‘लीळा पुस्तकांच्या’ : समाजाकडे, संस्कृतीकडे, स्वत:कडे बघण्याची एक खिडकी (पूर्वार्ध)
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
नितिन भरत वाघ
  • ‘लीळा पुस्तकांच्या’ या नीतीन रिंढे यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 30 March 2018
  • ग्रंथनामा Granthnama बुक ऑफ द वीक Book Of the Week लीळा पुस्तकांच्या Leela Pustakanchya नीतीन रिंढे Nitin Rindhe पुस्तकांविषयीची पुस्तकं Book on Books लोकवाङ्मय गृह Lokvangmaya Grih

जुनी गोष्ट आहेय, मी चार पाच वर्षाचा असतानाची, साधारण १९८०-८१ची. तो असा काळ होता, जेव्हा महिन्यातून एकदाच किराणा भरला जायचा, म्हणजे आमच्या घरी तरी. आणि त्या काळी पार्ले जी बिस्किटं आज जशी कुत्र्यांना खायला घालायची बिस्किटं झालीयेत, तशी तेव्हा नव्हती. तर जेव्हा महिन्याचा किराणा भरला जायचा, तेव्हा हमखास कमीत कमी एक पार्ले जी बिस्कीटचा पुडा घरी यायचा. थोडक्यात सगळ्यासाठी महिन्यात एक बिस्कीटचा पुडा. त्यातून वाट्याला एक किंवा कधी तरी जास्तीत जास्त दोन बिस्किटं यायची. मग ते बिस्कीट हातात उभं धरून हळूहळू कातरत पुरवून पुरवून खायचं, लवकर संपायला नको म्हणून. अप्रतिम चव, अजूनही जिभेवर रेंगाळणारी. ती चव आणि बिस्कीट एकदम आठवलं, नीतीन रिंढे यांचं ‘लीळा पुस्तकांच्या’ हे पुस्तक हातात घेतल्यावर. सवयीनं पुस्तक उघडून त्याचा वास घेतला मनसोक्त, तो वास थेट बालपणातल्या बिस्किटाजवळ घेऊन गेला आणि पहिल्याच भेटीत या पुस्तकानं ‘नॉस्टॅल्जिक’ केलं. मग तातडीनं लक्षात आलं हे पुरवून पुरवून खायचं ‘बिस्कीट’ आहे. छाती भरून श्वास घेऊन पुस्तक वाचायला सुरुवात केली कारण पुस्तकातून अनेक नवे जुने मैत्र भेटणार होते, त्यांना पुरेपूर वेळ द्यायचा होता. ‘लीळा पुस्तकांच्या’ हे पुस्तकांविषयीचं पुस्तक, पुस्तकांशी अपार सख्य असणार्‍या लेखकानं लिहिलेलं. माझ्यासाठी आनंदाची बाब म्हणजे मी या पुस्तकातला पूर्व प्रकाशित एकही लेख वाचला नव्हता, थेट पुस्तकच हातात आलं, नाही तर येणार्‍या पुढच्या लेखाची वाट बघत जीव गेला असता.

‘लीळा पुस्तकांच्या’ निमित्तानं पुस्तकांचाच विचार करायचा आहे. पण ‘पुस्तक’ म्हणजे नेमकं काय? पुस्तक कशाला म्हणायचं? जर पुस्तकाची व्याख्या करायची झाली तर कशी करणार? विविध शब्दकोशांत पुस्तक शब्दाचा अर्थ लिखित संहिता जी मुद्रित किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रकाशित केली जाते किवा छापील कागदांची कव्हरसह बांधणी असा अर्थ सांगितला आहे आणि शास्त्रीय व्याख्या तर उपलब्धच नाही. तर पुस्तकाची नेमकी नाही तरी एक व्याख्या ‘थ्री इडीयटस’ या सिनेमात सांगितलेली आहे. ती जशीच्या तशी – “Instruments that record, analyze, summarize, organize, debate and explain information; that are illustrated, non-illustrated, hardbound, paperback, jacketed, non-jacketed; with foreword, introduction, table of contents, index, that are intended for the enlightenment, understanding, enrichment, enhancement and education of the human brain through sensory route of vision – sometimes touch.” विनोदी म्हणून सांगितली असली तरी पुस्तकाची एक व्याख्या तरी या सिनेमात उपलब्ध करून दिली आहे.

‘लीळा पुस्तकांच्या’ पुस्तकाची प्रस्तावना – ‘विषयांतर : अर्थात, महाराष्ट्रीयांच्या पुस्तक संस्कृतीवर दृष्टिक्षेप’ ही वन ऑफ द बेस्ट आहे. अत्यंत अभ्यासपूर्वक आणि संशोधनात्म. मेहनत घेऊन लिहिलेली. या प्रस्तावनेचं मला जाणवलेलं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ती मराठी समाज आणि संस्कृती समजण्यासाठी एक निश्चित विधान करते आणि कोणताही समाज समजून घेण्यासाठी पुस्तकांना एक परिमाण (एकक) म्हणून प्रस्थापित करते. जी अत्यंत महत्त्वाची उपलब्धी आहे. या परिमाणाला पायाभूत समजून ‘लीळा पुस्तकाच्या’ या पुस्तकाकडे पाहायला हवं, म्हणजे हे पुस्तक किती महत्त्वाचं आहे ते लक्षात येईल.

केवळ पुस्तकाविषयीची पुस्तकांची ओळख एवढ्यापुरताच हे पुस्तक मर्यादित नाही तर, त्याच्या अनुषंगानं सांस्कृतिक, इतिहास, सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीचा वेध घेत योग्य त्या ठिकाणी ‘संतुलित’ भाष्य करते (‘संतुलितपणा’ हा या लेखांचा एक लक्षणीय गुणधर्म आहे). एखाद्या समाजाच्या पुस्तक संस्कृतीचा वेध घेत कशा प्रकारे त्या समाजाच्या अंतरंगात शिरून त्याला समजून घ्यायला मदत होऊ शकते किंवा असं म्हणता येईल पुस्तक संस्कृती समजून घेतल्याशिवाय एखाद्या समाजाचं आकलन होऊ शकत नाही, (किंवा) झालं तर अर्धवटच होईल.

इथं पुस्तक संस्कृती हे एक समाजशास्त्रीय परिमाण सिद्ध होतं. केवळ एक पुस्तक वा एक लेखकदेखील संपूर्ण समाजाचं मानस मांडू शकतो (उदा., शेक्सपिअर). तो समाज कसा विचार करतो, त्याची श्रद्धास्थानं काय, तो कुणाचा तिरस्कार करतो, हे सगळं एक पुस्तक समर्थपणे करू शकतं.

भारताचं, विशेषतः महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं झाल्यास – काही वर्षापूर्वी कोणतं पुस्तक सगळ्यात जास्त विकलं जातं याचा जगभरात आढावा घेण्यात आला होता. तर भारतात आणि महाराष्ट्रात हिटलरचं आत्मचरित्र ‘माइन काम्फ’ हे सर्वांत जास्त विकत घेतलं जाणारं पुस्तक आहे असं लक्षात आलं. जे पुस्तक वाचणं बहुतेक युरोपियन देशात विकृती समजलं जातं, ते पुस्तक वाचल्यानंतर तत्कालीन अनेक समीक्षकांनी हिटलरला मनोरुग्ण ठरवलं होतं, बहुतेक देशात ज्यावर अघोषित बंदी घातलेली आहे ते पुस्तक भारतात बेस्टेस्ट सेलर आहे! यावर सर्वेक्षणाच्या अभ्यासकांनी या पुस्तकाच्या भारतात होणाऱ्या खपाबद्दल थेट चिंता व्यक्त केली होती. विकृत समजलं जाणारं पुस्तक बेस्टसेलर ठरावं, हे कोणत्या मानसिकतेचं लक्षण आहे? ही चिंता अधिक गंभीरपणे घ्यावी लागते जेव्हा ‘माईन काम्फ’ची तुलना ‘बायबल’ किंवा ‘कुराण’ सोबत केली जाते. याबाबत एक महत्त्वाचं कोटेशन नीतीन रिंढे यांनी दिलं आहे. ज्यात समाजाचं सभ्य असणं अनेकदा केवळ बाह्यावरण ठरू शकतं. या अनुषंगानं भारतीय समाजाचं मूल्यमापन आपण कसं करू?

“People who have read just one book – be it the Bible, the Koran, or Mein Kamp – are the fiercest of fanatics in their religious or political beliefs. But there is also a problem if we look at the overall effect of literature on a person. Take the Germans : history tells us they are among the most cultured of peoples. They have world famous writers; they’re a nation of readers. But Goethe, Schiller, Herder, Lessing, Heine, and Kant notwithstanding, Germany was the birthplace of Nazism, the death camps, the extermination of Jews and other ‘interior races’. The fact that they read these authors, that they were educated in a spirit of humanism, was no obstacle to their descent Barbary.”

भारतीय लोकांसाठी हा एक प्रकारचा इशारा नाहीये का? माणूस सातत्यानं स्वत:ला त्याच्यात असणाऱ्या पशुतून मुक्त होण्यासाठी प्रयत्नरत आहे. मात्र तो सेपियन्स प्रजातीतून कायमस्वरूपी नष्ट होणार नाही. पुस्तकं या पशुला माणसाळवण्याचं काम करतात, पण तीचं पुस्तकं कधी कधी त्या पशूला ‘मोकळं’ करण्याचंही काम करतात. ‘बायबल’, ‘कुराण’ आणि ‘माइन काम्फ’ या पुस्तकांनी केलेली हिंसा कोणत्याही महायुद्धापेक्षा जास्त ठरेल. केवळ ‘बायबल’मध्ये सांगितलेल्या गोष्टी खोट्या ठरवल्यामुळे मध्ययुगात किती कलावंत, शास्त्रज्ञ आपल्या प्राणाला मुकले, कित्येकांनी (अगदी गॅलिलिओसकट) आपल्या उमेदीची किती वर्षं तुरुंगात खितपत घालवली, याची मोजदाद करणं अशक्य आहे. ‘बायबल’ आणि ‘कुराण’ या दोन धर्मग्रंथानी दाखवून दिलंय की, ग्रंथ ही सत्ता प्राप्त करण्याची आणि राबवण्याची साधनं असतात. त्यांना आव्हान देणाऱ्या पुस्तकांना नष्ट करणं ही सत्ता टिकवण्याची गरज असते, तेव्हा कोणताही मुलाहिजा न बाळगता त्यांना नाहीसं केलं जातं.

फक्त ही दोनच उदाहरणं का? भारतातही असा ‘मनुस्मृती’नामक विकृत, जुलमी ग्रंथ हजारभर वर्षं तरी लोकांचं जगणं हराम करतच होता की! ‘मनुस्मृती’ या पुस्तकानं केलेली हिंसा ‘बायबल’, ‘कुराण’ व ‘माइन काम्फ’ या ग्रंथांनी केलेल्या एकत्रित हिंसेपेक्षा अधिक भरेल. अशा ग्रंथाला प्रतीकात्मकरित्या का असेना नष्ट करणं समाजाला मुक्त करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं, हे बाबासाहेब आंबेडकर यांना स्पष्ट माहीत होतं म्हणून त्यांनी ‘मनुस्मृती’ जाळली. दुर्दैवानं आजही भारतीय समाजाचा एक हिस्सा या ग्रंथाचा गुलाम आहे. पुस्तकं कशा प्रकारे समाजाचं मोजमाप करणारी साधनं असतात, याहून चांगलं कसं ठरवणार? या सगळ्यांचा एकत्रित विचार केला तर ‘पुस्तकं’ परिमाण म्हणून कोणती समाजाशास्त्रीय भूमिका बजावतात, हे पुरेसं स्पष्ट व्हावं. मराठी भाषेपुरता विचार करायचा झाल्यास या परिमाणाचं वा कसोटीचं (निर्माण / अधोरेखित करण्याचं) श्रेय नीतीन रिंढे यांना जातं. ही एक मोठीच उपलब्धी आहे.

नीतीन रिंढे (सह उम्बर्तो इको) म्हणतात त्यानुसार, पुस्तकांचा शोध हा मानवी इतिहासात मूलभूत असून आगीच्या आणि चाकाच्या शोधाइतकाच महत्त्वाचा आहे. पुस्तकांशिवायचं जग कसं असू शकतं याची कल्पना करवत नाही. ज्याप्रमाणे बघितल्या जाणार्‍या सिनेमावरून त्या त्या समाजाचं मानसिक वय काढलं जातं, त्याप्रमाणेच समाज कोणतं पुस्तक वाचतो, त्यावरून त्या समाजाचं बौद्धिक वय काढता येऊ शकतं. तसं बघितलं तर महाराष्ट्रीय लोकांचं बौद्धिक वय काय असेल? ‘लीळा पुस्तकांच्या’मध्ये दिलेल्या संदर्भानुसार बघितलं तर – ‘सिंहासन बत्तिशी’ आणि ‘वेताळपंचविशी’ ही मराठीत सर्वाधिक छापली गेलेली पुस्तकं होती (१८६३)! यावरून पुस्तकाचं परिमाण म्हणून असलेलं मूल्य समजण्यास हरकत नसावी. असं असताना लेखक चांगलं लिहीत नाही म्हणून लोकं वाचत नाही, त्यांच्या वाचनावर परिणाम होतो, असं काहीही न वाचताच ठरवणारी मोठी जमात महाराष्ट्र देशी आहे.

पुस्तकं विकत घेणं आणि वाचणं हा खुळेपणा आहे यावर ठाम असणारी बहुसंख्य जनता आहे. जागतिकीकरणोत्तर काळात मोठ्या प्रमाणावर नवश्रीमंत मध्यमवर्ग निर्माण झाला व वाढला असला तरी पुस्तक विकत घेऊन वाचणं आजही पूर्णार्थानं मराठी समाजानं स्वीकारलेलं नाही, असं खेदानं म्हणावं लागतं. इतरांचं काय सांगावं, एकदा माझ्याच जन्मादात्रीनं मला सांगितलं होतं, पुस्तकांवर इतके पैसे ‘वाया’ घालवले, यात किती सोनं आलं असतं?

असो. अशा बारीकसारीक गोष्टींचा बराच विचार या पुस्तकात केलेला आहे. आणखीन सांगण्याजोगं वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकात ज्ञानाविषयी, संशोधनाविषयी काही निश्चित आणि लक्षणीय विधानं केलेली आहेत. यातून महाराष्ट्रीय समाजाचा पुढे होत जाणारा प्रवास कसा होत जाणार याची भीती आणि चिंता भेडसावताना दिसते. आधुनिक समाजशास्त्राचा आणि वाचन-पुस्तक संस्कृतीचा समन्वय घालून एखादा समाज कोणत्या वळणानं वाटचाल करणार आहे, ते स्पष्ट करता येऊ शकते, ते या पुस्तकात वारंवार दिसून येतं. उदाहरणादाखल ‘अक्षरनिष्ठांची मांदियाळी’ या अरुण टिकेकर यांच्या पुस्तकातले कोटेशन दाखवता येईल : “आज तीस वर्षांनंतर असं वाटतंय की, आपल्या देशातील जुन्या ग्रंथांची सध्याची आबाळ बघता येथून (दुर्मिळ) ग्रंथ विकत घेऊन जाणाऱ्यांचे आपण आभारच मानले पाहिजेत, कारण हे सारे ग्रंथ निदान त्यांच्या देशातील ग्रंथालयात उपलब्ध होऊ शकतात.” पुस्तकांचे, ग्रंथांचे काय आणि कसे हाल होऊ शकतात हे मी स्वत: पाहिलं आहे. एक अत्यंत नावाजलेल्या आणि ज्ञानाचं मंदिर अशी ख्याती असलेल्या संस्थेच्या प्रमुखाचं घर ‘साफ’ करायचं म्हणून त्या घरातील सर्व पुस्तकं, कागदं जे काही होतं ते दोन ट्रॅक्टर भरून, त्याची विल्हेवाट लावली. अत्यंत प्रकांड विद्वान म्हणून प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीच्या ग्रंथांची ही हालत तर बाकीच्यांचं काय सांगावं?

लिखित पुस्तकं चलनात आल्यानंतर मानवसभ्यता पूर्णपणे बदलली. मुद्रणकलेचा शोध सर्वप्रथम चिनी लोकांनी लावला. लाकडी ठोकळ्यांचे छापे बनवून, छाप्यांचा वापर कागदावर किंवा सिल्कच्या कापडावर करून हव्या तेवढ्या प्रती त्यांना बनवता येत असत. पुढे गुटेनबर्गनं खिळ्यांच्या छपाई यंत्रांचा शोध लावून मानवजातींवर उपकारच केले. छपाई यंत्रांच्या आधी देखील पुस्तक संस्कृती होतीच, मात्र सर्वसामान्य लोकांच्या पोहचण्याच्या पलीकडेच ती होती. तरी जवळपास सर्वच प्राचीन सभ्यतांना ग्रंथालयं आणि अर्काईव्हज ज्ञात होती. त्यात इजिप्तचं अॅलेक्झांड्रिया (जवळ-जवळ सात लाखापेक्षा जास्त ग्रंथ) हे सर्वांत जास्त प्रसिद्ध होतं. मेसोपोटेमिया, सिरिया, ग्रीस, ही तत्कालिन इतर प्रसिद्ध ग्रंथालयं होती. मुद्रणकलेचा शोध लागण्याआधी बहुतांशी सर्व लेखन हस्तलिखितात उपलब्ध असे. पुस्तकांच्या नकला करणं हे अत्यंत कष्टाचं काम होतं, पपायरस, भूर्जपत्र, गायीची सुकवलेली आतडी क्वचित रेशमी कापड अशा साधनांवर लेखन केलं जात असे, म्हणजे सगळीच लवकर नष्ट होणारी साधनं. पुस्तकांचा सांभाळ आजच्या प्रमाणेच सर्वच काळात जिकिरीचं काम होतं. मात्र ज्ञानाचं साधन आणि (म्हणूनच) धोकादायक वाटल्यानं पुस्तकं कायमच समान आदरणीय आणि तिरस्करणीय राहिली आहेत. आक्रमणं झाल्यानंतर सर्व आक्रमणकर्त्यांचं पहिलं लक्ष्य असतात ग्रंथालयं तर अभ्यासकांचा आटापिटा असतो, ते ग्रंथालय वाचवण्याचा.

वर अॅलेक्झंड्रियाचा विषय निघाला आहे म्हणून सांगतो. ‘अगोरा’ नावाचा एक सिनेमा आहे. त्यात हायपेशिया या विद्वान स्त्री अभ्यासिकेची कथा दाखवली आहे. तिचं भूमितीतल्या पॅराबोला, हायपरबोला यात लक्षणीय काम आहे. या सिनेमाचा खर्‍या अर्थानं केंद्रबिंदू आहे अॅलेक्झांड्रियाचं ग्रंथालय. सगळा सिनेमा या ग्रंथालयातच घडतो, कारण या सिनेमातील पात्रं इथंच जगत असतात. अॅलेक्झंड्रियावर ख्रिश्चन धर्मवेड्यांचं आक्रमण होतं आणि ते सगळंच नष्ट करत सुटतात. जे लोकं पॅगन धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारत नाही, त्यांचा काटा काढला जातो. हायपेशियाला नंतर आपलं संशोधन सुरू ठेवता येणार नसतं म्हणून ती आपला धर्म सोडणार नाही असं सांगते. स्वत:चा जीव वाचवायचा सोडून ती आणि तिचे सहकारी पुस्तकं वाचवण्याची जिद्दोजिहाद करतात. पुरुषसत्तेसमोर झुकत नाही, ख्रिश्चन धर्म स्वीकारत नाही आणि अभ्यास करते म्हणून शेवटी हायपेशियाला मृत्यूदंड होतो. स्त्री असून अभ्यास करते म्हणून तिला नग्न करून दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा होते. तिच्यावर प्रेम करणारा तरी तिचा तिरस्कार करणारा गुलाम या आक्रमणात मुक्त झालेला असतो आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारून आक्रमकांना जाऊन मिळतो. त्याला तिच्या शिक्षेबद्दल कळतं. तेव्हा तो स्वत: तिला गळा दाबून मारतो, आणि तिचं कलेवर दगडं मारण्यासाठी लायब्ररीत ठेवतो. पुढे ती ज्ञानशाळा ओसाड पडते. अशी ती कथा आहे.

ज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या परंपरा धर्म नेहमीच नेस्तनाबूत करतो, किमान पाश्चात्य जगात तरी अशीच परंपरा आहे. पुस्तकांच्या बाबतीत सर्वांत मोठा विरोधाभास आणि विसंगती अशी की पुस्तकांच्या/ग्रंथांच्या नाशाला कारणीभूत धार्मिक ग्रंथच असतात, उदा., बायबल, कुराण. एका ग्रंथाचं प्रामाण्य दुसर्‍या ग्रंथाच्या नाशाला कारणीभूत ठरतं. याचं कारण नीतीन रिंढे देतात, पुस्तकांची खरी ताकद दुसऱ्या पुस्तकाला आणि पुस्तक प्रेमींनाच कळत असते. पुस्तकं काय करू शकतात, शब्दांची ताकद काय करू शकते हे इतिहासात वारंवार दिसून आलं आहे.  अगदी सांगायचं झालं तर माओचं ‘रेड बुक’चं उदाहरण देता येईल.

येशू ख्रिस्तासोबत गद्दारी करणारा आणि त्यांना शत्रूच्या हवाली करणारा ज्युडास हा ग्रंथपाल होता आणि त्याचं पुस्तकांवर अतिशय प्रेम होतं, ही पुस्तकांच्या जगातली अजूनच विसंगती. हिटलरनं फ्यूरर झाल्यानंतर सगळ्या ज्यू लेखकांची पुस्तकं जाळून टाकली, मात्र त्याच्या संग्रही असणारी मॅक्स ऑस्बर्न या ज्यू लेखकानं लिहिलेल्या ‘बर्लिन’ या पुस्तकाची प्रत मात्र त्यानं शेवटपर्यंत जपली.

पुस्तकांच्या जगातल्या अशा अनेक विसंगती, गमतीजमती ‘लीळा पुस्तकांच्या’ या पुस्तकात वाचायला मिळतात. पुस्तकांवर अफाट प्रेम करणारी, पुस्तकवेडी माणसं पानोपानी भेटत राहतात. सदर पुस्तकात आधुनिक काळातील अनेक पुस्तकवीरांच्या गोष्टी आलेल्या आहेत. तरी पुस्तकांविषयी प्रेम असणारे वेडे सर्वच काळात उपलब्ध असलेले दिसतात. इसपू दुसर्‍या शतकातील ‘लेटर्स ऑफ अरिस्टीस’ (Letter of Aristeas) या पत्रांच्या संकलनात दिमित्रीयस या पुस्तक वेड्याची इच्छा काय आहे ते सांगितले आहे. “दिमित्रीयसने आपल्या बजेटचा पैश्यांचा मोठा हिस्सा ग्रंथसंग्रहासाठी खर्च केला आहे, जर शक्य झाले तर त्याच्या क्षमतेनुसार जगातली सगळी पुस्तकं तो जमवेल.”

दुसरं उदाहरण आहे टोलेमीचं, त्याच्याविषयी इरेनियस म्हणत असे, त्याचं (टोलेमीचं) ग्रंथालय जवळपास सर्व महत्त्वाच्या आणि गंभीर लेखनानं समृद्ध होतं. टोलेमीनं आपला ग्रंथसंग्रह समृद्ध होण्यासाठी अनेक क्लुप्त्या केलेल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे, अॅलेक्झंड्रियाच्या किनार्‍यावर जी जहाज विश्रांतीसाठी थांबत त्या प्रत्येक जहाजाची कसून तपासणी होई – त्या जहाजात एखादा ग्रंथ आहे की नाही हे बघण्यासाठी! जर ग्रंथ सापडला तर तो तातडीनं ग्रंथालयात नेण्यात येई, त्यानंतर निर्णय घेतला जाई, तो परत करावा की जप्त करावा. जर ग्रंथाचा मालक नशीबवान असला तर त्याला त्या ग्रंथाची एक प्रत तात्काळ बनवून देत असत आणि मूळ प्रत स्वत:कडे ठेवत. अशा ग्रंथांचं वर्गीकरण ‘जहाजामधून’ या प्रकारात केले जाई.

टोलेमीनं सोफोक्लिस, युरिपीडिस, एश्चकायलस या कवींचे मूळ ग्रंथ कसे प्राप्त केले, ते गॅलेन या तत्त्वज्ञानं हिप्पोक्राटीसवर लिहिलेल्या लेखनातून कळतं. या कवी, तत्त्वज्ञांचे ग्रंथ अथेन्सच्या राज्य संग्रहालयात सुरक्षित ठेवले होते, आणि ते ग्रंथ कोणत्याही परिस्थितीत बाहेर नेण्यास प्रतिबंध केलेला होता. टोलेमीनं (राजा असून) अथेन्सच्या गव्हर्नरला पाठपुरावा करून, विनंतीकरून ते ग्रंथ फक्त कॉपी करण्यापुरता उसने मिळावेत अशी मागणी केली. तेव्हा पंधरा चांदीचे टॅलेंट (त्या काळातली प्रचंड रक्कम) अनामत म्हणून जमा करून ते ग्रंथ ताब्यात घेतले. पुढे मूळ ग्रंथ स्वत:कडे ठेवून त्याच्या नकला ग्रंथालयात जमा केल्या, आणि आनंदानं अनामत रकमेवर पाणी सोडलं. टोलेमीसारखी अनेक पुस्तकवेडी माणसं नीतीन रिंढे यांच्या या पुस्तकात भेटतात. ती बहुतांशी पाश्चात्य जगतातील असल्यानं वाटत राहतं मराठी जगतातील एकही माणूस या वेडेपणात का आढळत नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तक प्रेमावर एक लेख सहज लिहिता आला असता, असं राहून राहून वाटत राहतं.

पुस्तकाविषयीची पुस्तकं म्हणजे काय, कोणत्या पुस्तकाला पुस्तकाविषयीचं पुस्तक म्हणता येऊ शकतं, अशा पुस्तकांची व्याप्ती किती आणि कशी असू शकते याबाबत परिपूर्ण विवेचन नीतीन रिंढे यांनी केलेलं आहे. पुस्तकांविषयीची पुस्तकं आणि एकूणातच जागतिक पुस्तक संस्कृतीच्या इतिहासाचा वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात घेतलेला आहे. पुस्तक लेखनापासून ते पुस्तक निर्मितीपर्यंत विविध टप्प्यांची माहिती लेखांमध्ये मिळत राहते.

.............................................................................................................................................

लीळा पुस्तकांच्या - नीतीन रिंढे, प्रकाशक - लोकवाङ्मय गृह, मुंबई

मुखपृष्ठ - नीतिन दादरावाला. पाने – १९२, मूल्य – २५० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3383

.............................................................................................................................................

लेखक नितिन भरत वाघ कादंबरीकार व समीक्षक आहेत.

nitinbharatwagh@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......