.............................................................................................................................................
या लेखाच्या पूर्वार्धासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/1935
.............................................................................................................................................
समाजमाध्यमे आणि ट्रम्प-ब्रेग्झिट काळ
२०१४ची भारतातील निवडणूक (किंवा केजरीवाल वा नीतिश कुमार यांची निवडणूक) ही समाजमाध्यमांच्या व तंत्रज्ञानाच्या जोरावर लढवल्याचे व जिंकल्याचे भारताने पाहिले. मात्र त्यात वापरण्यात आलेली बहुतांश पद्धत ही वर चर्चिलेली ‘ओबामा-काळ’ पद्धती होती जी तोवर काहीशी परिचित झाली होती. आपल्या जनतेला ती नवी असली, तरी त्या क्षेत्रातील जाणकारांना ती आधीपासूनच परिचित होती. मात्र त्यानंतर झालेल्या ट्रम्प-क्लिंटन लढतीत (व काही अंशी ब्रेग्झिट लढतीत) अनेक बाबतीत बदल झाले. नुकत्याच गाजत असलेल्या केंब्रिज अनलेटिका या ब्रिटीश कंपनीच्या ‘विदा चिकित्सेच्या’ (डेटा अनलिटिक्स) पद्धतींनी ओबामा पद्धतीला कैक योजने मागे सारले. आता आपण ट्रम्प-क्लिंटन लढतीसोबत आलेल्या नव्या मार्गांची ओळख करून घेऊ या.
फेसबुक, गूगल आदी माध्यमे ओबामा-काळापेक्षा ट्रम्प-काळात कितीतरी अधिक प्रगत झाली आहेत. शिवाय हे तंत्रज्ञान नवे तर राहिले नाहीच, पण महागही न राहिल्याने नगरसेवक पातळीच्या उमेदवारानांही ते वापरता येते. भारतातही ते वापरले जाऊ लागले आहे. आता नगरसेवकांचे फेसबुक पेज असते, ते नियमित अद्ययावत होते. पुण्यातील एका नगरसेवकाचे तर एक उपयुक्त मोबाईल अॅप आहे. क्लिंटन- ट्रम्प यांच्या लढतीसाठी इतका मूलभूत आणि साधा विदा असणारे तंत्रज्ञान पुरेसे नव्हते.
ही लढाई तीन प्रतलांवर लढली गेली.
अ. तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य तो मतदार गाठणे आणि तो मतदानाला बाहेर पडेल याची तजवीज करणे
ब. तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपरिक ‘मीडिया’वर आपले वर्चस्व राखणे
क. प्रतिस्पर्ध्याचा विदा आणि धोरण तंत्रज्ञानाच्या मदतीने समजून घेऊन वा मिळवून त्याच्याहून चार पावले पुढे असणे
अ. तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य तो मतदार गाठणे आणि आपल्याला हवा तो मतदार मतदानाला बाहेर पडेल याची तजवीज करणे
हिलरी क्लिंटन यांनी डझनाहून अधिक ‘डेटा इंजिनियर’ केवळ मतदारांची विभागणी करण्यासाठी ठेवलेले होते. जिल्हावार किंवा शहरवार नव्हे, तर प्रत्येक मतदाराचे विश्लेषण केले गेले. ते करण्यासाठी फेसबुकपासून गूगलपर्यंत सर्व आणि इतरही शक्य त्या प्रकारे विदा विकत घेतला गेला (प्रसंगी चोरला गेल्याचा संशयही अनेकांनी व्यक्त केला). नक्की कोणत्या भागात किती प्रचार करायचा, तिथे काय बोलायचे, किती ठासून बोलायचे, कोणाशी हात मिळवायचे(च), कोणाला अनुल्लेखाने मारायचे इथपासून कोणत्या रंगाची लिपस्टिक वापरायची, कपडे काय घालायचे इथपर्यंत अनेक बाबी हा विदा वापरून ठरवल्या गेल्या. इथपर्यंत हे ओबामा-काळाशी सुसंगतच म्हणायला हवे. मात्र या वेळी जो विदा वापरला गेला, तो मिळवण्याची पद्धत आणि त्याचे प्रमाण प्रचंड अधिक होते. क्लिंटन या आडनावाबद्दल लोकांना असलेले प्रेम आणि त्याबद्दल लोकांच्या असलेल्या तक्रारी यांचे गणित करून क्लिंटन यांना न चुकता बहुतांश वेळी ‘हिलरी’ असे संबोधले गेले. नेमक्या त्याच कारणासाठी ट्रम्प मात्र त्यांना अनेकदा ‘मिसेस क्लिंटन’ असे संबोधत असत. हिलरींचे ‘#ImWithHer’ हे ‘हॅश टॅग कॅम्पेन’ खूप वेगाने पसरले, कारण त्यात त्यांचे नाव न वापरता एकूणच स्त्रीजातीचे संबोधन - ‘her’ - वापरले गेले होते. अशा प्रत्येक बारीकसारीक बाबीबद्दलचा निर्णय हा जमवलेला विदा आणि त्याचे शक्य तितके अचूक विश्लेषण यांच्या आधारावर घेण्यात आला.
दुसरीकडे ट्रम्प यांनी विदा-विश्लेषणामधला (डेटा अॅनॅलिसीस) मोठा भाग विदा-वर्गीकरणासाठी (डेटा क्लासिफिकेशनसाठी) केंद्रित केला होता असे आता स्पष्ट होत आहे. सोशल मीडिया, क्रेडिट कार्ड हिस्टरी, आजपर्यंत किती वेळा मतदान केले आहे, खरेदीच्या नोंदी, कोण काय खरेदी करते, कोणत्या सुपर मार्केटबद्दल कोणाला अधिक जवळीक आहे इत्यादी माहिती; प्रत्यक्ष फोनकॉल्समधून, फेसबुक सर्वेक्षणातून मिळालेला विदा, टीव्ही बघण्याच्या सवयींसारखा विदा, हे व अशासारखे तब्बल ४०० वेगवेगळे निकष वापरून हरेक मतदाराचे विश्लेषण करण्यात आले व सर्व मतदारांचे २० प्रकारच्या मतदारांमध्ये वर्गीकरण केले.
ट्रम्प नुसते विदा वर्गीकरण करून थांबले नाहित, तर असे जालावरच्या काही लेखांत सापडते की ‘मून शॅडो मोबाईल’ या कंपनीसोबत ट्रम्प यांनी हातमिळवणी केली व रिपब्लिकन पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याकडे असले पाहिजे असे एक ‘डेटा व्हिज्युअलायझेशन अॅप’ विकसित केले. त्याचा या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठा फायदा झाला. आपल्याला सोयीचा मतदार कुठे राहतो याचीही माहिती मिळवणे या अॅपमुळे शक्य झाले. त्यामुळे नक्की कोणत्या घरात जाऊन किती व कसा प्रचार करायचा आहे व करण्यात काही फायदा आहे का इथपासून ते मतदानाच्या दिवशी नक्की कोणत्या घरातील लोकांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन यायचे इथपर्यंत सगळी माहिती कार्यकर्त्यांना दार ठोठावायच्याही आधी मिळत होती. तेथील अभिप्राय ताबडतोब मुख्य प्रचार डेटाबेसमध्ये पाठवायची सोयही होती.
उदा. याच अॅपचा वापर करून ‘रस्ट बेल्ट’ म्हटल्या जाणाऱ्या राज्यातील अनेक वयस्कर मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणले गेले. यापूर्वी हे मतदार मतदान करत नसत. त्यात भर म्हणजे ते एकगठ्ठा नव्हते, तर विखुरलेले होते. त्यामुळे त्यांची मते गुलदस्त्यात होती. पण त्यांच्या वेगवेगळ्या सवयी, आवडी, वर दिलेल्या अनेक घटकांचा अभ्यास यांच्या आधारे त्यांपैकी आपल्या बाजूचे कोणते असावेत याचा अभ्यास ट्रम्प यांच्या प्रचार संघाने केला व आपल्याला मिळू शकणारे एकेक मत कसे नोंदवले जाईल याची तजवीज केली गेली.
ब. तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपरिक ‘मीडिया’वर आपले वर्चस्व राखणे
ओबामा-काळात सोशल मीडियासोबतच पारंपरिक मीडियावर मुलाखती देणे, तेथे होणाऱ्या ‘प्रेसिडेन्शियल डिबेट्स’ना महत्त्व देणे, भाषणे व जाहिराती इत्यादींचा मारा करणे चालू असायचे. मात्र ट्रम्प यांनी काळाची नस ओळखत पारंपरिक मीडियाच्या घटत्या प्रभावाची दखल घेतली व त्याचा व्यवस्थित वापर करून घेतला. ‘सोशल मीडिया’च्या वाढत्या ताकदीवर त्यांनी लक्ष दिलेले दिसते.
इथे पारंपरिक मीडियाच्या वार्तांकनाच्या पद्धतीत झालेला बदल समजून घेणे गरजेचे आहे. आपले पत्रकार, वार्ताहर वेगवेगळ्या ठिकाणी पाठवणे, किंवा तिथल्या स्थानिक सूत्रांकडून माहिती मिळवणे आणि मग त्या माहितीचे वार्तांकन, संपादन, आणि प्रसारण करणे असा प्रकार साधारणतः गेल्या दशकभरापर्यंत असे. टेलिकॉमचे जाळे वाढल्यावर बातमी लवकरात लवकर लोकांना मिळू लागली. टीव्ही आल्यावर व तंत्रज्ञान बदलल्यावर कित्येकदा थेट (लाइव्ह) वार्तांकन होऊ लागले. पण या सगळ्यात पत्रकार, कॅमेरामन व/वा स्थानिक व्यक्ती यांच्या माध्यमातून पारंपरिक मीडिया आपले जाळे विणत असे व त्यामार्फत काम करत असे. ज्या वृत्तसंस्थेचे जाळे मोठे व तंत्रज्ञान प्रगत, ती वृत्तसंस्था महाग असे.
मात्र सोशल मीडियाच्या आगमनानंतर हे चित्र बदलू लागले. लोक स्वतःच बातम्या शेअर करू लागले. अनेक घटनांचे व्हिडियो जालावर सहज मिळू लागले. त्यासाठी खास चित्रीकरणाची गरज कमी होऊ लागली. त्याचबरोबर या मानवी जाळ्यावरील अवलंबित्व कमी होऊ लागले. सोशल मीडियावर येणाऱ्या माहितीला पकडू शकणारे तुमचे ‘अल्गोरिदम’ पुरेसे सक्षम असले, तर ऑफिसमध्ये बसल्याबसल्या बातम्या तयार करणे कठीण राहिले नाही. मात्र हे इथेच थांबले नाही. ‘हॅश टॅग’द्वारे किंवा किती लोक बातमीवर ‘क्लिक’ किंवा ती शेअर करताहेत या माहितीच्या आधारे लोकांना नक्की कोणती माहिती वाचायची आहे, लोकांचे त्याबाबतीत मत काय, लोकांना कोणती बातमी आवडते आहे, हेही वृत्तसंस्थांना सहज समजू लागले. सोशल मीडियावरून मिळवलेली अशा प्रकारची, सध्याची लोकप्रिय बातमी ही मथळ्याची जागा घेऊ लागली. काही साक्षेपी संपादक सोडले, तर - अमेरिका असो वा भारत - महत्त्वाची बातमी कोणती हे देशातील बहुसंख्यांमध्ये असलेल्या त्या बातमीच्या लोकप्रियतेवरून ठरू लागले. सोशल मीडियाचे स्वत:चे असे फायदे-तोटे दोन्ही आहेत. हा बदल पारंपरिक मीडियाला त्यांचा बातमी मिळवण्यासाठी होणारा खर्च कमी करण्यासाठी उपयुक्त ठरला. पण त्यामुळे त्यांचे सोशल मीडियावरील अवलंबित्व वाढले.
ही परिस्थिती ट्रम्प (आणि ब्रेग्झिटकार) यांनी अधिक नेमकी ओळखली. ट्रम्प आणि त्यांचे समर्थक हे दोघेही इतक्या मोठ्या प्रमाणावर ट्विटर वापरत होते, की ‘ट्विटर कँडीडेट’ म्हणून त्यांची हेटाळणीही करून झाली. पण त्यांच्या या धोरणाचा फायदा दिसून आला. म्हणूनच बहुतांश पारंपरिक मीडियातील ‘जुने – जाणिते’ लोक विरोधात असूनही, सोशल मीडियावर लक्ष केंद्रित करून ट्रम्प आणि ब्रेग्झिटकार जिंकू शकले. ट्रम्प यांची तीनही पारंपरिक ‘प्रेसिडेन्शियल डिबेट्स’मधली कामगिरी हिलरीपेक्षा सुमार असेलही; पण त्याचा प्रभाव सोशल मीडियावरील प्रचारापुढे कमी पडला. माध्यमांमधल्या मथळ्यात जागा मिळवण्याच्या स्पर्धेतही दोन्ही पक्ष याच सोशल मीडियाचा वापर करत होते. याच स्पर्धेसाठी या निवडणुकीत ‘बॉट्स’चा सढळ हस्ते वापर झाल्याचे बोलले जाते. बॉट्स म्हणजे कृत्रिम वापरकर्ते (व्हर्ज्युअल यूजर्स). फेसबुक वा ट्विटरवर जो हॅश-टॅग वेगात पसरत असतो, तो अधिकाधिक लोकांना दिसतो. त्यांनी तो शेअर अथवा लाईक केला की, त्यांच्या मित्रयादीतील लोकांनाही तो सतत दिसत राहतो. अशा वेळी आपल्याला हवी ती बातमी मीडियात वर राहावी, चर्चेत राहावी यासाठी तिला अधिकाधिक लोकांनी वाचणे किंवा शेअर केलेले असणे गरजेचे ठरते. बॉट्सचा वापर ओबामा-काळातच सुरू झाल्याचे सांगितले जाते. मात्र ट्रम्प लढाईत त्याची दखल घ्यावी इतक्या प्रमाणात त्याचा वापर झाला. असे म्हटले जाते की गुजरात निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळी आपल्याकडेही बॉट्सचा वापर झाला. पण अशा वृत्ताला आधार कोणी दिलेला नाही
क. प्रतिस्पर्ध्याचा विदा आणि धोरण तंत्रज्ञानाच्या मदतीने समजून घेऊन वा मिळवून त्याच्या पुढे चार पावले राहणे
या पातळीवर लढल्या गेलेल्या लढाईचे फारसे तपशील आपल्यासारख्या सामान्यांच्या हाती लागत नाहीत. विदा चोरणे, एकमेकांचे कच्चे दुवे शोधणे, योग्य त्या वेळी योग्य ती बातमी रुजवणे वगैरे पारंपरिक पद्धतीच्या खेळी तर खेळल्या गेल्याच (१९७२ सालचे वॉटरगेट प्रकरण अनेकांना आठवले असेलच); त्याचबरोबर ‘परकीय शक्तींच्या हाता’चीही खूप चर्चा झाली. रशियाने डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीच्या (डीएनसी) विदागारावर हल्ला केलाय असे जेव्हा सांगितले गेले, तेव्हा मात्र अनेकांची झोप उडाली. मात्र १९७२ आणि २०१६ मधील फरक हा, की या वेळी ट्रम्प यांनी “असे काही झाले असेल, तर हिलरीने लपवलेली व खाजगी ईमेलवरून पाठवलेली ‘ती’ पत्रेही त्यांच्या हाती असतील” अशी आशा व्यक्त केली. हे खरोखर घडले का? घडले असल्यास ट्रम्प
यांच्या कँपेनला नक्की किती माहिती मिळाली? तिचा काय आणि कसा उपयोग झाला? या बाबी इतक्या लगेच समोर येणे अशक्य आहे.
आता पुढे काय?
भारतात इतर सोशल मीडियाच्या बरोबरीने ‘व्हॉट्सअॅप’ हा प्रकारही खूप मोठी जागा व्यापून आहे. भारतात असलेल्या स्मार्ट फोन्सपैकी ९० टक्क्यांहून अधिक फोन्सवर हे अॅप आहे असे म्हटले जाते. यात अधिकची गुंतागुंत अशी, की गेल्या वर्षीपासून या अॅपमधून एकमेकांना धाडली जाणारी कोणतीही माहिती - डेटा - कोणत्याही सर्व्हरवर साठवूनच ठेवला जात नाही. (अर्थात हे प्रत्येकाच्या निवडीवरही अवलंबून आहे.) त्यामुळे त्या अॅपद्वारे होणारा प्रचार, प्रसार आणि त्याचा जनमानसावरील परिणाम यांचा विदा अभ्यासासाठी इतक्या सहज उपलब्ध नसेल. मात्र या प्रकाराचा आवाका आणि घराघरातील त्याचे स्थान बघता येणाऱ्या निवडणुकांमध्ये - आणि त्यासाठीच्या प्रचारामध्ये - या माध्यमाचा वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे हे नक्की. येणाऱ्या भारतीय निवडणूकांमध्ये फेसबुक, ट्विटर यापेक्षा व्हॉट्सॲप या माध्यमावर पकड मिळवणाऱ्या उमेदवाराला विजयाची अधिक संधी असेल असे मला वाटते
नुकत्याच बाहेर येत असलेल्या बातम्यांवरून इतके तर सगळ्यांनाच पटले असेल की, तर खाजगी विदा (तुमची - आपली प्रत्येकाची - माहिती, कल, आवडी ही माहिती) अतिशय मूल्यवान झाला आहे. फेसबुक व काही भारतीय कंपन्यांनी मिळून नेट न्युट्रॅलिटीला धाब्यावर बसवत, ‘फ्री बेसिक्स’ म्हणताना प्रत्यक्षात आपल्याला विदा मिळणे सोपे जाईल अशा आशेने इंटरनेटचा वापर ‘विनामूल्य’ करून देण्याचा घाट आठवत असेलच. या विनामूल्य गाजराच्या माध्यमातून अगदी खेडोपाडीच्या लोकांचीही माहिती मिळवण्याची बहुराष्ट्रीय कंपन्यांची ही खेळी काही लोकांच्या सजगतेमुळे फसली. मग काही दुनियेला मुठीत घेणाऱ्यांच्या कंपन्यांनी यावर उपाय म्हणून काही ठरावीक साईट्सच नव्हेत, तर अख्खे इंटरनेटच मोफत दिले होते. या योजनेत फक्त त्या-त्या कंपन्यांचेच सिमकार्ड फोनमध्ये प्रायमरी कार्ड म्हणून बसवले जाते. त्यानंतर त्या फोनमध्ये तुमचे खाजगी असे काहीही राहत नाही. भारतातील खेडोपाडी हे ‘फ्री इंटरनेट’ चांगले आठ-नऊ महिने (वा त्याहूनही अधिक काळ) वापरले गेले. आजवर कोणाच्याही हाती न लागलेला विदा त्याद्वारे कंपन्यांच्या हाती लागला आहे. त्याचा वापर या कंपन्या अचूक जाहिरातींसाठी करतील. मात्र निवडणुका येताच या विद्याचा वापर ‘योग्य ते सल्ले’ देण्यासाठी सल्लागार करतील याविषयी आता शंका घेण्यासारखी परिस्थिती नाही. मग त्यांच्या सल्ल्यावरून येत्या निवडणुका कशाच्या आधारावर खेळल्या जाव्यात हे ठरेल.
प्रत्येकाला आपल्या आवडीच्या लोकांत राहायला, त्यांच्याशी मैत्री करायला व आपला एक ‘कंपू’ बनवायला आवडते. ती नैसर्गिक प्रेरणा आहे. आपल्या आवडींच्या घटकांनी युक्त असा बुडबुडा स्वतःभोवती निर्माण करणे सोशल मीडियापूर्व काळातही चालू होते. मात्र सोशल मीडियाने आपली ती अंतःप्रेरणा ओळखत, त्यावर स्वार होत, आता आपल्या भोवतीच्या बुडबुड्यातच आपण कसे रममाण राहू याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. फेसबुकचा नवा अल्गोरिदम तुमचा कल ओळखतो व तो कल असलेल्या पोस्ट्स तुम्हांला प्राधान्याने दाखवतो. त्यामुळे तुमच्यापर्यंत विरोधी मते जवळपास पोचतच नाहीत असे म्हटले तरी चालेल. तुम्ही नकळत एकारलेले विचार करू लागता. हे इथवर थांबणार नाही. येत्या काळात तुमच्या आवडीनुसार व कलानुसार तुम्हांला दिसणाऱ्या बातम्याही वेगळ्या असतील. एखाद्या कट्टर भाजपा समर्थकाला मोदींचे गुणगान गाणारी बातमी मथळा म्हणून दिसेल, तर त्याच्या कट्टर विरोधकाला नेमकी विरुद्ध बातमी मथळ्याच्या जागी दिसेल. तुम्ही पुरेसे सजग नसाल, तर काही काळातच तुम्हाला भासणारे सत्य हेच अंतिम सत्य आहे यावर तुमचा विश्वास बसेल व तुम्ही त्याच बुडबुड्यात तरंगत राहाल याची व्यवस्था सोशल मीडिया करेल. ट्रम्प-विजयानंतर अनेकांना जो धक्का बसला, त्यामागेही हाच बुडबुडा होता आणि गेल्या काही वर्षांत जगभरातील लोकांत जे एकारलेपण उदयाला आले आहे, त्यातही या सोशल मीडिया निर्मित बुडबुड्याचा मोठा हात आहे. हा बुडबुडा त्या एकारलेल्या विचारांना पूरक आहे, त्यांचा वेगवान प्रचारक आहे.
येत्या दिवसांत ‘सर्वत्र छान चालले आहे’ की ‘सर्वत्र खूप समस्या आहेत’ याचे नेमके उत्तर मिळवणे अधिकाधिक कठीण होत जाणार आहे. ‘अच्छे दिन’ आले आहेत हे भासवण्यापासून ‘अच्छ्या दिनां’चा मागमूसही नाही असे भासवण्यापर्यंत काहीही सुयोग्य नियोजनाच्या माध्यमातून सहज शक्य आहे. मात्र यावर उपाय जालावर न जाणे हा नाही. कारण तुम्ही जात नसलात, तरी बहुतांश व्यक्ती (मतदार) हे माध्यम वापरत आहेत. म्हणूनच सहज व फुकट माहितीचा धबधबा ओतणाऱ्या सोशल मीडियाच्या बरोबरीने प्रत्यक्ष अनुभव घेत आपली सारासार विचारशक्ती वापरू शकणाऱ्या - सध्या अल्पसंख्य असणाऱ्या - व्यक्तींच्या संख्येमध्ये वाढ होणे गरजेचे आहे. त्यासाठी तंत्रज्ञान सोडून किंवा “फेसबुक काय कळत नाही बॉ!” किंवा “शी बाई! ही कसली फॉरवर्ड्स!” असे म्हणत नाक मुरडून नव्हे; तर ते तंत्रज्ञान व त्याचा परिणाम समजून घेऊन चांगल्या, शहाण्या मार्गासाठी त्याच तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नवी झुंज देणे अत्यावश्यक आहे. व्हॉट्सअॅप फॉरवर्ड्सपासून ते भडक फेसबुक मीम्सपर्यंत प्रत्येक गोष्टीला आपले म्हटले नाही, तर हे अल्पसंख्य शहाणे लोक नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. येत्या काळात हे तंत्रज्ञान मानवी मनापेक्षाही शिरजोर ठरू पाहणार आहे. ज्याची तंत्रज्ञानावर पकड असेल, तोच सत्तेचा पारधी असेल. अशा काळात सुबुद्धांनी यापासून दूर न राहता, त्याला आपलेसे करून त्यावर आपली मांड लवकरात लवकर पक्की करावी हे बरे!
.............................................................................................................................................
लेखक ऋषिकेश मल्टिनॅशनल आयटी कंपनीमध्ये कार्यरत आहेत.
rushimaster@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment