अजूनकाही
१. मी जेव्हा वर जाईन तेव्हा बाळासाहेब ठाकरेंना ठामपणे सांगू शकेन की, मी चांगले काम केले आहे. पण तुम्ही बाळासाहेबांना काय उत्तर द्याल असा प्रश्न उपस्थित करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेनेला चिमटा काढला आणि शिवसेनेने नोटाबंदीविरोधात संसदेच्या आवारात निघणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चात सहभागी न होण्याचा निर्णय केला.
ओहोहो, असंय होय! तरीच आमच्या नाना फडणविसांनी चीनकडे एका मोठ्या चिमट्याची ऑर्डर दिली आहे… वांद्र्याच्या परिसरातच बसवला जाणार आहे म्हणे तो! वाघोबादादा रुसले की कमळाबाई चिमटा घेणार, मग वाघोबादादा लाजतील वगैरे; यांच्या या सार्वजनिक प्रणयाराधनापायी यापुढे न्यूज चॅनेलवरही 'खुलता कळी खुलेना' नावाची मालिका चालवावी लागेल लवकरच!!
………………………..
२. नोटाबंदीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता थेट जनतेची मते मागवली आहेत. एका खास अॅपद्वारे नोटाबंदीच्या निर्णयावरच्या सूचना थेट माझ्यापर्यंत पोहोचवा, असे आवाहन मोदींनी जनतेला ट्विटरवरून केले आहे.
लोकशाहीच्या डोक्यावरून कल्याणकारी हुकूमशाही हाकण्याच्या या प्रकारातलं पुढचं स्क्रिप्टही सगळ्यांना तोंडपाठ आहे. ९२ टक्के जनतेचा मोदींना पाठिंबा, अवघ्या एक टक्क्याचाच विरोध असं ‘इंडिया टुडे’ छापाचं झी-गणित जाहीर होईल, पंतप्रधान पुन्हा भावुक होऊन पाठिंब्याबद्दल आभार मानतील आणि भक्त डोळेझाकू जयघोष करतील. पंतप्रधानांनी लोकशाहीच्या चौकटीत आणि जिची धूळ कपाळी लावली त्या संसदेच्या प्रांगणात आपलं उत्तरदायित्व निभावायला हवं. आज कोणत्या रंगाचा सूट घालू आणि नाश्त्यात इडली खाऊ की ढोकळा, अशा प्रश्नांवर जनतेचं मत मागवणं समजू शकतं; निश्चलनीकरणासारखे निर्णय, त्यांची अंमलबजावणी आणि परिणाम हे तज्ज्ञांच्या कक्षेतले विषय आहेत; सगळ्यावर काही ना काही मत असलेल्या सामान्य जनतेच्या आवाक्यातले नव्हेत.
………………………..
३. मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय आर्थिक आणीबाणी वाटत असल्याचे शरद पवारांचे विधान दुतोंडीपणाचे आहे. बारामतीत चमचेगिरी करायची आणि मुंबईत बोटे मोडायची हे धंदे लोकहिताचे नाहीत : शिवसेनेची टीका
शंभर टक्के बरोबर आहे. लोकहिताचा विचार करून पवारांनी यांच्याप्रमाणे मुंबईत बोटे मोडून दिल्लीत चमचेगिरी करायला हवी होती, हो ना?
………………………..
४. राहुलचं प्रमोशन माझ्या हातात नाही : सोनिया गांधी
काय सांगताय? अरे देवा, आता काय करेल ते गरीब अश्राप पोर. तुमच्याकडे डोळे लावून बसलंय बिचारं. अस्कायकर्ता? बघा की, जरा पक्षात वशिला लावा की! तुम्हाला काय अवघडाय? प्रयत्न तरी करा की. बाकी काही असो-नसो, आडनाव गांधी आहे, एवढं क्वालिफिकेशन काय कमी आहे काय आपल्या लोकशाही मार्गाने चालणाऱ्या पक्षात?
………………………..
५. नोटाबंदीची अंमलबजावणी चुकली : ‘अर्थक्रांती’चे प्रवर्तक अनिल बोकील यांची टीका
बोकीलबुवा, निश्चलनीकरणावर टीका करून आपल्याच पायावर कुऱ्हाड का मारून घेताय आणि तुमचा 'आगामी अण्णा हजारे' म्हणून वाढीला लागलेला टीआरपी कशाला उगाच गमावताय? देव आणि भक्त यांच्यामध्ये जिथे संसदेला आम्ही गुंडाळून ठेवतो, तिथे एका य:कश्चित पुजाऱ्याची लुडबूड कोण चालवून घेणार? मोदी रोज चहा पितात तोही देशासाठीच पीत असतात, एरवी त्यांना चहाचा मोह असेल का? अशा माणसाने केलेला निर्णय सगळ्या देशाने (म्हणजे कोण, ते विचारायचं नाही) मान्य केलाय ना निमूट, मग तुम्ही कशाला उगाच ‘प्रेस्टिट्यूड’पणा करताय. उलट सगळं बरोबर चाललंय म्हणालात तर काही दिवसांत एखादा चॅनेल सुरू कराल प्रवचनांचा आणि एखादा कसलातरी स्वदेशी ब्रँडही लाँच कराल.
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment