीवर होते. मग मी एक मिटिंग बोलावली, ज्यात या तरुणांना दलवाई यांची व त्यांच्या प्रस्तावित संघटनेची ओळख करू दिली. दलवाई त्या मिटिंगला स्वतः हजर होते. सोबत आमचे मित्र व पुढे मंडळाचे कार्यकर्ते झालेले बशीर शेख, अमीर शेख, मकबूल तांबोळी, मुनीर सय्यद इत्यादी मंडळीही उपस्थित होती. मी बोलावल्यावर ते आवर्जून आले. दलवाईंनी सर्वांशी चर्चा केली. बहुतेक सर्व समाजवादी विचारांची मंडळी असल्यामुळे दलवाई यांची भूमिका व विचार त्यांना पटले होते. दलवाई सोबत काम करण्याची त्यांची तयारी होती. अशा प्रकारे मंडळाची पायाभरणी झाली. बाबा आढावही त्यात आले आणि त्यांनी महात्मा फुले यांचं ‘सत्यशोधक’ हे नाव घ्यावं असं दलवाई यांना सुचवलं. सर्वांनी ते लगेच मान्यही केलं.
प्रश्न - या दरम्यान अ. भि. शहांसारखी अनेक मंडळी दलवाई यांच्या चळवळीशी जोडली गेली होती. याबद्दल...
- अ. भि. शहा हा अत्यंत प्रखर बुद्धिवादी आणि सेक्युलर असा माणूस. अ. भि. शहा, दाभोलकर (नरेंद्र), प्रधान मास्तर (ग. प्र. प्रधान), असा तो ग्रुपच होता. या सगळ्यांना हमीद आणि त्यांच्या कार्याबद्दल आस्था होतीच. मात्र शहांनी हमीदला संघटन बांधणीसाठी खूप साथ दिली. त्यावेळी वसंत नगरकर हे पोलीस दलात आय. जी. पदाचे अधिकारी होते. ते लेखक-विचारवंत होते आणि ‘चले जाव’ चळवळीच्या वेळी त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. हमीदला त्यांनीही खूप मदत केली. ‘साधना’चे संपादक यदुनाथ थत्ते यांनीही हमीदला मोलाची साथ दिली. त्यामुळे ‘साधना’ हे हमीदच्या चळवळीला पूरक काम करणारं आणि त्यांना ही चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी जी मदत करणं शक्य आहे, ती सर्व मदत करणारं साप्ताहिक ठरलं. अशी मदत दलवाईंना मिळत गेली. परंतु ही आम्ही जी काही मंडळी होतो, आम्ही काही मुस्लीम नव्हतो, त्यामुळे आम्ही मदत जरी करत असलो तरी खरं काम दलवाई आणि त्यांच्या मंडळातील सहकाऱ्यांनाच करावं लागणार होतं याची हमीदला कल्पना होती. माझ्याच घरी मंडळाची स्थापना झाली. माझे मित्र, सहकारी या संघटनेच्या सुरुवातीला कार्यकर्ते म्हणून मिळाले याचा मला अभिमान आणि आनंदच आहे. मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना ही जागतिक महत्त्व असलेली एक ऐतिहासिक घटना होती. कारण अशा प्रकारे मुस्लीम समाजाची, इस्लाम धर्माची मूलभूत चिकित्सा करणं ही काही सामान्य गोष्ट नव्हती. सनातनी लोकांना हे पचनी पडेल हे शक्यच नव्हतं.
प्रश्न - हो, आणि मुस्लीम सनातन्यांकडून दलवाई यांच्यावर हल्ला करण्याचे प्रयत्नही अनेक वेळा करण्यात आले होते.
- दलवाई यांनी फक्त मोर्चे काढले, काठावर बसून मुस्लीम समाजाच्या चुका काढल्या असं कधीच झालं नाही. ते मुस्लीम मोहल्ल्यातही आवर्जून जात. विरोधकांशी चर्चा करायचं सूत्र त्यांनी आयुष्यभर जपलं. एकदा पुण्यातील मोमिनपुरा या मुस्लीमबहुल भागातील मुस्लिमांच्या घरी जाऊन त्यांना आपल्या कार्याची संघटनेची माहिती देण्याची त्यांची योजना होती. त्यांनी तिथं जाऊन महिला–पुरुषांशी संवाद सुरू केला. काही वेळातच शे-दीडशेचा जमाव लाठ्या घेऊन काळे झेंडे दाखवत त्यांच्या अंगावर धावून आला. पोलिसांनी व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दलवाई यांना तिथून सुरक्षित बाहेर काढलं. इतकं सर्व होऊनही पोलिसात तक्रार करण्यास मात्र दलवाई यांनी नकार दिला.
प्रश्न - हमीद दलवाई यांना त्यांचे विरोधकही ‘दिलदार शत्रू’ म्हणत असत, वैचारिक विरोध व्यक्तिगत मैत्रीच्या आड ते येऊ देत नसावेत…
- हो, हमीद दलवाई यांचं वैशिष्ट असं होतं की, ते आपल्या विरोधकांचीही भेट घेत असत. त्यांच्याशीही चर्चा करत. माझे आणि बाबा आढाव यांचे मित्र व चारभाई बिडी वर्क्सचे मारुफ खान हे नाना पेठेत राहायचे. तिथंच त्यांचा मोठा कारखानाही होता. ते सनातनी विचारांचे होते. हमीदला त्यांनी कधीच पाठिंबा दिला नाही. दलवाई मात्र न चुकता त्यांच्याकडे जायचे. त्यांच्याशी चर्चा करायचे. म्हणजे सनातनी माणसाच्या तर्क-वितर्क काय आहेत. त्याची आपल्याला उत्तरं देता आली पाहिजेत, हे त्यांच्या डोक्यात असायचं. मारुफ खानला पुढे-पुढे हमीद दलवाईंबद्दल खूप प्रेम वाटायला लागलं. रेहमान वकील, डॉ. शेख अशा कट्टर विरोधकांशीही दलवाई यांचा स्नेह होता. दलवाई यांची कुराण, हदीस, धर्म यांची चिकित्सा त्यांना पचणारी नव्हती, पण दलवाई यांच्या दिलदार व्यक्तिमत्त्वामुळे आणि त्यांच्या नि:स्वार्थ कामामुळे ते दलवाई यांच्याकडे आकर्षिले जात. दलवाईंचं वागणं, थट्टा-मस्करी करणं आणि सहजपणे मित्रत्व निर्माण करणं, विरोधकांबद्दलही चांगली भावना ठेवणं, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं.
प्रश्न - पुढे दलवाई यांनी देशभर दौरे केले. अनेक मुस्लीम विचारवंतांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी चर्चा केली. मुस्लीम सत्यशोधक मंडळानं अनेक परिषदाही घेतल्या. मुस्लीम मानस जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता का?
- हो, दलवाई यांनी हे दौरे जाणीवपूर्वक आखले होते. देशातील मुस्लीम समाज हा एकजिनसी नाही. हे समजून घ्यायचे असेल तर देशभर फिरले पाहिजे. सर्वसामान्य मुस्लीम आणि सोबतच मुस्लीम विचारवंत यांच्या भेटीगाठी घ्यायला हव्यात असं त्यांना वाटे. भारतातल्या विविध प्रांतातले अत्यंत बुद्धिवान, विचारवंत अशी जी मंडळी होती, त्या सर्वांशी हमीद यांनी चर्चा केली. या दौऱ्यामध्ये अनेक वेळा दलवाई यांच्यावर हल्ले झाले, घोषणाबाजी झाल्या, पण हमीद डगमगला नाही. त्यांनी दिल्ली, अलिगढ, देवबंद, काश्मीर आणि इतर दौरे केले. इतिहासकार मुहम्मद हबीब, मुशिरूल हसन, अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील कुलगुरू आणि प्राध्यापक, देवबंदच्या दारूल उलुमचे नेते या सर्वांच्या भेटी घेतल्या, चर्चा केली. उर्दू वृत्तपत्रांच्या संपादकाना ते भेटले. जमात-ए-इस्लामीसारख्या सनातनी मुस्लीम संघटनेच्या नेत्यांना ते भेटले. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख व ज्येष्ठ मुस्लीम विचारवंत मोईन शाकीर यांच्याशीही त्यांनी अनेकदा चर्चा केल्या. जागतिक कीर्तीचे इस्लामचे अभ्यासक व भारताचे इजिप्तमधील माजी राजदूत, ए. ए. ए. फैझी हे तर हमीद दलवाई यांच्यासोबत काम करायला तयार झाले होते. मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या अनेक कार्यक्रमात फैझी उपस्थित असत. मला आठवतंय, मंडळाची एक मिटिंग नाना पेठेतील अहिल्या आश्रममध्ये झाली. तिला फैझी उपस्थित होते. तिथं ते जे बोललं ते मला आजही आठवतं. फैझी म्हणाले होते की, ‘हमीद दलवाई यांचे विचार मला पूर्णपणे मान्य आहेत. पण त्यांच्याइतकं धैर्य माझ्याजवळ नाही.’
प्रश्न - आपण दलवाई यांच्या धैर्याचा उल्लेख केलात. १९७० साली मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली. तलाक व मुस्लीम महिलांचे इतर प्रश्न मंडळानं देशभर पोहोचवलं.“जिहाद-ए-तलाक’, ‘मेरी कहाणी- मेरी जुबानी’सारख्या परिषदा घेऊन समाजाला आणि सरकारला जागं करण्याचं काम केलं. मंडळाच्या या कामाला विरोध करण्यासाठी सनातनी मुस्लिमांनी मुस्लीम प्रोटेक्शन लॉ कमिटी स्थापन केली. जिचं पुढे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डात रूपांतर झालं. त्या कमिटीची पहिली सभा डिसेंबर १९७३ ला मुंबईमध्ये झाली होती, ज्याला देशभरातून हजारो मुस्लीम उलेमा उपस्थित होते. आणि परिषदेबाहेर दलवाई आणि मंडळाचे पुरुष आणि महिला कार्यकर्ते विरोध करण्यासाठी उभे होते. तुम्हाला ही घटना आठवते का?
- हमीदवर आणि त्याच्या कार्यकर्त्यांवर अनेक वेळा हल्ले झाले. मंडळाच्या परिषदेला जाऊ नये म्हणून महिला कार्यकर्त्यांवर अनेक प्रकारे दबाव आणला जायचा. तरी शेकडो महिला हा दबाव झुगारून देऊन आपली कहाणी सांगण्यासाठी मंडळाच्या व्यासपीठावर आल्या आणि आपली करुण कहाणी त्यांनी जगापुढे मांडली. या परिषदेची देशभरची माध्यमं दखल घेऊ लागली. आणि मग तलाक आणि मुस्लीम महिलांच्या इतर प्रश्नावर चर्चा होऊ लागली. सनातनी मंडळींना वाटू लागलं की, आता आपल्या मुस्लीम कायद्यात हस्तक्षेप होईल, म्हणून त्यांनी कमिटी स्थापन केली. तिची सभा मुंबईला झाली होती. हजारो मुस्लीम उलेमा तिथे उपस्थित होते. दलवाई आणि त्यांचे मंडळातील सहकारी यांनी जोरदार घोषणाबाजी केली. हजारोंचा जमाव असूनही मंडळाचे कार्यकर्ते, ज्यामध्ये महिलाही होत्या, डगमगले नाहीत. जमावानं मंडळाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. दलवाईसकट सर्वांना मारहाण केली. पोलिसांनी हस्तक्षेप करून या सर्वांचा जीव वाचवला. हमीद या ठिकाणी ज्या निर्भयतेनं वागला, तीच निर्भयता त्यानं आयुष्यभर जपली.
प्रश्न - दलवाई यांच्यावर त्यांच्या विरोधकांनी वैयक्तिक हल्ले केले. दलवाई आणि मंडळ याबद्दल पराकोटीचा द्वेष या सनातनी मंडळीमध्ये का होता?
- दलवाई आपल्या भाषणातून आणि लिखाणातून अतिशय तर्कसंगत मांडणी व मूलभूत चिकित्सा करत. प्रखर बुद्धिवादी भूमिका तो मांडत असे. त्यामुळे त्याला जवाब देणं किंवा विचारांना विचारानं उत्तर देणं भल्याभल्यांना जमत नसे. त्यामुळे हमीद काफिर आहे, तो हिंदुत्ववाद्यांचा हस्तक आहे, असे आरोप विरोधक करत असत. ही वैचारिक पराभवाचीच लक्षणं होती.
प्रश्न - मंडळावर ते हिंदुत्ववाद्यांना सुखावणारी भूमिका घेतात, त्यांचे हस्तक आहेत, मुस्लीमद्वेष्टे आहेत, असे आरोप केले जातात. दलवाई असतानाही असे आरोप मंडळावर केलेच गेले असतील. त्यावेळी मंडळाची भूमिका काय असावी असा त्यांचा कटाक्ष असायचा?
- ‘राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान’ हे जे त्यांचे पुस्तक आहे, जे त्यांच्या मृत्युनंतर अनेक वर्षांनी प्रकाशित झालं, त्यातील शेवटचं प्रकरण मुळी हिंदू जातीयवादावरच आहे. दलवाईंना हिंदुत्ववाद्यांचे हस्तक म्हणणाऱ्यांनी ते प्रकरण आधी वाचावं असा सल्ला मी त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दिला आहे. औरंगाबादमधील दलवाई यांच्या सभेवर संघाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. कारण दलवाई हे सर्व धर्मांतील जमातवाद, धर्मांधता, धर्माधिष्ठित राष्ट्र या संकल्पनांवर हल्ले चढवत असत. हिंदू व मुस्लीम जमातवाद परस्परपूरक आहेत, पण मी मुस्लीम समाजाचा भाग असल्यामुळे मी मुस्लीम जमातवादावर जास्त लक्ष देतो अशी दलवाई यांची स्पष्ट भूमिका होती. त्यामुळे त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप, हे अज्ञानातून केले गेले होते.
प्रश्न - मंडळाच्या स्थापनेनंतर दलवाई यांना संघटना बांधणी व विस्तारासाठी फार वेळ मिळाला नाही. तुम्ही दलवाई यांनी त्या पाच-सहा वर्षांत केलेल्या प्रचंड कामाचे साक्षीदार आहात. तुम्हाला काय वाटतं याबद्दल.
- हमीदनं दौरे करून, परिषदा घेऊन, देशभर ज्या पद्धतीनं मंडळासाठी समर्थन मिळवलं ते मोठं वैशिष्ट्यपूर्ण होतं. दुर्दैवानं मंडळ स्थापनेनंतर काही काळातच त्यांना मूत्राशयाच्या आजारानं ग्रासलं. त्या आजारातून ते पुन्हा बाहेरच येऊ शकले नाहीत. इतक्या थोड्या कालावधीमध्ये त्यांनी मराठी साहित्यावर आपला अमीट ठसा उमटवला. जगातील मुस्लीम समाजसुधारकांमध्ये त्याची गणना झाली. इतिहासकार रामचंद्र गुहा यांना दलवाई नवभारताचे निर्माते वाटले. कमी कालावधीत झपाटून जाऊन त्यांनी केलेल्या कामाची ती पावतीच म्हणावी लागेल. त्यांना जर अजून काही अवधी मिळाला असता तर त्यानं जगभरातील सुधारणावादी मुस्लीम स्त्री-पुरुषांची संघटना उभी केली असती. आंतराष्ट्रीय परिषदा घेऊन मुस्लीम प्रश्न जगभर मांडला असता. जगभरातील मुस्लीम सुधारणावादी चळवळींना आवाज देण्याचं सामर्थ्य त्यांच्याजवळ होतं. प्रखर बुद्धिवाद आणि अध्ययन याची शिदोरी त्यांच्याजवळ होती. आज पन्नास वर्षानंतर त्यांनी उपस्थित केलेल्या तलाकसारख्या प्रश्नावर संसदेत चर्चा होते आहे, हे उशिरा का होईना पण त्याच्या परिश्रमाला आलेलं फळ आहे.
प्रश्न - जागतिक कीर्तीचे विचारवंत, लेखक, समाजवादी कार्यकर्ता असूनही, समाजवादी पक्ष किंवा त्यांचे नेते यांनी दलवाई यांना म्हणावी तशी साथ दिली नाही, पाठबळ दिलं नाही याची आपल्याला खंत वाटतं का?
- हमीद समाजवादी परिवाराचाच साथी-कार्यकर्ता होता. एस. एम. जोशींनाही हमीदबद्दल प्रेम होतं. एवढं खरं आहे की, एस. एम.जोशी, नानासाहेब गोरे हे त्याला सोशालिस्ट पार्टीचं तिकीट देऊ शकले नाहीत. पक्षाच्या विरोधात मग सबंध मुस्लीम समाज जाईल असा धोका त्यांना वाटत होता. पण हमीदनं त्याबद्दलही कधी तक्रार केली नाही. या सर्व मंडळींचा आपल्याला आणि आपल्या कार्याला वैचारिक पाठिंबा आहे, पण पार्टी म्हणून त्यांच्या काही मर्यादा आहेत ही गोष्ट हमीदनं लक्षात घेतली होती असं मला वाटतं.
प्रश्न - दलवाई यांच्या अकाली निधनानंतर मंडळाच्या कार्याला खीळ बसेल अशी भीती आपल्याला वाटली होती का?
- नाही. कारण हमीद गेल्यानंतर मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी कार्य सुरू ठेवलं, ती संघटना जिवंत ठेवली, ती वाढवली. बाबूमिया बँडवाले यांच्यासारखा राष्ट्रीय स्वातंत्र्यसेनानी मंडळाला दलवाई यांच्यानंतर अध्यक्ष म्हणून मिळाला, या सगळ्या गोष्टी मोठ्या अदभुत होत्या. १९७० च्या स्थापनेपासून आजतागायत मंडळाचं अवघड कार्य सुरू ठेवण्यामध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांचं मोठं योगदान आहे. त्याचं श्रेय मंडळाचे कार्यकर्ते, कार्यकारणी सदस्य, अध्यक्ष यांनाच देणं गरजेचं आहे.
प्रश्न – ‘पुरोगामी’ विचारवंत मुस्लिम समाजातील कु-प्रथा, कालबाह्य रूढी-परंपरा, मुस्लिम धर्मांधतेवर ठाम भूमिका घेताना, टीका करताना दिसत नाहीत…
- असं ‘पुरोगामी’ म्हणून सगळ्यांना एकाच मापानं मोजून त्यांच्यावर टीका करणं किंवा त्यांच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य नाही. ‘पुरोगामी’ या शब्दाचा अर्थ इतका हेटाळणीच्या स्वरूपात वापरणं योग्य नाही. जात आणि धर्म न पाहता त्यातील जुनाट रूढी-परंपरा, धर्मांधता यांवर निरपेक्षपणे टीका करणं हेच पुरोगामीत्वाचं लक्षण आहे. मी नाही का पुरोगामी? मी नाही का हमीदला आणि त्याच्या चळवळीला आयुष्यभर पाठिंबा दिला? या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे लोकही आहेत. मात्र त्यांचं प्रमाण अतिशय कमी आहे. हे प्रमाण वाढावं यासाठी आपल्या सर्वांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत हे नक्की.
प्रश्न - गेल्या काही काळापासून मुस्लीम समाजाविषयी द्वेष वाढताना दिसतो आहे. काही व्यक्ती, संस्था हे काम जाणीवपूर्वक पण संघटनात्मक रीतीनं करत असल्याचं दिसतं आहे. अनेक भारतीय व्यक्तींना फक्त ते मुस्लीम असल्यामुळे जमावानं मारून टाकल्याची अनेक उदाहरणं देशभर पाहायला मिळत आहेत. अशा वेळी मंडळाची भूमिका काय असावी?
- धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्म सोडून देणं अशी कम्युनिस्टांसारखी भूमिका हमीदनं कधी घेतली नव्हती. तो म्हणायचा तुम्हाला धर्म पाळायचा अधिकार आहे, पण राष्ट्र हे सेक्युलर असलं पाहिजे. त्यामुळे हमीदला अभिप्रेत असलेली धर्मनिरपेक्षता मुस्लीम समाजात रुजावी म्हणून मंडळानं काम केलं पाहिजे. राहिली गोष्ट हिंदुत्ववाद्यांची, तर संघाच्या स्थापनेपासून त्यांचा अजेंडा ठरलेला आहे. मुस्लीम द्वेष हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे असे हल्ले होणं, द्वेष पसरवला जाणं या मागे कुठल्या शक्ती आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यांना संविधानातील समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या गोष्टीच मान्य नाहीत. त्यामुळे सर्वांनी या जातीवादी शक्तीविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. संविधान आणि संवैधानिक मूल्यं यांच्या रक्षणासाठी पुढे आलं पाहिजे. मुस्लीम समाजात त्यांच्या संवैधानिक हक्काविषयी जागृती करायला हवी. मुस्लिमांच्या प्रबोधनासोबतच त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. सोबतच मुस्लीम समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगती होण्यासाठी विधायक कार्यक्रम आखले गेले पाहिजेत.
.............................................................................................................................................
‘सेपिअन्स - मानवजातीचा अनोखा इतिहास’ या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406
.............................................................................................................................................
समीर शेख
sameershaikh7989@gmail.com
साजिद इनामदार
sajidinamdar@outlook.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment