‘आपले विचारविश्व’ :  गेल्या दशकातील मराठीतील एक सर्वोत्तम पुस्तक
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
टीम अक्षरनामा
  • प्रा. के. रं. शिरवाडकर (२५ ऑक्टोबर १९२६- २५ मार्च २०१८) आणि ‘आपले विचारविश्व’चं मुखपृष्ठ-मलपृष्ठ
  • Thu , 29 March 2018
  • ग्रंथनामा Granthnama वाचणारा लिहितो Vacahanara Lihito के. रं. शिरवाडकर K. R. Shirwadkar आपले विचारविश्व Aapale Vicharvishwa

प्राध्यापक आणि समीक्षक के. रं. शिरवाडकर यांचं २५ मार्च रोजी निधन झालं. ती बातमी समजल्या समजल्या त्यांचं ‘आपलं विचारविश्व’ हे पुस्तक आठवलं. या पुस्तकानं आठेक वर्षांपूर्वी मनावर गारुड केलं होतं. जगभरातल्या तत्त्वज्ञांच्या विचारांची साध्यासोप्या भाषेत ओळख करून देणारं हे पुस्तक नितांत वाचनीय, रसाळ आणि सुरस आहे.

शिरवाडकरांची ग्रंथसंपदा तशी फार नाही. १) मर्ढेकरांची कविता : सांस्कृतिक समीक्षा, २) साहित्यातील विचारधारा, ३) संस्कृती, समाज आणि साहित्य, ४) आपले विचारविश्व, ५) सार गीतारहस्याचे, ६) तो प्रवास सुंदर होता आणि ७) विल्यम् शेक्सपिअर : जीवन आणि साहित्य, अशी थोडीच पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. ‘तो प्रवास सुंदर होता’ हे पुस्तक म्हणजे कविवर्य कुसुमाग्रजांचं चरित्र आहे. ते त्यांनी अतिशय मर्मज्ञतेनं लिहिलं आहे. ‘संस्कृती, समाज आणि साहित्य’ हे त्यांचं पुस्तकही असंच वाचनीय आहे आणि महत्त्वाचं आहे. ते यासाठी की, या नावाची वा आशयाची मराठीतली पुस्तकं वाचल्यावर शिरवाडकरांच्या या पुस्तकाचं महत्त्व खासकरून अधोरेखित करावंसं वाटतं. कारण या नावाच्या मराठीतल्या बहुतेक पुस्तकांमध्ये ‘संस्कृती’, ‘समाज’ आणि ‘साहित्य’ यांच्या व्याख्यांबाबतच कमालीचा गोंधळ असतो. साहित्य म्हणजेच संस्कृती आणि साहित्य व संस्कृती ही समाजाची देण असते, अशा सरधोपट विधानांपलीकडे या पुस्तकांमधून फारसं काहीही हाती लागत नाही. शिरवाडकरांनी मात्र या तिन्ही शब्दांच्या काटेकोर व्याख्यांची उजळणी करत या संकल्पना रसाळपणे समजावून सांगितल्या आहेत.

पण शिरवाडकरांच्या एकाच पुस्तकाची निवड करायची झाली तर ‘आपले विचारविश्व’ याच पुस्तकाची निवड करावी लागेल. पण ती करण्याआधी या पुस्तकावर मराठीमध्ये कुणी कुणी काय काय लिहिलं आहे, याचा जरा धांडोळा घेतला तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला. कारण या पुस्तकाचं मोठेपण अनेकांनी सांगितलं आहे. मराठीतले दोन आघाडीचे संपादक पत्रकार, एक संशोधक-प्राध्यापक, एक आघाडीची कादंबरीकार-कवयित्री आणि एक खंदा वाचक यांच्या लेखांतील काही परिच्छेदच खाली देतो, म्हणजे त्यावर वेगळ्या भाष्याची गरज नाही हे स्पष्ट होईल.

(हे परिच्छेद निवडताना त्यातील शुद्धलेखनाच्या काही अनवधानानं राहिलेल्या चुका दुरुस्त केल्या आहेत. आणि सोयीसाठी सर्व मजकूर बोलीभाषेत केला आहे.)

२१ मार्च २०१० रोजी मराठीतील आघाडीच्या कादंबरीकार-कवयित्री कविता महाजन यांनी आपल्या ब्लॉगवर ‘आपले विचारविश्व’विषयी लिहिलं आहे -

“ ‘आपले विचारविश्व’ हे प्राचार्य के. रं. शिरवाडकर यांचं नवे पुस्तक हाती आलं, तेव्हा नेहमीप्रमाणे आधी थोडं चाळून पाहू आणि मग सवडीनं निवांत वाचू, असा विचार केला. मात्र एखाद्या उत्तम कलाकृतीत सहज स्वाभाविकपणे गुंगून जावं, तसं मी सुरुवातीची सत्तरेक पानं दिवसभरात सलग वाचली. जेवण तर राहिलंच, पण दिवसभराची आखलेली सगळी कामं बाजूला पडली… आणि संध्याकाळी ध्यानात आलं की पुस्तक वाचून संपेपर्यंत आता हे असंच होणार! पण तक्रार नव्हतीच, कारण असं अगदी क्वचित घडतं. थोडक्यात, हे पुस्तक म्हणजे माझ्यासारख्यांसाठी एक ‘दुर्मीळ घटना’च आहे!

प्रस्तावना वाचताच ध्यानात आलं की, एकंदरीतच वैचारिक आळसाच्या काळात आलेलं, करकचून चिमटा घेऊन जागं करणारं हे एक महत्त्वाचं पुस्तक आहे. ते जड नाही, हे त्याचं सगळ्यात सोपं वैशिष्ट्य. ते विविध विचारधारांची माहिती देतं, तुलना मांडतं, निष्कर्ष सांगतं, हे आहेच; पण मला ते भावलं याचं मुख्य कारण म्हणजे ते ‘आज’पासून आणि ‘समाजा’पासून कुठेही तुटलेलं नाही. सारे धागे वर्तमानाशी, सद्यःपरिस्थितीशी जोडून घेणं; त्याकडे गांभीर्यानं, तरीही साधेपणानं पाहणं; एखाद्या विचाराविषयी वा विचारवंताविषयी अधिक आपुलकी वा जवळीक वाटली तरीही (प्रभावात आल्यानं) कुणाला झुकतं माप न देणं; रसिक अभ्यासकाच्या अलिप्त संवेदनशीलतेनं विविध विचारांचा आस्वाद घेणं; कधी मिस्कीलपणे, तर कधी किंचित उपरोधाचा आधार घेत इतरांची व स्वतःचीही भाष्यं नोंदवणं; हे सारं फार चांगलं साधलं आहे.

अभ्यास म्हणजे काय चीज असते, हे विद्यार्थी-प्राध्यापकांना दाखवण्यासाठी जे म्युझियम नजीकच्या काळात आपल्याकडे उभारलं जाईल, त्यात हे पुस्तक पहिल्या फळीवर असेल… हे निश्चित!!”

(संपूर्ण लेख वाचण्यासाठी क्लिक कराhttps://kavitamahajan.wordpress.com)

दै. लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी २६ जून २०१० रोजी ‘आपले विचारविश्व’बद्दल लेख लिहिला आहे. त्यात ते म्हणतात -

“ “तत्त्वज्ञ माणसांनीच इतिहास लिहिला पाहिजे. आजवर लिहिला गेलेला इतिहास युद्धांच्या, म्हणजे सामूहिक गुन्हेगारीच्या नोंदींनी भरला आहे. युद्ध आणि क्रांती म्हणजे जीवन नव्हे. जीवनाचं खरं प्रतिबिंब संस्कृतीत पडत असतं. त्यामुळे खरा इतिहास हा संस्कृती आणि मानवी मन यांच्या उन्नयनाचाच असावा लागेल”, इतिहासाच्या तत्त्वज्ञानाची पहिली रूपरेषा आखणाऱ्या व्हॉल्टेअरचं हे म्हणणं आहे. व्हॉल्टेअर आणि रुसो जन्माला आले नसते, तर फ्रान्सची राज्यक्रांती झाली नसती हा जगानं मान्य केलेला निष्कर्ष ध्यानात घेतला की, त्याच्या या उद्गारांची थोरवी लक्षात येते. या वचनाची आठवण व्हावी असं एक विलक्षण ताकदीचं, अल्पाक्षर रमणीय आणि तरीही जगभरच्या तत्त्वचिंतनाचा पट वाचकांच्या मनःचक्षुपुढे समर्थपणे उभे करणारं 'आपले विचारविश्व' हे चारशे पृष्ठांचं ग्रंथवजा पुस्तक डॉ. के. रं. शिरवाडकर यांनी मराठी माणसांच्या स्वाधीन केलं आहे.” 

(संपूर्ण लेख वाचण्यासाठी क्लिक करा - http://sureshdwadashiwar.blogspot.in/2010/06/blog-post_2282.html)

ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी ‘वेध विचारवंतांचा आणि त्यांच्या विचारधारांचा’ हा लेख २९ ऑगस्ट २०१० रोजी दै. लोकसत्तामध्ये लिहिला आहे. त्यात ते लिहितात -

“एखादं पुस्तक लिहिणं हेही कधीकधी धाडस असतं. अगदी हिमालयाचं शिखर चढून जाण्याइतकं वा अॅमेझॉनच्या घनदाट जंगलात घुसून, कुणाच्याही मदतीशिवाय तेथील वनस्पती व प्राणीसृष्टीचा अभ्यास करण्याइतकं. प्रा.डॉ. केशव रंगनाथ शिरवाडकर हे असेच धाडसी शोधयात्री आहेत.

त्यांनी ‘आपले विचारविश्व’ या पुस्तकात जागतिक तत्त्वज्ञानाच्या अथांग चिंतनाचा शोध घेतला आहे. वयाची ८० वर्षं ओलांडल्यानंतर अशा विषयाचा असा अभ्यास व लेखन करणं आणि तेही वाचकाला थेट जाऊन त्या शोधयात्रेत सामील करून घेणं सोपं नाही. वेदांपासून आईनस्टाईनपर्यंत, अॅरिस्टॉटलपासून फ्रॉईडपर्यंत, बसवेश्वरांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आणि रामदास-तुकारामांपासून कांट, हेगेल, स्पेन्सपर्यंतची वैचारिक परिक्रमा करणं हे गंगा नदीच्या काठावरून त्या अवघ्या भूप्रदेशाची परिक्रमा करण्यासारखं आहे. ती परिक्रमा करताना त्यांना भगवान श्रीकृष्ण भेटतात आणि महात्मा गांधीही. योगी श्री अरविंद आणि कार्ल मार्क्सही. गुरू नानक आणि लोकमान्य टिळकही. या पुस्तकासाठी केलेल्या शोधयात्रेत त्यांना भेटलेले असे युगप्रवर्तक लोक पाहिले की, गेल्या सुमारे साडेतीन-चार हजार वर्षांत माणसाचं विचारविश्व किती समृद्ध होत गेलं आहे, याचा अंदाज येतो.”

(संपूर्ण लेख वाचण्यासाठी क्लिक करा - https://lekhsangrah.wordpress.com/)

इतिहासाचे प्राध्यापक डॉ. राजा दीक्षित यांनी ‘प्रभावी विचार-विश्वरूप दर्शन’ या नावानं दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये १६ जानेवारी २०११ रोजी ‘आपले विचारविश्व’चे परीक्षण लिहिले आहे. त्यात ते लिहितात-

“मराठीत 'तत्त्वज्ञान महाकोशा'सारखं साधन अभ्यासकांच्या हाताशी आहे. डॉ. ना. य. डोळे यांच्या 'राजकीय विचाराचा इतिहास' या ग्रंथाचाही उल्लेख करता येईल. परंतु तरीसुद्धा भारतातील व जगातील प्राचीन ते अर्वाचीन समग्र विचारधारांचा आलेख मांडणाऱ्या एखाद्या ग्रंथाची उणीव जाणवत होतीच. ही उणीव ख्यातनाम विचारवंत व समीक्षक डॉ. के. रं. शिरवाडकर यांच्या नव्या ग्रंथामुळे भरून निघाली आहे. 'आपले विचारविश्व' हा त्यांचा ग्रंथ म्हणजे मराठीतले एक प्रभावी विचार-विश्वरूप दर्शनच म्हटलं पाहिजे.” 

(संपूर्ण लेख वाचण्यासाठी क्लिक करा - https://maharashtratimes.indiatimes.com/-/articleshow/7294360.cms)

‘मायबोली’ या ऑनलाईन संकेतस्थळावर वरदा यांनी ‘आपले विचारविश्व’बद्दल १५ ऑगस्ट २०१२ रोजी लेख लिहिला आहे. त्यात त्या या पुस्तकाचे महत्त्व सांगताना लिहितात -

“इंग्लिशमध्ये रीडर्स किंवा कम्पॅनियन बुक्स ही एक फार मस्त सोय असते. कितीही किचकट, गहन विषय असला तरी त्या विषयाची सहज पण अचूक तोंडओळख करून देणारी पुस्तकं (पाठ्यपुस्तकं किंवा गायडं नव्हेत), तीही त्या विषयातील कुणी अधिकारी अभ्यासकानं लिहिलेली/संपादित केलेली. ही परंपरा मराठीत जवळजवळ नाहीच. आपल्याकडे कलाशाखेची (भयाण दर्जाची) पाठ्यपुस्तकं सोडता सर्वसामान्यांना आकलन होईल, अशा समाजशास्त्रीय विषयांवरील पुस्तकांची वानवा आहे. मुळात स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गुणवत्तेचे समाजशास्त्रज्ञ अगदी मोजकेच आहेत/ होते. आणि त्यातल्या बहुतेकांची हयात ही इंग्लिशमधून व्यावसायिक संशोधनपर लिखाण करण्यात गेली. काही जणांनी मराठीतून लिखाण केलं, पण ते तितकंसं समाजमानसापर्यंत पोचलं नाही (उदा - वि. म. दांडेकर). शिवाय इतिहास, संस्कृती वगैरे विषय जरा तरी आकलनाच्या टप्प्यातले आहेत, त्यांचा वर्ण्यविषय हा रस घेण्यासारखा आहे, हे सर्वसामान्य वाचकाला स्वाभाविकपणे वाटतं. त्या तुलनेत अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र असे विषय कोण मुद्दामहून वाचायला जाणार? आणि याही पलिकडचा अस्पृश्य विषय म्हणजे तत्त्वज्ञान. सर्वसामान्यच काय पण इतर समाजशास्त्रांचे विद्यार्थी, अभ्यासकसुद्धा ज्याला वचकून असतात असा विषय हा! जिथं अभ्यासकांनीच वाचायची मारामार, तिथं विद्यार्थी आणि इतरेजन कशाला वाचताहेत? पण या सगळ्या परिस्थितीला आणि समजाला छेद देणारं एकमेव पुस्तक मराठीत काही काळापूर्वी प्रसिद्ध झालं. त्याचं नाव 'आपले विचारविश्व'. जागतिक तत्त्वज्ञानाचा थोडक्यात आणि अत्यंत सुगम भाषेत आढावा घेऊन त्याची तोंडओळख सर्वसामान्य वाचकाला सहजी होईल हे बघणारं असं पुस्तक माझ्या समजुतीनुसार मराठीतलं पहिलंच रीडर/ कम्पॅनियन बुक ठरावं.

प्रा. के. रं. शिरवाडकर हे तत्त्वज्ञान विषयातलं भारतीय अ‍ॅकॅडेमिक्समधलं एक प्रख्यात नाव. मराठी माणसाला कुसुमाग्रजांचे धाकटे भाऊ म्हणूनच जास्त परिचित. आयुष्यभर प्राध्यापकी आणि संशोधन-लेखन केलं. आणि या सगळ्या वाचन-लेखन-चिंतनाचं सार असलेलं हे पुस्तक वयाच्या ८४व्या वर्षी त्यांनी लिहिलं.

या तत्त्वज्ञानाचा आढावा घेताना त्यांनी जाणीवपूर्वक फक्त चार महत्त्वाची क्षेत्रं विचारात घ्यायचं ठरवलं - तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, विज्ञान आणि देवधर्मविचार. त्यांच्याच म्हणण्यानुसार या चारी क्षेत्रांचा समग्र अभ्यास नव्हे तर या विचारप्रवाहांचं स्वरूप आणि दिशा कळणं शक्य व्हावं, हे या लेखनामागचं सूत्र आहे.”

(संपूर्ण लेख वाचण्यासाठी क्लिक करा - https://www.maayboli.com/node/37176)

या पाच उदाहरणांवरून काय अधोरेखित होतं. तर ‘आपले विचारविश्व’ या शिरवाडकरांचं पुस्तकाचं महत्त्व, मोठेपण आणि त्याची गुणवत्ता. किंबहुना गेल्या दशकभरात मराठीमध्ये तत्त्वज्ञानपर जी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत, त्यातील हे पुस्तक सर्वोत्तम म्हणावं लागेल. ज्या पुस्तकाला इतक्या भिन्न प्रवृत्तीची लेखक\अभ्यासक\पत्रकार\वाचक मंडळी गौरवतात, ते पुस्तक नक्कीच डावं असू शकत नाही, हेही नमूद करायला हवं. त्यामुळे या पुस्तकाचं वाचन करणं हे शिरवाडकरांनी आपल्यावर करून ठेवलेल्या ऋणातून उतराई होण्यासारखंच आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4405

.............................................................................................................................................

संपर्कासाठी

editor@aksharnama.com 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Satish Deshpande

Thu , 29 March 2018

हे पुस्तक प्रत्येक घरात असावे असे आहे. वेगवेगळ्या विचारधारा समजून घेत, आपल्या विचारांच्या कक्षा रुंद करायला हे पुस्तक मदत करते.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......