बडोदा इथं नुकत्याच झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी कथा, कादंबरी व ललित-वैचारिक स्वरूपाचं लेखन केलं आहे. त्यांच्या बहुतांश लेखनाची बीजं त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीत पहायला मिळतात. म्हणजे त्यांच्यातील प्रशासकाच्या आड एक लेखक कायम दडलेला होता. या पार्श्वभूमीवर, त्यांची एकूण प्रशासकीय कारकीर्द ओझरती समजून घेतली तर त्यांच्या साहित्याचं मर्म अधिक चांगल्या प्रकारे कळू शकेल. म्हणून त्यांची दीर्घ मुलाखत ‘साधना’ साप्ताहिकामध्ये क्रमश: प्रसिद्ध होत आहे. त्याचा हा पहिला भाग… संपादित स्वरूपात.
.............................................................................................................................................
प्रश्न - देशमुखसर, आपण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाला आहात; तेव्हापासून आजपर्यंत तुमच्या साहित्याबद्दल मुख्य प्रवाहात भरपूर लेख-मुलाखती येऊन गेल्या आहेत. पण आम्हाला तुमचा जीवनप्रवास समजून घ्यायचा आहे. तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी, जडण-घडण कशी झाली, कुठं झाली - जरा सविस्तर सांगा.
- मी मूळचा मराठवाड्यातील. उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम गावचा. आमच्या कुटुंबाकडे म्हणायला पाचगावची जहागिरी-देशमुखी होती, पण मराठवाड्यात दुष्काळ नेहमीचा असल्यानं कुटुंबाची आर्थिक स्थिती जेमतेम होती. शिकायला किंवा अगदी जगायला पुरेशी साधनं आमच्या कुटुंबाकडे नव्हती. आमचं गाव मराठवाड्यातील असल्यानं ते निजामाच्या राजवटीत होतं. त्या वेळी मराठवाडा हैद्राबाद प्रांताचा भाग होता. शिक्षण असो वा जगण्याची भ्रांत असो, हैद्राबाद हाच जवळचा पर्याय होता. आजोबा (सुमारे दीडशे वर्षांपूर्वी) जगण्याचा मार्ग शोधण्याच्या निमित्तानं हैद्राबादला गेले. प्रथमतः त्यांच्या आईनं त्यांना स्वतःची अंगठी मोडून पैसे दिले व हैद्राबादला जाण्यास सांगितलं. ते तिथं सातवीपर्यंत शिकले. माधुकरी मागण्यापासून अनेक कामं त्यांनी केली. ज्या जागेत ते भाड्यानं राहत होते, तिथल्या एका वयस्कर अपंग महिलेची सेवादेखील त्यांनी केली. तिला दैनंदिन आयुष्यातील सगळ्याच गोष्टींत मदत करण्याचं काम ते करत होते. तिच्या सेवेमुळं त्यांना घरभाडं भरण्याची गरज नव्हती. हे सगळं केल्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. गावाकडून आशा ठेवावी, असं काहीही नव्हतं. त्यांचे वडील अल्पायुषी ठरले होते. त्यामुळं त्यांना जगण्यासाठी संघर्ष अटळ होता.
म्हणजे आमच्या कुटुंबाला जी प्रगती करता आली, त्याची मूळ प्रेरणा माझी पणजी होय. तिनं अंगठी मोडून आजोबांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला नसता, तर मागासलेपण तसंच पुढं काही वर्षं टिकलं असतं. पणजीनं ती कोंडी फोडली. तिनं आजोबांना सांगितलं होतं की, ‘वर्षातून मला फक्त एक पत्र पाठवत जा व खुशाली कळवत जा. पण शिकून, नोकरी मिळवून परत ये. तसा येऊच नको.’ त्यामुळं आजोबांनी हैद्राबादला सातवीपर्यंत शिक्षण घेतलं. तिथंच त्यांना नोकरी मिळाली. ती नोकरी करत त्यांचा उदरनिर्वाह सुरू झाला.
त्या वेळी त्यांना नोकरीतून सुट्या मिळायला वाव होता. त्यामुळं गावाकडे वर्षातून तीन-चार वेळा ये-जा व्हायची. त्यात ते गावाकडची शेतीदेखील बटाईनं करून घ्यायचे. पण ती शेती फारशी परवडणारी नव्हती. अशातच त्यांचं लग्न झालं. प्रपंच सुरू झाला. दरम्यानच्या काळात माझ्या वडिलांचा जन्म झाला. वडिलांचा जन्म हैद्राबादचा. त्यांचं शिक्षणदेखील तिथंच झालं.
माझ्या आईकडची कहाणी अशीच आहे. तिचे वडील त्या काळी हैद्राबादला शिकायला गेले. ते तेव्हाचे एसएससी होऊन मुन्सफ झाले. त्या पदाला तालुका जज् कम तहसीलदार असंही म्हटलं जायचं. चांगली नोकरी असल्यानं त्यांनी सगळ्या भावंडांना शिक्षणासाठी तिकडं नेलं. मग त्यांच्या मुलीचं म्हणजे माझ्या आईचं लग्न झालं. त्याचा फायदा आमच्या दोन्ही कुटुंबांना झाला. वडलांचं शिक्षण व्यवस्थित पार पडून त्यांना बँकेत नोकरी लागली.
हा काळ निजाम राजवटीच्या अखेरचा होता. स्वातंत्र्यासाठी संघर्ष त्या वेळी सुरू होता. हा अस्वस्थ अन् खदखदीचा काळ होता. त्या वेळच्या स्टेट काँग्रेसनं स्वामी रामानंद तीर्थांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याची चळवळ सुरू केलेली होती. तसंच सावरकरांची ‘वंदे मातरम्’ चळवळ सुरू होती. त्यामुळं निजाम आक्रमक झालेला होता. त्यानं स्वातंत्र्याच्या चळवळीला आक्रमक प्रत्युत्तर देण्यासाठी रझाकारांची सेना स्थापन केलेली होती. ही सेना लोकांवर खूप अत्याचार करत होती. या अन्याय-अत्याचाराच्या वातावरणानं माझ्या आईचं शिक्षण चौथीत थांबलं. ती खूप शिकू शकली असती, तिच्यात तशी क्षमता होती, कुशाग्र बुद्धी होती! पुण्यात असती तर रमाबाई, रखमाबाईप्रमाणं खूप मोठी होऊ शकली असती. पण ते व्हायचं नव्हतं. असो.
वडील बँकेत नोकरीला असल्यानं त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या. खासकरून मराठवाड्यात, तेलंगणा प्रांतात अन् आत्ताच्या कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्ये. माझ्या जन्माच्या वेळी आई-वडील परभणीला होते. पुढं वडिलांची बदली बिदरला झाली. त्यामुळं माझी पहिली स्पष्ट आठवण आहे ती बिदर-भालकीची. तिथं माझं चौथीपर्यंतचं शिक्षण झालं. त्यामुळं कन्नडदेखील मी त्यावेळी शिकलो होतो. तिथं आम्हाला शाळेत मराठी माध्यम होतं. पण एक भाषा विषय म्हणून कन्नडदेखील होती.
बिदरला मला दोन भाषा अन् दोन वेगळे धर्म बालपणात अनुभवता आले. अर्थात त्या वेळी धर्माबाबतची स्पष्टता आजच्यासारखी नव्हती. आमच्या शाळेपासूनच या वेगळेपणाचा अनुभव घेता आला. आमची शाळा बेदरशाही राज्याचे शिक्षणमंत्री राहिलेल्या महमंद गवानच्या चौबऱ्यासमोर होती. हा चौबरा म्हणजे मुस्लिम बांधवांना प्रिय असलेली एक ऐतिहासिक वास्तू होती. आम्ही दुपारच्या सुट्टीत तिथं खेळायचो. त्या चौबऱ्याच्या सान्निध्यानं मला मुस्लिम सवगंडी दिले. तिथंच माझं मुस्लिम समाज अन् धर्म यांच्याशी एक नातं निर्माण झालं. बिदरची दुसरी आठवण म्हणजे तिथला नानक झरा नावाचा गुरुद्वारा. या गुरुद्वाराशी त्या लहान वयात नातं जोडलं गेलं. त्या गुरुद्वारामध्ये शबद कीर्तन चालायचं. ते मला बालवयात खूप आवडायचं. त्यामुळं कुठं तरी शीख धर्माच्या परंपरा, रीती-रिवाज यांच्याशी समरस होत गेलो. अशा प्रकारे दोन धर्म मला वयाच्या दहाव्या वर्षाच्या आत जरासे जवळून माहीत झाले. त्यावेळी फारसं कळत नसलं तरी या दोन धर्मांशी निर्माण झालेल्या जवळीकतेनं छान वाटत होतं. तेव्हाच कदाचित माझ्यात सेक्युलर भूमिकेची बीजं पडली असावीत, असं आज मागे वळून पाहताना वाटतं.
प्रश्न - सर, आपल्या आजवरच्या प्रवासाची मुळं आपल्या या जडण-घडणीत अप्रत्यक्षपणे दिसत आहेत. आता तुमच्या शिक्षणाचा प्रवास कसा झाला, तुमच्यातील वाचक-लेखक याच काळात घडत गेला का, अन् तो कसा, हे विस्तारानं सांगा.
- पाचवीला मी उस्मानाबादला वडिलांच्या बदलीमुळं आलो. तिथल्या जिल्हा परिषद शाळेत पाचवी ते सातवी शिकलो. त्यानंतरचं शिक्षण मी बार्शीचे शिक्षण महर्षी जगदाळेमामांच्या पुढाकारानं स्थापन केलेल्या भारत हास्यकूलमध्ये घेतलं. जगदाळेमामा म्हणजे त्या भागात शिक्षण-प्रसारासाठी अविरत कष्ट उपसणारं महत्त्वाचं नाव होतं, आजही आहे. मराठी शाळा अन् एकूण शिक्षणविस्तारात त्यांचं मोलाचं योगदान आहे. अशा ध्येयनिष्ठ माणसानं स्थापन केलेल्या शाळेत संस्कार होत गेले. तिथंच मला वाचनाची गोडी लागली. मात्र चांगल्या वाचनाची ऊर्मी माझ्या आईच्या संस्कारामुळं माझ्यात आली. आई कुठलीही गोष्ट खूपच रंजक पद्धतीनं सांगू शकायची. तीन तासांचा सिनेमा ती जसा पाहिला तसा सांगायची. तिला कुठल्याही पाहिलेल्या-अनुभवलेल्या गोष्टींची वर्णनं करायला आवडायचं, अन् जमायचंसुद्धा फार भारी. आज माझ्यातील साहित्यिक असण्याची मुळं तिच्या कथानक रंगवण्याच्या संस्कारात दडलेली आहेत. एकूणच, आईचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. कारण आई उत्तम वाचक होती. तिची वाणी अस्खलित होती. कथानक सांगण्याची पद्धत खूप नाट्यपूर्ण व रंजक असायची. आईनं ‘हमराज’ या सिनेमाची स्टोरी आम्हाला बरोबर तीन तास सांगितली होती, हे मला आजही चांगलं आठवतं.
आई हा माझ्या आयुष्याचा सर्वांगीण परिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे. त्या काळी ती नगर वाचनालयातून पुस्तक आणून वाचायची. अनेकदा वाचताना हसायची, तर अनेकदा तिला रडताना मी पाहिलं आहे. ती नियमित अन् वैविध्य असलेलं काही तरी वाचते, ही बाब माझ्यावर सहजतेनं संस्कार करत गेली. उस्मानाबादला माध्यमिक शाळेत असताना तिनं माझी ओळख तिथल्या नगर वाचनालयाच्या ग्रंथपालाशी करून दिली. त्या ग्रंथपालाला तिनं सांगितलं की- ‘हा माझा मुलगा आहे. याला मी पुस्तक आणायला पाठवत जाईन. तुम्ही माझ्या नावानं याच्याकडे पुस्तक देत जा.’ मग आईला हवी असलेली पुस्तकं आणण्याच्या निमित्तानं माझा ग्रंथालयाचा प्रवास सुरू झाला. त्यातून पुस्तकाबद्दलची उत्कंठा वाढत गेली. आपली आई एवढी पुस्तकं का वाचत असेल? म्हणून एकदा ‘आई, तू का वाचते?’ असं न राहून विचारलं. तर तिनं मला काही वाचलेल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. त्या ऐकून मी तिला म्हणालो, ‘या तर मोठ्या माणसांच्या गोष्टी आहेत, या वाचून मला काय कळणार?’ त्यावर तिनं मला ‘बालवाङ्मय वाचत जा’, असा पर्याय सुचवला. त्यातील महत्त्वाची पुस्तकं सांगितली. त्यातूनच मी अभ्यासाच्या पलीकडचं उत्सुकतेनं वाचायला लागलो. उस्मानाबादच्या नगर वाचनालयाचा माझ्या जडण-घडणीवर मोठा प्रभाव आहे. कारण आरंभीच्या काळात काय वाचायला मिळतं, यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. (माझ्यातील एकूण वाचक-लेखक घडण्यात उस्मानाबादचं ‘नगर वाचनालय’, मुरूमचं ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय’ आणि नांदेडचं ‘डॉ. राममनोहर लोहिया वाचनालय’ यांचा वाटा आहे. या तिन्ही वाचनालयांना एक पुस्तक मी अर्पण केलं आहे.)
बालवाङ्मय वाचता-वाचता मी हळूहळू कथा वाचायला लागलो. त्या कथांमध्ये मला अवतीभोवतीच्याच गोष्टी आपण वाचत आहोत, असं वाटत राहिलं. त्या वाटण्यानं आपण लिहू शकतो, असं वाटायला लागलं. त्यामुळं मीही एक छोटी कथा लिहिली. विशेष बाब म्हणजे, माझी पहिली कथा साने गुरुजींच्या साप्ताहिक ‘साधना’त छापून आलेली आहे. ती कथा कशी सुचली, हे सांगणं आत्ता अवघड आहे; परंतु माझ्यातील लेखकाचा जन्म तिथं झाला. त्यावेळी मी सातवीला होतो. पहिली बालकथा पुण्यातून निघणाऱ्या अंकातून छापून आल्याचा आनंद खूप मोठा होता. शिवार ती कथा दिवाळी अंकात छापून आलेली होती. तो अंक पोस्टानं आमच्या घरी आला, तेव्हा आई-वडील प्रचंड खूश झाले होते. मला वाचनाची ओढ लावल्याचा आनंद आईला तेव्हा झाला असणार. माझी कथा छापून आली याचा अर्थ ‘आता मी लेखक झालो’ याचा आनंद होता. त्यामुळं मी बालवयापासून एका अर्थानं ‘साधना’ परिवाराशी जोडला गेलो आहे, हे आवर्जून सांगावंसं वाटतं.
प्रश्न - तुम्हाला चार शहरांनी घडवलं असं तुम्ही नेहमी म्हणता; त्यापैकी नांदेड अन् औरंगाबादमधील आठवणींविषयी सांगा.
- हो, हे खरं आहे. बिदर-भालकी, उस्मानाबाद, नांदेड अन् औरंगाबाद या शहरांतील शिक्षणाच्या निमित्तानं जे वास्तव्य झाले, त्यात माझी खरी जडणघडण झाली. माझं प्राथमिक शिक्षण बिदर-भालकीला झालं. माध्यमिक उस्मानाबादला, तर महाविद्यालयीन नांदेडला अन् पदव्युत्तर औरंगाबादला. माझ्या वडिलांची बदली मी एसएससी झालो त्या वर्षी वसमतला झाली, म्हणून माझ्या कॉलेज शिक्षणासाठी त्यांनी नांदेडला घर केलं अन् माझं महाविद्यालयीन शिक्षण सायन्स कॉलेज, नांदेड इथं सुरू झालं. हे कॉलेज स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलं होतं. महाविद्यालयीन शिक्षणात वाचन-लेखन सोबत होतं; याच काळात लिहिण्याची उर्मी आकार घ्यायला लागली. याचाच भाग म्हणून नाशिकच्या ‘आपण’ नावाच्या साप्ताहिकात ‘हुंडाबळी’ या विषयावरची माझी पहिली प्रौढ लघुकथा छापून आली. नाशिकमधून जवळपास दहा वर्षं नियमित चाललेलं हे लोकप्रिय साप्ताहिक होतं. या कथेनंतर ‘स्वराज्य’ नावाच्या साप्ताहिकात माझी दुसरी कथा छापून आली. त्यानंतर मी नियमित लिहू लागलो.
बिदर-भालकीनं मला मुस्लिम अन् शीख धर्माचं प्राथमिक स्वरूपाचं दर्शन घडवलं. उस्मानाबाद शहरानं माझ्यातील वाचक घडला. माझ्या पुरोगामी- विशेषतः स्त्रीवादी साहित्याची पायाभरणी याच काळातील वाचन अन् तत्कालीन सामाजिक प्रक्रियेनं झाली. तसा मी मध्यमवर्गीय असल्यानं फारसं दुःख नाही अन् फारसं सुखही नाही, अशी परिस्थिती घरी होती. पण व्यापक समाजजीवनाचं दर्शन मला उस्मानाबादला झालं. मूळ गाव याच भागातील असल्यानं इथल्या प्रत्येक गोष्टीशी नातं होतं. जेव्हा-जेव्हा गावी जाणं व्हायचं, तेव्हा पाणी शेंदण्यापासून गावात केली जातात ती अनेक कामं करण्याचा योग येत होता. गावात गेलो की बैलगाडी चालवणं, शेतात पेरणीला मदत करणं अशीही कामं करण्याचा आनंद अनुभवता आला. त्यातच मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असल्यानं भवतालच्या ग्रामीण शेतीप्रधान परिस्थितीचं अप्रत्यक्षच पण फार नेमकं दर्शन घडत गेलं. त्यामुळं कदाचित सर्वसामान्य माणसाच्या दुःखाला सहजतेनं मला समजून घेता येतं.
उस्मानाबादला असताना महत्त्वाची गोष्ट अशी घडली की, साने गुरुजी अन् स्वातंत्र्यवीर सावकर यांचं साहित्य एकाच वेळी माझ्या वाचनात आलं. त्या वेळी सावरकरांचं वाङ्मय आठ-दहा खंडांत प्रसिद्ध झालं होतं. ते माझ्या हाती मित्राच्या वडिलांमुळं पडलं. ते सावरकर भक्त होते. सावरकरांचे विज्ञाननिष्ठतेचे निबंध असतील किंवा ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ असेल किंवा ‘आता धर्मग्रंथांची जागा कपाटात’ आणि ‘गाय हा उपयुक्त पशू’ यासारखे परखड निबंध असतील. त्या साहित्यानं त्या वयात मला चांगलंच प्रभावित केलं होतं. त्यांची नाटकं मात्र आवडली नव्हती, कारण त्यांची भाषा क्लिष्ट होती अन् त्यातील विचारही पटत नव्हते. मला इथं स्वा. सावरकरांबद्दल एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे, ती म्हणजे, १९०९ ला काळ्या पाण्याची शिक्षा झाली, तोपर्यंतचे सावरकरांचे विचार वेगळे होते. अंदमानची शिक्षा भोगून आल्यानंतर त्यांचे विचार मुस्लिमविरोधी झाले किंवा कट्टर हिंदुत्ववादी झाले. तत्पूर्वी सावरकरांनी हिंदू-मुस्लिम एकोक्याचे गोडवे गायले होते; नुसते गोडवे गायले नव्हते, तर तशी सर्वसमावेशक भूमिका ते मांडत होते.
आणि साने गुरुजींच्या साहित्यानं मला करुणा, प्रेम आणि मानवता शिकवली. त्यांचा माझ्यावर आजही प्रभाव आहे. त्यामुळं त्यांना मी कधी पाहिलं नसलं तरी आजही त्यांच्या ‘धडपडणाऱ्या मुलां’मध्ये स्वत:ला गुंफून घ्यायला मला आवडतं. एकूणच सावरकरांच्या विज्ञाननिष्ठतेपासून साने गुरुजींच्या करुणा, प्रेम, गांधीवाद, मानवतावाद या सर्व गोष्टींचा माझ्या मनावर प्रभाव पडला. तसं पाहिलं तर हे दोन्ही भिन्न वैचारिक प्रवाह होते, पण पुढच्या नांदेडच्या प्रवासाची ती जणू काही पायाभरणीच होती. माझा व्यापक दृष्टिकोन घडण्यात या दोन्ही प्रवाहांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे.
उस्मानाबादच्या जडण-घडणीची जशी गोष्ट आहे, तशीच नांदेडचीही. पण ती अधिक व्यापक, अधिक डोळस अशी आहे. नांदेडला मला लेखन-वाचनाची खरी दिशा मिळाली. माझ्या वैचारिक भूमिका घडवण्याचं ते केंद्र म्हणता येईल. कारण इथं आल्यावरच मी गंभीरपणे वैचारिक साहित्य वाचायला लागलो. त्यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नांदेडला सर्वपरिचित असं एक चालतं-बोलतं विद्यापीठ नरहर कुरुंदकर होतं. कुरुंदकरांच्या लेखन-वाचनानं प्रभावित न होणं, तिथं केवळ अशक्य होतं. जसे नाशिकला कुसुमाग्रज हे सर्वमान्य सांस्कृतिक नेते होते, तसे नांदेडला कुरुंदकर होते. तिकडं तात्या (कुसुमाग्रज) दैनंदिन काय करतात, कसे बोलतात, काय वाचतात, याचं कुतूहल जसं अनेकांना असायचं; तसं इकडं आम्हाला कुरुंदकरांचं (गुरुजी) होतं. आमच्या मनावर ‘कुरुंदकर : व्यक्ती आणि विचार’ असे दोन्ही बाजूंनी गारूड होतं. नांदेडमध्ये त्या काळी कुठलाही मोठा कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुरुंदकर गुरुजीच असायचे. आणि कितीही मोठा वक्ता भाषण करणार असला तरी अध्यक्ष म्हणून कुरुंदकर काय बोलणार आहेत, ते ऐकलं पाहिजे, असं सर्वांना वाटायचं. कुरुंदकरांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वानं टाकलेला प्रभाव कधीच न विसरता येण्यासारखा आहे.
कुरुंदकरांच्या प्रभावानं माझा वैचारिक प्रवास सुरू झाला. त्यामुळं धर्म अन् विज्ञान या संदर्भातील पुस्तकं वाचायला लागलो. व्यापक स्तरावर विचारप्रक्रियेनं मनात जागा निर्माण केली. त्यामुळं वाचनाच्या अन् लेखनाच्या पलीकडे समाजजीवनातील घटना-घडामोडींकडे पाहायला लागलो; त्यात समरस व्हायला लागलो. त्याचाच भाग म्हणून त्या काळी तरुणाईवर प्रचंड प्रभाव असलेल्या ‘युक्रांद’च्या चळवळीत काही काळ सामील झालो. त्या काळी अरुण लिमये आणि कुमार सप्तर्षी या तरुणाईच्या लाडक्या युवा नेत्यांचा आमच्या पिढीवर मोठा प्रभाव होता. त्यांच्या व्यवस्था-परिवर्तनाच्या चळवळीचा मी अगदी सहज भाग बनत गेलो. फी वाढ कमी करणं अशापासून अनेक प्रश्नांवर झालेल्या आंदोलनांत सहभागी होत गेलो. त्यातच या चळवळींचे बौद्धिक वर्ग व्हायचे, त्या वर्गांना जायला लागलो. या बौद्धिक वर्गात अनेक गंभीर विषय मांडले जायचे, चर्चिले जायचे. त्याद्वारे आम्ही घडत होतो. माझ्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट या चर्चा अन् कुरुंदकरामुळे झाली, ती ही की- हिंदू-मुस्लिम प्रश्नाचा गुंता मला समजून घेता आला. बिदर-भालकीच्या शाळकरी वयापासून माझं हिंदू-मुस्लिम प्रश्नाकडे मार्गक्रमण होत होतं. त्यामध्ये गोडसेंची आपण वाचलेली पुस्तकं किती चुकीची व विपर्यस्त होती, हे तर कळलंच; पण त्याचबरोबर भारत-पाकिस्तानची फाळणी कशी झाली, इथपर्यंतचा हिंदू-मुस्लिम प्रश्नाचा प्रवास समजून घेता आला.
माझ्यातील लेखक घडण्यात कुरुंदकरांच्या प्रोत्साहनाचा काही वाटा आहे. त्या वेळी माझ्या ‘हिबाकुशा’ नावाच्या कथेला एक पुरस्कार मिळाला. ही कथा जपानमधील समाजजीवनावर आधारित होती. जपानवर दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्ब टाकले गेले, त्यामुळं रेडिएशननं तिथं शारीरिक विकृतीसह काही जन्म व्हायचे. त्यांना जपानी भाषेत ‘हिबाकुशा’ म्हणजे ‘अणुविकृत’ म्हटलं जायचं. अशा एका अणुविकृतीनं शारीरिक व्याधी भोगणाऱ्या जपानी तरुणाची ही कथा होती. या कथेला सन्मान मिळाल्यानंतर कुरुंदकरांनी शाबासकी दिली होती. एक तर कुरुंदकरांनी ती कथा वाचली, याचंच मला आश्चर्य वाटलं. कारण त्यांचा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वाचनाचा आवाका फार मोठा होता. अशात त्यांनी ‘स्वराज्य’ हे साप्ताहिक वाचून माझ्या कथेवर अभिप्राय देणं ही माझ्यासाठी मोठी बाब होती. कुरुंदकरांचं ‘लिहीत राहा, चांगले लिहितोस’ असं म्हणणं प्रेरणा देणारं ठरलं. नांदेडच्या जडण-घडणीत इतरही अनेक मान्यवरांचा अन् संस्थांचा संबंध आलेला आहे. त्यामध्ये स. रा. गाडगीळ व ग. ना. आंबेकर हे प्रमुख होते. त्याशिवाय ‘मराठवाडा’ दैनिकातील अनंत भालेरावांच्या संपादकीय वाचनानं माझ्यावर समाजवादी संस्काराची पेरणी झाली.
नांदेडमधील पदवीचं शिक्षण संपल्यानंतर मी पदव्युत्तर शिक्षणासाठी औरंगाबादला आलो. औरंगाबादला आल्यावर आयुष्याला पुन्हा नवं वळण मिळालं. हिंदू-मुस्लिम प्रश्नाकडून पुढे जाऊन मी दलित प्रश्न समजून घेण्याकडे वळलो. कारण इथं येईपर्यंत माझं दलित साहित्याचं वाचन झालेलं नव्हतं, ते इथं सुरू झालं. त्यामध्ये दया पवारांच्या ‘बलुतं’पासून लक्ष्मण मानेंच्या ‘उपरा’पर्यंत वाचनविस्तार वाढला. त्यातच औरंगाबादमध्ये राजा ढाले यांची दोन-तीन व्याख्यानं ऐकल्यानंतर तर दलित साहित्य अन् दलित समाजाचं जगणं अन् जाणिवा यांची लख्ख जाणीव झाली. ज्या काळात मी औरंगाबादला शिकायला आलो, तो दलित चळवळींसाठी व्यापक अर्थानं मंतरलेला काळ होता. त्यामुळं राजा ढालेंपासून नामदेव ढसाळांपर्यंत सगळ्यांना ऐकता आलं, वाचता आलं. स्वतःला या सर्व प्रक्रियेच्या अंगानं घडवता आलं. पुन्हा तिथं गंगाधार पानतावणे व त्यांच्या ‘अस्मितादर्श’ नियतकालिकाचा प्रभाव होताच.
सुरुवातीला म्हणालो त्याप्रमाणे- माझी प्रमुख जडणघडण ही मराठवाड्यातील चार प्रमुख अन् तितक्याच वैविध्यपूर्ण शहरांत झालेली आहे.
प्रश्न - माध्यमिकनंतरच्या तुमच्या शैक्षणिक प्रवासाबाबत थोडक्यात सांगा.
- माझ्या वैचारिक जडण-घडणीचा प्रवास सरळ अन् पुरोगामी दिशेनं विस्तारलेला दिसतो, पण शिक्षणाच्या बाबतीत तसं नाही. तसा शाळेत पहिल्यापासून ज्याला हुशार विद्यार्थी म्हणतात, त्या कॅटेगरीत मी होतो. प्रथम क्रमाकांची परंपरा बारावीपर्यंत होती. दहावीला (मॅट्रिक) ७१ टक्के गुण मिळवून नंबर मिळवला होता. पण बारावीला (त्या वेळी बारावीला ‘पीसीसी’ म्हटलं जायचं.) तुलनेनं कमी मार्क पडले. कारण बारावीत मी इतर उद्योगांत आघाडीवर होतो. कॉलेजच्या निवडणुकीला उभा राहिलो होतो, त्यात दोन मतांनी पराभूत झालो. (त्यानंतर थेट संमेलनाची निवडणूक लढलो, जिंकलो.) तरीही काही तरी करण्याची इच्छा होतीच. माझी लेखन-वाचनाची आवड लक्षात घेऊन मला कॉलेजच्या वाङ्मयीन मंडळाचा सदस्य केलं गेलं. त्यातच कॉलेजनं एक निबंधस्पर्धा घेतली. त्या स्पर्धेत जो पहिला येईल, त्याला कॉलेजच्या मॅगेझिनचा संपादक केलं जाणार होतं, मला ती संधी मिळाली. त्या संपादनाच्या कामात मी जास्तच रस घेतला. त्यामुळं अभ्यासावर परिणाम झाला. परिणामी, बारावीला कमी मार्क पडले. त्यामुळं मेडिकलला जायचा मार्ग बंद झाला. फक्त इंजिनिअरिंगचा पर्याय होता. त्यातही नंबर लागला वर्ध्याला. पण गणिताची आवड नव्हती, म्हणून बी.एस्सी. करण्याचा निर्णय घेतला.
एम.एस्सी. झाल्यावर ‘पुढं काय?’ या प्रश्नातून संशोधनाचा मार्ग निवडला. त्यातच मला प्रतिष्ठेची स्कॉलरशिप मिळाली. पण अल्पावधीत असं लक्षात आले की, संशोधन करणं, हा आपला पिंड नाही. दुसरं काय करावं, हा प्रश्नच होता. पीएच.डी.साठी संशोधन सुरू झालेलं; पण त्यात मन तर रमत नव्हतं. गाईडचं अन् माझं पटतदेखील नव्हतं. गाईडच्या वेगळ्याच अपेक्षा होत्या. मला त्या पूर्ण करून बळजबरीनं ते संशोधन करावंसं वाटत नव्हतं. उत्तरोत्तर गाईडसोबत जमेना. त्यावेळी स्टेट बँकेची एक जाहिरात आली होती. त्यासाठी अर्ज केला, परीक्षा दिली अन् क्लार्क म्हणून माझी निवड झाली. बँकेतील निवड ही पुन्हा नव्या आयुष्याची सुरुवात होती.
अतिशय सुरक्षित नोकरी. पगार उत्तम. (सरकारी नोकरीच्या तुलनेत त्याकाळी बँकेत पगार अधिक होते. सरकारी सेवकांना त्या वेळी तिसरा वेतन आयोग मिळत होता.) तरी मन रमेल असं काम नव्हतं. अशातच करिअरच्या पर्यायांवर विचार करत असताना श्यामसुंदर शिंदे या उपजिल्हाधिकारी असलेल्या सन्मानीय अधिकाऱ्यांना भेटण्याचा योग आला. त्यांना माझा लेखन-वाचनप्रवास कळल्यावर त्यांनी मला स्पर्धा परीक्षा देण्याची सूचना केली. ते म्हणाले, ‘तुझं एवढं चांगलं वाचन आहे, तर सहज अधिकारी होशील. दे परीक्षा. या नोकरीत पगार तर चांगला आहे, पण खऱ्या अर्थानं सेवेचं/परिवर्तनाचं काम करण्याची इथं संधी आहे.’ त्यांच्या सूचनेचा आदरपूर्वक स्वीकार करत मी अभ्यास सुरू केला.
प्रश्न - सर, स्पर्धा परीक्षांकडे वळल्यावर आलेले अनुभव, तुमची निवड याविषयी सांगा.
- स्पर्धा परीक्षेच्या प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वीच त्यासाठी लागणारा बेस माझ्या चौफेर वाचनानं आपसूकच तयार झाला होता. त्याचा मला प्रचंड फायदा झाला. मी पहिल्या प्रयत्नात तहसीलदार झालो. तहसीलदार झाल्यावर बँकेची नोकरी सोडावी की नाही, हा प्रश्न होता. या मानसिक गोंधळाच्या स्थितीत अनेकांशी चर्चा केली. काहींनी तहसीलदारच्या नोकरीतून जनसेवेची संधी लक्षात आणून दिली व मी ती नोकरी स्वीकारायचं ठरवलं. या पहिल्या प्रयत्नात माझी उपजिल्हाधिकारी होण्याची संधी थोडक्यात हुकली होती. ती खंत मनात होती. त्यामुळं पुन्हा परीक्षा दिली आणि १९८३ मध्ये उपजिल्हाधिकारी झालो. तेव्हा ज्ञानेशर मुळे आणि मी असे दोघेही पहिले आलो होतो. आम्हाला जवळपास सारखेच मार्क होते. मुळेंनी नंतर युपीएससी परीक्षा दिली, त्यात त्यांची निवड झाली आणि ते भारतीय परराष्ट्र सेवेत गेले. माझ्यासोबत राधेश्याम मोपलवार, चंद्रकांत दळवी, प्रभाकर देशमुख हेदेखील उपजिल्हाधिकारी झाले होते. अशा प्रकारे मी उपजिल्हाधिकारी म्हणून महाराष्ट्र सरकारच्या सेवेत १९९३ साली रुजू झालो. तहसीलदार म्हणून पश्चिम महाराष्ट्रात करिअरला सुरुवात झाली. पुढं मी स्वतः मागणी करून मराठवाड्यात गेलो. नोकरी होती तरीही शिकायची भूक कायम होती. अधिकारी म्हणून तर शिकत होतो, घडत होतो. त्याशिवाय आणखी शिकावं वाटत होतं. त्याचाच भाग म्हणून लातूरला प्रांताधिकारी असताना मराठी विषयात (एक्स्टर्नल) एम.ए. करावं असं वाटलं. मराठीत पीएच.डी. करून डॉक्टरेट व्हावं, असंही वाटलं. ते का वाटलं, ते अजूनही कळलेलं नाही. त्यामुळं कोल्हापूर विद्यापीठातून बहिस्थ एम.ए. केलं. ही माझी तिसरी पदवी होती. प्रथम श्रेणी अन् फारच चांगले मार्क्स मिळाले. मग पीएच.डी. साठी विचारणा करायला सोलापूरला डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्याकडे गेलो. ते मराठीचे गाईड होते. ते म्हणाले, ‘का करायची पीएचडी? काय उद्देश आहे?’ मग मी सांगितलं की, ‘मला लेखनाची आवड आहे. पीएच.डी.च्या निमित्तानं आणखी सखोल वाचन होईल’. ते तेव्हा असे म्हणाले की, ‘नोकरी सोडून पीएच. डी. नंतर प्राध्यापकी करायचा विचार आहे का?’ मी म्हणालो की, ‘सर, मला पुढच्या आठ-दहा वर्षांत आय.ए.एस. व्हायची संधी असताना मी का सोडू?’ मग ते म्हणाले, ‘तू असं कर, जे तुझं लिहिण्याचं काम सुरू आहे, ते सुरू ठेव. तू क्रिएटिव्ह रायटर आहेस, संशोधनाच्या फंदात न पडता ललित लेखनात सातत्य ठेवीत जा. तेच तुझं महत्त्वाचं योगदान राहील. त्यासाठी तुला पीएच.डी.ची गरज नाही.’ मला त्यांचा सल्ला पटला.
माझ्या आयुष्याचा हा तिसरा टप्पा होता. पण एम.ए. करताना व नंतरही अनेक लेखक वाचले. त्यावेळी अरुण साधू हा माझा आवडता लेखक होता. त्यांचं सगळं साहित्य मी वाचलं. ते अतिशय दर्जेदार तर होतंच; पण वास्तव जीवनाचं नेमकं चित्र रेखाटणारं त्यांचं लिखाण होतं. मराठीच्या पदव्युत्तर शिक्षणाच्या निमित्तानं समग्र व्यंकटेश माडगूळकर अभ्यासले, इतरही अनेक लेखक मुळातून वाचता आले. लेखक म्हणून मला त्याचा खूपच फायदा झाला.
(‘साधना’ साप्ताहिकाच्या ७ एप्रिल २०१८च्या अंकातून साभार)
.............................................................................................................................................
लेखक लक्ष्मीकांत देशमुख ९१व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
laxmikant05@yahoo.co.in
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment