अशा अज्ञानी, अमानवी कृत्यामुळे संपूर्ण लोकशाहीची परंपरा कलंकित होते!
पडघम - देशकारण
डॉ. दत्ताहरी होनराव
  • त्रिपुरात भाजप कार्यकर्ते लेनिनचा पुतळा पाडत असताना
  • Mon , 26 March 2018
  • पडघम देशकारण त्रिपुरा tripura लेनिन Lenin नरेंद्र मोदी Narendra Modi

त्रिपुरामध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर लेनिन यांच्या पुतळ्यांची भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. ‘त्रिपुराचा विजय हा संघ परिवारातील प्रामाणिक कार्यकर्त्यांचा अनेक दशकांचा संघर्ष आहे’, असं मोदी-शहांनी सांगितलं; तर ‘सत्ता बदलानंतर प्रत्येक सत्ताधारी स्वत:चं राजकारण करतो. विरोधक सत्तेत आल्यावर वेगळं काय करतात?’, असं त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय म्हणाले. भाजपचे आधुनिक चाणक्य राम माधव यांनी तर दोन पावलं पुढे जाऊन ‘लेनिनचा पुतळा रशियात थोडाच पाडला आहे? तो आमच्या त्रिपुरात पाडला आहे’, असं बेमूर्वतपणे सांगितलं.

त्यानंतर देशाच्या विविध भागांत विविध विचारधारांच्या नेत्यांच्या पुतळ्यां लक्ष्य केलं गेलं. तामिळनाडूमध्ये रामास्वामी पेरियार, कोलकात्यात श्यामाप्रसाद मुखर्जी, उत्तर प्रदेशमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, केरळमध्ये महात्मा गांधी आणि उत्तर प्रदेशमध्ये हनुमानाच्या मूर्तीची विटंबना केली गेली. हे कशाचं लक्षण आहे? अॅरिस्टॉटलनं राज्याचा चक्रिय सिद्धान्तात काही काळानंतर ‘शुद्ध शासन’ प्रकाराचं ‘अशुद्ध शासन’ प्रकारात रूपांतर होतं असं म्हटलं आहे. ते आपण सध्या अनुभवतो आहोत, असं वाटतं.

एवढ्या मोठ्या देशात अशा असंवैधानिक घटनांना पंतप्रधानच जबाबदार असतात असं नाही. या पुतळे फोडा कार्यक्रमाचं कोणीही समर्थन करण्याचं कारण नाही. हे कृत्य करणारे डावे असोत वा उजवे असोत, त्यांना शिक्षा व्हायला हवी. पण दुदैवानं सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी बेजबाबदार वक्तव्यं करतात, एच. राजासारखे धमक्या देतात. त्यांना शिक्षाही होत नाही आणि पक्षश्रेष्ठींकडून त्यांचं प्रबोधनही केलं जात नाही. परिणामी कायदा सुव्यवस्था मोडीत निघते. एवढंच नव्हे तर राष्ट्र निर्माणाचा संपूर्ण प्रपंच खोळंबतो. हे कृत्य भारतीय सहिष्णू परंपरेला कलंकित करणारं आहे.

श्यामाप्रसाद मुखर्जी सोडता लेनिन, पेरियार, डॉ. आंबेडकर व महात्मा गांधी ही सर्व कामगार, उपेक्षित, कष्टकरी आणि बहुजनांची श्रद्धास्थानं आहेत. त्यामुळे यातून ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर असा संघर्ष पेटला तर अथक परिश्रमानं निर्माण केलेली लोकशाही धोक्यात येईल, हे या उपटसुंभांना ज्ञात आहे का?

आपल्या पूर्वजांनी धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्र निर्माण करायचं म्हणून धर्माच्या आधारावर फाळणी झाली असतानाही सर्व धर्मांचा आदर करणारं, सर्वधर्मसमभाव आचरणारं उत्कृष्ट संविधान निर्माण केलं. आपल्या देशात परस्परविरोधी विचार परंपरा एकत्र नांदतात. ‘विविधतेत एकता’ हे आपल्या राष्ट्राचं वैशिष्ट्यं आहे. बुद्ध, महावीर वर्धमान लोकायत, चार्वाक, महात्मा बसवण्णा आदी दया, शांती, प्रज्ञा, शील व करुणेची शिकवण देणाऱ्या अहिंसावादी तत्त्ववेत्त्यांची मोठी परंपरा आहे. सहिष्णुता या मूल्यामुळे टिकून असणारी सर्वांत जुनी संस्कृती असणाऱ्या या राष्ट्रात अशी तालिबानी कृत्यं का होत आहेत, याचा आपण गांभीर्यानं विचार केला पाहिजे. 

हे लोक वेळोवेळी पाकिस्तान-अफगाणिस्तानातल्या कायद्यांची भारतातल्या कायद्यांशी तुलना करतात. त्यांना भारताला पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या वाटेवर न्यायचं आहे काय? सज्जनांची निष्क्रियताच दुर्जनांना बळ देते. आपल्या निष्क्रियतेमुळे तर लोकशाहीचं झुंडशाहीत रूपांतर होत नाही ना, हे तपासून पाहिलं पाहिजे. लोकशाहीत विरोधी पक्ष नेता पंतप्रधानासमान असतो. विरोध व विरोधी पक्षाच्या भूमिकेविना लोकशाही पूर्ण होत नाही.

लोकशाही मार्गानं डाव्या विचाराला शह देण्याचे सगळे पर्याय उपलब्ध असताना हा असा क्षोभ व्यक्त करणं, हे अमानवी आहे. पुतळे पाडून डावा विचार संपेल हा भाबडा आशावाद जन्म घेतो, तो अस्मितेच्या कुशीत. आणि मग बुलडोझर घेऊन झुंड निघते, लेनिनचा पुतळा पाडून स्वतःच्या विजयाचा उन्माद साजरा करायला. डाव्यांच्या सत्तेचं प्रतीक असलेल्या लेनिनचा पुतळा आम्ही पाडतोय असा त्यांचा दावा असतो. आणि दुर्दैव म्हणजे अशाच पाशवी सत्तेचं प्रतीक असलेल्या मनूचा राजस्थान उच्च न्यायालयासमोर पुतळा आहे. त्याबद्दल चकार शब्द काढायला ही झुंड तयार नसते.

खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकाराबाबत बोलताना म्हटलंय की, ‘लेनिन विदेशी होते, एकाप्रकारे ते दहशतवादीच होते. अशा व्यक्तींच्या पुतळ्यांची आपल्या देशात काय गरज आहे? कम्युनिस्ट पक्षांना हवं असेल तर त्यांनी तो पुतळा त्यांच्या कार्यालयात बसवावा आणि त्याची पूजा करावी.’ यातील विसंगती लक्षात घेतली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मनुस्मृती’ दहन केलं. ते खऱ्या अर्थानं विषमतेचं दहन होतं. एवढंच नव्हे तर संविधान सभेत बोलताना ते म्हणाले, ‘एका हातात ‘संविधान’ आणि दुसऱ्या हातात ‘मनुस्मृती’ चालणार नाही.’ पण ही दांभिक प्रवृत्ती नष्ट न होता वाढतच आहे.

भोवताली ज्या घटना घडतात, त्यांचा सर्वांगीण आणि संपूर्ण अर्थ जनतेला आकलन झालेला असतोच असं नाही. शिवाय स्मरणशक्ती अतिशय दुबळी असते. हा मुद्दा काही दिवसांनी महत्वाच्या बातम्यांतून गायब होईल. जनतेची स्मृती कमी असते म्हणतात. पुन्हा कुठलं तरी प्रकरण निघेल. अशा अवस्थेत वेळोवेळी आपल्या सर्व श्रद्धा पुन: पुन्हा घासून पुसून तावूनसुलाखून घेण्याची गरज असते.

लेनिनचा पुतळा पाडणारे आणि लेनिनच्या क्रांतीमार्गाचं समर्थन करणारे, हे दोन्ही अस्मितावादी गट विस्मरणात जातील. जागतिक परिणामाला पंतप्रधानांना सामोरं जावं लागेल. पंतप्रधान मोदी जगानं भारतात बिनदिक्कत गुंतवणूक करावी असं आवाहन करतात, तेव्हा त्यांच्या पुढे असं पुतळे पाडापाडीचं राजकारण अडसर ठरू शकतं, पण लक्षात कोण घेतं?

लोकशाही समाज म्हणवून घेताना विचारांचा लढा विचारानं लढायचा असतो, या मूलभूत मूल्याला पायदळी तुडवणारे दोन्ही गट या दिशाभूलीला तितकेच जबाबदार आहेत. लेनिनच्या क्रांतिकारी विचारधारेनं एकेकाळी आपले हजारो स्वातंत्र्यवीर झपाटलेले होते. लोकमान्य टिळक त्यांच्या विचारांनी प्रभावित झाले होते. श्रीपाद डांगेंनी तर 'गांधी व्हर्सेस लेनिन' या नावानं पुस्तकच लिहिलं आहे. महात्मा गांधींनी रशियन राज्यक्रांती ही शतकातील महान व अद्भुत घटना असल्याचं म्हटलं आहे. शहीद भगतसिंगदेखील लेनिनच्या विचारांनी प्रभावित झाले होते. भगतसिंग यांच्या फाशीच्या दोन दिवस आधी, त्यांचे कायदेविषयक सल्लागार प्राणनाथ मेहता यांनी काही हवं का असं विचारल्यावर भगतसिंगांनी त्यांना एक पुस्तक आणायला सांगितलं. फाशीची वेळ झाल्यावर तुरुंग कर्मचारी भगतसिंगांना न्यायला त्याच्या कोठडीजवळ आला, तेव्हा भगतसिंग ते पुस्तक वाचत होते. निघायला सांगताच भगतसिंग म्हणाले, ‘ठहरो, एक क्रांतिकारी की दुसरे क्रांतिकारी के साथ मुलाकात हो रही है.’ पुस्तक संपल्यानंतर भगतसिंग म्हणाले, ‘चलो’.

ते पुस्तक लेनिनचं चरित्र होतं. लेनिन-भगतसिंग यांचं हे युगप्रवर्तक नातं त्रिपुरातील लेनिनचा पुतळा पाडल्यामुळे नव्यानं देशासमोर आलं. हे लक्षात घेऊन प्रत्येकांनी विचारपूर्वक कृती करायला हवी. आपली परंपरा, इतिहास समजून घ्यावा. अशा पुतळे पाडापाडीच्या तालिबानी कृत्यापासून दूर राहावं. अन्यथा लोकशाहीचं रूपांतर झुंडशाहीत व्हायला वेळ लागणार नाही.

सर्वसामान्य समाजाच्या मनात जे ग्रह पूर्वग्रह असतात, त्यांची निर्भयपणे चिकित्सा करण्याचं काम अलीकडे मंदावलेलं आहे. एखाद्या व्यक्तीविषयी मनात आदर असणं आणि त्या व्यक्तींची मतं मान्य नसणं, या दोन गोष्टी एकत्र संभवतात हेच आपण विसरून गेलेलो आहोत. मतं पटण्याचा आणि आदराचा संबंध नसतो. आदराचा संबंध त्या माणसानं केलेल्या कामाचं मोल पटण्याशी असतो. नेत्याची जात कोणती? एखाद्या जातीत जन्मले म्हणून राष्ट्रपुरुष त्या जातीची संपती होत नसतात. ते संपूर्ण राष्ट्राची संपत्ती असतात. शुद्र जातीय, पक्षीय द्वेषातून राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याची विटंबना हे लोकशाहीचं नाही तर झुंडशाहीचं लक्षण आहे. अशा अज्ञानी, अमानवी कृत्यामुळे संपूर्ण लोकशाहीची परंपरा कलंकित होते.

.............................................................................................................................................

लेखक डॉ. दत्ताहरी होनराव श्री हावगीस्वामी महाविद्यालय (उदगीर) इथं राज्यशास्त्र विभाग प्रमुख आहेत.

dattaharih@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Vijay P

Mon , 26 March 2018

ज्यांनी आयुष्यभर मराठी भाषेची आपल्या साहित्यातून सेवा केली त्या राम गणेश गडकरी यांचा पुण्यातील पुतळा जेव्हा गावगुंडाकडून उखडला गेला, तेव्हा स्वत:ला प्राध्यापक वगैरे म्हणवणारे विद्वान लोक जणू तोंडात गुळण्या घेउन गप्प होते. आणि कोण कुठचा हा लेनिन, त्याचा पुतळा जेव्हा तिकडे दूर त्रिपुरात पाडला जातो, तेव्हा मात्र या कुडमुड्या विद्वानांना लगेच भारतातील लोकशाही धोक्यात आल्याचा साक्षात्कार होतो. म्हणजे ज्यांचा पुतळा पाडला जातो तो कोणत्या जातीधर्माचा वगैरे आहे हे पाहून हे कुडमुडे विद्वान निषेध करायचा कि नाही ? आणि त्यावरून लोकशाही धोक्यात आहे कि नाही हे ठरवतात का ? आणि तसे असल्यास तो या लोकांचा ढोंगीपणा नाही का ?


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......