‘लीळा पुस्तकांच्या’ : समाजाकडे, संस्कृतीकडे, स्वत:कडे बघण्याची एक खिडकी (उत्तरार्ध)
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
नितिन भरत वाघ
  • ‘लीळा पुस्तकांच्या’ या नीतीन रिंढे यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 30 March 2018
  • ग्रंथनामा Granthnama बुक ऑफ द वीक Book Of the Week लीळा पुस्तकांच्या Leela Pustakanchya नीतीन रिंढे Nitin Rindhe पुस्तकांविषयीची पुस्तकं Book on Books लोकवाङ्मय गृह Lokvangmaya Grih

‘लीळा पुस्तकांच्या’ या पुस्तकात प्रस्तावना वगळून एकूण तेवीस लेख आहेत.

‘लीळा पुस्तकाच्या’ हे पुस्तक माझ्यासाठी आजवर घेतलेल्या पुस्तकात सर्वात महागडं ठरलं आहे. या काळातली सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे, घरबसल्या पुस्तकं उपलब्ध होतात. पुस्तकात उल्लेख असलेली पण माझ्याकडे नसलेली पुस्तकं धडाधड ऑनलाइन मागवली. पुस्तकाला हात घालताच टेंपटेशन सुरू होते, वॉल्टर बेंजामीनपासून. एका पुस्तकवेड्यानं दुसर्‍या पुस्तकवेड्याला दिलेली श्रद्धांजलीच म्हणावा हा लेख इतक्या आत्मियतेनं लिहिला आहे. जगभरातल्या पुस्तकांवर प्रेम करणार्‍या लोकांचं प्रतिनिधित्व वॉल्टर बेंजामीन करतो. त्याचं पुस्तक संग्रहाविषयीचं तत्त्वज्ञान त्याच्या ‘अनपॅकींग माय लायब्ररी’ या पुस्तकात वाचायला मिळतं, “पुस्तकाशी आपले सूर जुळले पाहिजेत, एखादं पुस्तक पाहताच ते आपल्यासाठीच आहे याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. इतकं जिवंत नातं जर आपलं पुस्तकाशी जुळलं तरच चांगलं ग्रंथालय आपल्याला जमवता येईल.” इतकं त्याचं आयुष्य आणि विचार पुस्तककेंद्री होते. अशा या विद्वानाचं जगणं जितकं प्रोत्साहित करतं तेव्हढच त्याचं मरणं खिन्न करतं. केवळ हिटलरचं नाझी सैन्य आपल्याला पकडेल, या शंकेनं त्यानं आत्महत्या केली होती. यातील उपरोध असा की, वॉल्टर बेंजामीनच्या मते आदर्श पुस्तक संग्राहकच्या ज्या कसोट्या आहेत, त्या सर्व कसोट्यांत ‘हिटलर’ तंतोतंत बसत होता! वॉल्टर बेंजामीन आणि हिटलरचं पुस्तक प्रेमाविषयी असलेलं परस्परविरोधाभासी नातं, हिटलरवरील लेखात आलेलं आहे. पुस्तकांच्या वाट्याला जे भोग येतात, तेच बहुतांशी पुस्तकप्रेमींच्या वाट्याला यावेत असा काही नियम असतो का? पुस्तकांच्या बहुतेक कहाण्या दुखान्तच का असतात? अशाच दुखान्तात अनेक पुस्तकं नाहीशी होतात, जी पुन्हा कधीही सापडत नाही.

अशा हरवलेल्या पुस्तकांचा शोध घेणाऱ्या स्टुअर्ट केलीच्या पुस्तकाची चर्चा ‘पुस्तकांचं नाहीसं होणं’ या लेखात केलेली आहे. या लेखात केलीचं एक वाक्य आहे, ‘साहित्याचा इतिहास म्हणजे खरं तर नाहीशा झालेल्या पुस्तकांचाच इतिहास आहे.’ हे नोंदवताना नीतीन रिंढे भारतीयांच्या परस्परविरोधी विसंगतीवर बोट ठेवतात. “चार्वाक साहित्य आणि बौद्ध साहित्य भारतातून संपूर्णपणे कसं नामशेष झालं असेल याचा शोध घ्यायला हवा. एखाद्या विचार प्रवाहात चार-पाचशे वर्षं (खरं तर हजारपेक्षाही जास्त वर्षं) निर्माण होत राहिलेली सर्व पुस्तकं समूळ नाहीशी करणं ही अशक्य वाटणारी गोष्ट भारतीयांनी शक्य करून दाखवली आहे.” जर या पुस्तकांचा नष्ट होण्याचा माग निरपेक्षपणे घेतला तर भारतीय समाजेतिहासाला आमूलाग्र वळण मिळेल. सर्व मध्ययुगीन इतिहासाचं उत्खनन या निमित्तानं होईल. या पद्धतीनं दिशादर्शनाचे अनेक मुद्दे ‘लीळा पुस्तकांच्या’मध्ये सापडतात.

पुस्तकाचं नाहीसं होणं किंवा पुस्तकाचा शोध घेणं आणि संरक्षण करणं याविषयी एक वेगळ्याच धाटणीचा इंग्रजी सिनेमा आहे, ‘द बुक ऑफ इलाय’. यात महायुद्धानंतर (न्युक्लीअर अपोकॅलीप्सनंतर) जगाचा एक भाग पूर्णपणे नष्ट झालाय, अगदी साध्या साध्या गोष्टींसाठी माणसं एकमेकांना मारतायत. थोडक्यात दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपची झालेली स्थिती. अशा परिस्थितीतही एका माफियाला जगावर राज्य करायचं असतं, आणि जगावर राज्य करण्याची गुरुकिल्ली एका पुस्तकात असते, ते पुस्तक त्याला हवं असतं. त्या पुस्तकात सर्व मानवजातीला वाचवण्याचं रहस्य असतं. ते पुस्तक इलाय या सिनेमाच्या नायकाकडे असतं, ते त्याला अमेरिकेच्या दुसऱ्या भागात पोहोचवायची आज्ञा झालेली असते. सर्व प्रकारच्या अडथळे, संकटं पार करून तो ‘ते’ पुस्तक योग्य त्या ठिकाणी पोहोचवतो. एक पुस्तक सांभाळण्यासाठी आणि ते पुस्तक मिळवण्यासाठी किती जीवाची बाजी लावता येते, ते सिनेमात दिसून येतं. इलायचं पुस्तक वाचवणं केवळ पुस्तक वाचवणं नसतं तर एक संपूर्ण नाहीशी होऊ पाहणारी सभ्यता वाचवणं असतं. पुस्तक प्रेमींनी अगदी आवर्जून बघावा असा हा सिनेमा आहे.

पुस्तकं ज्याप्रमाणे समाजाचं उत्खनन करतात, त्याचप्रमाणे ती व्यक्तींचंही उत्खनन करतात. या विषयावर दोन लेख आहेत. आधी आलेला लेख कॅसानोव्हा हा कुख्यात प्ले बॉयवर आहे, तर दुसरा लेख साक्षात हिटलरवर आहे. ‘कॅसानोव्हा वॉज अ बुकलव्हर’ या पुस्तकात दिलेला एक निष्कर्ष आवर्जून वाचण्यासारखा आहे. तो म्हणजे, पूर्ण वेळ लेखक ही एक ‘मिथ’ आहे. कुठला तरी अतिरिक्त व्यवसाय केल्याशिवाय लेखक केवळ लेखनावर जगू शकत नाही. हे अप्रिय कटू सत्य संशोधनाअंती दाखवून दिलेलं आहे. अशाच दुसरा व्यवसाय करून जगणाऱ्या लेखकांच्या अनेक गमती या लेखात आहेत. कॅसानोव्हा म्हणजे रंगेल आणि बाईलवेडा अशी त्याची प्रतिमा जगभर आहे, मात्र तो लेखक होता आणि त्यानं काही महत्त्वाच्या ग्रंथांचे अनुवाद केले आहेत, हे खूप जणांना ज्ञात नसतं.

तीच गोष्ट हिटलरची. त्याच्या पुस्तक प्रेमाची गोष्ट शेवटच्या लेखात आहे. हिटलरच्या खाजगी जगण्यातल्या अनेक गोष्टी त्याच्या प्रेमप्रकरणासकट बहुतेकांना माहीत असतात, मात्र त्याचं कलासक्त असणं, त्याचं पुस्तकप्रेम अंधारातच राहतं. त्याची ही अज्ञात बाजू ‘हिटलर : पुस्तकं जपणारा आणि जाळणारा’ या लेखात वाचायला मिळते. या लेखात ‘हिटलर्स प्रायव्हेट लायब्ररी’ हे टिमोथी रेबॅकनं लिहिलेलं अगदी वेगळ्या प्रकारचं पुस्तक भेटतं. या पुस्तकात हिटलरच्या आयुष्यभरच्या वाचनाचा इतिहास लिहून काढला आहे. या पुस्तकामुळे हिटलरच्या अज्ञात आयुष्याविषयी अनेक पैलू उघड होतात. गोळ्या झाडून आत्महत्या करण्याआधी हिटलर एक पुस्तक वाचत होता, मरण्यापूर्वी त्या पुस्तकातील मजकूर वाचून पाहावा, असं कोणतं ते पुस्तक असेल? त्या पुस्तकातील नेमका कोणता भाग त्यानं वाचला असेल? असा विचारांचा भुंगा पाठीमागे लावणारा अत्यंत रोचक संदर्भ या लेखात आहे. नीतीन रिंढे म्हणतात हे पुस्तक म्हणजे हिटलरच्या वाचनाचं आत्मचरित्र आहे. हे वाचल्यानंतर मनात एक विचार अपरीहार्यपणे आला, याच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाचनचरित्राचा अभ्यास भारतात का होऊ शकत नाही? त्यांची वाचनपद्धती, अभ्यासपद्धती, विचारपद्धती काय होती, याचा शोध का घेतला जात नाही? केवळ बाबासाहेबच काय, महात्मा गांधी, नेहरू यांसारख्या विचारवंत नेत्यांचा वाचनाचा इतिहास सम्यकपणे मांडला तर त्यांच्याबद्दल कितीतरी गोष्टी नव्यानं कळतील.

वाचनातून चरित्र उलगडण्याच्या प्रयत्नाविषयी, तसंच पुस्तकांनी रचलेली चरित्रं या लेखातही भेटतात. एका लेखात ऑस्कर वाइल्ड हा आयरिश वादग्रस्त लेखक नव्यानं समजून घेण्यासाठी थॉमस राईट या संशोधकानं केलेले प्रयत्न आणि त्यावर आधारित लिहिलेलं पुस्तक ‘ऑस्कर्स बुक्स’ या पुस्तकाची ओळख करून दिलेली आहे. त्याच्या जोडीला आहे जॉन कॅरे या लेखकाचं आत्मचरित्र ‘द अनएक्सपेक्टेड प्रोफेसर – अॅन ऑक्सफर्ड लाइफ इन बुक्स’. अर्थातच दोन्ही पुस्तकांचा आत्मविषय आहे पुस्तकं. थॉमस राईट या लेखकानं ऑस्कर वाइल्डच्या पुस्तकावर घेतलेली मेहनत अफाट आहे. आपण भारतीय त्याची कल्पनाही करू शकत नाही. या अनुषंगानं महाराष्ट्रीय अकादामिक संशोधनक्षेत्रातील काही लाजिरवाण्या गोष्टींबाबत रिंढे यांनी वास्तव निरीक्षणं नोंदवली आहेत. या दोन लेखकांच्या वाचनाची पुस्तकांची चरित्रं तपासली तर त्या दोघांची व्यक्तीचरित्रं उभी राहतात. यातही फरक म्हणजे ऑस्कर वाइल्डच्या पुस्तक संग्रहाची पूर्ण धूळधाण झाली होती, तर जॉन कॅरे यानं स्वत:च आपल्या ग्रंथसंग्रहाच्या आधारे आत्मचरित्र रचलं. इथं रिंढे सरांना पुन्हा वॉल्टर बेंजामिन आठवतो – ‘पुस्तकं त्यांच्या संग्राहकाचं चरित्र, व्यक्तिमत्त्व रचू शकतात.’ हीच गोष्ट प्रत्येक पुस्तक प्रेमीच्या बाबतीत लागू  होणार नाही का?

अल्बेर्तो मँग्वेल या लेखकाच्या ग्रंथालयाची गोष्ट पुढच्या लेखात आहे. अल्बेर्तो मँग्वेल म्हणजे वॉल्टर बेंजामीनची अत्याधुनिक आवृत्ती, पण त्याच्यापेक्षा फारच नशीबवान, म्हणजे पुस्तकांसाठी घर बांधून त्या घरात मनाप्रमाणे जगणारा. अर्जेन्टिनामधील अराजकाच्या काळातही त्याची पुस्तकं सहीसलामत राहिली इतका नशीबवान. अल्बेर्तो मँग्वेल पुस्तक व्यवहाराबद्दल डोळसपणे विचार करतो आणि त्याविषयी मूलभूत चिंतन मांडतो, त्यात पुस्तकांचं नाहीसं होणं आणि पुस्तकांसाठी लागणारी जागा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अल्बेर्तो मँग्वेलच्या लेखात होर्हे लुई बोर्खेज आणि मारियो वर्हास योसा हे लेखक भेटतात. त्याचप्रमाणे  ‘लायब्ररी अॅट नाईट’ हे अद्भुत पुस्तकही भेटतं. ज्यात रात्री बुकशेल्फवरची पुस्तकं आपापसात बोलू लागतात, ज्यातून पुस्तकांचं अनोखं जग उभं रहातं.

‘पुस्तकी कथा’ या लेखात झोरान झिवकोविच या सर्बियन लेखकावर लेख आहे, ज्याच्या लेखांच्या केंद्रस्थानी फक्त पुस्तक आणि त्याचाशी निगडीत कथा आहेत. हा लेख झोरान झिवकोविच या लेखकाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण करतो. आधुनिकोत्तर कथेतली सगळी वैशिष्ट्यं झोरानच्या लेखनात सापडतात. पुस्तकांचं अंतरंग विविध पद्धतीनं झोरान कसा उलगड जातो, त्याच्या लेखनात असलेली पुस्तकांबाबतची जगावेगळी समज कशी अचंब्यात टाकते, याची ओळख करून दिली आहे. यातलं एक वेधक निरीक्षण – पुस्तकं माणसाच्या अस्तित्वावर अतिक्रमण करतात किंवा मिटली की नाहीशी होतात.

उम्बर्तो इकोवरील ‘एका ‘तरण्या’ कादंबरीकाराचा कबुलीजबाब’ हा महत्त्वाचा लेख आहेय. यात इकोच्या ‘कन्फेशन ऑफ यंग नॉव्हेलीस्ट’ या कादंबरीविषयक पुस्तकाची पर्यायानं कादंबरी लेखनाविषयी महत्त्वाची चर्चा केलेली आहे. त्यात असलेलं मला पटलेलं एक विधान – ‘एखाद्या कादंबरीवर बोलण्यासाठी सर्वांत अनधिकारी व्यक्ती जर कोणी असेल तर ती म्हणजे खुद्द त्या कादंबरीचा लेखक...’ अर्थात जरी इकोनं आपल्या कादंबरी लेखनावर भाष्य केलेलं असलं तरी! इकोवरचा लेख कादंबरीवरील चर्चेसाठी मुळातूनच वाचला पाहिजे. यात कादंबरी लेखन, कादंबरी याबद्दल अनेक महत्त्वाचे पैलू स्पष्ट केले आहेत.

पुस्तकात पुन्हा एकदा इको भेटतो ‘ग्रंथसुखाविषयी संवाद’ या लेखात. त्याचा आणि ज्याँ क्लॉद कॅरिए या पटकथा लेखकासोबत संवाद ‘धिस इज नॉट एन्ड ऑफ द बुक’ या पुस्तकात ग्रंथित केलेला आहे. युरोपीय विचारवंत नेमका कसा विचार करतात याची थोडी झलक या लेखात दिसून येते, शिवाय त्यांचं भारताविषयी असलेलं आकलन किती तोकडं असतं हेही लक्षात येतं. याव्यतिरिक्त सध्याच्या मोबाईल आणि संगणक युगात छापील पुस्तकांचं भवितव्य काय याचा देखील विचार या लेखात इकोच्या अनुषंगानं घेतलेला आहे. यात इकोचं अतिशय (खरं तर अतिरेकी) आशावादी विधान दिलेलं आहे – ‘काही शोध इतके परिपूर्ण असतात ते जग कितीही बदललं तरी कायमस्वरूपी तसेच राहतात. उदाहरणार्थ, चाकाचा शोध. काळ इतका बदलल्यानंतर देखील चाकाची मूल संकल्पना तशीच राहिली आहे. आणि पुस्तकाचा शोध चाकाच्या इतकाच मुलभूत आहे.’ पुस्तकं इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळे आपलं स्वरूप बदलत आहेत, त्यांचं भौतिक वजन ‘नगण्य’ होतं जातंय. किंडल किंवा ईबुक्समुळे छापील पुस्तकांवर नेमका किती, काय आणि कसा परिणाम होईल हे कळण्यासाठी एक निश्चित काळ जावा लागणार आहे. तोवर अस्सल पुस्तक प्रेमीना इकोचं विधान आशा पल्लवित करत रहायला पुरेसं आहे.

एखादा माणूस जर कोणा लेखकाच्या प्रेमात पडला तर काय घडू शकतं, हे समजून सांगणारा लेख म्हणजे ‘अत्तरविक्याचं प्रूस्तप्रेम’. या छोटेखानी लेखात दोन जणांची आत्मचरित्रं समाविष्ट आहेत. खुद्द मार्सेल प्रूस्त आणि झॅक ग्युरीन या प्रूस्त वेड्याचं. जणू झॅक ग्युरीन प्रूस्तच्या निमित्तानं स्वत:चाच शोध घेतोय, इतकं साम्य त्या दोघांच्या आयुष्यात आहे. एखाद्या कथेसारखा हा लेख आहे. त्यात वेर्नर या भंगार विकणाऱ्या सोबत मार्था या प्रूस्तच्या वाहिनीचं व्यक्तिमत्त्वही उलगडत जातं.

पुढील काही लेखांत पुस्तकांविषयीची रहस्यकथा, पुस्तक चोराच्या मागावर गुप्तहेर असे अत्यंत मनोरंजक विषय आहेत. ‘मुखपृष्ठांच्या रेखीव गोष्टी’ या लेखात पुस्तकांची मुखपृष्ठं या अत्यंत महत्त्वाच्या परंतु दुर्लक्षित पैलूवर झोत टाकला आहे. एकार्थानं हा लेख म्हणजे अगदी थोडक्यात मांडलेला मुखपृष्ठांचा इतिहासच आहे. वेळोवेळी कशा प्रकारे पुस्तकांची मांडणी बदलत गेली, मुखपृष्ठांना कसं महत्त्वं येत गेलं, महायुद्धात कामं न मिळाल्यानं चित्रकार कसे पुस्तकांच्या मुखपृष्ठांकडे वळले याची रंजक माहिती मिळते. केवळ समासातल्या नोंदी वाचून काही अभ्यास करता येईल का? असा विचार आपण भारतीय करू शकत नाही. मात्र एच. जे जॅक्सन या विदुषीनं समास-नोंदी (इंग्रजीत ज्याला ‘मार्जिनलिया’ म्हणतात, त्याला समासिके/समासिका असा शब्द मी सुचवतो) अभ्यासून ‘मार्जिनलिया : रीडर्स रायटिंग इन बुक्स’ हे पुस्तक लिहिलं आहे, त्याचा आढावा रिंढे यांनी घेतला आहे. ज्यात कोलरीज हा लेखक भेटतो, ज्याच्या समासिकांची संख्या सहा खंड झाले इतकी झाली होती आणि त्या प्रकाशितही झाल्या.

न वाचताच पुस्तक वाचल्याचं बिनदिक्कत सांगणारे कितीतरी लोकं आपल्या आजूबाजूला भेटतात, तशा लोकांचं संकीर्तन करणारा मजेशीर लेख आहे, ‘न-वाचण्याचं संकीर्तन’. ज्यात नमूद केलेलं अत्यंत महत्त्वाचं विधान म्हणजे – “पुस्तक वाचण्यापेक्षाही आवश्यक असतं ते ज्ञानाच्या जगात त्या पुस्तकाचं स्थान निश्चित करणं. म्हणजे ते पुस्तक कोणत्या प्रकारचं आहे, कोणती भूमिका मांडतं, त्या भूमिकेला संवादी आणि विरोधी भूमिका मांडणाऱ्या आजवरच्या पुस्तकांशी नातं काय?” हे ठरवता येणं आणि ठरवणं अत्यंत महत्त्वाचं असतं याची महाराष्ट्रीयांना अजिबात जाणीव नाही.

एखाद्या पुस्तकाची, लेखकाची स्थाननिश्चिती करणं म्हणजे काय तेही कळत असेल याविषयी देखील साशंकता आहे. अशी स्थाननिश्चिती म्हणजे त्या लेखकाची, त्या पुस्तकाची परंपरा निश्चित करणं असतं. त्यावरून संपूर्ण व्यवस्थेचा, परंपरेचा प्रवास तपासता येतो. एखाद्या पुस्तकाची वा लेखकाची स्थाननिश्चिती करणं म्हणजे त्याला डोक्यावर घेणं, मोठं बनवणं असा नसून त्याचे केवळ महत्त्व प्रमाणित करणं असतं. ज्याद्वारे त्या पुस्तकाचं, लेखकाचं योगदानही ठरवता येतं. या लेखात वाचनात आलेली एक संकल्पना म्हणजे ‘पोएटिक्स ऑफ डिस्टन्स’ (दुराव्याचं काव्यशास्त्र). त्याच्या मते पुस्तकाशी शब्दश: जवळीक साधणं, त्याच्या फार जवळ जाणं, अंतरंगात शिरण्याचा प्रयत्न करणं फार बरं नसतं. न वाचता पुस्तक ‘वाचता वा रचता’ येतं असा सिद्धांत त्यानं पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

‘द ग्रोनिंग शेल्फ’ : ग्रंथप्रेमाचे विविध रंग” भारतीय पुस्तकप्रेमी विषयी लिहिलेला हा एकमेव लेख. प्रदीप सेबॅस्टीअन या भारतीय पुस्तक प्रेमी लेखकाच्या ‘द ग्रोनिंग शेल्फ’ या पुस्तकाची ओळख या लेखात करून दिलेली आहे. या पुस्तकाचं नीतीन रिंढे यांनी दिलेलं फक्त वैशिष्ट्य सांगतो, जर पुस्तकांचा संग्रह करताना कुन्ठेचा लोलक झाला तर प्रदीप सेबॅस्टीअनचं पुस्तक काढून वाचायचं आणि पुन्हा जोमानं पुस्तक संग्रहाच्या नादी लागायचं.

प्रदीप सेबॅस्टीअनच्या पुस्तकाची सुरुवात अशी केलेली आहे – “युरोप- अमेरिकेतील लेखकांची एकाहून एक सरस पुस्तकांविषयीची पुस्तकं वाचताना भारतीय लेखकांनी या प्रकारच्या लेखनाकडे केलेलं दुर्लक्ष मनाला बोचत राहतं. अशा दुष्काळी वातावरणात प्रदीप सेबॅस्टीअन या लेखकाचं ‘द ग्रोनिंग शेल्फ’सारखं पुस्तक मात्र आश्चर्याचा सुखद धक्का देतं.” हे वाक्य जसंच्या तसं नीतीन रिंढे यांच्या ‘लीळा पुस्तकांच्या’ या पुस्तकाला मराठीच्या संदर्भात लागू होतं.

‘लीळा पुस्तकांच्या’ या पुस्तकाची स्थाननिश्चिती करण्यासाठी महाराष्ट्रीय साहित्यात अशी किती आणि कोणती पुस्तकं आहेत याचा थोडाफार शोध घेण्याचा प्रयत्न केला. नीतीन रिंढे यांनी आपल्या ‘विषयांतरा’त बहुतेक सगळ्या पुस्तकांविषयीच्या पुस्तकांची माहिती दिलेली आहेच (अगदी तंतोतंत सांगायचं झाल्यास पंचवीस पुस्तकं). नंतर श्री. बा जोशी यांचे ‘गंगाजळी’चे काही भाग, ‘उत्तम-मध्यम’, गोविंद तळवळकर यांचे ‘सौरभ’चे दोन खंड, शिवाय ‘वैचारिक व्यासपीठे’, शंकर सारडा यांनी पुस्तकांची ओळख करून देण्यासाठी लिहिलेली दोन-चार पुस्तके, यात जरा सरप्राईझिंग आढळलं सुहास शिरवळकरांचं ‘फलश्रुती’. चंद्रकांत बांदिवडेकरांचं ‘देशीवाण’ (खरं तर याला थेट पुस्तकावरचं पुस्तक म्हणता येणार नाही तरी संख्या वाढावी म्हणून घेतलंय). अलीकडे प्रकाशित झालेलं ‘वाचत सुटलो त्याची गोष्ट’ निरंजन घाटे यांचं पुस्तक, नाव आठवत नाहीये पण बहुधा रवींद्र पिंगे यांचं एक पुस्तक आहे. अजून समजा लक्षात न आलेली पंचवीसेक पुस्तकं असतील (फक्त समजा कारण एव्हढी नक्कीच नसतील) तरी एकूण संख्या सत्तरही भरत नाही, महाराष्ट्र देशी अशी पुस्तकांविषयीच्या पुस्तकांची अवस्था आहे!

जर आपण पुस्तकांना आणि पुस्तक संस्कृतीला समाजशास्त्रीय मूल्यमापनाचं ‘एकक’ गृहित धरत असू आणि त्याचं प्रमाण इतकं अत्यल्प असेल, त्यावरून लक्षात येतं ‘लीळा पुस्तकांच्या’ हे पुस्तक किती महत्त्वाचं आहे. हे पुस्तक केवळ पुस्तकांच्या जगाविषयी किंवा पुस्तकांविषयी माहिती देत नाही तर समाजाकडे, संस्कृतीकडे, स्वत:कडे बघण्यासाठी एक खिडकी प्रदान करतं. अशी खिडकी जी कुणासाठी उघडली तर लगेच उघडेल किंवा कुणासाठी कायमची बंद राहील.

(‘साहित्य सूची’च्या एप्रिल २०१८च्या अंकात संपादित स्वरूपात प्रकाशित झालेला मूळ लेख)

.............................................................................................................................................

लीळा पुस्तकांच्या - नीतीन रिंढे, प्रकाशक - लोकवाङ्मय गृह, मुंबई

मुखपृष्ठ - नीतिन दादरावाला. पाने – १९२, मूल्य – २५० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3383

.............................................................................................................................................

लेखक नितिन भरत वाघ कादंबरीकार व समीक्षक आहेत.

nitinbharatwagh@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......