पत्रकार नेता बनू शकतो का?
पडघम - माध्यमनामा
राजदीप सरदेसाई
  • ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर
  • Mon , 26 March 2018
  • पडघम माध्यमनामा कुमार केतकर Kumar Ketkar राजदीप सरदेसाई Rajdeep Sardesai

एखाद्या पत्रकारानं एखाद्या राजकीय पक्षाच्या तिकिटावर राज्यसभेचं सदस्य बनावं का? माझे मित्र, पत्रकारितेमधील माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यावरचे माझे मार्गदर्शक कुमार केतकर महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभा सदस्य बनल्यापासून आणि राजकारणाच्या भुलवणाऱ्या मळ्याकडे आकर्षित झालेले सर्वांत अलीकडचे पत्रकार बनल्यापासून हा प्रश्न माझ्या मेंदूला कुरतडतो आहे. अर्थात राजकारणात उतरण्याचं किंवा खासदार बनण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहेच. तरीही मला शंका येते की, दिवसेंदिवस राज्यसभेच्या पदाला केल्या 'खिदमतीची' 'बक्षिसी' असं रूप तर येत चाललेलं नाहीये ना?

संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या सदस्यत्वाला अलीकडे आपल्या बगलबच्च्यांना संधी देण्याच्या वृत्तीनं ग्रासलंय. ते वर्तमानातल्या नाहीतर जुन्या ऋणांची परतफेड करण्याचं साधन बनत चाललं आहे. आपल्या वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांचा राजकीय गटांकडून निर्लज्ज वापर होऊ देत स्वत:च्या गळ्यात नेतेपदाची माळ घालून घेणारे प्रसारमाध्यमांचे ताबेदार तर याबाबतीत अधिकच दोषी आहेत. सामान्य माणसांच्या जगण्याचा स्तर उंचावण्याच्या प्रामाणिक इच्छेऐवजी स्वत:चं संपर्कजाळं/नावाची पत वाढवणं, सत्तेचा रस चाखणं आणि पैसा मिळवणं असेच हेतू त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेमागे आहेत असं दिसत आहे.   

आणि म्हणूनच ज्यांना पत्रकारितेच्या जगातील काही सर्वोत्तम बुद्धिमंतांमध्ये गणलं जातं अशा कुमार केतकरांचं राज्यसभा सदस्यत्व मनात काही संमिश्र भावना निर्माण करतं. एका बाजूने पहावं तर संसदेमध्ये हळूहळू आटत चाललेल्या बुद्धिमत्तेच्या साठ्यामध्ये कुमार केतकरांच्या जाण्यानं काही भर निश्चित पडेल, पण दुसऱ्या बाजूला वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमांचे संचालक म्हणून किंवा लेखक म्हणून ते जे जे काही बोलतील/लिहितील ते एखाद्या राजकीय महत्त्वाकांक्षेनं प्रेरित तर नाहीये ना, याबद्दलची साशंकता वाटण्याचा धोका अधिकच वाढणार आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर गेल्या काही काळापासून केतकरांची अशी पक्की धारणा बनलेली आहे की, नरेंद्र मोदींच्या नेतृत्ताखालील भाजप हा एक फॅसिस्ट पक्ष असून त्याला हरवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी काँग्रेस हाच एकमेव व्यवहार्य पर्याय आहे. माझ्या माहितीतले केतकर हे काही कुणाची हांजी हांजी करण्यात धन्यता मानणारे नक्कीच नाहीत.

मधल्या काळात माझ्या क्षेत्रातल्या अनेकांनी निव्वळ सत्ताधाऱ्यांच्या 'उजव्या' बाजूला राहता यावं म्हणून आपली विचारसरणी सोयीस्करपणे बदलली. (एकेकाळी येता-जाता हिंदुत्ववादी राजकारणावर टीका करणारे एक मोठे संपादक सध्या मोदींच्या सरकारात मंत्री आहेत!) केतकर अशा प्रकारे स्वत:च्या उमेदवारीसाठी कुणाचं लांगूलचालन करणाऱ्यातले नाहीत. खरं तर स्वतंत्र नागरिक या नात्यानं मिळालेल्या खासगी हक्कांचा भाग म्हणून आपली राजकीय मतं आणि समजुती उघडपणे मिरवणारा इतका 'तटस्थ' पत्रकार दुसरा नसेल. पण जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या राजकीय पक्षामध्ये प्रवेश करते, तेव्हा ती आपला 'स्वतंत्र' आवाज गमावून बसते. आणि अशा प्रकारे आपला स्वतंत्र आवाज गमावलेला पत्रकार, सत्तेला सत्य बजावून सांगू न शकणारा पत्रकार ही संज्ञाच निरर्थक आहे.

आपल्या व्यावसायिक इमानाशी किमान काही प्रमाणात तरी तडजोड केल्याशिवाय अशा दोन-दोन भूमिका निभावण्याची चैन वकिलांना परवडू शकते; पत्रकारांना नाही. एकदा का एखादा पत्रकार राजकीय भूमीमध्ये प्रवेश करता झाला की, स्वतंत्र पत्रकारितेचा कसलाही आव त्याला किंवा तिला आणता येत नाही.

असं असलं तरीही पत्रकार/संपादक आणि जनतेच्या निधीवर अवलंबून असलेली संवैधानिक पदं बाळगणारे यांच्यात काही फरक करणंही गरजेचं आहे. मला असं वाटतं की सेनादलप्रमुख किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा निवडणूक आयुक्त किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही संवैधानिक पदावरील व्यक्तीनं राजकीय भूमिका स्वीकारण्याआधी किमान दोन वर्षांचा अवकाश घ्यायला हवा. सहजपणे राजकीय पदांपर्यंत पोहोचलेल्या सरकारी पदाधिकाऱ्यांची संख्या निश्चितच चिंतित करणारी आहे, पण पत्रकारितेच्या क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीला, विशेषत: केतकरांसारख्या गेल्या काही वर्षांपासून मुक्त पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तीला मात्र आपल्या व्यक्तिगत इच्छा-आकांक्षांचा पाठपुरावा करण्याची मोकळीक असायला हरकत नाही. 

असं असलं तरीही संसदेच्या कामकाजात सक्रिय सहभाग नसलेला राज्यसभेचा एखादा खासदार सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात खरोखरीच काही अर्थपूर्ण बदल योगदान देऊ शकतो का याबद्दल मी साशंक आहे. (बऱ्याच जणांना तर बोलण्याची संधीही फारशी मिळत नाही.) केतकरांचा एकूण स्वभाव पाहता, त्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर ते बोलतील याची मला खात्री वाटते. उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा एक झुंजार पत्रकार आपण गमावला असला तरीही संसदेचा आब आणि सन्मान यांचं प्रतिनिधित्व करणारा एक सक्रिय खासदार या निमित्तानं आपल्याला मिळेल अशी आशा आपण करू या. त्यांचं शुभ चिंतूया आणि आपली भूमिका बदलणाऱ्या पत्रकार/प्रसिद्धीमाध्यमांच्या मालकांच्या यादीत पुढचं नाव कोणाचं जोडलं जातं याची वाट पाहू या.

बरं, राज्यसभेच्या खासदारकीसाठी इच्छुकांच्या रांगेत तुम्हीसुद्धा उभे आहात का अशी पृच्छा माझ्याकडेही झालेली आहे. (ट्विटरवर असलं की कुणाकडूनही कसलेही प्रश्न विचारले जाण्याची तयारी ठेवावी लागते.) त्यांना मी थट्टेत सांगतो, 'विचारल्याबद्दल आभार! पण आर. एस. ही आद्याक्षरं माझ्या नावात आधीच हजर आहेत!' काही वर्षांपूर्वी एका स्थानिक पक्षाच्या प्रमुखांनी त्यांच्या पक्षाच्या तिकिटावर राज्यसभेत जाण्याचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला होता. मी त्यांना नम्रपणे नकार दिला होता. म्हटलं, 'थँक यू, बट नो थँक यू'.

एका व्यावसायिक स्वतंत्र पत्रकारानं अखेरपर्यंत तसंच रहायला हवं, या विचारावरची माझी निष्ठा अढळ आहे. परखड मतं मांडणारा, घडणाऱ्या घटनांचा साक्षीदार, वृत्तांतकार ही आपली ओळख त्यानं जपावी; राजकारणाच्या चतुर खेळींमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होऊ नये असं मला वाटतं. ज्यांना राजकारणात जायचं आहे त्यांनी खुशाल जावं, पण त्याआधी पत्रकारितेवर पाणी सोडावं!

मराठी अनुवाद - चैताली भोगले

.............................................................................................................................................

हा मूळ इंग्रजी लेख राजदीप सरदेसाई यांच्या ब्लॉगवर १३ मार्च २०१८ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

http://www.rajdeepsardesai.net/blog-views/journalist-neta

.............................................................................................................................................

लेखक राजदीप सरदेसाई India Today groupचे consulting editor आहेत.

mail@rajdeepsardesai.net

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

प्रा. मे. पुं.  रेगे यांचे तात्त्विक विचार जागतिक तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात मौलिक असूनही ते विचार इंग्रजीत जावेत, असे त्यांचे चहेते असणाऱ्या सुशिक्षित वर्गाला का वाटले नाही?

प्रा. रेगे मराठी तत्त्ववेत्ते होते. मराठीत लिहावे, मराठीत ज्ञान साहित्य निर्माण करावे, असा त्यांचा आग्रह असला, तरी खुद्द रेगे यांच्या विचारविश्वाचे, त्यांच्या काही लिखाणाचे अवलोकन करता त्यांचे काही विचार केवळ कार्यकर्ते, विचारवंत आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, अन्य तत्त्वज्ञान प्रेमिक यांच्यापुरते मर्यादित नाहीत. त्यांच्या समग्र मराठी लेखनावर इंग्रजीसह इतर भाषिक अभ्यासक, चिंतकांचाही हक्क आहे.......

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......