अजूनकाही
‘वंदेsss मातरम्...’ असं ऐकायला आलं की, ते फोन उचलतात. खड्या आवाजात ‘कोण?’ विचारतात आणि तिकडून स्पष्टीकरण मिळालं की, गरजेनुसार बोलतात. त्यांच्या ‘स्मार्ट फोन’मध्ये अनेक क्रमांक ‘सेव्ह’ नसावेत. साधा चहा नाही, ते ‘ग्रीन टी’ पितात. भरपूर बोलतात, मनमोकळं हसतात. बोलता बोलता मिश्किल टिप्पणी करतात. ‘ऋग्वेदा’तल्या ऋचा, ‘मनुस्मृती’तले श्लोक त्यांना योग्य उदाहरणासाठी सहज आठवतात. खूप काही सांगतात आणि बऱ्याचदा आधी म्हणतात, ‘हे फक्त ऐका. लिहून नका घेऊ!’ त्यांच्याकडे अनेक आठवणी आहेत, किस्सेही आहेत.
माजी मंत्री, अभ्यासू राजकारणी आणि विचारवंत ही अॅड. बी. जे. खताळ पाटील यांची ओळख. परिपूर्णतेबाबत आग्रही. ते आज सोमवार, २६ मार्च रोजी १००व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. विधानसभेत संगमनेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खताळ पाटील यांनी मंत्री म्हणून दीर्घ काळ काम केलं आणि ठसा उमटवला. पासष्टीनंतर ते निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त झाले. मग ते लिहिणं-वाचणं यात रमले. संगमेनरच्या घरातील कपाटात शिस्तीनं लावलेले ग्रंथ त्यांची सोबत करतात. गेल्या चार वर्षांत त्यांची दोन पुस्तकं प्रकाशित झाली. आत्मचरित्र लिहा, या आग्रहाला मात्र त्यांचा ठाम नकार असतो. त्याचं कारण ते ‘माझं वय झालं आता’ असं देतात!
खताळ पाटील, अर्थात ‘दादा’, गेले काही दिवस पुण्यात मुक्कामी आहेत. तेथेच त्यांच्याशी दिलखुलास गप्पा झाल्या. प्रश्नांचा कागद हाती दिल्यावर त्यातला पहिला प्रश्न मनाशीच, पण मोठ्यानं वाचून कागद परत देत ते म्हणाले, ‘विचारा काय ते तुम्हीच.’ बोलताना आवाज कधी उंचावत नाही; पण स्वतःच्या मतावर ठाम असतात. संदिग्ध असं काही ते बोलत नाहीत; हिणकस टीका नसते कुणावर. काही वेळा छापण्यासाठी नाही, तर फक्त ऐकण्यासाठी ते माहिती देतात. बहुतेक वेळा त्यामागचा हेतू असा की, आपल्या तोंडून स्वस्तुती नको!
.............................................................................................................................................
‘तेच जुनं सगळं पुन्हा नव्यानं पाहायला मिळत आहे...’ वयाची एक्याऐंशी वर्षं पूर्ण केल्यानंतर एका ज्येष्ठ नेत्यानं मुलाखतीत अशी भावना बोलून दाखवली होती. म्हणजे फिरून आपण तिथंच येतो. पृथ्वी गोल आहे! आता शंभरीत पदार्पण करताना तुम्हाला काय वाटतं दादा?
- तसंही असेल. हा निसर्गाचा नियम असावा कदाचित. जन्म आहे म्हणून मृत्यू आहे आणि मृत्यू आहे म्हणून जन्म आहे. निसर्गाच्या नियमानुसार आहे तेच राहत नाही. बदल होत राहतो. पण काय असतं, कृती तीच, आयुधं बदलतात. त्यामुळे निर्णय बदलत नाही, निकाल बदलत नाही आणि परिणामही बदलत नाही. त्यामुळे त्यांचं म्हणणं तसं खरंच आहे की.
साधारण वयाची पासष्टी गाठल्यानंतर सक्रिय राजकारणातून तुम्ही निवृत्ती घेतली. पुन्हा राजकारणात उतरावं, असं नंतर कधी वाटलं का?
- मुळात मला ‘राजकारणातून निवृत्ती’ हा शब्दप्रयोग मान्य नाही. केवळ ‘सत्तेचं राजकारण’ हा संकुचित अर्थ ‘राजकारण’ या शब्दाला नाही. आणि मला सांगा, राजकारण कुठं नाही? प्रत्येक क्षेत्रात आहे. आपलं अस्तित्व जगाला भासणं, त्यासाठी धडपड करणं, हेच खरं राजकारण! मग ते घरात, गल्लीत, गावात, प्रदेशात केलं जातं. ते कुठं कुणी कधी सोडलं? जागेचा फरक पडतो, काळाचा फरक पडतो; पण राजकारण असतंच. मी ‘निवडणुकीच्या राजकारणातून’ निवृत्त झालो. निवडणूक हा राजकारणाचा छोटासा भाग आहे. एकदा निवृत्तीचा निर्णय घेतल्यावर मी ठाम राहिलो. सत्तेच्या राजकारणात पुन्हा उतरावं, असं नंतर नाहीच वाटलं.
संयुक्त महाराष्ट्राला तुमचा पाठिंबा आणि काँग्रेसचं धोरण नेमकं त्याच्या विरुद्ध; म्हणून तुम्ही १९५७ची निवडणूक लढवली नाही. संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या तुम्हा सगळ्यांचं स्वप्न कितपत प्रत्यक्षात उतरलं? विशेषतः प्रादेशिक असमतोल, त्याबद्दलची नाराजी, स्वतंत्र राज्याची मागणी...
- सर्व मराठी भाषकांचा एक प्रदेश असावा; आचार-विचार समान असणाऱ्यांचं एक राज्य असावं. एक राज्य असलं म्हणजे त्यांना परस्परांसी बोलता-सांगता येईल, असा विचार होता तेव्हा. अधिक स्वातंत्र्य मिळेल, अशीही भावना होती. पक्षाला सांगितलं होतं की, निवडणुकीत पक्षाचं प्रतिनिधित्व करणार नाही. पण पक्ष उमेदवारी देईल, त्याचा प्रचार नक्की करेन.
आम्हाला मराठी भाषक प्रांत हवा होता. पण इथं मराठी तरी कुठं एक सारखी आहे? विदर्भात वेगळी, वऱ्हाड, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागातली मराठी वेगळी. मुळातच प्रदेशाच्या सीमा ठरवणं अवघड काम आहे. दर पाच-दहा मैलांवर आचार-विचार आणि भाषाही बदलत राहते. प्रादेशिक विचाराला एकदा खत-पाणी घातलं की, तो आहे तिथंच राहत नाही. त्याला नाना फाटे फुटतात.
आता स्वतंत्र विदर्भाची मागणी होत आहे. कुणी सांगावं, उद्या मराठवाडा, कोकणही आमचं वेगळं राज्य हवं, असं म्हणतील. झारखंड, छत्तीसगड, तेलंगण... अशी राज्यं झालीच की. ही संकुचित वृत्ती आहे. याला आम्ही खत-पाणी घातलं, असं आता जाणवतं. हे भावनिक राजकारण होतं आणि आहे. या मागचं महत्त्वाचं खरं कारण म्हणजे सत्तेची अभिलाषा, हेच.
प्रादेशिक असमतोलाबाबत तुम्ही विचारलंत. अहो, सर्वांचं एकदम कल्याण करणं साक्षात परमेश्वरालाही शक्य नाही! आपण कोण करणार? शेतकरीही पिकाला पाणी देतो, तेव्हा आधी एकाच वाफ्याला मिळतं. तो भरला की, पाणी पुढं पुढं जातं.
प्रागतिक राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखला जाई. आजच्या महाराष्ट्राला ते विशेषण लावता येईल का?
- शब्दशः म्हणताय? मग नाही म्हणता येणार तसं. प्रगतीच्या आड भांडणं आहेत. राजकीय भांडणं. अपेक्षेएवढी राज्याची प्रगती होत नाही, हे खरं आहे. पण प्रगती खुंटलीच आहे, असंही नाही. फक्त ती अपेक्षित गतीनं होत नाही. एकदा स्वार्थाच्या आग्रहाचे अंकुर फुटले की, त्यातून हे होतं. (सत्ता मिळवण्यासाठी) थोडा दम धरण्याची कुणाची इच्छा नाही. त्यातून मग प्रगतीला खीळ बसली आहे. पण ती होत राहील, असं आशावादी आपण राहूया.
देशात म्हणा, आपल्या महाराष्ट्रात म्हणा, अलीकडच्या काही वर्षांमध्ये वेगवगेळ्या अस्मिता अधिक टोकदार बनताना दिसत आहेत. मराठा क्रांती मोर्चा, पाटीदार आंदोलन, आता कर्नाटकात स्वतंत्र लिंगायत धर्म... आर्थिक आघाडीवर ‘आलबेल’ नसल्यानं सामान्य माणसांना भावनिक प्रश्न ‘आपले’ वाटू लागतात का?
- सत्ता, स्वार्थ यातून हे सुरू आहे. सत्तेच्या अभिलाषेपोटी हे सगळं घडत आहे. सत्ता मिळवण्यासाठी निवडणुकीत सरसकट खोटी आश्वासनं देतात हे, त्याचा हा परिणाम. आता राखीव जागांचंच बघा. सर्वांनाच हव्या आहेत राखीव जागा. त्यासाठी स्पर्धाच चालू झाली. मंडल आयोग लागू केल्यापासून हे सुरू झालं मोठ्या प्रमाणात. जनतेला सरकारनं, त्यातल्या शहाण्या माणसांनी समजावून सांगायला पाहिजे ना. ज्यांच्या हाती सत्ता आहे आणि ज्यांना सत्तेवर यायचं आहे, अशांनी देशाचं हित डोळ्यापुढे ठेवून वेगवेगळ्या समाजघटकांना समजावून सांगायला नको का याबद्दल? पण उलंटच होतं आहे. समजावण्याऐवजी भडकावल्याचे परिणाम आहेत हे.
असंख्य शेतकरी आज अस्वस्थ आहेत. केंद्र सरकारनं २००८मध्ये कर्जमाफी केली. त्यानंतर आठ-नऊ वर्षांतच पुन्हा कर्जमाफीची मागणी. म्हणजे कुठं तरी, काही तरी चुकतंय... ही चूक काय आणि दुरुस्त कुणी करायची?
- बरोबर आहे. चुकल्याशिवाय घटना घडत नाही. वस्तुस्थितीचा विचार न करता निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचं हे फळ आहे. तिजोरीत काय आहे नि किती आहे, याकडं लक्ष न देता मतं मिळवण्यासाठी निवडणुकीत भरमसाट आश्वासनं दिली जातात. ती अंगाशी येतात, दुसरं काय! पहिली कर्जमाफी आमच्या सरकारने १९८०मध्ये दिली. त्यासाठी आम्ही तेव्हा घासाघीस केली नाही की, शेतकऱ्यांचं कर्ज माफ केल्यानं सरकारही अडचणीत आलं नाही. सरकार म्हणजे ‘व्यवस्था’ आहे; कुणी ‘मी-तू’ नाही. तेव्हा दोषारोप करत न बसता, प्रश्नांकडे लक्ष देऊन उपाय सुचवले पाहिजेत.
राज्य मंत्रिमंडळात तुम्ही दीर्घ काळ, वेगवेगळ्या खात्यांचे मंत्री होता, दादा. त्यातलं तुमचं सर्वांत आवडतं खातं कोणतं? ठरवलेलं एखादं काम करता आलं नाही, अशी काही खंत आहे मनात?
- खरं तर नियोजन खातं मला सगळ्यात जास्त आवडतं. पण ते लोकांशी थेट संबंध असलेलं खातं नाही. पाटबंधारे खातं खूप काळ पाहिलं. त्याचं काम मला आवडतं. कारण ते पाण्याचं खातं. पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगासाठी लागतं. त्यातून जनतेशी प्रत्यक्ष संबंध येतो. तिथं काम केल्याचं समाधान मला मनापासून मिळालं. त्या माध्यमातून प्रश्न सोडविता आले, याचा आनंद आहे. ठरवलेलं कोणतंही काम करता आलं नाही, असं झालं नाही.
तुम्हाला कधी मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पडलं नाही का? त्या शर्यतीत अजमावून पाहावं, असं नाही वाटलं कधी?
- यशवंतरावांपासून (चव्हाण) अंतुले यांच्यापर्यंत वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. एक सांगतो, यापैकी कोणी कधीच मला अडवलं नाही. माझी भूमिका नेहमीच तात्त्विक असे. स्वतःचं काही नसे; त्यामुळे त्यांनी आपली मतं जुळवून घेतली. या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी मला नेहमीच आदरानं वागणूक दिली. ‘हा माणूस चुकीचं काही करणार नाही,’ एवढा त्यांचा विश्वास मी मिळवला होता. चव्हाणसाहेबांच्या काळात तर मी अगदी नवोदित होतो. पण त्यांनी चांगलीच वागणूक दिली. या सगळ्यांचे चांगलेच अनुभव असल्याने आपण मुख्यमंत्री व्हावं, असं मला मनापासून वाटलं नाही. त्यामुळे तशी कधी अपेक्षाच ठेवली नाही.
भारतीय जनता पक्षाची घोषणा आहे, त्याप्रमाणं देश खरंच काँग्रेस ‘मुक्त’ होईल, असं वाटतं? हा सबगोलंकारी पक्ष आता कालबाह्य झाला आहे का?
- लक्षात घ्या, काँग्रेस त्या अर्थानं चळवळ आहे. हा पक्ष ‘केडर बेस’ नाही, तर ‘मास बेस’ असलेला आहे. या पक्षात मतवैशिष्ट्याला, मतवैविध्याला स्थान आहे. त्यामुळेच काँग्रेस टिकली आणि टिकणार आहे. काँग्रेस एक विचार आहे; कुणी एक व्यक्ती नाही! ‘काँग्रेस’ हा शब्द सोडा, पण तो विचार आहे, हे एकदा मान्य केलं की, तो बदलणं शक्य नाही. या देशात एका धर्माचं राज्य येणं कदापि शक्य नाही, हे मी पुन्हा सांगतो.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारचं मूल्यमापन तुम्ही कसं कराल?
- मोदी सरकार काय, फडणवीस सरकार काय... त्यांची पाच वर्षांची मुदत होऊ द्या पूर्ण. त्यांना लोकांनी पाच वर्षांसाठी निवडून दिलंय ना. मग करू मूल्यमापन. समजा त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील, तर त्या सुधारण्याला अजून संधी आहे ना त्यांना. निवडणुकीला अजून एक वर्ष आहे. वर्षभरात त्यांच्याकडून काय होतंय ते पाहू. आणि मतदाराला वाटलं की, यांचं चुकलं, तर त्याला (विरोधात) मत देण्याची संधी आहे की. सध्या असं दिसतंय की, प्रसारमाध्यमं उतावीळ झाली आहेत. त्यातून हे मुदतीपूर्वीच मूल्यमापन सुरू होतं. पूर्वीच्या माध्यमांनी लोकांना दिशा दिली, चिथावलं नाही!
‘देश महासत्ता बनणार’ असं आपण २० वर्षांपासून ऐकत आहोत. हा भाबडेपणा, आशावाद की स्वतःचीच फसवणूक?
- मला ‘महासत्ता’ शब्दाचा नेमका अर्थ काय सांगा बरं. हे तुलनात्मक आहे. तुलना करत राहायची, हे प्रसारमाध्यमांचं काम. आशिया खंडातल्या देशांच्या तुलनेत आपला देश मोठा आहेच की. मग ‘महासत्ता’ म्हणजे काय अमेरिकेच्या वर? ते शक्यच नाही! तो भौगोलिकदृष्ट्या तिप्पट मोठा देश आहे; संपन्न आहे. आपल्या आणि त्यांच्या लोकसंख्येतला फरक बघा. असं असलं, तरी आम्ही काही कामी नाही आहोत. अन्नधान्यात स्वयंपूर्ण झालो आहोत. आमच्याहून दरिद्री देशांना प्रसंगी मदत करतो. झालं तर मग.
आजची एकूण परिस्थिती बघता निराश वाटतं की आशावादी राहावं?
- अरेच्चा! आशा का सोडायची? आशा सोडली की, माणूस संपला. बदल तर अपरिहार्य असतातच. काळाची वाट पाहायची. पण आशा कधी सोडू नका. मी तर नेहमीच आशावादी राहिलो आणि राहणार आहे.
.............................................................................................................................................
दोन महिन्यांपासून खोकल्याचा त्रास असला, तरी दादांची प्रकृती एरवी उत्तम आहे. त्यांना व्यवस्थित ऐकू येतं, चष्मा न लावता ते वाचतात आणि हास्यविनोद करत भरपूर वेळ बोलतातही. त्यांची दिनचर्याही अगदी पाहण्यासारखी आहे. रोज पहाटे चार-साडेचार वाजता ते उठतात. दोन-अडीच मैल चालून आल्यावर काही योगासनं करतात. त्यानंतर मनाच्या नियंत्रणासाठी आणि एकाग्रतेसाठी ध्यानधारणा. (‘बुद्धानं सांगितलेल्या पद्धतीनं ध्यान’ असे दादांचे नेमके शब्द.) या आन्हिकानंतर ते वृत्तपत्रांचं वाचन करतात. काही नवीन पुस्तक असलं तर तिकडे लक्ष देतात. संगमनेरमधल्या घरातील त्यांच्या खोलीतील कपाटांमध्ये असंख्य पुस्तकं नीटनेटकी लावून ठेवलेली दिसतात. दिवसभर लिहिणं, आलेल्या माणसांना भेटणं चालूच असतं. एवढं सगळं झाल्यावर रात्री अकरा वाजता ते झोपतात.
खाण्याच्या आवडीनिवडीबद्दल विचारल्यावर दादा म्हणाले, ‘‘मला साधं जेवण लागतं. फार तिखट-तेलकट-तुपकट चालतच नाही. माफक खातो; अपचन होईल एवढं कधीच खाल्लं नाही!’’
.............................................................................................................................................
लेखक सतीश स. कुलकर्णी मुक्त पत्रकार व ब्लॉगर आहेत.
sakul05@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment