हल्लीच्या मराठीमधील वर्तमानपत्रांच्या संपादकांविषयी, त्यांच्या भूमिकांविषयी अनेकांचे मतभेद दिसून येतात. सार्वजनिक व्यवसायातल्या कुठल्याही व्यवसायातल्या व्यक्तीविषयी ते काही प्रमाणात असतातच. त्यामुळे केवळ आजच्याच नव्हेतर कालच्या आणि उद्याच्या संपादकांकडेही कसा प्रांजळपणा आणि उमदेपणा असावा, याचं हा लेख एक उत्तम उदाहरण ठरू शकतो. हा लेख https://punashcha.com या मराठीतील जुन्या उत्तमोत्तम लेखांचा परिचय करून देणाऱ्या वेबसाईटवर ३ जानेवारी २०१८ रोजी पहिल्यांदा पुनर्मुद्रित करण्यात आला. त्यांच्या रीतसर पूर्वपरवानगीनं तो इथं देत आहोत.
.............................................................................................................................................
कोणताही व्यवसाय निष्कंटक नसतो. राजाला नोकर-चाकर, प्रासाद-रंगशाळा, अलंकार-जामदारखाना सारं काही असतं. असं असूनही त्याला सुखाची झोप येतेच असं नाही. जास्त जबाबदाऱ्या, जास्त लोकप्रियता किंवा अधिक उपद्रवशक्ती असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य फुले-आणि काटे या दोन्हींनीही भरलेलं असतं. नुसते फुलांचे हार किंवा नुसताच काट्याचा रस्ता जगात अस्तित्वात नसतो, सुख-दु:खांचं प्रमाण कमी-जास्त असेल, यश-अपयश यांच्या फूटपट्ट्याही बदलत असतील, पण या जगातील सर्वच प्रवासात फुलांचा गंध येतो. त्याच वेळेस काट्यांनी रक्तबंबाळही व्हावं लागतं. मिळालेले सन्मान ही दु:खावरची फुंकर असते, आणि सोसावं लागतं ते ते सारं अहंकाराच्या उपशमनार्थ असतं.
आपल्या देशातील प्रत्येक संपादक टिळक-आगरकर यांचाच वारसा सांगतात. पण मुळातच टिळक-आगरकर ही ब्रह्मकमळासारखी केव्हा तरी फुलणारी फुलं. शिवाय ते संपादक नव्हतेच. हजारो गनीम अंगावर घेऊन लढणाऱ्या सेनापतींजवळील अनेक हत्यारापैकी वृत्तपत्र हे एक हत्यार त्यांनी वापरलं एवढंच. शिवाय पत्रकार होण्यावाचून त्यांना पर्यायही नव्हता. हेतुपुरस्सर आंधळ्या, बहिऱ्या आणि मुक्या झालेल्या सुखासीन देशबांधवांना उकळत्या तेलाहून दाहक असणारे त्यांचे शब्द जागे करू शकणार होते. त्यामुळे ते संपादक झाले. त्यांचं नाव घेताना किंवा त्यांची जातकुळी सांगताना दहादा विचार करायला हवा. केवळ आपल्यालाही उडता येतं म्हणून चिलटानं गरुडाची बरोबरी करण्यात काय अर्थ आहे? लोकमान्यतेचे हार त्यांच्या गळ्यात पडले, पण त्यासाठी मंडालेतील एकांत कोठडीत स्वत:चं रक्तही त्यांना जाळून प्यावं लागलं. गळ्यात पडलेल्या प्रत्येक हारासाठी रक्ताच्या थेंबाथेंबानं किंमत चुकवताना मागे उरल्या, त्या त्याच्या उग्र, दाहक डोळ्यांच्या आठवणी. आणि त्याच उग्र डोळ्यांच्या दाहकतेला हायलंडर फलटणीही शरण आल्या होत्या.
आज अनेक संपादक आहेत. त्यापैकी बहुतेक जण शब्दांचे सौदागर आहेत. कुणाचे तरी शब्द स्वस्तात विकत आणावेत आणि कुणाच्या तरी ते गळ्यात मारावेत असा हा साधा व्यापार आहे. पुष्कळ संपादकांना शब्द प्रसन्नच नाहीत. पुष्कळजण लिहीतच नाहीत आणि त्यांनी लिहिलं तरी फारसं कोणी वाचीतही नाहीत. कोळशाची किंवा बर्फाची वखार काढावी तशा पुष्कळांनी शब्दांच्या वखारी काढल्या. म्हणून त्या शब्दांना रेखीव असा काही अर्थच नसतो. प्रस्थापित राज्यकर्ते, समाजरचना किंवा विषमता याविरुद्ध संपादकाच्या मनात खरोखरीच राग निर्माण झाला असेल, तरच तो त्याच्या शब्दांतून वा वृत्तपत्रातून व्यक्त होणार ना! कुणावर तरी राग करण्यासाठी कुणावर तरी मनभरून प्रेमही करावं लागतं. आणि प्रेम करणं काय इतकं सोपं आहे? ज्याला हिशेब नाही असं प्रेम करता येण्याचं भाग्य फार थोड्यांनाच लाभतं. आपल्या देशावर, धर्मावर, भाषेवर, आप्तस्वकीयांवर असं मनभरून प्रेम केलं की, कधी कधी शब्द गुलाबाच्या पाकळ्यांसारखे गंध-मखमाली होतात. आणि प्रसंगी तेच शब्द ठिणग्याही होतात. खऱ्या प्रेमात द्वेष, राग हे आपोआपच सामावलेले असतात. काहीच जमत नाही म्हणून वृत्तपत्र व्यवसायात येणाऱ्या माणसाचे राग-लोभही कोमट असतात. म्हणून त्याचे शब्दही गिळगिळीत होतात. एखादा संपादक लोकप्रिय होतो याचा अर्थ तो प्रेम करीत असलेला विषय लोकांना पसंत आहे, असा नसतो. संपादकाची कितीतरी मतं अमान्य असूनही वाचक त्याच्यावर खूष असतात. कारण त्याच्या शब्दांतून अस्सल असंतोषाचा बाणेदारपणा जाणवत असतो. एकदा आपल्या शब्दांच्या तावडीत वाचक सापडला की, त्याला कोणत्याही लांबच्या प्रवासाला नेण्याची त्या शब्दात ताकद असते. प्रामाणिकपणाचा स्पर्शसुद्धा माणसाला मोहात टाकतो. कारण दिवसेंदिवस प्रामाणिकपणा दुर्मीळ होत चालला आहे. सगळ्याच अस्सल गोष्टी हळूहळू दिसेनाशा झाल्या आहेत. अन्नात, वस्त्रात, औषधात, सगळ्यातच भेसळ असते. तशीच माणसांच्या विचारातही आता भेसळ होऊ लागली आहे. दिखाऊ परखडपणाच्या आड शरणागत भेकडपणा खाली मान घालून बसलेला असतो. अशाही परिस्थितीत कुठेकुठे एकाकी लढणारे, जखमांनी विव्हळ झालेले, परंतु युद्धाची नशा चढलेले लहान-मोठे संपादक दिसतात. विचार त्यांचाच करायचा.
आता ही गोष्ट खरी की वरील आदर्शात मी कुठे बसत नाही. मोठं व्हायचंच नाही असं एकदा स्वीकारलं की, आपोआपच आपल्या शत्रूंची संख्याही मर्यादित होते. एका माणसावर एका वेळेस तीन-चार माणसंच हल्ला करू शकतात आणि बाकीची हल्ला करणाऱ्यांच्यावरच हल्ला करीत असतात, तसंच हे आहे. लहान पत्रकाराची लढाई सोपी असते. त्याला संपूर्ण नष्ट करून टाकणं सहसा शक्य होत नाही. त्याचं व्यवसायाचं साधन म्हणजे त्यांची लेखणी. बाकीच्या लहान-मोठ्या गोष्टींचा नाश करता आला तर त्याच्या लेखणीचा नाश करता येतो. महापुरात लव्हाळी वाचावीत आणि वटवृक्ष उन्मळून पडावेत तसंच छोट्या वृत्तपत्रकाराचं होतं. तो आपल्या अंगाबरोबर जगत राहू शकतो! गुरगुरू शकतो, संधी पाहून आव्हान देऊ शकतो आणि पुन:पुन्हा सर्वनाशाला तयार होतो.
मी एक छोटा पत्रकार आहे. त्यातही माझं पत्र हे एक मतपत्र आहे. जगातले अनेक प्रकांड पंडित काही बोलत असले तरी माझ्या वृत्तपत्राच्या लेखी माझं मत हे आपोआपच श्रेष्ठ ठरतं. या देशातील राजकीय वादळवाऱ्यात आपल्या मताचं झाड उन्मळून पडू नये एवढी काळजी घेण्याचं शहाणपण माझ्याजवळ निश्चित आहे. आपण आपला वाचक बांधलेला आहे, ही खात्री असल्यामुळे क्वचित थोडा धोका पत्करून आपल्या तर्कशास्त्राप्रमाणे राजकीय अंदाज मला वर्तविता येतो. माझ्यावर कसलंच दडपण नसल्यामुळे बरेचसे अंदाज खरे ठरले आहेत. पण यात अकलेचा भाग थोडा. फक्त पूर्वग्रह सोडता आले एवढंच. ज्यांच्याबद्दल आपल्या भावना आपुलकीच्या, त्यांच्या शक्तीच्या अंदाजाचा वेध बरोबर घेता आला. कित्येकदा आपल्या मनात काही व्हावं अशी इच्छा असते, आणि ती आपली मन:कामना पूर्ण होण्यासाठी वास्तवाचं तर्कशास्त्र आपण बिघडवून टाकतो. आपल्या डोळ्यांनी स्वच्छ दिसत असतं की, अमूक अमूक घटना याच क्रमानं घडणार. आपण त्या सर्व तर्कशास्त्रात काही हातचं मिळवतो म्हणून अंतिम फसगत होते. माझी तशी फारशी फसगत झाली नाही. याचं एकच कारण, भाबडेपणानं अपेक्षा करण्याचं मी सोडून दिलं आहे. वेगवेगळ्या स्वरूपात या देशात काँग्रेसचंच राज्य राहील, हे अप्रिय सत्य स्वीकारल्यानंतर मनोभंग होण्याचा प्रश्नच उत्पन्न होत नाही.
माझ्या वृत्तपत्रीय आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण मला नेमका उलगडून सांगता येणार नाही. कारण या व्यवसायातील आनंद मुख्यत्वेकरून आपल्या सुजाण वाचकांच्या अभिप्रायावरच अवलंबून आहे. आणि तो आनंद मला शिगोशीग मिळालेला आहे. संपादकाजवळ किंचित अतिरंजित भाषा, भावनेला आवाहन करण्याचं सामर्थ्य आणि वाचकांच्या मनातील खदखदणाऱ्या असंतोषाबद्दल समभाव या गोष्टी हव्यात. मग वाचकांना बांधून ठेवता येतं. आपण निर्माण केलेल्या वाचकांच्या अपेक्षा आपण पुरवीत राहतो. म्हणजे तशा अर्थानं तो एक योजनाबद्ध खेळच होतो. पण मग या खेळाचे नियम पाळावे लागतात. अत्यावश्यक असणारं, परंतु वाचकांना न सोसणारं लेखन अनेकदा वादळ निर्माण करतं. मध्यंतरी कामव्यवहारावर मी एक लेख लिहिला. तो एक प्रौढ आणि चांगल्यापैकी लेख आहे असं माझं मत आहे, पण माझ्या वाचकांच्या लेखी तो लेख अतिरेकी व अनावश्यक आहे. माझ्या वाचकांच्याकडून शिव्या खाण्याचे प्रसंग माझ्यावर पुष्कळच आलेले आहेत. ‘मराठी सारस्वतातील एक भावेप्रयोग’ या लेखाला हमखास दाद मिळते, तिचंही कारण वाचकांना काय हवं त्याची जाण निर्माण झाली आहे. विरोधी मतांच्या एकांतिक माणसांच्याकडून आई-माईवरून शिव्या देणारी गलिच्छ पत्रं येतात. ती आली की मन विषण्ण होतं. पण तशी पत्रंही माझ्या वृत्तपत्रीय जीवनाला आवश्यक आहेत. कौतुकानं आणि स्तुतीनं सहजगत्या वाहवत जाण्याचा माझा स्वभाव आहे. माझ्यासारख्या माणसाच्या आयुष्याची कमाई कौतुकाचे चार शब्द हीच जर आहे, तर त्या कौतुकाचं मला अप्रूप वाटणारच. पण कौतुकानं डोकं फिरवून घेण्यापासून ती रक्तबंबाळ करणारी पत्रं माझा बचाव करीत आली आहेत.
शिवसेनाप्रमुखांनी मुंबईत माझ्यावर मारेकरी घातले, हा माझ्या आयुष्यातील सर्वांत शुभयोग होता. एकाकी लढणाऱ्या माझ्यासारख्या पत्रकाराचं सर्वच तऱ्हेनं शक्तिमान असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांना भय वाटावं किंवा राग यावा हेच आश्चर्याचं आहे. माझ्या लेखामुळे शिवसेनेचं काही कूसही वाकडं होणार नव्हतं. लहानसं का असेना विरोधी तोंड बंद करून टाकावं ही प्रवृत्ती हुकूमशाही प्रवृत्तीची असते. त्यासाठी मला दहा-पाच आघात सहन करावे लागले. पण त्याहीपेक्षा शिवसेनेला जास्त मोठे आघात सहन करावे लागले. पूर्वीच्या शिवसेनेला महत्त्व आता उरलेलं नाही. पण ज्या काळात मी शिवसेनेवर टीका केली, त्या काळात मुंबईची वृत्तपत्रंही शिवसेनेवर टीका करू शकत नव्हती. शिवसेना नष्ट व्हावी हा माझ्या लेखाचा हेतू नव्हता. तर कधी नव्हे ती निर्माण झालेली मराठी माणसांची संघटना अधिक व्यापक व शुद्ध पायावर उभी रहावी व नेतृत्व सुधारावं असं माझं म्हणणं होतं. ते माझं म्हणणं विचारात घेण्याऐवजी मलाच नष्ट करून टाकण्याचा विचार खुळेपणाचा होता. पण असा विवेक नेहमीच एकांतिक संघटनांना रूचत नाही. माझ्या आयुष्यात मात्र माझ्यावर लादलेला हा संघर्ष महत्त्वाचा ठरला. कारण मला वेगवेगळ्या थरातील लोकांचा पाठिंबा मिळाला, एवढंच नव्हे तर शिवसेनेतील कितीतरी जबाबदार नेत्यांनी माझंच म्हणणं बरोबर आहे, हे मला प्रत्यक्ष भेटून सांगितलं. पत्रकारांचं तोंड बंद करून टाकण्याचा प्रयत्न जगातल्या अनेक शक्ती करीत असतात. थोडीशी किंमत देऊन आपली निर्भयता टिकविण्यासाठी पत्रकाराला जागृत राहावंच लागतं. नाही तर त्याचे शब्द षंढ होतात. मला मोठं होण्याची संधी त्या प्रसंगानं लाभली.
परंतु हा प्रसंग सर्वोच्च आनंदाचा आहे असं मी मानणार नाही. या प्रसंगाच्या निमित्तानं माझ्या मनात निर्माण झालेली भावना मात्र अभूतपूर्व अशी होती. जीवनातील आनंद भोगताना जर कोणतीही कुचराई केलेली नसेल तर प्रसंगी जीवनातील आनंदच नव्हे, तर प्रत्यक्ष जीवनसुद्धा भिरकावून देताना वेगळीच नशा येते. जीवन क:पदार्थ वाटतं. मृत्यूचे गूढ आकर्षण वाटतं. त्या मारहाणीच्या निमित्तानं मी मरणाशी शेकहॅण्ड करून आलो. मृत्यूच्या त्या स्पर्शाबरोबर माझी पात्रता नसतानाही श्रेष्ठ पत्रकारांच्या त्या प्रदीर्घ मालिकेत मी सहजगत्या येऊन उभा राहिलो.
माझे लहान-मोठे सन्मान झालेले आहेत आणि होतही असतात. व्याख्यानाची बोलावणी येतात. ज्यांना आपण फार आदरणीय आणि अप्राप्य मानतो, अशा लोकोत्तर माणसांची गळाभेट होते. तर कधी कधी एखादा उद्योगपती आपल्याला घरी नेऊन सन्मानपूर्वक सत्कार करतो. याउलटही अर्थात कधी कधी घडतं, नाही असं नाही. आपला अपमान करण्यासाठी किंवा चेचण्यासाठी काही लोक आसुसलेले असतात. पण अशा अपमानाचं रूपांतर स्वाभिमानात करता येतं. त्याची मला आता थोडीशी सवय झाली आहे. अशा वेळेस एका उन्मत्त अहंकाराची सोबत माझ्या उपयोगी पडते, अपमान करणारा क्षुद्र आहे. त्याच्यावर परत हल्ला करण्यात फारसा मोठेपणा नाही. परंतु लहानसाही अपमान सहन करण्याची सवय आपल्या मनाला लागू देता कामा नये. अशा सहनशीलतेनं माणसे हळूहळू कोडगी होतात. ज्याच्या द्वेषाचा फणा क्षणार्धात उभा रहात नाही असा संपादक सरकारविरोधी लेखन कधीच करू शकणार नाही. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग हेच खरं असतं. कुणी विकत घ्यायला तयार असतात, कुणी दोस्तांचं नाटक करतात, कुणी दमदाटीची भाषा बोलतात. त्या सर्वांना एकच उत्तर असतं, आणि ते म्हणजे उन्मत्त अहंकार. पण हा अहंकार व्यक्तीचा नसतो तर समुदायाचा असतो. आणि तोही समुदाय असा की, ज्याला आजवर कोणीही त्राता लाभलेला नाही. हा अहंकार व्यक्तिगत लाभासाठी किंवा सूडासाठी वापरायचा नसतो. शक्ती, सत्ता किंवा पैसा यामुळे उन्मत्त झालेल्या माणसांपुरताच हा अहंकार वापरायचा असतो.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406
.............................................................................................................................................
एक दिवस असा उजाडतो की, एक एक गोष्ट मनाविरुद्ध होते. अगदी लहानसहान गोष्टींनीसुद्धा मन निरुत्साही होतं. लेखनिक आलेला नसतो, एजंटांच्या तक्रारी असतात, जाहिरातींचे पैसे थकलेले असतात, भीक मागून कागद आणावा लागतो. कामगार कुरकुरत असतात. नेहमीचे स्तंभलेखक या वेळेस लिहिणार नसतात, तेवढी पानं भरायची असतात. घरातल्या कुरकुरींना कोणतंच कारण नसतं. खरं तर इतर चारचौघांसारखा पत्रकारही एक संसारी गृहस्थ असतो. तेव्हा सर्व सुख-दु:खं त्यालाही बोचत असतात. लोकांना त्यातलं काही समजणार नसतं. आपण लिहीत असतोच, वृत्तपत्र निघालेलंच असतं-ते कुणाला आवडतंही. पण संपादकाला खरं मर्म माहीत असतं. कुठेतरी तो खचलेला असतो. पण उसनं अवसान आणून तो स्वत:चा सूळ स्वत:च पुरत असतो. दिवस संपत आलेला असतो. काळोखाची शांतता नाही आणि प्रकाशाचं चैतन्य नाही, असं काहीतरी वातावरण असतं. तेवढ्यात एक-दोन म्हातारी माणसं शांतपणे येऊन बसतात. नमस्कार चमत्कार होतात. इकडची तिकडची चौकशी होते. हळूहळू त्यांच्या शब्दातून आदरयुक्त कौतुक प्रकट होतं. आपल्यापेक्षा कितीतरी प्रौढ असणारी ही माणसं आपलं कौतुक करताना पाहून अवघडल्यासारखं होतं. त्यातला एकजण म्हणतो, ‘केसरीतल्या ग. वि. केतकरांनंतर वृत्तपत्र वाचण्याचं मी सोडून दिलं होतं. पण आता ‘सोबत’ वाचतो.’ ‘तुम्ही इतके तरुण असाल असं वाटलं नव्हतं’ असं दुसरा म्हणतो. माझ्या चेहऱ्यावरचे ते आश्चर्यकारक भाव पाहून तो गृहस्थ पुढे म्हणतो, ‘टिळक संस्काराशिवाय असलं लेखन करता येणार नाही असं मला वाटलं होतं. म्हणून ऐंशीएक वर्षांचा संपादक बेहेरे मी अपेक्षिला होता.’ मग त्यातले एक गृहस्थ उठतात आणि बरोबर आणलेला एक फुलांचा हार माझ्या गळ्यात घालू पहातात. मी त्यांना एक नम्र नकार देतो. मग तो हार तेथे असलेल्या सावरकरांच्या प्रतिमेला घातला जातो. मग पेढ्याचा एक पुडा माझ्या हातात ठेवला जातो. तो स्वीकारायला माझी काहीच हरकत नव्हती. मी वाकून नमस्कार करायला लागलो तर त्यांनी तसं करू दिलं नाही. त्यांनी वरच्यावरच मला उचललं. तेवढ्यात दुसऱ्या गृहस्थानं पाकीट काढून त्यातून तीनशे रुपयांच्या नोटा माझ्यापुढे केल्या. ‘हे काय?’ असा मी प्रश्न केला. ‘खाऊसाठी दिले आहेत.’ ते गृहस्थ हसून म्हणाले. ‘पण अशी देणगी मला घेता येणार नाही.’ ‘का?’ असा त्या दोघांनी एकदम प्रश्न केला.
‘संन्यस्तवृत्तीनं हा व्यवसाय मी करीत नाही. मी मौजमजा करणारा मनुष्य आहे.’
‘आम्हाला माहीत आहे. तुम्ही मद्य पिता-आणखीसुद्धा काही करता. तरीसुद्धा हे पैसे आम्हाला तुम्हाला द्यायचे आहेत.’
‘पण सार्वजनिक पैशावर माझा हक्क काय?’
‘तुम्ही कसे वागता याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही. आमच्यासारख्या संसारी माणसांना प्रत्यक्ष सार्वजनिक कार्य करणं शक्य नाही. पण तुमच्यासारख्यांचं आयुष्य थोडंफार सुखी करणं आम्हाला शक्य आहे. तुमच्या आजच्या लेखनाला दारू-बाई किंवा आणखी काही आवश्यक असेल तर त्यासाठीच आम्ही पैसे दिले आहेत असं समजा ना!’
‘तुमचं तर्कशास्त्र अजब आहे.’
‘मुळीच नाही. पहिल्या बाजीरावानं मस्तानी ठेवली, याबद्दल कुणी तक्रार करतं का? दुसऱ्या बाजीरावानं नुसतीच रंडीबाजी केली म्हणून लोक तक्रार करतात.’
मी काही पहिला बाजीराव होणं शक्य नाही. मी एक प्रमादशील साधा माणूस आहे. मला अनेक मोह पडलेले आहेत आणि अजून सुद्धा पडतात. मोहांना सामोरं जाणं हा पराक्रमाचाच एक भाग आहे असं मला प्रामाणिकपणानं वाटत असे. आता तसं वाटत नाही. पण बदनाम झालेल्या माणसाला मोहात पडावं लागत नाही. तर मोहच त्याच्या अंगावर चाल करून येत असतात. समाज जेव्हा एका लहान माणसाच्या लहान गुणासाठी अनेक पापांना क्षमा करू शकतो, तेव्हा आपल्या आयुष्याचं इतिकर्तव्य झालं असं मानायला हरकत आहे? पण हे-पापाचं समर्थन नव्हे किंवा मोहवशतेला निमंत्रणही नव्हे. अंगावरचा व्रण असला तर ही वस्तुस्थिती असते. तिच्याबद्दल जशी लाज वाटू नये, तसा अभिमानही वाटू नये. माझी पत्रकारिता माझ्या रक्तातून वाहते. तिला स्वतंत्र अस्तित्व नाही. म्हणून तिला खंतही नाही किंवा खेदही नाही. स्वत:च्या रक्तातील चैतन्याचं आपण गुणगान करीत नाही, तर ते चैतन्य आपण क्षणोक्षणी भोगतो. तसंच माझा व्यवसाय मी सर्वार्थानं भोगतो.
.............................................................................................................................................
असेच दुर्मीळ, निवडक पण कालसुसंगत लेख वाचण्यासाठी भेट द्या -
.............................................................................................................................................
(अंक : वसंत ; वर्ष:- दिवाळी १९८०)
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment