अजूनकाही
“माणूस फक्त आशा आणि भय यांच्या तालावर नाचत असतो”, हे वाक्य साहित्यिक किंवा कोणत्या तरी आध्यात्मिक गुरूचं नसून प्रोपागंडा करणाऱ्या एका व्यापारी चमूचं आहे, असं सांगितलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. हाच नियम निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांनाही लागू होतो. त्यामुळे त्यांच्या मनातील अव्यक्त भावनांना हात घालून त्यांना नियंत्रित करणं किंवा त्यांची दिशाभूल करणं शक्य होतं. फेक न्यूज, धार्मिक उन्माद, निर्वासितांविरुद्ध पसरवत चाललेला विद्वेष आणि टोकाची प्रादेशिक/राष्ट्रवादी भूमिका, अशा संकुचित विचारधारांच्या जोरावर धुमाकूळ घालणारे अनेक गट\संस्था\पक्ष कार्यरत झाले आहेत.
फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इतर समाजमाध्यमांच्या विस्फोटामुळे आपल्या जीवनामध्ये काही सकारात्मक बदल झाले आहेत, नाही असं नाही. त्यातून बहुभाषिक, बहुसांस्कृतिक आणि बहुप्रादेशिक जणांमध्ये संवाद वाढावा, एकोपा वाढावा आणि सामंजस्य वाढावं अशी आशा होती. परंतु एका मर्यादेनंतर ती होताना दिसत नाही. समाजमाध्यमांवर जन्माला घातल्या जात असलेल्या फेक न्यूज, विरोधाला हिंसक पद्धतीनं संपवण्याच्या द्वेषाचं जे विषारी वादळ आलं आहे, ते खूपच भयानक आहे. त्यामुळे साम, दाम, दंड, भेद या पलीकडे जाऊन एका अतिशय क्रूर परंतु छुप्या पद्धतीनं सामाजिक मनाच्या मनोव्यापाराची शस्त्रक्रिया करणारं एक ताकदवान शस्त्र तयार केलं गेलं आहे.
या धोकादायक खेळामध्ये मतदार हे ‘ऑडियन्स सेगमेंट’ (ग्राहक गट) असतात. त्यांच्यापर्यंत राजकीय किंवा पक्षाच्या उमेदवाराचा संदेश-अजेंडा पोचवण्याला ‘इंटेलिजंट टारगेटिंग’ किंवा ‘स्ट्रॅटेजिक मॅसेजिंग’ असं म्हणलं जातं. मार्केटिंगमध्ये ‘ग्राहक मानसशास्त्र’ (कझ्युमर बिहेव्हिअर) ही एक विद्याशाखा आहे. त्याचा वापर करून बिग डेटाचं विश्लेषण करणाऱ्या संशोधन संस्था, कोट्यवधी रुपयांची मार्केटिंग-जाहिरात अभियानं आणि उद्योग-विश्वातील गलेलठ्ठ गुंतवणूकदार, सट्टेबाज लोकांकडून सत्तेची दिशा कशी बदलवली जाते, याची साखळी नुकतीच उघड झाली आहे.
केंब्रिज अॅनालिटीका या ब्रिटनमधील संस्थेनं फेसबुकवरील २,७०,००० युजर्सची खाजगी माहिती बेकायदेशीर पद्धतीनं पळवली आणि त्याचा वापर कसा राजकारणासाठी केला गेला, याचा पर्दाफाश ब्रिटनमधील ‘चॅनेल फोर’ या वृत्तवाहिनीनं स्टिंग ऑपरेशनच्या सहाय्यानं केला आणि संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली.
२०१६ मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमध्ये रशियास्थित किंवा रशियाच्या शक्तींनी जो हस्तक्षेप केला, त्याची परिणीती म्हणून डोनाल्ड ट्रम्प निवडून आले. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोठ्या प्रमाणात फेक न्यूज प्रसारित केल्या गेल्या. अमेरिकन समाजाला विभाजित करणारे संदेश प्रसारित करण्यात आले. त्यामुळे ट्रम्प यांचा विजय झाला, हे त्यातून उघड झालं.
ते समजून घेण्याआधी डॉ. अलेक्झांडर कोगन या केंब्रिज विद्यापीठातील मानसशास्त्र विभागातल्या प्राध्यापकानं काय केलं हे जाणून घेऊ. कोगननं विकसित केलेल्या अॅपद्वारे हजारो लोकांना पैसे देऊन सर्वेक्षण करवून घेऊन त्याद्वारे हजारो युजर्सच्या संपर्कातील लाखो मित्रांची फेसबुकवर असलेली सर्व वैयक्तिक माहिती आणि संवाद-सारांश डाऊनलोड करणं शक्य झालं. कोगन यांनी विकसित केलेल्या आणि वापरात आणलेल्या अॅपची ही ताकद एका राजकीय प्रचाराच्या अस्त्रामध्ये वापरण्याचं तंत्र मग केंब्रिज अॅनालिटीका या कंपनीनं विकसित केलं.
त्यानंतर ख्रिस्तोफर वायली या २८ वर्षीय संगणक अभियंत्यानं केंब्रिज अॅनालिटीकामध्ये संशोधन करून कोगन यांनी लाखो अमेरिकन लोकांची फेसबुकवरील माहिती गोळा केली आणि त्यावर काम करून त्याचा अमेरिकन निवडणुकीमध्ये विशिष्ट पद्धतीनं युद्धनीतीसारखा वापर केला.
अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीमध्ये ट्रम्प यांचा प्रचारप्रमुख असलेला स्टीव्ह बॅनॉन हा त्या वेळी केंब्रिज अॅनालिटीकाचा उपाध्यक्ष होता. अलीकडेच बॅनॉनने असं वक्तव्य केलं होतं की, "The data from Facebook is just about the cost of it. That data is out there, it's a marketplace for your data. It's bought and sold every day." या स्टीव्ह बॅनॉनबद्दल वायलीनं अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत.
‘चॅनेल फोर’ या वृत्तवाहिनीनं केंब्रिज अॅनालिटीकाचे अध्यक्ष अलेक्झांडर निक्स यांचा स्टिंग ऑपरेशननं भांडाफोड केला. केनिया, नायजेरिया, भारत, अमेरिका, ब्रिटन (विशेषकरून ब्रेक्झिट अभियान) या ठिकाणच्या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप कसा होतो, हे समजावून घेण्यासाठी ‘चॅनेल फोर’च्या पत्रकारानं श्रीलंकन वंशाच्या एका व्यक्तीच्या आधारे केंब्रिज अॅनालिटीका संस्थेच्या अध्यक्षाला भेटी दिल्या. श्रीलंकन निवडणुकीमध्ये प्रचार धोरण आखणं आणि त्यादरम्यान विरोधकांचं चारित्र्यहनन करणं, त्यांच्याबद्दल वाटेल त्या मार्गानं चिखलफेक करण्यासाठी लागणारी माहिती कोणत्याही मार्गानं मिळवणं आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व मुद्रित, इलेक्ट्रोनिक माध्यमांमध्ये अपप्रचाराचा धुराळा कसं उडवून देता येईल, त्यासाठी केंब्रिज अॅनालिटीकाचं ‘मार्गदर्शन’ कसं घेतलं गेलं, हे या चॅनेल फोरच्या पत्रकारानं स्टिंग ऑपरेशनमधून उघड केलं.
चार-पाच महिन्यांदरम्यान या चॅनेलच्या टीमनं केंब्रिज अॅनालिटीकाच्या लोकांबरोबर अनेक बैठका केल्या. जनमत वळवण्याचंच नाही तर त्याला द्वेषपूर्ण वळण देऊन त्याचं ध्रुवीकरण करण्याचं तंत्र कसं विकसित केलं आहे, त्याचबरोबर पैसे, स्त्रिया पुरवून विरोधी पक्षांतील लोकाना जाळ्यात ओढून त्यांची खरेदी किंवा सार्वत्रिक बदनामी कशी करता येईल, याची एक कार्यक्षम यंत्रणा कशी विकसित केली होती, ही सर्व माहिती या स्टिंग ऑपरेशनमधून बाहेर आली.
हे स्टिंग ऑपरेशन प्रसारित झाल्यानंतरच व्यापक स्तरावर जगामध्ये फेसबुकच्या भूमिकेबद्दल विचारणा सुरू झाली. त्यावर शेवटी मार्क झुकरबर्गनं त्यासाठी ‘मोठी चूक झाली ’ असं कबूल केलं. अशा अॅपवर काम करणारे तंत्रज्ञ, या अॅपचा व्यावसायिक नफा कमावण्यासाठी काम करणारे लोक आणि हा डाटाबेस वापरणाऱ्या मार्केटिंग संस्था यांच्यावर नजर ठेवायला हवी होती, त्यात आम्ही कमी पडलो असंही झुकरबर्ग म्हणाला.
असं म्हटलं जातं की, बुद्धिभेद झालेला समाज स्वत:वरचा विश्वास गमावून राक्षसी महत्त्वाकांक्षेचा पाठलाग करत चुकीच्या दिशेनं वाटचाल करतो. आपल्या कृत्यांचा पश्चाताप झालेल्या ख्रिस्तोफर वायली या संशोधन संचालकानं अलीकडेच ‘द गार्डियन’ या ब्रिटनमधील वृत्तपत्रासमोर मन मोकळं करत केंब्रिज अॅनालिटीकामधील गैरकारभार, त्यासाठी कोगन अॅपद्वारे झालेलं बेकायदेशीर माहितीसंकलन आणि स्टीव्ह बॅनॉननं याचा राजकीय कारणांसाठी अमेरिकन निवडणुकीमध्ये कसा धूर्तपणे वापर केला याचं विस्तृत वर्णन केलं आहे. वायलीनं यावेळी बॅनॉनच्या कार्यशैली आणि विचारधारेवर जो प्रकाश टाकला आहे, तो विचारात घेण्यासारखा आहे. तो म्हणतो, “बॅनॉनसाठी राजकारण हे एका महाप्रचंड संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि लोकशाहीतील लोक/नागरिक हे त्या संस्कृतीचे एक महत्त्वाचे एकक असतात. त्यामुळे ते कसा विचार करतात, किंवा त्यांच्या मनातील आशा/भय यांच्या आधारे त्यांनी कसा विचार करावा याचं नियंत्रण आपण करू शकतो. आधुनिक समाजमाध्यमं ही आपल्या मनातील खोलवर रुजलेल्या अशा भावनांचं नियंत्रण करून जर आपलं मतपरिवर्तन करू शकतात. त्यासाठी नागरिकांना फक्त विचार करायला लावण्यापेक्षा त्यांना भावनाविवश करणं सोपं असतं. कारण भावनेच्या आधारावर आपण झालेल्या मतपरिवर्तनाचं राजकीय सत्तेमध्ये परिवर्तन करू शकतो.”
वायली पुढे म्हणतो की, “फेसबुकद्वारे मिळालेली माहिती असेल, कोगेन अॅपनं खाजगी मर्यादेच्या फायरवॉलला भेदून संकलित केलेला संवेदनशील डाटाबेस असेल किंवा केंब्रिज अॅनालिटीकाद्वारे या माहितीच्या विश्लेषणाचा व्यापारी, स्वार्थी राजकारणासाठी केला गेलेला वापर असेल, या सर्वांनी अमेरिकन समाजामध्ये आणि जेथे जेथे याचा वापर केला गेला, तिथं तिथं समाजाचं विभाजन, विघटन करण्याचं काम केलं.”
सत्य शोधून काढण्याची शक्ती जेव्हा आपण गमावून बसतो तेव्हा राजकीय हेतूंनी सांस्कृतिक संघर्ष घडवून आणला जातो. राजकीय प्रचाराच्या पंखांवर मग विषमतेचे समर्थन करणारे आरूढ होतात आणि सत्तेच्या प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारची हिंसा करण्यासाठी सिद्ध होतात.
या प्रकरणामुळे उठलेलं वादळ भारतीय किनाऱ्यापर्यंत येऊन पोचलं आहे. कारण याच केंब्रिज अॅनालिटीकाची एक भागीदारी असलेल्या ‘ओव्हेल्नो बिजनेस इंटेलिजन्स’ या कंपनीनं भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि जनता दल युनायटेड या पक्षांना आपली सेवा दिल्याचा आरोप सध्या होतो आहे. भारतीय संदर्भामध्ये आणखी बरंच काही बाहेर यायचं आहे. ब्रिटनमधील ‘चॅनेल फोर’ या वृत्तवाहिनीकडून आणि ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राकडून भारतीय प्रसारमाध्यमं संस्था बोध घेऊन येथील सत्य बाहेर काढतील का?
.............................................................................................................................................
लेखक राहुल माने पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करतात.
creativityindian@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
vishal pawar
Tue , 27 March 2018
उपयुक्त माहिती....
Umesh Madavi
Mon , 26 March 2018
So important article in today's circumstances....