पाणी, बेट, माणूस आणि समुद्री परिसंस्था यांची नाळ तुटली तर कहर होऊ शकतो!
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
अलका गाडगीळ
  • जुवे गावातील महिला
  • Sat , 31 March 2018
  • पडघम कोमविप जुवे Juve अलका गाडगीळ Alka Gadgil

जुवे म्हणजे बेट. गावाचं नाव जुवे. जैतापूर जवळचं जुवे बेट. जुव्याची सध्याची लोकसंख्या शंभरसुद्धा नाही. तरीही गावात ग्रामपंचायत असल्याचं समजलं. कुतूहल जागृत झालं. ही राज्यातील सर्वांत लहान ग्रामपंचायत. एवढ्या दुर्गम भागात निवडणूक प्रक्रिया कशी राबवली जात असेल?

डॉ. पी. व्ही. मंडलिक ट्रस्टच्या वतीनं नुकताच तिथं जाण्याचा योग आला. राजापूर या तालुक्याच्या ठिकाणाहून जैतापूर जवळ जवळ तीस किलोमीटर अंतरावर आहे. तिथल्या धक्क्यावरून तरीत बसायचं आणि जुव्याच्या धक्क्यावर उतरायचं. ही अर्जुना खाडी. राजापुरातून अर्जुना नदी वाहते. तिचा प्रवाह या खाडीत येतो. तरीतून जात असताना पाण्यामध्ये गच्च झाडी दिसते. हे खारफुटीचं वन. किनाऱ्यावरली चिमुकली गावंही दिसत होती. या गावांभोवती वनराणीनं फेर धरलाय. झाडांच्या गर्दीतून मध्येच लालचुटूक कौलं दिसतात. ही सफर केरळच्या बॅकवॉटर राईडपेक्षा विलक्षण सुंदर वाटली. चोहीकडे दिसणारी वनराजीची दृश्यंही केरळच्या सौंदर्याच्या तोडीस तोड. पर्यटकांच्या झुंडींची नजर अजून इथं वळलेली नसल्यामुळे हा परिसर नितळ राहिला आहे.

तरीतनं जुवे गावात पाय ठेवला. उजवीकडे एक चिमुकली पायवाट दिसत होती. बंद असलेली घरं, दोन घरांमधल्या चिंचोळ्या वाटा. वाटेच्या दोन्ही बाजूला वड, पिंपळ, बोर, गावठी आंबा, फणस, साग, काजू, उंबर, शेवगा, नारळ, रातांबा आणि ओळखू न येणारी असंख्य झाडं दिसली. त्या वाटेवरून थोडं पुढे गेलं तरी माणसांचा मागमूस दिसेना. क्षणभर निर्जन बेटावर येऊन पडलोय की, काय असं वाटावं इतकी शांतता. आमचाच आवाज आम्हाला त्रास देऊ लागला. त्या व्यतिरिक्त पाण्याचा आवाज आणि पानांची सळसळ ऐकू येत होती. या निर्जन बेटावरला हा खजिना समोर ठाकला होता.

पायवाटेवरून पुढे जात असताना वडाचा मोठा बुंधा दिसला. हे झाड तोडल्याचं स्पष्ट दिसत होतं. मधमाशांचं मोठं पोळं असल्यामुळे गावकऱ्यांनी वड तोडला. मधमाशी पालनातून रोजगार मिळू शकतो आणि त्याचं प्रशिक्षणही मिळू शकतं याची चर्चा संध्याकाळच्या मिटिंगमध्ये झाली. मधमाश्यांमुळे परागी भवन होतं. त्यामुळे पर्यावरणाला साहाय्य होतं. गावकऱ्यांनी मधमाशी पालनात रस दाखवला आणि तपशील नोंदवून घेतले.

जुवे गावात दोन बचत गट आहेत असं शिवानी करंजे यांनी सांगितलं. या बचतगटांनी रातांब्यापासून आमसोलं तयार करण्याचा व्यवसाय हाती घेतला आहे. गावात दुकान नाही. प्रत्येक गरजेसाठी जैतापूरला जावं लागतं.

फक्त ७१ मतदार असलेल्या या गावात ग्राम पंचायतीची निवडणूक होत नाही. ग्रामसभा होते आणि उमेदवारांची नावं ठरवली जातात. प्रतिस्पर्धी उमेदवार नसतोच. त्यामुळे मतदान होत नाही.

एकेकाळी शेती होत होती. आता येथील मुख्य व्यवसाय मासेमारी आहे. सत्तरच्या दशकांपर्यंत गाव नांदतं होतं. घरं मुलाबाळांनी भरलेली असत. मुलांना खेळायला जागा पुरत नसे. नंतर शिक्षण आणि नोकरीसाठी माणसं गाव सोडून गेली. पूर्वी जैतापूर-जुवे संयुक्त पंचायत होती. काही वर्षांपूर्वी ती विभक्त झाली.

आता गावात आंब्यांची कलमं आहेत, कोलंबी प्रक्रिया केंद्रही आहे. थोडीफार शेती होते, पण शेती आणि बागायतींवर कोल्हे, रानडुकरं आणि माकडांच्या धाडी पडतात. फार निगराणी करावी लागते.

मे महिना, गणतपती आणि होळीला गाव गजबजतं. मुंबईचे गावकरी जुव्याला धाव घेतात. लोकसंख्या कमी असलेल्या या गावात दोन होळ्या पेटतात. अनेक वर्षांपूर्वी गाबीत आणि भंडाऱ्यांमध्ये भांडणं झाली आणि गावात दोन्ही गटांच्या स्वतंत्र होळ्या पेटू लागल्या.

पन्नास वर्षांपूर्वी जुव्याची शाळा नावाजलेली होती. देवाचं गोठणंसारख्या आजूबाजूच्या गावांतून आणि बेटांतून विद्यार्थी जुव्याच्या शाळेत शिकायला येत असत. ‘मुक्काम पोस्ट देवाचं गोठणं’ हे पुस्तक लिहिणारे माधव कोंडवीलकर बहुधा याच शाळेत शिकले असावेत.

चालता चालता समोर तीच शाळा लागली. आता या शाळेत दोनच विद्यार्थी आहेत, दुसरीच्या वर्गात. एक मुलगा आणि एक मुलगी. त्यांच्यासाठी असलेले शिक्षक दूरच्या गावातून मजल-दरमजल करत या शाळेत येतात. पुढच्या वर्षी पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणारं एकही बालक या गावात नाही. त्यामुळे गौरवशाली इतिहास असणाऱ्या या शाळेचं भवितव्य काय असा प्रश्न पडला. पण उपसरपंच शिवा करंजेंनी ठामपणे सांगितलं, ‘आम्ही शाळा बंद पडू देणार नाही’!

जुवे हे देशातील सर्वांत कमी लोकसंख्या असलेलं गाव असावं, कारण सध्या तिथं फक्त ७७ लोकं राहतात. गावातली १०९ घरं बंद आहेत. नांदती घरं आहेत २५.

गावात गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. भर समुद्रात असलेल्या या बेटावर गोड्या पाण्याच्या विहिरी कशा? समुद्रातील खाऱ्या पाण्यापेक्षा जमिनीवरच्या पाण्याची घनता कमी असते. त्यामुळे विहीर खोदताना गोड्या पाण्याचे झरे आधी लागतात असं भूजलशास्त्र सांगतं. 

शाळेच्या थोडं पुढे असलेल्या देवळाच्या सभामंडपात टेकलो, तर गाभाऱ्याजवळची पाटी दिसली - ‘गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश नाही’. या दुर्गम बेटावर स्त्रियांची संख्या अधिक आहे, तिथलं देऊळही स्त्रियांना दूर लोटणारं आहे. जुवे बंदर असो की, हाजी अली दर्गा; शनी शिंगणापूर असो की, शबरीमाला, सगळीकडेच स्त्रियांना हक्क नाकारला जातो!

गाभाऱ्यात प्रवेश नाकारलेला असला तरी जुव्याच्या स्त्रिया काहीय कमी नाहीत. पूर्वी त्या होडी/तरी चालवत. सगळ्यांना उत्तम पोहताही येतं. आता स्थिरता आल्यामुळे स्त्रियांनी तरी चालवणं सोडून दिलं आहे. बेटावर राहत असल्यामुळे तमाम जुवेकर पट्टीचे पोहणारे आहेत.

जुव्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गावकऱ्यांनी गावात वीज आणली आणि तीही स्वकष्टानं. सत्तरच्या दशकांत गावात वीज आणण्याचा प्रस्ताव आला. त्यासाठी भर ५२ मीटरचा पोल उभारायचा होता. जुवेकर कामाला लागले. पोलसाठी २१ मीटर खोल खणावं लागलं. गावकऱ्यांनी फार मेहनत घेतली.

जेवण झाल्यानंतर करंजेंचा मुलगा नितेश आणि त्याच्या मित्राबरोबर गाभारा प्रवेशबंदीचा विषय काढला. ते दोघं बारावीत आहेत. स्त्रियांना प्रवेश दिला पाहिजे हे त्यांना पटतं, पण देवळातली पाटी काढून टाकण्याचा विषय कसा काढायचा हा प्रश्न त्यांना पडला. ‘मोठे आपली मतं बदलत नाहीत. ग्रामसभेत याविषयी चर्चा कशी होणार?’. 

या गावाला निसर्गाचं वरदान आहे. गावानं वनराईचं संवर्धन केलंय. त्याचं रक्षणही ते करताहेत. स्थलांतर केलेल्या गावकऱ्याची नाळ अजून गावाशी जोडलेली आहे. सगळीकडे पर्यावरणावर कुऱ्हाड चालवली जात असताना जुवेकरांसारखे निसर्गरक्षकही आहेत याची नोंद घ्यायला हवी. 

जुवे बेटावर पाय ठेवल्याबरोबर लहानपणी वाचलेल्या ‘ट्रेझर आयलंड’ आणि ‘रॉबिन्सन क्रूसो’ या पुस्तकांची आठवण झाली. हुजूर वर्गातील पुरुष समुद्र सफरीला निघतात आणि निर्जन बेटावरला खजिना लुटून आणतात किंवा तिथं वसाहत करतात. जगाचा शोध घ्यायला निघालेल्या प्रवाशांची पुस्तकं वसाहतीच्या सुरुवातीच्या काळात प्रकाशित झाली. त्या पूर्वी समुद्रमार्गानं नवभूमीचा शोध घेता घेता कोलंबस अमेरिकेत पोचला आणि अमेरिका खंड इंग्लंडचा मांडलिक झाला. पुढे मूलनिवासी रेड इंडियन समूहाची कत्तल केली गेली. रेनेसान्स काळातलं हे पहिलं जेनोसाइड-मानवी शिरकाण असावं. नवीन भूमीवर अधिपत्य मिळवण्याचं, संसाधनांचा अपहार करण्याचं, आपली संस्कृती आणि भाषा स्थानिकांवर लादण्याचं वसाहतवाद हे साधन होतं.

वसाहतउत्तर शहरी ‘अभिजनांनी’ संशोधनासाठी खेड्यात जाणं हे कोणत्या प्रकारात मोडतं? या संबंधांतील महाश्वेतादेवींचं कार्य आणि लेखन अभ्यासण्यासारखं आहे.

महाश्वेतादेवी लेखिका होत्याच, त्यासोबत त्या संशोधक आणि स्वच्छंदी पत्रकारही होत्या. पश्चिम बंगाल, बिहार, ओरिसा आणि मध्य प्रदेशमधील आदिवासी आणि आदिम जमातींच्या भाषा, संस्कृती आणि चालीरीतींचा त्या अभ्यास करत. आदिवासींच्या पारंपरिक उपजीविकांचा अपहार सरकार तसंच खाजगी क्षेत्र राजरोस करत असतात. त्यातून निर्माण होणाऱ्या हिंसेचा शोध त्या घेत असत. या सरकारप्रणीत हिंसेविरोधात संघर्ष करण्याची निकड त्यांना वाटायची. अशा आंदोलनांमध्ये त्या सक्रिय असायच्या. या चिंतनातून निपजलेलं त्यांचं लेखन लखलखीत आहे. 

‘श्री श्री गणेश महिमा’ या त्यांच्या कादंबरीत बिहारमधल्या एका गावाची कहाणी आहे. विसाव्या शतकाचा काळ असूनही हे गाव मध्ययुगाच्या अंधाऱ्या काळात वावरतं. भारत सरकारचं शासन तिथं अस्तित्वाच नाही. वरच्या जातीच्या राजपूतांचा अधिकार तिथं चालतो. खालच्या जातीतील स्त्री-पुरुषांनी कधी गुलाम, कधी वेठबिगार, कधी भूमिहीन मजूर तर कधी रखेल व्हायचं, हे राजपूतच ठरवतात.

या पुस्तकानंतर आदिवासींनी त्यांना आपलंसं मानलं.

राजापूर तालुका सध्या आंदोलनांनी गाजतोय. जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील आंदोलनं थंड झालेली नसताना तालुक्यातील अणसुरे गावाजवळ तेलशुद्धी प्रकल्प येऊ घातलाय. गावातील नागरिक सतत मोर्चे काढून आपला विरोध दर्शवत आहेत. पण आडगावातील या आंदोलनांना म्हणावी तशी प्रसिद्धी मिळत नाही. हे दोन्ही प्रकल्प राजापूरची खाडी, बेटं आणि परिसंस्थेवर परिणाम करणार हे निश्चित.

दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘कॉर्न आयलंड’ नावाचा जॉर्जियन सिनेमा पाहिला होता. जॉर्जियाच्या इंगुरी नदीला दर वसंत ॠतूत भरती येते आणि भरतीच्या प्रवाहामुळे काही बेटं तयार होतात. अशा एका बेटावर मक्याचं पीक घेण्यासाठी एक आजोबा आपल्या चौदा वर्षांच्या नातीसह दाखल होतात. ही नदी जॉर्जिया आणि अबकाझिया या दोन्ही देशांच्या सीमेवर आहे.

आजोबा नातीची जोडी लाकडांच्या ओंडक्यांची झोपडी तयार करतात, मका पेरतात, पाण्यात पाय सोडून मच्छिमारी करतात, शेकोटीवर मासे भाजतात आणि जेवतात. हे सारं मूकपणे होतं. संवादांची जरुरी भासत नाही. मक्याची पेरं वर येतात, वाढतात आणि कणसात दाणा धरतो. या दरम्यान मुलीची पाळी सुरू होते. सारे व्यवहार आणि क्रिया निसर्गचक्राप्रमाणेच होत राहतात.

समोरच्या किनाऱ्यावरील सैन्यातळातील एक ऑफिसर आपल्या दुर्बिणीतून या आजोबा नातीचं नेहमी निरीक्षण करत असतो. नातीच्या हालचालींवर त्याचं विशेष लक्ष असतं. जॉर्जिया आणि अबकाझियाच्या सैन्यातील सीमागस्तीचे शिपाई प्रचंड आवाज करणाऱ्या बोटींतून सारखी ये-जा करू लागतात, मुलीची सतत टेहळणी करू लागतात आणि या नि:शब्द परिसंस्थेवर ओरखडा उमटतो. त्या नंतर जोरदार सरी येतात आणि मक्याचं पीक भिजतं, ओंडक्यांची झोपडी मोडकळीस येते. आजोबा आणि नात नि:शब्दपणे निसर्गाचं हे थैमान बघत राहतात.

पाणी, बेट, माणूस आणि समुद्री परिसंस्था यांच्यात ताळमेळ असतो याचं प्रत्यंतर जुवे बेटात येतं. ही नाळ तुटली तर कहर होऊ शकतो याचा उच्चार महाश्वेतादेवींनी वेळोवेळी केला होता.

(‘पंचायत भारती’च्या मार्च २०१८च्या वर्षारंभ अंकातून साभार)

.............................................................................................................................................

लेखिका अलका गाडगीळ मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.

alkagadgil@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......