‘उदध्वस्त धर्मशाळा’नंतर ‘कोपनहेगन’ इतकं सकस वैचारिक नाटक बघायला मिळालं नव्हतं!
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘कोपनहेगन’मधील काही दृश्यं
  • Sat , 24 March 2018
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe कोपनहेगन Kopanhegan

कोणत्याही समाजात शास्त्रज्ञ, कलाकार, लेखक/ कवी आदरणीय मानले जातात. त्यातही पाश्चात्य समाजात या मंडळींना मिळणारा मान हेवा वाटावा असा असतो. ही मंडळी वेगळ्याच विश्वात वावरत असतात. त्यांना या जगाचं काही भान असतं की नाही? त्यांना या जगात वावरणाऱ्यांबद्दल प्रेम/ राग/ सहानुभूती वगैरे अशा काही भावना असतात की नाही? एखाद्या कलाकाराच्या कलाकृतीमुळे दंगे होत असतील किंवा (भारतासारख्या देशांत) जातीय ताणतणाव निर्माण होत असेल तर त्याची जबाबदारी कोणाची? तसंच शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधांचा जर गैरवापर होत असेल तर त्याची जबाबदारी कोणाची? वगैरे प्रश्न तसे कालातीत आहेत. पण विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून यांना भयानक स्वरूप प्राप्त झालं आहे. यातही दुसरं महायुद्ध संपता संपता अमेरिकेनं जपानवर टाकलेल्या दोन अणुबॉम्बनंतर तर या चर्चेला जोर चढला होता.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अणुशक्तीवर संशोधन सुरू झालं. १९२० व १९३० च्या दशकांत या संशोधनानं वेग पकडला. हे सर्व असंच शांतपणे सुरू राहिलं असतं. पण १९३० च्या दशकात जर्मनीत हिटलरचा उदय झाला. त्याच्या हाती १९३३ साली सत्ता आली. त्याच्या ज्यूद्वेषी राजकारणामुळे लवकरच शास्त्रज्ञांच्या जगतात ‘ज्यू अणुशास्त्रज्ञ’ व ‘बिगर ज्यू अणूशास्त्रज्ञ’ असे दोन गट पडले. त्यानुसार त्यांची भौगोलिक फाळणीसुद्धा झाली. बिगर ज्यू शास्त्रज्ञ जर्मनीत, तर ज्यू शास्त्रज्ञ इतरत्र संशोधन करत राहिले. जर्मनीत या विषयावर संशोधन करणाऱ्या आईनस्टाईनसारख्या नामवंत शास्त्रज्ञाला तर जर्मनी सोडून अमेरिकेत आश्रय घ्यावा लागला होता. जर्मन अणुशास्त्रज्ञांचा नेता म्हणजे हायझेनबर्ग जो ज्यू नव्हता. पण ज्याला आईनस्टाईनची मांडणी मान्य होती. आईनस्टाईनच्या मांडणीला त्या काळी ‘ज्यू शास्त्र’ असं कुत्सितपणे संबोधलं जात होतं. हायझेनबर्ग आईनस्टाईनची मांडणी मान्य करत होता, म्हणून त्यालासुद्धा ‘गोरा ज्यू’ म्हणून हिणवलं जात होतं.

दुसरीकडे बिगर ज्यू शास्त्रज्ञांचा नेता म्हणजे नील्स बोर. यात आणखी एक गंमत आहे. ती म्हणजे हायझेनबर्ग बोरचा एके काळचा शिष्योत्तम. तो बोर यांच्याकडे १९२४ सालापासून संशोधन सहाय्यक म्हणून काम करत होता. पण आता तो एका प्रकारे शत्रूपक्षात बसलेला. ही वस्तुस्थिती डोळ्यांसमोर ठेवून ब्रिटिश कादंबरीकार व नाटककार मिशेल फ्रेन यांनी ‘कोपनहेगन’ हे सुमारे दोन तास चालणारं वैचारिक नाटक लिहिलं.

मिशेल फ्रेन यांची दोन महत्त्वाची नाटकं म्हणजे ‘कोपनहेगन’ व ‘डेमोक्रॅसी’. ही दोन्ही नाटकं राजकीय व तत्त्वज्ञानात्मक आहेत. यात अतिशय गंभीर मुद्दांची चर्चा आहे. ‘डेमोक्रॅसी’ जर्मनीचं एकत्रीकरण होण्याअगोदर पश्चिम जर्मनीचे चॅन्सेलर असलेले विली ब्रॅड व त्यांचा स्वीय सहाय्यक गुंटर गुलीयम यांच्या संबंधांवर आहे. गुंटर पूर्व जर्मनीचा गुप्तहेर होता हे सांगितलं म्हणजे नाटककार फ्रेन यांनी ‘डेमोक्रॅसी’ या नाटकात कोणतं वैचारिक शिवधनुष्य उचललं असेल याचा अंदाज करता येतो.

असंच शिवधनुष्य त्यांनी ‘कोपनहेगन’ नाटकातही उचललं आहे. या नाटकात तीन पात्रं आहेत. नील्स बोर (१८८५-१९६२), त्याची पत्नी मार्गारेट (१८९०-१९८४) व हायझेनबर्ग (१९०१-१९७६). या तिघांत झालेले वैचारिक वाद, चर्चा, आरोप-प्रत्यारोप, एकमेकांना दिलेला दोष म्हणजे हे नाटक. यात मार्गारेटची भूमिका एखाद्या पंचासारखी असते. ती जेव्हा हायझेनबर्ग व बोर एकमेकांबर आरोपांच्या फैरी झाडत असतात, तेव्हा योग्य वेळी हस्तक्षेप करून त्यांच्यातील चर्चेला दिशा देते. या दोन अंकी नाटकाची सुरुवात महत्त्वाच्या घटना घडून गेल्यावर आणि त्या तिघांचा मृत्यू झाल्यानंतर अनेक वर्षांनी होते. नाटकाचा सुरुवातीलाच मार्गारेट एक प्रश्न उपस्थित करते – ‘हायझेनबर्ग सप्टेंबर १९४१ मध्ये कोपनहेगन इथं बोरला का भेटायला आला होता?’ हा प्रश्न नाटकाच्या केंद्रस्थानी आहे. त्याचा मागोवा म्हणजेच हे नाटक.

या प्रश्नाला उत्तर देताना हायझेनबर्ग म्हणतो- ‘गेल्या अनेक वर्षांत मी या प्रश्नाचं उत्तर अनेक वेळा दिलेलं आहे - बोअर/ मार्गारेट यांना, गुप्तहेरांना, पत्रकारांना, सरकारच्या प्रतिनिधींना… पण दर वेळेस मलाच माझ्या उत्तरातील अनिश्चितता जाणवली.’ यामुळे नाटकातील गूढ अधिकच गडद होत जातं. बघता बघता प्रेक्षक या नाटकांत ओढला जातो. प्रेक्षकांनासुद्धा कोपनहेगन शहरात भेट का झाली, त्या भेटीत काय ठरलं आणि काय चर्चा झाली याबद्दल कुतूहल निर्माण होतं.

ही भेट दोन साध्या शास्त्रज्ञांतील नव्हती, तर दोन अशा शास्त्रज्ञांतील होती ज्यांच्या संशोधनामुळे जगाचं राजकारण कायमचं बदललं. आजही अखिल मानवजात अणुशक्तीचे भलेबुरे परिणाम भोगत आहे. म्हणून प्रेक्षकगृहातील प्रत्येक प्रेक्षक नाटकात गुंतला जातो. आपल्या जीवनमरणाच्या प्रश्नांची रंगमंचावर चर्चा सुरू असल्याचं भान प्रेक्षकांत जागृत होतं.

हायझेनबर्ग व बोर यांच्या ‘त्या’ भेटीत काय बोलणं झालं याबद्दल ते दोघे निरनिराळे खर्डे बनवतात. यात प्रत्येक वेळी वेगळा मुद्दा समोर येतो. याचं कारण ही भेट सप्टेंबर १९४१ मध्ये झाली, तेव्हा दुसरं महायुद्ध ऐन भरात होतं, हिटलरची सरशी होत होती, जपानवर अणुबॉम्ब पडायचे होते. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचे भयानक परिणाम, ज्यूंचा झालेला नरसंहार, अणुबॉम्बमुळे उदध्वस्त झालेली हिरोशिमा व नागासाकी ही शहरं वगैरे घटना जगासमोर यायच्या होत्या.

आता हे सर्व माहिती असलेले हे गुरु-शिष्य ‘त्या’ भेटीत काय चर्चा झाली होती याबद्दल ठरवत आहेत. म्हणजे मग दोष कोणाला व किती द्यायचा? दोघांपैकी कोण हा नरसंहार थांबवू शकलं असतं? अमेरिकेच्या आधी हिटलरच्या हाती अणुबॉम्ब लागला असता तर? हायझेनबर्गनं जाणीवपूर्वक जर्मनीत राहून अणुशक्ती विकासाचा कार्यक्रम अगदी धिम्या गती पुढे जाऊ दिला का? त्यामुळेच हिटलरच्या हाती वेळेत अणुबॉम्ब लागला नाही का? वगैरे डोक्याचा भुगा करणारे प्रश्न चर्चेत येतात.

नाटकात शेवटी काय होतं हे सांगण्यात गंमत नाही. कारण तसं काहीही होत नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे महत्त्वाच्या घटना खूप वर्षांपूर्वीच घडून गेलेल्या आहेत आणि त्या आता बदलता येणार नाहीत. या नाटकाचं खरं यश आहे ते त्यातील नाट्यपूर्ण चर्चांमध्ये.

या नाटकाचं मराठी भाषांतर पदार्थविज्ञान शिकवण्यात हयात घालवलेल्या डॉ. शरद नावरे यांनी केलं आहे. मात्र नावरेंची ही ओळख अगदी अपुरी व काहीशी अन्यायकारक आहे. ‘सत्यकथा’ या मासिकाच्या एप्रिल १९७७ च्या अंकात ‘चार डावे दृष्टीक्षेप’ असा खास विभाग प्रसिद्ध झाला होता. यात तेव्हा मराठीत गाजत असलेल्या चार महत्त्वाच्या पुस्तकांची मार्क्सवादी समीक्षा पद्धतीनं चर्चा केली होती. हे लेख म्हणजे डॉ. मोहन देशपांडे यांचा किरण नगरकरच्या ‘सात सकं त्रेचाळीस’ वरचा लेख, अशोक राजवाडे यांचा सुधीर भट यांच्या ‘रंग माझा वेगळा’ या काव्यसंग्रहावरचा लेख, सुधीर बेडेकरांचा रा.भा. पाटणकरांच्या ‘सौंदर्यमीमांसा’ या पुस्तकावरचा लेख. यातील चवथा लेख डॉ.शरद नावरेंचा होता. त्या काळी गो. पु. देशपांडेंचं ‘उदध्वस्त धर्मशाळा’ हे नाटक गाजत होतं. नावरे यांनी या नाटकावर म.वा. धोंड यांच्या लेखाची व नाटकाची समीक्षा करणारा लेख लिहिला होता. (‘चार डावे दृष्टीक्षेप’सारखी जबरदस्त वैचारिक चर्चा मराठी साहित्याची चिमुकल्या जगात आता अगदीच विरळा!).

‘कोपनहेगन’चं भाषांतर करताना डॉ. नावरे यांनी अतिशय सोपी भाषा वापरली आहे. त्यामुळे नाटक जरी अतिशय गुंतागुंतीच्या विषयावर असलं तरी सहज सोप्या भाषेमुळे प्रेक्षकांना त्यातील ताणतणाव सहज भिडतात.

नाटकाची निर्मिती कोल्हापूरच्या ‘प्रत्यय हौशी नाट्य कला केंद्र’तर्फे करण्यात आली आहे. या नाटकात तीन नट आहेत. डॉ. शरद भुताडीया (निल्स बोर), मेघना भागवत (मार्गारेट बोर) व सागर तळाशीकर (हायझेनबर्ग) या तिघांनी आपापल्या भूमिका समजून सादर केल्या आहेत. तिघांच्या अभिनयाचा दर्जा फार वरचा आहे. खूप वर्षांनी मराठी रंगभूमीवर असं नाटक बघायला मिळालं. वैचारिक नाटकांतील एक गंमत म्हणजे यातील संघर्षाकडे प्रेक्षकांचं एवढं लक्ष केंद्रित झालेलं असतं की, अभिनयाची दखल घेता येणं अवघड असतं. ‘कोपनहेगन’मध्ये तसं होत नाही. भुताडीयांचा निल्स बोर, त्याला तोडीस तोड तळाशीकरांचा हायझेनबर्ग, त्यांच्यातील संबंधांना साक्ष असलेली मार्गारेट बोर हा त्रिकोण प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. १९९० च्या दशकात विजय तेंडुलकर ‘दैनिक लोकसत्ता’त ‘रामप्रहर’ नावाचं दैनिक सदर लिहीत असत. त्यात तेंडुलकरांनी एकदा डॉ. शरद भुताडीयांच्या ‘किंग लिअर’वर लिहिलं होतं. या नाटकातील भुताडीयांचा सहजसुंदर अभिनय दीर्घकाळ लक्षात राहिल असा आहे.

या नाटकाचे दिग्दर्शन डॉ. शरद भुताडीयांनीच केलं आहे. नाटकाचा वैचारिक गाभा लक्षात घेत त्यांनी रंगमंचावर भाराभार प्रॉपर्टी ठेवली नाही. ही रचना नाटकातील मोकळेपणानं होत असलेल्या वैचारिक चर्चेला पूरक ठरते. या नाटकातील प्रकाश योजनेचा (साहिल कल्लोळी व समीर पंडितराव) खास उल्लेख करावा लागेल. पार्श्वसंगीताची जबाबदारी नरहर कुलकर्णी, रोहित व ह्यषीकेश यांनी सांभाळली आहे. ‘उदध्वस्त धर्मशाळा’नंतर इतकं सकस वैचारिक नाटक मराठी रंगभूमीवर बघायला मिळालं नव्हतं.

.............................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे मुंबईमध्ये अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत.

nashkohl@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Raviprakash Karambalikar

Fri , 02 April 2021

वा!! फारच अप्रतिम लिहिलंय तुम्ही! 'कोपनहेगन'मधील तिघांचं मंथन काय असेल, यासंदर्भात विलक्षण कुतूहल निर्माण झालं आहे! हे नाटक आता पाहायलाच हवं. एक दुरुस्ती: 'रंग माझा वेगळा' हा सुरेश भट यांचा कवितासंग्रह आहे.


Raviprakash Karambalikar

Fri , 02 April 2021

वा!! फारच अप्रतिम लिहिलंय तुम्ही! 'कोपनहेगन'मधील तिघांचं मंथन काय असेल, यासंदर्भात विलक्षण कुतूहल निर्माण झालं आहे! हे नाटक आता पाहायलाच हवं. एक दुरुस्ती: 'रंग माझा वेगळा' हा सुरेश भट यांचा कवितासंग्रह आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख